एका कलाकाराची अक्षरगाथा : अच्युत पालव
प्रकाशक हा नेहमीच नवनवीन लेखकांच्या शोधात असतो. असे सर्जनशील लेखक शोधुन, त्यांच्याकडून लेखन करवून घेऊन पुस्तक रूपाने ते तो प्रकाशीत करीत असतो. पण एका प्रकाशकाकडे लेखक स्वतः गेला, आणि त्याने आपले सुलेखनावरील त्याचे पुस्तक प्रकाशीत करण्याची विनंती केली. प्रकाशकाने सदर पुस्तक पहाताच त्याची व्यावहारीक दृष्टी जागृत झाली.
'या पुस्तकांना कोण विकत घेणार?' हा वाजवी प्रश्न प्रकाशकाने त्या लेखकाला करताच, लेखकाने संध्याकाळपर्यंत त्या प्रकाशकाला सोदाहरण पटवून दिले, की आज शालेय, कला महाविद्यालये, व्यावसायीक क्षेत्र, अश्या सर्वच स्तरावर या पुस्तकाची कशी गरज आहे ते! आजवर ‘सुलेखन’ अथवा ‘कॅलीग्राफी’ या विषयावर गांभीर्याने पाहीले गेले नाही. पण हळूहळू काळानुसार या विषयाचे महत्व लोकांना आता जाणवू लागले आहे. आणि त्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळणे हे सुध्दा कठीण आहे. अश्या परिस्तिथीत पुस्तक रूपाने त्या विषयाची शास्त्रशुद्ध माहीती देणे हे महत्वाचे कार्य ठरेल. आणि त्यासाठी अशी पुस्तके लोकांना अवगत होणे ही आजची गरज आहे, असे त्या सुलेखनकार लेखकाचे म्हणणे होते. ते प्रकाशक होते 'नवनीत' प्रकाशन संस्थेचे जितूभाई गाला व त्यांच्यासारख्या व्यवहार चतुर माणसाच्या गळी आपली कल्पना उतरवणारे सुलेखनकार होते आजचे आघाडीचे सुलेखनकार 'अच्युत पालव'
कांही वर्षांपूर्वी 'अक्षराकृती' या पालव यांच्या नवनीतने प्रकाशीत केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पु.ल.देशपांडे कला अकादमीत संपन्न झाला त्यावेळी खुद्द जितूभाई गाला यांनी हा प्रसंग सांगीतला. या समारंभाला अध्यक्ष लाभले होते ते सुप्रसीध्द गीतकार, दिग्दर्शक गुलजार. सोबत होते कवीवर्य ग्रेस. असा सुवर्णयोग जुळून आलेल्या या मंगल सोहळ्यात पालवांच्या 'अक्षराकृती’च्या धारा बरसत होत्या. आणि त्या समारंभाची लज्जत सुलेखनाच्या लयीप्रमाणे उफाळत होती. वास्तविक अच्युत पालव हें नांव तसे सर्वांचं सुपरिचीत. पण गुलजार यांच्याशी त्यांची भेट मात्र मजेशीररीत्या झाली. पालवांचा एक मित्र बी.इ.एस.टी. मध्ये कामाला होता. गुलजार ज्या ठिकाणी रहात होते त्या भागात विज बिले देण्याची कामे तो करीत असे. गुलजार यांनाही बिल देतांना एकदा दिवाळीच्या सुमारास आपणही कांही प्रेमाची भेट द्यावी असा विचार त्या मित्राच्या मनात आला व त्यासाठी त्याने पालवांकडे विचारणा केली. त्यावेळी नुकतीच पालवानी 'विठ्ठल' हा पारमार्थिक विषय घेऊन एक सुंदर अशी सुलेखनयुक्त दैनंदिनी (डायरी) बनवली होती. तीच डायरी त्यानी मित्राला गुलजार यांना भेट देण्यास सांगीतले. अच्युतने स्वतः संकल्पन केलेली डायरी गुलजार यांना मिळताच त्यांना ती अतीशय भावली, व मोठ्या आपुलकीने त्यांनी अच्युतला बोलावून त्याच्या कॅलिग्राफीचे कौतूक केले. तसेच आपल्या ' रावी पार' या कथासंग्रहाचे मुखपृष्ठही त्यानी अच्युतकडून बनवून घेतले.
कोणत्याही कलेच्या मुळाशी शास्त्र असतेच. त्यावर आधारीतच ती कला आकार घेत असते. मग ती नृत्त्य कला असो, नाट्यकला असो वा चित्रकला, स्थापत्यकला, किंवा शिल्पकला असो. तिचा शास्त्रशुद्ध अभ्यास हा व्हायलाच हवा. आणि सुलेखनालाही हेच नियम लागू आहेत. आणि याचा ऊल्लेख आपणाला साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वामी रामदासांनी आपल्या 'दासबोध' या ग्रंथात लेखनाचे नियम सांगताना केला आहे. आणि अश्याच या लालबागच्या चाळीत राहणाऱ्या अच्युतला या अक्षरांनी मोहवीले. अच्युत जेव्हां आर्ट स्कुलला शिकायला आला, तेव्हांच त्याच्यात अक्षरांची खुमारी दिसून येत असे. अर्थात सर जे. जे.अप्लाईड आर्टचा स्वतःचा अशी कॅलीग्राफी व स्क्रिप्ट याचा एक खास असा दर्जा आहे. परंपरा आहे. येथून शिकून गेलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी ती आत्मसात केली आहे. तिचा मनमुराद वापरही केला आहे. यात संजय पवार आहे, कृष्णकांत ठाकूर आहे, राजन जगताप, दत्ता पाडेकर, सुतार, वसंत यादव, विक्रम गायकवाड, सुनील धोपावकर असे अनेक विद्यार्थी या कलेचा मागोवा घेत होते. अच्युतच्या आगेमागेच हे सर्व होते. त्यामुळे अच्युत आपल्या सर्वच स्वाध्यायीकांसाठी कॅलिग्राफीचा वापर करीत असे. अच्युत अंतिम वर्षाला होता तेव्हां जे.जे.मध्ये १९८४ साली 'उल्का' या जाहीरात संस्थेचे संचालक श्री मुंडकूर यांनी स्थानीक लिपीतील संशोधनासाठी एक शिष्यवृत्ती जाहीर केली. तेव्हां उल्काचे कला संचालक व सुप्रसिध्द सुलेखनकार सुलेखनकार श्री र.कृ. जोशी यांनी त्याला सांगीतले की, संशोधन करायचे असेल तर आतापर्यंत न झालेल्या विषयावर कर. त्यामुळे मोडी ही दुर्लक्षीत असलेली लिपी अच्युतने संशोधनासाठी निवडली. आणि त्याचा अभ्यास सुरु झाला. यातील अधिकारी मानली जाणारी व्यक्ती म्हणुन वि.मो.खोब्रेकर यांनी अच्युतला योग्य दिशा दाखवली. तसेच केवळ अभ्यासापुरता या लिपीचा वापर होऊ नये, तर ती लिहावी कशी, तिचा वापर कसा करावा या दृष्टीकोणातून अच्युतचा र.कृ. जोशी, द.ग.गोडसे, डॉ.अशोक केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोधनिबंध सुरु झाला. तत्कालीन अधिष्ठाता प्रा. हरिभाऊ हणमंते यांनी अच्युतला संस्थेत अभ्यासासाठी जागा तर दिलीच, शिवाय त्याच्या संशोधनात कसलीच अडचण येवू नये याकडे जातीने लक्ष पुरवीले. आणि यातून मोडी व देवनागरीचा सुरेख संगम घडवून आणून अच्युतची 'मुक्त लिपी' तयार झाली. सर्वप्रथम महाराष्ट्र्र शासनाने तिचा वापर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात प्रकाशनासाठी केला. आणि येथून पुढे अच्युतचा व्यावसायीक कामासाठी सदर लिपीचा वापर सुरु झाला. दूरदर्शनवरील मालीका 'राऊ'ची नामांकने, पेशवा हॉटेलचा लोगो पाहील्यावर अच्युतच्या सुलेखनाने वातावरण निर्मिती कशी होते हे जाणवते. 'झोका' मालिकेतील त्यांचा लोगो पाहील्यावर आपणच उंच झोक्यावर गेलो आहे असे वाटते.
आज लोकांना 'ज्ञानेश्वरी' 'दासबोध' 'तुकाराम'गाथा' वाचायला वेळ नसतो. निदान त्यांचे कांही विचार लोकांपर्यंत पोचावेत, या हेतूने अच्युतने ज्ञानेश्वरीवर सर्वप्रथम दैनंदिनी केली. ज्ञानदेव माऊलींचे विचार आपल्या सुलेखनाने जागोजागी पेरून त्यातील मौलिकता त्याने लोकांच्या नजरेसमोर आणली. त्या पाठोपाठ संत तुकाराम, संत रामदास यांच्याही दैनंदिन्या अच्युतने संकल्पीत केल्या. यासाठी त्यांना डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. यशवंत पाठक, संजीवनी खेर या थोर साहित्यिकांनी मोलाची मदत केली. एकदा र.कृ. जोशीनी पवई येथील औद्योगिक संकल्पन केंद्रात एक सेमिनार आयोजीत केले होते. तेथे अच्युतने आपले मोडी लिपीवरील संशोधन मांडले. तसेच त्याला देशोदेशीहून आलेल्या सुलेखनकारासमोर प्रात्यक्षीक देण्याची संधी मिळाली. त्यावेळी जर्मनीच्या बर्नर स्नायडर व रॉबर्ट नॉर्टन या जागतीक कॅलिग्राफरनी त्याचे काम पाहीले, व तेथेच त्यांनी अच्युतला जर्मनीला येण्याचें आमंत्रण दिले. तेथे जाऊन जर्मन लोकांपुढे सुलेखनाचे पाठ त्याने करवून घेतले. एक वेगळी लिपी शिकण्याची, जाणून घेण्याची प्रवृत्ती त्या लोकांमध्ये त्याला जाणवली. परके लोक जर आपली भारतीय लिपी शिकण्याची जीद्द व भावना ठेवतात, तर भारतात ती कां नसावी? आणि येथे पालवानी ठामपणे ठरवले की ही कमतरता दूर करायची. तुम्ही जे जे कांही शिकलात ते तुमच्यापुरते न रहाता त्याचा प्रसार व्हायला हवा. 'कॅलिग्राफी' केवळ एक आर्ट फॉर्म न रहाता तिला विचार प्रसारणाची जोड मिळायला हवी. कॅलिग्राफीची चळवळही केवळ आर्ट स्कुलपुरती सिमीत राहू नये, तर तिचा वापर माणसाच्या दैनंदिन जीवनातही व्हायला हवा. या हेतूने अच्युत पालवने या विषयाच्या डायमेंशन बदलायच्या ठरवल्या. सर्वप्रथम कॅलिग्राफीचा वापर कोठे करता येईल हे पाहीले. नंतर जी गोष्ट नजरेला पडेल, ती सुलेखनाला पूरक आहे असे अच्युतच्या कलासक्त नजरेने हेरले. जसा तिचा विचार द्विमिती पृष्ठभागावर झाला, तसाच त्रिमितीमध्येही त्याने केला. अगदी कागदापासून ते कापड, धातू, लाकूड, कांच एवढेच नव्हे, तर मानवी अंगाचाही वापर अच्युतने पृष्ठभाग म्हणून केला. माध्यमांना तर गणतीच नव्हती. स्टेशनरी, बुकमार्क, पोस्टर्स, कॅलेंडर, वाल हँगिंग्ज, पेंटींग्स, नेम बोर्डस, टी शर्टस, साड्या, ड्रेसीस या सर्वानाच पालवांच्या सुलेखनाने सुशोभीत केले. कॅलिग्राफीचा अमर्याद वापर त्यांनी केला. मात्र या सगळ्या वाटचालीत अच्युतला फायदा झाला तो भारतीय भाषांचा. त्यात सौंदर्य आहे, तसा अर्थही आहे. त्यांना आपल्या सुलेखनाच्या कोंदणात अच्युतने जडवले.
आज आपणासमोर त्या ताकदीचे र.कृ. जोशी हे एकच नांव कां येते? याची खंत अच्युतला नेहमीच जाणवते.मात्र त्यावेळी त्याच्या लक्षात आले की विद्यार्थ्यामध्ये सुलेखनाविषयी उत्सुकता निर्माण करण्याचे काम शिक्षकांचे आहे. त्यासाठी शिक्षक हा प्रथम सर्वज्ञ असावा लागतो. याची जाणीव त्याला झाली. आणि पालवांच्या कॅलीग्राफीच्या कार्यशाळा सुरु झाल्या. अनेक कला संस्थांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना एक नवी दिशा मिळाली. अनेक शिक्षक सुलेखनामध्ये कांही नवीन करून विद्यार्थ्यांना दाखवू लागले. विदयार्थ्यामध्येही एक नवी ऊर्जा निर्माण होऊ लागली. त्यांची प्रात्यक्षिके पाहून 'हे असेही होऊ शकते' हे विद्यार्थ्यांना जाणवू लागले.'मुख्य म्हणजे कॅलीग्राफी करतांना मूळ आशयाला बगल दिली जाते, व केवळ फॉर्म निर्मिती मागेच कॅलीग्राफर लागतो, या सर्वसाधारण धारणेला अच्युत पालव यांनी छेद दिला. व अक्षरांच्या आकारात असलेल्या प्रचंड उर्जेला दृश्य स्वरूप देऊन पाहणाऱ्यांनाही तो आनंद त्यांनी जाणवून दिला.
स्वतःचे 'अक्षरानुभव' हे पुस्तक प्रकाशीत झाल्यावर अच्युतने दिल्ली येथे जेव्हां ते तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी याना भेट म्हणून दिले, ते पाहून त्या कविमनाच्या नेत्याने मोठ्या कौतुकाने अच्युतचा गौरव केला. 'इन्होने ऐसी अनमोल चीज लायी है, जिसका मूल्य देनेके लिये मेरे पास चेक बूक नही है' असें भावपूर्ण उद्गार काढून त्यांनी अच्युतच्या कामाची नोंद घेतली. आज अच्युतने कॅलिग्राफीचा वापर व्यवसायिक कामासाठी करतानाच तिला सामाजीक शिक्षणाचीही जोड दिली आहे. लोकांना सुलेखनाचे महत्व कळले पाहीजे, त्यांना शिकता आले पाहीजे या हेतूने त्याने कांही पुस्तकांचेही संकल्पन केले.कारगील युद्धाच्या वेळी त्याने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त अक्षरांकनाने खास अशी 'विजय कार्ड' बनवली, व शेकडो लोकांनी ती आपल्या देश्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शूर जवानांना मानवंदना या नात्याने आपल्या अनेक इस्टमित्रांना व नातेवाईकांना पाठवली. खरोखरीच ही कल्पना अंगावर रोमांच उठवणारी आहे.
अक्षरें काढतांना पेन कोणते वापरावे, त्याचा कोन कसा असावा, याच्या पद्धती अच्युत अगदी शात्रोक्त पद्धतीने सांगत असतो. एखाद्या डॉक्टर कडून इंजेक्शन देताना सुईचा वापर बरोबर झाला नाही तर माणसाला वेदना होतात. आपले पेन नीट न पकडल्यास अक्षरांनाही वेदना होतात, यांचे विश्लेषण एका कार्यशाळेत करत असताना एका दंत वैद्यानेच त्याला दाद दिली. डॉक्तरांचे हस्ताक्षर वाचनीय व्हावे या हेतूने त्याने अच्युतच्या कार्यशाळेत भाग घेतला होता. आज अच्युतच्या नांवावर अनेक पुरस्कार, अनेक प्रकाशने, कार्यशाळा, प्रात्यक्षीके, प्रदर्शने, इत्यादी गोष्टी आहेत. स्वतःचे 'स्कुल ऑफ कॅलिग्राफी' त्याने सुरू केले आहे. त्यातील पहील्या तुकडीतील विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन व त्यावर आधारीत पुस्तक प्रकाशीत करून त्याचे उदघाट्न तत्कालीन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करवले.
र.कृ. जोशींनी या देशात सुलेखनाची मुहूर्तमेढ रोवली. अर्थात त्यांनी केवळ सुलेखन केले नाही तर वर्षानुवर्षे अभ्यास करून प्राचीन शिलालेख, पुरातन कागदपत्रे यांचा सखोल अभ्यास आणि संशोधन केले. विविध भाषांना उपयुक्त होईल अशी एक लिपी, देवनागरीचे नवनवीन फॉन्ट, त्यांचे संगणकीकरण अश्या अनेक गोष्टी केल्या. वेद, उपनिषदे यांचा वारसा त्यांना त्यांच्या पौरोहीत्य घराण्यातूनच मिळाला होता. उभे आयुष्य त्यांनी या विषयासाठी वेचले. गुरु शिष्य परंपरा राखली. अश्या गुरुची बरोबरी करणे कोणालाच शक्य होणार नाही. पण त्यांचा मागोवा घेत अच्युतने नक्कीच मार्गक्रमण केले. आपल्या सुलेखनाच्या सौंदर्याचा आस्वाद स्वतः घेतला. इतरांनाही त्या आनंद डोहांत मुक्तपणे डुंबायला दिले. त्याच्या सुलेखनाच्या तरंग लाटा अनेकांना आपल्या अंगावर खेळवत प्रोत्साहीत करीत असतात. आणि अच्युत स्वतः आनंद घेत, तो दुसऱ्यांना वाटत आपली वाट चालत आहे. आज आपल्यामागे प्रसिद्धीचे, कलाकाराचे वलय असूनही आजही तो पूर्वीचाच आर्ट स्कुल मधील अच्युत राहीला आहे. आपल्या मित्रमंडळी सोबत तितक्याच सहजतेने वावरणारा, कधीही मदतीसाठी पुढे येणारा, आणि हक्काने त्याला कांही सांगावे आणि ते तत्परतेने करणारा. त्यामुळे अजूनही मधला इतका काळ जाऊनही मला तो कॉलेजमधील अच्युतच वाटतो. कामात मग्न तर असेच, शिवाय तितकाच मिस्कील आणि खोडकर. आणि या त्याच्या गुणामुळेच तो कलेची एकेक शिखरे पार करीत गेला. एकही असे माध्यम त्याने ठेवलं नाही जेथे त्याच्या सुलेखनाचा संचार झाला नाही
आजही अच्युत पालव एखाद्या कलासक्त विद्यार्थ्यांप्रमाणे नवनवीन कल्पनांच्या शोधात असतात. सर्वांपुढे नम्रतेने लीन होतात. पाय जमिनीवरच ठेवून चालतात. १९८० च्या दशकात जे.जे. उपयोजीत संस्थेत एक विद्यार्थी म्हणून वावरताना, संस्थेची स्नेह संमेलने गाजवताना, तेथेच अध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, पुढे स्वतःची जाहीरात संस्था निर्माण करून व्यावसायिक कामे करताना आणि स्वतःचे 'स्कुल ऑफ कॅलीग्राफी' सुरु करून तेथे कॅलिग्राफीच्या शास्त्रशुद्ध धडे देणारा अशी त्याची अनेक रूपे मी पाहीली आहेत. त्याची अजूनही तीच जिद्द आहे, व तेच त्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. अश्या या अच्युत पालवने निरनिराळ्या क्षेत्रातील नामवंतांचे जे मित्रमंडळ जमवले आहे त्याची प्रचिती त्याच्या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाच्यावेळी पु.ल.देशपांडे अकादमीतील थिएटर जेव्हां लोकांच्या गर्दीने ओसंडून वहात होते, तेव्हां आली. मनातील कप्प्यामध्ये ठेवलेल्या कल्पनांना कागदावर आणून मन मोकळे केले, की कोणीही अच्युत पालवांशी सुसंवाद साधू शकतो!
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष









Comments
Post a Comment