चित्रमंदीरातील तपस्वी : कला महर्षी के.बी.कुलकर्णी
( बेळगांवचे विख्यात कलाकार व ज्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्या निर्माण केल्या ते के.बी. कुलकर्णी सर यांची जन्म शताब्दी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजी सुरु होत आहे. बेळगांवात ती आज त्यांनी घडवीलेले त्यांचे माजी विद्यार्थी, त्यांचे स्नेही हे सर्व कलाप्रेमी मोठ्या प्रमाणात साजरी करीत आहेत. त्या निमित्ताने माझ्या गुरूना माझ्याकडून ही शब्दांचे भावपूर्ण अभिवादन! )
आजच्या पिढीला गुरु - शिष्य परंपरेबद्दल कितपत माहीत आहे, अथवा तसे शिक्षण घेतल्याची जाणीव आहे माहीत नाही. कारण आता शिक्षण एक पवित्र अशी परंपरा राहीली नसून ते एक अर्थार्जनाचे साधन बनले आहे. तरीही अजूनही संगीत, चित्रकला सारख्या क्षेत्रांत ही पवित्र परंपरा जोपासली जाते. शिक्षक -विद्यार्थी मध्ये एक जे व्यावहारीक नाते आज पाहीले जाते, ते गुरु- शिष्यामधे एका घट्ट अश्या पवित्र बंधनाने विणले जाते. एकदा चित्रकार वासुदेव कामतांनी म्हटले होते की, 'मला कांही असे चित्रकलेचे विद्यार्थी पहायला मिळाले, जे आपली कला निपुणतेने सादर करीत होते. मला हे विद्यार्थी जे.जे.स्कुल मध्ये पहायला मिळाले नाहीत, नाशीक अथवा पुण्याच्या कला महाविद्यालयात मला ते दिसले नाहीत. पण एखाद्या फुलाचा सुगंध जसा दूरवर दरवळत जावा व तो कोठून येत आहे याचा शोध घेता घेता मूळ फुलाशी येऊन पोचावे तसे या विद्यार्थ्यांचा शोध घेतांना जाणवले की हे एवढे प्रतीभाशाली कलावंत आहेत बेळगांवच्या के.बी.कुलकर्णी या कला शिक्षकाचे, आणि त्यानंतर मी त्यांना भेटलो व त्यांची चित्रसंपदा पाहीली, तेव्हां जाणवले की केवढ्या प्रतिभेचा व क्षमतेचा हा चित्रकार आहे ते' आणि खरोखरीच बेळगांव सारख्या एका आडगावात राहून कला निर्मीती व कलाध्यापन करून अनेक शिष्यगण निर्माण करणे व आपले नांव सर्वत्र गाजविणे ही किमया के.बी.कुलकर्णी सरांनी केली.
कृष्णाजी भीमराव अर्थात सर्वांचे परीचीत असे के.बी.कुलकर्णी उर्फ के.बी.सर यांनी आपले सर्व आयुष्यच चित्रकलेला वाहीले होते. बेळगावपासून दीड दोन मैलावर असलेल्या व मध्यवर्ती कारागृहाबद्दल प्रसीद्ध असलेल्या हिंडलगे या गावांत ४ फेब्रुवारी १९२० साली कुलकर्णी सरांचा जन्म झाला. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या के.बी.नी आपले म्यॅट्रिक्युलेशन वयाच्या सतराव्या वर्षी पूर्ण केले. ड्रॉईंग विषयाची आवड होतीच, त्यामुळे नजरेत येणारी प्रत्येक गोष्ट स्केचबद्ध करण्याची त्यांना संवय लागली. देशप्रेमाने भारलेल्या त्या काळात शिवाजी महाराज एक चमत्कार असल्याचे जाणवून ते त्यांचे भक्त झाले. सतत महाराजांची चित्रे काढू लागले. पुढे बेळगांवच्या बेनन-स्मिथ हायस्कुल मधील चित्रकला शिक्षक देशपांडे यांनी त्यांची चित्रे काढण्याची हातोटी पाहून त्यांना ड्रॉईंगच्या परीक्षांना बसवीले. अभ्यासाची आवड नसल्याने एकदा म्यॅट्रिक झाल्यावर कॉलेजला जाण्याचे त्यांचे धैर्य होईना. गणित-अल्जीब्रा-जॉमेट्री ही पुस्तके पाहूनच त्यांचे डोके गरगरायला लागे. आणि त्यांनी ठरवीले हा आपला प्रांत नव्हे ! पण वाचन आणि चित्रे काढणे सुरु झालं की मात्र त्यांची तहानभूक हरपून जात असे. आणि त्याच वयात त्यांची अध्यात्मक गोष्टीबद्दल उत्सुकता वाढीला लागली. वि.स.खांडेकर, ना.सि. फडके, नाथमाधव अश्यांचे लिखाण सर वाचू लागले. जोडीला इंग्रजी चित्रपट देखील ते पहात असत. क्लार्क गेबल, अँथोनी क्वीन, रॉबर्ट टेलर, ग्रेटा गार्बो, जॉन वेन असे आवडीचे कलाकार त्यांच्या मनांत ठसले होते. सैगलने तर त्यांच्या मनावर जादू केली होती. रस्त्यावरून जातअसता एखाद्या हॉटेलमधील रेडिओवर सैगलच्या गाण्याचे स्वर ऐकू आले तर ते सायकलवरून उतरत व गाणे संपेपर्यंत तेथे उभे रहात.
१९३९ साली कुलकर्णी यांनी मुंबईला हळदणकरांच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला. पहील्यांदाच त्यांनी समोर एक दाढीवाला बसवून त्याचे पेन्सिलमध्ये चित्र काढायला सांगीतले. त्यांचे ते चित्र पाहून हळदणकर छान झाले आहे असे म्हटल्यावर कुलकर्णींना कोण आनंद झाला असेल याची कल्पनाच करा. हळदणकर वास्तववादी कलेचं भोक्ते होते. मॉडर्न आर्ट विषयी त्यांना तसा तिटकारा होता. हळदणकरांना भाऊ म्हणत. व त्यांचा चित्रकार मुलगा भाई, म्हणजे गजानन. भाऊंचे तैलरंगात व भाईंचे जलरंगात प्रभुत्व होतं. भाई जलरंगात काम करतांना पाहणं म्हणजे एक सुवर्णयोग असे. सहज असे रंगाचे फटकारे ते मारीत. कुलकर्णींना हळदणकर पिता पुत्रासोबतच त्रिनिदाद, नंदलाल बोस, टागोर अश्यांचीही चित्रे पहायला मिळाली. तीही त्यांच्या मनावर परीणाम करून गेली. जोडीला त्यांचा चित्रकलेचा अभ्यास हा त्यांनी मिळवलेल्या पाश्च्यात चित्रकारांच्या पुस्तकावरून त्यांनी केला. रस्त्यावर मिळणारी पुस्तके, वृत्तपत्रे, आदी माध्यमाद्वारे त्यांनी धडे गिरवले. जे नजरेला दिसेल, जे मनाला भावेल ते चित्रबद्ध करणे हा छंदच त्यांना जडला होता. त्यातही मानवाकृतीचा त्यांचा अभ्यास हे त्यांचे खास आकर्षण होते. त्यांना रेम्ब्रा, आगस्टस जॉन, सार्जंट, रसेल फ्लिंट आदींची पेंटींग्स खूप आवडत. पण कुलकर्णीनी आपल्या शैलीवर चुकूनही त्यांचा प्रभाव पडू दिला नाही. लिओनार्डोची 'मोनालिसा' व मायकल ऍंजेलोचे' क्रिएशन ऑफ मॅन' ही चित्रे त्यांनी आपली दैवतें मानली.
कुलकर्णी सरांच्या मनांत अशी कल्पना होती की, बेळगांवात कलेचे एक असे केंद्र सुरु करावे, ज्यामध्ये साहीत्य, संस्कृती, संवाद, काव्य, संगीत अश्या सर्वच गोष्टींची एकता असावी. ज्यामुळे चित्रकला समृद्ध होईल. अश्या संस्थेसाठी ते योग्य जागेच्या शोधात होते. सुदैवाने तीही त्यांना मिळाली. अगदी मोक्याच्या जागी. खडे बाजारच्या कोपऱ्यावर पहील्या मजल्यावर, बाहेर बाल्कनी असलेला प्रशस्त हॉल, आतमध्ये दोन खोल्या अश्या या जागेत १९५१ साली कुलकर्णी सरांनी आपली 'चित्रमंदीर' ही कला संस्था स्थापन केली. कलपत्रीने एक सुंदर असा नामफलक बनवून दिला. कला निकेतनच्या वेळी फसलेल्या कांही प्रयोगांनी चित्रमंदीरची रचना यथायोग्य व्हावी म्हणून सरानी त्याकडे जातीने लक्ष दिले. दरमहा स्वखर्चाने साहीत्यात ते भर घालत गेले. अगदी एकखांबी तंबू होता तो! पण जिद्द होती ती गगनाला गवसणी घालण्याची. व 'चित्रमंदीर' मध्ये चार वर्षाच्या शासकीय पदवीका अर्थात जी.डी.आर्ट या अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
माझा कुलकर्णी सरांशी संबंध आला तो १९५३ साली. मी सेंट पॉल्स हायस्कुल मध्ये तिसरीत असताना ते आम्हांला ड्रॉईंग शिकवीत असत. ती शाळा मिशनरी असल्याने तेथे मराठी शिक्षक केवळ तीनच होते. त्यापैकी कुलकर्णी सर एक व दुसऱ्या दोन शिक्षिका होत्या. श्रीमती अनुराधा कित्तूर व श्रीमती पंडीत. तेथे कुलकर्णी कमालीचे शिस्तप्रीय आणि थोडेसे अबोल वाटत. त्यामुळे आम्हांला त्यांचा थोडा धाकच वाटे. पण एखादे स्मरणचित्रं त्यांनी खडूने फळ्यावर रेखाटायला सुरुवात केली की आमची नजर तेथून ढळत नसे. सेंट पॉल्सची नोकरी संपली की चार वाजता ते सायकलवर टांग टाकून ते थेट खडेबाजार कडे वळत. 'चित्रमंदीर' आले की खाली सायकल उभी करून ते वर जात. मीही जवळपासच रहात असल्याने त्यांचे दर्शन मला नेहमी होत असे. मलाही वाटत असे की, आपणही वर जाऊन चित्रकलेचे धडे गिरवावे. एक दिवस एक गौरवर्णीय तरुणाला घेऊन आमच्या वर्गात आले व म्हणाले, 'हे रवींद्र परांजपे. आजपासून हे तुम्हांला ड्रॉईंग शिकवतील.' येथे मात्र माझी अन रवी परांजपे सरांशी गट्टी जमली. आणि नेमकी माझी चित्रकलेची ओढ पाहून माझे पत्रकार बंधू ग.गो.राजाध्यक्ष यांनी कुलकर्णी सरांना सांगून मला त्यांच्याकडे पाठवीले. भीतभीतच मी चित्रमंदीरच्या पायऱ्या चढून वर गेलो अन मला आष्चर्याचा धक्काच बसला. ज्या कुलकर्णी सरांचा मला धाक वाटत होता, ज्यांच्याविषयी आदरयुक्त भीती वाटत होती, त्याच कुलकर्णी सरांनी माझे हसून स्वागत केले. हे वर्ष होते १९५५.
चित्रमंदीरमध्ये ड्रॉईंग ग्रेड पासून ते अंतीम वर्ष पेंटिंग पर्यंत अभ्यास करणारे सर्वच विद्यार्थी एकत्रीतपणे काम करीत असत. त्या सर्वांना त्यांच्या वर्गाप्रमाणे विषय दिले जात. सर्व विदयार्थ्यांची कामे सर जातीने पाहून त्यामध्ये सुधारणा करीत असत. ते करतांना हास्यविनोद करीत प्रोत्साहन देत. कित्येकदा स्वतः काढलेली चित्रेही नक्कल करण्यासही आम्हांला देत. या अश्या खेळीमेळीच्या वातावरणात आमचे दोन अडीच तास कसे निघून जात ते कळतही नसे. लवकरच ‘चित्रमंदीर’ हे बेळगांवातील सर्वानी नोंद घ्यावी असे एक कला संस्कृतीचे केंद्र बनले. दिवसभर शाळा-कॉलेज आटोपून अनेक मुले मुली येथे ड्रॉईंग शिकण्यासाठी येत असत. येथे आल्यावर मात्र ते केवळ चित्रमंदीरचेच असत. कोणी समोर रचलेल्या स्टील-लाईफचे पेन्सिल, चारकोल, जलरंग, अथवा तैलरंगात उतरविण्यात मग्न असे. तर कोणी समोर बसलेल्या मॉडेलवरून अथवा ठेवलेल्या हेडवरून पेंटींग करण्यात गुंग असे. मधेच एखादा विद्यार्थी उठून दुसऱ्या विद्यार्थ्यांचे काम न्याहाळीत असे. मला त्यावेळचे आठवतात ते विद्यार्थी म्हणजे रवी परांजपे, नंदा शहापूरे, वसंत शंभूपुरे, जयवंत नाईक, शंकर मोदगेकर, देवगेकर, कलपत्री, पांडुरंग सुतार, बिंदू कुलकर्णी, केशव बिच्चू, वासंती कुमठा, हेमा कुद्री, सरोज गजेंद्रगडकर, सोनू नाडगौडा, शशीकला कुलकर्णी, पुष्पा ठाकूर हे विद्यार्थी. त्याकाळात शिकत असतानाही तेथे आम्हांला शिकवणारे रवी परांजपे आज स्वतःच्या कर्तबगारीने व शैलीने जगप्रसीध्द झाले आहेत. व पेंटींग आणि उपयोजीत कला या दोन्ही कला क्षेत्रात आपले नांव कळसाला पोचवणारे ठरले आहेत.
त्याकाळातील रिवाजाप्रमाणे मुंबई येथील सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट येथील उच्चकला परीक्षांना बसण्यापूर्वी चित्रांचे नमुने करून पाठवावे लागत असत. त्यावेळी संस्थेमध्ये बरीच धावपळ सुरु असे. आणि या नमुन्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची अनुमती मिळे. मग परीक्षेच्या वेळी या सर्व कुटुंबाला एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे घेऊन कुलकर्णी सर मुंबईला घेऊन जात. सरदारगृहामध्ये या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करीत. त्यांचे जे.जे.मधील शिक्षक धोंड मास्तरांशी गप्पा होत. व परीक्षा आटोपल्यावर कांही प्रदर्शने पाहून परत आल्यानंतर पुन्हा चित्रमंदीरमध्ये या सर्व गोष्टींना उजाळा मिळत असे. आमच्या त्या काळात आमच्या शाळाही मोठ्या असत. सर्व शाळांना प्रशस्त असे ड्रॉईंग हॉल असत. दोन दोन कला शिक्षक असत. सर्व साहीत्य शाळेमार्फतच मिळत असे. यातील बरेचसे विद्यार्थी चित्रमंदीरकडे आकर्षीत होत असत. आम्ही चित्रमंदीरचे विद्यार्थी आहोत, आमचे कला शिक्षक कुलकर्णी मास्तर आहेत हे आम्ही अभिमानाने आणि आत्मीयतेने सांगत असू
के.बी. सरांचे काम हे वास्तववादी होते. त्यातील सौंदर्याचा आस्वाद त्यांनी रसीकांना भरभरून दिला. पण त्यांच्या वास्तववादी कलेला पुराणमतवाद नव्हता, तर त्यांनी तिला एक आधुनिकतेची जोड दिली होती. त्यांनी विविध माध्यमातून केलेल्या निसर्गदृश्यातून हे प्रकर्षाने जाणवते. आकारांचे सुलभीकरण, नितळ अशी रंगसंगती, त्यामध्ये साधलेला समतोल व लय व महत्वाचे म्हणजे विषय शोधण्यासाठी त्यांच्या ठायी असलेली सौंदर्यदृष्टी यातून त्यांनी अनेक निसर्ग दृश्यांच्या सौन्दर्याकृती निर्माण केल्या. नाईफचा वापरही उत्कृष्टरित्या ते करीत असत. पेन्सीलवर तर त्यांची प्रचंड हुकूमत होती. त्यांच्या पेंटिंगमधल्या स्त्रिया बहुदा अंतर्मुख अश्या रंगवलेल्या असत. त्याही पहुडलेल्या, विचारमग्न, पाठमोऱ्या, ग्रामीण भागांतील पाणी भरणाऱ्या, अथवा भाजीवाल्या असत. या चित्रातून प्रकर्षाने जाणवते ते त्यातील निष्पाप सौंदर्य. आकृत्तीतील गोडवा, त्यांची रेषेवरील व अनॉटॉमीवरील हुकुमी पकड, स्मरणशक्तीची जोड, त्यांची स्वतःची अशी खास रंगसंगती. यातूनच त्यांनी आपली वास्तववादी शैली आधुनिकतेने रसिकांपुढे सादर केली.
कुलकर्णी सरांचा 'चित्रमंदीर' मधील क्लास सायंकाळी सात वाजता संपत असे. अन मग सर्व विध्यार्थी त्यांच्या सभोवार बसून सरांच्या खास बौद्धीकाचा लाभ घेत असत. अन या गप्पा व चर्चा हाच खरा अभ्यास असल्याची जाणीव सर्वांना होत असे. यात प्रत्येक रंगाचा वापर, इंडियन रेड, ऑरेंज, किती प्रमाणात वापरावा, पांढऱ्या रंगाचे मिश्रण प्रमाणाबाहेर केल्यास चित्र कसे निस्तेज होते याची मीमांसा, जोडीला पाश्यात चित्रकारांची उदाहरणे, व्हॅनगॉगचे आयुष्य, मायकेल ऍंजेलोने सिस्टीन चॅपेलवर काढलेली चित्रे, या सर्व घटना ते एखाद्या कादंबरीची गोष्ट ऐकवावी अशा रीतीने रंगवून सांगत. असे त्यांचे शब्दावरही सामर्थ्य होते. पुढे मी एस.एस.सी. झाल्यावर मुंबईला सर जे.जे.स्कुल मध्ये उपयोजीत कला संस्थेत प्रवेश घेतला. रवी परांजपे देखील मुंबईत त्या काळात एका विख्यात जाहीरात एजन्सीत इलस्ट्रेटर म्हणून काम करीत होते. मात्र येथून माझ्या कामाची दिशा बदलली. सुटीमध्ये मी बेळगांवला गेल्यावर रोज सायंकाळी 'चित्रमंदीर' मध्ये सरांशी गप्पा मारण्यासाठी जात असे. जाताना मी केलेले वर्गकाम त्यांना दाखवण्यास नेत असे. त्यामध्ये प्रेस लेआउट, पोस्टर्स, बूक कव्हर्स अश्या प्रकारचे काम असे. पण सरांना त्यात फारसे गम्य नसे. ते म्हणत, पुढच्या खेपेस आलास की छानशी ड्रॉईंग करून आण. पुढे मी जे.जे.मधेच अध्यापक व पुढे अधिष्ठाता झालो. त्याचा त्यांना खूप आनन्द झाला. बेळगांवी गेल्यावर माझ्या 'चित्रमंदीर'च्या फेऱ्या सुरूच असत. विद्यार्थ्यांचे चेहरे बदलले होते. नवीन पिढ्या येत होत्या. अश्याच एका वेळी सरांनी शेजारच्या इझलवर समोरील कास्ट कागदाला उतरत बसलेला एक विद्यार्थी दाखवित म्हणाले, हा जॉन फर्नांडीस. खूप चांगले काम करतो. अगदी परांजपेंच्या पावलावर पाऊल ठेवून शिकायचे म्हणतो. हे सांगताना सरांचा चेहरा कौतूकाने फुलून आला होता. आणि जॉनचे काम पाहता ते अक्षरशः खरे होते. पुढे हा जॉन खूप मोठा चित्रकार झाला. आणि सरांचा अगदी लाडका शिष्य बनला!
कुलकर्णी सर हे कट्टर महाराष्ट्रवादी होते. बेळगावचा लढा त्यांनी जवळून पाहीला होता. या लढ्यातील नेते बाबुराव ठाकूर, बा.रं. सुंठणकर, दाजीबा देसाई, केशवराव दड्डीकर त्यांचे स्नेही होते. 'तरुण भारत' या बाबुराव ठाकूरांच्या वृत्तपत्राशी त्यांचे जवळचे संबंध होते. बेळगांव महाराष्ट्राचे आहे आणि ते महाराष्ट्रात येणारच ही खात्री ते बाळगून होते. त्यांचा हा महाराष्ट्राभिमान कित्येक कन्नडीकांना खुपत असे. मात्र हे मराठी प्रेमच पुढे त्यांच्या 'चित्रमंदीर'च्या विरोधात आले. आपण ज्या संस्थेत तपासणीसाठी जावू तेथे आपली सरबराई करून घेऊन त्याना 'समाधानकारक' असा शेरा मारणाऱ्या कर्नाटकाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी चित्रमंदीरला भेट देणार असल्याचे कळविले. नेमकी त्याच वेळी चित्रमंदीरची डागडुजी चालली होती. त्यामुळे सरांनी त्यांना विनंती केली की या जागी सध्या विद्यार्थ्यांना काम करता येत नसल्याने आपली तपासणी कांही दिवसांनी व्हावी. पण त्या उद्दाम लोकांनी ती न ऐकता तशाच परिस्थीतीत संस्थेला भेट दिली. व ही जागा कला विद्यार्थ्यांना शिकविण्यायोग्य नसल्याचा शेरा मारून चित्रमंदीरची मान्यता काढून घेतली. वास्तवीक सरांचे एवढे मोठे मित्रमंडळ होते की सहजी ते पुन्हां मान्यता मिळवू शकले असते. पण कानडी कारभाराला विटलेल्या सरानी आता कर्नाटकाच्या परीक्षाच नको म्हणून तो अभ्यासक्रमच बंद केला. १९५१ ते १९७७ पर्यंत सव्वीस वर्षांचा वैभवशाली काळ पाहीलेले 'चित्रमंदीर' अचानक स्तब्ध झाले. जी संस्था स्वत:चे रक्त आटवून उभी केली होती, ती अशा रीतीने बंद व्हावी याचे दु:ख त्यांच्या मनाला खूप झाले. त्यातच जागेच्या मालकाने चित्रमंदीरची जागा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यात पुढे सरांना एकच खोली मिळाली. मागील बाजूच्या जिन्याने वर जाऊन कुलकर्णी सर तेथे काम करीत बसत. त्यांचे विद्यार्थी, जे पुढे प्रथितयश झाले, ते त्यांना भेटायला, त्यांना आपली कामे दाखवायला, त्यांची कामे पहायला तेथेच येत असत. नंतर आलेल्या लोकांसोबत खाली आल्यावर समोरील उडुपी हाॅटेलमघ्ये एकेक चहा घेवून सर आपल्या स्कूटरवर बसून घरी निघत.
कला शिक्षकाचा पिंड असलेले कुलकर्णी सर स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. तरुण भारतचे किरण ठाकूर यांनी सरांना 'भंडारी स्कुल ऑफ आर्ट' ही संस्था सुरु करून दिली. त्या वेळचे महाराष्ट्राचे शिक्षण सचीव सदाशिवराव तिनईकर हे बेळगावचेच. शिवाय तेही चित्रकार, वेळोवेळी चित्रमंदीरला भेट देणारे. कुलकर्णी सरांची महत्ता त्यांना माहीत होती. त्यांनी महाराष्ट्राचा कला अभ्यासक्रम सुरु करण्याची परवानगी त्यांना दिली. आरंभी जागेचा प्रश्न होता. बेळगांवपासून बारा मैलांवर असलेले वेंगुर्ला रस्त्यावरील कार्वे हे आमचे गांव. आमच्याच घरी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे शिनोळी व बेळगांव येथे जागा उपलब्ध होताच या संस्थेचे स्थलांतर तेथे झाले..मात्र महाराष्ट्र सरकारने सरांच्या या संस्थेला सर्वतोपरी मदत केली. कुलकर्णी सरांनी आपल्या कलेचा बडेजाव कधीच केला नाही. अत्यंत साधे जीवन ते जगले. चित्रमंदीरच्या रूपाने बेळगांवला त्यांनी कला चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनवीले.
१९९५ साली मला त्यांचे एक पत्र आले. त्यामध्ये त्यांनी लिहीले होते, ' माझे जहांगीर आर्ट ग्यालरीत प्रदर्शन भरत आहे. माझे विद्यार्थी जॉन फर्नांडीस, मारुती पाटील, बिंदू कुलकर्णी यांचे हे काम’. हे त्यांचे पहिलेच प्रदर्शन खूप गाजले. विक्रीही चांगली झाली. पण सरांना त्याचे विशेष कौतुक नव्हते. प्रदर्शनाच्या हॉल मध्ये एखाद्याला आपले चित्र समजावून सांगताना ते दिसत. याच दरम्यान मी जे.जे. उपयोजीत कला संस्थेचा हीरक महोत्सव साजरा केला. त्याचे औचीत्य साधून मी कुलकर्णी सरांचा एक भव्य सत्कार त्यावेळी संस्थेमघ्ये केला. त्या सत्काराला रवी परांजपे सहीत त्यांचे अनेक माजी विद्यार्थी मी त्या मंगल प्रसंगी जमा केले. एखाद्या मंद तेवत असणाऱ्या निरंजनाप्रमाणे भासणाऱ्या के.बी.सरांनी त्या दिवशी व्यासपीठावरून विध्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मौलीक मार्गदर्शन केले. चित्रकला एखाद्या कारीगिरीप्रमाणे शिकवली जाते यावर कुलकर्णी सरांचा विश्वास नव्हता. 'ज्या मुलांना चित्रकलेविषयी आवड आहे, ते माझ्याकडे येतात. मी त्यांना केवळ मार्गदर्शन करतो. मी काम करतांना ते माझे निरीक्षण करतात. माझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. पण मला खरोखरीच वाटते, मी त्यांना काय शिकवले? कामाचा भरपूर सराव, व विषयांची पुनरावृत्ती न करणे या त्यांच्या गुणामुळे आमच्यात गुरु-शिष्य नाते निर्माण झाले. तसेच कला ही आध्यात्मिक प्रेरणेचाही भाग आहे.' केव्हढे भौतीक तत्वज्ञान सांगीतले आहे हे सरांनी ! तेही त्यांच्या स्वभावाप्रमाणे लीनता, नम्रपणा बाळगून.
माणूस म्हणून तर के.बी.सर आणखीनच मोठे होते. सर्वांशी प्रेमळपणे वागणारे सर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामातील चुकाही न दुखावता सांगत असत. एखाद्याचे चित्र वाईट झाले असले की ते नीट पाहून हसऱ्या चेहऱ्याने म्हणत, 'अजूनही चांगलं झालं असतं.' त्याच दरम्यान जॉनला मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रासले. नेहमी डायलिसीस करावे लागे. मुंबईचा कोणीही भेटला की ते जॉनच्या तब्येतीची चौकशी करीत असत. नंतर सरांनाही त्यांची तब्येत साथ देईना. त्यामुळे पुढे सहा महीने ते चित्रमंदिर पासून दूर राहीले. मध्यन्तरी एकदा त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना बेळगांवला आणून त्यांच्या संस्थेचे दर्शन करवले. पण पुढे तब्येत साथ देईनाशी झाली. पुढे वरळीच्या नेहरू सेंटर कला दालनाच्या नीना रेगे यांनी गुरु-शिष्य परंपरेचे के.बी. व त्यांचे शिष्य यांचे एकत्र प्रदर्शन भरवायचे ठरवले. पण कां कोण जाणे, सरांनी त्याला नकार दिल्याचे कळाले. पण तरीही नेहरू सेंटर तर्फे नीनाने 'इंडीयन मास्टर पेंटर'ला अभीवादन करण्यासाठी त्यांचे एकट्याचे सिंहावलोकनी प्रदर्शन भरविले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते स्वतः हजर राहू शकले नाहीत. पण नेहरू सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी, सरांच्या विद्यार्थ्यांकरवी त्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
येथे जॉन फर्नांडीस यांना मूत्रपिंडदाता मिळाला. जानेवारीमध्ये जॉन हिंदुजा इस्पितळात दाखल झाला. फेब्रुवारीमध्ये मूत्रपिंड रोपणाची तारीख ठरवायची होती. अश्यातच जॉन अचानक कोमामध्ये गेला. कुलकर्णी सरांचा ४ फेब्रुवारी रोजी ८८ वा वाढदिवस होता. त्या दिवशी मी त्यांच्यावर एक लेख लिहून शुभेच्छा दिल्या होत्या. सकाळी फोनवर त्यांच्याशी बोललो देखील. मला त्यांनी सदर लेख पाठवून द्यायला सांगीतले. त्याच दिवशी कुरियरने मी त्यांना तो पाठवीला. शेवटी नऊ मार्च उगवला. का कोण जाणे? त्यादिवशी मला खूप वाटू लागले की आज सरांशी बोलावे. पण दुपारी झोपले असतील या हेतूने रात्री फोन करावा असे ठरविले. अन सायंकाळी लोकसत्ता मधून फोन आला अन ती दुर्दैवी बातमी कानांवर आदळली. के.बी.सर गेले! आम्ही सरांचे जुने विद्यार्थी एकमेकांशी संपर्क साधू लागलो. यात जॉनचाही विषय होता. आणि त्यानंतर दोनच दिवसांनी, अकरा तारखेला जॉन फर्नांडिसने या जगाचा निरोप घेतला. काय असावे नियतीच्या मनात? सरांनी कायम जॉनला आपला शिष्य मानला. दोघांचेही या जगातून जवळ जवळ एकत्र जाणे हा एक दुर्दैवी योगायोग म्हटला पाहीजे. दोघांनाही कला क्षेत्राने एकत्र श्रद्धांजली वाहीली. आज कला क्षेत्रांत आणि शिक्षण क्षेत्रांत अश्या प्रकारे किती जण आपणास पहायला मिळतात? अश्या या कला महर्षीला आपल्या राज्यात काय मिळाले? याचा आम्ही विचार करत नाही. कारण सरकार कोणतेही येवो, त्यांना फक्त कलाकार -कला शिक्षक दिसतात ते त्यांच्या पुढे पुढे केलेले अथवा त्यांची मर्जी सांभाळणारे. कारण ती संस्कृतीचं सरकारची नाही. हे कलाकार लोकमान्य असतात पण त्यांना राज्यमान्यता मिळेल ते दिवस भाग्याचे!
बेळगांवात के.बी.कुलकर्णी सर सतत लोकांसमोर राहीले. बेळगांव महाराष्ट्रात येणारच हा आशावाद घेऊन जगले. स्वतःच्या सच्छील, निर्मळ, प्रामाणीक व कर्तव्यतत्पर रहाणीचे त्यांनी चित्रकलेत प्रतीबिंबित केले. नेहमी सृष्टीतील सौंदर्य शोधले व ते अधीक सुंदर करून आपणास दिले. कलाक्षेत्रात केवळ एक व्यक्ती न रहाता एक विद्यापीठ म्हणून वावरले. विद्यार्थ्यांकडून ते फी देखील घेत नसत. 'फक्त या आणि शिका' एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. चित्रांतून मिळालेल्या पैशांचा आपल्या गरजू मित्रांना वापर करता येईल हेच त्यांनी आयुष्यभर पाहीले. आज सर आपल्यात नाहीत. पण त्यांचे काम व सतत हसतमुख असलेली त्यांची मुद्रा ही पुढील कला विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देत राहील. आज कुलकर्णी सरांची जन्म शताब्दी आहे. चित्रमंदिरातील तपस्वी म्हणून सतत वावरत आलेल्या या कला महर्षीला आमचे कोटी कोटी प्रणाम!
-मं.गो. राजाध्यक्ष










सातत्याने एका हून एक उत्तम लेख. अभिनंदन राजा .
ReplyDeleteYour Affiliate Money Printing Machine is ready -
ReplyDeleteAnd making money with it is as easy as 1..2..3!
Here are the steps to make it work...
STEP 1. Choose which affiliate products the system will advertise
STEP 2. Add push button traffic (it ONLY takes 2 minutes)
STEP 3. Watch the system grow your list and up-sell your affiliate products on it's own!
So, do you want to start making profits???
Check it out here