चित्रांना हास्याचे कोंदण देणारा हास्य चित्रकार : शि.द.फडणीस
कांही माणसे जन्माला येतातं तीच मुळी लोकांच्या मनात आनंदाचे कांही क्षण पेरायला, त्यांना त्यांची दुःखे विसरून या जगातील आनंदाचा लाभ द्यायला, त्यांच्या मनावर हास्याची अलगद अशी फुंकर मारायला. मग ते कोणत्याही क्षेत्रातील असोत. असेच एक हास्य चित्रकार वर्षो न वर्षं या महाराष्ट्रात, या देशात आणि परदेशात सुद्धा असेच लोकांना निखळ हास्याची मेजवानी सतत देत आहेत. आणि हे हास्यचित्रकार आहेत शिवराम दत्तात्रय फडणीस. अर्थात हे नांव ऐकले की आपणास विशेष असे कांही वाटत नाही. पण तेच जर का कोणी आपल्याला शि. द.फडणीस म्हणून सांगीतले तर पट्कन गेल्या चाळीस पन्नास वर्षांचा कालखंड आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो. त्यावेळच्या मासिके, दिवाळी अंकांची नयनमनोहर मुखपृष्ठे दिसू लागतात. अन त्यातही आठवतात ती अनंत अंतरकरांच्या हंस, मोहीनी, नवल या प्रकाशनांपैकी 'मोहीनी' हे विनोदाला वाहीलेले मासिक व त्याचा दिवाळी अंक. अन तितकीच त्यावरील लोभस अशी विनोदी चित्रे व त्याखाली असलेली अगदी सुट्या अक्षरातील इंग्रजीमधील एस फडणीस ही त्यांची सही. मासिकांची व दिवाळी अंकांची मूखपृष्ठे त्या काळात वाचकांच्या मनावर एक प्रकारचा पगडा घालत असत. केवळ सुंदर असे मुखपृष्ठ वाचकाला मासिके विकत घेण्यास प्रवृत्त करीत असे. मराठी घरात ही मासीके मना मनात ठसली होती. खरोखरीचाच एक चमत्कार होता तो
वास्तवीक चित्र काढण्याचा ओढा हा बालवयात सर्वानाच असतो. तसा तो फडणीसांनाही होता. पण त्या आवडीची कास धरून ती पूर्णत्वाला नेण्याचे काम मात्र फडणीसांनी मोठ्या नेटाने केले. २९ जुलै १९२५ मध्ये बेळगांव जिल्ह्यातील भोज या गावी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण झाल्यावर वयाच्या विसाव्या वर्षी फडणीसांनी मुंबईचे सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट गाठले, अन १९४९ साली त्यावेळची कमर्शिअल आर्ट ही पदवीका प्राप्त केली. शालेय जीवनातच त्यांना व्यंगचित्रे काढण्याचा खूप नाद होता. त्यामुळे व्यंगचित्रे हा फडणीसांचा एक नैपुण्याचा विषय झाला. वास्तवीक व्यंगचित्रे काढण्याचे वेगळे असे शिक्षण कुठं मिळत नाही. त्यांच्या पूर्वीच्या दलाल, गोडसें, शं.वा. किर्लोस्कर अश्यानीही ही कला स्वतःच जोपासली होती. फडणिसांनीही तेच केले. विनोदी हास्यचित्रे वा व्यंगचित्रे काढणारे त्याकाळी कांही ठरावीक असे लोक होते. त्यापैकी एक गाजलेले व सुंदर अशी निर्भेळ आनंद देणारी चित्रे काढणारे हरिश्चन्द्र लचके हे व्यंगचित्रकार होते. प्रत्येक मासीक, दिवाळी अंक यामध्ये त्यांची हास्य चित्रे येत असत. पण ती केवळ साहीत्य वाचतांना मध्ये मध्ये पेरलेली असत. एक प्रकारचे मनोरंजन करणे हा त्यांचा हेतू असे. पण फडणीसांची चित्रें ही केवळ चुटका वाटावा अश्या प्रकारची नसून त्यामध्ये कथा, कल्पना, अंकांच्या आतील विषयगाभा आपल्या डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद होती. आणि मुख्य म्हणजे त्यांनी मुखपृष्ठाची जागा मिरवली होती.
खरे पाहीले तर व्यंगचित्रकला शिकण्यासाठी ते जे.जे.ला गेले नाहीत. चित्रकला शिकण्यासाठी गेले होते. तेथील वाटेवरच त्यांना व्यंगचित्रकला गवसली. ती इतकी समृद्ध असेल हेही त्यांना जाणवले नव्हते. त्यातूनही व्यंगचित्रे हे आपले करीअर करायचा त्यांचा मुळीच हेतू नव्हता. पण त्या चित्रांना वाचकांकडून, प्रकाशन संस्थांकडून भरपूर प्रतीसाद आला तेंव्हा त्यांना वाटलं , अरे यात बरंच कांही करण्यासारखं आहे. एकदा त्यांनी एका मासिकाला पाठवलेले मुखपृष्ठ छापले गेले. पुढे कामे मिळू लागली. पैसेही मिळू लागले. अनेक मासिके, त्याचे दिवाळी अंक हे नवरंगी रंगामध्ये मुखपृष्ठे साकारीत असत. आणि ती आपल्या कला कौश्यल्याने साकारणारे मुळगांवकर, दलाल यासारखे चतुरस्त्र चित्रकार त्या काळात अवतरले होते. रसिकांच्या मनावर त्यांच्या चित्रांनी जबरदस्त मोहीनी घातली होती. अश्या अनेक प्रकाशनांपैकी साहित्याच्या विश्वात आपलें भारदस्त नांव असलेली हंस, मोहीनी, नवल ही नियतकालिके होती. आणि तिचे संपादक होते श्री. अनंत अंतरकर. मासिकाच्या एकंदरीत बाबतीत अतीशय चोखन्दळ असलेले संपादक होतें ते. आणि त्यांनी फडणीसमधले गुण हेरले व १९५१ साली त्यांना आपल्या विनोदाला वाहीलेल्या 'मोहीनी' मासिकाचे मुखपृष्ठ करायला दिले. आणि फडणिसांनीही तितक्याच जोमाने, आत्मीयतेने व कुशलतेने ते साकारले. त्यांच्या पहिल्याच मुखपृष्ठावरील चित्रं होते, एक माणूस बस स्टॉप वर उभा आहे. शेजारीच एका तरुणीही आहे. तरुणाच्या शर्टवर धावते उंदीर दाखवले असून, त्या तरुणीच्या साडीवर झेपावलेली मांजरे दाखवली होती. एकही शब्दाची गरज नसलेले ते चित्र आपला मतीतार्थ सांगुन जात होते. ते चित्र त्यांना नवीन दिशा देणारे ठरले. आणि एका पाठोपाठ मुखपृष्ठ देण्याचा त्यांचा हा सिलसिला चालूच राहीला. तसे पाहीले तर अंतरकरांनी नव्या नव्या चित्रकारातील सुप्त गुण हेरून त्यांना प्रोत्साहन देऊन कामाला प्रवृत्त केले. त्यांची 'हंस' व 'मोहीनी' ही मासिके उत्तम व्यंगचित्रांनी परिपूर्ण असत. 'हंस'चे प्रमुख आकर्षण म्हणजे उत्तम व्यंगचित्रे अशी ते जाहीरात करीत असत
शि.द.फडणीसांनी आपल्या चित्रांची एक स्वतंत्र अशी शैली निर्माण केली. शैलीबद्दल ते म्हणतात की, आपण व्यंगचित्रांचे शिक्षण कोठेच घेतले नाही. स्वतःच्या प्रयत्नांनी ती साध्य केली. तुमची चित्रे ही पहाताक्षणीच ओळखली जातात ती तुमच्या शैलीवरून. ती केव्हां ओळखता येतात, जेव्हां तुम्ही कोणाचे अनुकरण करीत नाही. शैली ही तुमचा चेहरा असतो. आणि पुढे ही फडणीसांची शैली अजरामर झाली. त्यांनी स्वतःचा असा चाहत्यांचा खास वर्ग निर्माण केला. त्या काळातील गाजलेल्या चित्रकारांच्या तोडीची मुखपृष्ठे आपल्या विनोदी शैलीने काढण्यास सुरुवात केली. ती विलोभनीय करून त्या मासिकांचा दर्जा वाढवला. आणि जिथे केवळ सुंदर ललना मुखपृष्ठावर दिसत होत्या, तेथें वाचकांनी मनमुराद हसून आनंद घ्यावा अशी विनोदी कल्पनाचित्रे काढून, फडणीसांनी प्रकाशन क्षेत्रांत एक नवा पायंडा पाडला. विनोदी चित्रामुळेही मासिके स्टॅंडवर खपू शकतात, त्यांना मागणी येते, याचे प्रत्यंतर त्यानी आणून दिले.
मुखपृष्ठांसोबतच आतील कथानाही फडणीसांनी बोधचित्रे काढली. विशेषतः त्याकाळातील 'मोहिनी' दिवाळी अंकातील त्यांची कथाचित्रे तर अत्यंत प्रभावी अन लयदार अशी असत. त्यामध्ये पं.ग.सुर्वे यांच्या उद्धव कथांना दरवर्षी ते उद्धवची व्यक्तीरेखा कायम ठेवून त्याप्रमाणे दाखवीत असत. पु.ल.देशपांडे यांनी आपली 'अपूर्वाई,' पूर्वरंग' ही पुस्तके प्रकाशीत होण्यापूर्वी त्यांची प्रकरणे मोहीनी मध्ये येत असत. त्यासाठी फडणीसांनी काढलेली बोधचित्रे म्हणजे हास्य बोधचित्रांचा एक गोड मिलाफ समजण्यात यावा, अशीच ती होती. विशेषतः त्यातील पु.लंचे व्यक्तिमत्व! तसेच त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये केलेली चित्रे त्या काळात अत्यंत गाजलेली होती. पु.लं च्या व्यक्तिचित्रणातील त्यांचे कुरळे केस, फुगीर गाल, त्यांचे किंचित पुढे दिसणारे दोन दात ही वैशिष्ट्ये फडणीसांच्या रेषांनी इतक्या मार्मिकपणे पकडली होती की, खरोखरीच पुलंचे विवीध भावाविष्कार त्यामधून दृष्टीस पडत. एकदा तर पुलंनी गमतीने लिहिले लिहीले होते की, 'फडणीसांची चित्रे मासिकांत दिसली तर पु.ल. देशपांडे यांचे नवीन प्रवास वर्णन सुरु झाले की काय? म्हणून वाचक घाबरत होते.'
फडणीसांची चित्रे ही गोलाकार व सरळ रेषांनी आविष्कृत होतात. चेहरा असो वा हातपाय, या रेषांच्या चौकटीतच त्यांना बसवले जाते. त्यांच्या चित्रातील स्त्री-पुरुषांचे चेहरेही गोल गोल असून अत्यंत लोभस असे दाखवलेले असतात. खास करून त्यातील डोळे खूपच बोलके अन भावदर्शक असतात. चित्र रंगीत असो वा कृष्ण-धवल असो किंवा केवळ रेषांनी केलेले असो, प्रत्येक चित्रांमध्ये त्यांची ताकद दिसून येते. आणि त्यामुळे त्यातील व्यक्ती ह्या लोभस आणि गोडवा असलेल्या दिसतात. आणि त्यावर त्यांची विलोभनीय अशी मनमोहक रंगसंगती. चित्रांतील सुलभीकरण हे त्यातील मूख्य आकर्षण असते. अन तरीही फडणीसांची चित्रे आपली प्रमाणबद्धता बिलकुल ढळू देत नाहीत. किंवा वास्तवतेपासून दूर जात नाहीत. फडणीसांचे प्रत्येक चित्र बोलके असते. स्वयंस्फूर्त असते. त्यामुळेच त्याला शीर्षकांची अजीबात गरज नसते. विना शीर्षकच ती चित्रें आपणास सर्व कांही सांगून जातात. स्कूल ऑफ आर्ट मध्ये उपयोजीत कलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेत असताना एक छंद म्हणून फडणीसांनी आपली व्यंगचित्रकला जोपासली. पण पुढे तीच त्यांनी ओळख ठरली.आणि याच वेळी अनंत अंतरकर यांनी फडणीस यांना स्वतःच्या प्रकाशनामध्ये त्यांच्या शैलीचा मुक्त वापर करण्याची मोठीच संधि दिली. विविधरंगी, विनोदी, व्यंगचित्रात्मक मुखपृष्ठांनी त्यांची प्रकाशने गाजू लागली. आणि शब्दांचे, भाषेचे बंधन नसल्याने फडणीसांची चित्रे लोकप्रिय झाली. घरोघरी पोचली.
विनोद निर्मिती हा एक स्वतंत्र विषय आहे. प्रत्येक चित्रकाराला तो जमतोच असे नाही. पण फडणिसांना तो अत्यंत यशस्वीपणे जमला. नव्हे, तर ते त्यात पारंगत झाले आहेत हे त्यांची चित्रें पहाताच आपल्याला जाणवते. १९५२ साली त्यांनी 'मोहीनी'वर काढलेल्या चित्रामध्ये रेल्वेच्या डब्यात वरच्या बर्थवर झोपलेला एक तरुण दाखवला असून, खाली त्याची पत्नी त्याचाच स्वेटर उसवून त्या लोकरीने मफलर विणताना दाखवले आहे. दुसऱ्या एका चित्रात तंबोरा पकडून गाणाऱ्या आपल्या आईला पाहून तिचा छोटा मुलगा 'आई रडते आहे' असे समजून तिला खुळखुळा व चॉकलेट देऊन गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे. पाण्यामध्ये बोटींग करणारे नवविवाहीत जोडपे दाखवून बायकोच्या पदराचे शीड करून ती चालवताना दाखवली आहे. सकाळी पातेल्यामध्ये दूध घेणारी गृहीणी व दूध घालणारा भैय्या, या दोघांच्याही डोळ्यावर झोप असल्याने दुधाची धार पातेल्यात न पडता जमिनीवर पडत आहे. व त्यामुळे मनी मांजरीचे आयतेच फावले आहे व ती ते दूध मटकावते आहे. हॉस्पिटलमध्ये एका स्थूल बाईची केवळ सावली वजनाच्या काट्यावर पडल्याने तो काटा पुढे सरकत आहे, ही व अशी कैक मनोरंजनात्मक चित्रे फडणीसांनी काढली. त्यांची सर्व चित्रे ही प्रासंगिक असतात. वेगवेगळे प्रसंग ते अगदी थोडक्या रेषेत प्रभावीपणे आविष्कृत करतात. पाहणाऱ्याला एक निखळ असा आनंद देऊन जातात. मुखपृष्ठांसोबतच त्यांनी बॅंकींग, गणित, शास्त्र, कायदा, तत्वज्ञान अश्या विविध विषयावरील पुस्तकांनादेखील आपल्या शैलीमध्ये चित्रांकीत केले आहे. लहान मुलांचीही पुस्तके त्यांनी रेखाटली आहेत.
१९६५ साली फडणीसांनी आपल्या चित्रांचे पहीले प्रदर्शन 'लाफींग गॅलरी' हे मुंबईच्या जहांगीर कलादालनात भरवीले. त्या प्रदर्शनाला खूपच प्रतीसाद मिळाला. नंतर देशभरात त्याचे पन्नासच्या वर शो केले. त्यांची चित्रे पाहण्यास रसिकांच्या रांगा लागू लागल्या. राजधानी दिल्लीमधील त्यांच्या प्रदर्शनाला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांनी सपत्नीक भेट देऊन त्यांच्या चित्रांचा आनंद घेतला. अश्या प्रदर्शनात त्यांना त्यांचे चाहते प्रत्यक्ष भेटत. त्यांचा आग्रह असे की हे प्रदर्शन आमच्या घरी हवे. यातून मग पुस्तकांची कल्पना पूढे आली. मग त्यातून प्रथम 'लाफींग गॅलरी’ची निर्मिती झाली. जोडीला त्यांच्या सौभाग्यवती शकुंतला याना सोबत घेऊन 'चित्रहास' हा एक खास कार्यक्रम त्यांनी संकल्पीत केला. त्यांची प्रात्यक्षिके, विवेचन, स्लाईड शो याद्वारे व्यंगचित्रावर बरीच बोधक माहीती देणारे हे प्रदर्शन मुंबई, बडोदा, हैद्राबाद, बंगळूर येथेच केवळ नव्हे, तर इंग्लंड, अमेरीका येथेही जाऊन त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. त्यांची चित्रे कॅनडा व जर्मनी येथील 'इंटरनॅशनल सलोन ऑफ कार्टून' मध्ये प्रसीद्ध झाली आहेत. त्यांचे प्रात्यक्षिके देण्याचे कार्य सतत चालूच असते. त्यांनी मुलांसाठी तसेच मोठ्या लोकांसाठी हास्यचित्रांवर आधारीत काम केले आहे. चित्रांमधून अगदी थोड्या वेळात संदेश पोचला पाहीजे हा त्यांचा दंडक असतो. तें म्हणतात, 'माझे चित्र काहीही असू शकते. जन्माला येण्यापूर्वी ते कांही बोलत नाही. एकदा कागदांवर आले की मग ते बोलू लागते. एकदा त्यांनी एका प्रात्यक्षिकाच्यावेळी एक काटेरी गुलाबाची फांदी काढली. त्यावरून चालत जाणारा एक माणूस दाखवला. त्याच्या पायाला काटा टोचून त्यातून रक्ताचे थेम्ब ठिबकत होते. तेही फडणीशी शैलीत एका रेषेत पडणारे. मग हा माणूस हसतो का? हा प्रश्न दर्शकाला पडतो तोच, पुढे त्या फांदीला एक टपोरा गुलाब पुष्प दिसतो. तेव्हा तो हस्तगत करण्याचे त्याचे इप्सीत साध्य झाल्याचे आपल्याला कळते. त्यांची ही चित्रे काय सांगायचं आणि काय विसरायचं हे सांगणारी व निखळ आनंद देणारी असतात. माणसाला छंद असतात. छंदात जगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण त्या सर्वच आनंद देणाऱ्या असतीलच असे नाही. तुमच्या समोरचा कागद हा सुंदर करायचा, क्षीण करायचा का दुःखदायक करायचा ते तुम्ही ठरवायचे. कल्पना तुम्ही जन्माला घालता. हे सगळं तुमच्या हातात आहे. हे त्यांचे व्यंगचित्राविषयीचे तत्वज्ञान होते. आणि स्वत: त्यानी ते आत्मीयतेने पाळले.
‘लाफींग गॅलरी’ पाठोपाठ त्यांची 'मिस्कील गॅलरी', 'दी लिट्ल गॅलरी', 'पेंटींग फॉर चिल्ड्रन' ही पुस्तके देखील प्रकाशीत झाली आहेत. शिवाय २०१४ साली त्यांच्या समग्र चित्रांचे एक डिलक्स पुस्तक प्रकाशीत झाले. सदर पुस्तक इंग्रजी मध्ये असून ते आर्ट पेपरवर छापले आहे. विशेषतः परदेशात स्थायीक झालेल्या चाहत्यांसाठी हे पुस्तक असुन त्याचा छपाईचा दर्जा, पुस्तकाचा आकार या सर्वाचं बाबी अगदी चोखंदळपणे सांभाळल्या आहेत. आणि आतापर्यंत केलेल्या सर्व कामाचे नमुने त्यात आहेत. फडणीसांनी अनेक प्रदर्शने केली, तसेच अनेक ठिकाणी त्यांची प्रात्यक्षीके, विवेचन अशा गोष्टी सतत सुरु असतात. ते नेहमी म्हणतात, कोऱ्या कागदाला कसे सामोरे जावे याची सवय तुम्हांला करावी लागेल. तुमच्या मनात आलेली कलपना पुढे कशी वळवत न्यायची हे तुमचे कर्तुत्व असते. त्यावेळी त्यांनी एका ब्रशचे उदाहरण चित्र काढून दिले. एक ब्रश, तोही चित्रे रंगवण्याचा नव्हे, तर जाडजूड असा भिंती रंगवण्याचा. तो ब्रश आपल्याला कसा दिसला त्याची कथा, त्यानी त्या ब्रशला पुढे एकेक गोष्टी जोडत त्याची एक सुंदर अशी राजकन्या बनवून दाखवली. अश्या अनेक गोष्टी आपण आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर रेखाटू शकतो. हे त्यांनी त्या चित्रांतून दर्शवले.फडणीसांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सन्मान मिळवले. अनेक पारितोषिकांची जोड त्याला मिळाली. फ्र्यांकफर्ट बुक फेअर मध्ये त्यांना व्याख्यान व प्रात्यक्षीकासाठी खास आमंत्रीत करण्यात आले होते. त्यांची अनेक हास्यचित्रे जर्मनी व अमेरिकेतील नियतकालिकात प्रसीद्ध झाली आहेत. त्यापैकी कांही म्हणजे,
महाराष्ट्र साहीत्य परिषदेने त्यांच्या 'रेषाटन' या पुस्तकाला पुरस्कार देऊन सन्मानीत केले.
२००० साली पुण्यातील चित्रकार रवी परांजपे फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा मानाचा पुरस्कार
'कृ.रा. परांजपे गुणीजन पुरस्कार’ देवून फडणिसांना सन्मानीत करण्यात आले.
२०११ साली फडणीसांचा 'हंस''प्रकाशनाचा पहीला 'हंस' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
बंगळूरच्या 'इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट' या संस्थेने त्यांना 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन सन्मानीत केले.
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांचा राष्ट्रीय दूरदर्शनवरून खास कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला.
असे अनेक पुरस्कार आणि सन्मान त्यांच्या वाट्याला आले.
सतत हसतमुख व आनंदी चेहऱ्याने वावरणाऱ्या फडणीसांनी आपल्या सहवासात आलेल्या सर्वाना आपलेसे केले आहे.
मी उपयोजीत कला संस्थेत अश्या नामवंत चित्रकारांच्या कलाकृती जमवून त्यांचा संग्रह करत होतो. त्यावेळी मी फडणीस सरांनाही त्याचे एक चित्र या दुर्मिळ संग्रहात असावे अशी मागणी केली. कांही दिवसांनी फडणीस स्वतः सपत्नीक आमच्या संस्थेत आले. त्यांनी आमचा संग्रह अगत्याने पाहीला व आपले एका चित्र भेट म्हणून जे.जे.उपयोजीत कला संस्थेला दिले.
मी ही गॅलरी संस्थेमध्ये एक खास खोलीत केली होती. ( आता ती सर्व चित्रे एकाखाली एक अशी तेथे रचून ठेवले असल्याचे समजले. शेवटी सरकारी खाते. दुर्दैवाची गोष्ट आहे). मुंबईत आलेल्यावेळी त्यांचा फोनवर संपर्क असायचा. मध्ये त्यांची विद्यार्थीनी व रचना संसद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सविता सराफ यांनी त्यांचा सत्कार व प्रदर्शन असा कार्यक्रम त्यांच्या संस्थेत आखला होता. त्यावेळी सराफ यांनी मला फडणीसांच्या चित्रायुष्यावर एक लेख लिहिण्यास सांगीतले होते. त्या दिमाखदार सोहोळ्याच्या वेळी त्यांनी एका प्रात्यक्षीक देखील दाखवले. पुढे सराफ यांनी फडणीसांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवुन त्याचे उदघाटन अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते केलें होते. स्वतः एक उंची गाठलेले अभिजात कलाकार असूनही फडणीस ज्या नम्रपणें आपली चित्रे समजावत तेथे होतें, ते पाहील्यावर माणुस म्हणूनही हा कलाकार किती मोठा आहे याची जाणीव होत होती. दुसऱ्याशी नम्रपणे वागणे, दुसऱ्याचा आदर करणे हे त्याचे अंगभूत गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसेच आहेत. पुढे पुण्याला माझ्या 'कागद कॅनव्हास आणि कुंचला' या कलाविषयक पुस्तकाला ‘लोकमत’चा ललित गद्य पुरस्कार मिळाला, त्यापैकी ते निवड समितीतील एक सदस्य होते. त्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. कलाकारांच्या जमावात एकदा फडणीस आले की वातावरण कसे प्रसन्न होऊन जात असे, याचा अनुभव मी घेतला आहे. शाळेंत असल्यापासून ज्यांना गुरु मानून ज्यांच्या चित्रांच्या नकला करत असताना कधीही वाटले नव्हते, की या हास्यचित्रांच्या बादशहाशी कधीकाळी आपली जवळीक होईल, त्यांच्याशी आपुलकीचे चार शब्द बोलता येतील. अशी माणसे शतका शतकातून जन्माला येतात. अथक काम करून शैलीदार चित्रसंपदा निर्माण करतात आणि पुढील पिढीला मार्गदर्शक ठरतात.
अश्यावेळी फडणीसाना त्यांच्या दोन मित्रांची आवर्जून आठवण येते. एक व्यंगचित्रकार वसंत सरवटे, व दुसरे चित्रकार ग.ना. जाधव. वसंत सरवटे हे त्यांचे बालमित्र. जवळ जवळ ऐंशी वर्षांचा संबंध असलेले. बालपणात कोल्हापुरात दोघेही एकाच वाड्यात रहाणारे, चित्रकला हा एकच छंद जोपासणारे. तसे ते बैठक मारून लेखनही करीत असत. दोघांनीही एकदा कथा लिहील्या. छापायला पाठवल्या. पण त्या छापल्या गेला नाहीत किंवा परतही आल्या नाहीत. तेव्हां दोघांनीही ठरवले, हे आपले क्षेत्र नाही. पुढे सरवटे इंजीनिअरिंग कॉलेजला गेले व इंजीनीयर झाले. पण त्यांनी चित्रकला सोडली नाही. उलट एक शैलीदार व्यंगचित्रकार म्हणून ते प्रसीद्ध पावले. फडणीस जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये आले. व त्यांनीही नांव कमावले. मधल्या काळात अनेक स्थित्यंतरे झाली. पण पूढे दोघेही चित्रकला या एकाच बांधलेल्या धाग्याने जवळ आले. त्याच धाग्याने त्यांना गुंतवून ठेवले. गेल्या कांही वर्षात 'कार्टूनिस्ट कम्बाईन' या संस्थेने आपल्या सभासदांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शने भरवून त्यांना रसिकांपुढे आणले. पण त्याही आधी शि.द.फडणीस व वसंत सरवटे या दोघांनी सतत दहा वर्षे आपल्या व्यंगचित्रांची प्रदर्शने अनेक शहरात, अनेक छोट्या-मोठ्या गावांत भरवली आहेत. सरवटे यांनी आपल्याला चित्रकलेचे मर्म दिले हे फडणीस सांगतात.
तसेच ग.ना.जाधव हे देखील कोल्हापुरात असूनही त्यांची भेट खूप उशीरा झाली. किर्लोस्कर वाडीत किर्लोस्कर, स्त्री, मनोहर या मासिकांची छपाई होत असे. त्यांचे संपादक शं. वा. किर्लोस्कर हे स्वतः एक निष्णात चित्रकार होते. त्यांनी मनोहर मासिकाचा चित्रपट विशेषांक काढला होता. त्याचे मुखपृष्ठ फडणीसांनी केले होते. त्याच्या प्रकाशन समारंभासाठी फडणीस किर्लोस्करवाडी येथे गेले असता, त्यांची भेट किर्लोस्करचे चित्रकार श्री ग.ना.जाधव यांच्याशी झाली. पुढे किर्लोस्कर मासिक पुण्यात स्थलांतरीत झाले. व तेथे ही मैत्री दृढ झाली. जाधव हे जरी किर्लोस्कर मासीकासाठी बोधचित्रे काढत असले तरी त्यांची पेंटींग, लॅंडस्केप अत्यंत सुंदर असत. विशेषतः जलरंगातील त्यांची पोर्ट्रेट व लॅंडस्केप्स अतीशय सुंदररित्या ते साकारीत, एवढी त्यांची त्या माध्यमावर पकड होती. पुढे फडणीस, जाधव, या लोकांनी 'पुणा आर्टीस्ट गिल्ड' ही संस्था सुरू केली. त्यामध्ये भैयासाहेब ओंकार, खटावकर, दिवाकर डेंगळे, मुरलीधर नांगरे असें सभासद होते. ह्या संस्थेतर्फे अनेक उपक्रम करण्यात आले. ग.ना. जाधव हे एक निष्णात चित्रकार असले तरी आपल्या कलेविषयी ते कोणाकडे फारसे बोलत नसत. त्यामुळे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवून त्यांना रसिकांपुढें आणण्याची कामगिरी फडणीसांनी केली. आज ते दोघेही हयात नसल्याची जाणीव होऊन फडणीस त्यांच्या आठवणीने हळवे होतात.मनाला निर्भेळ असा आनंद देणाऱ्या शि. द. फडणीस यांच्या चित्रांनी हजारो लोकांची मने जिंकली आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ' माझ्या कुंचल्याने निदान कांही दुःखी मनावरील जळमटे साफ करून, त्यांच्या जीवनात अल्प असे प्रकाशकिरण जरी आणले, तरी मी स्वतःला धन्य समजेन!' फडणीसांच्या कुंचल्याच्या हास्य किरणांनी कितीतरी रसीक चाहत्यांची आयुष्ये उजळली आहेत, हे का वेगळे सांगायला हवे?
वयाच्या ९५ व्या वर्षीही त्याच तडफेने, त्याच उमेदीने, त्याच कल्पकतेने आणि त्याच तरूणाईने चित्र संपदा निर्माण करणाऱ्या आणि रसीकांच्या जीवनांत रंग भरणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या फडणीससरांना २९ जुलैच्या आजच्या ९५ व्या वाढदिवसानिमीत्त आम्हां त्यांच्या सर्व चाहत्यांकडून लक्ष लक्ष शुभेच्छा! आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या पुढील प्रवासात देखील असेच रसिकांना आपल्या चित्रांचा भरभरून आस्वाद घेण्याचे भाग्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष










Comments
Post a Comment