कला शिक्षकाची प्रेरणा: हरीभाऊ हणमंते.
ती १९३५ सालची गोष्ट होती. त्यावेळी जन्माला आलेला सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टमधील 'कमर्शिअल आर्ट' अथवा आताचा उपयोजीत कला विभाग दहा एक वर्षातच भरभराटीला आला होता. केवळ पैसा मिळवणारी व्यापारी चित्रकला न रहाता तिचे स्वरूप विचार प्रसारण म्हणून होऊ लागले होते. त्या वेळचे सर्वच शिक्षक ही कला शिकवतांना बहुदा पाश्चात मासीके अथवा वृत्तपत्रे यांचा आधार घेत असत. त्या आधारावर जाहीरातकलेच्या स्वाध्यायीका आखत असत. पण त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे घटकांची मांडणी करणे यावरच विशेष भर दिला जात असे. ड्रॉईंग हा विषय देखील पारंपारीक पद्धतीने शिकवला जाई. अश्या वेळी तेथे चौकस नजरेने वावरणाऱ्या एका शिक्षकाला या गोष्टी खटकू लागल्या. व त्यावर विचारपूर्वक ध्यान देऊन त्यांनी कांही अभ्यासपूर्ण स्वाध्यायीका आखण्यास प्रारंभ केला. सुरुवातीला काहींनी याला विरोध दर्शवीला, पण शेवटी विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रतीसाद व परीणाम पाहून त्या स्वाध्यायीका किती योग्य होत्या याची जाणीव सर्वांनाच आली. आणि हे क्रांतीकारी विचारांचे शिक्षक म्हणजे त्याच सर जे.जे. उपयोजीत कला संस्थेचे पुढे अधिष्ठातापद भूषविलेले
प्रा. हरीभाऊ हणमंते.
२५ डिसेंबर १९२५ रोजी रायगड जिल्ह्यातील हशिवरे या गांवी जन्मलेल्या हरीभाऊंचे शालेय शिक्षण मुंबईला झाले. ते दोनच वर्षांचे असतांना त्यांचे वडील निवर्तल्यामुळे त्यांना मेहुण्यांकडे रहावे लागले. ड्रॉईंग या विषयाची लहानपणापासूनच आवड, तसेंच हातही चांगला. त्यामुळे शिक्षकांची मर्जी. त्याकाळी शाळेच्या ग्रेड परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवीले की, प्रत्येक विद्यार्थ्यामागे चित्रकला शिक्षकांना कांही पैसे मिळत. त्यामुळे चित्रकलेत गती असलेल्या ठरावीक विद्यार्थ्यांना शिक्षक ड्रॅाईंग ग्रेड परीक्षेला बसवीत. हणमंते जेंव्हा या परीक्षेला बसले त्यावेळी ते गांवाहून प्रथमच मुंबईला आले होते. एलफिन्स्टन हायस्कुलमध्ये परीक्षेचे केंद्र होते. परीक्षा आटोपल्यानंतर त्यांनी मॅजेस्टीकला पहीला सिनेमा पाहीला. व वेलणकरांकडे पहीलाच बटाटेवडा खाऊन त्यांनी जीवाची मुंबई केली. पुढे मुंबईला ते अमरसी हायस्कुलमध्ये शिक्षण घेत असतांना त्यावेळी तेथील चित्रकला शिक्षक होते मावानी. हरीभाऊंचे ड्रॉईंग पाहून त्यांनी वर्गातील इतर मुलांनाही अधून मधून त्यांना शिकवायला लावले. शालेय प्रदर्शनात हरीभाऊंची चित्रे लागू लागली. त्यावेळी वार्षीक परीक्षेत शिक्षकांनी त्यांना चित्रकला विषयात पन्नासपैकी एकावन्न गूण दिले.इतर शिक्षकांनी यांवर हरकत घेतली. तेव्हां आपण दिलेले गूण योग्यच आहेत अशी भूमिका चित्रकला शिक्षकांनी घेतली व शेवटी प्रिन्सिपॉल भट यांनीही ते मान्य केले.
जे.जे. च्या उपयोजीत कला विभागांत शिक्षण घेण्यास हणमंते १९४६ साली दाखल झाले. त्यावेळी तेथे देव, अभ्यंकर, प्रभाशंकर कवडी, महाजन असे शिक्षक शिकवीत असत. प्रत्येक शिक्षकाचे एक स्वतंत्र असे वैशिष्ट्य होते. विद्यार्थी दशेतही त्यावेळी हणमंते ड्रॉईंग हा विषय वेगवेगळी तंत्रे वापरून करित असत.अंधेरीला रहात असतांना तेथे समविचारी अश्या त्यांच्या कांही मित्रांचा एक ग्रूप होता. त्यामध्ये दत्ता कर्णिक, भालू नाबर, दत्ता पाटील हे लोक होते. या सर्वांनी 'अमरज्योत मंडळ' स्थापन करून त्याद्वारे चित्रकला, साहीत्य, नाट्य, अश्या क्षेत्रात कार्य सुरु केले. यामध्ये कधी आचार्य अत्रे, तर कधी अनंत काणेकर या लोकांनाही आमंत्रीत केले जात असे. नाट्यक्षेत्राच्या संदर्भात दामू केंकरे व नंदकुमार रावते हे मार्गदर्शन करीत. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत असे.
शिक्षण घेत असतांनाच अर्थार्जनासाठी हरीभाऊनी रेल्वेमध्ये ट्रेसर म्हणून नोकरीही केली. परीस्थितीमुळे अर्थार्जन आवश्यक होते. पुढे त्यांचे उच्च कलाशिक्षण पूर्ण झाल्यावर 'मॉडेल आर्ट' या या कला संस्थेत हरीभाऊंनी काम करण्यास आरंभ केला. यावेळी त्यांच्या सान्निघ्यात आले दत्ता परुळेकर, एम.एस.जोशी, ठोसर आदी लोक. विद्यार्थ्यांच्या उच्चकला शिकण्यासाठी जे.जे. व्यतीरीक्त अन्य ठिकाणी कलाशिक्षणाची सोय नव्हती. तेव्हां या मंडळींनी ' बॉंबे सबर्बन सोसायटी' द्वारा उपनगरांत एक कला महाविद्यालय सुरु करण्याचे ठरवीले. वांद्र्याच्या 'नॅशनल लायब्ररी' च्या वर काका पाटकरांनी जागा दिली, व तेथे वर्ग सुरु केले. पेंटींग विभाग दत्ता परुळेकर पहात, दाभोळकर हे आर्किटेक्चर तर हणमंते कमर्शिअल विभाग घेत असत. पहील्या वर्षी त्यांच्याकडे डिमेलो नावाचा एकमेव विद्यार्थी होता. पुढे ही संस्था वाढली, नांवारूपाला आली व तिची स्वतंत्र इमारतही झाली.आणि या काही ध्येयवेड्या माणसांच्या प्रयत्नातून त्यावेळचे ' बांद्रा स्कुल ऑफ आर्ट' निर्माण झाले. जे.जे.च्या खालोखाल त्याने नांव कमावले. आज 'रहेजा कॉलेज ऑफ आर्ट' म्हणून ती संस्था ओळखली जाते.
या 'बांद्रा स्कुल ऑफ आर्ट'मध्ये शिकवत असताना हणमंतेना परुळेकरांच्या ज्ञानाचा बराच लाभ झाला. विशेषतः मुलांना त्यांचे मानसशास्त्र समजावून घेऊन नाउमेद न करता कसे शिकवायचे याची हातोटी परुळेकराना चांगलीच होती. वर्गामध्ये पाठ घेण्यापूर्वी सर्वजण एकत्र बसून त्यावर चर्चा करीत, त्याचा उद्देश ठरवीत असत. दर शनीवार, रवीवार लहान मुलांना बाल चित्रकला शिकवीत असत. येथूनच हणमंतेंच्या कला शिक्षण क्षेत्राची बीजे रोवली गेली. पुढील आयुष्यात त्याचा त्यांना फायदा नक्कीच झाला.
१९५८ ला जे.जे. उपयोजीत कला संस्थेत हणमंते अध्यापक म्हणून रुजू झाले. कला शिक्षणासाठी झटणाऱ्या हणमंते यांना ती एक नामी संधी होती. याच दरम्यान अधिष्ठाता दादा आडारकर यांनी 'व्हिजिटिंग लेक्चरर्स' ही योजना प्रथमच जे.जे. मध्ये आणली. नामांकीत चित्रकार, जाहीरात एजन्सी मधील डिझाइनर्स, मुद्रण व्यवसायातील निपुण अश्या लोकांना येथे आणण्याचा त्यांचा हेतू होता. ज्यायोगे येथील विद्यार्थ्यांना त्यांचा कामाचा लाभ व्हावा, विद्यार्थी सर्वांगाने परीपूर्ण व्हावेत ही त्यामागे प्रेरणा होती. आणि ही जबाबदारी आडारकरांनी हणमंते यांच्यावर सोपवली. येथे हणमंतेनी पी.एन. सर्मा, दासगुप्ता, वर्मा, टी.एस.मणी, अश्या त्याकाळातील नामवंत अश्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांना त्यांच्या भेटीचे महत्व पटवून दिले. याचबरोबर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ज्या पारंपारिक प्रकारच्या स्वाध्यायीका चालत त्यांना छेद देऊन हणमंते यांनी डिझाईन सुधारण्यासाठी बेसीक डिझाईनचा वापर विद्यार्थ्यांकडून करून घेण्यास आरंभ केला. ड्रॉईंगसाठी प्रथम गेस्चर व काउन्टर अश्या प्रकारे सराव करण्यास विद्यार्थ्यांना लावले. त्यालाही प्रथम विरोधच झाला. पण याच काळात प्रा. वसंतराव आंबेरकर हे बडोद्यावरून येथे आले होते. एक नामवंत कला शिक्षण तज्ञ असा त्यांचा लौकीक होता. बडोद्याला त्यांनी जर्मनीच्या 'बाहाऊस' विद्यापीठाच्या पद्धतीवर आध्यारीत अभ्यासक्रम आखला होता. त्यांनी हणमंते यांचे शिक्षणातील प्रयोग पाहीले, तेव्हां त्यांनीच ही आज काळाची गरज आहे, हे सर्वाना पटवून दिले.
हणमंते यांनी कलाविषयक वाचन अफाट केले होते. यासाठी जी संधी मिळेल, त्याचा त्यांनी फायदा घेतला. 'आर्ट अँड इंडस्ट्री'. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था होती. कोलकात्याला मूळ कार्यालय असलेल्या या संस्थेचे ताज महाल हॉटेलमध्ये एक ग्रंथालय होते. हे ग्रंथालय सांभाळण्यासाठी त्यांना कोणीतरी हवे होते. येथे हणमंते सरांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अनेक दुर्मीळ पुस्तके अभ्यासायची संधी त्यांना मिळाली. पुढे वाचकाअभावी ते ग्रंथालय बंद झाले. व ती सर्व पुस्तके जे.जे.च्या उपयोजीत विभागाला देण्यांत आली. जे.जे.उपयोजीत कला संस्थेचे हे पहीले ग्रंथालय. आणि हणमंते सरानी त्यामध्ये भर कशी घालता येईल हेच सतत पाहीले. अर्थात आडारकरांचा याला पाठींबा होताच. वर्गात शिकवीत असतांना हणमंते सर एक शिस्त पाळत असत. त्याकाळात आम्हां विद्यार्थ्यांना रंग वगैरे कपड्याना लागू नये यासाठी अंगावर घालायचे डॉक्टर प्रमाणे निळ्या रंगाचे ऍप्रॉन असत. वर्गामध्ये ऍप्रॉन असणे आवश्यक होते. तेही हणमंते सर पहात असत. मुलांच्या परिस्थितीकडेही सरांचे बारकाईने लक्ष असे. आर्थीक परीस्थीती नाजूक असलेल्या विद्यार्थ्यांना मग कुठेतरी स्टुडीओत कामाला पाठवून त्याला चार पैसे मिळतील हे ते आवर्जून पहात असत. असे अनेक विद्यार्थी भेटतील की जे त्या कठीण काळात हणमंते सरांमुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो हे कृतज्ञतेने सांगतील. कांही वेळा त्यांनी कोणाला रहायला जागा नाही व होस्टेलला रहाण्याची ऐपत नाही, अश्याना आपल्या घरीही ठेवले आहे. या बाबतीत त्यांना त्यांच्या पत्नीचे सहकार्य सतत असायचे.
पुढे १९६८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांना जे.जे.उपयोजीत कला संस्थेचे अधिष्ठाता म्हणून नियूक्त केले. त्यांच्या मनातील कल्पनांना आकार देण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या वेळी त्यांचे सह - प्राध्यापकही निष्णात अन आपापल्या विषयात पारंगत असे होते. याकाळात विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यासाच्या दृष्टीने जास्त सुवीधा मिळाव्यात यासाठी ते प्रयत्नशील राहीले. विशेषतः गरीब, अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांकडे त्यांचे लक्ष्य असे. कलेबरोबरीच सांस्कृतीक कामाकडेही त्यांचा ओढा होता. म्हणूनच त्यांच्या काळी 'आर्ट जत्रा' सारखी कृती घडली. व्यावसायीक क्षेत्रातील सर्वांशीच ते चांगले संबंध राखून होते. त्यांच्या या जनसंपर्कामुळे शिक्षण संपताच सर्व विद्यार्थ्यांना नोकरी लावणे हे त्यांचे आवडते काम. आपल्या सूंदर हस्ताक्षरांत ते एजन्सीच्या लोकांना पत्र लिहून अनेकांना त्यांनी नोकऱ्या लावल्या आहेत. जगभर विखुरलेले अनेक विद्यार्थी त्यांचे हे ऋण मान्य करतात. येथील अभ्याक्रम यशस्वी राबवील्यानंतर हणमंतेना श्रीलंका सरकारकडून त्या सरकारचा कला अभ्यासक्रम आखण्यासाठी खास आमंत्रीत करण्यात आले. कोलंबो स्कुलवर बंगाल स्कुलचा पगडा होता. त्यांना आधुनिकता पटवून देण्यांत हणमंते यशस्वी झाले. त्यावेळी त्यांनी इटली, प्यारीस, लंडन, अँस्टरड्याम येथील डिझाईन स्कुल व आर्ट गॅलऱ्या पाहील्या.
केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांचाही कामाचा दर्जा वाढावा याकडे त्यांचे लक्ष असे. आणि यात त्यांना मदत होत असे ती प्रा. आंबेरकर यांची. शिक्षकांना ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यास व आपलें ज्ञान वाढीला लावण्यास अनेक प्रयोग त्यांनी केले. दर आठवड्याला प्रत्येक शिक्षकाने आपण वाचलेल्या विषयावर एक दीर्घ अशी टिपणी लिहून ती सादर करणे सक्तीचे केले. प्रा. आंबेरकर व प्रा. हणमंते दोघेही त्या वाचून त्यावर सुधारणा, आपले मत मांडता असत. यामुळे आपोआप अनेकांचा फायदा होत गेला. त्या निमित्ताने प्रत्येकाचे एक लेक्चर तयार होत असे. काहींचा याला विरोधही असे. अश्या या शिक्षण प्रेमी व्यक्तीला कांही काळ दुर्दैवाचे दशावतारही भोगावे लागले. मध्यन्तरीच्या काळात आधी शिक्षकांचा व नंतर विद्यार्थ्यांचा संप झाला. पुढे कांही दिवसांनी हणमंते सरांची बदली नागपूरला झाली. सरांना आधीच दोन वेळा नोकरीत वाढ मिळाली होती. पण यावेळी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. अधिष्ठात्याला रहायला संस्थेच्या आवारात बंगला असल्याने सरांनी आपला कला नगर मधील बंगला एकाला भाड्याने दिला होता. नागपूरच्या वास्तव्यात मी देखील त्यांच्या सोबत होतो. आम्ही दोघेही आमदार निवासात मुक्काम करून होतो. पण एका वर्षातच सरांची बदली मुंबईला झाली. व नंतर त्यांनी पुढे नोकरी सोडली. पण कलानगर मधील भाडेकरू जागा सोडेना. शेवटी ते त्यांचे मित्र बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व प्रकरण घेऊन गेले. बाळासाहेबांनी दोघांनाही आपल्या घरी बोलावीले व त्या भाडेकरूला सांगीतले, हे पहा तू माझा शत्रू नाहीस. पण हणमंते माझा मित्र आहे. त्याची जागा तू बळकावली आहेस. आजच्या आज तू येथून सामान बांधून निघून जायचे. नाहीतर मी तुला कलानगरच नव्हे, तर मुंबईतही रहाणे मुश्किल करेन! परीणाम त्याच दिवशी हणमंते सरांना त्यांची जागा ताब्यात आली. आणि ती केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे!
हणमंते सरांचा सहवास मला बराच लाभला. नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयात असतांना आम्ही विद्यर्थ्यांसाठी अनेक उपक्रम केले. त्यांचे बंद पडलेले वार्षिक सुरु केले. संध्याकाळी सायकलवरून आम्ही भटकत असू. रात्री धंतोली मधील अनंताश्रमात जेवण करून मग आमदार निवासवर पोहोचत असू. त्यावेळी त्यांच्यामुळे मला कधीही एकाकी वाटले नाही. हणमंते सर आध्यात्मिक बैठकीचे होते. सत्य साईबाबांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. निवृत्तीनंतरही त्यांची कला शिक्षण साधना सुरूच होती. बऱ्याच शैक्षणीक समित्यांचे ते सभासद असल्याने हणमंते सर जेथे जात, तेथील वातावरणाचा कला शिक्षणासाठी कसा उपयोग करता येईल याचे ते आवर्जून निरीक्षण करीत. भारतातील बहुतेक राज्यांच्या कला महाविद्यालयामध्ये त्यांचे योगदान आहे. संस्थेत असतांना विद्यार्थ्यांचे डिझाईन चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करणारे हणमंते सर तितक्याच ठामपणे डिझाईनचे महत्व पटवून देत. पुढे नवीन तंत्रज्ञानाचे आगमन झाल्यावर त्याचे महत्वही ते जाणून होते. पण सरळ संगणकावर काम करून त्याचे परीणाम मिळवू पाहणाऱ्यांना मात्र त्यांचा विरोध होता. पहीली दोन वर्षे संकल्पनांवर काम करून विद्यार्थ्यांची संवेदनक्षमता जागृत होणे आवश्यक आहे, यासाठी त्यांची विचारशक्ती, निरीक्षणशक्ती, वाचनक्षमता वाढणे आवश्यक आहे, तरच त्याला दृश्य कलेची जाण येईल, हे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते. आम्हांला तर ते आमच्या शिक्षकांपेक्षा आमचे पालकच भासत. अडारकरानंतर सर जे.जे.उपयोजीत कला महाविद्यालय त्यांनी पितृवत प्रेम देऊन सांभाळली. अखेरपर्यंत त्यांनी या संस्थेची चिंता अन भवितव्य याचाच विचार केला.
असे हे वयाची ८५ वर्षे ओलांडलेले अजातशत्रू व्यक्तीमत्व ४ जून २०१० रोजी कृतार्थपणे काळाच्या पडद्याआड निघून गेले.
- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
Comments
Post a Comment