आमचे दादा : ध्येयवादी पत्रकार ग.गो.राजाध्यक्ष.
दादा हे माझे वडील बंधू. त्यांच्या माझ्या वयात चक्क चौदा वर्षांचे अंतर होते. दादाच्या पाठीवर तीन बहीणी. त्यानंतर आम्ही परत तिघे भाऊ. मी सर्वात लहान शेंडेफळ. मझ्या जन्मानंतर सुमारे दोन अडीच वर्षात माझ्या आईचे निधन झाल्याने माझे वडील आम्हां सर्वाना घेऊन बेळगांवात आले. चंदगड तालुक्यातील बेळगावपासून बारा मैलावरील कारवे हे बेळगांव वेंगुर्ला रस्त्यावरील आमचे गांव. तेव्हां चंदगड तालुका बेळगांव जिल्ह्यात होता. मला जेव्हां समज आली तेव्हां मला आठवते ते दादा सकाळी सायकलवरून हायस्कुलला जात असे. तसेच देशभक्तीने भारलेल्या युवकाप्रमाणे दादानेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पदार्पण केले. रोज सकाळी हातात लाठी घेऊन संघाच्या शाखेवर जात असे. मध्ये कधीतरी सायकलवरूनच तो आमच्या गांवी म्हणजे कारव्याला जाऊन येत असे. तेव्हां मला समजले की आमचे कारवे नावाचे एक गाव असून तेथे आमच्या मालकीची शेती वगैरे आहे. आणि एकदा दादा मलाही सायकलवर बसवून कारव्याला घेवून गेले. तेथे आमचे घर, शेते प्रथमच मी पाहीली. आमच्या घरात कुलकर्णी नावाचे तलाठी रहात असत. व घराचा व तेथील फळ झाडांचा सांभाळ वडीलांकडून पैसे घेऊन करीत असत.
आईविना मी असल्याने घरातील सर्वच मला खूप जपत. माझी मोठी बहीण- आक्का, त्याकाळात वयाने लहान असूनही मला आईप्रमाणे तिने सर्व कांही केले. पुढे गांधी वधाची घटना झाली. सर्वत्र ब्राम्हणांच्या घराच्या जाळपोळी सुरु झाल्या. संघाचा कार्यकर्ता म्हणून आमच्या घरावर मोठा जमाव चालून आला, आणि घरातील काही वस्तू, व दादाचे संघाचे साहीत्य बाहेर नेवून जाळण्यात आले. आणि त्याच रात्रीं साळवी नावाचे फौजदार आमच्या घरी येऊन त्यांनी माझ्या वडीलांची आवडती अमेरीकन डबल बॅरलची बंदूक, तिची काडतुसे जप्त करून नेली. आमच्या दादाला लिखाणाची खूपच आवड होती. भारलेल्या युवकाप्रमाणे त्यांचे मराठीचे शिक्षक वि.गो.साठे यांनी त्याच्या लेखनाला सतत प्रोत्साहन दिले त्यामुळे त्यांची मराठि भाषा वृधिंगत होऊ लागली. ते ज्या सेंट्रल हायस्कुल मध्ये शिकत होते, ती शाळा बा.रं.सुंठणकर, एन.के. देशपांडे, ए.जी. कुलकर्णी, के. बी.कुलकर्णी अश्या काही ध्येयवादी लोकांनी सुरु केली होती. त्यामुळे तेथील शिक्षकही त्याच धोरणाने तेथे शिकवीत असत. आपल्या विद्यार्थ्यांनी साहीत्य क्षेत्रांत पुढे यावे, भरपूर वाचन, लेखन करावे ही तळमळ असणारे श्री वि.गो.साठे या शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. आणि वयाच्या सोळाव्या वर्षांपासून दादा कथा व कविता लिहू लागले.
या दरम्यान समविचारी तरुणांचा एक ग्रुप तेथे तयार झाला. व त्यांनी 'कुमार साहीत्य मंडळ' नावाचे एक मंडळ स्थापन करून त्यातर्फे 'प्रदीप' नावाचे एक हस्तलिखित सुरु केले. दादाचे अक्षर अगदी मोत्याप्रमाणे सुंदर होते. त्यामुळे संपादन आणि लेखन अशी दुय्यम जबाबदारी त्याच्यावर आली. या हस्तलिखितात लेख, कथा, कविता, चित्रे असे सर्वच विषय असत. आणि मुखपृष्ठ देखील त्यातीलच एकाने केलेले असे. त्यावेळी बेळगावात 'मराठी साहीत्य संमेलन' भरले होते. त्यात हे हस्तलिखित ठेवण्यात आले होते. आणि त्यामध्ये अभिप्रायासाठी ठेवलेल्या पानांवर आचार्य अत्रे, दत्तो वामन पोतदार, ग.त्र्यं.माडखोलकर, काकासाहेब गाडगीळ, मामा वरेरकर, वि.स.खांडेकर, वि.मा.दि.पटवर्धन, न.र.फाटक अशा दिग्गजांनी आपलें अभिप्राय लिहून या 'प्रदीप'ला सुयश चिंतले होते. या अनोख्या अश्या हस्तलिखिताला पारितोषिक तर मिळालेच, शिवाय थोरामोठयांच्या आशीर्वादाला ते हस्तलिखीत पात्र ठरले.
गांधीवधाच्या त्या दिवसात जे साळवी फौजदार आमच्या घरी आले होते त्यांनी दादांना संघाचा एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणुन रात्री अटक करून बेळगावच्या हिंडलगा जेल मध्ये ठेवले. त्यांना भेटण्यासाठी माझ्या वडीलांसोबत मीही गेल्याचे मला चांगलेच स्मरते. पुढे त्यातून सुटका झाल्यावर वडीलांनी दादाचे लग्न केले व गोव्यातील अंजनी नमशिकर, सुशीला राजाध्यक्ष बनून आमच्या घरी आमची वहीनी म्हणून आली. माझ्या अगदी लहानपणापासूनच तिला आम्ही घरी पहात आल्याने ती कधी बाहेरून आलेली आम्हांला जाणवलीच नाही. इतकी आमच्या घराशी, आम्हां सर्वांशी ती रुळून गेली. जसजसा मी मोठा होत गेलो, तसे मला आमच्या कारवे गावाविषयी, आमच्या शेतीविषयी समजत गेले. जवळ जवळ अर्ध्या गावची जमीन आमच्या मालकीची होती. तीही आमचे आजोबा वारल्यानंतर वडील लहान असल्याने आजीने, म्हणजे त्यांच्या आईने कारव्याला, आपल्या माहेरी येऊन ती विकत घेतली होती. पुढे माझ्या वडीलानी काहीच व्यवसाय केला नाही. शेतीचे उत्पन्न येत असे. कुळं घरी येऊन शेतात पिकलेले धान्य, फाळा वगैरे देत असत. त्यावरच चरीतार्थ चालत असे. माझ्या वडीलांना गावांत खूप मान होता. गावांतील सर्वजण आम्हांला सावकार असे संबोधीत असत. गांधी वधाच्या वेळी सर्व ब्राह्मण कुटुंबाची घरे खेड्यापाड्यातून जाळून त्यांचे सर्व लुटण्यात आले होते. पण आम्ही कोणीही तेथे रहात नसून देखील आमच्या काडीलाही कोणी धक्का लावला नाही. एवढा मान माझ्या वडीलांना होता.
पुढे माझ्या वडीलानी कुटुंबाचा सर्वच भार दादांच्यावर घातला. तेव्हां दादाने कारव्यालाच वेळ जाण्यासाठी म्हणून एक लहानसे दुकान सुरु केले व तेथे त्याने आपल्या लिखाणाला पुन्हां सुरुवात केली. रात्री झोपण्याआधी ते लिहीत बसत. त्याकाळी टाकाने शाईच्या दौतीत बुडवून लिहिणे हा प्रकार असायचा. पांढऱ्या कागदांचे ताव घेऊन बसायचे, व मग बैठक मारून बराच वेळ लिखाणात घालवायचा हा त्यांचा नित्यक्रम ठरला होता. त्यांचे लिखाण एकटाकी होत असे. व कोऱ्या कागदावर रेष न मारता सरळ टपोऱ्या अक्षरात त्याचे लेखन होत असे. पुण्याच्या सह्याद्री मासिकांत त्यांची पहीली कथा प्रसीद्ध झाली. आणि त्यांच्या साहित्यिक यशाची वाट मोकळी झाली. त्यावेळी कारव्यासारख्या खेड्यात आमच्या घरी बहुतेक सर्व मासीके, साप्ताहीके येत असत. माझ्या वडीलांना वाचनाचा खूप नाद होता. घरात पुस्तकांची अन मासिकांची एक मोठी लायब्ररीच झाली होती.
आमची घरेही समोरासमोर अशी दोन होती. एक आजीच्या काळातील जुने व नंतर वडीलानी बांधलेले नवे. त्या घरात आम्ही रहात असू. एक एकराच्या प्लॉटवर चौफेर असलेल्या आंब्या फणसाच्या, लिंबू, पेरू, नारळ अश्या झाडामध्ये आणि परसदारातील केळीच्या बनात लपलेल्या अश्या त्या घरात आम्हांला नंदनवनच वाटत असे. . रात्री कंदील व लहान दिवे, अधून मधून पेट्रोमॅक्स पेटवणे असे प्रकार असत. रात्रीच्या अंधारात आकाशात काजवे चमचमत असत. आंब्यांच्या दिवसात कोकीळा रात्री झाडावर पिकलेले आंबे टोचा मारून खात त्यावेळी ते खाली पडत. व त्यांना गोळा करण्यासाठी आम्ही धावत जात असू. शेवगा फुलला की त्याच्या शेंगानी संपूर्ण झाड ओथंबून निघे. मग त्याच्या शेंगा आम्ही गांवभर वाटत असू. तीच गत फणसांची. फणसाच्या दिवसात ही झाडे जमिनीपासून फणसानी लगडलेली असत. गावातील गावकरी, नातेवाईक असे सर्वच हक्काने ते नेत असत. उसाचे गुऱ्हाळ असले की मग चैनच असे. प्रत्येक सण हा मोठ्या थाटामाटाने घरी साजरा होत असे. त्याकाळी कोणीही सरकारी अंमलदार आले कीं ते आमच्याच घरी उतरत असत. दादांच्या कथा आणि कविता त्यावेळी बेळगावच्या तरुण भारत, बेळगांव समाचार, लोकमत, चिकित्सक यांच्या दिवाळी अंकात तसेच वसंत, सह्याद्री, माणीक, रोहीणी, अश्या मुंबई पुण्याच्या मासिकांतून सतत प्रसिद्ध होऊ लागल्या. लेखक म्हणून ते प्रसिद्धीला आले होते. त्यांचे मित्र शेजारच्याच कोवाडचे रणजीत देसाई यांचेही लिखाण खूप प्रसीद्ध होत असे. जे पुढे खूप मोठे साहीत्यिक झाले. कारव्यासारख्या खेडेगावांत राहून एवढी साहीत्य संपदा दादा निर्माण करीत असत, त्यामुळे ते सर्वांच्या कौतुकाला पात्र झाले होते. अश्या रीतीने किराणा मालाच्या पुड्या बांधताना त्यांचे कथा-काव्य बहरत होते.
दादांचे संबंध जरी रा.स्व. संघाशी होते तरी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे संबंध स्नेहाचे होते. विशेषतः बॅ. नाथ पै हे समाजवादी. पण त्यांच्याशीही दादांची घट्ट मैत्री होती. माझ्या सर जे.स्कुल ऑफ आर्ट च्या प्रवेशावेळी नाथ पै यांनीच मदत केली होती. त्यानंतर आमचे सर्वच बिऱ्हाड कारव्याला स्थलांतरीत झाले. कुळ कायदा आला व आमच्या बऱ्याच जमीनी कुळांना मातीमोलाने विकाव्या लागल्या. तरीही बऱ्याच जमीनी शिल्लक होत्या. त्यानंतर मला बेळगावच्या शाळेत घातलेले असल्यामुळे मी व दादा आम्ही दोघेही बेळगावात राहू लागलो. ते होते १९५५ साल. नुकतेच गोव्याचे आंदोलन आटोपले होते. पाठोपाठ भाषावार प्रांत रचना झाली आणि बेळगांव- कारवारचा समावेश कर्नाटकातच! अशी घोषणा पं. जवाहरलाल नेहरू यांनी नभोवाणीवरून केली, आणि बेळगावात एकच आगडोंब उसळला. बेळगावचे लढवय्ये नेते बाबुराव ठाकूर आणि त्यांचे वृत्तपत्र 'तरुण भारत' यांनी सीमा लढ्यात स्वतःला झोकून दिले होते. ' तरुण भारत' हे तर सीमावासीयांचे मुखपत्रच होते. बाबुरावांना आपल्या वृत्तपत्राला पूर्णवेळ देता येत नव्हता. माझ्या वडीलांशी त्यांचे चांगले संबंध होते. तसेच दादांचे लेखनगुणही ते जाणून होते. त्यामुळे त्यांनी दादांना आपल्या 'तरुण भारत' मध्ये घेऊन त्यांच्यावर संपादकीय जबादारी टाकली. आणि ललीत लेखनाकडून दादांची वाटचाल पत्रकारीतेकडे सुरु झाली. आणि 'ग.गो. राजाध्यक्ष' हे नांव पत्रकार या नव्या बिरुदावलीत अवतरले.
'तरुण भारत' हे त्यावेळचे केवळ वृत्तपत्र नव्हते, तर ती पत्रकार घडवणारी एक शाळा होती. तरुणांना राष्ट्रीय दिशा देणारी एक संस्था होती. अनेक चळवळींशी तरूण भारतचा संबंध आला होता. त्यांच्या संपादकीय कचेरीत टेबलावर समोरच्या बाजूला बाबुराव व दुसऱ्या बाजूला इतर संपादकीय स्टाफ असा प्रकार असे. बाबुराव टिपणी देत असत. व इतर लोक त्यावरून बातम्या करत असत. अश्या रीतीने संपादकीय संस्कार तेथे घडत असत. यामध्ये सोबत बा.रं. सुंठणकर, केशवराव दड्डीकर, रामभाऊ आपटे, हरिभाऊ हेरवाडकर, बळवंतराव सायनाक अश्या नेत्यांचा सहवासही त्यांना लाभला. बघता बघता दादांनी तेथे आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांचे लेख, संपूर्ण सीमा भागात प्रसीद्ध पावले, एकढेच नव्हे, तर कोल्हापूर, सांगली पुणे या भागात देखील त्यांना महत्व येऊ लागले. आणि यामुळे त्यांना पुढे हिंदुस्तान समाचार या वृत्तवाहिनीचे, तसेच पुणे तरुण भारत, विवेक, गोमंतक, सकाळ, पुढारी, गांवकरी अश्या राष्ट्रवादी वृत्तपत्रांचे वार्ताहर प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले. त्यावेळी कर्नाटक सरकारकडून मराठी माणसावर होणारे अत्याचार हे सहसा बाहेर कोणी छापत नसे. म्हणून बॅ.नाथ पै यांनी त्यांना मुद्दाम लोकसत्ताचे बेळगांव जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम पहाण्यास सांगीतले. सीमा भागावरील अन्यायाला योग्य तऱ्हेने जनतेपुढे मांडणारा पत्रकार हा त्यांना वाटलेला ‘ग.गो.’ विषयीचा हा विश्वास होता. आणि तो सार्थ होता. १९६६ सालापासून ते अखेरपर्यंत लोकसत्ताचे एकमेव दीर्घकालीन प्रतिनिधी म्हणून दादा कार्यरत राहीले. प्रत्येक वृत्तपत्राची विचारसरणी निरनिराळी असते. आणि दादा ज्या वृत्तपत्राला त्यांची बातमी जात असे, ती त्यांची विचारसरणी मनाशी धरूनच! एकच बातमी ते वेगवेगळ्या तऱ्हेने पाठवीत असत. लोकसत्ताशी तर ह.रा.महाजनी ते शेवटचे अरुण टिकेकर संपादक असेपर्यंत त्यांचा या लोकांशी संबंध आला होता. मग त्यामध्ये र.ना.लाटे, विद्याधर गोखले, माधवराव गडकरी, नारायण आठवले, अरुण टिकेकर अश्यांचा समावेश होता. १९६० साली जेव्हां पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा स्वतंत्र झाला, तेव्हां भारतीय सैन्याबरोबर तेथील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी म्हणून दादांना नेण्यात आले होते.
आणि मग सुरु झाली अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याची पत्रकारीता. आजूबाजूच्या खेड्यातील, तालुक्यातील, गांवातील अनेक अडले नाडलेले गरीब लोक आपली गाऱ्हाणी घेऊन दादाकडे येऊ लागले. त्यांचे म्हणणे ऐकून, जमल्यास अधिकाऱ्यांशी बोलून, नाहीच जमल्यास वृत्तपत्रातून वाचा फोडून ते त्या लोकांना न्याय मिळवून देऊ लागले. कित्येकदा स्वतःची पदरमोड करून ते मदत करीत असत. आणि त्यांनाही कळले नाही की आपण समाजसेवेकडे कधी वळलो ते! 'तरुण भारत' 'मध्ये ते विविध सदरे लिहीतं असत. कधी गजाभाऊ, तर कधी वक्रतुण्ड अश्या नांवाने. यामध्ये त्यांनी नर्म विनोदाचा वापर करत अनेक कुलंगडी बाहेर काढली. अनेक प्रकरणे तडीला नेली. पण त्यामुळे कांही सुखावले तर कांही दुखावलेही. कोर्टाच्याही धमक्या दिल्या गेल्या. पण प्रत्यक्ष कोर्टात कुणीही गेले नाही. कारण प्रत्येक गोष्ट पुराव्याशिवाय लिहायची नाही ही त्यांची धारणा होती. कांही वेळा त्यांना धमकीची पत्रेही आली. पण शुद्ध चारित्र्य असलेल्या ग.गो.ना कोणालाही कांही करता आले नाही. मात्र कोणावरही त्यांनी वैयक्तीक टीका कधीच केली नाही. त्यामुळे सर्वच त्यांचे मित्र राहीले.
पत्रकारांच्या पार्ट्यात मद्याला स्पर्शही न करणारा असा हा एकमेव माणूस होता. आणि बाबुरावांनी त्यांना या बाबतीत लिखाणाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यांच्याविरुद्ध एकही तक्रार त्यांना चालत नसे. त्यांनी तरुण भारत मध्ये 'गजाभाऊ' य टोपण नांवाने लिहिलेल्या 'हलकल्लोळ' या सदरात जगातील असा कोणताही विषय नसेल, ज्याला दादांच्या लेखणीने स्पर्श केलं नसेल. त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाला ललीत लेखनाची जोड असल्याने ते विषयानुरूप लवचिक बनत असे. जेव्हां 'हलकल्लोळ'चे एक हजार लेख पूर्ण झाले, तेव्हां तरुण भारत तर्फे दादांचा साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी 'हजारावर लेख लिहीणारा व तेही दररोज, असा पत्रकार कसा असतो ते पहायला आपण आलो आहोत' असे उद्गार कर्णिकांनी काढले होते. पुढे सातत्याने त्यांनी १८०० च्या वर हे लेख लिहीले. त्यांच्या पूर्वी मासिकांतून प्रसीध्द झालेल्या कथांचा ‘पाषाण’ हा कथासंग्रह प्रसीद्ध झाला. तसेच तरूण भारत या सदरातील लेखांवर आधारीत ‘हलकल्लोळ' भाग १ व २ अशी पुस्तके प्रकाशीत झाली. पुढे बाबुरावांचे निधन झाल्यावर त्यांचे सुपुत्र श्री. किरण ठाकूर यांनी 'तरुण भारत'चा चेहरा मोहरा संपूर्ण बदलला. अर्ध साप्ताहिकाचे ते दैनिक झाले. अनेक आवृत्यांत प्रकाशीत होऊ लागले. नवीन तंत्रज्ञान आणले. पण किरणने देखील दादांना तोच मान देऊन त्यांच्यावर पूर्वीचीच जबाबदारी टाकली. संपूर्ण ठाकूर घराण्याचा विश्वास दादांनी संपादन केला होता.
याच्या जोडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण ट्रस्ट तर्फे १९७७ साली चालवलेले साप्ताहीक 'विरवाणी' याचेही ते अखेरपर्यंत संपादक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्रियाशील कार्यकर्ते होते. हे कार्य करतांना ते गटनायक, मुख्य शिक्षक, शाखा कार्यवाह, नगर कार्यवाह, तालुका कार्यवाह, संपर्क प्रमुख अश्या विवीध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्यामुळे संघाच्या शिकवणीप्रमाणे सर्वाना निरपेक्षपणे मदत करणे हे त्यांचे काम चालूच असे. रात्री बेरात्री कोणीही कार्यकर्ते, नातलग असे आले, तरी सर्वांची विचारपूस होत असे. हे कार्यकर्ते प्रचार करीत फिरत असतांना त्यांना आपल्या या संघ बंधुंचीच मदत होत असते. आणि याला संपूर्ण साथ होती ती आमच्या वहीनीची. आमची वहीनी ही आमच्यापैकी कोणीही कधीही गेलो तर आवडीने स्वयंपाक करून वाढण्याचा तिचा कार्यक्रम ठरलेला होता. कोणत्याही वेळेला आलेल्याला हसतमुखाने करून वाढणे, त्यांना हवे नको ते पहाणे, ही कामे आमच्या वहीनीने एखादे व्रत घेतल्याप्रमाणमुंबईला मी जेव्हा शिक्षणासाठी मुंबईला गेलो तेव्हां दरवेळी जाताना माझ्यासाठी वहीनी मला आवडणाऱ्या लाडवांचा डबा न विसरता करून देत असे. जेवणाच्या अथवा नाश्त्याच्या वेळी कोणी जरी आला तरी त्याला कधीही उपाशी पोटाने वहीनीने आमच्या घरून जायला दिले नाही. अनेक संघाच्या कार्यकर्त्यानी व गावकऱ्यांनी याचा अनुभव घेतला आहे. पण त्यांची ही रा.स्व.संघाशी असलेली बांधीलकी कुणाच्याच कधी आड आली नाही.
१९८२ साली बेळगांवात कर्नाटक सरकारने शाळेमधून कानडीची सक्ती केली आणि पुन्हां शहरांत आगडोंब उसळला. त्याविरुद्ध मराठी माणसांचा सत्याग्रह सुरु झाला. पोलिसांच्या लाठ्या खाऊनही लोक शरण जात नव्हते. या बातम्या बाहेरच्या वृत्तपत्रातून येऊ नयेत यासाठी पोलीस सर्व पत्रकारावर नजर ठेवून होते. आणि जेव्हां शिवसेनेने त्यात भाग घ्यायचा ठरवला, तेव्हां मात्र त्यांना शत्रू नंबर एक मानणाऱ्या कर्नाटक सरकारने बाहेरून येणाऱ्या सर्वाना बेळगांवात येण्यास बंदी घातली. शिवसेनेचे आक्रमक नेते श्री छगन भुजबळ हे स्वतः बेळगावात येवून सत्याग्रहींच्या तुकडीचे नेतृत्व करणार अशी बातमी येऊन थडकताच कानडी पोलीस सावध झाले. सर्व बस, खासगी गाड्यावर लक्ष ठेवण्यात आले. आणि इकडे भुजबळांनी नकली दाढी लावून एका तंबाखू व्यापाऱ्याचे सोंग घेतले. व निपाणी येथे जाऊन पुढे ते त्याच वेषात बेळगांवी पोचले देखील! आणि अचानक पोलीसांसमोर सत्याग्रहींची तुकडी घेवून भुजबळ आले व त्यांनी कर्नाटक सरकारविरुद्ध घोषणा देण्यास सुरुवात केली. अचानक आलेल्या या वादळामुळे पोलीसही गडबडले. एवढ्यात कोणीतरी एका पोलीसांवर पेटता कागदाचा बोळा टाकला. एवढ्यावरून पोलीसांनी भुजबळांना खुनाच्या प्रयत्नावरून अटक करून अज्ञात ठिकाणी नेले. पत्रकारांना तर बंदीच होती. पण दादांनी त्यांना धारवाड येथील जेलमध्ये ठेवल्याची बातमी काढली व पहाटेच ते निघून धारवाडला पोचले. तेथे भुजबळांची गाठ घेऊन त्यांची मुलाखत घेतली. बेळगावात येताच सरळ पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन प्रथम ती बातमी लोकसत्ता आदी मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रांना पाठवली. तें घरी येताच त्यांना पोलीसांनी अटक केली. पण पुढे रामकृष्ण हेगडे त्यांना ओळखत होते व बेळगावच्या डी.एस.पी.ना राजाध्यक्ष ह्यांची पत्रकारीता माहीत होती. त्यामुळे राजकीय कारणाने त्यांना अटक करणे त्यांना योग्य वाटलं नाही. व पुढे त्यांना सोडण्यात आले.
सीमा भागातील चळवळीला दादांचा एक मोठा आधार होता. त्यांची वार्तापत्रे ही सीमाभागाची बाजू योग्य रीतीने मांडून त्याला जनतेपर्यंत पोचवित असत. बेळगावला 'मराठी पत्रकार परीषद' ही त्यांच्याच प्रयत्नांनी आणि अथक परिश्रमांनी झाली. यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांना मदत केली होती. कानडी-मराठी असे सर्वच भाषीक त्यांच्या मित्रमंडळात होते. सर्वानाच ते आपले वाटत. व सर्वजण त्यांना सहकार्य करीत असत. माझा जेव्हां पहीला लेख 'लोकसत्ता'मधे प्रसीद्ध झाला, त्यावेळी त्यांनी मला मुद्दाम पत्र लिहून 'असेच लिहीत जा. छापले जावो वा न जावो, त्याची काळजी करू नकोस. पण लिखाण वाढल्याने तुझा सरावही होत राहील. अन मुंबई हे त्यासाठी चांगले क्षेत्र आहे' असा मोलाचा सल्ला देऊन प्रोत्साहन दिले होते. माझ्यातील लेखनगुणावर त्यांचे सतत लक्ष असे. मी कधी बेळगावला गेलो की मुद्दाम मला घेऊन ते 'तरुण भारत'मध्ये जात. तेथे मग आमचे चित्रमंदिरचे कुलकर्णी मास्तर, किरण ठाकूर, हरीभाऊ कामत, जगदीश कुंटे अश्यांशी भेटी होऊन अनेक विषयावर गप्पा होत असत. किरण ठाकूरने तोपर्यंत आपल्या 'तरुण भारत'चा व्याप खूप वाढवला होता. संपूर्ण कोंकणभर त्याच्या आवृत्या निघत होत्या. तोही भार वाढला होता.
हळू हळू दिवस सरकत गेले. १९८७ साली दादांची एकसष्ठी आली. आणि बेळगावकरांनी या एकसष्ठीचा एक प्रचंड उत्सव साजरा केला. षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार समिती स्थापन करून त्यायोगे ग.गो.राजाध्यक्ष यांच्या पत्रकारीतेचा गौरव झाला. या गौरव समारंभाचे अध्यक्ष होतें सुप्रसीध्द साहित्यिक, स्वामीकर रणजीत देसाई. 'एखाद्या लेखकाचा सत्कार मोठ्या प्रमाणात होतो, साहित्यिकाचा होतो, पण एका पत्रकाराचा एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा सत्कार मी प्रथमच पहातो आहे' असे भावपूर्ण उद्गार स्वामीकर रणजीत देसाई यांनी तेव्हां काढले होते. अनेक नामवंत पत्रकार, साहीत्यिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते अश्या लोकांनी या सत्काराला वर्णी लावली होती. मुंबई-पुण्याकडील वृत्तपत्रांनी आपापले प्रतिनिधी या सत्कारास उपस्थीत रहाण्यास पाठवीले होते. बेळगावचे सुप्रसीध्द उद्योगपती रावसाहेब बा. म. गोगटे यांच्या हस्ते दादांना चंदनाचा रथ देऊन त्यांचा सन्मान केला. आणि त्या भावस्पर्शी सत्कार सोहोळ्यात आमच्या दादांचा आणि वहिनीचा सत्कार करण्यात आला. बाहेरील आघाडी जशी दादा सांभाळत असत तसेच घरच्या आघाडीची जबाबदारी वहिनींवरच होती. आणि आमची वहिनी ती पूर्ण जबाबदारीने व आवडीने पार पाडीत असे.
त्यानंतर कांही दिवसांतच दादांना मराठी पत्रकार संघातर्फे मानाचा असलेला श्रेष्ठ पत्रकार आणि दैनिक पुढारीचे संपादक श्री ग.गो.जाधव यांच्या नांवे देण्यांत येणारा ' पदमश्री ग.गो.जाधव सन्मान पुरस्कार' व २५०००/= रुपये रोख असा देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना मुंबई पत्रकार संघाच्या कार्यालयात तत्कालीन मा. मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी 'पत्रकारांनी रचनात्मक दृष्टीकोण ठेवून समाजात वितुष्ट किंवा तणाव निर्माण होईल असे लिखाण टाळावे' असे आवाहन त्यांनी केले. व पुढे विलासराव देशमुख सीमा प्रश्नाचा विषय काढून म्हणाले, 'दीर्घकाळ रेंगाळलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नांची यशस्वी सांगता व्हावी म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. आणि राजाध्यक्षांसारख्या पत्रकारांनी सतत यावर लिहून हा प्रश्न जागता ठेवला आहे. बेळगांवचे एक बुजुर्ग पत्रकार म्हणून मी त्यांच्याकडे पहात आलो आहे' अशा शब्दांत त्यांनी दादांचा गौरव केला. त्या मिळालेल्या पैशांतून राजाध्यक्षांनी बेळगांवातील नवोदीत व तडफदार अश्या एक मराठी व एक कानडी अश्या दोन पत्रकारांना दरवर्षी 'ग.गो.राजाध्यक्ष पत्रकार पुरस्कार' देण्यासाठी सदर रक्कम बेळगांवच्या सार्वजनिक वाचनालयाच्या हवाली सुपूर्द केली. त्याप्रमाणे दरवर्षी हे दोन पुरस्कार त्यांच्या नांवे देण्यात येत असतात. नंतर बेळगावातील अनेक तालुक्यातून त्यांचे सत्कार घडत राहीले. याशिवाय 'वाङ्मय चर्चा मंडळ पुरस्कार', पत्रकार विकास ट्रस्टचा पहीला 'बाबुराव ठाकूर पुरस्कार', 'दर्पण पुरस्कार' असेही अनेक पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले.
दादा सतत पत्रकारीतेत कार्यरत राहीले. अनेकांना मदतीचा हात देत राहीले. वृत्तपत्रांतून त्यांनी सीमा आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन, निपाणी येथील तंबाखू कामगारांचे आंदोलन, कन्नड साहीत्य संमेलन, अश्या विषयावर सतत लिखाण केले. म्हैसूर येथे भरलेल्या 'कन्नड साहीत्य संमेलना'वर त्यांनी लिहिलेल्या लेख मालिकेचे कन्नड भाषेत अनुवाद प्रसीद्ध झाले. ते वाचून मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांनी दादांचे खास रित्या वैयक्तीक पत्र पाठवून अभिनंदन केले होते. दादा 'बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे' अध्यक्ष व संस्थापक राहीले आहेत. तरुण भारतात त्यांनी 'वक्रतुंड' या टोपण नांवाने सुमारे पाचशेच्या आसपास लेख लिहीले. बेळगावातील अनेक संस्थांचे ते अध्यक्ष होते. त्यापैकी कांही म्हणजे, सीमा भागातील मराठीच्या विकासासाठी व संवर्धनासाठी स्थापन केलेली 'गुरूवर्य वि.गो.साठे प्रबोधिनी, कर्नाटक प्रदेश श्रमीक पत्रकार संघटना, राष्ट्रीय विचारांच्या 'जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी, सारस्वत समाज, बेळगांव सार्वजनीक वाचनालय अश्या कांही नांवाजलेल्या संस्था!
नव्याने पत्रकारीतेत येणाऱ्या तरुणांना दादा नेहमीच उभारी देत. आज पत्रकारितेचे शात्रशुद्ध धडे आणि पदव्या देणाऱ्या अनेक संस्था निघाल्या असल्या तरी अश्या कुठल्याच संस्थेतून त्यांनी पदवी घेतली नव्हती. अन्यायाने पेटून उठून त्यावर आपल्या लेखणीचे घाव घालून त्याला दूर करणाऱ्या बाबुराव ठाकूर यांच्या लेखणीच्या प्रेरणेने त्यांनी त्यावेळचे अर्ध साप्ताहिकं असलेल्या 'तरुण भारत' पासून ते किरण ठाकूरने सात आवृत्यांत काढलेल्या दैनिक 'तरुण भारतात' त्यांचा सहभाग होता. पत्रकारीतेत राजाध्यक्ष हे बेळगांवच्या सांस्कृतिक जीवनाशी एकरूप झाले होते. मी कधीही गोवा विद्यापीठाच्या कामासाठी गोव्याला गेल्यावर माझी बेळगांवला फेरी होत असे.तेथें एक दोन दिवस राहून मी मुंबईला परतत असे. असेच मे २००१ मध्ये गोव्याला जाण्याचा योग आला. निघण्याच्या आदल्या दिवशी रात्री माझे दादांशी बोलणे झाले. व मी गोव्याचे काम आटोपल्यावर बेळगांवी येणार असल्याचे सांगीतले. दुसऱ्या दिवशी गोव्याची बस पकडण्यासाठी मी टॅक्सी करून निघालो. टॅक्सीत बसलो असतांनाच मला बेळगावहून फ़ोन आला की दादांना हार्ट ॲटॅक आला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मी टॅक्सी तशीच वळवली व बेळगावची बस पकडून पत्नीसह बेळगावला पोचलो. दादावर उपचार सुरु होते. पण त्याच रात्री त्यांना पक्षाघाताचा ॲटॅक आला. पुढे दोन महीने ते बिछान्यावर होते. व ६ ऑगस्ट २००१ रोजी दुपारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एका सरळमार्गी, संयमी, निकोप मनाच्या पत्रकाराचे, घरातील वडिलधाऱ्याचे, एका मार्गदर्शक दीपस्तंभाचे निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप देण्यास संपूर्ण बेळगांव लोटले होते. सर्वांचे डोळे आपल्या या पाठीराख्या भावाच्या अनंतात विलीन होण्याने पाणावले होते.
आम्हां भावंडाना दादा वडीलांच्या ठिकाणी होते. घरात अंतीम शब्द त्यांचाच मानला जाई. त्यांचा धाकही वाटत असे तसेच त्यांचे पितृवत प्रेमही सतत अनुभवायला मिळे. सर्व घराला त्यांनी एकत्र बांधून ठेवले होते. आम्हां सर्व बहीण-भावंडांची काळजी त्यांनी आयुष्यभर वाहीली. कांही कमी पडू दिले नाही. दादांच्या आठवणीत रमताना कांही दुःखदायक गोष्टीही आठवून मनाला वेदनाही होतात. माझी चित्रकलेची आवड पाहून त्यानी मला त्यांचे मित्र व बेळगावातील नामांकीत चित्रकार के.बी. कुलकर्णी यांच्या 'चित्रमंदीर' या संस्थेत चित्रकलेचे धडे गिरविण्यास दाखल केले होते. त्या काळात मी माझ्या वडिलांची दैवतें असलेले स्वामी रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांची कॅनव्हासवर मोठी तैलचित्रे काढली होती. दादांनी कौतुकाने त्यांना कांचेच्या फ्रेम करून ती आमच्या (त्यावेळी मला ते घर आमचे वाटायचे ) कारव्याच्या घराच्या बाहेरील भिंतीवर लावली होती. माझे वडीलही आल्या गेलेल्याला ती कौतुकाने दाखवीत असत. ती व मी काढलेली इतरही बरीच चित्रे त्या घरांत मी ठेवली होती. पण माझ्या वडीलांनी प्रपंचात लक्ष न घातल्यामुळे दादाच सगळा कारभार सांभाळीत असत व घरांवर त्यांचेच नांव लावले होते. दादांच्या निधनानंतर आमच्या त्या वडीलोपार्जित घरावर दादांचे नांव असल्याने त्यांच्या मुलांनी त्यावर ताबडतोब केवळ आपली नावे लावून घेतली. आणि वडिलोपार्जीत असूनही माझे नाव निशाणही त्या घरावर राहीले नाही. आणि माझे त्या घराशी, घराण्याशी आणि पर्यायाने त्या कारवे गांवाशी कायमचे संबंध संपले. त्यादिवशीच मी त्या घराला शेवटचे वंदन करून कारव्याचे पुढे तोंडही पाहीले नाही, तो आजतोवर! आणि त्याची मालकी असलेल्या कोणीही त्या घराकडे लक्ष न दिल्याने एक दिवस ते घर कोसळल्याचे मला समजले. तेथे असलेली माझी चित्रे तरी मिळवावी म्हणून माझ्या चित्राबद्दल मी दुसऱ्या भावाला विचारताच तेथील सर्व चिखलाच्या ढिगाऱ्यात नष्ट झाल्याचे मला सांगण्यात आले. चिखलात फ्रेम केलेली ऑइल पेंटींग नष्ट होतात हे मी प्रथमच ऐकत होतो. ते ऐकून मला जीवघेण्या यातना झाल्या. त्या दिवशी मी खरा दुःखी झालो. माझ्या लहानपणाच्या सर्व आठवणी त्या घराच्या ढिगाऱ्यासोबतच गाडल्या गेल्या, त्याच्या वेदना मला जाणवल्या. आमच्या लहानपणी गांधी वधाच्या वेळी जी जाळपोळ झाली त्यावेळी तेथील आमचे अनेक नातेवाईक वगैरे लोक त्या भागातून गांव सोडून परागंदा झाले होते, पण कांही वर्षांनी तेही पुन्हां परत आपल्या मूळगावी परतून त्यांनी आपल्या पडीक घरांचे नंदनवन करून ते फुलवले, पण आमचे सदैव हसते, खेळते, बागडते घर दादा गेल्यानंतर उजाड बनून माळरान करण्यांत आले, याचेच दुःख होते. कारण कुणीही त्यात आपल्या भावना गुंतवल्या नव्हत्या. आमच्या आजीने स्वाभीमानाने कुणाच्याही मदतीचा आधार न घेता उभारलेल्या या कारव्यातील घराण्याचा केवळ पुढच्याच पिढीकडून अस्त झाला. मी त्या घरात जन्म घेतला होता, हेही मी कोणाला कधी सांगू शकणार नाही.
तसाच आधी मी ज्याचा उल्लेख केला त्या दादांच्या 'प्रदीप' या हस्तलिखितांची व त्यांच्या कथा प्रसीध्द झालेल्या जुन्या दुर्मीळ मासिकांची तीच गत झाली. आमच्या बेळगावातील जुन्या भाड्याच्या घरातील माळ्यावर ती होती. एकाला अडचणीच्या काळात ती जागा रिकामी असल्याने दादांनीच त्यांना रहायला दिली. त्या जागेत माझ्या बॅगेत माझी शाळेतील खेळांची, चित्रकलेची प्रशस्तिपत्रे, मी जमवलेली कांही जुनी वृत्तपत्रे ज्यामध्ये पं. नेहरूंचे निधन, जॉन केनेडी यांच्या खुनाची बातमी असे दुर्मीळ अंक होते. लहानपणापासून जमवलेल्या हिंदी सिनेमाच्या गाण्याच्या अगणीत चोपड्या होत्या, हे सर्व त्यांनी तेथेच सोडून दिले. आणि तेथे राहणाऱ्या लोकांनी ते कदाचित रद्दीत दिलें असावे किंवा कचरा म्हणून जाळून टाकले असावे. कारण याचे महत्व केवळ त्याचे मोल माहीत असलेल्याला असते. दुसऱ्यांच्या लेखी ते केवळ अडचण अथवा भंगार. आणि मी दोष तरी दुसऱ्यांना कां देऊ? कारण माझ्याच दुर्दैवी नशिबाने मला त्यावेळी ग्रासले होते. आणि माझे बालपण त्यात संपूर्णपणे गाडले गेले. आणि याच्या वेदना दादांच्या आत्म्यालाही झाल्या असतील.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्याचा एक चालता बोलता इतिहास म्हणून दादाकडे पहावे लागेल. इतकें ते सीमा लढ्याशी एकरूप होते. एकीकडे रा.स्व. संघाच्या कार्याची जबाबदारी ते दुसरीकडे सीमा लढ्याच्या पत्रकारीतेचे खांद्यावर घेतलेले निशाण, जे त्यानी कधीच बाजूला सारले नाही. यामुळेच दादांना बेळगांवातील वृत्तपत्र सृष्टीमध्ये आदराचे स्थान होते. राजाध्यक्षांची स्वतःची अशी लेखनशैली होतीच, शिवाय निरहंकारी वृत्ती, सोज्वळ प्रतिमा, सत्याचा आग्रह व निर्भीड वृत्ती या त्यांच्यातील गुणामुळे ज्यांना पत्रकारीतेत आपले नांव करायचे असेल तर त्यांनी निर्भीड आणि सोज्वळ पत्रकारीतेतील 'ग.गो.राजाध्यक्ष' हा आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवून चालावे.
दादा अजातशत्रू होते. ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकार असूनही, सर्व मोठी पत्रे हातात असूनही त्यांनी कधीच मोठेपणा मिळवला नाही. सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेली दादांचा मित्रपरीवार प्रचंड होता. सीमा लढ्याचे झुंजार पत्रकार असूनही त्याचे कन्नडीग पत्रकारांशी अतीशय स्नेहाचे संबंध होते. ते स्वतः रा.स्व.संघाचे क्रियाशील कार्यकर्ते होते, तरीही बॅ. नाथपै सारख्या समाजवादी, कृष्णा मेणसे सारख्या साम्यवादी नेत्यांशीही त्यांचे संबंध ममत्वाने होते. तरुण भारत सोबतच ते 'वीरवाणी' या हिंदुत्वाला वाहीलेल्या साप्ताहिकांचेही संपादक होते. या परस्पर विरोधी टोकाच्या भूमिका त्यांना साध्य होत असत ते केवळ त्यांच्यातील पारदर्शकतेमुळे. सीमावासीयांसाठी केवळ एक व्यक्तीपेक्षा संस्था म्हणूनच ते उभे होते. हाडाचा पत्रकार, प्रतिभावंत साहीत्यिक आणि सेवाभावी समाज कार्यकर्ता म्हणून 'ग.गो.राजाध्यक्ष' हे नांव प्रदीर्घ काळ स्मरणांत राहील.
आम्हांला तर ते सर्वस्वच होते. कधीही आधाराला हात मागावं असे! रिक्त कधीच रहात नसे. उलट मागितल्यापेक्षा जास्तच देणारे. आणि नुकसान म्हटले तर ... कधीही भरुन न येणारे! कौतुकाचे शब्द पुन्हां ऐकू न येणारे, वेळ प्रसंगी रागे भरणारे, पण तितक्याच आत्मीयतेने वडीलांच्या प्रेमाने माया करणारे. ज्याचा जमाखर्च कधीच होणार नाही!
असे आमचे दादा!
आज त्यांची १९ वी पुण्यतीथी. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अशी भावपूर्ण श्रद्धांजली!
-प्रा. मं.गो. राजाध्यक्ष












Comments
Post a Comment