एक झाकोळलेला कलावन्त : रमाकांत देशपांडे
मला अजूनही आठवते ती ३० जूनची संध्याकाळ. वरून धो धो पाऊस कोसळत होता. साडेसातची वेळ होती. रस्त्या रस्त्यातून पाणी भरल्यामुळे बाहेर पडणे देखील अश्यक्य झाले होते. अश्यातच माझे मित्र व जे.जे. स्कुल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता वसंत सोनवणी यांचा फोन आला. अन त्याने मन सुन्न करणारी बातमी दिली, रमाकांत देशपांडे गेले!
रमाकांत देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे धाकटे बंधू. आणखी एक त्यांचे बंधू होते ते उमाकांत. मात्र पु. ल. व उमाकांत हे जवळपास सारखे भासणारे बंधू होते, पण रमाकांत त्याहून एकदम वेगळे वाटत. उंच शरीरयष्टी, गोरा रंग, भेदक असे घारे डोळे, जणू एखाद्याच्या मनाचा ठाव घेत आहेत असे भासत. १९६० चे दशक पु.ल.नी आपल्या साहीत्य, नाट्य, प्रवासवर्णन, चित्रपट, संगीत या रूपाने अवघ्या महाराष्ट्रावर मोहीनी घातली होती. तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, अंमलदार, बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात अशी एकापेक्षा एक सरस नाटके पु.ल. रंगभूमीवर आणत होते. रमाकांतही त्यातून कांही भूमिका करीत असत. त्यातील 'वाऱ्यावरची वरात' मधील 'गरुड छाप' तपकीर विक्रेता अन 'कामत मामा' ह्या भूमिका रमाकांत देशपांड्यानी गाजवल्या. रमाकांत देशपांडे हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. नाट्याभिनय हा त्यांच्या घराण्याला लाभलेला वारसाच त्यांना मिळालेला होता. त्यांच्या मामांचे दुभाषी घराणे हेही नाट्यकलेची सेवा करणारे होते. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे कवी तसेच मराठी साहित्याचे भोक्ते होते. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली'चे मराठीत 'अभंग गीतांजली' असे भाषांतर केले होते. रमाकांत यांचे वडील लक्ष्मणराव देशपांडे हे अडवाणी पेपर मिल्स मध्ये कामाला होते. . रमाकांत यांचे मामेभाऊ सतीश दुभाषी हे अभिनय क्षेत्रांत एक चांगले नांव कमावून होते. आणि हा सर्व नाट्यक्षेत्राचा वारसा जोपासत रमाकांत यांची जीवन वाटचाल सुरु होती. पण त्याच जोमाने रमाकांतने चित्रकला देखील जोपासली होती. आणि तिला आत्मसातही केली होती. किंबहुना नाट्यकला व चित्रकला या एकमेकाला पूरक असलेल्या कलानीच त्यांचे जीवन घडवले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
हे देशपांडे कुटुंब मूळचें बेळगावकडील. बेळगांवहून वेंगुर्ल्याला जो सरळ रस्ता जातो त्यावर जरा आतमध्ये असलेले जंगमहट्टी हे त्यांचे गांव. पु.ल.नी आपल्या आरंभीच्या काळात बेळगांवच्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये प्राध्यापकीही केली.रमाकांत यांचा जन्म १३ जानेवारी १९२७ चा. पुढे हे कुटुंब मुंबईला आले. मुंबईला ते ग्रॅंट रोडवर रहात. त्यानंतर त्यांचे कुटुंब जोगेश्वरी येथे आले. तेथे कांही वर्षे काढल्यावर त्यांनी पार्ल्याला स्वतःचे घर केले. त्या वडीलोपार्जीत घरात ते त्यांच्या आईसह रहात असत. पुढे पु.ल. पुण्याला स्थलांतरीत झाले. चित्रकला शिक्षण झाल्यावर रमाकांतनी गिरगावातील एका शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून आपली कला कारकीर्द सुरु केली. त्यांची पत्नीही शाळेतच होती. अतीशय प्रेमळ स्वभावाच्या त्यांची पत्नी स्वंयपाकात सुगरण मानल्या जात असत. नवऱ्याच्या सुख दुःखात त्याला सदैव साथ देत असणाऱ्या त्यांच्या पत्नीने पतीला सतत प्रोत्साहन दिले होते. रमाकांतची शिक्षकी कारकीर्द आणि जोडीला त्यांची नाट्यकलाही सुरूच असे. दिग्दर्शनाचीही त्यांना चांगलीच जाण होती. पुढे त्यांची शाळा बंद झाली. आणि १९६५ च्या दरम्यान सर ज.जी. उपयोजीत कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. दादासाहेब आडारकर यांनी रमाकांत यांचे कला व नाट्यगुण हेरून त्यांना संस्थेत अध्यापक म्हणून घेतले.
भारतीय विद्या भवनच्या एकांकीका स्पर्धा त्याकाळात खुप गाजत होत्या. दामू केंकरे हे जे.जे.मधेच प्राध्यापक होते. त्यांनी ह्या एकांकीकांवर जे.जे. चा खास असा ठसा उमटवला होता. जे.जे.ला हमखास ट्रॉफी हे समीकरणच तेव्हां झाले होते.यातच केंकरेंना रमाकांतची जोड मिळाली. १९६७ साळी 'यम हरला, यम जिंकला' या देशपांडेंनी दिग्दर्शीत केलेल्या एकांकीकेला सर्वोत्कृष्ट निर्मीतीचा पुरस्कार मिळाला. अन दिग्दर्शनाच्या क्षेत्रांत रमाकांत देशपांडे हे नांव दमदारपणे गाजू लागले. १९६८ साली मी जे.जे.मधे अध्यापक म्हणून लागलो, शासनाने संस्थेचा विस्तार करून विद्यार्थी संख्या वाढवली. पर्यायाने अध्यापकांची पदेही वाढली. यावेळी रमाकांत देशपांडे यांनी ड्रॉईंग क्लासची धुरा सांभाळली. त्यांचे स्वतःचे ड्रॉईंग इतकें अप्रतीम आणि शास्त्रशुद्ध होतें की जेव्हां ते विद्यार्थ्यांच्या कामावर सुधारणा करू लागले की त्यांच्या पेन्सीलवरील प्रभुत्वामुळे विद्यार्थी त्यांच्या प्रेमातच पडत. विद्यार्थ्यांनाही ते अगदी ममतेने चुका समजावून देत. कधीही कोणाशीही आवाज चढवून बोलत नसत. पण त्यांचे व्यक्तीमत्वच असे होते की सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा आदरयुक्त धाक वाटत असे. या त्यांच्या गुणांमुळे अल्पावधीतच ते विद्यार्थीप्रिय झाले.
जे.जे.मध्ये विचार प्रसारण कले सोबतच नाट्यक्षेत्राचीही आवड असलेले विद्यार्थीही दरवर्षी हमखास असत. अश्या विद्यार्थ्यांना हेरून त्यांचे नाट्यगुण रसिकांसमोर आणणे ही रमाकांत देशपांड्यांनी खासीयत होती. अश्याच एकांकीका स्पर्धांतून अन जे.जे.च्या स्नेहसंमेलनातून देशपांड्यानी अनेक रोपट्याना खतपाणी घालून त्यांना जोमानं वाढवलं व नावारूपाला आणलं. यातूनच पुढे इर्षाद हाशमी, मुश्ताक मर्चंट, सतीश पुळेकर, अशी मंडळी पुढें आली. १९७२ साली जे.जे.उपयोजीत कला संस्थेच्या स्नेह संमेलनासाठी त्यांनी 'ससा आणि कासव' हे नाटक बसवले. त्यातील मुख्य भूमिका होत्या अनील चिटणीस, नाना पारकर आणि मीता आठवले या जे.जे.च्याच विद्यार्थ्यांच्या! साहीत्य संघ मंदीरात झालेल्या या नाटकाचा प्रयोग चांगलाच रंगला. साध्याभोळ्या तरुणाची भूमिका करणाऱ्या नाना पारकरला पुढे चांगलेच यश मिळाले. पुढे व्यावसायीक नाटकातून नाना पारकर हिंदी चित्रपटात चमकला. त्याने नंतर आपले पारकर नांव बदलून 'पाटेकर' असे धारण केले. आज हिंदी चित्रपट सृष्टीत 'नाना पाटेकर' हे एक फार मोठे चलनी नांव आहे. अर्थात नानाने हे आपल्या कलागुणांवर मिळवले हे खरेच आहे, पण त्याला पहीली भूमिका देण्याला कारणीभूत रमाकांत देशपांडे हेच होते.
उंच, सडपातळ शरीरयष्टी असलेले रमाकांत आपल्या घाऱ्या डोळ्यांनी एखाद्याच्या मनाचा ठावं घेत. पण कधीही त्यांच्या तोंडून दुसऱ्याबद्दल वावगे शब्द निघत नसत. ते जेव्हां चित्रं काढायला सुरुवात करीत, तेव्हां त्यांची पेन्सील ज्या सफाईने कागदावर फिरे की पाहणाऱ्याला ती सुखावीत असे. मधूनच समोरच्या मॉडेलकडे अथवा स्टील लाइफकडे डोळे रोखून ते त्याचा अंदाज घेत व आपल्या चित्रात त्यातील बारकावे आणत. त्यांना नेहमी आपला हात उचलून डोक्याला लावायची सवय होती. तसेच मधून मधून घड्याळाच्या स्टीलच्या पट्ट्याची कळ सोडून पुन्हां बसवण्याचीही सवय होती. पुढे आम्हां कांही शिक्षकांचा एक ग्रुप बनला. हा ग्रुप घरून कॉलेजला येण्यापुरता होता. त्यात मी, रमाकांत देशपांडे, अरविंद नागवेकर, रमेश कांबळी, वसंत सोनवणी व अरविंद हणमंते असे होतो. प्रत्येकजण आपापल्या ट्रेनने वांद्र्याला पोचत असे. नंतर ५ नंबरच्या हार्बरच्या फलाटावर आम्ही सर्व एकत्र जमत असू. आमची ८ ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे जाणारी हार्बरची ट्रेन असे. आमचा पुढचा प्रथम वर्गाचा डबा, त्यातील प्रत्येकाच्या सीट ठरलेल्या होत्या. मग गप्पात अर्धा तास कसा निघून जाई ते कळतच नसे. कॉलेजला पोचलो की सरळ रमेशच्या कॅन्टीन मध्ये चहा-मिसळ पाव खाऊन मग प्रत्येकजण आपापल्या वर्गाकडे प्रस्थान करीत असे. अनेक वर्षे आमचा हा उपक्रम सुरु होता. मात्र कॉलेजमध्ये देशपांडे जास्त करून मीराबाई करंडे यांच्या केबीनमध्ये दिसत. त्या दोघांचे मग कारवारी भाषेत बोलणे होत असे. मधून मधून नागवेकरही त्यांत सामील होत. मीराबाईंचा एक नियम होता. रिकामा वेळ मिळाला की त्यांची केबिनमध्ये सतत स्केचिंग करणे चालू असे. आणि पुढे यातूनच त्यांचे 'मेघदूत’ हे पेंटींगचे प्रदर्शन साकार झाले. सकाळचा नाष्ता देशपांडे घरून घेवून येत असत. आणि दुपारच्या आमच्या जेवणाचे डबे त्याकाळच्या प्रथेप्रमाणे घरून येत. मग आमचे सर्वांचे जेवण स्टाफ रूम मध्ये गप्पा गोष्टी करत चालू असे. मग येथे विषयाचे कधीच बंधन नसे. आणि एकमेकाच्या डब्यातील वाटपही सुरू असे.
सच्छील, सरळमार्गी, अजातशत्रू असलेले रमाकांत देशपांडे नियत वयोमानानुसार १९८५ साली निवृत्त झाले. संस्था एका आदर्श शिक्षकापासून वंचीत झाली. आणि अश्या निर्मळ मनाच्या कलाकारावर नियतीने अनेक कठोर असे आघात केले. सेवा निवृत्त झाल्यावर त्यांचा हातातोंडाशी आलेला कर्ता मुलगा कावीळीच्या विकाराने निधन पावला. त्यांना सतत साथ देणारी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणारी आणि सतत सावलीप्रमाणे सोबत राहून त्यांची काळजी वाहणारी त्यांची कर्तबगार पत्नी देखील मधेच त्यांची साथ सोडून गेली. तेव्हां ते पूर्णपणे मनाने खचले. पण याही परीस्थीतीत ते दुःखाला गिळून उभे राहीले . आपल्या स्वभावानुसार देशपांडे आंतरीक दुःखे, आपल्या भावना कधीच कुणापुढे उघड करीत नसत. अपवाद फक्त मीराबाईंचा. मात्र तेही कांही बाबतीत राखूनच! मीराबाई करंडे त्याचे श्रद्धास्थान म्हटले तर वावगे ठरणार नाही. अमेरीकेला विवाह करून गेलेल्या आपल्या मुलीवर मात्र त्यांची खूप माया होती. त्यांचा दुसरा मुलगा पुढे पुण्याला स्थायीक झाला. तसेंच त्यांची पूर्वीची जे.जे.ची विद्यार्थिनी व नंतर त्यांच्या पुतण्याची झालेली पत्नी दीपा कुलकर्णी (आताची दीपा देशपांडे) हिने मात्र त्यांची अखेरपर्यंत स्वतःच्या वडीलांप्रमाणे काळजी घेतली.
चित्रकलेतील निसर्गचित्रण हा रमाकांत यांचा खास आवडता विषय. व त्यामध्ये त्यांनी चांगलेच प्रावीण्य मिळवले होते. कॉलेजच्या स्टडी टूर मध्ये देशपांडे भरपूर काम करीत असत. आम्ही जेंव्हा केरळ येथे स्टडी टूर घेऊन गेलो होतो तेंव्हा देशपांडे तेथील निसर्ग सौंदर्य भराभर कागदावर उतरवताना आम्ही पाहीले आहे. निसर्गाचे सौन्दर्य रेखाटतांना ते आपले भान विसरून जात. निसर्ग चित्रण करण्यासाठी ठिकाण कसे निवडावे हे देखील ते सांगत असत. व त्याची त्यांनी एक आठवण देखील आम्हांला सांगीतली. एकदा ते कांही विद्यार्थी सोबत घेऊन खंडाळ्याला निसर्ग चित्रांसाठी गेले होते. एक जागा निवडून ते व इतर मुले कामाला बसली. एवढ्यात शेजारील रस्त्यावरून एक गाडी चालली होती. या मुलांना चित्रे काढताना पाहुन त्यातील व्यक्तीने गाडी थांबवली, व ते उतरून खाली आले. त्यांनी देशपांड्याना निसर्गातून नेमके काय हुडकायचे, त्याला कसे कम्पोज करायचे याचे शास्त्रशुद्ध धडे दिले, तसाच त्यांना नेमका स्पॉट देखील निवडून दिला. व स्वतः थोडे काम करून दाखवून ते गृहस्थ निघून गेले. सर्वच विद्यार्थी अचंब्याने पाहू लागले. तेव्हां देशपांडे त्यांना म्हणाले, अरे तुम्ही भाग्यवान आहात. आज ज्यांनी तुम्हांला कांही धडे दिलें ते कोण आहेत माहीत आहे? ते आपल्या देशातील एक महान चित्रकार आहेत. त्यांचे नांव आहे एस.एम.पंडीत! असे अनेक किस्से आम्हांला देशपांडे सरांच्या बैठकीत ऐकायला मिळत. असेच एकदा आर्टीस्ट सेंटर येथे चित्रकार पळशीकरांचे पोर्ट्रेटचे प्रात्यक्षीक ठेवले होते. पळशीकरांचे प्रात्यक्षीक ही कलाकारांना पाहण्यासाठी मोठीच पर्वणी असे. आमच्याच संस्थेमधील एक प्राध्यापक दत्ता नावेलकर देशपांडेंना घेऊन ते पाहण्यासाठी गेले. कारण अद्याप पर्यंत नावेलकरांनी पळशीकरांचे प्रात्यक्षीक कधीच पाहीले नव्हते. दोघेही जाऊन अगदी योग्य रित्या पहाता येईल अशी जागा पटकावून बसले. आणि पळशीकर आले. त्यांनी आपली पॅलेट तयार केली. मॉडेल ते स्वतःच निवडणार होते. आणि त्यांनी आपली नजर सभोवार फिरवली अन नेमके त्यांना नावेलकर दिसले. गौर वर्णाचे, चेहऱ्यावर दाढी वाढवलेले नावेलकर मॉडेल म्हणून त्यांच्या पसंतीला आले व त्यांनी नावेलकरांना जवळ बोलावले. पुढे पळशीकरांना पोर्ट्रेट प्रात्यक्षिकासाठी केवळ अर्धा तास पुरे असे. पोर्ट्रेट सुंदर झाले. पण ज्या हेतूने नावेलकर तेथें गेले होते, त्या प्रात्यक्षीक पाहण्यास मात्र ते मुकले. आणि हा किस्सा देशपांडे रंगवून सांगत असत. तसे देशपान्डे मिस्कीलदेखील होते. एखाद्याची फिरकी घेण्याची लहर आली की हसत हसत ते त्याची फिरकी घेत असत. आमच्याच सुमारास देशपांडे नांवाचे दुसरे एक गृहस्थ अध्यापक म्हणून आले होते. थोडासा स्वतःचा मोठेपणा सांगण्याची त्यांची सवय होती. नुकत्याच आलेल्या त्या देशपांडेंनी रमाकांतशी गप्पा मारत असता, पु. ल. देशपांडे आपले काका लागत असल्याचे सांगीतले. त्याला रमाकांत कोण आहेत हे माहीत नव्हते. त्यावर गंभीर चेहऱ्याने रमाकांतनी त्याला म्हटले, मला आणखी एक पुतण्या आहे हे माहीत नव्हते. कारण पु.ल.माझा मोठा भाऊ आहे. त्यावर त्या नवीन आलेल्या देशपांड्याची काय गत झाली असेल, त्याची कल्पनाच करावी.
एकदा ते माझ्याकडे त्यांचा नातवाच्या प्रवेशासाठी जे.जे.मध्ये आले. त्यानंतर मी माजी शिक्षकांचे सत्कार करण्याची प्रथा सुरु केली, त्यावेळी त्यांचा सत्कार माजी अधिष्ठाता हणमंते सर यांच्या हस्ते मी करवला. असेच एकदा मला पार्ले टिळक विद्यालयाने त्यांच्या स्नेह संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांनी आपला नातू निखिल याला गाडी पाठवून मला घरी बोलावून घेतले होते. आधीही मी त्यांच्या घरी गेलो होतो. अगदी जुन्या घरात त्यांची आई असतानाही. वरच्या मजल्यावर त्यांनी एक खोली होती. तेथे ते काम करीत असत. जेव्हां मुंबईत जुन्या ईमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रथा सूरू झाल्या केव्हां देशपांडेंचेही घर त्यात जावून तेथे नवीन इमारत उभी राहीली व सर्व देशपांडे बंधूना त्यात आधुनीक तर्हेचे फ्लॅट मिळाले. मधे एकदा परत देशपांडे यांनी मला घरी त्यांची निसर्गचित्रे पहाण्यास बोलावले. मी गेलो तेव्हां तेथे अनेक निसर्गचित्रे मांडून ठेवली होती. कांही वर्षांपूर्वी ते अमेरीकेला मुलीकडे गेलें असता, तेथे त्यांनी केलेली तसेंच कांही भारतात केलेली निसर्गचित्रे त्यांनी मला दाखवली. त्यांची सर्व चित्रे अप्रतीम होती. एवढे अफाट चित्रण करणाऱ्या देशपांड्यानी कधीच आपल्या चित्रांचे प्रदर्शन का भरवले नाही हा विचार माझ्या मनांत आला. व तेथेच मी त्यांना सांगीतले की तुमच्या या चित्रांच्या खजीन्याचे प्रदर्शन मी जे.जे.मध्ये भरवणार आहे. असे हे अमूल्य चित्रण कला विद्यार्थ्यांनी पहाणे आवश्यक आहे. आणि एक खास समारंभ करून मी रमाकांत देशपांडे यांच्या निसर्ग चित्रांचे प्रदर्शन जे.जे.च्या संस्थेत भरवून या महान कलाकाराचा सन्मान केला. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, तृप्ती आणि समाधान मी कधीच विसरू शकणार नाही.
त्यानंतर देशपांडे पार्ल्याला तेथीलच कांही कलावंत मंडळींच्या सहवासात होते. तेही सर्व जे.जे.चेच माजी अध्यापक! पण त्यात पार्ल्याबाहेर रहाणारे देखील असत. महीन्यातुन एक दिवस ही मंडळी एकत्र जमत. चर्चा करत. चित्रप्रदर्शनावर टीका टिपणी चालू असे. मग त्यापैकी एकजण सर्वांना जेवण देत असे. आदल्या महीन्यात रमाकांत देशपांड्यानी ही जबाबदारी घेतली होती. त्यावेळी माजी अधिष्ठाता हणमंते यांनाही बोलावले होते. या नंतर जे.जे.चा पार्ल्यातील एक माजी विद्यार्थी सुनील चव्हाण याने १९८१ सालची त्यांची जे.जे.मधील बॅचचा अंधेरीतील एका हॉटेलमध्ये मित्र मेळावा भरवला होता. त्या वेळीही त्यांनी देशपांडे याना अगत्याने बोलावले होते. स्वत:कडेही मित्रमंडळींनी यावे अशी त्यांची अपेक्षा असे. एकदा असेच एका ठिकाणी मी व नागवेकर गेलो असता तेथे आम्हांला देशपांडे भेटले. थोड्या गप्पा झाल्या. नंतर निघतांना थोडे विनोदाने देशपांडे म्हणाले, यारे एकदा तुमच्या जुन्या मित्राला भेटायला. नाहीतर एक दिवस वर्तमानपत्रात वाचाल की देशपांडे गेले म्हणून! खरोखरीच कदाचीत नियतीच बोलली असेल त्यावेळी त्यांच्या तोंडातून. जूनच्या ३० तारखेला त्यांनी दुपारी वसंत सोनवणींना फोन केला, व सांगीतले, अरे मला जरा अस्वस्थ वाटते आहे. डॉक्टरना भेटून येतो. त्यांचे पुतणे त्यांना घेऊन हॉस्पीटल मध्ये गेले. आपल्याला काय होते आहे हे डॉक्टरांना सांगत असतांनाच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
मी जेव्हां विचार करतो तेंव्हा वाटते, या माणसामध्ये अभिनय करण्याची ताकद होती. दिग्दर्शन करण्याची क्षमता होती. चित्रकार म्हणून आपले स्थान निर्माण करण्याची धमक होती. मग त्यांच्या जीवनात असे काय घडले असावे की यातील काहीही ते मोठ्या प्रमाणावर मिळवू शकले नाहीत? पु.ल. देशपांडे एवढे प्रचंड मोठे नांव पाठीमागे होते. पण त्यापुढे कदाचित रमाकांत हे नांव दिसले नसेल? पु.ल. नावाच्या तेजापुढं रमाकांत हे नांव झाकोळलं गेलं हे मात्र निच्छित! आज जेव्हां आपण गुगलवर पु.ल.देशपांडे नांव टाईप करतो तेव्हां शेकड्याने पर्याय समोर येतात. पण रमाकांतचा तेथे नाव निशाणाही नसतो. रमाकांतनी आपल्या उभ्या आयुष्यात स्वतःला कधीच मिरवीले नाही. मात्र आपल्या भाईंविषयी ते इतरांशी भरभरून बोलत असत. आज नाट्य दिग्दर्शनांत, अभिनयात, कलाक्षेत्रात एवढी दमदार ताकद असूनही 'रमाकांत देशपांडे' हे नांव पाहीजे तेवढे गाजले नाही. कांही शासकीय जाहीरात फिल्म्स मध्ये, दूरदर्शनच्या चिमणराव गुंड्याभाऊ मालीकेमध्ये ते मधून मधून दिसत. दामू केंकरे यांच्या मनोहर काटदरे लिखीत 'घेतलं शिंगावर' मध्ये त्यांची इन्स्पेक्टर वाकणकर ही विनोदी भूमिका चांगलीच गाजली. होती. रमाकांत देशपांडे यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी त्यांची पत्नी गेल्यावर त्यांच्या जीवनातील रंगच उडाले होते. पुढे ते कांही दिवस पुण्याला मुलाकडे होते. पण तरीही ते एकाकीच होते. पुन्हां मुंबईला आले. त्यांच्या मुलीने येऊन त्यांना घर लावून दिले. जेवण बनवायला स्वयंपाकीणीची व्यवस्था केली. त्यांची दीपा त्यांची काळजी घेत होती. रमाकांत देशपांडे हे आयुष्यभर एक निर्मळ आणि चारीत्र्यवान जीवन जगले. त्यांनी कुणालाही कधी दुखावले नाही. कितीही कौटुंबीक विवंचनेत असोत, त्या विवंचना चेहऱ्यावर कुणालाही दाखवल्या नाहीत. सदा प्रसन्न अश्या हसतमुख चेहऱ्याने ते सतत वावरले. जातानाही एखाद्या गांवाला जाताना जसा निरोप घेतो, तश्या सहजपणे गेले. आयुष्यभरात कुणालाही त्रास न देता जगले, तसेच या जगातूनही निघून गेले. शेवटीही कुणाला त्रास होऊ न देता. राहील्या आहेत त्या फक्त आठवणी!
आज ३० जून. रमाकांत देशपांडे यांची १३ वी पुण्यतीथी. त्या पुण्यात्म्याला, आमच्या सुख दुःखाशी समरस होणाऱ्या आमच्या मित्राला, साश्रु नयनांनी भावपूर्ण आदरांजली!
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
( लेखातील कांही छायाचित्रे सुनील चव्हाण ब्याच १९८१ यांच्या सौजन्याने)







Comments
Post a Comment