चित्रकलेतील वास्तववादी आदर्श : सुहास बहुळकर


सुहास बहुळकर हे नांव आज चित्रकलेत खूप उंचीवर पोचले आहे. आपल्या स्वतंत्र शैलीने आपली ओळख दाखवणारा एक वास्तववादी चित्रकार ही त्याची खरी ओळख आहे. अश्या या सुहासला एकेरी बोलणे थोडे अप्रशस्त वाटेल. पण सुहासला अगदी विद्यार्थी दशेपासून पहात आल्यामुळे असेल कदाचीत, तें उपचार कदाचित घडणार नाहीत. तशी चित्रकला ही सुहासच्या अंगात भिनलेली आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अगदी बालवयातच त्याचे गुण जाणून त्याला इंदीरा गांधींचे चित्र बनविण्यास सांगीतले. व ते स्वतः इंदिराजींनी पाहून त्यावयात सुहासचे कौतुक केले होते. वास्तविक या इंदिराजींच्या चित्राची हकीकत मोठी मजेशीर आहे. सुहासला वयाच्या दहाव्या वर्षी त्याचे वडील दिल्लीला त्याला घेऊन शंकर्स विकलीच्या बाल चित्रकला स्पर्धेला घेऊन गेले होते. त्यात सुहासला प्रथम पारितोषिक मिळाले. त्यावेळी पुण्यातील खासदार ताराबाई साठे यादेखील आल्या होत्या.आपल्या पुण्यातील मुलाला पहीले बक्षीस मिळाले, या कौतुकाने त्या त्याला घरी घेऊन गेल्या. तेथून त्यांनी सुहासला पंतप्रधान इंदिराजींच्या घरी नेले, व त्याना म्हणाल्या मॅडम, तुम्ही जरा खुर्चीवर बसा. हा मुलगा पाच मिनिटांत तुमचे चित्र काढेल. इंदिराजीही तयार झाल्या व त्या खुर्चीवर बसल्या. त्यांच्या पाठीमागे त्यांचा उंचापुरा, धिप्पाड असा सरदारजी रक्षक उभा होता. सुहासला स्केच पॅड देण्यात आले. पण सुहासचे लक्ष त्या सरदारजीकडेच होते.कारण तो जास्त आकर्षक होता. पाच मिनिटात सुहासने आपलें चित्र संपवले. शेजारी उभे असलेले वडील घामाघूम झाले होते. ताराबाई डोक्यावर हात चोळत बसल्या होत्या. आणि इंदिराजी उठून पुढे आल्या व म्हणाल्या, मैं देखू ? व त्यांनी स्केचबुक हातात घेतले. काही क्षण त्या पहात राहील्या व नंतर सुहासचा डोक्यावर हात ठेवुन म्हणाल्या, बेटा, मुझे दाढी कबसे आ गयी ? सुहासने इंदिराजींऐवजी सरदारजीचेच चित्रं रेखाटले होते. नंतर ताराबाई पटकन बाहेर गेल्या, व येतांना रंगपेटी, कागद, पेन्सील, ब्रश आदी साहीत्य घेऊन आल्या व इंदिराजींचा एक फोटो देऊन त्यांनी तो पाहून काढायला सांगीतले. आणि मग ते चित्र पाहून इंदिराजींनी सुहासचे कौतुक करून त्याला शाबासकी दिली.  तसेच राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचेही व्यक्तीचित्र त्याने त्यांच्या समोर बसून काढले. त्याच बालवयात त्याने चाळीसगावच्या प्रसीद्ध छायाचित्रकार केकीं मूस यांचेही व्यक्तीचित्र रेखाटले होते. अशी हुकूमत सुहासच्या बोटात बाल वयातच होती.

सुहास पुण्यात जन्मलेला. तेथील शिक्षण, संस्कार यांनी त्याला पुरेपूर भरभरून दिले. त्या संस्कारावर तो वाढला. चित्रकला तर आतून उफाळतच होती. अश्यातच त्याला सहवास लाभला तोही थोर चित्रकार गोपाळराव देऊसकर अश्यासारख्यांचा. पुण्यात त्याकाळी अनेक चित्रकार कार्यरत होते. ग.ना.जाधव, भैय्यासाहेब ओंकार, शि. द. फडणीस, असे कांही त्यापैकी. त्यांच्याशी सुहासचा संबंध आला. ग. ना. जाधवांचा मुलगा श्रीकांत हा सुहासचा खास मित्र. दोघेही पुण्यापासून एकत्र होते ते पुढे सुहास मुंबईला आल्यावरही दोघे एकत्र असायचे.  आणि सुहासने चित्रकला हेच आपले ध्येय ठरवले, व तीच आपली वाट ठरवली.
तो काळ असा होता की पालकांना आपल्या मुलाने चित्रकला शिकावी म्हणजे नेमके काय करावे ते माहीत नसे. शाळेतील चित्रकला शिक्षक ज्यांचे ड्रॉईंग चांगलं आहे, त्यांना शासनाच्या ग्रेड परीक्षेना बसवीत असत. पुढे तो विद्यार्थी त्या ग्रेडचे काय करीत असे तेही माहीत नसायचे. कांही मोजकेच अन चित्रकलेची जाण असलेले पालक आपल्या मुलांना चित्रकलेत उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन देत. आणि त्याचे भवितव्य कलेतच आहे हे जाणणारे कलावन्त अश्या मुलांना आर्ट स्कुलचा मार्ग दाखवीत. आणि सुहासलाही त्याच्या वडीलानी लहानपणापासूनच चित्रकलेसाठी प्रोत्साहन दिले. परिस्थितीमुळे आपण आपली चित्रकला शिकण्याची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, या भावनेने त्यांनी सुहासला सतत प्रोत्साहीत केले. आणि आपल्या पुढील कला शिक्षणासाठी, आपल्या उज्वल भवितव्यासाठी चित्रकारांची पंढरी समजल्या जाणाऱ्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट चा बेलभंडारा मस्तकाला लावण्यासाठी सुहास मुंबईला पोचला. मुंबईला येऊन त्याने मोठ्या खडतर तपश्चर्येने ती आत्मसात करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत लोकांनाही पेंटींगचे महत्व कळू लागले होते. आपल्या घरी ते सजविण्यासाठी सुंदर अश्या पेंटिंगची गरज आहे याची जाण लोकांना दिसू लागली. आणि याचा फायदा घेऊन सुहासने एक पेंटींग लायब्ररी सुरु केली. काही ठरावीक दिवसासाठी एखाद्याच्या घरी पेंटींग लावणे व नंतर ते बदलून दुसरे लावणे. अश्याने सर्वसाधारण रसिकांना पैसे खर्चून पेंटींग विकत घेण्याची गरज नाही, व घरी मौल्यवान पेंटींगही भिंतीवर विराजनमान होत असे.



सुहास बहुळकर यांनी भर दिला तो वास्तववादी चित्रकलेवर. तिचा अभ्यास सर्व बाजूनी पुरेपूर केला. केवळ केला नाही, तर त्यात प्रावीण्य मिळवले. त्याच्यावर आपला स्वतंत्र असा ठसा उमटवला. आणि त्याला त्याकाळात मातब्बर असे शिक्षकही  मिळत गेले. शंकर पळशीकर, संभाजी कदम, सोलापूरकर, बाबूराव साडवेलकर असे एकाहून एक शैलीदार चित्रकार प्राद्यापकांची मालिकाच त्याकाळात जे.जे.मध्ये उभी होती. जणू जे.जे.स्कूलचा सुवर्ण काळच मानावा तो काळ. अर्थात शिक्षक हा फक्त मार्गदर्शक असतो. शिष्य त्यातून आपल्याला जे काय हवे ते त्यातून निवडतो. आणि त्यानुसार आपले ज्ञान वाढवतो.  आणि शिवाय चित्रकार गोपाळराव देऊसकर यांच्याकडूनही सुहास कलेचे धडे गिरवत होता.  आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुहासने १९७५ साली आपले उच्च कला शिक्षण पूर्ण केले. आणि त्यात त्याने प्राविण्य मिळवले. आणि त्याला स्कुल आर्टची फेलोशिप मिळाली. यानंतर सुहास अध्यापक म्हणून स्कुल ऑफ आर्ट मध्ये रुजू झाला. कांही दिवसांनी औरंगाबाद येथे शासकीय चित्रकला महाविद्यालय सुरु झाले. तेथे या तरुण अश्या कर्तबगार कलाकार शिक्षकांना पाठविण्यात आले. अप्पासाहेब देशपांडे तेथें अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. किंबहुना ते त्या संस्थेचे एका तऱ्हेने निर्मातेच होते. त्यावेळी बहुळकर यांचा त्यांना फार उपयोग झाला. सर्वच शिक्षक मनापासून काम करीत असत. आणि अप्पासाहेबांनी ह्या सर्व तरुणांना त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यास लावले. विद्यार्थीही त्यामुळे प्रोत्साहीत होवू लागले
सुहास बहुळकर त्यानंतर पुन्हां मुंबईला जे.जे.मध्ये आले. त्यावेळी येथे प्रा.बाबुराव सडवेलकर यांचे मार्गदर्शन त्यांना खूप मोलाचे ठरले. बहुळकर निष्णात चित्रकार होतेच. शिवाय एक कर्तबगार शिक्षक म्हणूनही तितकेच उपयुक्त होते. हळू हळू स्कूल ऑफ आर्ट मध्ये वास्तववादी काम करणारे कमी होत चालले होते. आणि ड्रॉईंग, अनॉटॉमी, हा तर चित्रकलेचा पाया मानला जातो. त्यामुळे सुहास सारख्या शिक्षकांची नितांत गरज तेथे होती. बहुळकर केवळ चित्रे आविष्कृत करून थांबले नाहीत, तर त्यांनी कलेवरील आपला व्यासंग वाढविण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी अनेक जुन्या चित्रकारांच्या चित्रांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. बाबुराव सडवेलकर हे कला संचालक, तसेच स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता म्हणूनही ते कार्यरत होते. बाबुराव स्वतः देखील संशोधन करीत असत. याच बाबूरावानी सुहासला विवीध संध्या उपलब्ध करून दिल्या.    स्कूल ऑफ आर्ट मध्ये कैक वर्षे अधिष्ठात्यांच्या स्टुडिओत पुढे जे प्रतिथयश चित्रकार झालें अश्या जुन्या विद्यार्थ्यांचे बरेच काम पडून होते. त्या कामाचे वर्गीकरण करून संवर्धन करण्याचे काम त्यांनी सुहासकडे दिले. व संस्थेच्या संग्रहामध्ये १८८० ते १९२० दरम्यानच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांच्या अमूल्य अश्या चित्रखजीन्याची भर पडली.

बाबूरावांच्या तालमीमध्ये सुहास पूर्णपणे तयार झाला. त्याची रसीकताही वाढली. जोडीला कला संवर्धक म्हणून घडण होत गेली.  बाबुरावांच्या चित्र ज्ञानाविषयी सुहास खूप आदर बाळगुन होता. आणि बाबुरावही कलाकाराची ओळख जाणणारे होते. त्यामुळे कांही महत्वाची कामे ते सुहासवर सोडून विश्वासाने  मोकळे होत. महाराष्ट्राची चित्रपरंपरा राखली जावी या हेतूने बाबूराव साडवेलकर प्रयत्नशील होते  त्यांना सुहासची जोड मिळाली. मध्ये सुहासला त्याच्या सहकाऱ्यांसोबत जाऊन त्यांनी पुण्याच्या मस्तानी महालात भित्तिचित्रांचे काम करण्यास दिले होते. ते काम चालू असतानाच एक दिवस बाबुराव तेथे आले. तेव्हां कागदावर चित्रे काढणे व भिंतीवर रेषा मारणे यावरील फरकावर चर्चा सुरु झाली. तेव्हां बाबुरातील शिक्षक जागा झाला, व त्यांनी म्हटले, कागद हवा तसा फिरवता येतो. पण भिंत कशी फिरवणार?  मग त्यांनी तेथेच बैठक मारून भिंतीवरच्या रेषा ही श्वासाच्या लयीबरोबरच काढावी लागते यांवर प्रात्यक्षीकासह त्यांनी एक लेक्चरच दिले. या मस्तानी महालाच्या भिंतीवर, त्याकाळच्या पेशव्यांच्या काळातील चित्रे जशी असत तशाच भारतीय पद्धतीने काढायची होती. सुहासने  तर स्कूल ऑफ आर्टच्या पाश्च्यात पद्धतीच्या चित्रपद्धतीवर अभ्यास केला होता. पण ह्या भारतीय पद्धतीच्या चित्रांनी सुहासच्या मनावर एक वेगळाच परिणाम केला. भारतीय पद्धतीच्या कला शैलीचा अभ्यास करण्याची उर्मी त्यातून निर्माण झाली. त्या संस्कृतीवर आधारीत त्याची चित्रे संकल्पीत होऊ लागली. आणि १९९२ साली सुहासने आपले पहीले 'आकार संस्कृती' हे प्रदर्शन भरवले. या चित्रमालिकेतून आपल्याला जाणवते ते त्यातील अवकाश, पोत, आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना. आणि यातून जाणवतात त्या मानवी जीवनाच्या मर्यादा. आणि या मध्ये त्याने पुण्यांतील वाडे संस्कृती आणि त्या वेळची कौटुंबीक पद्धती, याचा बहुतांशी वापर त्याने केला.

१९८१ साली सुहासने बाबुरावांच्या सांगण्यावरून दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी 'शिवराज्याभिषेक' या विषयावर चित्ररथ केला होता. त्यासाठी बाबुराव सुहासला घेऊन कोल्हापूरला भालजी पेंढारकर यांच्याकडे महाराजांचे एका अभ्यासक म्हणून घेऊन गेले. शिवाजी महाराजांविषयी निस्सीम भक्ती असलेली भालजींनी शिवराज्याभिषेकाचा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर उभा केला, ज्याचा चित्ररथाच्या देखाव्यासाठी सुहासला बराच उपयोग झाला. परत १९८४ साली 'लोकमान्य टिळकांचा खटला' हा विषय घेऊन चित्ररथ केला होता. सर्व तयार झाले होते. आधी दोन दिवस सर्व चित्ररथाना राजपथावरून फिरवून आणून रंगीत तालीम  घेण्यात येते. त्यावेळी अपघात होऊन चित्ररथाचा पुढचा भाग मोडला. सर्वाना वाटले
२६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ बहुदा नसणार. पण सुहास जिद्दीला पेटून कामाला लागला. दुसऱ्या दिवशी साडवेलकर आले. जोडीला सुताराला घेवून, पुढे जे लोकमान्यांचे उभे शिल्प येणार होते, त्याऐवजी फक्त चेहऱ्याचा भाग गोलाकार कापून लावल्यास वेळेवर काम पूर्ण होईल असे म्हणून बाबुरावांनी स्वतः रेखाटन करून दिले. आणि हा चित्ररथ २६ जानेवारीला दिमाखात राजपथावरील संचलनात फिरला. यासाठी चित्रकाराला इतरही कला कशा आल्या पाहीजेत हेही विष्णू पुराणाच्या कथेवरून ते सांगण्यास विसरले नाहीत. या त्यांच्या चित्ररथांनी १९८१ व १९८४ अशी दोन वर्षे प्रथम पारीतोषिके मिळवली. आणि सुहासच्या मनांत आपल्या या वैभवशाली चित्रपरंपरेच्या वारशाबद्दलची आस्था जास्तीत जास्त वाढीस लागली. सुहास अध्यापक असतांनाच त्याला त्याची भावी पत्नी साधना जे.जे.मध्येच भेटली. तीही पेंटिंगची विद्यार्थीनी. साधना खडपेकर ही जशी चित्रकार आहे तशीच एक चोखन्दळ कला समीक्षक देखील आहे. अनेक वृत्तपत्रातून ती चित्रे व इतर कलाक्षेत्रावर सातत्याने लिहीत असे. कला रसग्रहण देखील ती करीत असते.  तिने माधवराव सातवळेकरांवर लिहीलेले ‘ चित्रायण’ हे  त्यांचे चरीत्रात्मक पुस्तक खूप गाजले. अशी ही साधना खडपेकर सुहासच्या आयुष्यात साधना बहुळकर म्हणून आल्यावर सुहासचा संसार चहुबाजूनी फुलला. तिची साथ त्या दोघांच्या रंगभान संसारात आणखी रंग भरू लागले. व एक आदर्श कलाकार पती-पत्नीची जोडी कलाक्षेत्रांत वावरू लागली


पुढे १९८५ साली बाबूराव सेवानिवृत्त झाले. तसे पाहीले तर जे.जे.स्कूल हे पूर्वीपासूनच एक शापीत भूमी म्हणून ओळखले जात होते. त्या काळातही तेथे ‘शिक्षकांच्या बदल्या’ या प्रकरणावरून प्रथम शिक्षकांचा व नंतर हे शिक्षक नको म्हणून विद्यार्थ्यांचा संप सुरू झाला. त्यावेळी शिक्षकांत दोन गट पडले. वास्तवीक तरूण शिक्षक त्यांत ओढले गेले होते. पण सुहास त्यातही अलीप्त राहीला. त्यावेळी कांहींच्या रोषालाही तो कारणीभूत ठरला होता. पण त्याच्या सौम्य स्वभावानुसार तो काम करीत राहीला. अर्थात पुढे सर्व निवळले. पण बदल्या मात्र थांबल्या नाहीत. आणि या बदल्या तरी कश्या? चक्क कारकुनी छाप्याच्या. नगाला नग पुरवला की झालं. कारण येथून जेव्हां ड्रॉईंग अथवा फोटोग्राफी अश्या विषयाचा अध्यापक बदलून गेला की येणारा त्याच विषयाचा असेल असे नाही. मग तो विषय शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? शिवाय त्या जागी येणाऱ्याचीही क्षमताही तशी हवी. आणि नेमकी सुहासची बदली औरंगाबाद येथे झाली. सुहासची संस्थेला असलेली गरज याच्याशी वरती बसलेल्या प्रशासकीय लोकांना काहीही देणेघेणे नव्हते.

जे.जे.मध्ये पेंटींग व उपयोजीत कला असे दोन विभाग आहेत. उपयोजीत कला ही विचारप्रसारण कला म्हणून ओळखली जाते.  म्हणून येथील पेंटिंगच्या अध्यापकांच्या जागा बंद करून त्या पेंटिंगमध्ये भरण्यात आल्या. पण सुहास सारखा माणूस हा येथील विद्यार्थ्यांना उपयोगी आहे, याची जाणीव आम्हांला होती. मी त्यावेळी उपयोजीत कला विभागाचा अधिष्ठाता होतो. आणि सुहाससारखा माणूस ड्रॉईंग शिकविण्यास मिळाला तर तो मला हवाच होता. आणि कला संचालनालयातर्फे शासनाला कळवून सुहासला आमच्याकडे बदलीवर घेतले. आणि त्याचा मोठा फायदा मला, पर्यायाने  आमच्या संस्थेला झाला. आणि येथील विद्यार्थ्यांना त्यांचे काम सुधारण्यास मदत झाली. विद्यार्थी हे खरे आपल्या शिक्षकांचे परीक्षक असतात. त्यांच्या कामावरून ते ताबडतोब आपल्या शिक्षकाला जोखतात. आणि सुहासने गुरु बनून अनेक विद्यार्थी शिष्य तयार केले. त्यांना प्रात्यक्षिके दिली. त्यांच्या कामावर सुधारणा केल्या. पण एक दिवस माझ्याजवळ तो बोलला, 'मी पुढच्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेणार आहे. आणि त्यात त्याचीही कांहीच चूक नव्हती. सुहाससारख्या संवेदनशील कलावन्ताला जे.जे.सारख्या ठिकाणी पुढे तसा व्हावं नव्हता.  त्याकाळात त्याच्या जहांगीर मध्ये होणाऱ्या चित्रांच्या प्रदर्शनांची त्याची जोरदार तयारी सुरु होती. आणि शेवटी तो दिवस उजाडला. सुहासने सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये नोकरीला लागून सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ ॲप्लाईड आर्ट मधून निवृत्ती घेतली. संस्था एका चांगल्या, आदर्श अश्या शिक्षकाला मुकली. आम्ही सुहासला संस्थेच्यावतीने हृद्य निरोप दिला. पण सुहासचे जे.जे.शी संबंध अबाधीत राहीले. त्याला जे.जे.कडून हक्काने कामे सांगण्यात येऊ लागली, व तोही ती तितक्याच आत्मीयतेने ती करू लागला. आणि यापुढे सुहास बहुळकर पूर्णवेळ व्यावसायीक कलाकार म्हणून काम करू लागले.


सुहासचा जन्म १९५४ चा पुण्यातला. लहानपणापासूनच तेथील वाडे-महाल त्याच्या पहाण्यात येऊ लागले. पुणे शहराला एक सांस्कृतीक वारसा आहे. त्याचे संस्कार सुहासवर होवू लागले. आणि या वाडे संस्कृतीचा सुहासच्या मनावर खोल परीणाम झाला. त्याची पेंटींग्स याच वाड्यांच्या अंगानी जाऊ लागली.या पुरातन वैभवाने त्याच्यावर मोहीनी घातली, आणि मग तेच वाडे सुहासचा कुंचल्यातून आविष्कृत होऊ लागले. जसे आजच्या परिस्थितीत आहेत तसे. रंग उडालेल्या अश्या रंगहीन भिंती, लाकडी कोरीव कामाचे दरवाजे-खिडक्या, निखळलेले कोनाडे, चौकटीच्या उडालेल्या रंगाआड लपलेला व त्या चिरफाळ्याआडून दिसणारा पूर्वीचा रंग, भिंतीवरील कमानदार देवळ्या, मोडतोड झालेल्या नक्षीदार व जाळीदार अश्या लाकडी जाळ्या, हे सर्व मनाच्या कप्प्यामध्ये साठवलेली गतकालीन मराठी परंपरा सुहास अलगदपणे कॅनव्हासवर आविष्कृत करू लागला. आणि त्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे १९ व्या शतकातील पुरुष प्रधान संस्कृतीमधील पारंपारीक कुटूंब एकत्ररित्या बसलेले दिसते. त्यातीलही निरीक्षण इतके सूक्ष्म असते की, डोक्याला टोपी अथवा रुमाल बांधलेले, खांद्यावरून उपरणे घेतलेले यजमान, शेजारी सौभाग्यवती नऊवारी टोपपदरी साडीत, नाकात नथ, केसांचा खोपा, त्यावर व इतर अंगावर आभूषणे,  डोक्यावर जरीची टोपी घातलेली मुले, तशाच वेशभूषेतील इतर मंडळी असा एक कौटुंबीक जमाव. यासाठी जुन्या काळातील अनेक कौटुंबीक ग्रूप फोटोंचा अभ्यास त्याने केला. आणि आपल्याला त्या काळात नेण्यासाठी त्याची सेपीया रंगात केलेली रंगसंगती. तसेच त्यातील समृद्धता व वैभवशाली सौंदर्य वाढवण्यासाठी गोल्ड फॉईलचा केलेला वापर. अश्या अनुरूप अंगानी त्याची चित्र संपदा चालु असते. फ्रेम ही चित्राला केवळ संरक्षणासाठी नसून ती देखील चित्राचा एक भागच असते. त्यामुळे कित्येकदा बहुळकरांची ही चित्रे कॅनव्हासवरून फ्रेमवरही येतात. त्यामुळे ही वाडा संस्कृती आजही पुढे जात आहे याचीच जाणीव सुहास करून देतो.

सुहासने अनेक व्यक्तिचित्रणे रेखाटली. त्याने केलेले दुर्गा भागवत यांचे व्यक्तीचित्र एशियाटीक लायब्ररीमध्ये मानाचे स्थान मिळवून स्थानापन्न झाले आहे. आणि त्याला 'बॉंबे स्कुल'च्या  अभ्यासासाठी 'अरुण टिकेकर फेलोशीप' मिळाली. त्याचा संशोधनात्मक अभ्यास सुरूच होता. एकीकडे चित्र आविष्कार करीत रहाणे, दुसरीकडे जुन्या कलावंताचा आणि त्यांच्या दुर्मीळ कलाकृतींचा मागोवा घेणे, शिवाय चित्रांइतकीच लिखाणातही प्रतीभा लाभल्याने चित्रकला व तत्सबंधी सातत्याने लेखन करणे ही सारी कामे सुहास सतत करीत असतो. त्याने केलेले पं. नेहरू यांचे तैलचित्र एल.आई.सी. च्या दिल्लीतील कार्यालयात आहे. विनोबा भावे यांचेही व्यक्तिचित्र त्याने साकारले आहे. पुणे विद्यापीठात त्याचे स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिचित्र आहे. ही व्यक्तिचित्रे साकारताना सुहासला त्या व्यक्तीचे केवळ बाह्यरूप पहायचे नसते तर तिच्या जीवनाचे तत्वज्ञान बघावे लागते. तिची आवड, तिच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करावा लागतो.  तिचे समाजातील स्थान विचारात घ्यावे लागते, सदर व्यक्तिचित्र कोठे लागणार आहे याचीही नोंद घ्यावी लागते. एवढी ताकद सुहासच्या कुंचल्यात आहे. आणि मग या सर्व अंतरंगातील गोष्टी व्यक्तिचित्रणातून आविष्कृत होतात. आणि सुहासने त्या तंतोतंत अभ्यासलेल्या दिसून येतात. आमचे माजी अधिष्ठाता गो.कृ. देशपांडे यांचे पुण्याला त्यांनी केलेले व्यक्तिचित्रण पाहीले की देशपांडेंचे व्यक्तीमत्व, त्यांचा स्वभाव, चेहऱ्यावरील भाव इतके साधले गेले आहेत की, वाटते आता ते पोर्टेट आपल्याशी बोलु लागेल.  दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावर सुहासने चित्रीत केलेले क्रांतीदेवतेचे म्युरल आज शेकडो लोकांकडून दररोज पाहीले जाते.

मध्य प्रदेशमधील चित्रकूट येथील रामायणाची चित्रे हा सुहासच्या जीवनातील एक खूप मोठा प्रकल्प मानावा लागेल. सुहासने स्वतंत्ररित्या कामाला सुरुवात केल्यावर त्याचे नांव सर्वत्र झाले. ते नांव ऐकून रा.स्व.संघाचे जेष्ठ प्रचारक, समाजसेवक, चित्रकूट ग्रामोद्योग विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू, भारतरत्न श्री नानाजी देशमुख सुहासकडे आले. आल्या आल्याचं त्यांनी सुहासला सांगीतले, 'मी चित्रकूटमध्ये रामायणावर असा प्रकल्प बनवू इच्छीतो की ज्यामध्ये रामायणाचा नैतीक संदेश असेल. येथे पूजा पाठ होणार नाही. केवळ तेथे प्रेरणा मिळेल असे ते प्रेरणास्थळ असेल.आपल्याला नाही का वाटत आपल्यातील कलेचा वापर या देशातील अतीसामान्य जनतेला देखील व्हावा?' आणि त्यांनी रामायणाच्या कथेची सुरूवात केली. त्या रामवर्णनाने सुहास इतका भारावून गेला व कधी त्या रामायणात स्वत: समाविष्ट होत गेला, ते त्याचे त्यालाही कळले नाही. आणि सुहासने आपले सहकारी निवडले व कामाला सुरुवात केली. यामध्ये चित्रे, उठावशिल्पे, आणि त्रिमिती देखावे अश्या तीन भागात हे रामायण त्याने पूर्ण केले. १९९५ ते २००१ अश्या साडेपांच वर्षात संपूर्ण केलेल्या या  प्रकल्पावर चित्रकाराची सही देखील नाही. कारण त्याच्या मते हे सांघीक काम आहे.

चित्रकलेसोबतच सुहास लिखाणातही तितकाच मातब्बर आहे. त्याने अनेक चित्रकारांवर, महाराष्ट्रातील चित्र-शिल्प याच्या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या कला संस्कृती नसलेल्या सरकारवर अनेक लेख लिहीले आहेत. अनेक कलाकारांचा मागोवा त्याने त्यांच्या चित्र शैलीसह कागदावर उतरवला आहे. त्यासाठीही प्रत्यक्ष पहाणी, त्यांच्या नोंदी घेवून करून त्याने लिखाण केले आहे. शिल्पकार करमरकर यांच्यावर त्याने लिहिलेल्या पुस्तकासाठी सासवण्याला त्यांच्या संग्रहालयाला वारंवार भेटी देऊन सुहासने नोंदी घेतल्या आहेत. आणि अशातूनच त्याने 'गोपाळ देऊसकर  : कलावन्त आणि माणूस', 'शिल्पकार करमरकर, 'बॉंबे स्कुल-आठवणीतले, अनुभवलेले', हे कलाभिरुचीने संपन्न असे ग्रंथ निर्माण केले. बाबुराव साडवेलकर यांच्या 'महाराष्ट्रातील कलावन्त' या पुस्तकाच्या केवळ प्रस्तावनेत सुहासने बाबुरावांच्या चित्ररसग्रहणासोबतच त्याचे अंतरंगही इतक्या मुलायम तऱ्हेने उलगडून दाखवले आहे की त्यातून प्रत्यक्ष बाबुराव साडवेलकर आपल्या समोर उभे रहातात.  या व्यतीरीक्त चित्रकार आलमेलकर यांचा कॅटलॉग व प्रदर्शन, राव बहादूर धुरंधर यांच्या चित्रांचे प्रदर्शन असे कितीतरी प्रकल्प सुहासकडून घडलले  आहेत. कांही वर्षांपूर्वी प्रफुल्ला डहाणूकर व सुहास बहुळकर यांनी ठरवले की विस्मरणांत गेलेले कांही 'मास्टर्स पेंटर्स' शोधून त्यांच्या कामाचे प्रदर्शन 'जहांगीर आर्ट गॅलरी'त भरवायचे त्या चित्रांची विक्रीही करायची. व आलेले पैसे सदर कलाकाराच्या कुटुंबियांना द्यायचे. व 'मास्टर्स स्ट्रोक्स' या प्रदर्शनाने जन्म घेतला. वर्षातून एकदा नित्याने जहांगीर आर्ट गॅलरी हे प्रदर्शन भरवू लागली. अनेक चित्रकारांच्या कुटुंबियांना पैसे मिळाले. त्यासाठीही सुहासचे परीश्रम कारणी लागत असत. चित्रकलेसोबतच सामाजीक बांधिलकीची त्याने ठेवलेली जाणंच यातून दिसून येते. 



सर्वात महत्वाचे म्हणजे 'विवेक' या नियतकालिकांसाठी अपार मेहनत घेवून त्याने निर्माण केलेला चित्रकारांचा 'कोष'!  गेल्या दोनशे वर्षांत होऊन गेलेल्या कलावंतांची नोंदी या ' दृश्यकला' कोशात करण्यात आल्या आहेत. चित्रकला, शिल्पकला, उपयोजीत कला या सर्व कलातील कलावंत यात समाविष्ट करण्यात आले आहेत. उपयोजीत कलेसाठी प्रा. दीपक घारे व
प्रा. रंजन जोशी यांचे सहकार्य त्यांनी घेतले. सुहास ज्या शैलीमध्ये लिखाण करतो, तितक्याच सहजतेने आणि नाविन्यपूर्ण शैलीत तो कथनही करीत असतो. त्यावेळी त्याचा विनोदी स्वभाव, चित्रकारांच्या लकबी तो सहजतेने मांडत असतो व ऐकणारा त्यात गुंगून जातो. त्याचे मित्रमंडळी खूप मोठे आहे. त्यामध्ये प्रफुल्ला डहाणूकर, शरयु दोषी, सुभाष दांडेकर, सौ रजनी वहीनी अशा अनेक व्यक्तींचा समावेष आहे.येथे बाबुरावांच्या कारकिर्दीतील एक गोष्ट सांगितल्याशिवाय रहावत नाही. त्यावेळी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या वेळी थोर चित्रकार श्री गोपाळराव देऊसकर यांचा शासनातर्फे सत्कार करण्याचे समितीने ठरवीले. व देऊसकारांना तसे कळवले. आमंत्रण पत्रीकाही तयार झाल्या. देऊसकारानी संमती दिली. पण त्यांनी हेही सांगीतले की मला तुमचा तो सत्कार तुमच्या मंत्र्या बिंत्र्याकडून नको आहे. माझा सत्कार या पूण्यातच व्हायला हवा. व तोही भीमसेनजी जोशी यांच्याकडून. सर्वचजण हादरले. कारण भीमसेनजींना सांगणार कोण? आणि देऊस्करांना समजावणार कोण? अशा व्दिधा मनस्थिती बाबुरावांची झाली. शेवटी या मधला दुवा म्हणून सुहासकडेच ही कामगिरी सोपविण्यात आली. व सुहासनेही तो चोखरित्या पार पाडली. व त्यानेच हा सत्कार सोहळा घडवून आणला. देऊस्करांना हवा होता तसा सत्कार पुण्यात भीमसेनजींच्या हस्ते करण्यात आला.


पुरस्कार अन सन्मान तर सुहासने अगणित मिळवले. त्याचा महत्वाचा पुरस्कार म्हणजे गेल्या वर्षी त्याला मिळालेला व प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'चतुरंग'चा ‘जीवन गौरव पुरस्कार'. मला वाटते चित्रकाराला मिळालेला चतुरंगचा हा पहीलाच पुरस्कार असावा. अर्थात चित्रकलेतील सुहासचे योगदान, त्या विषयातील त्याची सामाजिक बांधीलकी, त्याने केलेले अनेक समाजोपयोगी प्रकल्प याचा विचार होऊनच हा सुहासला सत्पात्री पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार त्याला जेष्ठ चित्रकार श्री शि.द.फडणीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना बहुळकरांनी सांगीतले, 'महाराष्ट्रात चित्र-शिल्पकला नेहमी दुर्लक्षीत राहीली. आणि याला जबाबदार आपले सरकार, आम्ही कलावंत, आणि रसीक आहोत. चित्रसंस्कार रुजवण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, म्हणूनच आपले राज्य दृश्यकलेच्या क्षेत्रांत मागास राहीले आहे. आज शाळांमधून चित्रकला शिक्षक बाद केले जात आहेत. जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये नवे शिक्षक नेमले जात नाहीत. कलेसाठी अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे आर्थीक बजेट अत्यंत अल्प आहे. सरकारी पातळीवर एकही मोठा पुरस्कार चित्रकार-शिल्पकारांना दिला जात नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज चतुरंगने एका चित्रकाराला जीवन गौरव पुरस्कार देऊन आदर्श घालून दिला आहे. त्यातून सरकारलाही सुबुद्धी मिळो.' 
शेवटी आजच्या कला विद्यार्थ्यांना, होतकरू कलाकारांना सुहासचे एकच सांगणे आहे, ' कोणतीही फाईन आर्ट -चित्रकला, शिल्पकला, शास्त्रीय संगीत, नृत्यकला शिकायची असेल तर पहीली गोष्ट, तुम्हांला ध्यास असायला हवा, त्यासाठी प्रचंड परीश्रम केले पाहीजेत, खूप पेशन्स ठेवला पाहीजे. कारण कोणत्याही कलेमध्ये यश मिळायला खूप काळ लागतो'!
 

अजूनही मला सुहास आठवतो तो जे.जे.मध्ये फिरणारा, डोळ्यावर गोलाकार चष्मा असलेला, मधूनमधून खांदे उडवणारा, हनुवटीवर छोटीशी दाढी ठेवलेला, हसतमुख व एखाद्या आवडल्या गोष्टीला खळखळून हसून दाद देणारा व तितकाच मिस्कील असा, सर्वाना हवाहवासा वाटणारा सुहास. जो कित्येकांशी मित्रत्वाचे संबंध ठेवून होता. अजूनही आहे. आकाशापर्यंत उंची गाठूनही जमिनीवर पाय ठेवून वावरणारा. सतत कामात मग्न असलेला, तितकाच अनेक गोष्टीत रस घेणारा. असा रसीक रंगभान चित्रकार...
सुहास बहुळकर!

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष








Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :