प्रतिभावंत शिल्पकार : नारायण सोनावडेकर
प्राचीन काळात आपल्या भारतात शिल्पकला ही फार प्रगत झालेली होती. आपल्या प्राचीन मंदिरातील देवदेवतांच्या मुर्त्या त्याला साक्षीदार आहेत. पण ही शिल्पे युरोपीयन शिल्पकारांनी केलेल्या केवळ शरीर सौष्ठव दर्शवणाऱ्या नसून त्याकाळातही त्यांचे सुंदररीत्या केलेले सुलभीकरण, त्यातील लय, सौंदर्य या सर्वच बाबतीत भारतीय मूर्तीकला आघाडीवर होती. जेव्हां ब्रिटिश येथे आले तेंव्हां त्याचा बराच पगडा आपल्या चित्रकलेवर व शिल्पकलेवर पडला. पुढे चित्रकला, शिल्पकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट या संस्थेची स्थापना झाली. व त्यातून अनेक कलाकार बाहेर पडू लागले. तो काळ म्हणजे ब्रिटीश कलाकारांना गौरविण्याचा, पारितोषिके मिळण्याचा होता. पण जे.जे.च्याच एका विद्यार्थ्याने तो रिवाज मोडून ब्रिटिशांच्या अहंकाराला एक धक्काच दिला. विद्यार्थी दशेतच त्याने आपले 'मंदीर पथ गामिनी' हे मंदीरात पूजेचे तबक घेऊन जाणाऱ्या एका घरंदाज सौंदर्यवतीचे शिल्प बनवले, त्याने देशभरात कीर्ती मिळवली. हाच विद्यार्थी पुढे रावबहादूर गणपतराव म्हात्रे या नांवाने नावाजले गेले. पुढे अनेक महान शिल्पे बनवून म्हात्रे यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले. मुंबईतील असलेल्या अनेक ब्रिटिश शिल्पकारांच्या पुतळ्यामधे त्याच तोडीचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व गोपाळ कृष्ण गोखले यांचे संगमरवरी पुतळे बनवले व त्याच मालीकेत ते स्थानापन्न झाले. पुढे वि. पां. उर्फ नानासाहेब करमरकर यांनी त्यांचा वारसा पुढे चालवीला. त्यानंतर त्यांचा मागोवा घेत वाटचाल करणाऱ्या शिल्पकारांच्या पुढच्या पिढीत देखील अनेक नामवंत शिल्पकार तयार झाले. त्यातील अग्रस्थानी असलेले एक नांव म्हणजे शिल्पकार नारायण लक्ष्मण सोनावडेकर.
नारायण लक्ष्मण सोनावडेकरांचा जन्म २१ जानेवारी १९३३ साली निसर्गरम्य अशा कोकणातील आकेरी गावातील कलाकाराच्या घराण्यांत झाला. त्यांचे आजोबा व वडील दोघेही शिल्पकार. त्यामुळे नारायणकडे हा पिढीजात वारसा चालून आला यात नवल नव्हते. त्यांची ओढ होती ती चित्रे काढण्याची. पेंटींग करण्याची. त्या ओढीमुळे ते मुंबईला सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधे दाखल झाले ते पेंटिंगचा अभ्यास करण्यासाठी. नंतर कांही काळ त्यांनी कमर्शिअल विभागातही अभ्यास केला. पण ते पुढे रमले ते शिल्पकला विभागात. त्यामागे त्यांना प्रेरणा होती ती शिल्पकार नानासाहेब कमरकरांची तसेंच स्कूल ऑफ आर्टमधील 'कला व हस्त व्यवसाय' विभागाचे प्रमुख प्रा. नागेश साब्बणवारांची. सांब्बणवारांना ते गुरुस्थानी मानत असत. 'आपण कोणाकडेच तसे शिकलो नाही. पण गुरु म्हणून जर कोणाचे मार्गदर्शन लाभले असेल तर सांब्बणवार मास्तरांचे!' असे ते कृतज्ञतेने सांगत. याच साब्बणवार मास्तरांनी नारायणरावांना त्यांच्या शिल्पि घराण्याची महत्ता सांगून त्याना शिल्पकलेकडे वळण्यास सांगीतले होते.
नारायणरावांच्या शैक्षणिक कारकिर्दीतच त्यांनी बक्षीसे मिळवण्यास सुरुवात केली. १९५८ साली ते शिल्पकलेची अंतीम परीक्षा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. व त्यांना त्या काळातील सुवर्ण पदक तसेच संस्थेची फेलोशिप मिळाली. १९५९ पासून नारायणरावांनी आपली व्यावसायिक शिल्पकलेची वाटचाल सुरु केली. त्यावेळच्या मुंबई सरकारच्या राज्य कला प्रदर्शनात त्यांच्या शिल्पकृतीला प्रथम पारीतोषिक मिळाले होते. तसेच 'बॉंबे आर्ट सोसायटी'च्या प्रदर्शनांत राज्यपालांचे खास पारीतोषिक देखील त्यांना प्राप्त झाले. १९६२ साली त्यांना जे.जे.च्या शिल्पकला विभागात अधिव्याख्याता म्हणून नियुक्त केले गेले. आणि विद्यार्थ्यांना एक चिंतनशील कलासक्त असे अध्यापक मिळाले. जे.जे.मध्ये शिकवत असतांना सोनावडेकर विद्यार्थ्यांच्या कला जाणीवा विकसीत करण्याचा प्रयत्न करित असत.
माझा सोनावडेकरांशी संबंध आला तो १९६९-७० साली. कला संचालक होते माधवराव सातवळेकर. जागतीक कीर्तीचे कलाकार म्हणून ते ज्ञात होतेच. त्याशिवाय मंत्रालयातही त्यांना मान होता. त्यावेळी महीला तसेच पुरुष खेळाडूंना एक मानाचा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नांवे देण्यांत यावा अशी योजना महाराष्ट्र शासनाने ठरवली. मंत्रालयात क्रीडा खात्याच्या बैठका झाल्या. भरघोस रकमेसोबत त्याच तोलामोलाचे एक मानचिन्ह देण्याचेही ठरले. आणि सहाजीकच त्या मानचिन्हासाठी राज्याच्या कलासंचालयाचे नांव समोर आले. आणि हे काम उत्कृष्ट तऱ्हेने पार पाडणारा म्हणून विश्वास असलेल्या सोनावडेकरांना त्यांचे संकल्पन करण्यासाठी सातवळेकरांनी दिले. हा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नांवे देण्यांत येतं असल्याने महाराज ज्या पद्धतीने नजराणा देत असत, तीच कल्पना सोनावडेकरांनी शिल्परूपात बांधली. नजराण्याचे तबक, त्यामध्ये शेला आणि जिरेटोप व त्यावर आडवी ठेवलेली तलवार असे ते देखणे शिल्प मानचिन्ह म्हणून तयार झाले. त्याच्या चौथऱ्यावरील महाराष्ट्र राज्याचे लामणदिव्याचे सील व त्यावरील अक्षरांकन सोनावडेकरांनी मला बनविण्यास सांगीतले. हे मानचिन्ह त्यावेळचे मंत्री व त्यांचे सचिव यांनी पाहीले तेव्हां त्यांना अत्यानंद झाला. मात्र त्यावेळेपासून मी सोनावडेकरांच्या सान्नीध्यात आलो ते अधिकाधिच जवळ येत गेलो. आणि त्यांची अनेक कामे पहाण्याची संधी मला मिळाली
यानंतरचे नारायणरावांचे आणखी एक महत्वाचे काम म्हणजे कन्याकुमारी येथील 'स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉक' वरील स्वामी विवेकानंद यांचे पूर्णाकृती शिल्प. कन्याकुमारी येथील समुद्र किनाऱ्याजवळील एका खडकावर स्वामी विवेकानंद ध्यान धारणेसाठी बसले होते. त्याच्या स्मृती प्रीत्यर्थ कन्याकुमारी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विवेकानंद केंद्राच्या वतीने सदर खडकावर स्वामी विवेकानंदांचे पूर्णाकृती स्मारक शिल्प उभारण्याचे ठरवले. त्यासाठी आधार होता तो कलामहर्षी एस.एम. पंडीत यांनी केले स्वामी विवेकानंदांचे पूर्णाकृती पेंटींग. आणि त्यासाठी तसाच तोलामोलाचा शिल्पकार शोधण्याचे काम समितीने पंडीतजींकडे सोपवीले. पंडीतजींनी शोध घेण्यास सुरुवात केली. पंडीतजी त्या बाबतीत आपले मित्र साब्बणवार यांना भेटले. दोघेही एकाच गांवचे, एकत्र शिकलेले, आणि आपापल्या कलेत दोघेही दिग्गज! त्यामुळे साब्बाणवारांच्या शब्दावर पंडीतजींचा पूर्ण विश्वास होता. आणि एका क्षणांत साब्बणवार म्हणाले, नारायण सोनावडेकर! आणि त्यांचे काम पाहील्यावर पंडीतजींची खात्री पटली. पंडीतजीना एक दैवी शक्ती होती, जिच्या योगाने त्यांना पुढे साकारणारी कलाकृती जाणवत असे. त्यांनी स्वतः केलेले स्वामी विवेकानंदांचे तैलचित्रही असेच कालीमातेची उपासना करून तिच्या मार्गदर्शनाने त्यांनी साकारले होते. सोनाडेकरांनी स्वामीजींना पूर्ण न्याय देणारे स्मारक शिल्प बनवीले. यात त्यांनी स्वामीजींचे शांत, सात्विक पण करारी भावाविष्कार मोठ्या कौशल्याने आवीष्कृत केले. सदर शिल्प त्यांनी स्वतःची जागा लहान असल्याने एक चित्रपट कलावंत पी. जयराज यांच्या बंगल्यावर बनवले होते. या शिल्पाच्या अनावरण सोहोळ्यांत शिल्प पाहून आनंदीत झालेल्या तत्कालीन राष्ट्रपती मा. व्ही.व्ही.गिरी यांनी मिठी मारून सोनावडेकरांचे कौतुक केले होते.
या स्वामी विवेकानंदांच्या शिल्पामुळे सोनावडेकर एकदम प्रकाश झोतात आले. अनेक पुरस्कारही त्यांनी मिळवले. मात्र याच काळात कांही कटू प्रसंगही त्यांच्या वाट्याला आले.१९७६ साली बाबुराव सडवेलकर हे राज्याचे नवे कलासंचालक म्हणून नियुक्त झाले. एक उत्तम पेंटर, कला शिक्षण तज्ञ्, कला समीक्षक अशी त्यांची ख्याती होती. आणि दुसरे म्हणजे ते जे.जे.मधेच प्राध्यापक असल्याने या सर्व गुणी कलाकार शिक्षकांची त्यांना कदर होती. पण कला संचालक पदावर आल्यावर कोठेतरी काहीतरी बिनसले. पळशीकर निवृत्त झाल्यामुळे स्कूल ऑफ आर्टची अधिष्ठातांची जागा रिक्तच होती. त्याचाही पदभार बाबुरावाना मिळाला. आणि पुढे त्यांचेच जवळ असलेले मित्र काहींना कांही कारणामुळे दूर गेले. त्यातही सोनावडेकर हे स्वभावाने अत्यन्त स्पष्टवक्ते व निर्भीड स्वभावाचे होते. आपली मते ते परखडपणे मांडत असत. आत बाहेर असे त्यांच्याकडे काहींचं नसे. पण याची परिणीती पुढे १९७७ साली सोनावडेकरांनी जे.जे.मधून आपल्या नोकरीचा राजीनामा देण्यात झाली.
आणि दुसऱ्या दिवशीच 'टाइम्स ऑफ इंडीया'च्या अंकात पहील्या पानावर ‘Sonawadekar quits JJ’ अशी त्यांच्या फोटोसह ठळक बातमी आली. जे.जे.स्कूल ऑफ आर्टने एक प्रतिभाशाली कलावंत गमावला.
सोनावडेकरांच्या कामातील कौश्यल्याच्या जाणीवेने तसेच त्यांच्या शिल्प निर्मितीसाठी अपुऱ्या असलेल्या जागेची अडचण जाणून महाराष्ट्र शासनाने त्यांना खार येथे स्टुडीओसाठी जागा दिली. त्याजागेवर कोणतेही मोठे शिल्प आकार घेवू शकेल असा मोठा भव्य असा स्टुडीओ सोनावडेकरांनी बांधला. त्यावरतीच स्वतःची रहाती जागा बांधायचा त्यांचा विचार होता. थोडे बांधकाम झालेही होते. एकदा गप्पा मारता मारता त्यांच्या तोंडून शब्द निघाले, ' पण कशासाठी वाढवायचा हा व्याप? आज मुलगा आर्कीटेक्चर मधे गुणवत्तेत येऊन अमेरीकेला गेला. मुलगीही लग्न होऊन गेली. आम्हां दोघा नवरा बायकोसाठी एवढी जागा काय करायची? म्हणून सध्या ते स्थगीत केले आहे'.
विधान भवनासमोर महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवायचे जेव्हां ठरले, तेव्हां त्या समितीने सोनावडेकरांना आमंत्रीत केले. शासकीय नियमानुसार कांही गोष्टी ह्या कराव्या लागतात. सार्वजनीक ठिकाणी जेव्हां एखादे शिल्प उभारण्यात येते, तेव्हां त्यातील व्यक्तीची ओळख, सौंदर्यशास्त्र आदी बाबी सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागप्रमुख यांच्याकडून तपासून त्यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. पण स्वतःच्या कलेची क्षमता जाणून असणाऱ्या सोनावडेकरांनी त्यांना अट घातली की कोणीही समज नसलेल्या व्यक्तीने माझ्या शिल्पाचे परीक्षण करता कामा नये. सरकारने तेही मान्य केले. व महात्मा फुले यांचे एक सुंदरसे शिल्प विधान भवनासमोर साकारले. मात्र सोनावडेकरांच्या दृष्टीने ते शिल्प अद्यापही अपूर्ण होते. कारण त्याच्या चौथऱ्यावर महात्मा फुले यांच्या जीवनावरील काही खास प्रसंग त्यांनी उठाव शिल्पात साकारले होते. पण निधीअभावी त्यावेळी ते राहीले ते राहीलेच! पुढे कित्येक वेळा आम्ही त्यांना सांगीतले की समितीशी बोलून आपण ते पूर्ण का करीत नाही? विशेषतः छगन भुजबळ हे बांधकाम मंत्री असतांना त्यांच्याशी बोलू शकता. पण स्वतःच्या कामासाठी कोठे जाणारे सोनावडेकर नव्हतेच! मात्र विधान भवनासमोरील सर्वच शिल्पामध्ये उठून दिसणारे महात्मा फुलेंचे जे शिल्प उभे आहे, त्यात त्या व्यक्तीचे मोठेपण, रांगडेपणा, कणखरपणा हे सर्वच बाबी सामावल्या आहेत. जे पहाताच आपलीही छाती अभिमानाने स्फुरण पावते.
मधल्या काळात मी जेव्हां जे.जे. उपयोजीत कला महाविद्यालयाचा अधिष्ठाता होतो त्याकाळी मी रहात असे त्या डीन बनल्यामध्ये ब्रिटीश कवी व नोबेल पारितोषीक विजेता रुडयार्ड किपलींग ह्याचा जन्म झाला होता. त्याचे वडील लॉकवूड किपलींग हे जे.जे.स्कूलचे वास्तू विशारद शिल्पकार होते. अनेक ब्रिटीश नागरीक या रुडयार्डच्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी येत असत. पण संस्थेतील कोणालाच बहूदा या रुडयार्ड बद्दल माहीती नव्हती. असेच एकदा माझे मीत्र अरविंद नागवेकर यांच्याशी बोलत असताना आमच्या मनांत विचार आला, की ब्रिटीशांच्या कांळात बाहेरील व्हरांड्यात जी रुडयार्डच्या जन्माची प्लाक बसवली आहे, त्याच्या खाली रुडयार्डचा जर अर्ध पुतळा बसवला तर या बंगल्याला महत्व येईल. आता हा पुतळा बनवायचा तर तो सोनावडेकरांनीच! ही आमची भावना पक्की होती. पण त्यांच्या व्यावसायीक कामात हे काम कसे होईल याची खात्री आम्हांला होईना. पण आम्ही त्यांच्या स्टुडीओत गेलो. आमचा हेतू सांगीतल्यावर ते मला म्हणाले, अरे, तुझ्यासाठी आणि तुमच्या आर्टसकूलसाठी मी कधीही नाही म्हणणार नाही. माझ्याही त्या संस्था आहेत. पण त्या आधी एक गोष्ट करा. तो बंगला सरकारी आहे. तेथे काहीही करायचे असले तर प्रथम शासनाची परवानगी हवी. ती आधी घ्या. नंतर काही शुक्लकाष्ट मागे लागायला नको. दुसरे म्हणजे मला रुडयार्डचे कांही फोटो लागतील. समोरून, बाजुने असे. आणि महत्वाचे म्हणजे या पुतळयाला जो चौथरा कराल त्याचे डिझाईन प्रथम मला दाखवा. नाहीतर पी डब्ल्यू डी कडून काहीतरी करून घ्याल तर मी पुतळा देणार नाही. आणि त्यांच्या सर्व अटी मान्य करूनच आम्ही निघालो. निघतांना हळूच त्यांच्या कानावर घातले, सर तुमचे शिल्प बनविण्याचे मूल्य आम्हांला माहीत आहे. पण आम्हांला तेव्हढे श्यक्य होणार नाही. पण आपण जे ब्रॉन्झ धातू त्यासाठी वापरणार आहेत त्याची किंमत आम्ही देऊ. त्यांनी एकवार रोखून माझ्याकडे पाहीले व म्हणाले, आता निघ. क्ले मॉडेल झाले की पहायला बोलावतो. आम्ही लंडनच्या 'किपलींग'सोसायटी'शी पत्र व्यवहार करून फोटो मागवले.
आणि एक दिवस त्यांचा फ़ोन आला, राजा मॉडेल तयार आहे. उद्या पहायला तू आणि नागवेकर या! आणि उद्या जेवायलाच जाऊ आपण. दुसरे दिवशी आम्ही त्यांच्या स्टुडीओत गेलो. क्ले मॉडेल तयार होते. हुबेहूब रुडयार्ड साकारला होता. तेथून मग् आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तेथे बऱ्याच गप्पा झाल्या. आणि एक दिवस सरांचा निरोप आला, बस्ट तयार आहे. घेऊन जायला या. आणि या अर्ध पुतळ्याचे अनावरण आम्ही सोनावडेकर यांनीच सुचविल्या प्रमाने सार जमशेटजी जीजीभॉय त्यांचे पणतू रुस्तम जीजीभॉय यांच्या शुभ हस्ते करण्याचे ठरवले. आणि ते वर्ष होते सहस्त्रक उगवण्याचे, त्यामुळे तोच मुहूर्त आम्ही साधायचा ठरवले. सरांनी सांगीतल्याप्रमांणे पुतळ्याचा चौथरा माझे सहकारी प्रा. नरेंद्र विचारे यांनी विनामूल्य बनवून दिला होता. व त्या सायंकाळी मोठा समारंभ करून आम्ही त्या रुडयार्डच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्या सायंकाळी आम्ही सोनावडेकर पती पत्नीचा आमच्या संस्थेतर्फे सत्कार करून त्यांना मानचिन्ह दिले. या समारंभाची सी डी मी लंडनला किपलिंग सोसायटीला पाठवली व त्यांनी हा समारंभ आपल्या वेब साईटवर टाकुन आमचे तसेच शिल्पकार सोनावडेकरांचे खास आभार मानले. आम्ही जाताना सोनावडेकरांना त्या पुतळ्याचे मूल्य म्हणून छोटीशी रक्कम देऊ केली. तेथेच त्यांनी एक कागद मागवून घेतला व ती रक्कम आमच्या विद्यार्थी संसदेला दिल्याचे लिहून देऊन पुन्हां आमच्या हवाली केली. असा उमदार कलावंत मी दुसरा पाहीला नाही.
एकदा असेच सायंकाळी सोनवडेकर सर माझ्याकडे आले. थोडेसे गंभीर दिसत होते. आणि त्यांनी आपल्या मनातील कल्पना मला सांगण्यास सुरुवात केली. मला म्हणाले, आज मी हक्काने तुला कांही काम सांगायला आलो आहे. तू उपयोजीत कलासंस्थेत अनेक उपक्रम केलेस. यासाठीच तुला सांगतो आहे. स्कूल ऑफ आर्टने माझ्या गुरूची-साबण्णवार सरांची कांहीच कदर केली नाही. त्यांनी एवढे विद्यार्थी घडवले, अद्वितीय अशी व्यावसायीक कामे केली. त्यांच्या तोडीची धातुकाम करणारी आज दुसरी व्यक्ती नाही. पण जे.जे.स्कुलने ना कधी त्यांना गौरवले, ना त्यांच्या कलेची कधी कदर केली. माझ्या हयातीत मला सरांचा मोठ्या प्रमाणात सत्कार करून त्यांचा गौरव करायचा आहे. पण तो स्कूल ऑफ आर्ट मध्ये नाही तर या उपयोजीत कला संस्थेत. आणि याची जबाबदारी तू घ्यायची. यातून त्यांची स्कूल ॲाफ आर्ट विंषयीची कटूता दिसून येत होती. मी त्यांना म्हटले, अहो सर, तुम्ही दोघेही मला गुरूच्या ठिकाणी आहात. तुम्ही फक्त हुकूम करा. आमची संस्था तुमच्या सारख्या कलाकारांसाठी सदैव तयार आहे. ते म्हणाले, कितीही पैसे लागले तरी हरकत नाही. त्याचे एक छानसे सोव्हीनीयर देखील काढायला हवे. म्हणजे त्यांचे एक रेकॉर्ड रहाते. मी त्यांना सांगीतले की मी स्वतः ते डिझाईन करेन. आणि मी, नरेंद्र विचारे व त्रिफळे यांनी एक सुंदरसे सोव्हीनीयर बनवले. आता राहीले समारंभाचे अध्यक्ष. त्यासाठी सोनावडेकरांनी ख्यातनाम चित्रकार श्री. माधवराव सातवळेकर ठरवलेच होते. शिवाय एक प्रमुख पाहुण्याची गरज होती. त्यासाठी मी आमचे माजी शिक्षण सचीव श्री. सदाशिवराव तिनईकर यांचे नांव सुचवले. एकतर ते स्वतःही चित्रकार होते. त्यांचाही स्वभाव या दोघांसारखाच परखड पणाचा होता. शिवाय तेही मूळ बेळगांवचे असल्यामुळे साबण्णवार मास्तरांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. दिवस ठरला. साब्बण्णवार मास्तरांनी बनवलेल्या अनेक कलात्मक वस्तू आम्ही संस्थेत आणून त्यांचे प्रदर्शन मांडले होते. अनेक कलारसिकांना आमंत्रण दिले होते. आणि अखेर तो समारंभ सोनावडेकरांना जसा हवा होता तसा मोठ्या थाटामाटात पार पडला. साबण्णवार सर भारावून गेले होते. एवढ्यात सोनावडेकरांनी मला बाहेर बोलावले. व त्यांनी एक रेशमी थैली काढली. मला म्हणाले, हे पंचवीस हजार रुपये मला गुरूंना द्यायचे आहेत? हरकत नाही ना! मी म्हटले हीच खरी संधी आहे तुमच्या गुरूंना गुरूदक्षिणा द्यायची. यापेक्षा आणखी मंगल प्रसंग कोणता असू शकतो? आणि सातवळेकरांच्या हस्ते ती थैली त्यांना देण्यांत आली. शिवाय आलेल्या नामवंतांना आठवण म्हणून देण्यासाठी सत्कार समितीतर्फे साबण्णवार सरांच्या व्याघ्रमुखावरून लहान आकारातील व्याघ्रमुख तयार करून घेतली होती. तीही सर्वाना देण्यात आली. त्यादिवशी सोनावडेकरांच्या चेहऱ्यावर एक तृप्ततेचे समाधान मी पाहीले, त्यावरून त्यांनी माझ्यावर सोपवलेले काम मी यथोचीत पार पाडल्याची जाणीव मला झाली.
सोनावडेकरांनी अनेक स्मारकशिल्पे केली, असंख्य व्यक्तींशिल्पे साकारली. प्रत्येक शिल्पात त्यांनी जीव ओतून काम केले आहे. अनेक मानसन्मान त्यांच्या वाट्याला आले. महाराष्ट्र राज्याचा कला सन्मान तसेच त्यावेळचा मानाचा समजला जाणारा 'बॉंबे आर्ट सोसायटी'चा प्रतीष्ठेचा गव्हर्नर पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. अगदी भूतपूर्व राष्ट्रपती गिरी ते पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रशंसेला ते पात्र ठरले होते. नागपूरच्या 'ऑल इंडीया रिपोर्टर्स' या कायदेविषयक पुस्तके छापणाऱ्या संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब चितळे यांच्या पूर्णाकृती शिल्पाने सोनावडेकरांनी प्रथम व्यवसायीक क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर त्या क्षेत्रातील ते दिग्गज झाले. स्वामी विवेकानंदांच्या शिल्पानें ते जागतीक कीर्तीचे ठरले. एक्दा ख्यातनाम शिल्पकार नानासाहेब करमरकर यांनी सोनावडेकराकडे अशा इच्छा व्यक्त केली की, त्यांना लोकनेते एस.एम. जोशी त्यांचे व्यक्तींशिल्प बनवण्याची इच्छा होती. पण ती अपूर्णच राहीली. तरी तू ती पूर्ण करावीस! आणि त्याप्रमाणे एस.एम.ना ओळखणाऱ्या व्यक्तीकडून त्यांची वेळ मागून घेऊन सोनावडेकरांनी एस.एम.जोशीं यांचे व्यक्तीशिल्प बनवले. व एक प्रकारें आपण ज्यांना प्रेरणा व गुरु मानतो, त्या नानासाहेब करमरकरांना त्यांची अपूर्ण इच्छा पूर्ण करून एक प्रकारे गुरूदक्षिणा दिली. पण हे होत असतानाच त्यांना कर्करोगाने ग्रासले. एकीकडे देवाने त्यांच्या हातात इतकी कला देऊन त्यांना प्रतिभावान बनवले, तर दुसरीकडे त्यांच्या आयुष्यावर अश्या तऱ्हेने घाला घातला. पण हे त्यांनी कोणालाच सांगीतले नाही. अपवाद फक्त साबण्णवार सरांचा. त्यांच्याकडून आम्हांला त्यांच्या तब्येतीच्या गोष्टी कळत. पण तरीही त्यांचे काम कधी थांबले नाही. त्यांचा भक्त व शिष्य असलेला दाजी त्यांच्या सोबत काम करीत असे.
कांही दिवसांनी जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली व ती यशस्वीही झाली. पण पुढे रोगाने आपला प्रादुर्भाव वाढवण्यास प्रारंभ केला. त्यांचे चाहते, मित्रमंडळी अत्यंत काळजीत होती.साबण्णवार मास्तर सतत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करुन जवळच्या मित्रमंडळींना कळवीत असत. मात्र सोनावडेकरांना फ़ोन केला तर ते स्वतःच आपल्या क्षीण आवाजात बोलत असत. मध्यन्तरी अम्ही दोघांनी त्यांच्या स्टुडीओत गप्पा मारण्यासाठी व त्यांच्या कांही आठवणी ध्वनीमुद्रित करण्यासाठी बसण्याचे ठरवले. त्यावेळी मी नवशक्तीमध्ये कलाविषयक सदर लिहीत असे. व सोनावडेकरांवर मला लेख लिहायचा होता. आमचा बसण्याचा दिवसही ठरला. पण नेमके त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांना एका समितीत घेवून बैठकीस आमंत्रीत केले. माझी खेप फुकट जाऊ नये म्हणुन आदल्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे येऊन त्यांनी हे मला सांगीतले. नंतर ते बऱ्याच दिवसांकरिता बाहेरगांवी गेल्याचे कळाले. त्यानंतर त्यांचा आजार बळावताच गेला. एप्रील महीन्यात मी गोवा विद्यापीठाच्या कामासाठी गोव्याला गेलों होतो. नेमके मी माझें मित्र राजू शिंदे यांच्यासोबत फार्माकुडी येथे आलो होतो. ९ एप्रील २००२ ची तारीख होती ती. आणि माझ्या पत्नीचा फोन आला, 'सोनावडेकर गेले'. समोरील डोंगरावर किल्ल्याची तटबंदी दिसत होती. त्यामध्ये आपल्या घोड्यावरून दौडत जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सोनावडेकरांनी केलेले भव्य असे शिल्प लक्ष वेधून घेत होते. भरल्या डोळ्यांनी मी ते पहात होतो. शब्द गोठले होते. कधीतरी ही दुःखद बातमी येणार होती याची जाणीव होतीच! तरीही एक वेडी आशा मनात होती हा माणूस अजून कांही वर्षे अशीच सुंदर शिल्पे निर्माण करत राहू दे! आणि मनोमनी हीच इच्छा आम्ही व्यक्त करीत असू.
त्यांच्या भक्कम हाताची थाप आमच्या पाठीवर पडत असे, त्याला आम्ही कायमचे मुकलो!
-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष









Comments
Post a Comment