उंदीर मांजराचा धुडगूस : टॉम अँड जेरी


कार्टून फिल्म ही नेहमीच आबालवृद्धांचे निर्भेळ मनोरंजन करीत असते. केवळ माणसेच नव्हेत, तर तुमच्या आसपासचे पक्षी, प्राणी एक गोडसे आणि निष्पाप असे रूप घेऊन तुमच्या मनोरंजनाला हजर असतात. तुमच्याशी खेळतात, हसतात, बागडतात. आणि तुम्हीही त्यात आपले वय विसरून पूर्णपणे मिसळून जाता. आज कार्टून म्हटले की, सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते जगविख्यात कलाकार वाॅल्ट डिस्ने. त्यांची अजरामर झालेली मिकी माउस, डोनाल्ड डक, गुफी, पिनाचिओ, पीटर प्यान ही पात्रे. एवढेच नव्हे तर जी जंगल बूक कलाकृती रुडयार्ड किपलींगने लिहीली आहे हे बहुतेकांना माहीतच नसते. त्याने अजरामर केलेली कार्टून फिल्म 'जंगल बुक'मुळे ती वाॅल्ट डिस्ने यांच्याच नांवावर खपवली जाते. एवढा पगडा बसवला आहे या डिस्ने यांच्या कार्टूननी! अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत या कार्टूननी आपले क्षेत्र काबीज केले आहे. पण याच पात्रांइतकीच महत्वपूर्ण अशी एक जोडगोळी आपल्या खट्याळ कारवाईने जगभरातील दूरदर्शन संचावर धुमाकूळ घालीत असते. ही दोन पात्रे सर्वपरीचित आहेत, आणि ती आहेत 'टॉम अँड जेरी' ही मांजर व उंदराची जोडी. व त्याचे निर्माते आहेत विल्यम हॅना व जोसेफ बार्बरा  हे दोन कलाकार.

हॅना -बार्बरा ही दोन नांवे ऐकताच कदाचीत आपणांस कांही बोध होणार नाही. पण टॉम-जेरी सोबत त्यांनी केलेली 'फ्रेंड', 'द योगी बेअर', 'स्कुबी डू', 'हकल बेरी हाऊंड' ही व्यक्तीमत्वे आपणा सर्वांच्या परिचयाची आहेत. विशेष करून 'टॉम अँड जेरी' या मांजर उंदीर यांच्या यांच्या कार्टूनमुळे ही कलाकारांची जोडगोळी खूपच गाजली. अगदी वाॅल्ट डिस्ने यांचा क्षणभर विसर पाडणारी व्यंगचित्रे निर्माण करून हॅना-बार्बरा यांनी कार्टूनच्या विश्वांत एक क्रांती करून अमाप प्रसीद्धी मिळवली. कित्येक लोक तर ही वाॅल्ट डिस्नेचीच निर्मीती आहे असे समजत इतकी ती प्रभावी झाली होती.

या चित्रकार जोडीतील  विल्यम डाॅल्बी हॅना यांचा जन्म न्यू मेक्सिको येथील मेलरोजमध्ये  १४ जुलै १९१० मध्ये झाला. तर जोसेफ बार्बरा हे  २४ मार्च १९११ मध्ये न्यूयॉर्क मध्ये जन्माला आले. हॅना यांनी कॅलीफोर्निया येथून इंजिनीअरिंग व पत्रकारितेचे शिक्षण घेतले. पण पुढे ते  वैफ़ल्यग्रस्त झाले. १९३० मध्ये हॅनाने  हॉलीवूडमधील हर्मल आईझिंग स्टुडीओमध्ये काम मिळवले. त्याचे काम कथा व संकल्पन रचना खात्यात होते. तेथे त्याने. ॲनीमेशन करण्यास सुरुवात केली. पुढील सात आठ वर्षे हॅनाने 'ल्युनी ट्युनस' व 'मेरी मेलोडीज' या कार्टून मालिकांना अनेक नावीन्यपूर्ण कल्पना पुरविल्या. वाॅर्नर ब्रदर्सच्या बॅनरखाली त्या प्रसारीत होत होत्या. त्यानंतर हर्मल आईझिंग स्टुडीओ 'मेट्रो गोल्डविन मेयर' अथवा 'एम जी एम' कडे गेला तेंव्हा हॅना  यांना कथा संकलक म्हणून तेथे नेण्यात आले. तेथे त्यांची फ्रेड क्वीम्बी या अतीशय सर्जनशील व कल्पक अश्या दिग्दर्शकाशी गांठ पडली. अन हॅनाच्या जीवनाला ती एक वेगळी कलाटणी देणारी ठरली

फ्रेड क्वीम्बी हे एम जी एम च्या कार्टून ॲनीमेशनच्या विभागाचे प्रमूख होते. त्यावेळी 'टॉम अँड जेरी' ही मालीका ते करीत होते. हॅनाना त्यांनी टॉम -जेरी साठी चित्रे काढण्यास प्रवृत्त केले. व याच वेळी त्यांना जोसेफ बार्बरा हा जोडीदार भेटला. बार्बरा हा पूर्वी एका बॅंकेत नोकरी करीत असे. पण हातातील चित्रकलेच्या ओढीने तो नोकरी सोडून फिशर स्टुडीओमध्ये सेल ॲनीमेशनमधील व्यंगचित्रांना शाईने बाह्य रेषा काढणे, व त्यात रंग भरणे हे काम त्याने पत्करले. मात्र वाॅल्ट डिस्ने यांचे व्यंगचित्रपट व त्यातील सर्व प्राण्यांची व्यक्तीमत्वे जगभरात एवढी प्रसीद्ध झाली की, याचा परीणाम बार्बरा ज्या स्टुडीओत काम करीत होता, तो बंद होण्यात झाला. व बार्बरा याने एम जी एम मध्ये पदार्पण केले. व तेथे हॅना- बार्बरा हे दोघे तुल्यबळ कलाकार एकत्र आले.

१९३५ मध्ये हॅना-बार्बरा यांनी एकत्ररीत्या ' पूस गेट्स द बूट' या व्यंगचित्र मालीकेवर काम केले. त्यामध्ये टॉम मांजर व जेरी उंदीर ही दोन व्यक्तिमत्वे दाखवीली होती. टॉम-जेरीची ही पहीली कार्टून फिल्म. पहील्या भागात टॉम हा 'जॅस्पर' नांवाने ओळखला गेला. त्यावेळी टॉम व जेरी मानवी व्यक्तीमत्वे म्हणून वावरत होती. हॅना हा एक अनूभवी दिग्दर्शक म्हणून काम पहात होता. तर बार्बरा हा कथा लेखक, कॅरेक्टर डिझाइनर म्हणून जोडीने काम करत होता. २० फेब्रूवारी १९४० मध्ये ही फिल्म प्रकाशीत झाली. पुढे जगभरातील घराघरांत टॉम व जेरी ही मांजर उंदीराची जोडी पोचली. व आपल्या खट्याळ रवायांनी त्यांनी सर्वांचे निखळ मनोरंजन करावयास सुरुवात केली. टॉम व जेरी या जोडगोळीने अनेक कथांमधून अक्षरशहा धुमाकूळ घातला. सुरुवातीला या दोघांच्या जोडीला कांही 'सपोर्टींग कॅरेक्टर' दाखविण्यांत येत असत. तीही बहूदा टॉमला जरब दाखवून जेरीला मदत करीत असत. मात्र पुढे कित्येक व्यंगकथा या दोघांशीच संबंधीत होत्या. टॉम जेरीच्या कथांमध्ये अशक्यप्राय वाटणाऱ्या कित्येक गोष्टींची रेलचेल असे. ही दोन्ही व्यक्तीमत्वे जास्त बोलत नाहीत. किंबहूना त्यांची तोंडे बंदच असतात. पण संवादाशिवाय संपूर्ण कथेचा या दोघांच्या हालचालीवरून आपणास बोध होतो व यामध्येच या मालिकेच्या यशाचे गमक आहे.


टॉम हा मार्जार धर्माप्रमाणे जेरी या उंदीराचा शत्रू तर आहेच! पण त्यांच्यामध्ये मैत्रीचे अतूट नातेही आहे. घरातील पाळलेल्या एका लाडावलेल्या मांजराचे टॉम हे रूपक असून स्वतःहोऊन तो कधी जेरीच्या वाट्याला जात नाही. पण जेरी हा जात्याच बुद्धीवान दाखवला असल्याने तो कल्पक अश्या खोडकर योजना आखून टॉमला सतावून सोडतो. व आपण मात्र नामानिराळा रहातो. यामध्ये टॉमचे अनन्वीत हाल तर होतातच, शिवाय जेरीने काढलेल्या खोड्यानी त्रस्त झालेली इतर पात्रे हे टॉमचेच उपदव्याप असे समजून पुन्हां टॉमचीच धुलाई होते. यामुळे चिडलेला टॉम दरवेळी जेरीला पकडून त्याला शासन करण्याच्या प्रयत्नांत असतो. पण यात टॉमला कधीही यश येत नाही. या कार्टून मालीकेत जी कल्पकता वापरली जाते तिला मात्र तोड नाही. ज्या ज्या घटना यात घडत जातात त्या केवळ अश्यक्यप्राय आहेत हे माहीत असूनही त्या पूर्णपणे शास्त्रशुद्ध असल्याची जाणीव आपल्याला होते. यात हिंसाही दिसून येते. जेरी कित्येक वेळा टॉमच्या चकत्या करतो, त्याला बॉंबने उडवतो, त्याला भाजून काढतो. रोड रोलरखाली त्याला चिरडून सपाट करतो. तसेच टॉमही जेरीचा सूड घेण्यास कुऱ्हाड, पिस्तूल, चाकू बॉम्ब पर्यँतची सर्व आयुधे वापरतो. पूर्वी जेव्हां बॉलीवूडच्या हिंसात्मक चित्रपटावर टीका झाली, तेव्हां या ऍनिमेशन फिल्ममधे इतका हिंसाचार दाखवलेला असूनही त्याविरुद्ध कृती का करण्यात येत नाही असा सवाल एका साधी विनोदबुद्धी नसलेल्या एका प्रथितयश दिग्दर्शकाने केला होता. पण त्याची साधी दखलही कोणी घेतली नाही. कारण यात जरी हाणामारी दाखवली असली तरी त्यातून आपण केवळ अनुभवत असतो निखळ मनोरंजन अन करमणूक आणि त्यातून निर्माण होणारे हास्याचे धबधबे!


पुढे टॉम-जेरीच्या व्यंगचित्र मालिकेच्या रूपाने हॅना-बार्बरा यांनी वाॅल्ट डिस्नेच्या कार्टून साम्राज्याला एक मोठा धक्का दिला. व डिस्नेच्या कार्टून ॲनीमेशनची ऑस्कर अवार्डची मोनोपाली तोडली. पुढील वीस वर्षांच्या कारकीर्दीत 'टॉम अँड जेरी'साठी एम.जी.एम.ने सात ऑस्कर जिंकले. या कार्टून फिल्म प्रकल्पासाठी हॅना हा जास्त करून दिग्दर्शन व त्यातील नवीन शोधक तंत्रे याकडे लक्ष देत असे. तर बार्बरा त्यांतील कलात्मकता अन सौंदर्यशास्त्र या भागाकडे. टॉम अँड जेरी एवढे प्रसिध्द झाले की या दोघांनी जेन केलीसोबत एका चित्रपटांत नृत्यही केले. टॉम अँड जेरीच्या चित्रामध्ये आढळून येणारी सुलभता हे त्या मालीकेच्या यशाचे गमक होते. त्या व्यक्तीमत्वातील गोडवा, रंगसंगती, त्यावरील विवीध भावाविष्कार, त्यात कधी राग, कधी भीती, दुष्टपणा, द्वेष आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या दोघांतील मैत्री असो वा दुष्मनी, त्यामधील निखळ प्रेम आणि निष्पाप भाबडेपणा या सर्व गुणांनी टॉमला आविष्कृत केले आहे. आणि तितकेच मनस्वी प्रेमही तो जेरीवर करतो. अगदी साध्या साध्या गोष्टीतून कल्पक अश्या घटना निर्माण करणे हे हॅना-बार्बरा याना सहजी साध्य झाले होते.

नंतर एम.जी.एम.ला आर्थीक दृष्ट्या 'ॲनीमेशन विभाग' परवडेनासा झाला. व पुढे तो बंद करण्यात आला. तेंव्हा हॅना-बार्बरा यांनी एकत्र येऊन स्वतंत्र कंपनी काढली. व त्यात ॲनीमेशन विभाग सुरु केला. त्यांनी एम.जी.एम.कडून टॉम अँड जेरीचे सर्व हक्क विकत घेतले व येथून पुढे टॉम-जेरीची एक स्वतंत्र वाटचाल सुरु झाली. मात्र आता हॅना-बार्बरा यांनी टॉम-जेरीच्या मूळ हटवादी स्वभावाला बदलून त्याला प्रेमळ स्वरूपात सादर केले. त्यामुळे त्यांची व्यक्तीमत्वे आणखीनच बहरली. टेलिव्हीजन या माध्यमाची ताकद हॅना-बार्बरा यांना कळून चुकली असल्याने त्यांनी स्टुडीओमधे टेलिव्हीजन -ॲनीमेशन ही नवीन मुहूर्तमेढ रोवली. १९३९ मध्ये एकत्र आलेली ही हॅना-बार्बरा यांची जोडी कधीही एकमेकापासून विभक्त झाली नाही. १९७६ चा हॉलीवूडचा 'वाॅक ऑफ फेम' 'किताब या दोघांना मिळाला. तर १९९३ मध्ये 'टेलिव्हिजन ॲकॅडमी हॉल ऑफ फेम' या किताबाने या दोघांना सन्मानीत करण्यात आले. 'गोल्डन ग्लोब अवार्ड, गव्हर्नर्स अवार्ड ही देखील त्यांच्या वाट्याला आली. २००१ मध्ये  हॅना यांचे निधन होईपर्यंत ते या स्वप्ननगरीत दंग होते.  पुढे आपल्या कामात व्यस्त असतांना जोसेफ बार्बरा यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. आजही जगभरात टॉम अँड जेरी आपली वाटचाल अनिर्बंध करीत आहेत. यात कधी जेरीची दमछाक होत असते, तर कधी टॉमची परवड जेरीकडून होत असते. तरीही हे दोघे एकत्रच आहेत. अगदी जिवाभावाचे मित्र 'टॉम अँड जेरी'

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष

Comments

  1. छान माहिती पूर्ण लेख.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’