विकास सबनीस आणि व्यंगचित्रे.



नुकताच विकास आपणास सोडून गेला. आपल्या व्यंगचित्रांसहीत गेला. व्यंगचित्रे हीच त्याची भाषा होती. आणि तेच त्याचे व्यक्त होण्याचे एक माध्यम होते. आधीच या महाराष्ट्रात तशी व्यंगचित्रकारांची वानवाच आहे. आणि त्यातही राजकीय व्यंगचित्रे काढणे हे तर दुर्लभच! व्यंगचित्र ही अशी कला आहे की त्यात केवळ चित्रे काढता येऊन भागत नाही. केवळ त्याची चेहरेपट्टी ओळखता येऊन चालत नाही तर याच्याही पुढे जाऊन ज्या व्यक्तीचे व्यंगचित्र आपण रेखाटतो त्यातील त्याचे वर्म शोधून तो आपल्या कुंचल्याद्वारे आविष्कृत करण्याची ताकद त्यांमागे असावी लागते. असे म्हटले जाते की व्यंगचित्रकार दोन ओळींच्या मधील वाचतो. शंभर अग्रलेखांची ताकद एका राजकीय व्यंगचित्रात असते. पूर्वीच्या काळी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये कला दिग्दर्शक  वॉल्टर लॅंगहॅमर हे राजकीय व्यंगचित्रेही काढीत असत. मोजक्या रेषातून त्यांचा आशय प्रकट होत असे. दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता तो! चर्चील, रुझवेल्ट, हिटलर,मुसोलीनी, चेम्बरलेन, स्टालीन, नेहरू, गांधी अशी जबरदस्त मॉडेल्स त्यांच्यापुढे असत. त्याच सुमारास गोडसे, दलाल,असे लोकही या राजकीय व्यंगचित्रांच्या मालीकेत आले होते. भारत स्वतंत्र झाल्यावर फ्रीप्रेस जर्नल मध्ये दोन व्यंगचित्रकार आपापली कला आविष्कृत करू लागले, त्यापैकी एक होते आर.के. लक्ष्मण व दुसरे बाळ ठाकरे. त्यातही बाळ ठाकरे यांची रेखाटन शैली अभ्यासपूर्ण, स्वयंभू, अशी होती. सर डेव्हीड लो त्यांचे आदर्श होते. आणि व्यंगचित्रकाराला जेवढ्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्यांच्यामध्ये ठासून भरलेल्या होत्या. व्यक्तीची ओळख तर असेच, शिवाय त्यावरील जे भाष्य असेल त्याप्रमाणे ते भाव दाखवीत. हे त्यांना कमालीचे साध्य झाले होते, किंबहुना त्यांना ती निसर्गदत्त देणगीच होती. शरीराची अनॉटॉमी, व्यक्ती कोणत्याही बाजूने दाखविली तरी तिची पटणारी ओळख, चेहेऱ्यावरील सर्व रसांचे भाव, व्यक्तीचे वाढते वय अश्या सर्वच गोष्टींकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. पुढे नोकरी सोडून त्यांनी स्वतःचे व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक' सुरु केले आणि महाराष्ट्रातील हे पहीले व्यंगचित्रांना वाहीलेले नियतकालीक ठरले. आणि त्यांच्या या मार्मिकमुळेच पुढे 'शिवसेना' स्थापन झाली. व्यंगचित्रकार बाळ ठाकरेंचे बाळासाहेब ठाकरे झाले. तोंडातील चिरुटासोबतच अंगावरून घेतलेली शाल हे त्यांचे प्रतीकात्मक चिन्ह झाले. आणि त्यांच्या व्यंगचित्रांचा मागोवा घेणारे अनेकजण उदयाला येऊ लागले. आणि विकास सबनीस ही त्यातील एक झाला.

जे. जे. मधील विकास मला तसा आठवत नाही. प्रा. सवाईंच्या वर्गात तो होता. मला वाटते त्याने आपले तेथील शिक्षण ही पूर्ण केले नसावे. तो जे.जे. विषयी फारसा बोलतही नसे. त्याची व्यंगचित्रकला तेथेही चालूच असायची. पण उपयोजीत कलेमध्ये कोणत्याही एकप्रकारच्या चित्रांमध्ये नैपुण्य असून चालत नाही. त्या कलेची अनेक अंगे आपणास अभ्यासावी लागतात. आणि विकासचा सर्वस्वी कल होता तो व्यंगचित्राकडे. त्याचे आदर्श होते ते बाळासाहेब ठाकरे आणि आर.के.लक्ष्मण. त्या दोघांच्या रेषा त्याला मोहवीत होत्या. विशेषतः बाळासाहेबांची व्यंगचित्रे त्याने अभ्यासायला सुरुवात केली. त्याकाळात सर्वानाच ती मोहवीत असत. त्यांच्या तुलनेत दुसरा एखादाही व्यंगचित्रकार दिसत नव्हता. अर्थात बाळासाहेबांच्या तुलनेत कोणीच त्यांची बरोबरी कधीच करू शकले नाही, कदाचित पुढेही कोणी करणार नाही. पण बाळासाहेबांच्या चित्रांची आठवण करून देणारी व्यंगचित्रे विकास रेखाटू लागला. त्याची चित्रे वृत्तपत्रांतून प्रसीद्ध होऊ लागली. विकासाच्या कलाजीवनाची वाटचाल जरी जाहीरात एजन्सी मधून सुरु झाली, तरी तेथील रेखाटने आणि व्यंगचित्रे त्यावेळचे गोमंतकचे संपादक माधव गडकरींच्या तीक्ष्ण दृष्टीने हेरली व विकासला त्यांनी दर रवीवारी गोमंतकसाठी राजकीय व्यंगचित्रे काढण्यास प्रोत्साहीत केले. त्यानंतर मुंबई सकाळ सुरु झाला व सकाळच्या नानासाहेब परुळेकरांनी विकासला सकाळसाठी व्यंगचित्रे काढण्यास सांगीतले. रुसी करंजीया यांच्या सुप्रसीध्द 'ब्लिट्झ' मधून त्यांच्या व्यंगचित्र कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर 'मीड डे 'मध्ये त्याची चित्रे दिसू लागली. शिवाय अधूनमधून इतरही मराठी, गुजराथी, लोकप्रभा, चित्रलेखा फ्रीप्रेस जर्नल  अश्या  साप्ताहिकातून देखील विकासची सहीनिशी व्यंगचित्रे दिसू लागली. विकासची वेलांटी काढतांना तो एक लंबगोलाकार वर्तुळ दाखवीत असे.

मला आठवते तो आणीबाणीचा काळ. तेंव्हा लोकसत्ता आणि शिवसेना यांचे वितुष्ट होते. त्यामुळे सेनेवरील टीकेसाठी त्यावेळचे संपादक र.ना.लाटे हे विकासकडून मर्मभेदक व्यंगचित्र रेखाटून घेत. व या चित्रांना मुख्य पानावर जागा मिळत असे. केंद्रात प्रथमच काँग्रेस हरली होती, व जनता पक्षाचे सरकार स्थानापन्न झाले होते. पाठोपाठ महाराष्ट्रातही जनता पक्षाने आघाडी घेतली होती. पण विदर्भाने काॅंग्रेसला साथ दिल्याने जनता पक्ष सत्तेवर येऊ शकला नाही. आणि मुख्य म्हणजे
शिवसेने ने मुंबईत उभे केलेले सर्व उमेदवार पराभूत झालें होते. यावर लोकसत्तेमध्ये विकासने अत्यंत मार्मिकपणे व्यंगचित्र रेखाटले होते. 'आम्ही काय कमावले' अश्या मथळ्याखालील त्या चित्रात सर्व पक्ष वाघाची शिकार करून  आल्यावर विजयाप्रमाणे आपापल्या हातात त्या वाघाचे अवयव घेऊन उभे होते. त्यामध्ये जनता पक्ष वाघाचे तोंड, काँग्रेस (सं ) वाघाचे पाय, काँग्रेस (इं) वाघाची शेपटी व शेवटी तोंडात पाईप, अंगावर शाल घेतलेले बाळासाहेब भिंतीवर वाघ लावण्यासाठी केलेले केवळ लाकडी भोक घेऊन उभे होते. एका अक्षराचीही गरज लागू नये असे हे बोलके व्यंगचित्र तेव्हां खूप लोकप्रिय झाले होते. त्यानंतर मा. इंदिराजींची स्टेनगनने हत्या झाली त्यावरही विकासने असें समयोचीत व्यंगचित्र रेखाटले. इंदिराजी स्वर्गात महात्मा गांधींना भेटतात व त्यांना म्हणतात,' बापू, आपल्या देशाने खूपच प्रगती केली आहे. पिस्तुलापासून स्टेनगन पर्यंत ! ' ही बौद्धीक पातळी विकासने खूप चांगल्या रीतीने जोपासली होती. आणि चित्रकारांची कदर करणाऱ्या बाळासाहेबांची ह्या गोष्टींवर नजर असे. एकदा राज ठाकरेनेही मला सांगीतले होते की, विकासने त्याच्या व्यंगचित्रांना दाद दिली होती. तोही विकासला मानत होता

जरी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांशी कोणाचीच तुलना होऊ शकत नसली तरी, त्यांच्या रेषेची, फटकाऱ्याची आठवण विकासची चित्रे नक्कीच करून देत. त्यातील माणसांचा पेहराव, चेहऱ्याचे भाव, मिशा रेखाटण्याची पद्धत, पार्श्वभागातील स्ट्रोक्स या साऱ्या गोष्टी विकासने बरोबर साधल्या होत्या. पुढे शिवसेना तसेच राजकारण या गोष्टीत व्यस्त झाल्याने मार्मिक साठी काम करण्यास बाळासाहेबांना अजीबात वेळ मिळेना. त्याबद्दल ते खन्तही व्यक्त करीत असत. कारण व्यंगचित्र त्यांचा आत्मा होता. त्यांचे संवादाचे माध्यम होते. राजकारणातील अनेकांना लोळविण्याची ताकद होती, आणि लोकोत्तर व्यक्तींचा सन्मान कारण्याचे व्यासपीठ होते. पण नाईलाजाने त्यांना त्यापासून दूर व्हावे लागले. त्यावेळी त्यांनी मार्मिकला योग्य न्याय देईल याची खात्री वाटल्याने विकासकडे ते काम सोपवले. व विकासनेही तो विश्वास पूर्णतया खरा करून दाखवीला. आज बरेच व्यंगचित्रकार कार्यरत आहेत. पण त्यातील मर्म जाणणारे, ते व्यंगात्मकरीत्या आविष्कृत करणारे, राजकारणातील खाचाखोचा माहीत असणारे, त्यांच्या दीर्घ अश्या भाषणातून नेमके मर्म उचलून त्यावर टिपणी करण्याची हातोटी या सर्वच गोष्टींचा विचार करून व्यंगचित्र रेखाटणारे कोणीच डोळ्यासमोर येत नाही. शिवाय यावर सर्वात कळस म्हणजे ते सर्व रेषेच्या ताकदीतून दाखविण्याची क्षमता सुद्धा तितकीच महत्वपूर्ण असते. नाहीतर कित्येकदा सुमार चित्रांना शब्दांची जोड देऊन ते पूर्ण करावे लागते. कित्येकदा वाटते की येथे चित्र नसले तरी चालले असते. बऱ्याच वेळी माणसे ओळखण्यासाठी त्यांच्यावर नांवे लिहावी लागतात. ज्याने रेषेचा आकृत्यांचा, भावाविष्कारांचा सतत सराव केला आहे, रियाझ केला आहे अश्याना या गोष्टी सहज साध्य होतात.

बाळासाहेबांना यातील बऱ्याचश्या गोष्टी वारसा हक्काने मिळाल्या होत्या. त्याचे वडील थोर वक्ते व व्यासंगी लेखक होते. त्यांच्या घरी मोठमोठ्या माणसाची सतत येजा असे. त्यांची व्यंगचित्रे मर्मभेदक तर असतंच, शिवाय त्यांच्यातील निसर्गदत्त चित्रकार हा फार मोठा सहभाग त्यात होता. त्यांच्या चित्रांना कोंदण मिळाले ते, फ्रीप्रेस जर्नल सारख्या इंग्रजी वृत्तपत्रांचे, आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकाचे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळांत नवयुग मधील अत्र्यांचे जळजळीत लिखाण व तितकीच ज्वलंत बाळासाहेबांची व्यंगचित्रे मराठी मनाला पेटवून उठविण्याचे काम करीत असत. अत्र्यांच्या सहवासाने देखील बाळासाहेबांमधील पत्रकार वाढीला लागला. त्यामुळे ते केवळ व्यंगचित्रकार म्हणून राहीले नाहीत तर सर्वांगांनी त्यांचा व्यक्तिविकास झाला. विकास मार्मिकचे काम सुमारे दहा बारा वर्षे करीत होता. 'कार्टूनिस्ट कम्बाईन' ही व्यंगचित्रकारांची संघटना स्थापन करण्यातही त्याचा सहभाग होता. विकासची अनेक व्यंगचित्रे गाजली.

मी अधिष्ठाता असताना जे.जे.मध्ये मी अनेक कलावंतांची चित्र प्रदर्शने आयोजीत करीत असे. विकास हमखास त्याला भेट देत असे.मध्ये मध्ये मी राज ठाकरेंना संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना व्यंगचित्रांचे आकलन होण्यासाठी प्रात्यक्षिकासाठी बोलावीत असे. त्यामुळे विकासाला आनंद होत असे. त्यालाही येण्याची मी विनंती केली होती. पण वेळ जुळून आली नाही. आमच्या भेटी मात्र नेहमी अश्याच अचानक होत असत. कधी प्रदर्शनाच्या वेळी, तर कधी शिवाजी पार्कला तो रहात असे तेथे. एकदा रचना संसद तर्फे व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांच्या चित्रांचे प्रदर्शन होते. त्याच्या उदघाटन प्रसंगी मी गेलो असताना मी बराच मागे बसलो होतो. आणि विकासने मला तेथे पाहीले. तो आयोजकांकडे जाऊन कांही बोलला. व आयोजकांनी माझे नांव जाहीर करून मला फडणीसांच्या चित्रांवर बोलण्याची विनंती केली. वास्तविक तेथे तसे मला कोणीच ओळखत नव्हते. विकास सर्वांच्याच माहीतीचा होता. आणि त्याच्या उंचीमुळे तर तो चटकन ध्यानातही येत असे. नंतर कार्यक्रम आटोपल्यावर मी त्याला विचारताच तो म्हणाला, लोकांना या कलाकारांचे चरीत्र ऐकायचे नसते. तुम्ही त्यांच्या चित्रांवर जे बोलला ते महत्वाचे होते. चित्रे कशी पहायची ते त्यांना यामुळे कळते. वास्तवीक आयोजकांनीच हे करायला पाहीजे. दुर्दैवाने आपल्याकडे ती दृष्टीच नाही.


विकासने आपल्या व्यंगचित्रकलेच्या कारकीर्दीची पन्नास वर्षे पूर्ण केली तेव्हां शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर सभागृहांत आयोजीत ' रेषा विकासची, भाषा ५० वर्षांची' या खास कार्यक्रमांत राज ठाकरे यांच्या हस्ते विकासचा सत्कार करण्यात आला. दोघेही एकाच तोडीचे कलाकार. विकासने आयुष्यात मानसन्मान खूप मिळवले. पण कधी त्याचे भांडवल केले नाही. जागतीक कीर्तीचे व्यंगचित्रकार ऱॅनन ल्युरी, शंतनुराव किर्लोस्कर, यांच्याकडून ते गौरवीले गेले. सतत तीन वर्षे त्यांनी पत्रकारसंघातर्फे दिला जाणारा दिवाळी अंकातील सर्वोत्कृष्ट व्यंगचित्राचा पुरस्कार मिळवला. मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून त्यांना सन्मानीत करण्यात आले. ' गोष्टी व्यंगचित्राच्या' हे व्यंगचित्रावर आधारीत पुस्तक त्यांनी प्रकाशीत केले. व त्यावर आधारीत एकपात्री प्रयोग त्यांनी देश परदेशात शेकड्यानी केले. त्यांनी केलेल्या युरोप दौऱ्यावर आधारित 'युरोप, आय लव्ह यू !' या पुस्तकाचे लेखन केले.

विकासाच्या म्हणण्याप्रमाणे "व्यंगचित्र फक्त विनोदी असून चालत नाही, तर त्याच्या माध्यमातून भाष्य केलेले असले पाहीजे. व्यंगचित्र म्हणजे रंग रेषेच्या माध्यमातून लिहीलेला अग्रलेखच असतो हीच माझी धारणा असल्याने या कलेत मी माझे सर्वस्व ओतले." विकासने गेल्या फेब्रुवारीपासून व्यंगचित्रे काढण्याचे थांबवले होते. शेवटी शेवटी विकास नर्सिंग होममधून औषधोपचार घेऊन आठवड्यानंतर घरी आला होता. त्यानंतर दहा एक दिवसांनी २७ डिसेम्बरला तो नेहमीच्या तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेला असता तेथेच त्याला हृदयविकाराचा जबर झटका आला आणि त्याने विकासाला आपणातून ओढून नेले. आज राजकीय व्यंगचित्रकला जवळजवळ अस्त होत चालली आहे. राजकीय व्यंगचित्रकाराला  राजकारणाचा व्यवस्थीत अभ्यास केल्याशिवाय ते श्यक्य होत नाही. प्रचंड व्यासंग, ध्यास असल्याशिवाय राजकीय व्यंगचित्रकार होणे कठीण आहे. पण बाळासाहेबांच्या पावलावर पाय ठेवून विकासने हे जमवले होते. त्यांच्या एकेका रेषेचा त्याने अभ्यास केला होता. एवढेच नव्हे, तर बाळासाहेब पाईप ओढीत म्हणून विकासने देखील पाईप ओढायला सुरुवात केली होती. अश्या या विकासाच्या जाण्याने राजकीय व्यंगचित्रे पोरकी झाली आहेत. आज बाळासाहेब ठाकरे, आर.के.लक्ष्मण, श्रीकांत ठाकरे, दीनानाथ दलाल, द.ग.गोडसे, विकास सबनीस, राज ठाकरे असे कांही मोजकेच मराठी  कलावन्त राजकीय  व्यंगचित्रकार म्हणून नावारूपाला आले. त्यातील एक नांव विकास सबनीस पुन्हां गळून पडले. विकासाच्या कलाप्रेमी आत्म्याला अश्रुपूर्ण सुमनांजली!

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष








Comments

  1. Do you understand there's a 12 word sentence you can speak to your man... that will trigger deep feelings of love and impulsive attraction to you buried within his heart?

    Because hidden in these 12 words is a "secret signal" that fuels a man's impulse to love, admire and guard you with his entire heart...

    ====> 12 Words Who Fuel A Man's Love Instinct

    This impulse is so hardwired into a man's brain that it will make him work better than ever before to take care of you.

    Matter-of-fact, triggering this dominant impulse is so binding to achieving the best possible relationship with your man that once you send your man one of these "Secret Signals"...

    ...You will instantly find him expose his heart and mind for you in a way he haven't expressed before and he will recognize you as the one and only woman in the universe who has ever truly attracted him.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’