सौ. भारती : माझी सहचारीणी
मला अजूनही आठवतो तो दिवस. १ डिसेंबर १९६८. त्यादिवशी मी जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये लेक्चरर म्हणून नोकरीला लागलो. तो दिवस रवीवार असल्याने मी दोन तारखेला कामावर रुजू झालो. तसे जे.जे. मला नवीन नव्हते. अगदी बालपणापासूनच त्याची लागलेली ओढ माझ्या वडीलबंधूंनी पूर्ण करून मला तेथील जे.जे. इंस्टीट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचा विध्यार्थी हे नामाबिधान लावण्याची संधी मिळवून दिली. या काळात अनेक जणांच्या आशीर्वादाचे हात माझ्या मस्तकावर मला लाभले. त्यामुळे येथे अध्यापक म्हणून आल्यावर मला सर्वप्रथम जाणवले ते माझ्या घरात, माझ्या कुटुंबात, माझ्या जे.जे.त मी परत आल्याची सुखद जाणीव. फरक इतकाच होता, की यापूर्वी मी घोळक्यासह शिक्षकांच्या टेबलासमोर उभा असे, ते आता माझ्यासमोर माझ्या विद्यार्थ्यांचा घोळका समोर घेऊन. आणि माझे सर्वच गुरुवर्य सोबत असतांना आणि त्यांचे प्रेम मला सतत लाभत असताना मला त्यांच्या शेजारी बसण्याचे भाग्य लाभले हे देखील ईश्वराने मला दिलेले लेणं होते. आणि तेथून सुरु झाली ती माझी शिक्षकी पेशातील वाटचाल.
शाळेत असल्यापासूनच आम्ही सर्व मुलांच्या शाळेत शिकलो असल्याने येथील वर्गात असलेल्या मुलींकडे मोकळेपणाने बोलण्यास थोडी अडचणच वाटे. त्यातही माझे मुलींशी बोलणेही कमी असे. एकतर सतत वर्गकाम, त्यातून वेळ काढून आमच्या शिक्षकांच्या ओळखीने अधून मधून बाहेरची कामे करण्यातच वेळ जात असे. त्याकाळात मध्यमवर्गीय मुलांना प्रेम करणे वगैरे गोष्टी जमत नसत, व परवडतही नसत, अथवा त्यामध्ये ती मुले सहसा पडत नसत. अश्याच मुलांपैकी मीही एक होतो. पण मी जेव्हां अध्यापक म्हणून आलो, तेंव्हा प्रथम वर्षातील एक गोडशी मुलगी सतत जिन्यावरून येजा करीत असतांना मला दिसे. कधी फ्रॉक, तर कधी स्कर्ट घातलेल्या या मुलीला मी जेव्हां पाहीले तेव्हांच माझ्या मनात ती भरली. आणि एक दिवस पट्टी मागण्याच्या निमित्ताने मी तिला बोलावले. हळू हळू तिच्याकडूनही प्रतिसाद मिळाल्याचे संकेत मिळू लागले. तेंव्हा गप्पा मारता मारता मला समजले की ती चित्रपट दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांचे फोटोग्राफर बंधू बाळ जोगळेकरांची मुलगी भारती आहे. वसंतराव व सुमतीबाई जोगळेकर एक आदर्श म्हणून फिल्मी दुनियेत ओळखले जाणारे आदरणीय असे जोडपे होते. जणू विष्णू-लक्ष्मीचा जोडा. आदर्शवत. आणि मी त्यादिवशी तिला मागणी घातली व तात्काळ तिचा होकार मिळाला. अर्थात घरामध्ये कळवूनच. आणि लगोलग ही बातमी सर्व कॉलेजभर पसरली. आणि एक प्रेमगाथा सुरु झाली.भारतीचे जन्मापासूनचे बालपण तिच्या तिच्या आजोळी गिरगांवला आजी-आजोबा, मोठी मावशी आक्का, व इतर मावश्यांच्या लाडाकोडात गेले. गिरगांवच्या राममोहन शाळेत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने जे.जे.कॉलेजपर्यंत प्रवेश घेईपर्यंत आपल्या मावसबहीणी व भावासोबत तिचे वास्तव्य होते. एरवी तिचे आई वडील हे वरळीला रहात असत. आजोळी देखील ती सर्वांचीच लाडकी होती.
अर्थातच भारतीचे शिक्षण पूर्ण व्हायला अजून तीन वर्षे बाकी होती व त्यानंतरच विवाह करण्याचा आम्हा दोघांचाही मानस होता. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर म्हणजे १९७२ साली ती ‘मा’ या जाहीरात संस्थेत काम करू लागली. व १९७३ साली
२४ फेब्रुवारी रोजी वरळीच्या 'सन व्हिला' या हॉल मध्ये शनीवारी आमचा विवाह संपन्न झाला. आणि सांताक्रूझ वाकोला येथील दोन खोल्यात आमचा संसार सुरु झाला. आम्ही दोघेही एकत्र कामाला जायला निघत असो. परत येतांना आम्ही मिळूनच येत असू. पण रोज रोज होणाऱ्या उशीरामुळे पुढे भारतीने आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. व पुढे ती माझ्या कामातच मला मदत करू लागली. ते दिवस होते आमच्या दैवाच्या कसोटी पहाण्याचे. एका वर्षातच माझा मोठा मुलगा केतन याचा ७ जानेवारी १९७४ साली जन्म झाला. त्यानंतर ३ वर्षांनी ३० मार्च १९७७ साली माझ्या लहान मुलाचा, हर्षदचा जन्म झाला. आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. त्यातही भारतीवरच ती जबाबदारी जास्ती होती. भारती ही खरोखरीच उत्कृष्ठ कलाकार आहे. प्रत्येक गोष्टीकडे ती नेहमी कलात्मक दृष्टीने पहात असे. साध्या साध्या गोष्टीतून ती सौंदर्य वेचीत असे. मग ती गृह सजावट असो, ड्रेस डिझाईन असो, लेटरींग टायपोग्राफी, डिझाईन असो किंवा टाकावू वस्तूमधून केलेल्या सजावटीच्या सुंदर कलात्मक वस्तू असोत, भारतीचा हात लागताच त्यांना एक सौंदर्य चिन्हांचा आकार येत असतो.
आणि याचा फायदा झाला तो आमच्या ओढाताणीच्या काळात. भारतीने केतन-हर्षद यांच्या वाढदिवसाचेही डिझाईनर कपडे स्वतः शिवले होते. माझी कामाची वेळ जरी दुपारी ३.३० पर्यंत होती, तरी मी आमच्या साठे सरांसोबत बाहेरील कामे करीत होतो, त्यामुळे बहुदा मला रोजच घरी परतण्यासाठी रात्री उशीर होत असे. दोन्ही मुलांना सकाळी तयार करून शाळेत नेवून पोचवणे, त्यांना परत आणणे ही कामे तर होतीच, शिवाय त्या काळात घरून डबा जाण्याची प्रथा होती, त्यासाठी सकाळी लवकर उठून डबेवाला येण्याच्या आत माझ्या डब्याची तयारी पण भारतीला करावी लागे. घरी कधीच कसले काम अथवा स्वयंपाक न केलेल्या भारतीने थोडक्याच अवधीत सर्व काही पदार्थ करण्याची कला आत्मसात केली. एवढेच नव्हे तर पाककृतिची पुस्तके वाचून, तसे पदार्थ ती बनवू लागली. केक, पेस्ट्रीज सारखे पदार्थ देखील आमच्याकडे होऊ लागले. मग तिने दिलीप प्रभावळकरांच्या काकींकडे चायनीज पदार्थ शिकून घेतले, वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सिस शिकून घेतल्या. मांसाहारी पदार्थांच्या अनेक प्रकारच्या रेसिपीज तिने बनवील्या.एखादी गोष्ट नवीन पाहीली अथवा चाखली की भारतीने ती आत्मसात केलीच म्हणून समजा. आज ती बीर्याणी, मटण चिकनचे विवीध प्रकार करणे, डेसर्ट करणे यांत पूर्ण पारंगत आहे. लग्नाआधी स्वयंपाकाला हातही न लावलेल्या भारतीने व्हेज-नॉन व्हेज अश्या अनेक गोष्टी आत्मसात केल्या. सूप तर ती अनेक प्रकारची करते. आजच्या काळात पुरणपोळी हा प्रकार कित्येकाना शक्य होत नाही. पण भारतीने तोही यशस्वी रित्या आत्मसात केला. तिच्याकडे तिने लिहीलेल्या रेसीपींची भली मोठी वही आहे, की ती जर कां छापली तर एक रेसीपी बुक तयार होईल. कोणताही विषय असो, त्यात एकदा का हात घातला की तो पुरेपूर आत्मसात केल्याशिवाय तिला रहावत नाही.
भारतीचे मला नेहमीच कौतुक वाटत असे की हीला ह्या गोष्टी जमतात कश्या? कदाचीत आपणातील हे गुण तिला माहीती नसणार. पण आमच्या फ़ॅमीली डॉकटर यांच्याशी चर्चा करून, ते देत असलेल्या औषधांवरून अनेक प्रकारच्या औषधांची माहीती आज तिला आहे. यात सतत डाॅक्टरांशी विचार विनीमय करणे, त्यातील घटक समजून घेणे यामुळे डाॅक्टरी पेशाचे बरेच ज्ञान तिला उपलब्ध आहे. सर्व साधारणपणे होणाऱ्या आजारावर काय दिले पाहीजे ते ती पटकन सांगते. यामुंळे आम्ही कधी बाहेर गांवी निघालो, की भारतीने ऐन वेळी गरजेला लागतील अशी औषधे सोबत देणे हे ओघानेच आले. तीही प्रत्येक गोळ्या कशावर घ्यायच्या हे त्यावर लिहून. कोणत्या खाण्यामुळे शरीरावर कसे परीणाम होतात याचाही तिने अभ्यास केला आहे. एकदा पाहिलेलं चेहरा ती केव्हांही ओळखते. अगदी पाठमोरा असला तरी. अगदी टीव्हीवर चित्रपट पहाताना एखादा चेहरा पुसटसा दिसला की त्तकाळ ती कोण आहे ते हमखास ओळखते. आणि याचे प्रत्यंतर मला आले ते जेव्हां आपल्या मैत्रीणीला पास करवून घेण्यासाठी रात्री माझ्या घरी येवून माझ्यावर हल्ला करणाऱ्या जे. जे. तील गुंड विद्यार्थ्यांच्या टोळक्यासोबत आलेले सर्व गुंड तिने पोलीसांच्या ओळख परेड मघ्ये बिनचूक ओळखले. त्याचे पोलीसानीही कौतूक केले. त्याही क्षणाला मला संभाळणारी, धीर देणारी ही भारतीच होती. तसेच एकदा पाहीलेला रस्ता ती केव्हांही परत बीनचूक ओळखते, जे मला कितीही फेऱ्या घातल्या तरी आठवत नाहीत
१९८१ साल. दोन्ही मुलांच्या शाळेच्या वेळा बदलल्या. त्यातच माझी नागपूरला बदली झाली. ते दिवस तर तिच्या दैवाची परीक्षा घेणारे होते. केतनला शाळेत घेऊन जाताना छोट्या हर्षदपुढे खेळणी ठेवून शेजारील लहानग्या सुजाताला बसवून ती शाळेत जात असे. मात्र हर्षद एकदम समजूतदार होता. तो खेळणी घेऊन, अथवा सर्व पेन्सील एकमेकाला जोडून त्याची गाडी करून खेळत बसत असे. या बदलीच्या काळात आम्ही दोघेही प्रचंड तणावाखाली होतो. एकतर दोन्ही मुले लहान. त्यांचे सर्व करून, परत शाळेत नेणे आणणे, त्यांचा अभ्यास घेणे ह्या गोष्टी करून, त्याचे आजार काढून सर्वच कामे तिच्या एकटीवर पडत. व मी येथे नसल्याने माझे सर्व लक्ष त्याकडेच असे.आणि माझे मुंबईत तसे कोणीच नव्हते. मात्र भारतीच्या घरच्या लोकांचा आधार होत. माझे मोठे बंधूही मधूनमधून चौकशी करून, तसेच कधी लागले तर पैसेही पाठवून मदत करीत. पण त्या कठीण दिवसातही भारतीने सर्व कांही निभावून नेले. त्यावेळी आमची आर्थीक परीस्थीतीही बेताबाताचीच होती. भारतीने मुलांना स्वतः कपडे शिवून घातले आहेत. अर्थात ते नुसते शिवणे नव्हते, तर त्याला नेहमीच तिने डिझाईनची जोड दिली. आणि तिची हीच सौंदर्यदृष्टी घरांतील वस्तू ठेवणे अथवा सामान लावणे यांत पुरेपूर दिसून येते. लग्नाआधी मोठ्या जागेत राहीलेली भारती माझ्या दोन खोल्यांच्या जागेत समाधान मानून राहीली. त्या दोन खोल्यांचाच तिने स्वर्ग केला. शेजार लाभला होता तोही देव सदृश्य माणसांचा. रवींद्र व सुनंदा लोवलेकर या प्रेमळ दाम्पत्याचा. वेळीअवेळीला, दुखण्या खुपल्याला त्यांचा आधाराचा हात सतत पुढे असे. कधी बाहेर जावे लागले की आमच्या दोन मुलांस त्यांच्या भरवश्यावर सोडून भारती निर्धास्तपणे जात असे.आजही लोवलेकर कुटुंबांचे व आमचे रक्ताचे नसले तरी त्याहीपेक्षा घट्ट संबंध आहेत.
मात्र मी नागपूरहून बदली होऊन परत आल्यावर आमची परिस्थिती जरा बदलू लागली. मुलेही मोठी झाली होती. त्यामुळे माझ्या बाहेरील कामामध्ये मला तिची मदत होऊ लागली. पुढे मी जे.जे.चा डीन झाल्यावर जेंव्हा डीनच्या त्या प्रशस्त अश्या बंगल्यात रहायला गेलो, तेव्हां तिची पहीली प्रतिक्रीया होती, ती ' आतापर्यंत जागेसाठी कष्ट भोगले, तेव्हां देव म्हणाला आता घ्या हवी तितकी मोठी जागा! ' पुढे त्या बंगल्यात अनेक मोठमोठे लोक येऊन आमचा पाहुणचार घेऊन गेले. त्यात होते बाळासाहेब ठाकरे, गजानन किर्तीकर, सुरेश जैन, प्रतापराव पवार, एस.पी. गोदरेज, टाॅम आॅल्टर, अतूल भातकळकर तसेच माधवराव गडकरी, कुमार केतकर, अशोक जैन, कुमार कदम, सुधीर नांदगावकर, किरण ठाकूर अश्या पत्रकारांचाही राबता असे. नारायण सोनावडेकर यांनी मला संस्थेच्या प्रेमापोटी तेथे बसविण्यासाठी रुडयार्ड किपलिंगचा पुतळा विना शुल्क बनवून दिला. बंगल्याच्या आवारात भारतीने सुपारीची सुमारे पंधरा एक झाडे लावून घेतली. तिच्या वडीलानी तेथे जांभूळ, फणस लावला. आज ती झाडे मोठे वृक्ष होऊन दिमाखात फळे देत उभी आहेत. भारतीने मुंबईत कधी तश्या वासाचा कडीपत्ता बघायला मिळणार नाही असा खास बेळगावचा कडीपत्ता आणून लावला. जो पुढे प्रचंड प्रमाणात फोफावला. एकदा तर त्या बंगल्याच्या आकर्षणाने यशवंत चौधरींनी आपल्या मुलाच्या विवाहानिमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यासाठी मला विनंती केली. व मीही ती त्यांना दिली. बंगल्याच्या लॉनवर एक सुरेखसे स्नेहसंमेलन त्या दिवशी घडले. अश्या रीतीने त्या डीन बंगल्याच्या स्मृती आमच्या जीवनाशी जडून गेल्या. आणि आमच्या मार्शल व स्वीटी या डाॅबरमन जोडीने आम्हांला जीव लावला तो तेथेच, शिवाय आमचा झाडावरून पडुन दुखापत झालेला व भारतीने त्याला औषधोपचार करून वाचवलेला आमचा बोलका पोपट मिठू हा तेव्हांपासून आजपर्यंत म्हणजे सुमारे २१ वर्षे आम्हांला साथ देत आहे. पक्षी-प्राणी यांचे प्रेम असलेल्या भारतीला एकदा आवारांत झाडावरून पडलेला पांढरा कावळा सांपडला. हा ‘ अल्बीने क्रो ‘ म्हणून ओळखला जाणारा पांढरा कावळा अमूल्य आहे हे तेव्हां आम्हांला समजले. त्यालाही कांही दिवस भारतीने सांभाळले. त्या कावळ्याबद्दल दूरदर्शनने भारतीची मुलाखत घेतली. वृत्तपत्रांनी तिचे कावळ्यासह फोटो छापले आणि अशा तऱ्हेने त्या कावळ्याने आम्हांला प्रसीद्धी मिळवून दिली. त्याला पहायला आमच्या बंगल्यावर लोकांच्या रांगा लागू लागल्या.
आम्ही जे.जे.च्या डीन बंगल्यात रहात असतांना आमची चर्चा चालली होती की, आपली शाळा, त्यावेळचे मास्तर, तेव्हांचे वर्गमित्र हे आपल्याला सतत आठवत असतात. पण पुढे व्यवसायाला लागले, की हे सर्वजण चार वाटाने जातात. त्यांची भेट म्हणा, पत्ता म्हणा कोणालाच माहीत नसतो. यावरून माझ्या पत्नीने ठरवीले,की आपल्या राम मोहन शाळेतील वर्ग मैत्रीणींचे पत्ते कां मिळवीण्याचे प्रयत्न करू नयेत? आणि ती कामाला लागली. दोन तीन मैत्रीणी तशा तिच्या सहवासांत होत्याच! फेसबुकची सोय नसलेल्या त्या काळात, सूरू झाला एक शोध तपास. जसा जसा संपर्क होईल तसतसे सांखळीचे एकेक दुवे सांधू लागले. बघता बघता मुंबई, पुणे येथून १९६८ सालच्या राममोहन स्कुलच्या बॅचच्या १८ मैत्रीणी जमल्या. नांवे-आडनांवे बदलली होती. कांही चेहरे बदलले होते. आणि डीन बंगल्याच्या लाॅनवर एक छोटेसे स्नेह संमेलन भरविण्यात भारती यशस्वी झाली. आणि हे मैत्री संबंध आजही तसेच राखून ह्या सर्व वर्ग मैत्रीणी एकमेकाशी जिव्हाळा ठेवून आहेत. दर महीन्यातून एक दिवस या सर्वजणी एकत्र जमतात व संपूर्ण दिवस गत आठवणी जागवत मजेत काढतात. एकदा चौपाटीवर ह्या सर्वजणी असताना टी.व्ही. निर्देशक विनोद दुवा तेथे आले. या मंडळीशी गप्पा मारताना त्यांना या भारतीने कश्या प्रकारे ह्या सर्वाना जमवून अजूनही त्या एकत्र असलेल्या मैत्रीणींचे त्यांना कौतूक वाटले व त्यांनी एन.डी.टी.व्ही. या चॅनलवर एक विशेष कार्यक्रम करून या मैत्रीणींची खास दखल धेतली
१९९८ साली माझा जेष्ठ मुलगा केतन याचा विवाह तो एम.बी.ए.चा अभ्यास करत असतांना त्याच्याच वर्गातील पूजाशी झाला. पूजा ही अनेक टी व्ही चॅनलवर वरीष्ठ पदावर काम करते आहे. त्या दोघाना एक गोड अशी मुलगी झाली. जिचे नांव सिमरन आहे. बघता बघता ती आज अठरा वर्षांची होवून सध्या पाछात्य संगीत शिकते आहे. धाकटा मुलगा हर्षद हा उपयोजीत कलाकार असून त्याने अनेक जाहीरात संस्थामधून काम करून आता तो ‘ओगील्व्ही मध्ये मोठ्या पदावर काम करत आहे. आपल्या आईला कोणत्याही प्रकारे त्रास होवू नये यासाठी तो सतत कार्यरत असतो. मी स्वत: भारतीवर माझ्या विवाहापासून आतापर्यंत सर्वस्वी अवलंबून आहे. अगदी आरंभापासून मला कसल्याही गोष्टीला पहावे लागले नाही. अजूनही मला अनेक गोष्टी अनाकलनीय असतात. त्यातच आम्हांला आमची दोन खोल्यांची जागा आम्हांला अपुरी पडू लागली. त्यातही भारतीने आपल्या कलात्मक दृष्टीने स्वर्ग निर्माण केला. या आमच्या जागेतच केतन-हर्षदचे वाढदिवस साजरे झाले. आम्हां दोहोंकडचे नातेवाईक त्या जागेत आले. कधीकधी वाटे, या जागेंतून बाहेर पडायचा कांही मार्गच नाही का? आमच्याकडे येणाऱ्या बहूदा सर्वच नातेवाईकांच्या प्रशस्त जागा पाहतांना आपल्या जागेच्या रूपाने एक बारीकशी कळ हृदयांत कोठेतरी उमटत असे. ज्याना भविष्य समजे असे माझे सर षांताराम पवार तसेच ज्यांना एकप्रकारचे आत्मज्ञान प्राप्त झाले होते असे माझे नेमळेकर भाऊजी या दोघांनीही मला माझी भविष्यवाणी सांगीतली होती, ती म्हणजे मला मदत करतील ते माझ्या पत्नीचे उच्च ग्रह. त्यामुळेच माझ्या आयुष्याची भरभराट होईल. आणि याचे मला प्रत्यंतर आले. मी शासनाच्या कलाकार प्रवर्गातून १० टक्के जागांमधून एक सदनीका मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो, त्याला यश येत नव्हते. कर्ज काढून जागा घेणं त्याकाळात शक्यच नव्हतं. कारण कर्जच मिळत नव्हतं. आणि भारतीची बहीण मीरादिदी हिने एक दिवस स्वतःहोऊन मला माझ्या अर्जाची काय परिस्थीती आहे ते विचारले. ध्यानी मनी नसताही हे विचारणे झाल्यामुळे मला कोठेतरी आशेचा किरण दिसला. आणि तिच्याच मदतीने एकदा मला माझी स्वतःची म्हणावी अशी जागा मिळाली, तीही चांगली ८०० चौरस फुटांची. येथेच मला जाणीव झाली ती भारतीवीना मी किती अधूरा आहे याची.
आणि खरोखरीच अद्यापही मी संपूर्णपणे अवलंबून असतो तो माझ्या प्रिय पत्नी भारतीवर. अजूनही बऱ्याच गोष्टी मला माहीतही नसतात. स्वयंपाक करणे, लहानपणी मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना शाळेतून नेणे आणणे, घरी येणाऱ्या जाण्याऱ्यांची उठबस करणे अशी सर्वच कामे हसतमुखाने करून घराला एक सोनेरी किनार देणारी माझी पत्नी खरोखरीच आम्हां सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी आहे. कदाचीत त्या दिवसांत मी तिच्या कांही अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, कोठेही नेवू शकलो नाही, पण आहे त्यात तिने सुख मानले. आमच्या त्या लहानश्या जागेत तेंव्हा बरीच मोठमोठी मंडळी येऊन गेली. त्यामध्ये माझेही आणि तिचेही नातेवाईक असत. पण कधीही भारतीने त्यात कमीपणा वाटून घेतला नाही. मिळालेला पगार तिच्या हातात ठेवल्यानंतर मला मग कसलीच काळजी तिने पडू दिली नाही. मात्र नेहमी मला एका गोष्टीचे दुःख होत असे, ते म्हणजे त्या उमेदीच्या काळात मी तिच्यासाठी कांहीच करू शकलो नाही. तिच्या घरी तिचे नेहमीच कौतुक होत असे. तिच्या स्वतःच्या आईवडीलांपेक्षा तिचे काका वसंतराव जोगळेकर ज्यांना आम्ही सर्वजण अप्पाकाका म्हणत असू, व तिची काकी सुमतीबाई गुप्ते-जोगळेकर यांच्याकडेच तिचा बहुतेक ओढा होता. आम्ही कधीही त्यांच्याकडे गेलो की काकी जेवल्याशिवाय सोडायच्याच नाहीत. मग त्यांच्या हातच्या विशेषकरून फिशच्या रेसीपीज खाणे हे ओघानेच येत असे.
भारतीवर सर्वानीच प्रेम केलं, माया केली. आमच्या त्या छोट्याश्या जागेत अनेक मोठमोठ्या लोकांनी भेटी दिल्या. माझे सर्वच शिक्षक भारतीचेही शिक्षक असल्याने तेही हक्काने आमच्याकडे येत. घरगुतीपणाने वागत. भारतीने आपल्या हाताने जेवण करून त्यांना घातल्याशिवाय कधीच सोडले नाही. की आपल्या लहानश्या जागेची खंत बाळगली नाही. साईबाबांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून तिने सतत होकारार्थी भूमिका ठेवली आणि साईबाबांनी तिचे फळ त्यांना दिले. ज्या दोन खोल्यांच्या जागेतून आम्ही दोन बेडरूमच्या जागेत गेलो, तेथून व्ही.टी. येथील साडेतीन हजार चौरस फुटांच्या बंगल्यात रहायला गेलो हे भारतीच्या नशीबामुळेच! आज भारती, तिचे बंधू किशोर, ज्याचे ग.दि.माडगूळकरांच्या कन्येशी, शुभदाशी विवाह होऊन आणखी एक सुशील आणि प्रसन्न व्यक्तिमत्व जोगळेकरांमध्ये सामील झाले. तिची लहान बहीण माधवी व तीची कन्या श्वेता ह्या देखील भारतीशी संपर्क साधून असतात. १९७३ साली आमचा विवाह झाला, तेंव्हापासून आजपर्यंत एकूण ४६ वर्षे आमच्या सुखी संसाराची वाटचाल सुरु आहे. यामध्ये आले कधी खडकाळ पाषाणाचे खडबडीत धक्के, तर जास्तकरून आले ते मोरपीशी सहवासाचे सुखद क्षण! आणि भारतीच्या सहवासाने ते सर्वच आनंदी ठरले. लक्षणीय ठरले. यावेळी मला आठवते ते, माझ्या लग्नापूर्वीच मला भवीष्य जाणाऱ्या एक दोघांनी सांगीतले होते, की तू कष्ट खूप करशील, पण हवे तसे यश तुला मिळणार नाही. पण तुमच्या भविष्यात योग दिसतो, तो तुमच्या पत्नीच्या ग्रहांचा. तिचे ग्रह तुमच्या भाग्यरेषेत दिसतात. थोडक्यांत म्हणजे तुमच्या
पत्नीच्या ग्रहांमुळे तुमचा उत्कर्ष होणार आहे, भरभराट होणार आहे. आज मागे वळून पाहता ते किती सत्य होते, त्याची जाणीव मलाहोते.
आज पुन्हा १ डिसेंबर! भारतीचा वाढदिवस. अन माझ्या जे.जे.तील नोकरीचा पहीला दिवस. आजही रवीवार आहे. किती योगायोग आहे हा! आज या वयातही भारती सर्व कांही पूर्वीच्याच जोमाने कार्यरत आहे. तिची नात सिमरन आली की तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला देण्यांत आनंद मानते आहे. माझ्यापासून घरातील सर्वांच्याच आवडी निवडी पुरवीत आहे. प्रत्येकाच्या तब्येतीकडे आवर्जून लक्ष देते आहे. आम्हा कोणाचीही त्यातून सुटका नसते. या तिच्यातील उर्जेला साद देत भारतीच्या आजच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर लक्ष लक्ष शुभेच्छांचा वर्षाव करतो !!!
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष










If you're attempting to burn fat then you absolutely need to get on this totally brand new personalized keto meal plan.
ReplyDeleteTo produce this service, certified nutritionists, fitness couches, and top chefs joined together to develop keto meal plans that are productive, convenient, price-efficient, and delicious.
From their launch in January 2019, 1000's of individuals have already transformed their figure and well-being with the benefits a professional keto meal plan can provide.
Speaking of benefits: clicking this link, you'll discover eight scientifically-certified ones offered by the keto meal plan.