पंचाहत्तरी पार :



दोन वर्षांपूर्वी मी पंचाहत्तरी जवळ आलेला लेख लिहीला होता. आणि बघता बघता पंच्याहत्तरी आली आणि गेलीही! पाठोपाठ आता शहाहत्तरी देखील पार पडली.  वाटते की ही मधली दोन वर्षे न जाता दोन दिवसच गेले आहेत. इतके पटापट दिवस सरले. आणि गेले चार पाच महीने तर दिवस उजाडतो आणि सरतो एवढेच पहाणे नशीबी आले आहे. प्रत्येक पिढी आपल्या गत आयुष्याबद्दल बोलतांना नेहमी त्या भूतकाळात रमून 'आमच्या पिढीने हे पाहीले' असे प्रौढीने सांगत असते. आणि तेही खरेच आहे. कारण प्रत्येक पिढीला त्यांच्या काळात कांही उल्लेखनीय असे पहायला मिळतच असते. त्याबरोबरच ती पिढी वाढत असते, प्रगतीशील होत असते, आणि ती पिढी त्या आठवणी मोठ्या प्रेमाने आपल्या उराशी जपून असते. मात्र या सर्व गोष्टींना छेद देणारी गोष्ट केवळ आपल्याकडेच नाहीं तर संपूर्ण जगात हाहा:कार मांडणारी घडली. ती म्हणजे कोरोना. सगळ्या जगाला कुलूपबंद होऊन घरी बसायला लावणाऱ्या या कोरोना नावाच्या विषाणूने जगभर थैमान घातले. आणि पृथ्वीच्या व्युत्पत्तीपासून कोणीही कधीही न पाहीलेली अजब गोष्ट या पिढीने, नव्हे तर संपूर्ण जगाने पाहीली, अनुभवली. आणि सर्व जग स्तब्ध झाले. जगभरातील जनता एका अर्थाने घरातच नजरबंद झाली. आणि आपण सर्वजण त्या सापळ्यात अडकलो. प्रत्येकजण एकमेकांशी संशयाने पाहु लागला. एका अदृश्य शत्रूशी आपली लढाई सुरु झाली. तो कोणावरही, केव्हाही झडप घालेल आणि क्षणात त्या व्यक्तीचे होत्याचे नव्हते होईल, अशी परिस्थीती आज निर्माण झाली आहे!

या माझ्या पंच्याहत्तर वर्ष्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या. अनेक बरे वाईट अनुभव आले. त्यापैकी बऱ्या गोष्टींना कनवटीला लावले व नको त्या भिरकावून दिल्या. शालेय, महाविद्यालयीन जीवनात सर्वानीच प्रेम दिले. मग ते विद्यार्थी मित्र असोत वा माझे शिक्षक. आज माझे जेजे मधील माझ्या वर्गमित्रांशी जसे स्नेहाचे संबंध आहेत, तसेच ते माझ्या बेळगांवातील शाळेतील वर्गमित्रांशी देखील तितकेच आहेत. त्यांच्याशी एक प्रकारचे स्नेहाचे, ममतेचे आणि आदराचे नाते जडले. का व कसे मला माहीत नाही. पण सहवासात आलेली प्रत्येक व्यक्ती ही जीवनाचाच एक भाग बनून राहीली. माझ्या जेजेच्या कारकिर्दीत अनेकांशी माझा जवळून संबंध आला. त्यांच्याशी केवळ औपचारीक ओळख नव्हे, तर ऋणानुबंध जुळले. आणि ते केवळ कला क्षेत्रातीलच नव्हेत, तर साहीत्यिक, पत्रकार, समाजसेवक, राजकारणी, वरिष्ठ सरकारी अधीकारी, पोलीस अधिकारी असे सर्वच त्यात होते. अश्यांशी  संवाद साधत गेल्याने माझे ज्ञान भांडारही समृद्ध होत गेले. अनेक जेष्ठ कलावन्त सहवासात आले. त्यांच्याही सहवासात आयुष्य संपन्न होत गेले. वाचनाचे वेड तर बालपणापासूनच होते. त्यामुळे अनेक विषयावरील पुस्तके अधाश्यासारखी वाचून काढली. यात लो. टिळकांच्या गीतारहस्यापासून बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यमालापर्यंत सर्वच साहीत्य आले.  आणि  आता जोडीला असतो तो टीव्ही. तो तर आपल्या प्रत्येकाच्या घरचा एक अविभाज्य घटक बनला आहे. तो मनोरंजन करतो, तसेच ज्ञान देखील देतो. आपण ठरवायचं त्यातून काय घ्यायचं ते!  तिच गोष्ट 'गुगल' या सर्च इंजिनची. मात्र त्यावर संपुर्ण अवलंबुन न रहाता ते केवळ 'संदर्भ मित्र' एवढेच मर्यादीत त्याचे महत्व असले पाहीजे. कारण आपल्यासारखेच लोक त्यात भर घालत असतात. त्यामुळे त्यातील सर्वच माहीती अचूक असेलच असे नाही. आणि सोबत करते आहे माझी शाळेत असल्यापासूनची स्केचिंगची सवय. तीही माझा वेळ आनंदी करण्यास मदत करते. मजा येते कागद खराब करण्यात आणि पेन्सीली घासण्यात. आणि महत्वाचे म्हणजे माझी सतत काळजी घेणारे, मला हवे नको ते बघणारे माझे कुटुंब. माझी पत्नी भारती, मुलगे केतन व हर्षद, सून पूजा आणि सर्वांची लाडकी आमची नात सिमरन, ज्यांच्याशिवाय मी जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. प्रत्येकजण मला सुखात ठेवण्यासाठी झटत असतो. त्यांच्या सहवासात वेळ कसा जातो ते कळतच नाही.


आज आठवण येते ती माझ्या अनेक गुरुवर्यांची, अनेक मित्र मंडळींची, जे आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत. त्याच सोबत माझ्या अधिष्ठाता असलेल्या वेळी माझ्यासोबत सावलीप्रमाणे राहणारे कांही माझे अध्यापक मित्रही मी विसरू शकत नाही. २००२ साली मी जेव्हां निवृत्त झालो, त्याकाळात माझा आर्ट स्कुलशी संपर्क तुटला होता. पण तंत्रज्ञानाने मला  व माझ्या  शेकडो विद्यार्थ्यांना खूपच जवळ आणले. 'फेसबूक' या माध्यमातून मला असंख्य मित्रांशी संपर्क साधता आला. पण फेसबुक वरती मी एक पथ्य पाळले होते ते म्हणजे कोणतीही राजकीय भाष्य करणारी पोस्ट त्यावर टाकायची नाही. माझ्या फेसबुक पेजला एक शैक्षणीक दर्जा द्यायचा. त्याप्रमाणे आरंभापासूनच मी तो राखत आलो. मध्ये मी 'बॉंबे आर्ट सोसायटी'ची  माहीती देऊन तिची सुवर्ण पदक विजेती पेंटीग्स दिली. जाहीरात एजन्सीची तसेच जाहीरात क्षेत्रातील घडामोडी सांगणारे 'आर्ट ट्रीव्हिया' हे सदर सुरु केले. जे.जे.उपयोजीत कला संस्थेत मी दाखल झाल्यापासूनचे अनुभव, तेथील शिक्षकवर्ग, त्यांच्याबद्दल माहीती, व्यावसायिक क्षेत्रांतील शिकवायला येणारे कलावंत, माझी मित्र मंडळी, कांही शिक्षक मित्रांची कारकीर्द,  मला आलेले बरे वाईट अनुभव यावर आधारित माझी 'यादोंकी बारात' ही दीर्घ लेखमाला लिहीली. तिला खूप प्रतीसाद मिळाला. ७५ भाग झाल्यावर मी त्या मालिकेचा निरोप घेतला होता. पण विद्यार्थी मित्रांच्या आग्रहाखातर मी तिचे १०० भाग लिहून ती संपवली. ही मालीका म्हणजे जे.जे.चा एका कालखंडाचा प्रवास मानता येईल. आजही कोणाला वाचायला हवी असल्यास माझ्या फेसबुकच्या टाइम लाईनवर माझी ‘ यादोंकी बारात’ वाचायला मिळेल. त्याच सोबत माझ्या जीवन प्रवासात मला वेगवेगळे महापुरुष भेटत गेले. त्याच्या कारकीर्दीचा प्रभाव माझ्या आयुष्यावर पडला. अश्या लोकोत्तर व्यक्तींवर मी 'भेटीगाठीतील हृदयस्थ' ही मालीका फेसबुकवर लिहीली. त्यालाही माझ्या मित्रांकडून चांगला प्रतीसाद मिळाला.

२००१ साली 'नवशक्ती' दैनिकाचे संपादक श्री प्रकाश कुलकर्णी यांनी नवशक्तीच्या  रविवारच्या आवृत्तींध्ये मला कला विषयक सदर लिहिण्याची विनंती केली. आणि माझे 'सृजनरंग' हे कला विषयक सदर मी  लिहिण्यास सुरुवात केली. अनेक व्यक्ती, संस्था, त्या अनुषंगाने आलेले इतर विषय अश्या प्रकारे त्या सदरातून मी आढावा घेत असे. त्या माझ्या सदराला वाचकांचा प्रचंड प्रतीसाद मिळाला. अनेकजणांनी पत्रे पाठवून आपल्या प्रतिक्रिया त्यावर व्यक्त केल्या. मध्यन्तरी मी ते सदर बंद केले होते, पण त्यावर संपादकांना अनेकांची पत्रे, फोन आले, त्यामुळे संपादकांनी पुन्हां मला ते सुरू ठेवण्यास सांगितले. आणि तब्बल बारा वर्षे मी ते सदर लिहीत होतो. यातीलच लेखातून नवचैतन्य प्रकाशनाचे शरद मराठे व माझे चित्रकार मित्र सतीश भावसार यांनी माझी दोन पुस्तके प्रसिद्ध केली, ती 'सृजन रंग' आणि 'कागद, कॅनव्हास आणि कुंचला'. यापैकी 'कागद कॅनव्हास आणि कुंचला या पुस्तकाला लोकमतचा 'ललित गद्य पुरस्कार' मिळाला.  आणि एक दिवस अचानक मला फोन आला तो चंद्रकांत नियतकालिकांचे संपादक श्री राजेंद्र कुलकर्णी यांचा. त्यावेळी नुकतेच दिवंगत झालेले माझें गुरु  कला महर्षी के.बी.कुलकर्णी यांच्यावर 'चंद्रकांत' साठी एक लेख त्यांना लिहून हवा होता. आणि त्या क्षणापासून कुलकर्णींशी जे नाते जुळले गेले ते अखेरपर्यंत. त्यानंतर दरवर्षी 'चंद्रकांत' दिवाळी अंकासाठी ते माझ्याकडून  एक दीर्घ कथा लिहून घेत. कलाकाराची जाण असलेले कुलकर्णी आपला अंक कसा कलात्मक होईल याकडे लक्ष देत असत. त्या 'चंद्रकांत' च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या सर्व लेखावर मा.मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या 'प्रबोधन प्रकाशन' तर्फे माझे 'कॅलिडोस्कोप हे पुस्तक प्रसीद्ध केले. शिवाय मला मधून मधून लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना अश्या वृत्तपत्रातून लेख लिहिण्यास सांगण्यात येत असे. मात्र माझे हे सर्व लिखाण कलेच्या अंगाने जाणारे होते. रायकरांच्या 'दीपलक्ष्मी', मधुवंती सप्रे यांच्या 'ऋतुरंग', प्रकाश कुलकर्णींच्या 'हेमांगी, साळगावकरांच्या 'कालनिर्णय', सतीश नाईकांच्या 'चिन्ह',  'ललित' चा खास विशेषांक अश्या दिवाळी अंकातूनही माझे कलाविषयक लेख प्रसीद्ध झाले आहेत.  शिवाय जागतीक कीर्तीचा जर्मनीचा  हुकूमशहा 'हिटलर' हा चित्रकार म्हणून किती मोठा होता. त्यावर मी लिहीलेला लेख 'नवाकाळ'च्या संपादीका सौ. जयश्रीताई खाडीलकर यांना आवडल्यामुळे त्यांनी मुद्दाम मागवून तो नवाकाळ मध्ये पुनर्मुद्रीत केला होता. शिरीषताई पै यांनीही मी आचार्य अत्रे यांच्यावर लिहिलेल्या लेखावर मला फोन करून लेख आवडल्याचे आवर्जून सांगीतले होते. अश्या प्रकारे माझ्यासारख्या एका अपघाताने 'लेखक' बनलेल्याच्या वाट्याला हे सद्भाग्य आले हेही नसे थोडके!

आणि नंतर मी 'फेसबुक' व माझा नवीन केलेला ब्लॉग 'मी राजा बोलतो आहे' यावर अनेक दिग्गज असे, गतस्मृतीत गेलेले, तसेच जे हयात असूनही लोकांसमोर फारसे न आलेले कलाकार, शिल्पकार, उपयोजीत कलाकार अश्यांचे कला-जीवन रसिकांपुढे उलगडू लागलो. आजच्या पिढीला ज्ञात नसलेले अनेक कलाकारांचे कला जीवन मी शब्दबद्ध केले. अनेक संस्था ज्यांच्याविषयी बहुतेकांना विशेष माहीती नाही, या देखील मी प्रकाशात आणल्या. फेसबुकवर कितीजण हे मनापासून वाचत असतील माहीत नाही, पण कुठेही प्रकाशात न आलेल्या या कलाकारांचे तसेच संस्थांचे दस्तावेजीकरण व्हावे हा मुख्य हेतू त्यामध्ये होता. आणि मी जे लिहीत गेलो तो कांही प्रयत्नपूर्वक लेख लिहायचा म्हणून नाही, अथवा 'गुगल' वरून माहीती घेऊन नाही, तर अनेकांशी माझा संवाद झाला होता, सहवास लाभला होता. त्याच्या भरपूर आठवणी मनात होत्या, ज्या मनांत कल्लोळ माजवत होत्या. त्या अश्या उफाळून बाहेर येत, अन मी माझ्या शब्दांत त्या उतरवत होतो. मी ज्याच्यावर लिहिले आहे, त्या व्यक्तीला आधी कधीच सांगत नसे. त्यांच्यासाठी ते एक प्लेझंट सरप्राईझ असे. मात्र मी एक पथ्य नेहमी पाळले. मी कोणाही विषयी केवळ सकारात्मक लिहीत असे. कोणावरही व्यक्तीशः निंदा अथवा नालस्ती केली नाही. कारण माणूस म्हटला की त्याच्या आयुष्यात बरे वाईट गुण असतातच. पण आपल्या कलेद्वारे त्यांनी जनसेवा काय केली आहे, तो समाजशिक्षणाचा घटक कसा बनला आहे, हे मला महत्वाचे वाटते.  त्यांच्या कलागुणांचे सतत कौतुक केले. त्यांनी थोरवी गायली. अश्या रीतीने माझे अनेक गुणवंतांवर लेख लिहून झाले. आणि हे मी सर्व मांडत असतो ते माझ्या आठवणींच्या खोक्यातून. तो उघडला की आठवणी भरभरून ओसंडू लागतात. त्यांचा शब्दानं शब्द आठवू लागतो. ती सर्व दृश्ये डोळ्यासमोर येतात. एखाद्या टाइम मशीन प्रमाणे मला त्या काळात त्यांच्यासोबत नेतात. आणि त्यांच्याशी झालेल्या गप्पा मी लेखरूपाने तुमच्या समोर मांडतो. विशेष म्हणजे माझा ब्लाॅग हा भारताबाहेरील देशांतून माझ्या कांही माजी विद्यार्थ्यांकडून देखील वाचला जातो हे विशेष!  अजूनही कित्येक जणांच्या आठवणी मनात रुंजी घालत आहेत. बाहेर पडायला धडपडत आहेत. त्या जसजशा बाहेरी पडतील तेव्हां तुमच्यासाठी मी त्या नक्कीच सादर करीत जाईन. त्यामुळे कित्येक अप्रकाशीत कलंदराना लोकांसमोर आणण्याचे भाग्य मला मिळेल हेही कांही कमी नाही. यात माझे केवळ शब्द आहेत. कर्तृत्व आहे ते त्या विभूतींचे. ज्यांनी इतिहास घडवला. आणि मी तो  केवळ तो सर्वासमोर मांडला. माझी जी तिन्ही पुस्तके प्रसिध्द झाली, ती अचानक माझ्या मित्रांनी स्वतः जबाबदारी घेऊन छापली. अजूनही असेच कोणीतरी येईल व माझें आणखीही एक पुस्तक तयार होईल यात मला शंका नाही. कारण माझे प्राक्तन आहे ते!

माझ्या लिखाणावर मला सतत माझ्या मित्रांकडून आवडल्याची पावती मिळतं गेली. बऱ्याच जणांनी त्यांवर टिपणीही केली आहे. माझ्या लेखाचे पहीले वाचक असतात ते विनय नेवाळकर. लेख टाकताक्षणीच तो वाचून त्यावर अभ्यासपूर्ण टिपणी ते नेहमीच देतात. आणि त्याला कारणही आहे. विनय सर्वच क्षेत्रांतील जाणकार आहेत. त्या त्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला आहे. अभ्यासपूर्ण वृत्ती असल्याने त्यांच्याकडे ज्ञानाचे कोठार भरलेले आहे. मग ते कोणत्याही क्षेत्राबद्दल असो. पेंटींग असो. चित्रपट-नाट्य-पत्रकारीता-दिग्दर्शन- अभिनय या सर्वच क्षेत्रातील एक जाणकार म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. आणि त्याचसोबत स्मरणशक्तीची जोड. कोणतीही गोष्ट त्यांना विचारा, ते धडा धडा सांगू लागतात. मला केव्हांही एखाद्या माहीतीची गरज लागते तेव्हां माझी धाव असते ते विनयकडे. आणि वर त्याचा विनयशील स्वभाव. महत्वपूर्ण माहीती देऊनही जणू कांही आपण विशेष काय केले नाही हा भाव सदैव चेहऱ्यावर. मला लेखनाला प्रवृत्त करणारे एक व्यक्तित्व म्हणून मी विनयकडे पहातो. प्रा. षांताराम पवार यांच्या कला जीवनावर मी 'षांतारामायण’ नांवाने कादंबरी लिहीली. ती 'ग्रंथाली' तर्फे प्रकाशीत करण्याचे श्रेय विनय नेवाळकरांना जाते. मात्र पुढे पवार सरांच्या हटवादामुळे ती 'दीपस्तंभ' म्हणून प्रकाशीत झाली. व त्यामध्ये पवारांविषयी माझे इतर लेखकासोबत एक प्रकरण म्हणून राहीले. पण सरांचा सत्कार सोहळा, त्यांची गांगलांनी घेतलेली प्रकट मुलाखत ह्या मागे प्रेरणा, धडपड सर्व होती ती केवळ विनय नेवाळकर यांची.

याशिवाय माझ्या लेखांना नेहमीं आवर्जून प्रतिक्रिया देणाऱ्या इतर व्यक्ती म्हणजे मीराताई करंडे, सुभाष गोंधळे, श्रीराम खाडीलकर, किशोर जयकर, वासुदेव कामत, दीपक गावडे, अनंत कुलकर्णी, कृष्णराज पंडीत, प्रभाकर वाईरकर, सुधीर कर्नाटकी, अरुण काळे, संजीव हजारे, बाळ मुणगेकर, भगवान रामपुरे इत्यादी कांही! यात अनीश दाते यांचा खास उल्लेख करावा लागेल. कला क्षेत्रांतील गाढा अनुभव आणि सोबतीला असलेली वाचन संस्कृतीची जोड, यामुळे त्यांचे जीवन समृद्ध झाले आहे. माझ्या बहुतेक लेखावर त्यांची अभ्यासपूर्ण मींमासा करणारा एक छोटासा शैलीदार असा लेखच ते लिहून त्याबद्दल बरीच इतर माहीती देतात. कालनिर्णयचे जयेंद्र साळगांवकर यांनी प्रत्यक्ष फोन करून माझे लेख आवडल्याची पावती दिली. शिवाय कायम लिहीत रहा हे सांगण्यास ते विसरले नाहीत. अश्यांच्या सकारात्मक प्रतिक्रीया वाचल्यावर माझाही उत्साह द्विगुणीत होतो. आणि मी तिरोडकर सरांवर लिहीलेल्या लेखावर दिलीप जोशी यांची अत्यंत बोलकी प्रतीक्रिया आली.  त्यांचे म्हणणे असे की, ‘तिरोडकरांची चित्रे फारशी पाहण्याचे सद्भाग्य लाभले नाही. त्यांची छायाचित्रे काढून ती गुगलवर संग्रह करणे आवश्यक आहे. याशिवाय त्यांचे असेही म्हणणे आहे की, जहांगीरमध्ये सरांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवायला हवे. त्याचा खर्च नी व्यवस्था उद्धव ठाकरे व अन्य माजी चाहत्या विद्यार्थ्यांनी करायला हवा. मनावर घेतले तर हे करता येईल. अन्यथा आणखी एक व्हॅन गॉग असाच उपेक्षीतपणे कालप्रवाहात लुप्त होणार आहे.’ ही गोष्ट मला पटल्यामुळे मी नेहरू सेंटरच्या नीना रेगे यांना विचारणा केली. पण सध्याच्या परिस्थीतीत ते कठीण असल्यामुळे आता काहीच सांगता येणार नाही असे त्यांनी सांगीतले. पण एकदा सर्व व्यवस्थीत झाल्यावर नक्कीच विचार करेन असे आश्वासन त्यांनी दिले. दुसरी एक आठवण म्हणजे  माझा चित्रकार बी. प्रभा यांच्यावरील 'तेजोमय प्रभा हा लेख वाचून पैठणीवाले राणे यांनी मुद्दाम बी. विठ्ठल यांना आपल्या वडीलानी लहानपणी घरी आणून कसा संभाळ केला, त्यांचा विवाहही तेथेच झाला, याची संपूर्ण माहीती सांगीतली. त्यांच्या घरी विठ्ठलनी केलेले अनेक शिल्पे अजूनही आहेत. असो! आज मला प्रकर्षाने आठवण येते ते आमचे दादा, माझे वडील बंधू. लेखक पत्रकार अश्या भूमिकेत वावरलेले एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांनी माझ्या वेड्यावाकड्या लिखाणाचे नेहमीच मनापासून कौतुक केले. प्रोत्साहन दिले. आज माझे लिखाण वाचायला ते नसल्याचे दुख मनातील कळ दाबून सोसावे लागते.

आजवर माझ्या विद्यार्थ्यांनी, फेसबुकवरील माझ्या मित्र-मैत्रिणींनी माझ्यावर खूप प्रेम केले. माझ्या वाढदिवसादिवशी सर्वजण माझ्यावर अक्षरशह: शुभेच्छांचे वर्षाव करतात. विशेष करून माझें मित्र सतीश सोनवणे व जय सावंत यांची हमखास येणारी सुंदर अश्या डिझाईनची शुभेच्छा पत्रे. जपून ठेवावीत अशी, त्या आनंदात भरच टाकतात. येथे एका गोष्टीचा उल्लेख मला जरूर करावासा वाटतो, तो म्हणजे माझे काही जूने विद्यार्थी एकत्र येऊन सुनील चव्हाण यांच्या पुढाकाराने त्यांनी केलेला अनेक माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतील  माझा व प्रा. नरेंद्र विचारे यांचा संवाद-सत्कार. त्या निमित्ताने मला दिलेले संस्थेच्या प्रतिकाचे मानचिन्ह. जे सतत मला स्फूर्ती देत राहील. हा प्रेमाने केलेला सत्कार सोहोळा मला कोणत्याही पारितोषिकाच्या पेक्षा मोलाचा आणि प्रतिष्ठेचा होता. या वर्षाची आणखी एक उल्लेखनीय घटना म्हणजे दीपक गावडे याने आम्हां सर्व गुरुजनांची त्याच्या खास शैलीत पोर्ट्रेट काढून आम्हां सर्वाना आदराप्रती केलेली मानवंदना. ह्या आगळ्या वेगळ्या गुरुदक्षिणेने एक वेगळाच आनंद आम्हां सर्वाना नक्कीच मिळाला. आणि अश्या या मित्रांच्या प्रेमाखातरच  जीवन सुसह्य होते. एकाकी पणा नाहीसा होतो. आणि आपण पुन्हां तरुण होतो. ताजेतवाने होतो. मधले वयाचे बंधन झट्कन गळून पडते. आणि मीही माझ्या सर्जनशील कलासक्त मित्रांच्या रंगयात्रेत सामील होतो.

या 'पंचाहत्तरी पार' झाल्याबद्दल अपेक्षा आहे ती केवळ आपणा सर्वांच्या प्रेमळ आशीर्वादाची, ज्यामुळे मी ताजातवाना राहीन, वयाने वाढलो तरी मनाने तरुण राहीन, अजूनही कांही वर्षे लिहीत जाईन, आनंद वाटत जाईन!

-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष



 

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :