प्रतापगडावरील शिवस्मारक :
सातारा जिल्ह्यांत वाई तालुक्यांत महाबळेश्वर पासून पश्चिमेस आठ मैलांवर प्रतापगड आहे. जावळीजवळ असलेल्या भोरण्या डोंगरावर हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३५४३ फूट उंचीवर बांधण्यात आला. त्रिदळासारख्या दिसणाऱ्या या किल्ल्याला बांधताना महाराजांनी आपणाला शत्रूचा उपसर्ग होणार नाही व सुरक्षीतपणे कोकणावर नजर ठेवता येईल, तसेच युद्धशास्त्रदृष्ट्या महत्वाची तटबंदीची व माऱ्याची जागा आपल्या हातात राहून योजलेल्या कार्यात उपयोगी पडेल हे ध्यानांत ठेवले होते. युद्धशास्त्रदृष्ट्या किल्ले कसे बांधावेत याचे उत्तम ज्ञान असणाऱ्या मोरोपंत पिंगळ्यांकडे हे काम महाराजांनी सोपवले व १६५६ च्या अखेरीस बांधकामास प्रारंभ झाला. यामुळे रत्नागीरी, सातारा, कुलाबा यांच्या सीमेवरही येथून लक्ष ठेवता आले.
पुढे विजापूरकरांनी महाराजांना नेस्तनाबूत करण्याच्या इराद्याने अफझलखानाची नेमणूक केली. अफझलखान सुमारे दहा वर्षे वाई परगण्यात हवालदार असल्याने त्या भागाची त्याला खडा न खडा माहीती होती. महाराजांचे वडील बंधू संभाजी याच अफजलखानाच्या कारवाईने मारले गेले होते. पुढे महाराजांनीच अफजलखानाला प्रतापगडावर कसा नेस्तनाबूत केला हा इतीहास सर्वसृतच आहे. पण ज्या गडावर महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्या गडावर खुद्द महाराजांची स्मृती मात्र दिसत नव्हती.
तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर व थोर स्वातंत्र्यसैनीक श्री. हरेकृष्ण मेहताब यांनी १९५५ च्या मे महीन्यात महाबळेश्वरला भेट दिली असता ते प्रतापगडावर गेले. तेथील श्री भवानी मातेचे मंदीर, अफजलखानाची कबर त्यांनी पाहीली. पण एकूण किल्ल्याची परिस्थीती पाहून त्यांना कुठेतरी खोलवर याची जाणीव झाली. महाराजांच्या आठवणींच्या मागमूसही तेथे नसावा या बाबत त्यांना विषण्णता वाटली. त्या ऐतीहासीक स्थळावर महाराजांचे एखादे भव्य स्मारक उभारावे ही त्यांच्या मनात रुजली व मुंबई राज्यातील महाराष्ट्रीय मंत्र्यांनी ती तात्काळ उचलून धरली. आणि यासाठी मग वेगाने हालचाली सुरु झाल्या. भूतपूर्व बांधकाम मंत्री श्रीमंत मालोजीराव नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मध्यवर्ती मंडळ गठीत झाले. त्यात तत्कालीन मा. मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण, बाळासाहेब देसाई, गणपतराव तपासे, दादासाहेब जगताप, किसनवीर, बाबासाहेब शिंदे आदी मान्यवरांचा समावेश होता. यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी स्थानीक कार्यकर्त्यांची एक समारंभ समिती नेमण्यात आली. स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती सुमीत्रादेवी राणीसाहेब सातारा या होत्या. तसेच त्यामध्ये डी.एस.जगताप, शांताराम गुप्ते, राघूअण्णा लिमये, अनंतराव कुलकर्णी, तात्यासाहेब साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबुराव सणस, गोपाळराव कारखानीस अश्या तोलामोलाच्या व्यक्तींचा समावेश होता.
या स्मारकास येणारा दीड लाख रुपयांचा खर्च ( यात पुतळ्याचा खर्च ८० ते ९० हजारांचा होता) केवळ धार्मीक संस्था,
राजे -महाराजे, वा कारखानदार उद्योगपती यांच्या करवी सहज उभा करणे समितीला शक्य होते. पण महाराष्ट्राच्या शककर्त्याचे हे स्मारक सामान्य व्यक्तींच्या मदतीने उभारावे या उदात्त हेतूने स्मारकमंडळाने सर्वसामान्य लोकांकडून देणग्या गोळा केल्या. त्यामध्ये त्या काळांतील सहा आण्यापासून ते दहा हजारापर्यंत देणग्या जमा झाल्या. अनेक गोरगरीबांनी या पुण्यकार्याला हातभार लावला. स्मारकाचा संदेश गांवोगांवी पोचावा म्हणून 'आग्र्याहून सुटका' व 'रणरागिणी' हे नाट्यप्रयोग साताऱ्याच्या हौशी नाट्यसंस्थेच्या कलाकारांनी केले. छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा पुतळा शिल्पबद्ध केलेले मुंबईचे सुप्रसीद्ध शिल्पकार श्री रामचंद्र पां. कामत यांच्यावर सोपविण्यात आले. हा पुतळा ब्रॉन्झ धातूचा असून चौथऱ्यासहीत त्याची उंची साडेछत्तीस फूट आहे. पूर्वी महाराजांच्या पुतळ्यासाठी राजा रवीवर्माच्या चित्रांचा आधार घेतला जात असे. मात्र हा पुतळा पारसनीस ऐतिहासीक संग्रहालयातील महाराजांच्या चित्रावरून बनविण्यात आला. शिवाजी महाराज आग्ऱ्यास असताना औरंगजेबाने आपल्या खास दरबारी चित्रकाराकडून हे चित्र करवून घेतले, त्या अर्थी तेच विश्वसनीय मानणे मंडळाला जरुरीचे वाटले
श्री. कामत यांनी हा पुतळा नोव्हेंबर १९५५ ते मार्च १९५६ या केवळ चार महीन्यात पूर्ण केला. मात्र हा तीन टनी पुतळा
गडावर चढविण्याच्या दृष्टीने अखंड न करता त्याचे अनेक वेगवेगळे भाग बनविण्यात आले होते. त्या काळात प्रतापगडावर जाण्यासाठी आतासारखा रस्ताही नव्हता. त्यामुळे शिल्पकार कामतांनी तो बसवायच्या जागेवरच जोडून पूर्ण केला. ज्या पुतळ्याची लोक आतुरतेने वाट पहात होते, त्याचे सुटे भाग मुंबईहून प्रतापगडाकडे यायला निघाल्यापासून गांवोगांवी जनतेने त्यांचे मोठ्या उत्साहाने मिरवणुका काढून, ताशे वाजंत्री लावून स्वागत केले. हे अवजड सुटे भाग गडावर नेण्यासाठी लोकांची मदत लागत होती. त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यापायी त्यांना देऊ केलेला मोबदला शिवप्रभूंच्या प्रेमापोटी त्या भाबड्या लोकांनी विनम्रपूर्वक नाकारला.
हा पुतळा चौथऱ्यावर चढविणे ही देखील एक अवघड बाब होती. त्यासाठी उंचच उंच गदम बांधण्यात आले होते. मुंबईहून खास करून गोदीतील अवजड बोजे बोटीवर चढवणारे-उतरवणारे वाकबगार लोक आणून हा पुतळा चौथऱ्यावर चढविण्याचे काम पूर्ण करण्यात आले..इंचाइंचाने हा पुतळा वरती चढवावा लागत होता. शिवप्रभूंच्या पुतळ्याला आपला हातभार लागून जीवन सार्थकी लागल्याची एक पवित्र भावना सर्वांच्या मनात होती.
शेवटी ३० नोव्हेंबर उजाडला. भूतपूर्व पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते होणाऱ्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या ठिकाणाहून हजारो लोक प्रतापगडाकडे रवाना होत होते. मात्र यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने पंडितजींसमोर निदर्शने करण्याचे व महाराजांच्या प्रतिमेचे उदघाट्न त्यांच्या हस्ते न करण्याचे विरोधी पक्षाने ठरवीले होते. आपल्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकांत छत्रपतींविषयी त्यांनी लिहिलेल्या कांही निंदाजनक मजकुरावर जनतेची ही प्रतिक्रिया होती. आचार्य अत्रे, एसेम जोशी आदी समितीचे थोर नेते त्यामध्ये अग्रभागी होते. अर्थात निदर्शक तेथे पोचू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांना बरेच आधी अडवले. मात्र आपल्या भाषणांत पंडीत नेहरूंनी याबद्दल खेद व्यक्त केला. 'जी गोष्ट पंचवीस वर्षांपूर्वी मी कांही अज्ञानामुळे लिहून गेलो, कारण त्या कालखंडाचा मी अभ्यास केला नव्हता. मात्र त्यानंतर मी ती चूक सुधारली व माझ्या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीमधून सदर मजकूर काढून टाकण्यात आला. व पूर्वीच्या आवृत्याही मागे घेण्यात आल्या. आज भारताच्या या महापुरुषाला आदरांजली वहाण्यासाठी मी येथे आलो आहे.' असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले. दुपारी १२.३० वाजता गडावर आलेल्या पंडीतजींचा मुक्काम सुमारे तीन तास तेथे होता. त्यानंतर पंडीत नेहरूंनी तेथे जाहीर सभा घेतली.
ज्या शिवाजी महाराजांची कीर्ती जगभर गाजली, ज्यांच्या अदभूत पराक्रमाने इतिहासाला भव्य रूप प्राप्त झाले त्या देवस्वरूप व्यक्तिमत्वाचे स्मारक होण्यास डॉ. हरेकृष्ण मेहताब यांना प्रत्यक्ष परमेश्वराने संकेत दिला असावा यात शंका नाही!
-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष





Easy "water hack" burns 2 lbs OVERNIGHT
ReplyDeleteWell over 160 000 men and women are utilizing a easy and secret "liquid hack" to lose 2lbs each night in their sleep.
It's simple and works with everybody.
Here's how you can do it yourself:
1) Grab a clear glass and fill it up half full
2) And now follow this crazy hack
you'll become 2lbs lighter when you wake up!