बाल कला शिक्षणाचे मानसशास्त्रज्ञ : दत्ता परुळेकर



'जन्माला येणारे प्रत्येक मूल कलाकार असते. चित्रकला त्याच्यात अंतर्भूत असते. मात्र त्या कलेला उमलायला, जागृत करायला आणि सकसपणे तीचे पोषण करायला मदत करणे व उत्तेजन देणे हे प्रत्येक कलाशिक्षकाचे कर्तव्य आहे. चित्रकला हा इतर विषयांच्या सोबत जाणारा एक विषय नसून त्याला एक गती आहे, ज्यामूळे विद्यार्थ्यांचा चोहोबाजूनी विकास होतो. मात्र बागेतील माळी ज्याप्रमाणे फुलांचा विकास नैसर्गीक पद्धतीने होईल हे पहातो, त्याप्रमाणे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्याच पद्धतीने विकसीत व्हायला देणे आवश्यक आहे. फक्त हे होत असतांना शिक्षकांनी त्यांना मदतीचा हात द्यायला हवा!' हे विचार होते कला क्षेत्रात, कला शिक्षण क्षेत्रात तसेच बाल चित्रकला क्षेत्रात एका विशिष्ट्य ध्येयाने काम करणाऱ्या एका झपाटलेल्या कलाकाराचे, थोर चित्रकार श्री दत्तात्रय रामचंद्र परुळेकर व पुढे आपल्या दत्ता परुळेकर या नावाने प्रसीद्ध पावलेल्या एका बाल कला शिक्षणतज्ज्ञाचे !

१ मार्च १९२२ रोजी जन्मलेल्या परुळेकरांना कला शिक्षण  घेण्यासाठी फार मोठे दीव्य करावे लागले.  ओरिएंटल शाळेंत विद्यार्थी असताना तेथील शिक्षक राजाभाऊ पाटकर यांच्याशी त्यांचा घनीष्ट संबंध आला. पु.ल.देशपांडे हेही तेथे विद्यार्थी होते. परुळेकरांनी शिक्षणातील गती पाहून राजाभाऊ पाटकरांशी त्यांचे चांगलेच जमले. ते दिवस होते स्वातंत्र्य चळवळीचे. अन राजाभाऊ स्वातंत्र्य सैनीक होते. स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय भाग घेत होते. जेव्हां राजाभाऊंवर भूमीगत राहून काम करण्याची वेळ आली, तेव्हां त्यांनी परुळेकरांना शिक्षक म्हणून तयार केले. पाटकरांच्या जागी 'पाटकर' म्हणून काम करायचे प्रशिक्षण दिले. आणि पाटकर स्वतः भूमीगत झाले. ही परुळेकरांची काळ शिक्षकाची पहीली भूमिका पुढे संपुर्ण आयुष्यभर त्यांनी जोपासली.

शालेय शिक्षणानंतर परुळेकरांनी दादरच्या 'मॉडेल आर्ट' या कला संस्थेत नांव दाखल केले. तेथे पाटकर होतेच! त्यांच्या सोबत एम.ए.जोशी हे देखील होते. परुळेकरांना कला शिक्षणासाठी तसा घरचा पाठींबा नव्हताच. आणि त्यामुळे पैसाही नव्हता. हा प्रश्नही पाटकरानीच सोडवला. ते जेव्हां दुसऱ्या वर्षात गेले, तेव्हां त्यांना मागच्या वर्ष्याच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास सांगण्यात आले. ते तिसऱ्या वर्षात गेल्यावर दुसऱ्या वर्ष्याच्या विद्यार्थ्यांना परुळेकर शिकवू लागले. अश्या रीतीने विद्यार्थीदशेतच त्यांच्याशिक्षकी पेशाचा श्रीगणेशा सुरु झाला. याच्या मोबदल्यात त्यांनी 'मॉडेल आर्ट' मध्येच राहण्याची सोय झाली. मात्र तरीही पैशांची गरज ही होतीच. हातामध्ये कला होती, मनात जिद्द होती. परुळेकरांनी सरळ रणजीत स्टुडीओ व अमर स्टुडीओ हे चित्रपटांचे स्टुडीओ गाठले. तेथे सिनेमांचे बरेच काम सुरु असे. तेथे सिनेमाची पोस्टर रंगवण्याचे काम त्यांनी केले. पण पुढे स्वाभीमान आड आला. कलाकारांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीने त्यानी ही कामे सोडली. या दरम्यान त्यांनी जुवेलरी डिझाईन, लेदर इंडस्ट्रीसाठी कामे केली. व आपले कला शिक्षण पूर्ण केले.

या नंतर परुळेकरांची व्यावसायिक वाटचाल सुरु झाली. ठाकूरद्वारच्या प्रभू सेमिनरी विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून ते कमी पाहू लागले. शाळांमधून सर्वसाधारणपणे चित्रकला शिक्षक हा थोडासा उपेक्षेनेच पाहीला जात असे. तेथेही त्यांना चित्रकला शिक्षकाच्या मनाला रुचणार नाहीत अशी कामे सांगण्यात आली.सडेतोड अन स्पष्टवक्ता असलेल्या परुळेकरांनी ते नाकारले व दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हां तेथे गेले नाहीत. यानंतर भायखळ्याच्या ह्यूम हायस्कुल मध्ये त्यांना नोकरी मिळाली. पण तेथेही त्याचीच पुनरावृत्ती झाली. आणि त्यांचे पर्यवसान ते पुन्हा तेथून बाहेर पडण्यात झाले. नशीबाने खेळ मांडला होता. यानंतर 'चिकिस्तक' शाळेमध्ये त्यांना काम मिळाले. तेथे मात्र त्यांचे सूर चांगले जुळले. तेथील प्रिन्सिपॉल पै हे स्वतः तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. चित्रकलेबद्दल त्यांना आस्था होती, आदर होता. ते स्वतः कलेवरती चर्चा करीत असत. त्यांनी परुळेकरांना त्यांच्या विषयात पूर्ण स्वातंत्र्य दिले. परुळेकरांनी मोठ्या आत्मीयतेने तेथे विद्यार्जन केले. विशेष म्हणजे पहीली ते दहावी अश्या दहा वर्षांतील एका प्रगतीशील विद्यार्थ्यांचे कलात्मक काम त्यांनी जपून ठेवले होते. त्याचा लाभ पुढील शिकाऊ विद्यार्थ्यांना व्हावा ही यामागची धारणा होती. सुमारे अठरा वर्षे 'चिकित्सक' मध्ये काढल्यानंतर परुळेकरांनी ती शाळा सोडली. जाताना त्यांनी जपून ठेवलेला मौलीक ठेवा, विद्यार्थ्यांचे काम, हे पुढे सर्व कला विद्यार्थ्यांना दाखवता येईल या हेतूने संस्थेकडे मागीतले. पण त्यांना ते मिळाले नाही. कांही दिवसांनी ते सर्व काम  रद्दीत गेल्याचे त्यांच्या ऐकीवात आले.
 


१९५३ च्या आसपास कुडाळदेशकर ब्राम्हणांच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन होत असे. एकदा वांद्र्याच्या नॅशनल लायब्ररीच्या उदघाटन प्रसंगी परुळेकरांच्या चित्रांचे प्रदर्शन ठेवले होते. त्यावेळी परुळेकरांनी एक अट घातली की, आपल्या विद्यार्थ्यांना कला शिक्षण मिळावे यासाठी एक आर्ट स्कुल सुरु करावे. कारण उच्च कला शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जे.जे.स्कुल ऑफ आर्ट शिवाय अन्य ठिकाणी कला शिक्षणाची सोय नव्हती.  व राज्यातील इतर आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांना परीक्षेलाही मुंबईला यावे लागे.  त्यावेळी बी.डी. सामंत, मामा सामंत, ठोसर आदी मंडळींनी 'बॉंबे सबर्बन सोसायटी' द्वारा एक कला महाविद्यालय सुरु करण्याचे ठरवीले. वांद्र्याच्या नॅशनल लायब्ररीच्या पहील्या मजल्यावर  काका पाटकरानी जागा दिली. व तेथे वर्ग सुरू केले. आणि मॉडेल आर्ट मधे त्यांच्या सान्नीध्यात आलेले प्रा. हरीभाऊ हणमंते हेही त्यात सामील झाले. पेंटींग विभाग परुळेकर पहात. दाभोळकर हे आर्कीटेक्चर तर हणमंते यांच्यावर उपयोजीत कला विभागाची जबाबदारी देण्यात आली. पहील्या वर्षी त्यांच्याकडे डिमेलो नांवाचा एकमेव विद्यार्थी होता. पुढे ही विद्यार्थी संख्या वाढत गेली, त्याचबरोबर  संस्था देखील वाढत राहीली. तिची वांद्र्याच्या सेंट मार्टीन रोडवर दिमाखदार अशी स्वतंत्र इमारत उभी राहीली. आणि 'बांद्रा स्कुल ऑफ आर्ट' या नांवाने ही संस्था ओळखली जाऊ लागली. आणि दत्ता परुळेकर हे तिचे प्राचार्य म्हणून काम पाहू लागले. तेथील सर्वच शिक्षक एका ध्येयाने प्रेरीत झाले असल्याने जे.जे.स्कूल ॲाफ आर्टच्या खालोखाल ती ओळखली जावू लागली. बांद्रा स्कुल ऑफ आर्टला परुळेकरांच्या ज्ञानाचा बराच लाभ झाला. मुलांना त्यांचे मानसशास्त्र समजावून घेऊन नाउमेद न करता कसे शिकवायचे याची हातोटी परुळेकरांना चांगलीच होती. वर्गामध्ये पाठ घेण्यापूर्वी सर्वजण एकत्र बसून त्याचा उद्देश ठरवीत असत. दर शनीवार व रवीवार  परुळेकर लहान मुलांना बालचित्रकाला शिकवत असत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांची शिकवणी चालू असे. काम करत असतांना विद्यर्थ्याचे कधीही दुर्गुण पहायचे नाहीत, हे त्यांचे ठाम मत होते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करायचा, त्यांची विचार करण्याची वृत्ती जोपासायची या गोष्टीकडे ते आवर्जून लक्ष देतं असत.

राज्यातील इंटरमीडिएट ग्रेड परीक्षांचा सुधारीत अभ्यासक्रम करताना पुढे उच्च कला शिक्षणामधील मूलभूत अभ्यासक्रमाला तो पुरक असावा, हा त्यांचा दृष्टिकोण होता. त्यासाठी परुळेकरांनी विविध प्रयोग केले. बाल चित्रकलेमध्ये त्यांनी पहिलीच्या मुलाच्या चित्रांची नक्कल करून त्यावर शिक्षकांना काय अनुभव येतो, याचा अभ्यास करायला लावला. मूल जेंव्हा आईचे चित्र काढते, तेव्हां ते तिच्या  आकारासोबत तिच्या गुणांशी एकरूप होते. ही नैसर्गीक प्रवृत्ती आहे. स्टील लाईफ हे केवळ वस्तुचित्र नसून ते संघटनशील चित्रं आहे. समोरील वस्तू या संदर्भ म्हणून पाहील्या पाहीजेत. आकृतीबंध चांगला होईल या हेतूने आकार, रंग, यांचा आविष्कार पाहीजे. व त्यामधील यथार्थ दर्शित्व राहीले पाहीजे. इंटर मिजीएट साठी सुचविलेल्या या अभ्यासक्रमाला त्यावेळच्या शिक्षण संचालीका चित्रा नाईक व चिपळूणकर यांनी उचलून धरले. चित्रकलेचे ज्ञान असलेल्या चित्रा नाईक यांनी या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले. नंतर मात्र हे थांबले. कला हा विषय बुद्धीमान विद्यार्थ्यांचे नुकसान करतो, अशी भावना मनाशी बाळगुन असलेल्या काही अधिकाऱ्यांनी शाळांमधून कला विषय केवळ आठवीपर्यंत केला. आणि याला राज्याचे कलासंचालक पूर्णपणे जबाबदार आहेत, अशी परुळेकरांनी भावना होती. कारण त्या खात्याकडून सरकारकडे तसें आग्रही प्रतिपादन कधी झालेच नाही. सरकारला कला विषयाचे महत्व पटवून देण्याचे कार्यच या राज्याच्या कला संचालकांनी केले नाही, ही गोष्ट त्याना खेदजनक वाटली.

बाल चित्रकलेचा प्रचार परुळेकरांनी सर्व महाराष्ट्रभर केला. चर्नीरोड येथील बालभवनतर्फे अनेक ठिकाणी बालभवन निर्माण करण्यासाठी त्यांनी योगदान केले आहे. मुंबई महापालिकेच्या कला अकादमीसाठी परुळेकरांनी सदस्य या नात्याने बरेच कार्य केले. भाऊ दाजी लाड म्युझियम मध्ये लहान मुलाच्या कलेसाठी आर्ट गॅलरी सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला व तो साध्य करून दाखवला. आज तेथे लहान वयातील विद्यार्थ्यांची चित्रकला प्रदर्शने होतात. लहान मुलांसाठी अशी ही पहिलीच गॅलरी असेल, आणि तिचे उदघाटन करण्याचे भागय मला लाभले.

चित्रकला हा विषय सर्व विषयांना पोषक असतो. पण पालकांची उदासीनता आणि अज्ञान पाल्याला अनुत्साहीत करण्यास कित्येकदा कारणीभूत ठरते. वास्तवीक व्यक्तीमत्व विकासासाठी जीवनात या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपापल्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगीरी बजावणाऱ्या चर्चील, रवींनद्रनाथ टागोर,  होमि भाभा, माधवराव बागल, व्यंकटेश माडगूळकर, व.पु.काळे आदींच्या यशस्वीततेत त्यांचे कलागुण सामावलेले आपल्याला आढळतात. चित्रकला हा केवळ चित्रकार बनवण्यासाठी शिकवण्याचा विषय नसून विद्यार्थ्यांचा चौफेर विकास होण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. आणि त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी  आपापल्या क्षेत्रात ते सिद्ध करून दाखवले आहे. कलेच्या संस्कारामुळे व्यवसायात सफलता कशी येते, याचे प्रत्यन्तर त्यांना मिळाले आहे. पण यासाठी कलेची निष्पत्ती काय याचा शोध घेणे आवश्यक आहे. परुळेकरांचा एक विद्यार्थी चित्रकार न होता पुढे ड्रायव्हर झाला. पण गाडी चालवताना त्याला चित्रकलेचे शिक्षण उपयोगात आले. लय, तोल याचा समन्वय तो गाडी चालवतांना साधत होता. तर दुसरा एक विद्यार्थी हे संस्कार घेऊन डॉक्टर झाला. पेन्सील किती हलकी, किती खोल, किती उंच वापरायची याची तालीम आज शस्त्रक्रिया करताना हत्यारे वापरताना या तंत्राचा वापर आपण करतो हे त्याने अभिमानाने प्रतिपादन केले. या चित्रकलेच्या संस्काराने प्रत्येकजण आपापले व्यवसाय यशस्वीरीत्या करू शकतो हा परुळेकरसरांचा जबर आत्मविश्वास होता. फक्त त्यासाठी मनाला सुमन-सुविचारी करणे आवश्यक असल्याचं ते सांगत.


१९८० साली 'बांद्रा स्कुल ऑफ आर्ट' (आताचे रहेजा स्कुल) येथून परुळेकर सरांनी सेवानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतरही त्यांची बाल चित्रकलेची सेमिनार, स्पर्धा यावर अनुभवी व्यक्ती म्हणणं मार्गदर्शन करणे सुरूच होते. एकदा कां ते अश्या बालकामध्ये मिसळले की सर्व्ह वातावरण आपल्या स्वभावाने हर्षोत्फुल करून सोडत. दरम्यान त्यांनी चित्रकला या विषयाचा सांगोपांग अभ्यास करून प्राथमीक व माध्यमीक शाळांमधील ड्रॉईंग विषयावर 'एड टू टीचिंग ऑफ आर्ट' , चित्रकला ग्रेड परीक्षा, आत्माविष्कार' ही कला शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर पुस्तके लिहीली. साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी पेस्टालोजीं या स्वीस शालेय शिक्षकाने 'शिक्षण हे मानसशास्त्राला अनुसरून दिले पाहीजे' हा सिद्धांत मांडला. याचे स्वागत होऊन इतर विषयात अनेक बदल होत गेले. पण कला शिक्षणात मात्र केवळ कसब यावरच भर दिला जात होता. नंतर सीझॅक या आस्ट्रियन चित्रकाराने या विषयात अनेक प्रयोग केले. पण त्याची उपेक्षा  केली गेली. मात्र भारतात रवींद्रनाथ टागोरांनी त्यातील मर्म ओळखले, व सीझ्याकचे अभिनंदन केले. व त्याच्या तत्वासमान बाल चित्रकला शिक्षणपद्धती शांती निकेतनमध्ये अनुसरली. परुळेकर त्याच विचाराने भारावून त्यांनीही बरेच प्रयोग करून त्यावर चिंतन, मनन करून आपली अनुमाने काढली आहेत. या विषयासाठी जोडीला नृत्त्य, संगीत याचाही अभ्यास हवा. तसेच काव्यही हवे, पण आज आपल्या शासनाकडे असा विचार करणारे लोक, शिक्षण तज्ञ यांची वानवा आहे, अशी खंत ते सतत व्यक्त करीत असत. नाहीतरी आज एखाद्या शाळेत साधा शिक्षक नेमायचे असलं तरी त्याला प्रशिक्षण अभ्यासक्रम करावा लागतो. पण आमच्या उच्च कला शिक्षणासाठी आधी कोणतेही प्रशिक्षण न घेता, कोणीही परीक्षा झाल्यावर कुठंतरी कांही काम करून त्या अनुभवावरून सरळ विद्यार्थ्यांना उच्च कला शिक्षण देऊ लागतो. त्यासाठीही शासनाने आधी अश्या लोकांना प्रशिक्षण मिळण्यासाठी अभ्यासक्रम करायला हवेत.

अत्यन्त साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी असलेले परुळेकर सर सतत हसतमुख होते. त्यांचा प्रसन्न असा चेहरा सर्वाना प्रफुल्लीत करून सोडत असे. बोलणेही अत्यन्त मृदू, आणि नम्र असे. कोणालाही दुखावतील अथवा लागतील असे शब्द ते कधीच वापरत नसत. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी आयुष्य काढले. त्यांच्या घरी कधी गेले की तीच आपुलकी, तीच प्रसन्नता आदळून येत असे. निवृत्तीनंतरही पूर्वीच्याच उमेदीने त्यांचे बालकला उपक्रम सुरुच असत. त्यातूनही बाल चित्रकलेच्या उन्नतीसाठी शासनाकडून कांही गोष्टी व्हायला हव्यात या दृष्टीने त्यांचा शासनाशी त्या वयात देखील पत्रव्यवहार सुरू असे. याबाबतीत त्यांची पत्रे लिहून देण्यास त्यांचे एक माजी विद्यार्थी दिगंबर चिसकर  त्यांना मदत करीत असत. चिसकर हे त्यांना नेहमी ‘तारे जमीं पर’ या चित्रपटातील 'निकुम्ब सरांचे सर' असा उल्लेख करीत असत व त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत ते होते. आणि खरोखरीच निकुंब सरांना त्यांनी शिकवले होते. त्यांना एकच ध्यास लागला होता, तो म्हणजे बाल चित्रकला या राज्यात समृद्ध करण्याचा. त्यानी भाऊ दाजी लाड संग्रहालयात लहान मुलांच्या कलेला आविष्कृत करण्यासाठी शासनाच्या, महानगरपालिकेच्या पाठी लागून गॅलरीसाठी जी जागा मिळवली, त्यावेळी शरद काळे यांच्यासारखे कलाप्रेमी आयुक्त तेथे होते. त्यांच्यानंतर जेव्हां त्या संग्रहालयाचे नूतनीकरण झाले, तेव्हां ती गॅलरी तेथुन हटवण्यात आल्याचे कानावर आले. सेंट मार्टीन रोडवरची 'बांद्रा स्कुल ॲाफ आर्ट'ची भव्य इमारत देखील संस्थेच्या हातून गेली. पुढे रहेजा यांनी सदर संस्था घेऊन ते सध्या ती चालवीत आहेत. पण ज्या निष्ठेने हे कांही कलाकार एकत्र येऊन त्यांनी आरंभ केलेल्या संस्थेतील भावनेचा ओलावा मात्र तेथे नव्हता. होता तो फक्त व्यावहारिकपणा. परुळेकर सर अखेरपर्यंत त्या संस्थेशी एकरूप राहीले. त्यांचा मुलगा प्रदीप त्यांच्याप्रमाणेच शांतस्वभावाचा आहे. सध्या तो देखील चिकित्सक समूहाच्या कला शाळेत प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. आणि आयुष्यभर केवळ बालचित्रकलेच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या या ध्येयवादी कला शिक्षकांनी, परुळेकरसरांनी  कौटुंबीक प्रेमाच्या सहवासात ३० ऑगस्ट २०१३ रोजी तृप्तपणे त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष


Comments

  1. सर,
    आपल्या या लेखावरून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे जिद्द, चिकाटी व कामातील सातत्य असेल तर कितीही वाईट परिस्थिती असेल तरी माणूस आपले ध्येय साध्य करू शकतो. फक्त माणसाने सकारात्मक व ध्येयवादी असायला हवे.
    धन्यवाद सर या लेखाबद्दल.
    ध्येयवादी परुळेकर सराना सलाम.

    ReplyDelete
  2. सर,
    मी केलेल्या मा. दत्तात्रेय परुळेकर सरांचे चित्र ह्या जिवंत लेखात सामावून घेतल्याबद्दल खूप खूप आभार व धन्यवाद!
    चित्रकार श्री. दिगंबर चिचकर सर व प्रा. प्रदीप परुळेकर सर यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद.
    ह्या गुरुवर्यांमुळे मला थोर चित्रकार मा. दत्ता परुळेकर सर यांचे माझ्या मनात घर झाले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :