आचार्य अत्रे : एक पूर्ण पुरुष
( पंधरा वर्षांपूर्वी दैनिक सामनाच्या रवीवार आवृत्तीत माझा आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमीत्त शब्द सुमनांजली वाहणारा लेख प्रसीद्ध झाला होता. त्यावेळी तो वाचून शिरीषताई पै यांनी मुद्दाम मला फोन करून लेख आवडल्याचे आवर्जून सांगीतले होते. त्यांना माझी आचार्य अत्रे स्मारकाची कल्पना खूप आवडली होती. व त्यानी त्याबाबत माझ्याशी त्यांनी चर्चाही केली होती.
आज तो लेख माझ्या फेसबुकवरील वाचक मित्रांसाठी मी तो देत आहे.)
आचार्य अत्रे यांच्या १३ ऑगस्ट रोजी येणाऱ्या १२२ व्या जयंतीनिमित्त या महापुरुषाला विनम्र श्रद्धांजली!
महाराष्ट्रातील जनतेने ज्यांच्यावर अपरंपार प्रेम केले, ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनांत महत्वाचे स्थान दिले, ज्यांना आपल्या मनोमंदीरात अक्षरश: पुजले, अश्या ज्या कांही व्यक्ती गेल्या शतकात महाराष्ट्रात जन्माला आल्या, त्यामध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या महान व्यक्तिमत्वाचा क्रमांक बराच वरचा लागेल. १३ ऑगस्ट १८९८ साली सासवड येथील शिवकालीन राघो बल्लाळ अत्रे यांच्या घराण्यात अत्रे यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षणही सासवड येथे झाले. त्याकाळी निरनिराळ्या नाटक कंपन्यांची नाटके होत असत. शाळेत शिकत असतांना अत्र्यांनी ती पाहीली, तसेंच शाळेत बक्षीस मिळालेल्या बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या चरित्रामुळे त्यांना वाचनाचा नाद जडला. मासीक मनोरंजनाचे अंक मिळवून त्यांचे वाचन करणे हे त्यांचे नित्याचे काम ठरले. आणि याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी गोविंद यांची राष्ट्रप्रेमाने ओथंबलेली गीते, पोवाडे जनजागृतीचे महत्वाचे काम करीत होती. त्याचाही परीणाम अत्रे यांच्यावर झाला.
मॅट्रीकला असताना अत्र्यांची राम गणेश गडकरी यांच्याशी भेट झाली. तेंव्हापासून अत्र्यांनी गडकऱ्यांना आपले गुरु मानले. विनोदबुद्धी हे अत्र्यांना मिळालेले जन्मजात वरदान होते. शाळेत असल्यापासून त्यांनी या बुद्धीचा वापर केला होता. गडकऱ्यांमुळे त्यांना विनोद हुडकून काढण्याची दृष्टी आली. ' विनोद हा जिवनात सर्वत्र विखुरलेला असतो. तो कसा शोधायचा हे मात्र कळले पाहीजे ' असे ते म्हणत. आपल्या विनोदाने अत्र्यांनी अवघ्या महाराष्ट्राला पोट धरधरून हसायला लावीले. पुढे अत्रे पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्या प्रतीभेला बहर आला आणि १९१९ साली बी.ए. झाल्यावर त्यांनी मुंबईला पदार्पण केले. काव्याच्या क्षेत्रांत अत्र्यांनी आधीच प्रगती केली होती. त्याचबरोबर त्यांनी 'झेंडूची फुले' लिहून विडंबन हा काव्यप्रकार प्रसिद्धीला आणला. त्यापूर्वीही हा प्रकार अस्तित्वात होता, पण अत्र्यांनी त्याला वाङ्मयीन दर्जा दिला. त्यांच्या ' झेंडूच्या फुला'नी महाराष्ट्रात अमाप लोकप्रियता मिळविली, ती अन्य कोणत्याही काव्य प्रकाराला लाभली नाही.
शिक्षण क्षेत्राविषयी आचार्य अत्र्यांना अत्यंत जिव्हाळा होता. लंडन येथून टीचर्स डिप्लोमा घेऊन येताना त्यांनी तेथील शिक्षण पद्धती कसून अभ्यासली होती. अनेक पुस्तके वाचली होती. मात्र भारतात येताच येथील क्रमीक पुस्तके ही ज्यांना साहित्याचा गंधही नव्हता, अश्या रुक्ष व अरसिक शिक्षकांनी लिहिलेली व वर्षानूवर्षे चाललेली पाहून आचार्य अत्र्यांनी त्यावर कडाडून टीका केली व शिक्षण खात्याला जाग आणली. एवढे करून ते थांबले नाहीत, तर मुलांच्या मानसशात्राचा अभ्यास करून त्यांना भावी आयूष्यात उत्तम मराठी भाषा आली पाहीजे, ते नामवंत लेखक, प्रतिभावान कवी झाले पाहीजेत या हेतूने त्यांनी ती 'नवयुग वाचनमाला’ तर्फे स्वतः लिहून काढली. त्यातील ' दिनूचे बील ' हा धडा तर सर्व प्रसीध्द आहे. शिक्षण क्षेत्रांवर
आचार्य अत्रेंनी केलेले हे अनंत उपकार आहेत. चित्रपट क्षेत्रांत त्यांनी पाय टाकला तो ते क्षेत्र काबीज करण्यासाठीच ! त्यांचे पायाची दासी, धर्मवीर, ब्रॅंडीची बाटली, अर्धांगी आदी चित्रपट त्याची साक्ष देतात. ' श्यामची आई ' या साने गुरुजींच्या जीवनांवर काढलेल्या चित्रपटाला तर राष्ट्रपतींचे प्रथम सुवर्ण पदक मिळवीण्याचा त्यांनी बहुमान मिळविला तसेच त्यांच्या 'महात्मा फुले' चित्रपटास रौप्य पदक मिळाले.
नाट्यलेखनाची प्रेरणा अत्र्यांना गडकऱ्यांपासून मिळाली. त्या काळात गडकरी, खाडीलकर, कोल्हटकर, अश्या महान प्रतिभाशाली नाटककारांनी रंगभूमीला वैभवाच्या कळसावर नेवून ठेवले होते. पण त्यातही आचार्य अत्र्यांनी मराठी रंगभूमीला 'साष्टांग नमस्कार’ घालून स्वतःचे असे खास पर्व नाट्य श्रुष्टीत निर्माण केले. त्यांनी स्वतःच्या मालकीच्या चित्रपट व नाट्य संस्थाही निर्माण केल्या. अत्र्यांच्या सहवासात अनेक लोकप्रिय व्यक्तिमत्वे आली. त्यांच्याशी त्यांचे सख्य जमले, तसेच त्यांच्या न पटलेल्या विचारांवर वा तत्वावर कित्येकांची नाराजीही ओढवली. काहीवेळा त्यांच्यावर शारीरिक हल्लेही झाले. पण अत्रे शेवटी सर्वाना पुरून उरले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कर्तृत्व, देशभक्ती, त्याग, याची पूर्ण जाणीव असलेल्या अत्र्यांनी सावरकरांनी जेव्हां हिंदू राष्ट्राचा ध्यास धरला, तेव्हां त्यांच्यावर टीकाही केली. तरी देखील त्या दोघांच्या संबंधात कधीही बाधा आली नाही. आणि पुण्यातील सावरकरांच्या एका सत्कार सभेत अत्र्यांनी त्यांना ' स्वातंत्र्यवीर ' ही पदवी दिली. तसेच पुण्यामधेच सावरकरांनी अत्र्यांना 'आचार्य' ही उपाधी दिली. सावरकरांच्या अखेरच्या दिवसांत काँग्रेस सरकाने त्यांच्या घरावर गुप्त हेरांची नेमणूक केली होती. त्यांचा हा कुटील डाव अत्रेंनी बाहेर काढून मराठा मध्ये लेख लिहून काँग्रेसला पाळता भुई थोडी केली व काँग्रेस सरकारला सावरकर सदन वरील गुप्तहेर मागे घ्यावे लागले.
आचार्य अत्र्यांच्या रोमहर्षक जीवनातील 'संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन’ हे एक पर्व आहे. त्याकाळांत मुंबई ही द्विभाषीक ठेवण्याचे षडयंत्र राज्य पुनर्रचना समितीने रचले होते. तेव्हां महाराष्ट्रातील जनता पेटून उठली. आचार्य अत्रे यांचा महाराष्ट्र वाद व मराठी बाणा सर्वश्रुतच होता. त्या काळात अवघा महाराष्ट्र त्यांनी आपल्या भाषणांनी आणि लेखणीने ढवळून काढला. नवयुग मधील आचार्य अत्र्यांचे जळजळीत लिखाण व जोडीला बाळासाहेब ठाकरे यांची घणाघाती व्यंगचित्रे यांनी प्रत्येक मराठी मनावर " मुंबईसह संयूक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे!” हा मंत्र कोरला. लाखालाखांच्या सभा घेऊन अत्र्यांनी काँग्रेसी नेत्यांना सळो की पळो करून सोडले. पण या आंदोलनाची भांडवलदारी साखळी वृत्तपत्रांकडून दखल घेतली जात नव्हती, म्हणून जनतेपर्यंत हा आवाज पोचला पाहीजे याकरीता संयूक्त महाराष्ट्राचे रणशिंग फुंकण्यासाठी शिवतीर्थावरील एका जाहीर सभेत अत्र्यांनी आपल्या दैनिकाची घोषणा केली. आणि तेथेच असलेल्या सेनापती बापटांनी त्याचे नामकरणही
'मराठा’ असे केले. आणि १५ नोव्हेम्बर १९५६ रोजी जनसेवेचे कंकण बांधून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारा
'दैनीक मराठा’, 'मराठ्या उचल तुझी तलवार!’ हे सुरेश भटांचे स्फूर्तीदायक गीत गात दिमाखात प्रसीध्द झाला. अल्पावधीतच मराठाने विक्रीचा उच्चांक गाठला. सरकारी जाहीरातींशिवाय केवळ विक्रीवर खप वाढवणारे मराठा हे एकमेव दैनीक होय.
पुढे वरळी नाक्यावर उभारलेली त्यांची ‘शिवशक्ती‘ हे मराठी माणसांचे खुले व्यासपीठ आहे, असे ते म्हणत. आणि हे अक्षरश: खरे होते. अनेकांना त्यानी न्याय मिळवून दिला. कोणालाही त्यांच्याकडे सहजरीत्या जाता येत असे. तेही लोकांमध्ये सहजी मिसळत असत. केवळ कांचेच्या बंदीस्त घरांत राहून राजकारण करणारे ते नव्हते. त्या काळात वृत्तपत्रे सुधारीत वेतन श्रेणीसाठी संप पुकारून वृत्तपत्रांचे प्रकाशन बंद पाडीत असत, तेव्हां मराठा हे एकमेव दैनीक सुरु असे. कारण आधीच त्यांनी सुधारीत वेतनश्रेणी दिलेली असे.
संयूक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे हे मराठी जनतेच्या वतीने लढणारे झुंजार सेनानी होते. सं. महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या रक्ताचे अर्ध्य देऊन बळी पडलेल्या १०७ हुतात्म्यांच्या स्मरणाने ते पेटून उठत. आणि त्यांच्या वाणीतून आणि लेखणीतून शब्दांचे जळजळीत निखारे बाहेर पडत. शेवटी मराठी माणसाचा रुद्रावतार पाहून केंद्र सरकार नमले, व १ मे १९६० रोजी मुंबईसहीत महाराष्ट्र राज्य जन्माला आले. मात्र त्या दिवशी झालेल्या जल्लोष समारंभाचे त्यांना साधे आमंत्रणही नव्हते. उलट ज्या यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रापेक्षा मला नेहरू मोठे आहेत, म्हणून विरोधी भूमिका घेतली होती, व जनतेचा रोष पत्करला होता, जनता त्यांच्या सभा उधळून लावीत असे. त्यांच्याच नावावर संयूक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्याची नोंद झाली. आचार्य अत्रे यांचे व्यक्तीमत्व प्रचंड होते. त्यांच्याच भाषेत बोलायचे तर ' असा माणूस हजारो वर्षात झाला नाही अन पुढील हजारो वर्षात होणार नाही. निसर्गाने त्यांना भव्य असे व्यक्तीमत्व बहाल केले होते की त्यांच्यापुढे सर्वच खुजे वाटत. त्यांचा आवाजही नभांचा गडगडाट झाल्याप्रमाणे होता. थोडे, अल्प असे दारीद्र्य दाखवणारे शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हतेच. ' प्रचंड’ 'कोट्यवधी 'अश्या शब्दांतूनच त्यांचे विचार व्यक्त होत.म्हणूनच ग. दि. माडगूळकर एकदा म्हणाले होते की, अत्र्यांना त्यांच्या मास्तरांनी ' बे एकं बे 'चा पाढा कधीच शिकवला नाही. तो ‘हजार एके हजार ' असाच शिकवलेला असावा. त्यांच्या लिखाणांत शब्दबंबाळ वाक्ये कधीच नसत. साधी, सुटसुटीत सोपी वाक्ये. थेट अंतःकरणाला भिडेल अशी वाक्यरचना. सुंदर बाळबोध वळणाची भाषाशैली अत्र्यांनीच मराठीत आणली. अग्रलेख वाचण्याचं सवय त्यांनी महाराष्ट्राला लावली. त्यांच्या अग्रलेखात एकही परीच्छेद नसे. त्यांचे मृत्युलेख तर मराठी साहीत्यातील मानदंड ठरले आहेत. त्याचा त्यांना रास्त अभिमानही होता. एकदा काकासाहेब गाडगीळांना ते म्हणाले होते, लोकांनी मरावे अन माझ्याकडून मृत्यूलेख लिहून घ्यावा. आणि खरोखरीच जेव्हां काकासाहेब गाडगीळ गेले त्यादिवशी त्यांनी आपल्या या मित्रांवर जो मृत्युलेख लिहीला तो अगदी खेळकर स्वरूपात. कॉलेज जीवनातील फर्ग्युसन समोरील बैलगाडीत स्थापन केलेल्या ‘सुपारी क्लब’ च्या आठवणीतून त्यांनी गाडगीळांच्या कर्तबगारीचे पैलू असे उलगडले, की वाचत असता आपल्याला हुंदके दाबावे लागत असत. तीच गोष्ट पं. नेहरुंवरील व स्वा. सावरकरांवरील मृत्युलेखातून जाणवत होती. अग्रलेखांची मालीका लिहून एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेणे हे आचार्य अत्र्यांचे खास वैशिट्य होते. तसेच वृत्तपत्रात मथळे देण्यातही त्यांचा हातखंडा होता. त्यांचे 'कऱ्हेचे पाणी' हे आत्मचरीत्र आजपर्यंत कोणीही लिहीलेल्या आत्मचरीत्रापेक्षा प्रचंड आहे. तसेच ते केवळ त्यांच्यापुरते मर्यादीत नसून त्या काळातील महाराष्ट्रातील तो वैचारीक, साहीत्यिक, व राजकीय आढावाच म्हणावा लागेल. त्याच बरोबर मथळे द्यावेत तर अत्र्यांनीच, शिव्या द्याव्यात त्याही अत्र्यांनीच व स्तुती करावी तीही अत्र्यांनीच ही प्रत्येकाची धारणा असे. आपल्या भाषेचा अत्र्यांनाही अभीमान वाटत असे. वृत्तपत्रीय लिखाणात त्यांनी अनेकांचा खरपूस समाचार घेतला, त्यासाठी कित्येकदा अश्लील भाषाही वापरली. पण त्यांच्या साहीत्यात मात्र हे त्यांनी कटाक्षाने टाळले. त्यातील त्यांची भाषा ही भरजरी, होती, वैभव संपन्न होती, मनाला भिडणारी होती. म्हणून ती अमर झाली. अक्षय झाली.
आचार्य अत्र्यांनी अनेक क्षेत्रे काबीज केली. साहीत्य, नाट्य, काव्य, शिक्षण, चित्रपट, राजकारण या सर्वच क्षेत्रांत त्यांनी पाऊल टाकले व ते अत्यूच्च पदावर पोचले. मराठी नाट्यसृष्टी मृतवत होत आली तेव्हां त्यांनी नवीन नाटके लिहून रंगभूमीवर आणून तिला संजीवनी दिली. ते धार्मीक होते, अध्यात्मीक होते, पण त्यांच्याकडे अंधश्रद्धा नव्हती. त्यामुळेच त्यांच्या ओठी तुकोबा-ज्ञानेश्वर असत. संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांचा मानवता धर्म त्यांनी जोपासला. त्यामुळेच 'देह देवाचे मंदीर, आत आत्मा परमेश्वर' अशी रचना त्यांच्याकडून झाली. ते जसे गुणांचे पूजक होते, तसेच दुर्गुणांचे निर्दालक होते. अत्रे यांचे जीवन म्हणजे एक प्रचंड नाट्य आहे. पर्वताएवढी संकटे त्यांच्यावर कोसळली. पण त्यांनी धीरोदात्तपणे त्यांच्याशी सामना केला. त्याचबरोबर यशही त्यांना भरभरून मिळाले. सुखदुःखाचा खेळ त्यांच्या मंतरलेल्या जीवनांत विलक्षण होत होता. खिशात दमडी नसताना त्यांनी लाखांचे व्यवहार केले. राजेशाही वैभवही भोगले. अनवाणी चालले, अन स्वतःच्या वातानुकूलित आलीशान इंपाला मधूनही फिरले.
१९६७ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आचार्य अत्रे मध्य मुंबईतून उभे राहीले. पण त्यावेळी त्यांनी आपली व दैनिक मराठांची सर्व ताकद जॉर्ज फर्नांडीस साठी लावली. आचार्य अत्र्यांच्या प्रचंड सभा होत होत्या. यावेळी नुकत्याच उदयाला आलेल्या शिवसेनेसह बाळासाहेब ठाकरे यांनी आचार्य अत्र्यांच्या पराभवासाठी सगळी ताकद त्या निवडणूकीत पणाला लावली होती. स्वतःचे उमेदवार नसताही केवळ ' या लोकांना पाडा ' ही एकच भूमिका शिवसेनेने घेतली होती. आणि काँग्रेसचे उमेदवार कोण होते ? तर उद्योगपती नवल टाटा, केशब महींद्र, संयूक्त महाराष्ट्राचा शत्रू स.का. पाटील. मराठी माणसाच्या जयजयकारासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने आचार्य अत्रे या सच्च्या मराठ्याला विरोध करण्याची अनाकलनीय भूमिका त्यावेळी घेतली नसती तर, अत्रे लोकसभेवर निवडून गेले असते. वास्तवीक याच आचार्य अत्रे याना सन्मान म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या जन्मदिनानिमित्त १३ ऑगस्ट १९६० रोजी आपल्या ' मार्मीक ' या व्यंगचित्र साप्ताहिकाची मुहूर्तमेढ रोवली होती. व आतमध्ये आचार्य अत्रे यांचे मावळ्यांच्या वेषांत हातामध्ये तलवारीच्या जागी लेखणी घेऊन घोड्यावर बसलेले व्यंगचित्र काढले होते, व त्याचे शीर्षक होते, ' मराठी शिलेदाराला मानाचा मुजरा !' ज्या मराठी सेनानीने संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता, त्याच माणसाचे शत्रू मराठी माणसे झाली आणि सहा हजार मतांनी आर.डी.भंडारे यांच्याकडून आचार्य अत्रे पराभूत झाले. दुसऱ्या दिवशी मराठात अत्र्यांनी 'आम्ही हरलो, आम्ही जिंकलो' हा नितांत सुंदर अग्रलेख लिहीला. अत्र्यांचे गूण जसे महान होते, तसेच त्यांचे दोषही मोठेंच होते. तरीही त्यांनी महाराष्ट्रावर प्रेम केले आणि महाराष्ट्रानेही तितकेच प्रेम आपल्या या लाडक्या बहुढंगी व्यक्तिमत्वावर केले. ते जेव्हां महाराष्ट्रासाठी लढत होते, तेव्हां मराठी जनतेचे प्रतिबिंब त्यांच्यामध्ये दिसत असे.
मात्र या निवडणूक काळात झालेल्या दगदगीमुळे अत्र्यांची तब्येत ढासळू लागली. १९६८ साली त्यांचा सत्तरावा वाढदिवस साजरा झाला, पण ते उल्हासीत दिसत नव्हते. 'आता कसले वाढदिवस, आता फक्त काढदिवस ' असे उद्गार त्यांनी त्यावेळी काढले. बांदोडकरांच्या करणीमुळे गोवा महाराष्ट्रात आला नाही, बेळगांव -कारवारचा सीमा लढा अर्धवट राहीला होता, या सर्वच गोष्टी त्यांना क्लेशदायक वाटत होत्या. त्यातच त्यांना कावीळ झाली. त्याही स्थितीत ते दौरा करून आले. परतल्यावर त्यांची तब्येत पूर्णपणे ढासळली. त्यांना बॉंबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर तेथून त्यांना के.इ.एम. रुग्णालयात हलविण्यात आले. कावीळ रक्तात पसरली होती. रक्त बदलण्याची गरज होती. रक्तदानासाठी विद्यार्थी, तरुण यांची प्रचंड रांग इस्पितळासमोर लागली. पण अखेर नियतीपुढे कोणाचे कांहीच चालले नाही. डॉक्टरी प्रयत्न कमी पडले. ईश्वरी संकेतही कांही वेगळेच सांगू लागले. अन १३ जून १९६९ रोजी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढणारा हा झुंजार सेनानी सर्व महाराष्ट्राला पोरकं करून दूरच्या प्रवासाला निघून गेला. ज्याने असंख्य लोकांना हृदय पिळवटणारे मृत्युलेख लिहून आदरांजली वाहीली, तोच साहीत्यसम्राट आज शांत, निस्तब्ध झाला होता. १४ जून रोजी निघालेल्या त्यांच्या प्रचंड अंत्ययात्रेत लोक अक्षरशः रडत होते. ते कमी म्हणून की काय ? निसर्गालाही अश्रू अवरेनात. त्यानेही ते धो धो पावसाच्या रूपाने अश्रू ढाळण्यास सुरुवात केली.
अशा या महान व्यक्तिमत्वाचा अर्धपुतळा वरळी नाक्यावर उभारण्यात आला त्याला चौथरा केला होता तो आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा. त्या पुस्तकामध्ये एक पुस्तक होते ते ‘श्यामची आई' हे सानेगुरुजींचे. आपल्या उभ्या हयातीत कोणाची कधीही उसनवारी न केलेल्या अत्र्यांच्या नांवावर साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे पुस्तक दाखवून मुंबई महापालिकेने आपल्या अकलेचे दिवाळे वाजल्याचे दाखवले होते. वास्तवीक 'श्यामची आई' या कथेवर अत्र्यांनी चित्रपट काढला, ज्याने विश्व विक्रम केला. राष्ट्रपतींच्या पहील्या सुवर्ण पदकाचा तो मानकरी ठरला. आणि एखाद्या अर्ध पुतळ्यात सामावणारे त्यांचे अफाट व्यक्तिमत्वच नव्हते. त्यासाठी त्यांचे स्मारक असे होणे आवश्यक आहे की ते 'आचार्य अत्रे संशोधन केंद्र' म्हणून असावे. यामध्ये आचार्य अत्रे यांचे जीवन प्रदर्शन असावे. त्यांचे चित्रपट, त्यांचे साहीत्य, त्यांची नाटके, पत्रकार म्हणून केलेले कार्य, दर्शनी भागात असावे. त्यांच्या 'नवयुग' व मराठा' या वृत्तपत्रांचे अंक डिजिटल पद्धतीने तेथे उपलब्ध असावेत. त्यामध्ये एक संशोधन केंद्र असावे, ज्यामधून पी.एच.डी. च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या जीवनपटाचा, त्यांच्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलन काळातील त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा, त्यांच्या पत्रकारितेचा, त्यांच्या काव्याचा, नाट्यसेवेचा, शिक्षकी पेशाचा, त्यांच्यातील राजकारणी व्यक्तीचा सखोल अभ्यास करता येईल. कारण आचार्यांनी ज्या ज्या क्षेत्रात पाय टाकला ते त्यांनी केवळ काबीजच केले नाही, तर त्या क्षेत्रात ते कळसावर पोचले. तेथे एक मिनी थेटर असावे, ज्यामध्ये त्यांचे चित्रपट तेथे पहाता येतील. आणि एखाद्या नामवंन्त शिल्पकाराकडून त्यांचे अंतर्गत दर्शन घडवणारे पूर्णाकृती शिल्प असावे, जे पुढील तरुण पिढीला नेहमीच स्फूर्तीदायक ठरेल.
शतका शतकातून जन्माला येणारे असे हे व्यक्तीमत्व होते. अत्रे एक होते की अनेक याचासुद्धा संभ्रम पुढच्या पिढीला पडू शकेल. आजच्या राजकर्त्यांनी त्यांचे राजकारणातील योगदान अनु्ल्लेखनीय ठरवले असले तरी येणाऱ्या अनेक पिढ्या त्यांचे साहीत्य वाचून याच राजकर्त्यांच्या छाताडावर उभे राहून सांगतील, तुम्ही आज जी सत्ता भोगत आहात ती या आचार्य अत्रे यासारख्या लढवैय्या झुंजार नेत्यामुळे तुमच्या नशीबी आली आहे. त्यांचे नांव जरी तुम्ही पुसायचे म्हटले तरी ते पुसले जाणार नाही. कारण ते क्षणीक वाळूवर लिहीलेले नसून या सह्याद्रीच्या कणखर पाषाणावर कोरलेले आहे.
मिटवू म्हटले तरी मिटणार नाही!
आज या महाराष्ट्राच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असलेल्या, सामान्य जनतेच्या अन्यायावर तुटून पडणाऱ्या, मराठी माणूस व महाराष्ट्रावर जीवापाड प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या या पोलादी पुरुषाला त्यांच्या १२२ व्या जयंती निमित्त नम्र आदरांजली!
-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
( या लेखातील 'श्यामची आई' पुस्तकाचा उल्लेख केल्यानंतर महापालिकेने सदर पुस्तकावरील नांव वगळले. पुढे प्रमोद नवलकर यांनीही या गोष्टीचा समाचार आपल्या ' भटक्यांची भ्रमंती' या सदरांत घेतला होता. आज त्या ठिकाणी आचार्य अत्रे यांचा भव्य पुतळा उभा आहे.)






Comments
Post a Comment