अवतार वाल्मिकीचा : ग.दि.माडगूळकर
पूजा अर्चा आटोपून वाल्मिकी ऋषी आपल्या आश्रमाकडे येत असतांना झाडावर त्यांना एक क्रौंच पक्षाचे जोडपे दिसले. एवढ्यात लपत छपत एक शिकारी तेथे आला आणि त्या निष्पाप पक्षाची हत्या करण्यासाठी त्याने आपल्या धनुष्याला बाण लावला. 'त्यांना मारू नको' असे सांगत वाल्मिकी ऋषी पुढे येत असतांनाच शिकाऱ्याच्या बाणाने विद्ध झालेला तो क्रौंच पक्षी वाल्मीकींच्या पायाजवळ येऊन पडला. त्या पक्षाच्या प्राणांतिक वेदना पाहून व्यथीत झालेल्या वाल्मिकींकडून 'रामायण या महाकाव्याचा जन्म झाला. या काव्याचा गोडवा, मतीतार्थ आजही प्रत्येकाच्या अंतःकरणात साठलेला आहे. आणि या वाल्मिकीचा पुनर्जन्मच पुढे या महाराष्ट्रात झाला. जणू काही त्यावेळची रामकथा घरोघरी, मनोमनी प्रत्येकाच्या ओठावर खेळवण्यासाठी आणि अंत:करणात रूजवण्यासाठी! आणि जणू ते महर्षी वाल्मिकी जन्माला आले १ ऑकटोबर, १९१९ रोजी सांगली जिल्ह्यांतील शेटफळ या खेडेगावांत. दिगंबर कुलकर्णी यांच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले, हेच पुढे प्रतिवाल्मिकी म्हणून घराघरात प्रसीद्ध पावले. नांवही ठेवण्यात आले ते बुद्धीच्या देवतेचे, गजानन.
घरची परिस्थीती ओढाताणीची असल्याने कुलकर्णी घराण्याला नेहमीच निरनिराळ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागत असे. याचा परीणाम गजाननवर होऊन जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याच्यावर वेगवेगळे संस्कार घडत राहीले. शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवला तोही औंधच्या श्रीनिवास हायस्कुल मध्ये. जी शाळा प्रमाणपत्र देण्यासाठी कमी अन संस्कार केंद्र म्हणूनच जास्त प्रसीद्ध होती. खुद्द महाराज पंत प्रतिनिधी यांच्या वैयक्तीक देखरेखीखाली आणि शिस्तीखाली विद्यार्थी घडत असत. या शाळेत खेळांना अन व्यायामालाही महत्व असे. पण गजाननाचा ओढा खेळापेक्षा वाचनाकडे अधीक होता. यातूनच त्यांची चिंतनाची बैठक हळूहळू घट्ट होऊ लागली. सरस्वतीचा प्रसाद लाभलेल्या गजाननाची प्रतिभा बहरू लागली. अचूक नादमय अन सोपी अशी ओवीबद्ध शब्दयोजना, विषयाचा गाभा, संत वाङ्मयातील साधेपणा या गोष्टी त्यांना सजतेने साध्य झाल्या. अन साहीत्य व काव्याच्या मंदीरात गदिमांची पूजा साकारू लागली. स्वातंत्र्य लढ्याशी संपर्क आलेल्या गदिमांनी कुंडल या गांवी स्वातंत्र्य सैनिकांना स्फूर्ती अन सामर्थ्य देणारे शाहीरी काव्य लीलया घडवलं!
वयाच्या १९ व्या वर्षी गदिमांनी कोल्हापूरला येऊन चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. मा. विनायक यांच्या कंपनीत त्याना यायला कारणीभूत ठरले ते आचार्य अत्रे! त्यावेळी पडेल ते काम या औंधकराने स्वीकारले. पण अभिनयाच्या जोरावर त्यांना महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. मात्र त्याच सोबत त्यांच्यातील काव्यही उफाळत होतं. १९४२ साली ' पहीला पाळणा ' या चित्रपटासाठी गीतलेखन करून त्यांनी कवी म्हणून पाय रोवला. काव्य हे तर ग.दि.माडगूळकरांच्या रक्तातंच भिनलं होतं. कळत न कळत जसा आपला श्वासोश्वास चालत असतो, तितक्याच सहजतेने त्यांच्याकडून काव्याची गुंफण होत असे. विषयाला मर्यादा तर कधीच नसत. काव्याची सुमधुर शब्दरचना हे गदिमांना लाभलेले परमेश्वरी वरदान होतं. त्यांच्या लेखणीतून उतरलेला प्रत्येक शब्द काव्य बनून आज संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी,प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या, बाल गोपालांच्या ओठांवर नाचत असतो. आणि तोही विवीध रूपात. कधी देवभक्ती-देशभक्तीपर गीतं, अंतरीच्या भावना जाणवून देणारी भावगीतं, प्रणय गीतं, तशीच वीरह गीतं, शृंगार रसाने ओथंबलेल्या लावण्या, 'नाचरे मोरा, लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना' अशी शिशुगीतं, अशी अनेक गीते त्यांच्या लेखणीतून बहरत होती. रसिकांच्या मनांत कायमची ठसली होती. त्यांचे शब्दसामर्थ्य वातावरण निर्मीती यथायोग्य करीत असे. मग ती पुराणातील सुरांची भाषा असो, ऐतीहासीक वीरांची भाषा असो, वा आधूनिक काळातील प्रणयी युगूलांच्या प्रीतीची वा ग्रामीण ठसक्याची असो. एकदा पहाटे काम संपवून प्रभात रोडवरून घरी परतत असताना रस्त्यावरील म्युनिसिपालटीचे दिवे मालवले जाताना त्यांना दिसले. तेथल्यातेथेंच 'माया बाजार' या चित्रपटातील 'विझले रत्नदीप गगनात, आता जागे व्हा यदुनाथ' हे अवीट गोडीचे गीत जन्माला आले. एवढी प्रचंड प्रतिभा या महाकवीच्या ठायी होती. तसेच ‘चांदण्यात चालू दे, मंद नाव नाविका’ अथवा ‘ डोळ्यांत वाच माझ्या, तू गीत भावनांचे असो, किंवा धूंद मधुमती’ ही गीते हमखास आपणास त्या वातावरणात घेऊन जातात.
११ मे १९४२ साली गदिमांचा विवाह झाला. विद्याताई त्यांच्या सहवासात आल्यावर त्यांचा संसारही फुलू लागला.
चित्रपट सृष्टीत सतत ते वरच्या कमानीत चढत होते. जोडीला अभिनय व लेखन ह्या दोन्ही बाजू त्यांची कीर्ती द्विगुणीत करीत होत्या. आणि ह्याच सुमारास व्ही. शांताराम उर्फ आण्णासाहेब यांनी या दुसऱ्या आण्णांना पहीली दाद दिली. शांताराम बापूंच्या लोकशाहीर राम जोशी ह्या चित्रपटाची आखणी सुरु हा होती. ह्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते सर्वकांही गदिमांनी करण्याची जबाबदारी शांताराम बापूनी त्यांच्यावर टाकली. एवढेच नव्हें, तर त्यातील मुद्गल शास्त्रींच्या महत्वाच्या भूमिकेसाठीही त्यांनी गदिमांना पाचारण केले. आणि गदिमा उर्फ अण्णांनी त्याला आपला परीस स्पर्श केला. अण्णांच्या लेखणीने राम जोशीला अजरामर केले. त्यातील राम जोशींचा सवाल-जवाब हा आण्णांच्या लेखणीचा एक चमत्कार मानावा लागेल.
ग.दि.माडगूळकरांनी काव्यासोबत चित्रपट कथा लेखन तितक्याच समर्थपणे केले. सकस अन दर्जेदार कथांमुळे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. १९५० साली आलेल्या राजा परांजपे यांचा 'पेडगांवचे शहाणे' हा चित्रपट खूप चालला. त्या दोन वर्षात त्यांनी सोळा कसदार चित्रपटांचे लेखन केले. यातील 'लाखाची गोष्ट' हा चित्रपट त्यांची कथा अन भूमिका या दोन्ही क्षेत्रावर दाद देऊन गेला. उत्कृष्ठ अभिनय व विनोदाने नटलेल्या 'लाखाची गोष्ट' मध्ये एका महीन्यात एक लाख रुपये खर्चायला लावणाऱ्या वधूपित्याच्या भूमिकेत अण्णांची व राजा परांजपे यांच्या अभिनयाची जुगलबंदी त्या चित्रपटात आपणास पहायला मिळते. तशीच विनोदाची परिसीमा देखील त्या चित्रपटाने गाठली होती. त्यांचा 'बोलविता धनी' हा चित्रपटही त्यांच्या भूमिकेमुळे खुप गाजला. गदिमांनी शून्यातून विश्व् निर्माण केले. आणि येथून पुढे आण्णांच्या आयुष्याचा व दारिद्र्याचा वनवास संपून ते पंचवटीत स्थिरावले. त्यांच्या खडतर कष्टाचे दिवस संपून पुण्यातील 'पंचवटी' येथे सुखाची सावली त्यांना लाभली. अन साथ होती ती विद्याताई या सहधर्मचारीणीची. जी त्यांच्या प्रत्येक पावलागणिक त्यांची काळजी वहात असे. या दुर्वासाच्या रागा -लोभाला सांभाळत असे.
गदिमांची पंचवटीत लेखनाची एक खास बैठक होती. येथूनच त्यांनी अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा बसल्या बैठकीत लिहील्या आहेत. त्यांचे सर्व लेखन हे एकटाकी असे. ते लिहायला बसले की, शब्द दोनही हात जोडून लीन होऊन त्यांच्या समोर उभे असत. पटकथेमध्ये शब्दा शब्दांतून दृश्य फुलवावं लागतं. ते तंत्र माडगूळकरांनी मोठ्या कौश्यल्याने आत्मसात केले होते. याचे प्रत्यंतर 'ऊन पाऊस' चित्रपटातील एका दृश्यातील संवादावरून जाणवते. व्यक्ती न दाखवता केवळ दूरध्वनीवरील झालेल्या संभाषणावरून प्रसंगाची पूर्ण जाणीव व कल्पना आपल्याला पुरेपूर येते. मराठी सोबतच हिंदी चित्रपट कथाही त्यांनी लिहील्या. अनेक पारितोषिकांनी सन्मानित झालेल्या राजकमलच्या ' दो आँखे बारह हात'ची कथा त्यांचीच होती. या चित्रपटाची कथा त्यांनी औंधचे महाराज पंत प्रतिनीधी यांनी 'मॉरीस फ्रीडमन ' या पोलीश तरुणाच्या सूचनेनुसार कैद्यांना तुरुंगाबाहेर ठेवून माणसात आणण्याच्या केलेल्या प्रयोगावर आधारीत होती. 'आमच्या हातातील बेड्या काढतांना राजानं आम्हांला जगदंबेसमोर नेवून शपथा घेववल्या होत्या' असे त्या खुनी कैद्यांनी माडगूळकरांना डोळ्यांत पाणी आणून सांगीतले होते. आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत 'बेस्ट फॉरेन फिल्म'चा पुरस्कार हा चित्रपट मिळवून गेला. तसेच त्यांच्या 'तुफान और दिया' या चित्रपटाची कथा त्यांचा स्वतःच्या खडतर जीवनावर बेतल्याचे आपणांस जाणवते. या खेरीज 'गुंज उठी शहनाई’ 'नवरंग' पेडगांवचे शहाणे वरून केलेला हिंदी चित्रपट 'चाचा चौधरी' या चित्रपटांचे लेखनही त्यांनीच केले. कित्येकदा हवा तो आशय मिळवण्यासाठी शांताराम बापू मराठीत माडगूळकरांकडून गीते लिहून घेत व नंतर भरत व्यास यांच्याकडून ती हिंदीत करवून घेत. ज्या ज्या उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे नांव घ्यावें तो गदिमांच्याच लेखणीतून अवतीर्ण झालेला हमखास असायचाच!
ग.दि.माडगूळकरांच्या 'गीत रामायणा'ने तर महाराष्ट्रात क्रांतीच केली. लहानपणापासूनच संत वाङ्मय गदिमांच्या मनावर संस्कार घडवीत गेले. त्यामुळे संत-पंत-तंत य तिन्ही कवींचे गुण त्यांच्या ठायी सामावले होते. श्रीधर स्वामींचा 'राम विजय' त्यांनी समग्र ऐकला. तसेच रिसबुडकर बुवांची कीर्तनेही श्रवण केली. रिसबुडकर तर आख्यानाचे गाणेच करीत.आपणही श्रीधरांसारखी ओवी व रिसबुडांसारखी गाणी रचावी ही गदिमांची तीव्र इच्छा होती. पण काहीं ना कांही कारणामुळे ती राहून गेली. ते जेव्हां पूण्यास पोचले तेव्हां तेथे त्यांना मोरोपंतांचे वंशज रामकृष्ण पंत पराडकर भेटले. आणि त्यांना पंतांच्या काव्याचा खजीनाच मिळाला. आर्य भारत व अष्टोत्तरशत रामायण त्यांनी वाचून काढले. तरीही लिखाण झालेच नाही. मधल्या काळात कथा-नाटक-चित्रकथा-गीते-यांचे बरेच लिखाण झाले. पण राम कथेवर लिहिण्याची तळमळ वाढतच होती. त्याच वेळी सुदैवाने पुण्याला नभोवाणी केंद्र निघाले. सीताकांत लाड तेथील सर्वेसर्वा होते. त्यांनी माडगूळकरांना नभोवाणीसाठी सातत्याने काहीतरी लिहीण्याची गळ घातली. सीताकांत लाडानी रामायणाची ती कल्पना गदिमांना सांगताच त्यांनी सुधीर फडके यांना विचारले. तोपर्यंत सुधीर फडके संगीतकार व गदिमा गीतकार म्हणून त्यांची जोडी चित्रपट सृष्टीत नावाजली होती. अन रामायण लिहीण्याची त्यांची आंतरीक इच्छा पुन्हां उफाळून आली. जणू राघवानेच संकेत दिले होते. आणि हाती कोणताही संदर्भ न घेता गदिमांच्या मुखातून शब्द ओघळले,
| स्वये श्री रामप्रभू ऐकती
कुश-लव रामायण गाती ||
एक महाकवीच्या मुखातून प्रत्यक्ष वाल्मिकीचे रामायण अवतरत होते. केवढी ही प्रतिभा? अवघ्या ३२ दिवसांत ५२ गीतांचा रत्नहार अण्णांनी महाराष्ट्र शारदेच्या गळ्यात घातला. त्यावेळी पहाटे समई लावून तिच्या शांत प्रकाशात अण्णा जमिनीवरच गादी लोडांच्या बैठकीवर बैठक मारून बसायचे. समोरच्या डेस्कवरील कागदांवर आण्णांच्या लेखणीतून शब्दांची आतषबाजी होत असे, आणि भराभर गीतांची जुळणी आकार घेत असे. त्याकाळी पुण्याला आण्णा फोनवरून सुधीर फडक्याना गीत सांगत व मुंबईला फडके त्याला चाल लावत. जेव्हां रामायण स्फुरत नव्हतं तेंव्हा त्यांच्या खोलीत येतांना एकदा विद्याताईनी त्यांना थोडेसे गंमतीनेच विचारले, काय, जन्मला का तुमचा राम? हें विचारल्याचे निमित्त मात्र झाले. आणि झराझर ओळी कागदावर उतरल्या, 'राम जन्मला ग सखे राम जन्मला.' हाच खऱ्या अर्थाने 'गीत रामायणा'चा जन्म होता. आणि आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या या प्रत्येक आठवड्याच्या 'गीत रामायण'ला काव्यबद्ध करायला या भाषाप्रभू 'वाल्मिकी'ला बिलकुल प्रयास पडले नाहीत. सहज सुलभतेने ही रामकथा घडत गेली. जणू त्यांची रामभक्ती गदिमांच्या अंतःकरणातून ओठावर येत होती व कागदावर उतरत होती. त्याला संगीताचा बाज दिला सुधीर फडके यांनी. या दुग्ध शर्कर योगाचा श्रोत्यांनी भरभरून आस्वाद लुटला. यातील जीवनाच्या तत्वज्ञानाचे सार सांगून कळसावर पोचवणारे गीत म्हणजे, 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' पुणे आकाशवाणीवरून प्रसारीत झालेल्या 'गीत रामायणा'ला सुधीर फडके, ललिता फडके, माणिक वर्मा, लता मंगेशकर, मालती पांडे, व गजानन वाटवे अश्या दिग्गजांनी आवाज दिला होता. पुढे 'गीत रामायण'चे स्वतंत्र कार्यक्रम सर्वत्र होऊ लागले. तेव्हां सुधीर फडके एकट्याने सर्व ५६ गाणी गात असत. गदिमांनी नंतर कृष्ण चरीत्रावर 'गीत गोपाळ'चीही रचना केली. त्याला स्वरबद्ध केले होते सी.रामचंद्र यांनी! सचीन शंकर यांच्यासाठी 'कथा ही राम जानकीची' ही नृत्य नाटिकाही या राम भक्ताने लिहीली.
गदिमा हे मराठी चित्रपटाचे एक अविभाज्य अंग बनले होते. म्हणून १९५७ साली या महाकवीला संगीत नाटक अकादमीने उत्कृष्ट चित्रपट लेखक म्हणून गदिमांचा सर्वोच्च बहुमान केला. त्यानंतर त्यांना 'पद्मश्री' या किताबाने भारत सरकारने सन्मानीत केले. गदिमांनी प्रचंड लेखन केले. सुमारे दोन हजारवर वर गीते, शंभरच्या आसपास चित्रपट कथा, तितक्याच हिंदी मराठी पटकथा, साहीत्यात अनेक लघुकथा संग्रह, काव्यसंग्रह, दोन कादंबऱ्या, दोन नाटकं, शब्दरंजनसहीत तीन मासिकांचे संपादन याशिवाय अनेक फुटकळ लेख विविध प्रकाशनातून लिहीले आहेत. असे हे लोकप्रिय व्यक्तीमत्व १९६२ ते १९७४ दरम्यान विधान परीषदेवर नामनिर्देशीत सभासद म्हणून नियुक्त झाले होते. तेव्हां त्यांची विधान परिषदेतील अभ्यासपूर्ण भाषणे अत्यंत प्रभावी होती आणि त्यामुळे ती गाजली होती. तशीच आमदार म्हणून आपली कारकीर्दही त्यांनी गाजवली होती. त्यांच्या पुरस्कार, मानसन्मान, सत्कार अश्या अश्या गोष्टींची मोजदादच करणे शक्य होणार नाही. अश्या या धकाधकीच्या जीवनांतून कधी माडगुळला जाण्याचा योग आल्यास मात्र त्यांचे मन उल्हसीत होत असे. तेथे लेखन तर होतंच असे, पण ते निमित्त असे. ओढ असे ती आपल्या गांवच्या मातीची, तेथील आप्त गोत्रांना भेटण्याची संधी मिळत असे. आण्णांनी तेथील 'बामणाचा पत्रा' ही एक त्यांनी निर्माण केलेली साहीत्यिक वास्तू. आण्णांच्या 'खेड्यामधले घर कौलारू', या स्मृती जपणारे एक चैतन्यमय स्थळ! यामध्ये त्यांच्या लेखन समाधीसाठी चोख व्यवस्था ठेवलेली असे.
मात्र अश्या या ऋषीतुल्य माणसाच्या ठिकाणी जश्या महानतेच्या गोष्टी ठासून भरल्या होत्या, तश्याच कांही वैगुण्याच्या खुणा त्यांना चिकटून होत्या. तो म्हणजे त्यांचा संताप. ते शीघ्रकोपी होते. त्यांच्या लेखनात कोणी जर का बदल सुचवला तर तो त्यांना बिलकुल रुचत नसे. मग त्या माणसाला त्यांच्यापाशी थारा नसे. तीच गोष्ट त्यांच्या लेखनाच्या वेळची. त्यांच्या लेखन समाधीत जर का कोणी भंग केला, तर मग त्यांचा संताप उफाळून येत असे. त्याचा ज्वालामुखी बनत असे. त्यावेळी मग ते कोणाचाही मुलाहीजा ठेवत नसत. त्यांच्या स्वभावातील या वैगुण्यामुळे त्यांचे कित्येक निकटवर्तीय, कोणी कांही क्षणांपुरते तर कोणी कायमचे दुरावले. पण पुढे पंचवटीत त्यांना सुख समृद्धी व समाधानाची अयोध्या नगरीच लाभली होती. ज्वालामुखी शांत झाला होता. सदैव साथ देणाऱ्या प्रेमळ विद्याताई व मुलांच्या सहवासांत! वसंत सदा बहरलाच होता. पण हा वसंत केवळ घरापुरताच नव्हता, तर सर्वांसाठी होता. कुणीही यावं अन सुगंध भरभरून घेऊन जावा!
जश्या व्योमातुनी येती धारा,
जसा मोर फुलवी पिसारा,
तसे कंठातून येई गाणे,
असा गंधर्व पुन्हा न होणे.
यशवंतराव चव्हाण जेव्हां संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला चालले तेव्हां त्यांना आशीर्वाद पूर्वक त्यांनी काव्य केले.
उभा देश आहे तुझा पाठीराखा | तुझी कीर्त वाढो जशी चंद्र रेखा ||
एकदा विधान भवनात उत्तर प्रदेशातील एक शीघ्रकवी त्यांना शोधत आला. त्याने आल्याआल्या आण्णांना सांगीतले 'माझ्या या हिंदी ओळींचे भाषांतर करून दाखवा. त्या ओळी होत्या,
रातभर रहियो| सबेरे चले जईयो|
मिलने वालोंके साथ | क्या काम है जलने वालोंका|
अण्णांनी डोळे मिटून आपला अंगठा व तर्जनीने क्षणभर कपाळ दाबले, व त्यांनी पुढील ओळी म्हटल्या,
रातभर रहावा, झुंजूर का तुम्ही जावा,
शेजेशी समई लावु कशाला, जुळत्या जीवाशी,
जळशी कशाला.
आचार्य अत्रे यांच्या १३ जून १९६९ रोजी झालेल्या दुःखद निधनाच्या दुसऱ्या दिवशीच्या मराठाच्या अग्रलेखासाठी गदिमांकडून चार ओळीची काव्य श्रद्धांजली हवी होती. गदिमा त्यावेळी मुंबईला माहीम येथे रहात होते. रात्री १ वाजता त्यांच्याकडे सुधीर नांदगावकर व वसंत सोपारकर पोचले. गदिमा झोपले होते. त्यांना उठवून विनंती करण्यात आली. अण्णांनी क्षणभरच डोळे मिटून घेतले. दुसऱ्याच क्षणीच त्यांनी म्हटले, घ्या लिहून,
सर्वांगाने भोगी जीवन,
तरीही ज्याच्या उरी विरक्ती,
साधुत्वाचा गेला पूजक,
खचली, कलली, श्री शिवशक्ती
हे शीघ्रकाव्य करणारा दुसरा कवी मी अद्याप तरी पाहीला नाही. काव्य त्यांना करावं लागतंच नव्हतं तर ते आपसूकच त्यांच्या ओठातून बाहेर पडत असे. मधल्या काळात अण्णांवर दुःखाचे आघातही झाले. निकटवर्तीयांचा आकस्मीक मृत्यू, त्यातच स्वतःचा क्लेषकारक दुर्घर आजार, ज्याचा त्यांनी शेवटपर्यंत कोणालाही पत्ता लागू दिला नव्हता. त्याही परिस्थीतीत ते मृत्यूला भेटून त्याला 'हॅलो मिस्टर डेथ!' करून आले. माडगूळकरांचे संपूर्ण जीवन एक महाकाव्य होते. औंधात राजा भेटला, तोही नुसताच कलाप्रेमी नव्हे, तर तलवारीसोबत कुंचला चालवणारा कलाकार! त्यांच्या आधाराने सर्वच कला तेथे बहरत होत्या. एकाच वेळी भक्तीगीते, भावगीते, ओव्या, शृंगारीक लावण्या, देशभक्तीपद गीते लिहणारे आणि त्याच बरोबर विधान परीषदेत राजकारणावर अभ्यासपूर्ण भाषण करणारे माडगूळकर एक होते की अनेक याचा संभ्रम पूढच्या पिढीला पडेल एवढे विवीध प्रकारचे कार्य त्यांनी केले. मात्र त्यांच्या या समृद्ध जीवनांमध्ये त्यांना एक खन्त मात्र होती. ती म्हणजे चित्रपटासाठी केलेल्या लिखाणाला व काव्याला साहीत्यात 'साहीत्य' म्हणून मान्यता नव्हती. आणि ही खन्त त्यांनी १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या 'मराठी साहीत्य संमेलना'च्या अध्यक्ष पदावरून बोलताना व्यक्त केली होती. ‘साहित्यीक चित्रपट कथांना व गीतांना साहीत्य मानत नाहीत. रसीकांचे मन भारून त्या कथा पडद्यावर येतात. एखादी कथा जर का प्रकाशीत होण्यापूर्वी पडद्यावर आली तर ती साहीत्य का ठरू नये ? हा त्यांचा रास्त सवाल होता. चित्रपट कथा, गीते यांना साहित्याचा मान मिळत नाही. जेथे मानवी मनोभाव, हृदयाची स्पंदने, निसर्गाचे नेमके चित्रण साहीत्यिक शब्दाने करतो, नाटककारही तेच करतो, व ते साहीत्यात मोडते. तर चित्रपट कथा कां नाही?’ आण्णांच्या या मनोगताचा पाठपुरावा कोणत्याही साहीत्य संमेलनात केला गेला नाही, अन आण्णांनाही त्याची गरज नव्हती. कारण ते तर या साहित्यीकापेक्षा खूपच वरच्या पातळीवर पोचले होते. व या साहित्यीकांकडे त्याचे उत्तर नव्हते. पण अनेक साहित्यिकांचे साहीत्य कदाचित वाचले गेलेही नसेल, तेवढी गदिमांच्या साहित्याने रसिकांच्या मनावर मोहीनी घातली आहे.
अश्या या विवीध अंगानी युक्त असलेल्या व्यक्तिमत्वाला, महाराष्ट्राच्या वाल्मीकीला, सर्वांच्या गदिमांना १४ डिसेंबर १९७७ साली काळाने हिरावून नेले. ईशवराने त्यांना प्रतिभा बहाल केली होती त्याचा त्यांना अभिमान होता. म्हणूनच ते बोलून गेले,
‘ज्ञानियाचा वा तुक्याचा,
तोच माझा वंश आहे,
माझिया रक्तात थोडा,
ईश्वराचा अंश आहे'
आज गदिमा आपल्यात नाहीत, पण त्यांच्या पंचवटीतील अयोध्यात या राम सीतेचा वास अखंड आहे. त्यांची मुले तो वारसा पुढे चालवीत आहेत. आनंद 'गीत रामायणा'चा दरवळ आपल्याला लाभलेल्या मधूर आवाजात सर्वत्र पोचवीत आहे, तर कुमार शब्दांची पूजा मांडून शारदेच्या चरणी शब्द सुमनें अर्पण करीत आहे. शेवटी त्यांच्या लाडक्या आई-पप्पांचेच संस्कार त्यांच्यावर आहेत! गदिमा हे मराठी साहीत्याला पडलेले भव्य दीव्य स्वप्न आहे. आज गदिमांचे साहीत्य आणि काव्य शारदेच्या मंदीरात अमर आहे. प्रत्येक पिढीकढून ते वेदांप्रमाणे पुढच्या पिढीकडे समर्पीत केले जातं आहे. आमच्या बालपणापासून आमच्या मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या या वाल्मिकीच्या स्मृतीचरणी नतमस्तक व्हावे एवढीच आमची अपेक्षा आहे.
यापरीस भाग्य ते कोणते?
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
( या लेखांतील कांही संदर्भ भारत सरकारच्या फिल्म प्रभागने केलेल्या 'गदिमा' या माहीतीपटातून घेतले आहेत )










Comments
Post a Comment