एका स्वप्नाची पूर्तता : माऊंट रशमोरचे स्मारक शिल्प
२५ मे २०२० रोजी अमेरीकेत जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय आणि निशस्त्र अश्या व्यक्तीची एका गोऱ्या पोलिसाकडून अमानुषपणे हत्त्या झाली. आणि त्यापाठोपाठ अमेरीकेत श्वेत वर्चस्ववाद्यांविरुद्ध निदर्शनांचा व आंदोलनांचा आगडोंब उसळला. प्रत्यक्ष पोलीस प्रमुखांनी जनतेपुढे गुडघे टेकून माफी मागितली तरी ही आग शमली नाही. आणि अमेरीकेत आता 'गुलामगिरी आणि वसाहतवाद्यांचे पुतळे हलवा’ ही मोहीम जोर पकडू लागली. आणि त्याचा फटका न्यूयॉर्क शहरातील 'अमेरीकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री' या जगविख्यात वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर असलेला १९०१ ते १९०९ या कालखंडातील अध्यक्ष असलेल्या रिपब्लीकन पार्टीच्या थिओडोर रुझवेल्ट ( डेमोक्रॅट फ्रँकलिन रुझवेल्ट नव्हेत) यांचा असलेला अश्वारूढ भव्य पुतळा हटवावा, अशी मोहीमही सुरु केली आहे. आणि अमेरिकेतील 'पुतळे हटाव' या मोहिमेने आता यूरोपमध्येही शिरकाव केला आहे. थिओडोर रुझवेल्ट यांच्या पुतळ्यावर राग असायचे कारण पुतळ्याच्या एका बाजूला एक श्वेतवर्णीय व्यक्ती दाखवली असून दुसर्या बाजूला एक कृष्णवर्णीय व्यक्ती दाखवली आहे. १०९१ च्या काळात थिओडोर हा अमेरिकेला महासत्ता बनविणारा म्हणून ओळखला जातो. पण त्याचबरोबर तो वसाहतवादाचा व वांशीक भेदाभेद करणारा म्हणूनही त्याची ओळख आहे. पण सागरी सामर्थ्य योजनेच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक प्रमुख म्हणुन थिओडोर रुझवेल्ट कडे पाहीले जाते. पण त्याचा पुतळा हलवा म्हणून आंदोलन करणाऱ्यांना इतपत विवेकबुद्धी असेल तर पहायलाच नको. कारण तो काळ आता मागे पडला आहे. आणि त्याचा एक पुतळा नष्ट करून जर कां त्याच्या आठवणी पुसल्या जातील तर मग इतिहासाचे काय? तोही पुसून टाकणार काय? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'जगविख्यात नॅशनल मेमोरिअल'चे काय ? कां तेही उध्वस्त करून टाकणार? काय आहे हे 'नॅशनल मेमोरिअल'? याचीही निर्मिती एका सर्जनशील अश्या कल्पक माणसाकडून झाली व ते आज अमेरिकेचा मानबिंदू ठरले आहे
आजच्या संगणकी युगात अजूनही मानवी हाताचे कौशल्य, सर्जनशील मनाच्या कल्पनांची झेप अन स्वप्नपूर्तीसाठी घेतलेले अव्याहत परीश्रम यांना तोड नाही. या घ्यासातूनच आज जगातील अनेक आस्चर्यांची निर्मिती झाली आहे. त्यावरून जाणीव होते की, शेवटी मानवी मन आणि त्याची कला निर्मिती याला पर्याय नाही. अशीच स्वप्ने पाहणाऱ्या एका अमेरीकन इतीहास संशोधकाने एक असेच भव्य-दिव्य स्वप्न पाहीले. ते स्वप्न होते एका प्रचंड अश्या पर्वतावर दगडी शिल्प कोरण्याचे. अन ती व्यक्ती होती 'स्टेट हिस्टोरिकल सोसायटी'ची संचालक डॉन रॉबिन्सन.
१९२३ च्या डिसेम्बरमध्ये दुरदृष्टी लाभलेल्या डॉन रॉबिन्सन यांना साऊथ डकोटा येथील भव्य अश्या पर्वतावर प्रचंड अशी स्मारकशिल्पे कोरण्याची कल्पना स्फुरली. ही स्मारकशिल्पे इतकी प्रचंड व भव्य असावीत की साऊथ डकोटाला जगाच्या नकाशावर नेवून ठेवतील. आणि आपली ही योजना सत्यात साकारावी या हेतूने रॉबिन्सनने साऊथ डाकोटाच्या क्षितिजरेषेकडे प्रयाण केले. अन अनेकांना आपली योजना ऐकविली. ज्यांना रॉबिन्सनच्या स्वप्नाबद्दल खात्री पटली, त्यानी या कल्पनेचे स्वागत केले. ही चित्रे कांही अमेरीकन हिरोंची असावीत या दृष्टीने त्याने काही विख्यात अभिनेत्यांची चित्रेही तयार केली. यानंतर रॉबिन्सनने अनेक सेवाभावी संस्थांना पत्रावर पत्रे लिहिण्यास आरंभ केला. साऊथ डकोटाच्या अनेक रहिवाशांना खात्री होती की या अवाढव्य शिल्पामुळे हजारो परदेशी पर्यटकांची येथे रीघ लागेल व त्यामुळे प्रचण्ड आर्थीक लाभ होईल. पण त्याचबरोबर काहींना रॉबिन्सनची ही कल्पना आचरटपणाची वाटली. हळूहळू त्याना पाठींबा देणाऱ्या वृत्तपत्रांचा उत्साहही मावळू लागला. तरी पण रॉबिन्सन नाउमेद झाले नाहीत. यावेळी अश्या परीस्थीतीत मार्ग दाखवू शकेल अश्या एका व्यक्तीची आठवण त्यांना झाली. ही व्यक्ती म्हणजे यू.एस. सिनेटर पीटर नार्बेक!
सिनेटर नार्बेक यांच्या व्हाईट हाऊसला सतत भेटी होत असत. त्यांना सिनेटमध्ये तसेच तेथे पाठवणाऱ्या साऊथ डकोटामधील जनतेमध्ये खूप आदर होता. पर्वतरांगेमध्ये शिल्प कोरण्याची कल्पना जेव्हां रॉबिन्सन यांनी त्यांच्या समोर मांडली, तेव्हां नॉर्बेक यांना ती अतीशय भावली. व त्यांनी रॉबिन्सन यांना त्या कल्पनेला पूर्णत्व देणाऱ्या अश्या शिल्पकाराचा शोध घेण्यास सांगीतले, की जो हा प्रचंड प्रकल्प यशस्वीपणे व समर्थपणे पेलू शकेल. याच दरम्यान अमेरिकेतील एक सुप्रसिध्द व कल्पक शिल्पकार गुटझॉन बोरग्लम हा जॉर्जीया येथील दगडी पर्वतावर सुमारे पाव मैल लांबीचे राष्ट्रमंडळाचे स्मारकशिल्प बनविण्यामागे गर्क होता. पहील्या महायुद्धानिमित्त त्यात विघ्न येऊन पैशांचा तुटवडा पडला होता.यामुळे या प्रकल्पाचा विकास खुंटला होता. आणि त्यामुळे गुटझॉन देखील त्रासला होता. नेमक्या याच वेळी रॉबिन्सनच्या त्या ऐतिहासिक प्रकल्पाची योजना त्याच्या हाती आली. बोरग्लम हा नेहमीच आक्रमक स्वभावाचा, हट्टी व दूरदृष्टीने विचार करणारा होता. ऑगस्ट रोड्यान या जगप्रसीध्द कलाकाराचा विद्यार्थी असलेल्या गुटझॉन बोरग्लम याने एक नवीन संधी दार ठोठवते आहे हे पाहून, ती तात्काळ स्वीकारण्यास तो तयार झाला. १९२४ च्या ऑगस्ट मध्ये आपला पूर्वीचा प्रकल्प सोडून हे नवीन काम करण्यासाठी तो पुढे सरसावला!
साऊथ डकोटा येथील पर्वतावर ग्रॅनाईटमध्ये पाश्च्यात हिरोंच्या प्रतीकृती कोरण्याची आपली कल्पना व त्यासाठी तयार केलेली चित्रे रॉबिन्सनने दाखवितांच बोरग्लमने त्या कल्पनेला नम्रपणे पण स्पष्ट विरोध दर्शवीला. अश्या रीतीने स्थानीक लोकांना अमरत्व देण्यासाठी आपली कला वाया घालवायला तो तयार नव्हता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे या प्रकल्पाला त्याला असा विषय हवा होता, की निसर्गाला तसेच राष्ट्रालाही तो अभिमानास्पद वाटेल. यासाठी सिनेटर नार्बेक, रॉबिन्सन व बोरग्लम या त्रिकुटाने अमेरीकेचे चार अध्यक्ष निवडण्याचे ठरवले. यामध्ये राष्ट्राचा जन्म, विकास, संवर्धन व प्रगती दृष्टीक्षेपात येईल. तसेच १५० वर्षांचा अमेरीकेचा इतिहास डोळ्यापुढे उभा राहील ही कल्पना त्यामागे होती. विचाराअंती अमेरीकेचे पहीले अध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन (१७८९ ते १७९७), थॉमस जेफरसन (१८०१ ते १८०९), अब्राहम लिंकन (१८६१ ते १८६५), व थिओडोर रुझवेल्ट (१९०१ ते १९०९) या चार कर्तबगार राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यात आली. सर्वप्रथम हे शिल्प 'नीडल्स' नांवाच्या ग्रॅनाईटच्या स्तंभावर करण्याचे ठरले होते. पण त्या ग्रॅनाईटची पहाणी करतांना बोरग्लमला तो अतीशय पातळ व शिल्पाला योग्य नसल्याचे आढळले. व बोरग्लमने ही चार शिल्पे एकत्ररित्या कोरली जातील असा पर्वताचा पृष्ठभाग शोधण्यास प्रारंभ केला. सुमारे ७२४२ फूट उंचावरील 'होर्नी पीक' या पॉइंटवर त्यांच्यासमोर असा सपाट आणि खडबडीत पृष्ठभाग पसरला होता. आणि तो होता 'माऊंट रशमोर'. विशेष म्हणजे तो दक्षीण-पूर्व दिशेला असल्याने त्यावर जास्तीत जास्त वेळ सूर्य प्रकाश पडत होता. जणू शिल्पकाराच्या छीन्नीला तो आव्हान देत होता आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या इतिहासात मानाचे पान खोवणारे शिल्प त्या स्वप्नाळू शिल्पकाराच्या नजरेत तरंगत होते.
गुटझॉन बोरग्लम या १८६७ मध्ये जन्मलेल्या शिल्पकाराने 'माऊंट रशमोर हे राष्ट्रीय स्मारक शिल्पबद्ध करून आपले नांव जगात अमर केले. १९३९ मध्ये त्याने आपला स्टुडीओ उभारला. तेथे त्याने या चार राष्ट्राध्यक्षांच्या शिल्पाची जी प्रतिकृती बनवली होती ती, व तसेच त्याच्या खोदकामासाठी वापरण्यात आलेली हत्यारे व उपकरणे, शिल्पाकृती कोरण्याचा पद्धतीची माहीती ही सर्व पर्यटकांना पाहावयास ठेवण्यात आली आहे. अमेरिकेतील ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. न्यूयॉर्कचे कायदेतज्ञ चार्लस इ.रशमोर यांचे १८८५ मध्ये नाव दिलेला 'माऊंट रशमोर' जगप्रसीध्द करण्यामागे 'माऊंट रशमोर राष्ट्रीय स्मारका'ची कल्पना मांडणारे इतिहास तज्ञ डॉन राॅबिन्सन व त्यांच्या प्रतीभेला दाद देऊन प्रोत्साहीत करणारे व पाठींबा देणारे सिनेटर पीटर नाॅर्बेक व ही प्रचंड कल्पना आव्हान म्हणून सत्यात साकारणारे गुटझॉन बरग्लम हे शिल्पकार प्रामुख्याने कारणीभूत आहेत.
आज या व अश्या अनेक दैवी कलाकारांनी आपल्या कलेच्या आविष्काराने हे जग समृद्ध केले आहे. अनेक संस्कृतीशी ती जोडली गेली आहे. कला व संस्कृतीचा वारसा ती जतन करीत आहे. याची आपण जपणूक करायला हवी. कारण असे हे कलाकार शतका शतकातून एकदाच जन्माला येतात आणि प्रतिविश्व निर्माण करतात. पुतळे नष्ट करून इतिहास पुसला जात नाही. कारण त्यांचे कार्यच हा इतिहास घडवतो. पण पुतळे हे प्रेरणा देतात. तुमची सौंदर्यदृष्टी वाढवतात. तुमची अभिरुची संपन्न करतात. पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरतात. त्यांची जपणूक व्हायलाच हवी. मग ती अमेरीकेत असो, युरोपात असो वा भारतात. तेच आमचे वैभव आहे. तीच आपली संस्कृती आहे, सभ्यता आहे!
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष






Comments
Post a Comment