सर्जनशील कलावंत, विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक : काशीनाथ साळवे.



काशीनाथ साळवे हे नांव आल्यावर माझ्या डोळ्यासमोर येतात ते चक्क पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीचे जे.जे.संस्थांमधील सुवर्णमयी काळातील क्षण. आम्ही होतो उपयोजीत कला संस्थेत, तर काशीनाथ होता स्कुल ऑफ आर्टच्या पेंटींग विभागात. आमच्याकडे हणमंते, दामू केंकरे, साठ्ये, देसाई, पवार, तिरोडकर यासारखे निष्णांत असे शिक्षक होते, तसे तेथेही धोंड, पळशीकर, सुकडवाला, सोलापूरकर, वसंत परब,सोनावडेकर, साबण्णवार, संभाजी कदम, गजानन भागवत असे मातब्बर कला शिक्षक कार्यरत होते. तेथे काशीनाथ साळवे, प्रभाकर कोलते, वसंत सोनवणी, पॉल कोळी, रमेश कांबळी, असे मित्र असत. व आमच्याकडे मी, नागवेकर, खांबेकर, असे होतो. आमचेही तेथे तसेच त्यांचे आमच्याकडे येणेजाणे सुरु असे. आणि आम्हीही  सर्व समवयस्क व समविचाराचे असल्याने काशीनाथ साळवे, प्रभाकर कोलते, वसंत सोनवणी,  रमेश कांबळी, पॉल कोळी यांच्याशी आमची घनिष्ठ मैत्री झाली. विचारांची देवाण घेवांण होवू लागली

काशीनाथ सत्यवान साळवे यांचा जन्म १९४४ सालचा अहमदनगर मधील. ते शिक्षणासाठी मुंबईला आले. १९६३ साली त्यांनी सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधे पेंटींग विभागांत प्रवेश घेतला. तेथे त्यांना कला शिक्षक मिळाले तेही विद्यार्थ्यांना मुलाप्रमाणे जपणारे, आणि ज्ञानार्जन करणारे. जितके कला संपन्न होते, तितकेच ज्ञानाने परीपूर्ण होते. त्यामध्ये होते ते, प्रा. शंकर पळशीकर, सोलापूरकर, वसंत परब, गजानन भागवत, सुकडवाला अश्यानी त्यांचे जीवन घडवण्यात हातभार नक्कीच लावला. सुरुवातीला पळशीकर त्यांना अबोल, गंभीर व थोडेसे अहंकारी वाटत. पण पुढे त्यांचा जसा सहवास मिळत गेला, तसे त्यांचा मूळ स्वभाव त्यांना समजू लागला. एखाद्याचे काम आवडले, तो माणूस आवडला की पळशीकर त्याच्यासाठी मग वाटेल ते करीत. आणि अश्या पळशीकर सरांच्या जवळच्या विद्यार्थ्यांमध्ये काशीनाथ आपल्या कामाच्या ताकदीवर आला. त्यांचा बराच सहवास काशीनाथला मिळाला.  आणि १९६८ साली त्याने आपले शिक्षण संपवले व तो अंतीम वर्षाच्या परीक्षेत प्रथमश्रेणीत गुणवत्तेने उत्तीर्ण होऊन त्याने जे.जे.मध्येच फेलोशीप घेतली व पुढच्याच वर्षी तो अध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवू लागला. त्या वर्षीच्या वार्षीक प्रदर्शनात त्याने सुवर्ण पदक जिंकले. अंतीम वर्षात शिकत असतांना काशीनाथला कॅनडास्थित असलेले प्रख्यात पेंटर मोहन सामंत यांची चित्रे पहाण्याचा योग आला. त्यावेळी सामंत आपल्या चित्रांचा शो कॅनडाहून मुंबईला घेऊन आले होते.  त्याचा प्रभाव  काशीनाथच्या चित्रावर पडला.  धागा व प्लॅस्टर ऑफ पॅरीस याच्या तंत्राचा वापर  पेंटिंगवर ज्या तऱ्हेने सामंतांनी केला होता, ते साळवेना खूप भावले. आणि त्याचीही चित्रे त्या अंगाने जाऊ लागली. नवनवीन तंत्रे ते आपल्या पेंटींग मध्ये वापरू लागले. द्विमीती व त्रीमीतीचा सुंदर मिलाफ ते आपल्या चित्रांतून घडवू लागले


पुढे हळूहळू ते पेंटींग कडून ग्राफीक कडे वळु लागले. याला कारण होते, ते एकतर त्यांना ग्राफ़िक मध्ये तंत्र वापर व प्रयोगशिलता यासाठी खूप वाव होता. आणि त्याखेरीज त्यांनाही जाणवू लागले, की आता मोहन सामंतांच्या शैलीतून बाहेर पडायचे, हाही हेतू त्यामध्ये होता. एक शिक्षक म्हणून साळवे अत्यंत योग्य, आणि कार्य तत्पर होते. विद्यार्थ्यांमध्ये मिसळून काम करणारे शिक्षक म्हणून साळवे अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय ठरले. कधीही जा, ते विद्यार्थ्यांमध्ये काम करतांना दिसून येत. नंतर प्रिंट- मेकींग मध्ये त्यांचे सतत काम चालू असे. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा दर्जा इतका वाढवला की त्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले. त्यांचे काम ओळखले जाऊ लागले. साध्या विषयातून ते जेंव्हा अमूर्त असे चित्र आविष्कृत करीत तेव्हां आपल्याला त्यातून जाणवणारी लय जाणवते. अनेक विद्यार्थी त्यांचे शिष्य बनले. त्यांचा मागोवा घेऊ लागले. आणि साळवेना निरनिराळ्या ठिकाणाहून प्रिंट-मेकिंगच्या कार्यशाळेसाठी आमंत्रणे येऊ लागली. त्यातील एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झाली. जे.जे.मध्ये कितीतरी विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होवू लागले. आणि त्यांच्या सतत गराड्यात काशीनाथ साळवे दिसू लागले. जोडीला होते ते त्यांचे मित्र प्रभाकर कोलते, पॉल कोळी, रमेंश कांबळी इत्यादी. सर्वच सर्जनशील मनाचे आणि समविचारांचे. आणि त्यानंतर काशीनाथची घोडदौड सुरूच राहीली.

काशीनाथ साळवे ह्यांचे अस्तीत्वच कलाकारांच्या मेळाव्यात एक प्रसन्नता आणीत असे. त्यांचा सदैव हसरा चेहरा, थोडेसे खांदे झुकवून खाली मान घालून चालणे, कोणालाही भेटताच त्याला आपुलकीनं 'दादा' अशी आदराची उपाधी लावून बोलणे, कधीही कोणावर ओरडून अथवा रागाने न बोलणे, ह्या सर्वच गोष्टी त्यांच्या साधेपणात भर घालीत असतात. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी अनेक कलाकारांची मैत्री जोडली. कोणत्याही कामाला तत्परतेने होकार देऊन मदत करायला एका पायावर तयार. आणि तेही मनापासून. जे.जे.ला एक पवीत्र मंदीर मानणारे लोक होते हे!  पुढे १९७५ साली पळशीकर सर अधीष्ठाता म्हणून निवृत्त झाले.  त्यानंतर  आलेल्या साडवेलकर सरांच्या कारकिर्दीत अनेक शिक्षकांच्या बदल्या नागपूर-औरंगाबाद येथे झाल्या. त्यात आमच्या काशीनाथचाही नंबर लागला. जे.जे.मध्ये उभारलेले गुरु-शिष्याचे गुरुकुल संपुष्टात आले. आणि १९७६ साली काशीनाथ नागपूर येथील 'चित्रकला महाविद्यालय' येथे डेरेदाखल झाले. तेथील विद्यार्थी हे बहुतेक कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाला बांधील असत. नशीबाने त्यांचे मुंबईतील सर प्रा. वसंत परब देखील तेथे अधिष्ठाता म्हणून बदलीवर आले होते. काशीनाथच्या ध्यानांत आले की तेथील विद्यार्थ्यांना मनापासून शिकण्याची आवड आहे. आणि तेथेही काशीनाथने कंबर कसली, व मुलांना कलाज्ञान देण्यास सुरुवात केली. त्यामध्ये खरोखरीच अत्यंत सुंदर काम असलेले विद्यार्थी होते. आणि नागपूरचे विद्यार्थी म्हणजे त्यांना शिक्षकाकडून कांही योग्य शिकायला मिळते म्हटल्यावर ते त्यांच्यावरून जीवही ओवाळून टाकतील असे होते. हा अनुभव पुढे मीही घेतला आहे. तेथेही बबन बेसेकर, रघु नेवरे, सविन्द्र सावरकर असे विद्यार्थी त्यांना मिळाले. त्यात कांही उपद्रवी होतेच, व त्यानां उचकवणारे शिक्षक देखील होते. कारण आपल्या पेक्षा जर कोणी  कामात जास्त उजवा आहे असे वाटले, तर त्यांना त्याबद्दल मत्सर निर्माण होतोच. असे एक दोन शिक्षक तेथेही होते. पण अरुण मेंदुळे, अप्पासाहेब काटे यांच्यासारखे बरेचशे शिक्षक देखील तेथे त्याचे चहाते होते.

मात्र नागपूर सारख्या ठिकाणी जरी विद्यार्थ्यांना त्याच्या कामाचा लाभ झाला तरी साळवेंच्या कामाला तसा कांही खास वाव नव्हता. स्वतःची कला आविष्कृत करण्यासाठी तशी संधी नव्हती. तेंव्हा त्यांनी आपले भाव प्रकट करण्यासाठी पेंटींग -ग्राफिक कडून आपला कल म्यूरलकडे वळवला. त्यांची  सिरॅमिक मधील आवड त्यांनी जोपासायची ठरवली. ते महाराष्ट्राच्या अंतर्भागात फिरून तेथील तेथिल गोष्टींचा, साहित्याचा  अभ्यास करू लागले. आणि ह्या त्यांच्या आवडीने त्यांना 'भद्रावती' येथे नेले. तेथे खादी ग्रामोद्योग भांडारचे संचालक एस.मिरमारा यांच्या मार्गदर्शनाखाली क्ले मधून मिळणाऱ्या विवीध श्यक्यता ते शिकू शकले. आणि याचा परीणाम म्हणजे साळवे यांनी केलेले मुंबईतील 'भारतीय रिझर्व्ह बॅंक’चे सिरॅमिक मधील म्युरल. त्यामध्ये त्यांनी वापरलेले अलंकारीक मोटीफ, प्रतीके पाहील्यावर जाणवतो तो त्यातील गर्भीतार्थ. ह्या म्यूरलसाठी त्यांनी 'ग्रोथ' हा विषय घेतला होता. यामध्ये त्यांनी उठाव व खोली याचा कल्पक वापर केला आहे.  त्यात आहे एक अखंड अशी गती आणि लय. दरम्यान १९८१ साली मी नागपूरला बदलीवर गेलो. पुन्हा आमची तेथें भेट झाली. जरी आम्हां दोघांचे विभाग वेगळे होते, तरी  मी त्यांच्या ज्ञानाचा वापर आमच्या उपयोजीत कलेसाठी करून घेत असे. आम्ही सर्वानी मिळून तेथे संस्थेचे बंद पडलेले वार्षीक 'रुपांजली! सुरुवात केले. जोडीला आमचा जे. जे. मधील मित्र अरुण मेंदुळे व हेमंत वैद्य देखील तेथेच होते. तसेच धनंजय वर्मा देखील तेथेच होता. पण तो त्यावेळी धार्मीकतेकडे वळला होता. साळवेने तेथेही सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली होती. सतत कामामध्ये मग्न असे तो! नागपूरच्या आमदार निवासवर व युथ काॅंग्रेसच्या कार्यालयावरील त्यांनी केलेली म्युरल्स अशीच कल्पक होती.  मात्र हणमंते व मी तेथे गेल्यावर त्याला थोडासा दिलासा नक्कीच मिळाला असेल. व हणमंते पुन्हां मुंबईला परतल्यावर मीच तेथे प्रभारी अधिष्ठाता म्हणून वर्षभर काम पहात होतो. त्यावेळी काशीनाथला त्रास होणार नाही, याकडे मी लक्ष देत असे. विद्यापीठाच्या वार्षीक परीक्षेला मुंबईहून आमचे जे.जे.मधील मित्रच तेथे येत. त्यातही कोलते सारखे कोणी आले की आमची तिघांची बैठक भरणे ठरलेलेच असे.मग काशीनाथच्या घरी जेवणाची पार्टी ही ठरलेली. असे मजेत दिवस चालले होते आमचे!


पुढे काशीनाथ साळवे  १९७६ साली  पुन्हां मुंबईला आले. तोपर्यंत येथेही बरेच बदल झाले होते. बहुतेक पूर्वीचे सर्व प्राध्यापक निवृत्त झाले होते. नवीन लोक आले होते. त्याची झळ प्रभाकर कोलते व काशीनाथ साळवे या दोघांनाही बसत होती. पुढें कोलते यांनी नोकरीचा राजीनामा दिला. जे.जे. मधील आणखी एक स्तंभ निखळला. आज कोलते एक श्रेष्ठ दर्जाचे जागतीक चित्रकार म्हणून ओळखले जातात. पण दरवर्षी दोन मार्च रोजी जे.जे.च्या वर्धापनदिनाला हमखास येऊन जमशेटजी जिजीभॉय यांच्या स्मृतीला वंदन करतात. नंतर साळवे तेथे विभागप्रमुख झाले. वसंत सोनवणी अधिष्ठाता झाले. त्यानंतर वसंत सोनवणी, पॉल कोळी, काशीनाथ साळवे व पाठोपाठ मी असे आम्ही सर्वच तेथून निवृत्त झालो. आणि आमच्या वेळची एक संपूर्ण पिढी जे.जे.मधून बाहेर गेली.  तसे पाहीले तर  काशीनाथ यांची १९६३ सालापासून कलाशिक्षणाशी ओळख झाली. पुढची सुमारे ३३ वर्षे त्यांनी जे.जे.मध्ये अध्यापन केले. विद्यार्थ्यांना शिकवले. त्यांना मार्गदर्शन करणारा एक स्वयंप्रकाशी दीपस्तंभ म्हणून सतत कार्यरत राहीले. अध्यापक झाल्यावर आपल्या सहकाऱ्यांचा एक ग्रुप बनवून गॅलरी घेऊन सर्वांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवीले. आपल्या कला जीवनाच्या प्रवासात साळवेंनी अनेक माध्यमे हाताळली. अनेक विषय त्यांनी  आपल्या पेंटींगसाठी निवडले. आपल्या कलेतून आशय व्यक्त करण्यासाठी ते मानवाकृती, प्रतीकात्मक, व रचनात्मक अशी चित्रशैली वापरत. त्यांच्या मानवाकृतीही पूर्ण वास्तववादी शैलीच्या नसून त्या शैलीदार अश्या आधुनिकतेकडे झुकणाऱ्या आपल्याला जाणवतात.  उत्तम कला शिक्षक म्हणून ते ख्यातनाम पावलेच होते. शिवाय एक उत्तम पेंटर, म्युरलिस्ट व व प्रिंट मेकर म्हणूनही ते राष्ट्रीय स्तरावर गाजत होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ठिकाणी प्रिंट मेकिंगचे वर्कशॉप घेतले. गोव्याच्या कला महाविद्यालयातही त्यांनी सिरॅमिकचा वर्कशॉप घेऊन तेथील विद्यार्थ्यांकडून एक सूंदर असे म्युरल करवून घेतले.  तेथे त्यांना जाणवले की महाराष्ट्राबाहेर अश्या कला विद्यार्थ्यांना आपली कला आविष्कृत करण्याची सोय आहे, तशी या आपल्या राज्यात नाही.

१९९५ ते २००० दरम्यान साळवे हे दिल्लीच्या ललित कला अकादमीचे सभासद होते. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या संस्थेत अंतर्गत कला क्षेत्रातील विविध उपक्रम केले जात असत. चित्रांची प्रदर्शने आयोजीत केली जात. आणि साळवेंच्या आयुष्यातील 'गढी वर्कशॉप' हा त्यातीलच एक होता. या उपक्रमात त्यांना जाणवले ते कलेविषयी आस्था असली की कलाकार काय करू शकतो ते! गढीमध्ये चित्र, शिल्प, सिरॅमिक, ग्राफीक -प्रिंट मेकींग या सर्व कलांसाठी आवश्यक त्या सर्व सोयींनी उपयुक्त असा सुसज्ज स्टुडीओ होता. तेथे येणाऱ्या कलावंतांना राहण्यासाठी निवासाचीही सोय आहे. देशातील अनेकजण त्याचा लाभ घेतात. आपल्याकडे तश्या सोयी नसल्यामुळे ट्यालेंट असूनही काम करता येत नसे. या विचाराने साळवे चिंताग्रस्त होते. त्या दृष्टीने तसा स्टूडीओ उभारण्याचा त्यांनी प्रयत्नही सुरु केला. पण यश आले नाही. पुढे २००१ साली जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधून निवृत्त होताच त्यांच्या प्रिंट मेकींगच्या या कल्पनेने पुन्हां उचल घेतली. तेंव्हा ग्रॅंट रोडवरील रॉबर्ट मनी टेक्नीकल स्कुल मध्ये जागा मिळवून २००१ साली त्यांनी स्टुडीओ उभारून प्रिंट-मेकिंगच्या कामाला सुरुवात केली. अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकार तेथे येऊन त्यांनी त्या स्टुडीओत कामही केले. त्यामध्ये पदमश्री लक्स्मा गौड, ज्योती भट, अनुपम सूद असे तोलामोलाचे कलाकार होते. २००९ पर्यंत हा स्टूडीओ खूप चांगल्या तऱ्हेने चालला. पण पुढे त्या शैक्षणिक संस्थेचे पुनर्निर्माण करण्याच्या हेतूने संस्था चालकांकडून ती इमारत पाडण्यात आली व साळवेंचे काम पुन्हा थबकले. पण साळवे स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हते. पुन्हां नवीन उमेदीने त्यांनी जागेची शोधाशोध सुरु केली. गढी सारखे वर्कशॉप मुंबई मध्ये सुरु करण्याचे मनाने पक्के ठरवले होते. शासनाने फिल्म सिटी रोडवर जागा देण्याचे ठरवले, पण ते पुढे साध्य झाले नाही. गढी सारख्या सुविधा मिळाल्यावर प्रिंट-मेकिंग सोबत सिरॅमिक सुद्धा करता येईल व येथील तरुण मुलांना मुंबई मध्ये नांव करता येईल यासाठी  काशीनाथ साळवेंची तळमळ चालली होती.

साळवेंनी पुन्हा नव्या उमेदीने जागेची शोधाशोध सुरु केली. सुरुवातीला त्यांना ठाण्यातच कोठारी कंपाऊंड मध्ये जागा मिळाली. त्यानंतर वागळे इस्टेट येथे स्टुडीओसाठी प्रशस्त अशी जागा मिळाली. आजूबाजूला शांत असा परीसर असलेली जागा भरपूर प्रकाश आणि खेळत्या हवेने युक्त अशी होती. एकाच वेळी सुमारे वीस कलाकार काम करू शकतील अशी.
प्रिंट-मेकिंग करतांना त्याला बऱ्याच प्रोसेस मधून जावे लागते. आर्ट वर्क, इचिंग, ॲसीड बाथ, अशा सर्व प्रक्रीया त्यामागे असतात. इचींगचे मशीन ज्योती भट यांनी स्टुडीओला देणगी दाखल दिले.  प्रत्येकी दहा ते पंधरा हजार रुपये किमतीचे  प्रिंटिंगसाठी रोलर, चेन्नईहून आणले. लिथोग्राफी मशीन बडोदा येथें अकबर पदमसी यांनी स्वतःच्या देखरेखीखाली तयार करून घेतले. प्रिंट-मेकींग कला माध्यमात काम करू इच्छीणाऱ्या सर्वच चित्रकारांना येथे काम करता येते. यामध्ये व्यावसायीक, होतकरू, नाणावलेले व हौशी अश्या सर्व स्तरावरील चित्रकारांना काम करत येते. साळवेंचे एक स्वप्न त्यांनी स्वतःच साकारले. अनेकांनी त्याचा लाभ घेतला. पण पुढे आर्थीक सहाय्य जसे हवे तसे मिळत नवहते. शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. पण तेथेही निराशेचा सूर होता. तरीही साळवेनी बरेच लोक तयार केले.


त्यानंतर साळवेंनी आपली जमा पुंजी एकत्र करून देशभर भ्रमण केले. अनेक कलाकारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या कलाकृतींच्या 'लिमीटेड एडीशन प्रिंट्स' बनवल्या. प्रिंट-मेकिंग सारखा कमी माहीतीच्या कलामाध्यमाला प्रसीद्धी देण्याचे  साळवे यांचे जे एकखांबी  प्रयत्न चालले होते, त्यांकडे वरळीच्या 'इंटर नॅशनल क्रिएटीव्ह आर्ट सेंटर' (ICAI) चे संचालक
श्री. रवींद्र मार्डीया यांचे लक्ष गेले. व साळवे यांच्या सर्जनशीलतेने, त्यांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठानी भारावून जाऊन त्यांनी साळवे यांना त्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यास व त्या प्रिंट्सचे एक 'कॉफी  टेबल बुक' प्रसीद्ध करण्यास मदत केली. या भव्य अश्या '१११ प्लेटोग्राफीक एक्स्प्रेशन्स' नांवाच्या कॉफी टेबल बुक मध्ये जागतीक कीर्तीचे कलाकार अकबर पदमसी, क्रिशन खन्ना, सतीश गुजराल, ललिता लाझमी अश्या नामांकितांचे प्रिंट्स त्यांच्या मूळ सहीनिशी आहेत. यामध्ये त्यांच्या कामासोबतच त्यांची काम करण्याची पद्धत शिवाय कलाकार स्वतः त्याची सही करतानाचे  त्यांची छायाचित्रेही त्यात छापली आहेत. शिवाय कोणालाही हवा तो प्रिंट विकत घेता येत असे. याबद्दल बोलताना साळवे म्हणाले, ' यामागची कल्पना अशी आहे की प्रिंट्स बाबतीत लोकांच्या मनात प्रथम जागृती निर्माण करणे. जरी ते मुद्रीत असले तरी ते प्रत्यक्ष त्या चित्रकाराकडून स्वाक्षरी केलेले आहेत. आणि ज्या कोणा रसीकांना मूळ चित्रांची अवाढव्य किंमत देऊन विकत घेता येत नाहीत, त्यांना हे सहज घेता येतील. मूळ चित्र घ्यायचे म्हटले तर त्यासाठी करोडो रुपये घालवावे लागतात. तेथे ही प्लेटोग्राफीक मुद्राचित्रे  केवळ  साठ हजर ते सव्वालाख रुपयांपर्यंत खरेदी  करता येतात. येथील चित्रकार हुसेन, गायतोंडे, तय्यब मेहता, रझा, अकबर पदमसी, शांतिनिकेतन मध्ये शिक्षण घेतलेले आंध्रचे कृष्णा रेड्डी अशानी प्रिंट- मेकींग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली आहे. आपल्याकडेही तसे कलाकार आता घडावेत या भावनेने साळवेंनी हा उपक्रम राबवीला. या ‘प्लेटोग्राफीक प्रिंट प्रदर्शना’ने  व त्याच्या सोबतच्या कॉफी टेबलं बुकने काशीनाथच्या प्रयत्नांना फळ मिळाले, अन त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. कोणीही संग्रह करावे असेच ते पुस्तक आहे. आणि या पुस्तकातून जे पैसे मिळतील ते नवीन कलाकारांना प्रिंट-मेकींग शिकण्यासाठी स्टुडीओच्या मदतीसाठी होतील, हा प्रांजळ हेतू त्यामागे होता. तसेच हे प्रदर्शन पुढे अहमदाबाद, बडोदा, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पॅरीस अश्या ठिकाणी न्यायची होती.


आपल्या कला कारकीर्दीत काशीनाथ साळवे यानी अनेक प्रदर्शनातून भाग घेतला. स्वतःची एकल प्रदर्शने भरविली. ती ही मुंबईच्या जहांगीर कलादालन, ताज आर्ट गॅलरी, सिमरोझा आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर कला दालन. त्रिवेणी आर्ट गॅलरी अश्या ठिकाणी. अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातूनही त्यांचा सहभाग होता. अनेक संस्थांवर ते सभासद म्हणून कार्यरत होते. त्यापैकी कांही म्हणजे ललित कला अकादमी, नवी दिल्ली, भारतीय पारंपारिक कला संस्था, राष्ट्रीय आधुनिक कलासंग्रहालय, मुंबई, बॉंबे आर्ट सोसायटी, अश्या नावाजलेल्या संस्था त्यात समावीष्ट आहेत. त्यांना अनेक मान सन्मान, पारितोषिके यांनी गौरविले गेले आहे. १९७१, १९७५, १९९२ साली त्यांना महाराष्ट्र राज्य कला पुरस्कार मिळाला. १९९५ साली ललित कला अकादमी, नवी दिल्लीचा मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्याच वेळी 'एमीनेन्ट आर्टीस्ट ऑफ इंडिया'  हा पुरस्कार देखील ललित कला अकादमीने त्यांना दिला.जपानच्या सहकार्याने भरवलेले राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या प्रदर्शनाचे ते एक सहभागी होते. १९९० साली बॉंबे आर्ट सोसायटीचे पारितोषिक, १९८५ चे उत्तर प्रदेश ललित कला अकादमीचे पारितोषिक अशी अनेक पारितोषिके  आज त्यांच्या नांवावर आहेत. बांगला देश येथील ढाका येथील 'ग्यालरी कॉसमॉस' या प्रतीष्ठीत कलादालनाने साळवेंच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले होते. त्याला बांगला देशचे पंतप्रधानांचे खास सल्लागार प्रा. गोहर रिझवी हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. शिवाय यू.एस.चे ॲॅंब्यासॅडर डॅन मोझेना व बांगला देशच्या एंटरप्राइज इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष फारुक शोभन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. शिवाय बांगलादेशचे प्रतिष्ठित व नावाजलेले कलाकारही या समारंभाला उपस्थीत होते. यावेळी 'भारत व बांगला देशच्या सांस्कृतीक साम्याचा उल्लेख करून भारतातील श्रेष्ठ कलाकारांच्या कलाकृतींचे दर्शनं येथील कलाकारांना मिळण्याचे भाग्य या प्रदर्शनाने मिळवून दिले, व यामुळे संस्कृतीची देवाणघेवाण होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

२०१९ चा 'अखील भारतीय कला शिक्षण गौरव सम्मान' ह्मा मानाच्या शैक्षणीक क्षेत्रातील सन्मानाने साळवेना गौरवीले गेले.
२०२० च्या जानेवारी महिन्यांत 'आर्ट सोसायटी ऑफ इंडीया' यांनी त्यांच्या १०२ व्या प्रदर्शनानिमित्ताने काशीनाथ साळवे यांना या वर्षीचा 'कला सृजन पुरस्कार'  'ख्यातनाम चित्रकार व प्रिंट मेकर' तसेच, 'सृजनशील कला निपुण शिक्षक'  व त्यांचा विशेष उल्लेखनीय प्रकल्प ' प्लेटोग्राफीक स्टुडिओ' या त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात आला. त्या पुरस्काराच्या वेळी साळवे यांनी आपल्या एकूण कला वाटचालीचा आढावा थोडक्यात घेऊन आपले गुरु प्रा. शंकर पळशीकर यांच्याविषयी आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. पळशीकरांविषयी बोलताना ते नेहमीच भावनाशील होत असतात. भरभरून बोलतात. ते म्हणाले, 'कामाच्या अथवा प्रात्यक्षिकाच्या वेळी पळशीकर बोलत नसत. बोले तो त्यांचा कुंचला. समोरील मॉडेलवरून जेव्हां ते त्याचे पोर्ट्रेट करीत तेंव्हा ते कुठून सुरु करणार आहेत हेही कधी कळत नसे. कधी ते डोक्यावरील केसापासून सुरु करीत, तर कधी हनुवटीवरून. मग हळूहळू एकेक रंगाचा पॅच त्यांच्या कॅनव्हासवर जावून बसत असे तेंव्हां केवळ वीस पंचवीस मिनिटात समोरील मॉडेल प्रत्यक्षात इझलवर जाऊन बसल्याचा भास होत असे', या व अश्या कैक आठवणी काशीनाथ माझ्याशी बोलताना सांगत असे. पळशीकर म्हणत, पोर्ट्रेट हे रांगोळीप्रमाणे आहे. ते डोळे व मन या दोघांनाही भावले पाहीजे. पळशीकरांच्या लयबद्ध रेषा, त्यांचे रेखाटनातील प्रभुत्व, त्यातील जिवंतपणा, रंगांची निवड व त्यांचे विवीध रंगांचे मिश्रण हे अद्भुत होते. त्या काळातही ते प्रयोगशील होते. काळाच्या पुढे चालत होते. त्यांचे म्हणणे ' अमूर्त हीच खरी वास्तवता. बाकी सर्व 'माया' वा आभासी आहे'  हें गुरु प्रेम काशीनाथने अखंड सांभाळले आहे. तसेच याच वर्षी पाठोपाठ फेब्रुवारी महिन्यात 'बॉंबे आर्ट सोसायटी'ने मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते साळवे यांचा सत्कार करून त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात आला. काशीनाथने त्यावेळी चित्रकाराचे एक सूत्र सांगीतले होते, ’ज्याने स्केचींग केले, तो चित्रकार होतो, ज्याने ड्राॅईंग केले, तोच चित्रकार होतो. जो क्रीएटीव्ह करेल तो डिझाइनर होईल. या सर्वासाठी ड्राॅईंग करणे आवश्यक आहे.’


मध्यंतरीच्या काळात काशिनाथ साळवे यांच्या मणक्यावर एक शस्त्रक्रिया झाली. पण त्यानंतर त्यांच्या चालण्यावर बंधने  आली. ते बसून काम करीत असत. पण नंतर तेही  त्रासदायक होऊ लागले . तरीही यातून उठून पुन्हां काम सुरु करायचे, पुन्हां ब्रश, रोलर पकडून रंगांची उधळण कॅनव्हासवर करायची त्यांची जिद्द आहे. आज वयाच्या ७६ व्या वर्षीही त्यांच्या मनांत आहे ती सकारात्मक भूमिका. आणि काशीनाथ, खरोखरीच तुला पुन्हां उभे राहीलेले पहायचे आहे. तुझे ते हास्य तू सतत चेहऱ्यावर बाळगून असतोसच, आता तुला पुन्हा काम करताना पहायचे आहे. पुन्हां तुझा आविष्कार पहायचा आहे. आणि खात्री आहे, त्याला फार वेळ वाट पहावी लागणार नाही.

-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष






Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’