खेळ सावल्यांचा : बाळ जोगळेकर




'मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवन ग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटलेल्या असतात. कांही रेषा अस्पष्ट तर कांही खोलवर असतात.' वि.स.खांडेकरांचे हे वचन अनेकांच्या बाबतीत सत्य ठरते. पण माणसाची मुद्रा पाहून ती व्यक्ती आदराला प्राप्त होते, प्रचंड लोकसंग्रह करते, त्या मुद्रेवर सतत प्रसन्नतेचे व तृप्ततेचे भाव जाणवतात. असे एक हसतमुख आणि तडफदार व्यक्तीमत्व म्हणजे नामवंत छायाचित्रणकर विष्णू महादेव तथा फिल्मी दुनीयेत तसेच पत्रकारीतेत सुपारीचीत नांवाने प्रसीद्ध असलेले बाळ जोगळेकर.

वसंतराव जोगळेकर, सुमतीबाई गुप्ते-जोगळेकर याच घराण्यांतील बाळ जोगळेकर हे नांव. वसंतरावांनी दिग्दर्शक म्हणून कीर्ती मिळवली. तर त्याच जोमाने बाळ जोगळेकरांनी सिने छायाचित्रण कलेत. जोगळेकर कुटुंब हे वऱ्हाडातले. यवतमाळ येथे २ जून १९२४ रोजी जन्मलेल्या बाळासाहेबांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. विदर्भातील सुखवस्तू घराण्यांपैकी त्यांचे एक असल्याने कटकटी तश्या वाट्याला आल्याचं नाहीत. अभ्यासासोबत मैदानी खेळांचीही आवड असल्याने त्याचाही सराव चालूच असे. मित्रमंडळीही होती ती देखील समविचारांची. तेथल्याच एका युवकाने स्वतःला सामाजीक, राजकीय, सांस्कृतीक चळवळीत झोकून दिले होते. त्याचा रजीस्टर विवाह होणार असल्याची बातमी या मित्रमंडळींना मिळाली. तेव्हां रजीस्टर विवाह हा नेहमीच्या विवाहापेक्षा अधीक थाटामाटाचा सोहळा असावा या हेतूने बाळासाहेब तेथे पोचले. पण त्यांनी पाहीले की केवळ वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले व एका मोठ्या बुकात सह्या केल्या, बस! त्यावेळी त्यांना कल्पना देखील नव्हती की तो तरुण नवरदेव आपला जीवश्च्य कंठश्च्य मित्र बनणार आहे व पुढे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार आहे. हरीत क्रांतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राचे नांव उज्वल करणारे दीर्घकालीन मुख्यमंत्री म्हणून राजवट करणारे वसंतराव नाईक हेच ते होते!

तेव्हां संस्थान असलेल्या कोल्हापुरात त्याकाळी प्रफुल्लचा 'चिमुकला संसार' हा चित्रपट वसंतराव दिग्दर्शीत करित होते. बाळ जोगळेकरांना छायाचित्रणाची ओढ प्रथमपासूनच होती. त्याचे तंत्र शिकून आपण सीनेछायाचित्रणकार व्हावे ही एकच तळमळ त्यांना लागली होती. तेथे त्यांची एका चिमुरड्या मुलीशी गाठ पडली. स्टुडीओत सर्वत्र मुक्तपणे वावरत असलेली ती मुलगी उत्तम गात होती. तसेच नृत्यातील पदन्यासही तालात करीत होती. सर्वांच्याच कौतुकाचा विषय ती चिमुरडी ठरली होती. पुढे गान सम्राज्ञीचे अढळपद प्राप्त केलेली, अवघ्या जगावर आपल्या मधुर आवाजाची मोहीनी घातलेली गायिका लता मंगेशकर हीच ती मुलगी. जिच्याशी बाळ जोगळेकरांचे पुढे घरोब्याचे संबंध जुळले!

'प्रफुल्ल'मध्ये असलेले छायाचित्रकार श्री बुलबुल यांनी बाळासाहेबांची चाललेली तळमळ पाहून त्यांना सल्ला दिलं की, येथेच उमेदवारी करून जर का तुला छायाचित्रकार व्हायचं असेल, तर पुढील दहा वर्षातही तुला ती संधी मिळणार नाही. यासाठी तू प्रथम तुझे शिक्षण पूर्ण कर. आणि मगच ये. बाळासाहेबानाही तो सल्ला पटला आणि त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे कॉलेजचे दिवस मजेत जात होते.  कोल्हापूर संस्थानच्या जुन्या राजवाड्यात हे कॉलेज त्यावेळी भरत असे. कोल्हापुरात त्याकाळी बाहेरील अनेक प्रांतातून आलेले विद्यार्थी होते. त्यापैकी कांही १९४२ च्या चळवळीतील मुंबई सोडून आलेलेही कांही विद्यार्थी होते. या सर्व विद्यार्थ्यात एका शांत, शालीन अश्या विद्यार्थिनीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. ही विद्यार्थीनी मुंबईच्या शांताराम मसूरकरांची कन्या इंदुमती होती. स्वभावाने सालस आणि लाघवी असलेली इंदुमतीही बाळासाहेबांकडे आकर्षीत झाली. आणि पुढे या दोघांचा विवाह सोहळा धार्मीक पद्धतीने मोठ्या थाटामाटात आटोपला, आणि इंदुमती मसुरकर ह्या इंदुमती जोगळेकर होऊन बाळासाहेबांच्या संसारात आल्या. पुढे त्यांच्या संसारवेलीवर तीन फुले उमलली. मोठी भारती, जी आज माझी पत्नी आहे. दुसरा किशोर, ज्याचा विवाह ग.दि.माडगूळकरांच्या लहान कन्या शुभदा हिच्याशी झाला, व तिसरी माधवी. जी दिग्दर्शक-निर्माता असलेल्या प्रथमेश सावंत याच्याशी विवाहबद्ध झाली.

त्याच दरम्यान मा. विनायक यांनी आपला चित्रपट व्यवसाय मुंबईला हलवीला. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्वप्नाला पूर्तता येण्याची चिन्हेही त्यांना दिसेनाशी झाली. आणि चित्रपट क्षेत्रात नांव कमवायचे हे तर मनाशी ठामपणे ठरवीलेले. एका क्षणी त्यांनी निर्णय घेतला, आणि त्याच क्षणी कोल्हापूरला रामराम ठोकून मुंबईची वाट धरली. त्यांचे बंधू वसंतराव यांनीही  तोवर मुंबईला दिग्दर्शक म्हणून आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. बाळासाहेब मुंबईला येताच त्यांनी बाळासाहेबांना त्यावेळचे ख्यातनाम व नावाजलेले छायाचित्रकार श्री. द्रोणाचार्य यांच्याकडे उमेदवारीसाठी पाठवीले. पाच सहा दिवस जाऊनही त्यांच्याकडून कॅमेरा व त्याच्या तंत्राविषयी काहीच माहीती त्यांना मिळेना. शेवटी एक दिवस धीर करून जोगळेकरांनी त्यांना विचारताच स्पष्ट शब्दांत द्रोणाचार्यानी त्यांना सांगीतले, ' मी तुला मुळीच शिकवणार नाही. तूच जर उद्या या विषयात तज्ञ झालास, तर तुझ्या भावाचे चित्रपट मला मिळणार नाहीत.'  यानंतर बाळासाहेबांना 'श्री साऊंड स्टुडिओ'चे रजनीकांत पंड्या, तसेच गोवर्धनभाई पटेल, कुमार जयवंत यांनी हात दिला व बाळ जोगळेकर हे नांव आणि त्याच्या खांद्यावर कॅमेरा आला.


बाळासाहेबांच्या उमेदवारीच्या काळात चित्रपट सृष्टीचे सुवर्णयुगच मानले जात होते. त्यामुळे बाळासाहेबांना 'फुल', 'जुगनू', 'झीनत', 'लैला-मजनू' सारख्या सेटवर काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांना नुकतीच मिसरूड फुटलेला अवघा एकवीस वर्षांचा के. असीफ मोठ्या आत्मविश्वासाने पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, सुरैया, याकूब यासारख्या थोर अभिनेत्यांना दिग्दर्शन करीत असतांना पहायला मिळाले. 'जुगनू' मध्य दिलीप कुमारशी संबंध आला. तो त्यांच्याशी मराठीत बोलत असे. त्याच चित्रपटात एक कॉलेज तरुण 'वो अपनी याद दिलाये' हे गीत गात होता. पडद्यावर व पडद्यामागेही हे गीत गाणारा होता नंतर जगप्रसीध्द झालेला पार्शवगायक महंमद रफी. त्याने दिलीप कुमारच्या तोंडून गायलेले 'यहाँ बदला वफा का बेवफाई के सीवा क्या है!' ह्या गीताने त्याला खूपच प्रसिधी मिळवून दिली. आणि अश्या गुणी लोकांच्या सहवासात हळूहळू बाळ जोगळेकर हे नांव चित्रपट सृष्टीमध्ये छायाचित्रणकार म्हणून ओळखले जाऊ लागले. अश्या प्रकारे श्री साऊंड स्टुडीओत काम करत असतांना एकदा केदार शर्मा यांच्या चित्रपटाचे शुटिंग चालले होते. कुमार जयवंत त्यांचे कॅमेरामन होते. शुटींगच्या पहील्याच दिवशी शर्मा यांनी जयवंत यांना प्रसंग, त्याची मांडणी, वगैरे समजावून सांगितलीच, शिवाय लायटींग कसं हवं तेदेखील सांगायला सुरुवात केली. कुमार जयवंत या प्रकाराने संतापले होते. पण रोजच हा प्रसंग घडू लागल्याने कुमार जयवंत यांनी केदार शर्मा यांना स्पष्टपणे सांगीतले, हे पहा शर्माजी, मला तुमच्याबद्दल आदर आहे. पण मी सुध्दा अनेक चित्रपटांचा अनुभव घेतलेला छायाचित्रकार आहे. पण तुमच्यासोबत काम करताना मला लक्षात येत आहे की तुम्हांला कॅमेरामन नव्हे, तर ऑपरेटीव्ह कॅमेरामन हवाय. मग मी कशाला माझा वेळ फुकट घालवू? असे म्हणून त्यांच्या उत्तराचीही वाट न पहाता कुमार जयवंत सेट सोडून निघून गेले.

या कुमार जयवंतांकडून जोगळेकरांना खूप शिकायला मिळाले. नंतर तर बहुतेक सर्व काम ते बाळासाहेबांवर सोपवून निर्धास्त होत. त्यावेळी त्यांचे के. असीफ याचा पहीलाच चित्रपट 'फुल'चे काम चालले होते. नुकताच मिसरूड फुटलेला पोरसवदा असीफ मोठया आत्मविश्वासाने दिग्दर्शन करीत होता. सेट लावण्यात आला होता. कॅमेऱ्याचा अँगल बरोबर साधला होता. जिन्यावरून नायीका उतरून खाली निघून जाते. बस, एवढाच शॉट. पण त्यासाठी पूर्ण दिवस लायटिंग चालले होते. नायीका जाताच तिचे वडील संतापाने हातातील काठीने तेथील एक प्रचंड झुंबर जोराने फोडतात. ते झुंबर त्यावेळी सात हजार रुपयांना विकत आणले होते. त्या महागड्या झुंबराऐवजी दुसरे कांहीतरी फोडूया असे तो कलाकार असीफ यांची विनवणी करीत होता. कारण एकाच वेळी झुंबर फुटून त्याचा खळकन आवाज, चेहऱ्यावरचा उद्रेक हे सारे दाखवणे, पुन्हां त्यात रिटेक नाही. एकाच शॉट मध्ये ओ के हवे. नाहीतर दुसरे झुंबर पुन्हा आणायला हवे. पण के. असीफ कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानें पुन्हां पुन्हां रिहर्सल करायला लावली अन फायनल शॉट घेतला. सर्वजण श्वास रोखून होते. आणि त्या कलाकाराने ते झुंबर फोडले. मोठा खळकन आवाज होवून सर्वत्र काचांचे तुकडे विखूरले गेले.  दोन मिनीट सर्वत्र शांतताच होती. आणि आसिफच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसूं फुलले होते. या असिफचा मामा म्हणजे निर्देशक व लैला मजनू चित्रपटाचे नायक होते. त्यांनी असीफला शिंप्याचे दुकान काढून दिले होते व सेटवर अजीबात यायचे नाही अशी समज दिली होती. अनेक मोठमोठ्या कलावंतांचे कपडे असिफ़ने शिवले होते. पण त्याची स्वप्ने खूप मोठी होती. पुढे त्याने निर्माता-दिग्दर्शक म्हणून अनेक सिनेमा केले. मोगल इ आझम सारखी अतिभव्य कलाकृती निर्माण केली.

१९४५ च्या सुमारास जोगळेकरांनी आपला 'आयमो' कॅमेरा घेतला. आणि त्यावर पहिलेच चित्रण पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे करण्याची संधी त्यांना मिळाली. दुसऱ्या एका प्रसंगी रंगीत चित्रणासाठी प्रखर दिवे लावल्याने पंडीतजी प्रथम संतापले. पण नंतर त्यांनी स्वतः त्यांना बोलावून आपले हवे तसे चित्रण त्यांना करायला दिले. यापुढे बाळासाहेबांनी हिंदी,मराठी, गुजराथी अश्या अनेक चित्रपटांचे छायाचित्रण केले. त्यांनी शिष्यही खूप तयार केले. छायाचित्रण तर त्यांच्या नसानसात इतके भिनले होते की साधारण पंधरा एक फुटावरून आपला सहाय्यक डायफ्राम कीती फिरवतो हेही त्यांना अचूक कळे. त्यावरून ते चूक की बरोबर हे सांगत असत. आणि विशेष म्हणजे आपल्या शिष्याना ते जाणीवही देत असत की स्टील फोटोग्राफी मध्ये तुम्हांला जर का एक्सपोझर जास्ती किंवा कमी झाले, तर तेथे निरनिराळ्या ग्रेडच्या पेपरची सोय असते. पण मूव्ही मध्ये एकदा का तुम्ही शॉट घेतला की तो फायनल. तेथे तुम्हांला दुसरी सोय नाही. याकरिताच तुमचं एक्सपोझर अचूक असायला हवे. नाहीतर ती फिल्म फेकूनच द्यावी लागते. ‘नशीबदार’ चित्रपटानंतर जोगळेकरांचे बऱ्यापैकी नावं झाले. १९५१ च्या सुमारास
एम.अँड. टी. प्राॅडक्शन मध्ये कृष्णाच्या जीवनावर चित्रपट निर्माण करण्याचे घाटत होते. हा चित्रपट मराठी व हिंदी अश्या दोन्ही भाषांत काढायचे ठरले होते. वसंतराव जोगळेकर याचे दिग्दर्शन करीत होते. अश्या चित्रपटात ट्रीक फोटोग्राफीला खूप वाव असतो. आणि बाळासाहेबांचे गुरु गोवर्धनभाई पटेल त्यातील एकदम तज्ञ. त्यामुळे वसंतराव सर्वप्रथम त्यांच्याकडे गेले.  गोवर्धनभाई मनमुरादपणे हसले व म्हणाले, अहो वसंतराव, तुमच्या घरातच आता एक उत्तम छायाचित्रकार असताना बाहेर कोठे शोधता?  तरी वसंतरावांना थोडी शंका होती. पण गोवर्धनभाई ठाम होते. आणि हा चित्रपट बाळासाहेबांकडे चालून आला. नंदकिशोर मध्ये त्यांनी अनेक ट्रीक सीन्स वापरले. राधेच्या गायनाने झाडावरची पाने फुले सोन्याची होतात,वसुदेव
बाळ कृष्णाला परडीत घालून निघतो.आणि कृष्णाच्या चरण स्पर्शाने यमुना नदी दुभंगते आणि वसुदेव सहजगत्या पुढे जातो,
असे ते सीन प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. या दृश्यासाठी त्यांनी एका तलाव बांधून घेतला. आणि त्यात दोन मोठ्या काचा उभ्या केल्या. त्यांना साखळ्या बांधल्या. काहीजणांकडे फक्त ते पाणी हलतं ठेवण्याचं काम दिलं. जेणेकरून वाहत्या नदीचा परीणाम साधता यावा.

१९५३ साली 'टाइम्स ऑफ इंडीया' वृत्त समूहाने आपला पहीला 'फिल्म फेअर' सोहोळा सुरु केला. या सोहोळ्याला खुद्द हॉलीवूडचा प्रसीद्ध अभिनेता ग्रेगरी पेक यांना उदघाटक म्हणून आमंत्रित केलें होते. चित्रपट सृष्टीतील पहीला वहीला ऑस्करच्या धर्तीवरील पुरस्कार म्हणुन मेट्रो सिनेमावर खास रोषणाई केळी होती. त्याकाळात चॅनल नव्हते. म्हणून या प्रसंगाचे चित्रण होणे महत्वाचे होते. आणि बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे फिल्म फेअरने ही खास जबाबदारी त्यांच्यावर दिली. चित्रपटामध्ये चित्रण करताना हवी तशी प्रकाश योजना, विषीस्ट अँगल आपणास साधता येतात. पण अश्या प्रसंगात ती उपलब्धता नसते. तरीही या अवार्ड फंक्शनचे पहीले पारितोषीक विजेता दिलीप कुमार, मीना कुमारी, नौशाद, बिमल रॉय,यांच्या अभूतपूर्व सोहोळ्याचे चित्रण बाळासाहेबांनी अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट केले. पुढेही त्यांनी तो सोहोळा चित्रित केला. तसेच  राजेश खन्ना -डिंपल यांच्या विवाहाचा सोहळाही त्या काळात खूप गाजला होता.  षण्मुखानंद हॉल मधे झालेल्या त्यांच्या स्वागत समारंभाचे चित्रण कारण्यासाठी बाळासाहेबांनाच सांगण्यात आले होते. एखाद्या चित्रपटातील झालेल्या प्रसंगाप्रमाणे बाळासाहेबांनी या विवाहसोहळ्याचे चित्रण केले. हे चित्रण त्यावेळी बऱ्याच चित्रपटगृहांनी चित्रपटाच्या खेळापुर्वी एक खास आकर्षण म्हणून दाखवले होते. व बरेच राजेश खानाचे फॅन तो चित्रपट केवळ राजेश-डिम्पलचा  विवाह सोहोळा पहाण्याच्या निमित्ताने पहात असत.

बाळासाहेबांच्या फिल्मी कारकिर्दीला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला आणि ते माहीतीपटाकडे वळले. यामध्ये त्यांना भारत सरकारच्या अनेक माहीतीपटावर काम करता आले. निरनिराळ्या विषयावर त्यांचे महितीपट आले. डॉक्युमेंटरी आणि बाळ जोगळेकर ही नांवे एकमेकांशी जुळली गेली. सरकारी कोणत्याही परवानग्या लागोत, 'बाळ जोगळेकर’ हा परवलीचा शब्द झाला. अनेक मित्र मिळाले.  बाळासाहेबांचे बंधू वसंतराव यांचे चित्रपटही बाळासाहेबांच्या कॅमेऱ्यातून बद्ध होऊ लागले. 'कारीगार' 'आंचल' ' आज और कल' 'एक कली मुसकायी'  असे चित्रपट त्यांनी केले. एक कली मध्ये त्यांची पुतणी (वसंतरावांची मुलगी) मीरा ही काम करीत होती. चित्रपटात त्यावेळी एक समांतर असे विनोदी कथानक जोडले जात असे. त्यासाठी त्यावेळचा लोकप्रिय विनोदी अभिनेता मेहमूद याला घ्यायचे ठरले. त्याची आणि शुभा खोटेची जोडी खूपच लोकप्रिय झाली होती. मेहमूदशी करार करण्याचे काम बाळासाहेबांवर सोपवण्यात आले. आणि बाळासाहेब मेहमूदकडे पोचले. त्याकाळात मेहमूदचा भाव बराच वाढला होता. पण हा चित्रपट वसंतरावांचा आहे, हे समजल्यावर मेहमूदने आणखीन जास्त रक्कम मागीतली. जोगळेकरांना कळेना हा असे का वागतो आहे. पण त्याचे सांगणे एकच होते, जोगलेकरका पिक्चर है तो मै जादा पैसा लुंगाही. नंतर त्याने त्यामागील कहाणी पेश केली. मेहमूद जेव्हां एक स्ट्रगलर होता, तेव्हां त्याला वसंतराव दिगदर्शन करीत असलेल्या चित्रपटात एक लहानशी भूमिका मिळाली होती. आपण प्रथमच पडद्यावर दिसणार ही गोष्ट त्याच्यासाठी तेव्हां प्रचंड होती. चित्रपट प्रदर्शीत झालेल्या दिवशी मेहमूदने दोन तीनशे रुपये खर्चून त्याची बरीचशी तिकिटे विकत घेतली व सोबत तो आपले बरेच मित्र, नातेवाईक यांना चित्रपट पाहण्यास घेऊन आला. चित्रपट सुरु झाला. मध्यंतर जवळ आलं. वाटले आता आपला रोल येईल. मध्यंतरानंतर द एन्ड ची टायटल आली. चित्रपट संपला. लोक उठून बाहेर जाऊ लागले. फिल्म एडीट करतांना मेहमूदच्या त्या छोट्याश्या रोलला एडिटरची कात्री लागली होती. आणि इकडे मेहमूद मात्र अनेकांच्या टिंगलीचा धनी झाला. आणि आता संधी चालून आली होती बदला घेण्याची. ती तो थोडीच सोडणार? मात्र जोगळेकरांनी प्रांजळपणे त्याची मागणी पुरी केली.

नंतर आला जमाना दूर दर्शनचा! त्यामुळे जोगळेकर या माध्यमात आणखी कार्यरत राहीले. त्याकाळात दूर दर्शनसाठी  त्यांनी केलेली 'रघुनाथ धोंडो कर्वे' ही टेलिफिल्म दूर दर्शनवर खूप गाजली. कुटुंब नियोजनाचा संदेश त्या काळात देशाची पुढची भयानक स्थिती ध्यानात घेऊन प्रसार करणाऱ्या त्या महापुरुषावर कश्या प्रकारचे प्रसंग आले, याची भूमिका अनंत जोग या अभिनेत्याने मोठ्या आत्मीयतेने साकारली. दूरदर्शन हे  माध्यम जणू त्यांच्यासाठीच केल्याप्रमाणे झाले. कारण त्यांच्या रहात्या जागेतून रस्ता ओलांडला की दूरदर्शनची इमारत होती. पुढे या दूरदर्शनसाठी जोगळेकरांनी भरपूर काम केले.

बाळासाहेबांनी अनेक मित्र जोडले. अगदी राजकारणापासून ते पोलीस खात्यापर्यंत. मुख्यमंत्री ते राज्यमंत्र्यापर्यंत. पोलीस कमिशनर ते खालच्या शिपायापर्यंत. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, त्यांचे जवळचे मित्र. सुधाकरराव नाईक तर बालपणीचे सवंगडी. गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर, मारुतराव अन सुमतीदेवी धनवटे, जमखिंडी संस्थानच्या राजकन्या इंदुताई पटवर्धन, जवाहरलाल दर्डा, रा.सु.गवई, बाळासाहेब देसाई, पहील्या आय.ए.एस. अधिकारी मालतीबाई तांबे-वैद्य, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.  जोगळेकर गेले, की त्यांचे सर्वत्र स्वागत झालेच पाहीजे. आणि मग जोगळेकर आपली पानाची चंची काढत व मग गप्पा होत.  ओळख असो वा नसो, ते कोणाशीही ओळख असल्याप्रमाणे सुहास्य मुद्रेने त्याचे स्वागत करीत. त्यांच्या हातात त्यांचा पॅलार्ड बोलेक्स कॅमेरा सतत असे. त्यामुळे कित्येक दुर्मिळ असे क्षण ते त्यावर टिपत असत. एकदा एका बैठकीत ते आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक असे जमिनीवर बैठक मारून बसले असताना अत्रे त्यांना विनोद सांगताहेत व यशवंतराव व वसंतराव खदखदा हसताहेत असे दृश्य त्यांच्या कॅमऱ्यात कैद केले. पुढे आचार्य अत्र्यांचे निधन झाल्यावर शरदचंद्र सिन्हा यांनी 'आचार्य अत्रे, एक झुंझार पौरुष' असा माहीतीपट काढला त्यासाठी हे दृश्य त्यांनी वापरण्यास दिले. शिवाय चित्रपट सृष्टीतील कुमारसेन समर्थ, अशोक कुमार, दिलीपकुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, त्यांच्याशी तर घरोब्याचे संबंध जुळले. एकदा ते भालजी पेंढारकरांच्या स्टुडीओत गेले असता तेथे त्यांना लता भेटली. दोघांच्या गप्पा छान रंगल्या. पूर्वस्मृतींना उजाळा मिळाला. इतक्यात तेथे कोणीतरी त्यांना खावयास आंबे आणून ठेवले. ते पाहून लता एकदम उद्गारली, "प्रफुल्लमध्ये काम करत असतांना आम्ही सर्व भावंडे मिळून एक आंबा वाटून खात होतो. आणि आता...आंब्याच्या करंड्या घरात असतात, पण ते खायला कोणी नसतं!" दिलीप कुमार त्यांच्याशी मराठीत बोलत असत. कारण कांही काळ त्यांनी नाशीक जवळील देवळाली येथे काढल्यामुळे मराठी भाषा त्यांनी आत्मसात केली होती.


सिनेमॅटोग्राफर या नात्याने बाळासाहेबांनी फिल्मच्या विविध माध्यमातून काम केले. माहीतीपट करताना अनेक अविस्मरणीय क्षण त्यांच्या वाट्याला आले. त्यापैकी कांही महत्वाचे म्हणजे पंडीत नेहरूंचे विविध तऱ्हेने केलेले चित्रण, सन १९६१ मध्ये जगातील पहीला अंतराळवीर रशियाचा युरी गागारीन जेव्हां भारतात आला होता, तेव्हां त्याच्या सत्काराचे केलेलं कव्हरेज, भारतीय नौदलात 'आय एन.एस. विक्रांत' ही महाप्रतापी बोट दाखल झाली त्याच्या समारंभाचे कव्हरेज, आणि नौदलात अभिमानाने महत्वपूर्ण कामगिरी बजावल्यानंतर ती जेव्हां निवृत्त झाली त्यावेळीही बाळासाहेबांनी तिचे चित्रण केले होते.
तसेच बांगला देशचे पंतप्रधान शेख मुजीबूर रेहमान पाकिस्तानच्या बंदिवासातून सुटल्यानंतर ढाक्याला जातांना वाटेत कांही काळासाठी ते मुंबईत आले. त्यावेळी मुंबई विमानतळावर जाऊन केवळ तत्कालीन पोलीस आयुक्त श्री प्रधान यांच्या ओळखीने त्यांनी मुजीबूर रेहमान यांचे संपूर्ण चित्रण केले.

आणि त्या १ ऑगस्ट १९९९ च्या पहाटे जोगळेकरांच्या घरचा फोन खणखणू लागला. त्यांचे एक जिवलग मित्र व काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रभाकर कुंटे यांचा फोन होता. श्रीमती सोनीया गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होत्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांचे दौरे होते. त्यांच्यासोबत राहून त्यावर आधारित एक डॉक्युमेंटरी करायची होती. त्या कामाची आखणी करून ते झोपले. पण...सकाळीच त्यांच्या शरीराने बंड पुकारले. त्यांच्या निद्राधीन देहाला पॅरॅलीटीक अटॅक आला. जसलोक मधील डॉ. पंड्या आणि डॉ. नागपाल या या निष्णात शल्य विशारदानी त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताचा झालेला क्लॉट शस्त्रक्रीया करून काढला. हळूहळू ते शुद्धीवर आले. त्यांचा मुलगा किशोर याने त्यांना कसलीही कमतरता पडू न देता श्रावण बाळाप्रमाणे त्यांची सेवा केली. बिछ्यान्यावर पडून असतानाही ते सतत सकारात्मक बोलत असत. कसे आहात हे विचारताच, 'बेटर दॅन येस्टर डे' हे वाक्य ते हमखास बोलत.  व्हील चेअर मध्ये असतानाही त्यांची वृत्ती प्रफुल्लीत असे. सकारात्मक विचारातच ते असत. मात्र त्या काळातही कित्येकदा ते वास्तवतेच्या पलीकडे जाऊन चित्रपटाच्या सोनेरी क्षणांत पोचत,  आणि त्यांच्या समोर येत असत ते 'लाईट- कॅमेरा- ऍक्शन!' हे शब्द.

आणि आपले सुखी, समृद्ध, वैभवशाली आणि कृतार्थ जीवन जगून २६ जून  २००२ च्या पहाटे त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एका छायाचित्रण संस्थेचा अस्त झाला. अनेक शिष्य त्यांनी तयार केले. अनेकांना स्वतःच्या पायावर उभे केले. आयुष्याचा महत्वाचा काळ त्यांनी आपल्या 'कॅमेरा' नामक मित्रासह सेल्युलाइडवर प्रकाश आणि सावल्यांचा खेळ खेळण्यात घालवला. आणि जगाच्या या सेटवरचे एक नाट्य संपुष्टात आले. आणि केवळ फ्लॅश ब्याक शिल्लक राहीला.

२६ जून २०२०! बाळासाहेब जोगळेकर यांची १८ वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आम्हां सर्वाकडून त्यांना ही भावांजली अर्पण करीत आहोत!

-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…