एक कलासक्त संपादक: राजेंद्र कुलकर्णी.



 २००७ सालची गोष्ट आहे. मला माझ्या कार्यालयात अचानक एका फोन आला. समोरील व्यक्ती अगदी नाजुक आवाजात बोलत होती. ती म्हणाली, राजाध्यक्ष, मी 'चंद्रकांत' मासिकाचा संपादक राजेन्द्र कुलकर्णी बोलतो आहे. नुकतेच निधन पावलेले कला महर्षी के.बी.कुलकर्णी यांच्याकडे आपण चित्रकला शिकत होतात. तेव्हां आमच्या या वर्षाच्या 'चंद्रकांत'च्या दिवाळीअंकासाठी त्यांच्यावर तुम्ही एक लेख लिहावा अशी इच्छा आहे. प्रथमदर्शनीच आपल्या आवाजातील मार्दवावाटे  कुलकर्णीनी माझ्या मनात प्रवेश केला होता. तसे माझे गिरगांवात  नेहमीच जाणे-येणे असल्याने गिरगांवातील पोर्तूगीज चर्चच्या समोरील  महाराजा इमारतीतील पहिल्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयाचा बोर्ड नेहमीच दिसत असे. खाली एक डोक्याला लावायच्या विगचे दुकान होते. तसा काहीच बदल त्या भागात वर्षो न वर्षे झाला नव्हता. त्याच सोबत त्यांनी मला एकदा त्यांच्या कार्यालयात येण्याचीही विनंती केली. आणि मी त्यांच्या 'चंद्रकांत'च्या कार्यालयात पोचलो,  आणि मला एक आस्चर्याचा धक्काच बसला. माझ्या डोळ्यासमोर त्यांच्या मार्दवी आवाजावरून जी त्यांची प्रतिमा उभी होती, त्यापेक्षा एकदम उलट ती व्यक्ती मला दिसली. थोडीशी ठेंगणी, गौरवर्णाची, आणि खानदानी चेहऱ्यावर एखाद्या लष्करी अधिकाऱ्याला शोभतील अश्या भारदस्त सफेद मिश्या बाळगलेली. मात्र बोलायला लागले की तेच मार्दव आणि माधुर्य त्यांच्या स्वरात जाणवे. एखाद्याच्या थेट मनांत शिरणारे आणि त्यांना आपलेसे करणारे!


तसे 'चंद्रकांत' नियतकालीक मला नवीन नव्हते. अगदी शालेय वयात आम्हांला जी प्रकाशने वाचनाचे वेड वाढवीत असत, त्यापैकी एक म्हणजे 'चंद्रकांत' हा दिवाळी अंक. अन याची सुरुवात केली होती ती शंकरराव कुलकर्णी यांनी. त्या वेळी गिरगांव नाक्यावर शंकररावांचे 'महाराष्ट्र ग्रंथ भांडार' व भारतीय प्रकाशन मंदीर' होते. या शंकररावांकडे अनेक कल्पना असत. अनेक पुस्तके ते प्रकाशीत करीत असत. त्यावेळी ना.सी.फडके यांच्या शृंगारीक कादंबऱ्या फडक्यांच्याच 'अंजली' दिवाळी अंकातून गाजत होत्या. पुढे त्यांचे पुस्तकात रुपांतर होत असे.  इतर दिवाळी अंकात वेगवेगळ्या लघुकथा असत. पण शंकररावांनी विचार केला, आपण जर का एकाच अंकात चार कादंबऱ्या दिल्या, आणि त्याही एकाच लेखकाच्या तर?  आणि एकदा विचार आला की तो तडीला न्यायचा त्यांचा खाक्या होता. मग त्या कोणाच्या घ्यायच्या?  तेव्हां त्याकाळात गाजणारे एकच नांव त्यांच्यासमोर आले, ते होते  'चंद्रकांत काकोडकर.' या काकोडकरांना अगदी तरुण वयात शंकररावांनीच प्रोत्साहीत केले होते. विश्वासाने त्यांच्या कादंबऱ्या छापून त्यांना लेखकाचा दर्जा मिळवून दिला होता. आणि पुढे त्या तरुण लेखकाच्या- चंद्रकांत काकोडकरांच्या एकापाठोपाठ कादंबऱ्या ते छापत गेले. आणि काकोडकर शृंगारीक लेखक म्हणून प्रथितयश बनले. त्यांच्या शृंगारिक कादंबऱ्या तरुणांमध्ये खूपच आवडत्या झाल्या. आणि पुढे काकोडकर व कुलकर्णी हे एक समीकरणच बनले. आणि काकोडकरांच्या लेखनाचा झपाटा पाहूनच कुलकर्णींना एकाच अंकात चार कादंबऱ्या द्यायची कल्पना सुचली. काकोडकरांनीही त्याला मान्यता दिली. व १९६४ साळी काकोडकरांच्याच नांवावरून दिवाळी अंकाचे नामकरण ' चंद्रकांत' असे करण्यात आले. 'चंद्रकांत' च्या कथा - कादंबऱ्यांना त्यावेळी मुखपृष्ठासहीत एकहाती चित्रे असत ती चित्रकार रा.स.कंटक यांची. एका सरळ रेषेत काढलेल्या त्या चित्रांनीही 'चंद्रकांत'ला ओळख दिली होती. तो दिवाळी अंकांचा जमाना होता मुळगांवकर, दलाल, शि.द.फडणीस यासारख्या प्रतिथयश चित्रकारांनी नटवण्याचा. अधूनमधून एन.जी.जोशी, व्ही.एस.गुर्जर सारखे कलावन्तही ती सजवीत असत. पण ते संख्येने खूपच कमी असे. तरीही चंद्रकांतने आपले नांव वाचकांच्या मनांवर कोरले.  तोही आपला दर्जा सांभाळून

पुढे काकोडकर हे लेखक म्हणून प्रसिद्धीला पावले. व त्यायोगानें चंद्रकांतचाही लाभ झाला. काकोडकरांच्या शृंगारिक कादंबरीवर अश्लीलतेचा खटलाही भरण्यात आला. नंतर काकोडकर पैशाने आणि नांवाने यशाची शिखरे गाठत गेले. मात्र  त्यांनतर त्यांचे व शंकररावांचे आर्थिक व्यवहारावरून बिनसले. अनेक वर्षांची मैत्री व्यवहार बनून तुटली. आणि अचानक 'चंद्रकांत'शी संबंध तोडून चंद्रकांत काकोडकरांनी आपला ' काकोडकर' हा वेगळा दिवाळी अंक काढला. पण या प्रकाराने शंकरराव खचले नाहीत. उलट त्यांनी 'धनंजय' 'चंद्रकांत' बंद झाले असले तरी, आपल्या मुलांच्या मदतीने हिंदीतील नामांकित लेखक गुलशन नंदा, राजवंश अश्यांच्या पुस्तकांची भाषांतरे करून ती पुस्तके छापण्यास सुरुवात केली. शंकररावांचा वारसा त्यांच्या मुलांमध्येही आला होता. मुलगा राजेंद्र हा लहानपणापासूनच या व्यवसायाची जडण घडण पहात वाढला होता. कागद, शाई, छपाई याच्याशी त्याची ओळख जुळली होतीच. पण आवडीचा विषय म्हणून तो वास्तूविशारद झाला. पण घरच्या वातावरणामुळे साहित्याची आवड होती. मुळातच हुशार आणि कल्पक असलेला राजेंद्र सर जे.जे.कॉलेज आर्कीटेक्चर मधून  वास्तुविशारद झाला व गल्फ मधे मोठ्या पगाराच्या नोकरीवर रुजू झाला. इकडे काही आर्थिक अडचणीमुळे शंकररावांचा त्यांचा पुस्तक व्यवसाय बंद करावा लागला.


इकडे राजेंद्र कुलकर्णी आपल्या वास्तू रचनाकार  व्यवसायात यशस्वी झाले होते. पण त्यांच्या डोळ्यात स्वप्न मात्र वडिलांच्या दिवाळी अंकांचे होते. 'चंद्रकांत' व 'धनंजय' ही त्यांची दोन अपत्ये होती. मुलाप्रमाणेच त्यांनी ती जपली होती. १९७७ साली शंकररावांचे निधन झाले. त्यांच्या दोन्ही मासिकांना पुन्हां संजीवनी देऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे कुलकर्णीनी ठरवले. आणि आपली गल्फ मधली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून राजेंद्र यांनी मुंबईत आगमन केले. आणि जवळजवळ पंधराएक वर्षे बंद असलेल्या आपल्या प्रकाशनांना प्रकाशीत करण्याची प्रक्रीया सुरु केली. आता डोळ्यासमोर प्रश्न होता तो अंकाची आकर्षक अशी मांडणी करण्याची. स्वतः एक वास्तुरचनाकार असलेल्या राजेंद्रची सौंदर्यदृष्टी अनोखी तर होतीच, पण प्रत्येक गोष्ट ही रुढीबध्द व  सर्वसाधारण असता कामा नये, तर त्याचे वेगळेपण जाणवले पाहीजे, याकडे त्यांचे जातीने लक्ष असे. म्हणूनच  आजच्या वातावरणाला उचीत अशी अंकांची शीर्षके करण्यासाठी त्यांनी प्रथम प्रसीद्ध सुलेखनकार कमल शेडगे यांना गाठले. आणि कमलनेही त्यांना सुयोग्य व डौलदार अशी प्रगतीशील वाटचाल करणारी शीर्षके बनवून दिली. व १९८९  पासून दोन्ही दिवाळी अंक काढायचे ठरले. पुढे प्रश्न आला लेखक शोधण्याचा. दिवाळी अंक म्हणजे केवळ वलय प्राप्त झालेले लेखकच हवेत, ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती. अनेक नवोदीत लेखकांना राजेंद्रनी संधी दिली. शिवाय अनेक जुन्या नव्या लेखकांनी सुद्धा विना अट सहकार्य दिले. त्यापैकी कांही म्हणजे, व.कृ. जोशी, नारायण धारप, अशोक व्हटकर, यशवंत रांजणकर, अनंत मनोहर, सुहास शिरवाळकर, अनुराधा वैद्य असे कांही आहेत.

राजेंद्र कुलकर्णी यांच्या या धडपडीत त्यांच्या आयुष्यात २३ नोव्हेंबर १९८० रोजी आलेल्या पत्नी निलीमा वहीनी यांचाही सावलीसारखा त्यांच्या सोबत सहवास होता.  पुढे चंद्रकांत व धनंजय याच्या यशाने नांव मिळवलेले असतानाच राजेंद्र-निलीमा या जोडीने थेट प्रकाशन क्षेत्रांत पाऊल टाकले. जून २००६ मध्ये 'राजेंद्र प्रकाशन' हे नवे चमकदार नांव प्रकाशन क्षेत्रांत झळकले. आणि त्याचबरोबर डॉ. गिरीश जाखोटीया यांच्या 'एका मारवाड्याची गोष्ट' या पुस्तकाने क्रांती केली. या पुस्तकामुळे ते भराभर वरती चढले. अल्पावधीतच या पुस्तकाची सातवी आवृत्ती निघाली. नंतर त्यांचे ऋणानुबंध असे जुळले की जाखोटियानी पुस्तक लिहायचे, आणि राजेंद्र प्रकाशनाने ते प्रसीद्ध करायचे हा जणू संकेतच झाला.  यात आपल्याकडे कांही नामवंतांनीही आपल्या चंद्रकांत कुटुंबात यावे या इच्छेनें कुलकर्णीनी नंतर भारदस्त अश्या लोकांशी संपर्क साधला. या लेखकांनीही 'चंद्रकांत' 'धनंजय' यांना आपले मानून लेखन सहाय दिले.  त्यात एक महत्वाचे लेखक होते ते प्रभाकर पेंढारकर. राजेंद्रनी त्यांच्याशी सततचा संपर्क ठेवला व पुढे पेंढारकर हे कुलकर्णी कुटुंबाचे सदस्यच ठरले. त्यांची 'एका स्टुडिओचे आत्मवृत्त'हीं  कादंबरी चंद्रकांत मधुन प्रसीद्ध झाली. ही कादंबरी कोल्हापूरच्या भालजी पेंढारकरांच्या 'जयप्रभा स्टुडीओ'वर आधारीत होती. स्वतः स्टुडीओ त्यांच्या बोलतो आहे अश्या तऱ्हेने ही कादंबरी लिहीली आहे. पुढें त्यांचे तपशील वाढवून कुलकर्णीनी त्याचे पुस्तक प्रकाशीत केले. या पुस्तकांत आतमध्ये संजय शेलार या कोल्हापूरच्या चित्रकाराने बरीच बोधचित्रे आपल्या खास शैलीत पेरली आहेत, ज्यामुळे पुस्तकाचे देखणेपण आणखीनच वाढले आहे. या पुस्तकाला वाचकांचा  प्रचंड प्रतीसाद मिळाला. ते पुस्तक प्रसिद्ध झाल्याबरोबर अवघ्या दहा दिवसात त्याला 'केसरी-मराठा ट्रस्ट' तर्फे 'न.चिं. केळकर  पुरस्कार' देऊन गौरवले गेले. आणि पाठोपाठ  त्याला विशेष उल्लेखनीय असा २००९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दिल्लीच्या विज्ञान भवनात तो राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दोघांनाही प्रदान करण्यात आला. प्रभाकर पेंढारकर व राजेन्द्र कुलकर्णी ह्या दोघांनाही ही अभिनंदनास्पद गोष्ट होती. पेंढारकरांच्या 'रारंग ढांग' या कादंबरीने राजेंद्रावर जबरदस्त मोहीनी घातली होती. त्यामुळे पेंढारकरांच्या हयातीतच त्यांनी त्यांच्याकडून परवानगी घेऊन त्या कादंबरीचा उत्तरार्ध लिहिण्याची स्पर्धा जाहीर केली. आरंभाला त्याला तितकासा प्रतीसाद मिळाला नाही. ते आव्हान पेलणे तेवढे सोपेही नव्हते. पण पुढे ते आव्हान स्वीकारणारे एक जिगरबाज त्यांना भेटलेच! मात्र त्याचे नांव त्यावेळी कुलकर्णीनी जाहीर केले नव्हते. ते २०१२ च्या अंकात वाचायला मिळेल असे जाहीर केले होते. आणि हा जिगरबाज होता श्रीकृष्ण सवदी. त्यांनी 'रारंग ढांग, लाचेन, रीशी -एका अभियंत्यांचा प्रवास' ही उत्कंठावर्धक कादंबरी लिहीली.

पुढे पेंढारकरांची 'तपोवन' ही कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर असलेली  कादंबरी चंद्रकांत मधून प्रसीद्ध झाली. मात्र अंक प्रसीद्ध होण्यापूर्वीच ते निघून गेले. त्या कादंबरीचे पुस्तक रूपाने प्रकाशन करून ८ सप्टेंबर या त्यांचा जन्मदिनी तीचे प्रकाशन राजेंद्रानी केले. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे राजेंद्र कुलकर्णी यांचीही जन्म तारीख ८ सप्टेंबर होती. 
वर्ष होते १९४८. 
डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी त्या कादंबरीला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहीली आहे. पौगंडावस्थेत गेलेल्या मुलाच्या विचारांची  यात कहाणी आहे. पेंढारकरांची ही शेवटची कादंबरी ठरली. राजेंद्र कुलकर्णी आपला लोकसंग्रह वाढवीत होते. नवनवीन लेखकांना आपल्या दिवाळी अंकात लिहायला लावत होते. दरवर्षी जानेवारी महीन्यात त्यांचा फोन येत असे. मग भेटायला त्यांच्या कार्यालयात गेल्यावर ते मला घेऊन खाली उतरत असत व थेट समोरील पणशीकरांच्या दुकानात मसाला दूध प्यायला घेऊन जात असत. तेथे थोड्या गप्पा झाल्या की परत त्यांच्या कार्यालयात आले की मग चर्चा होई ती 'चंद्रकांत'च्या दिवाळी अंकाबाबत. या वर्षी मी कोणावर लिहावे हे तेथे ठरत असे. मी ते असेपर्यंत दरवर्षी दिवाळी अंकासाठी बेळगांवचे चित्रकार के.बी.कुलकर्णी, सुलेखनकार र.कृ.जोशी, चाळीसगावचे केकी मूस, टाइम्स ऑफ इंडियाचे शेवटचे युरोपियन कला दिग्दर्शक वाॅल्टर लॅंगहॅमर, तसेच धनंजय साठी रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांच्यावर दीर्घ कथा लिहील्या. तसे दिवाळी अंक म्हणजे वर्षभराचे काम. आणि त्या कामात कुलकर्णी स्वतःला पूर्णपणे झोकून देत असत. सतत त्यांचा फोन सुरु असे. जाहीरातदार, वितरक, लेखक, चित्रकार, मुद्रक अश्या सर्वांशीच संपर्क सुरु असे. साधारणपणे  एप्रिलमध्ये मी माझा लेख त्यांना नेवून दिला की तीन चार दिवसांनी त्यांचा फोन येत असे. त्यांनी लेख आवडल्याचे त्यांच्या स्नेहपूर्ण आवाजात सांगीतल्यावर मी स्वतःच मोहरून उठत असे. मग पुढच्याच आठवड्यात त्यांचा राजेंद्र प्रकाशनतर्फे मानधनाचा चेक येत असे. केवळ  लेख मिळाल्याबरोबर अंक प्रसीद्धही न होता, आवर्जून चेक पाठवणारा संपादक त्यांच्या व्यतीरीक्त मी तरी दुसरा पाहीला नाही. एवढे मैत्रीप्रमाणेच व्यवहारात देखील ते चोख असे खणखणीत नाणे होते.

दरम्यान मी 'केसरी टूर' तर्फ़े युरोपची टूर केली. तेथील निरनिराळ्या देशातील, निरनिराळ्या ठिकाणची मुझियम, तेथील शिल्पे, पेंटींग्स यावर फेसबुकवर मी एक छोटीशी मालीका केली होती. त्यांनी ती पाहील्यावर लगेच त्यांना एक कल्पना सुचली, ते म्हणाले, मी दरवर्षीच्या अंकात चौकटी टाकतो. त्यामध्ये खास असा माहीतीपुर्ण मजकुर असतो. मला धनंजयसाठी ही चौकटीची मालीका करण्याची इच्छा आहे. त्यासाठी आपण 'केसरीला' ते स्पॉन्सर करतील का? हे देखील विचारू, आणि त्या साठी त्यांनी माझ्याकडून संपूर्ण टूरवर आधारीत एक लेख लिहून घेतला. त्यामध्ये 'केसरी'चा देखील त्यांच्या आतिथ्या बाबत उल्लेख केला होता. मी त्यांना तेथील व्यवस्था पाहणाऱ्या केसरी पाटलांचे  चिरंजीव हिमांशू यांचा नंबर दिला. पण प्रत्यक्ष त्यांना कोणी फोन दिलाच नाही. त्यांच्या सेकेटरींनी आपण त्यांना विचारून परत फोन करते असे सांगीतले. पण तोही आला नाही. मग कुलकर्णीनी त्या स्पॉनरशिपचा नाद सोडला.



कुलकर्णी आपल्या अंकांच्या सजावटीबाबत फार चोखंदळ असत. प्रत्येक पान, त्याचे लेआऊट, त्यातील रंगसंगती, त्यांची शीर्षके एवढेच नव्हे, तर अनुक्रमणीकेचे पृष्ठ देखील खोलवर न्याहाळणारा व सौंदर्यपूर्ण करणारा संपादक मी तरी अन्य  पाहीला नाही. १९९० पासून त्यांनी आपल्या अंकाची एक चालत आलेले घाटणी बदलली. अगदी मुखपृष्ठापासून ते आतील बोधचित्रापर्यंत त्यांची ठेवण कालानुरूप त्यांनी देखणी केली. त्यासाठी ते तरुण कर्तबगार आणि सर्जनशील अश्या चित्रकारांची फौजच वापरीत असत. यामध्ये वासुदेव कामत, विजय आचरेकर, जॉन फर्नांडीस, दत्ता पाडेकर, संजय शेलार, किरण हणमशेट अश्यांच्या दमदार कुंचल्यातून चंद्रकांतची मुखपृष्ठे झळकू लागली. अश्या चित्रकारांना ते आपल्या मैत्रीने व  विश्वासाने बांधून ठेवीत असत. आतील चित्रेही अनंत कुलकर्णी, अनीश दातें, संजय शेलार, अश्यानीही केली आहेत. या शिवाय मधून मधून अश्या कलाकारांच्या पेंटीग्सची पृष्ठे देखील त्यांनी आतमध्ये दिली होती. त्यात वासुदेव कामत, विजय आचरेकर, जॉन फर्नांडीस, के. बी. कुलकर्णी यांची अभिजात कलेतील पेंटींग,  शिवाय दत्ता पाडेकर यांच्या कॅलिग्राफीचेही नमुने त्यांनी या अंकातून रसिकांसाठी प्रकाशीत केले.  स्वतः वास्तुरचनाकार असल्याने सौंदर्य दृष्टी होतीच, शिवाय आपले लेख केवळ वाचनीय राहू नयेत, तरी ते डौलदार, सुंदर आणि वाचकांचे मन मोहून घेणारेही असावेत हीच भावना त्यांनी सदैव बाळगली. लेखांची शीर्षके त्यांनी चित्रबद्ध केली. यासाठी ते चित्रांच्या आणि चित्रकारांच्या शोधात अनेक कला दालनांना भेटी देत असत. तेथील प्रदर्शनातील चित्रे पहात असत. चित्रकारांशी संवाद साधत असत.  त्यापैकी कांही विकतही घेत असत. कलेचा सतत शोध सुरूच असे या कलासक्त माणसाचा! आणि त्यांच्या सोबत असे ते त्यांचे भारदस्त असे व्यक्तीमत्व, मृदू आणि आपुलकीचे असे संभाषणातील मार्दव आणि त्यांचे खळाळणारे हास्य. कोणालाही आपलेसे करायला अणि नाते जुळवायला एवढ्या गोष्टी पुरेश्या होत्या.

२०१० साली धनंजयचे पन्नासावे वर्ष होते. त्यासाठी गेल्या पन्नास वर्षातील निवडक कथा घेऊन 'निवडक धनंजय-तृतीय नेत्र' हा खास अंक काढायचा राजेंद्रनी ठरवले. आणि एकदा का ठरवले की मग ते पूर्णत्वाला न्यायचेच हा त्यांचा बाणा होता. काम तर खूपच कठीण होते. त्यामुळे १९६१ ते २००० सालच्या दिवाळी अंकातून लेखनिवड करण्याचे ठऱले. त्यासाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नायगांव शाखेत त्यांच्या फेऱ्या सुरु झाल्या. वाटेत रस्त्यावर जिन्याची चढउतर होत होती. त्यांच्या सोबत अरुण नेरुरकर, प्रा. सुधाकर कौशीक, हे लेखक असत. तेथील धनंजय, चंद्रकांत हे अंक पहायचे, त्यांच्या मुखपृष्ठाचे फोटो काढायचे. त्यातील अनुक्रमणिकांच्या झेरॉक्स काढायच्या. त्या महासागरातील रत्नामधून  निवडक रत्ने उचलणे हे देखील कठीण काम होते. ते अंक पाहील्यावर  त्यांच्या वडिलांच्या त्या वेळच्या कल्पना, उंच झेप घेणाऱ्या भराऱ्या पाहून राजेंद्रचा ऊर भरुन येत असे. त्यांचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडत होते. यासाठी प्रचंड धावपळ होत होती. आणि आतमध्ये एकही जाहीरात न घेत राजेंद्र कुलकर्णी यांनी 'निवडक धनंजय -तृतीय नेत्र' हा ग्रंथ २८ ऑगस्ट रोजी संस्थापक शंकरराव कुलकर्णी स्मृतिदिना दिवशी प्रकाशीत केला. वाचकांना एक अपूर्व अशा साहीत्य मेजवानीच होती ती. त्यातील त्या काळातील गूढकथा वाचून आपण थक्क होतो. त्यावेळच्या प्रतिभावंत लेखकांचे लिखाण आपल्या गतस्मृतींना जागृत करते.  असा हा संग्राह्य अंक प्रत्येकाने जवळ बाळगावा असा झाला. मध्यंतरी त्यांच्या मुलाचा विवाह ठाणे येथे संपन्न झाला. त्या विवाहाला मी पत्नीसह तेथे गेलो होतो. पण का कोण जाणे, त्या दिवशी  सतत हसतमुख असलेले, नेहमी धावपळीत असलेले, गोष्टीवेल्हाळ असे नेहमीचे कुलकर्णी दिसत नव्हते. त्या दिवशी प्रथमच मला ते थोडे थकलेले वाटले. मी येताना माझ्या पत्नीशीही त्याबद्दल उल्लेख केला. पण परत त्यांची पूर्वीसारखीच धावपळ सुरू झाली. कारण पुढच्या अंकांची सुरूवात झालेली होतीच.

आणि २०११ सालच्या अंकात त्यांनी पुढचं वर्ष हे 'चंद्रकांत'चे रौप्य महोत्सवी वर्ष असेल याची जाणीव करून दिली. 'चंद्रकांत' ५० व्या वर्षात पदार्पण करणार त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरु झाली होती.  त्यासाठी गेल्या पन्नास वर्षातील निवडक अश्या बारा कादंबऱ्या तीन खण्डात पुस्तक रूपाने प्रकाशीत करण्याचे त्यांनी योजले होते. आणि हे काम आपल्या सर्व वाचक-लेखक मित्रांच्या सहकार्याने होईल याची त्यांना खात्री होती. यामध्ये लेखकांचे, विषयांचे अन काळाचे वैविध्य असेल व त्यावर तज्ञांचेही भाष्य असेल असेही त्यांनी जाहीर केले होते. राजेन्द्र कुलकर्णी व नीलिमा वहीनी एखादे व्रत घेतल्याप्रमाणे काम करीत होते. प्रत्येक कामात निलीमा वहिनीचा सहभाग हा असेच. या २०११ च्या अंकातील निळू दामले यांची थिज व श्रीकांत मुंदरगी यांची वारीस या दोन कादंबऱ्यांना 'मुंबई मराठी पत्रकार संघ' व 'दिवा प्रतिष्ठान' यांचे पुरस्कार मिळाले. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आदल्याच वर्षी विजयाताईंच्या चंद्रकांत मधल्या 'आयुष्य : पहिलं की तिसरं' कादंबरीला मुंबई मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट कादंबरीचा 'चंद्रकांत भोगटे पुरस्कार' मिळाला. पुरस्कार मिळत होते. यशाच्या पायऱ्या चढत होते.   या दरम्यान एकदा त्यांनी सुलेखनकार कमल शेडगे यांचे 'कमलाक्षरे ' हे पुस्तक प्रकाशीत केले. त्यांचे उदघाट्न राज ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे त्यांनी ठरवले. या प्रसंगाला साजेशे कमल शेडगेंच्या कलाकृतींचे एक प्रदर्शन देखील मांडण्यात आले होते. त्यावेळी कुलकर्णीनी मला त्या समारंभाच्या वेळी कमल शेडगे यांनी एक प्रकट मुलाखत घेण्याची विनंती केली. पण अश्या मोठ्या राजकीय व्यक्तीबरोबर असणे मला योग्य वाटले नाही म्हणून मी ते नम्रपणे नाकारले. 

आम्ही नेहमीप्रमाणे नवीन अंकाची वाट पहात होतो. पण २०१२ चा अंक अर्ध्यावरच सोडून राजेंद्र कुलकर्णी हे सतत धावपळीत असलेले चैतन्यशील उमदे  व्यक्तीमत्व २५ एप्रील २०१२ रोजी आपणच मांडलेला डाव रंगात आला असतानाच मधेच मोडून निघून गेले. कदाचित सतत पन्नास वर्षे आपल्या 'धनंजय'व 'चंद्रकांत' या लाडक्या अपत्यांना सांभाळताना त्यांना आलेल्या थकव्यातून थोडी विश्रांती द्यावी म्हणून नियतीनेच त्यांना कल्पनाही न देता हा प्रसंग घडवला नसेल ना? पण  नियतीने लादलेला हा दुःखाचा डोंगर सोसूनही नीलिमा वहीनी यांनी स्वतःला सावरून चंद्रकांत-धनंजयची धुरा आपल्या खांद्यावर वाहीली. आणि राजेंद्राच्या कल्पनेतील ह्या दिवाळी अंकांना, प्रकाशन संस्थेला पूर्णपणे स्वबळावर उभे केले. अर्थात त्यामागे राजेंद्रांची  ऊर्जा, त्यांचे बळ अदृश्य रूपाने त्यांना सहाय्य नक्कीच करीत असणार. आणि त्यांच्या अदृश्य मार्गदर्शनाने एकही अंक खंडीत न होता तितक्याच दिमाखदार पद्धतीने राजेंद्र प्रकाशनाची वाटचाल सुरु आहे. न  थांबता, न थकता, अखंड आणि अविरत पणे!


राजेंद्र  कुलकर्णी सारखा मित्र मिळणे हे भाग्याचे असते. त्यांचा सहवास एखाद्याला सतत प्रेरणा देत असे. त्यांच्या सहवासाने वातावरणात एक प्रसन्नता येत असे. त्यांच्या जाण्याने एक अत्यंत लाघवी, प्रेमळ आणि आनंदी असे व्यक्तीमत्व गेले. अनेकांना लिहीते करणारे संपादक गेले, कित्येक नवोदितांना प्रकाशन क्षेत्रांत प्रगतीचा प्रकाश दाखवणारी एक मंगल ज्योत निमाली. आणि मागे राहील्या त्यांच्या अनंत आठवणी, ज्या नेहमी आपल्याला सांगत रहातील,

'मी गेलो नाही, मी आहे, माझ्या प्रकाशन संस्थेतून, माझ्या चंद्रकांत आणि धनंजयातून, ती सतत तुम्हांला माझं अस्तीत्व दाखवतील. तुम्ही सतत माझ्याप्रती केलेल्या प्रेमातून तुमच्याशी संवाद साधतील.

-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष










 

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’