आमचा मार्शल
त्यावेळी पॉमेरियन जातीचे छोटे कुत्रे पाळायची एक टूम आली होती. आमचे डीन हणमंते यांच्याकडे एक त्या जातीची कुत्री होती व तिला पिल्ले होणार होती. मी माझ्यासाठी एक पिल्लू ठेवण्यास सांगीतले पण तिला पिल्ले होण्याआधीच ती कुत्री मरण पावली. आणि त्यानंतर मी हर्षदाला सांगीतले की आपल्याला मोठी जागा मिळूदे मग मी तुला नक्की तुला हवा तसाच कुत्रा घेऊन देईन. आणि एकदा ती संधी आली. एक दिवस माझे मित्र वासुदेव निब्रे यांनी मला सांगीतले की बदलापूर येथे एकाकडे अल्सेशियन कुत्रीला पिल्ले झाली आहेत. त्यासाठी पांचशे रुपये किंमत आहे. तुला हवे म्हणून मी त्यांना ॲडव्हान्स म्हणून शंभर रुपये दिले आहेत. तरी तू तेथे जाऊन उरलेले पैसे देऊन ते घेऊन ये. मी घरी सांगताच हर्षदचा आनंद गगनात मावेना. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तो मागे लागला. माझीही बदलापूर येथे जाण्याची ती पहीलीच वेळ होती. येताना त्या छोट्याश्या बुटकुल्याला आणण्यासाठी एक छोटी बॉक्स सारखी प्लॅस्टीकची ब्याग विकत घेतली. छोटीशी दुधाची बाटली सोबत घेतली. व बोरीवली ते दादर व दादर ते बदलापूर अश्या लोकलच्या गर्दीतील प्रवास आम्ही पार पाडला. सदर इसमाचे घर स्टेशनपासून थोडे दूरच होते. डोक्यावर बाराच्या सुमारचा सूर्य तळपत होता. आम्ही पत्ता शोधत चालत चालत एकदा त्या ठिकाणी पोचलो आणि आता आमचा छोटुकला घ्यायचा व माघारी परतायचे या आनंदात घाम पुसत दाराची बेल वाजवली. एका महीलेने दार उघडले.
आम्हांला दरवाजातच उभे करून त्या महीलेने येण्याचे कारण विचारले. मी जेंव्हा त्यांना निबरेंनी कुत्र्याच्या पिल्लासाठी पाठवले आहे, असे सांगताच त्या म्हणाल्या, आम्ही अजून त्यांचे पेपर बनवीले नाहीत. तोपर्यंत मला असे काही पेपर तयार करावे लागतात याची कल्पनाही नव्हती. नंतर त्या म्हणाल्या, निबरेंचा कांही तरी गैरसमज झालेला दिसतो. मी त्यांना सांगीतले होते ती किंमत पाच हजार रुपये होती. व ॲडव्हान्स म्हणून पाचशे मागीतले होते. ते ऐकल्यावर मी तेथेच त्यांचा निरोप घेतला. आपण कोणी अनोळखी जरी घरी आला तरी त्याला निदान पाणी देतो. पण या बाईने माझ्यासोबत लहान मुलगा असूनही एका शब्दाने साधे पाणीही विचारले नाही, अथवा घरात घेतले नाही. हर्षद नाउमेद होऊन परतला. मात्र एक दिवस जिना चढताना त्याला एका घरातून कुत्र्याच्या पिलाची कुईकुई ऐकू आली. व त्याने मला सांगताच मी त्या घरी गेलो. खरंच हर्षदचे कान एकदम तीक्ष्ण होते. त्यांच्याकडे नुकतीच त्यांच्या डॉबरमनला पिल्ले झाली होती. त्या छोट्याश्या पिल्लाना ठरावीक उष्णतामानात ठेवलं होते. लहान वयातच त्यांच्या शेपट्या कापल्या होत्या. त्यांची आई सोनी भीतीदायकच होती. आणि त्यातील एक पिल्लू मी हर्षदसाठी घेतले. यांची किंमतही पाच हजारच होती, अन मला त्यांनी ते साडेतीन हजाराला दिले. आणि माझ्या बोरीवलीच्या घरात त्याचे आमच्या सोबतच वास्तव्य सुरु झाले.नंतर कळायला लागले की चांगल्या पेडीग्रीचा कुत्रा पाळणे म्हणजे काय कसरत असते ती. आणि त्याला ताब्यात घेतले माझ्या दोन्ही मुलांनी. हर्षद व केतन यांनी. हर्षदने त्याचे नामकरण 'मार्शल असे केले. परळच्या पशु वैद्य इस्पितळातील वरीष्ठ डॉक्टर जोशी हे त्याच्या आईला पहायला येत. तेच आमच्या मार्शलचेही डॉक्टर झाले. त्याचे सर्व पेपर तयार केले तसेच त्याचे कॅनॉल क्लब मधेही नांव नोंदवले. आणि येथून पुढे आमचा डाॅबरमन कुत्र्याविषयीचा अभ्यास सुरू झाला. त्याच सुमारास ‘डाॅबरमन गॅंग’ नांवाचा चित्रपटही आला होता. डाॅबरमन हे एका जर्मन व्यक्तीने शोधून काढलेली प्रजाती होती. आणि तीही आक्रमक अशा धनगरी जातीच्या कुत्र्यावर प्रयोग करून.
आमच्या कॉलेजच्या पाठी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या आवारात पोलीस कुत्र्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु असे. एक दिवस आमचा सदाशीव कदम शिपाई त्यापैकी एका पोलीसाला घेऊन आला, व त्याने मार्शलला शिकविण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कधीही रागवायचे नाही अथवा त्याला मारायचे नाही, ही ताकीद त्या पोलिसानेच आम्हांला दिली. हे शिक्षण त्याच्या सहा महीन्याच्या वयातच द्यावे लागते. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चोक चेनने मार्शलचा गळा सुजून निघे, त्यावर फोड येत. संधी मिळाली की तो गुपचूप सावलीखाली लपून बसे. लवकरच मार्शल रोल करणे, हाताला गच्च पकडून एखाद्याला ओढून आणणे. स्टे म्हणताच थांबणे, हील म्हटले की चालणे, रोल करणे, कॅच म्हटले की पकडणे अशा सर्वच गोष्टीत तो तरबेज झाला. नाकाला वास देऊन लपवून ठेवलेल्या वस्तूला शोधून काढणे, स्वतःच्या मालकावर कोणी हल्ला करायला आले की त्याच्यावर तुटून पडणे अश्याही गोष्टीत पारंगत झाला. एवढा की माझ्या नातेवाईकांनी जरी मला शेकहॅंड करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला वाटे ते मला अपाय करतील, म्हणून तो त्वेषाने त्यावर तुटून पडण्याचा प्रयत्न करे.
मार्शलच्या सुदैवाने आम्ही पुढे व्ही टी ला रहायला गेलो. आणि ते त्याच्याही फायद्याचे पडले. कारण हातात मावणारा मार्शल आता आकाराने प्रचंड झाला होता. अशा जातीवंत कुत्र्यांना व्यायामाची अत्यंत गरज असते, जी आमच्या फ्ल्यॅटमध्ये शक्यच नव्ती. जे.जे.च्या आवारात मात्र समस्त जेजे करांचा आवडीचा झाला आमचा मार्शल. आर्किटेक्चरची मुले जेंव्हा तेथे क्रिकेट खेळीत असत, तेंव्हा कित्येकदा त्यांचा बॉल आमच्या आवारात येऊन पडे. मग त्या विद्यार्थ्यांच्या मार्शलच्या नावाने ' मार्शल बॉल ' अश्या आरोळ्या चालू होत. आमच्या पैकी कोणी मार्शलला बॉल आणण्यास सांगीतले की त्या गवतात मान खुपसून मार्शल जो जाई तो बॉल घेऊनच येत असे. मात्र आल्यावर तो त्यांच्याकडे बॉल दिल्यासारखे करे व ते घ्यायला आले की एक झटका मारून पळत जात असे. मात्र त्या विद्यार्थ्यांनाही त्याने जीव लावला होता. अश्यातच त्याला जोडीदार म्हणून माझ्या एका मित्राने बाऊन रंगाची डॉबरमनची एक मादी आणून दिली. तिचे नांव ठेवले 'स्वीटी'. मात्र नांवाने जरी ती स्वीटी असली तरी स्वभावाने एकदम तिखट होती. आम्हां चौघांशिवाय तिने कोणालाच ओळखले नाही. या कुत्र्यांचे जबडेच एवढे मोठे असतात की त्याच्यामध्ये मार्शल संपूर्ण न सोललेला नारळ पकडून येत असे. कंपाऊंडमधील मोठमोठे दगड मार्शल उचलून आणे. त्यातही कोणता जास्त जड आहे याचा अंदाज घेत असे व आमच्या बंगल्यावर असे अनेक दगड त्याने साठवून ठेवले होते. मार्शल - स्वीटी जोडी आता जे.जे.च्या कंपौंडमध्ये प्रसीद्ध झाली होती. आमचा केतन त्याला अंघोळ घालायला निघाला की मार्शलला त्याचा आधीच अंदाज येत असे व तो एकदम जड होऊन जमिनीला चिकटून राही. मग एखादे जड ओझे ओढावे तसे त्याला खेचावे लागे. मात्र त्याची आंघोळ झाली की त्याच्या संपूर्ण शरीरावर घोड्याप्रमाणे एक प्रकारची झळाळी येत असे. मी कॉलेजमधून खाली आलो की मार्शलला त्याचा नेमका अंदाज येई व नंतर त्याचे जे भुंकणे सुरु होई ते वरचे छप्पर फाटेल की काय असे वाटे. कुत्रा आपल्या घरत असला की त्याचे आपल्याशी झालेले सर्व संभाषण आपल्याला कळते. त्याच्या भुंकण्याचेही वेगवेगळे प्रकार असतात. काही मागण्याचे असले की वेगळे, रागावला की वेगळे, परक्या माणसावर वेगळे असे अनेक प्रकार आपण त्याच्याकडून शिकतो. आपंण बोलत असलो की तो नीट कान देवून मान हलवीत जेव्हां ऐकत असे, तेव्हां त्याच्याकडे पहाण्यात मजा येई
माझा मोठा मुलगा केतन याच्यावर त्याचा फार जीव होता. तो एकदा तीन दिवसासाठी पुण्याला गेला होता, त्यावेळी शांतपणे बाहेरील लॉन वर तो गप्प बसून त्याची वाट पहात असे. आमच्या बंगल्याला चारी बाजूनी मोठमोठे काचेचे दरवाजे होते. त्याला मोठाले असे चौकोन असून त्याला काचा बसवल्या होत्या. एक दिवस आम्ही सर्वजण आत बसलो असताना केतनने बाहेरून मार्शलला हाक मारली. व त्याच क्षणी कोणताही विचार न करता मार्शलने हिंदी चित्रपटात स्टंट करतात, त्याप्रमाणे त्या काचेच्या चौकोनातून जोराने जी झेप घेतली, ती चक्क ती काच फोडून तो बाहेर पडला. त्याच्या कल्पनाही नव्हती की समोर काच आहे. मी याला काय झाले असावे हे पहायला घाबरतच बाहेर गेलो, अन पहातो तो काय? तोंडावर जखमा झालेल्या, त्यातून रक्त झिरपत आहे, अश्या अवस्थेत मार्शल जणू कांही काहीच झाले नाही अश्या तऱ्हेने उभा!
सकाळी आम्ही बंगल्याच्या आवारात फिरत असू. जोडीला मार्शल-स्वीटी ची जोडी असे. मात्र मार्शल थोडा आळशी होता. त्याची एक फेरी होईपर्यंत स्वीटी दोन फेऱ्या करून परत येत असे. मार्शल मधेच व्हरांड्यात जाऊन बसला की स्वीटी जाऊन त्याला ढुश्या मारून परत फिरायला भाग पाडीत असे. असा ह्या मार्शलला एकदा पावसाळ्यात मी रात्री बाहेर टॉयलेट साठी घेऊन गेलो होतो. तेथे त्याने कोणाला पाहीले देव जाणे, त्याने जो झटका मारून भुंकत पुढे गेला, व माझ्या हातात त्याची चेन असल्यामुळे मी सुद्धा त्याच्या मागोमाग घसरत गेलो व खाली पडलो. मी जेंव्हा डोळे उघडले तेव्हां माझ्या सभोवार अनेक नातेवाईक उभे असलेले मला दिसले. डॉक्टरही आले होते. माझी पत्नी आपला हात धरून बसली होती. तिचा हात फ्रॅक्चर झाला होता. नंतर मला कळले की मीं जेव्हां पडलो तेंव्हा डोके आपटून माझी शुद्ध गेली होती. आवाज ऐकून माझी पत्नी धावत आली व तीही पाय घसरून पडली. कारण पावसाचे शेवाळ तेथे धरले होते. व माझ्या पत्नीचा हात फ्रॅक्चर झाला. आम्हा दोघांचीही रवानगी इस्पितळात झाली. मात्र ते कांही दिवस मार्शल एकदम गप्प गप्प होता. आपल्या हातून काहीतरी चुकीचे घडले आहे, हे त्याच्या मनाला सतावत होते.
अशी ही मार्शल -स्विटीची जोडी आमच्या कंपाऊंड मध्ये आमचा आधार होती. कोणाचीही आत शिरायची हिम्मत होत नसे. आणि अश्या वेळी एके रात्री आम्ही वरच्या मजल्यावर बसलो असता, आम्हाला मार्शलच्या भुंकण्याचा आवाज आला. हे त्याचे नेहमीचे भुंकणे नव्हते. त्यामुळे आम्ही खाली आलो तर एक चोर आमच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. मार्शलच्या केवळ भुंकण्याने तो गर्भगळीत होऊन बाहेरील जाळीला पकडून उभा होता. मार्शल व स्वीटी अाम्हा कोणालाही आवरता येईनात. मार्शलला आम्ही जाळीला साखळीने बांधून ठेवले, पण त्याने ती संपूर्ण जाळीचं उखडून काढली. मार्शल बराच ताकदवान होता. तो संतापला की त्याच्या पाठीवरील मध्यभागावरील केस उभे रहात. तो पर्यंत वाॅचमन आले. त्यांनी चोराची गचांडी पकडताच तो हातापाया पडून रडू लागला व म्हणाला, मला पोलीसांच्या ताब्यात द्या, पण या कुत्र्यांपासून वाचवा. शेवटी वाॅचमननी त्याला चार फटके मारले व पोलील ठाण्यावर घेवून गेले.
मार्शलला झोपण्यासाठी आम्ही एक गादी केली होती. पण त्याची आवडती जागा म्हणजे आमचा बिछाना. पटकन उडी मारून तोवर येई व तेथेच आमच्या सोबत झोपे. व संपूर्ण जागाच तो व्यापून टाकी. त्यावेळी माझ्या पत्नीकडून तो आपला गळा खाजवून घेत असे. व हळूहळू मान खालीवर करीत संपूर्ण गळ्यावर एखाद्या माणसाप्रमाणे खाजवून घेत असे. जेवणाची वेळ झाल्यावर तो आपल्या जागी येऊन उभा राही. त्याच्यासमोर जेवण ठेवले की त्याला 'इट मार्शल' म्हटल्याशिवाय त्याने कधीही तोंड लावले नाही. एवढा शिस्तप्रिय होता मार्शल. उभ्या आयुष्यात त्याने कधीही घरात शी अथवा सू केली नाही. त्यासाठी त्याला जरी बांधलेले असले तरी भुंकून तो जाणीव देत असे व सोडल्यावर बाहेर जाऊन आपले विधी उरकून घेत असे. मार्शल अश्या रीतीने आमच्या कुटुंबातील एक सदस्यच झाला होता. 'मार्शल राजाध्यक्ष' या नांवानेच आमच्या सहीत सर्वच त्याला ओळखीत असत. या मार्शलला गोड पदार्थाची मात्र खूप आवड होती. विशेषतः पेढे हे त्याचे आवडते खाद्य. पेढा पाहीला की त्याच्या तोंडातून लाळ टपकू लागे. तसेच आम्ही कधी बाहेर जेवायला गेलो की तेथून येतांना त्याच्यासाठी व्हॅनीला आइस्क्रीम आणावेच लागे. मध्यंतरी आमची स्वीटी अचानक मरण पावली. त्यावेळी मात्र मार्शल थोडा हळवा झाला होता.
फिरायला जाणे ही सुद्धा मार्शची आवड होती. आम्ही जेव्हां प्रथम गाडी घेतली, तेंव्हा त्याला गाडीतून नेण्याचा प्रयत्न केला. पण प्रथमच गाडीत शिरत असल्याने तो आत यायलाच तयार होईना! कसेबसे आम्ही जबरदस्तीने त्याला आत घालून गच्च पकडून ठेवले. व्ही टी पासून कुलाब्यापर्यंत फेरी मारून आलो. घरी येताच मार्शलने जी बाहेर उडी मारली, ती थेट घरात. असे दुसऱ्या दिवशीही घडले अन नंतर मात्र चमत्कार झाला. मार्शल स्वतः येऊन भुंकून भुंकून गाडीकडे नेऊ लागला. त्याला आता फिरायची चटक लागली होती. दर शनीवारी मुलगा घरी असल्यामुळे आम्ही त्याला घेऊन कुलाब्यापर्यंत फिरवून आणत असू. एखाद्या शनिवारी जर वेळ झाला, अन मी बाथरूम असलो की बाथरूमवर जोरजोराने खरडून तो बोलावीत असे. तसेच त्याची चोक चेन, त्याचा बॉल बाहेरील ड्रावर मध्ये असे, तेही त्याला बरोबर माहीत होते. ती काढण्यासाठी तो ड्रॉवर खरवडून काढण्याचा प्रयत्न करीत असे. एखाद्या वेळी जर का त्याला जवळपास नेवून आणले की त्याचे समाधान होत नसे. मग तो गाडीतून उतरण्यास साफ नकार देई. मग परत त्याला लांबवर न्यावे लागे. आणि प्रत्येक शनीवार त्याच्या ध्यानात असे. एरवी इतर दिवशी तो हे कधीच करीत नसे. एकदा आम्ही चौपाटीवर गाडी थांबवून मी व मार्शल दोघेच गाडीत राहीलो व बायको व मुले काही खाण्यासाठी आणण्यास बाहेर पडली. मार्शल मागील सीटवर आरामात पहुडला होता. एवढ्यात एक भिकारी आपला डबा खटखटावत गाडीकडे आला व त्याने आत हात घातला. त्याक्षणी मार्शलने आपले डोके बाहेर काढले. त्याचा अवतार पाहताच त्या भिकाऱ्याने जी धूम ठोकली ती पहायला मजा आली.
रात्री मार्शलला आम्ही वरती आमच्या बेडरूम मध्ये झोपवत असू. रात्री झोपायला जाताना अथवा सकाळी वरच्या मजल्यावरून खाली आणताना त्याला, चल मार्शल म्हणायचा अवकाश, तो आपले सर्व अंथरूण, सांखळी एकत्र करून वरून खाली येण्यास निघे. वाटेत सांखळी पायात येऊ नये याचीही खबरदारी तो त्या साखळीला गोळा करून तोंडात ठेवून घेत असे. मला आश्चर्य वाटते, ही अक्कल, हे गुण त्याला कोठून मिळाले असतील? हे त्याचे सर्व वागणे माणसाप्रमाणे असे. त्याच्यावर जर का कधी कोणी रागावले की, तो पूर्ण जमीनीशी सपाट होऊन तोंड खाली करून बसत असे. त्यावेळी त्याच्या तोंडून गुर्रर्रर्र गुर्रर्रर्र असे निषेधाचे स्वर निघत असत. आम्हांला त्याची ही नाटके पूर्ण माहीत होती. मात्र त्यावेळी जर का प्रेमळ आवाजात त्याला हाक मारली, की लगेच तो पटकन उठे व नेहमीच्या खेळीमेळीच्या आवेशात येत असे. मी ऑफिसमधून दुपारी जेवायला आल्यावर थोडावेळ बाहेरील सोफ्यावर आडवा होत असे. त्यावेळी मार्शल सोफ्याला चिकटून मान माझ्या पायावर टेकवूनबसून राही. व मी तेथून उठल्यावर पटकन उडी मारून सोफा ताब्यात घेई व झोप काढे. हर्षदने बऱ्याच वेळा त्याला खाली झोपण्यासाठी शिकविण्याचा प्रयत्न केला. एक दिवस हर्षद हट्टाला पेटला व त्याने ठरवले आज त्याला खाली झोपायला लावणार. पण थोड्या वेळाने पाहतो ते मार्शल वर व हर्षद खाली झोपला होता. केतनने त्याला बऱ्याच गोष्टी शिकविल्या. केतनवर त्याची जरा जास्तीच मर्जी होती. दोघांची बऱ्याच वेळा जुगलबंदी चालू असे.
असा हा मार्शल आमच्या सर्वांच्या जीवनातील एक सांधणारा दुवा होता. कुत्रा आपल्या माणसावर प्रेम म्हणजे काय करतो, किती विश्वास देतो हे मार्शलच्या रूपाने आम्हांला समजले. व्ही टी च्या बंगल्यातील त्या बारा वर्षांच्या वास्तव्यात, तेथे कसलीही सुरक्षा व्यवस्था नसतांना आम्ही राहीलो, ते केवळ आमच्या मार्शल-स्विटीमुळे. अख्या आवारात, कला संचालनालयाच्या लोकांना, मार्शल बद्दल एक जिव्हाळा प्राप्त झाला होता. मात्र देवाने माणसाच्या या सच्च्या मित्राला आयुष्य मात्र खूपच कमी दिले आहे. अवघे दहा बारा वर्षांचे. आणि आमच्या मार्शलने देखील तितकीच वर्षे आमची सोबत केली.
२१ डिसेंबर १९९१ साली जन्मलेल्या आमच्या मार्शलने २३ फेब्रुवारी २००१ रोजी आमचा निरोप घेतला. आम्हांला दुःखात लोटून. आमच्या काळजाची चिरफाड करून. आम्ही त्याच्यावर अधूनमधून रागावलो होतो त्याला माफ करून, कधीही आमच्यावर न रागावता, आमची सतत काळजी घेऊन आम्हाला जपत आला. आणि तो सतत त्याची कापलेली छोटीशी शेपटी आमच्यासाठी हलवत राहीला. कित्येक वर्षांची सोबत त्याने दिली. आणि त्या शेवटच्या क्षणी त्याची माफक मागणी काय होती? तर शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा. माझ्याशी बोलत रहा. आजवर आम्ही एकत्र मिळून आनंदाचे क्षण घालवले, इतके जवळ आलो. आणि या क्षणी तुम्ही तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी अश्रू आणू नयेत. माझे डोळे मिटेपर्यंत मला घट्ट धरून रहा. मला खुशीने निरोप द्या! आणी त्याच्या त्या शेवटच्या दिवसात त्याला जिनाही चढता येईना म्हणून आम्ही दोघेही त्याच्या सोबत, त्याला जवळ घेऊन, त्याच्या अंगावर हात ठेवून झोपू लागलो. माझी पत्नि त्याच्या कानांत बोलत असे. त्याला धीर देत असे. त्यावेळी तो बोलत असे ते त्याच्या डोळ्यावाटे. कदाचीत आपल्यामुळे आम्हांला त्रास होत आहे या जाणीवेने तो दुःख व्यक्त करीत असावा.
यावेळी आम्हांला आठवली ती 'ज्युलिया नेपियर'ची एक कविता. अगदी हृदयाला भिडेल अशी. गदगदून सोडणारीआणि डोळ्यातून अश्रूंचा पाट वहायला लावणारी.
THE LAST BATTLE
If it should be that I grow frail and weak
And pain does keep me from my sleep
Then will you do what must be done
For this- the last battle-can’t be won.
You will be sad I understand
But don’t let grief then stay you hand
For on this day, more than the rest
Your love and friendship must stand the rest.
We have had so many happy years
What is to come can hold no fears
You’d not want me to suffer so
The time has come, please let me go.
Take me to where my needs they’ll tend
Only, stay with me till the end
And hold me firm and speak to me
Until my eyes no longer see.
I know in time you will agree
It is a kindness you do to me
Although my tail its last has waved
From pain and suffering I have been saved.
Don’t grieve that it must now be you
Who has to decide this thing to do.
We’ve been so close-we two- these years
Don’t let your heart hold any tears.
- Julia Napier.
कदाचीत हा मार्शल पुन्हा आमच्या घरात जन्म घेऊन आला असेल! पुन्हा आमच्यावर माया जडवायला, प्रेम करायला, आणि खरोखरीच कुटुंबाचा घटक म्हणून आलेला. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर!
-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

Did you know there's a 12 word sentence you can say to your man... that will trigger deep feelings of love and instinctual appeal for you buried inside his chest?
ReplyDeleteThat's because deep inside these 12 words is a "secret signal" that triggers a man's instinct to love, adore and guard you with his entire heart...
12 Words That Fuel A Man's Desire Response
This instinct is so hardwired into a man's genetics that it will drive him to try harder than before to do his best at looking after your relationship.
As a matter of fact, fueling this powerful instinct is absolutely important to achieving the best ever relationship with your man that the instance you send your man a "Secret Signal"...
...You will instantly notice him open his mind and heart to you in such a way he's never expressed before and he will identify you as the only woman in the galaxy who has ever truly interested him.