खाकीतील 'तुळशी वृंदावन' :


अरवींद इनामदार यांच्या सहवासातील कांही क्षण. 

तुडुंब भरलेले दादरचे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह. व्यासपीठावर मंगेश पाडगावकर, दाजीशास्त्री पणशीकर, किरण शांताराम असे दिग्गज. अध्यक्षांना त्यांचे चार शब्द बोलाविण्यासाठी पाचारण केले जाते. माईक जवळ एक देखणी, गोरीपान, आकर्षक व्यक्तिमत्वाची, उंचीपुरी व्यक्ती येऊन माईकचा ताबा घेते. आणि उपस्थित श्रोत्यांना उद्देशून त्यांचे स्वागत करताना आपल्या धीरगंभीर आवाजात म्हणते, " येथे बसलेल्या सर्व बंधू भगिनींना सेवानिवृत्त झालेल्या पांडू हवालदाराचा नमस्कार !"
आणि सर्व सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात दणाणून निघते. तर ही सभा प्रथम दर्शनीच जिंकणारे वक्ते असतात महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय पोलीस महासंचालक, आदरणीय श्री अरविंद इनामदार ! 
अरविंद इनामदार पोलीस खात्यात असूनही त्यांचा साहित्य, काव्य, संत वाङ्मय, शेरोशायरी यावरील अभ्यास आणि अधिकार निर्विवाद आहे. आणि त्याचबरोबर भाषण करतेवेळी त्याला ते जी अभिनयाची जोड देत, ती तर शब्दांना जिवंत करण्याची कलाच त्यांना साध्य होती. वरील प्रसंग होता सावरकर सभागृहात होणाऱ्या माजी पोलीस अधिकारी श्री संजीव कोकीळ यांच्या ' खाकी गुलाब ' या पुस्तक प्रकाशनाचा. त्यावेळी इनामदारसाहेबानी पाडगावकर व पणशीकर या दोन करांच्या मध्ये बसलेलो मी म्हणजे एक करांगुळी आहे असे विधान करून हशा पिकविला.
अरविंद इनामदारांचे व्यक्तिमत्व कोणावरही छाप पडेल असे होते. महत्वाचे म्हणजे हा कविमनाचा माणूस असंख्य कवि, चित्रकार, साहित्यिकांचा घेराव्यात सतत असे. अनेक दिग्गजांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती.  नाशिकला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे अत्यंत जवळचे असे एक सात आठ जणांचे मित्रमंडळ होते. त्याला कुसुमाग्रज आपली ' गोल्डन गॅंग ' असे म्हणत. या गॅंगमधील दोन महत्वाचे सभासद म्हणजे एक आमचे इनामदारसाहेब व दुसरे म्हणजे नाशिकचे सुप्रसिद्ध निसर्ग चित्रकार शिवाजीराव तुपे. तुपे याना आठवले की आठवतो तो त्यांचा नम्र आणि मुलायम स्वभाव आणि कधीही लुप्त न होणारे चेहऱ्यावर हास्य. आणि इनामदारसाहेब तर साहीत्य, काव्य, विनोद, शायरी, त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यासोबतच पोलीस खात्याला लावलेली त्यांनी शिस्त, या गोष्टी ठळकपणे जाणवत.  


अश्या या पोलीसी पण कलात्मक, काव्यात्मक माणसाच्या सहवासात येण्याचे कारण घडले, त्याला निमित्त होते माझे गुरुवर्य व जागतिक कीर्तीचे आदरणीय चित्रकार श्री रवी परांजपे. परांजपे सरांकडे अश्या गुणी लोकांची खाणंच आहे. मग ते साहित्यिक असोत, सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर असोत. मध्यंतरी परांजपेंनी आपल्या वडिलांच्या नांवाने  'कृ.रा. परांजपे गुणीजन कला पुरस्कार ' सुरु केला. चित्रकला क्षेत्रात सकारात्मक काम करणाऱ्या चित्रकाराला हा रोख रक्कम व मानपत्र अश्या स्वरूपाचा पुरस्कार होता. सरांच्या वडिलांशी माझे शालेय वयापासून संबंध होते. मला ते एक पितृतूल्य असे व्यक्तीमत्व होते.  त्यामुळे या पहिल्याच पुरस्कार समारंभाचा अध्यक्ष म्हणून परांजपे सरांनी मला आमंत्रित केले होते. इनामदार प्रमुख पाहुणे होते. व पुरस्कार दिला होता शिवाजीराव तुपेंना. इनामदारांनी त्यादिवशीच आपल्या भाषणाची चुणूक दाखविली. जेव्हा कधी ते नाशिकला जात, तेव्हा कुसुमाग्रज व तुपे यांच्याकडे जाणे ओघानेच होत असे. तुपेंची नवीन निसर्गचित्रे पाहण्याचा लाभही मिळत असे. त्यापैकी काही आवडल्याचे म्हणताच तुपे म्हणत अहो घेऊन जा. जणू काही बऱ्याचश्या मुलींचा बाप एखादे स्थळ सांगून आले की म्हणेल हवी ती घेऊन जा. त्या आनंदात तुपे सांगत असे म्हणून इनामदारानी तुपेंच्या स्वभावाचे वर्णन केले.
पोलीस खात्यात साध्या हवालदाराला सुखसोयी मिळाव्यात, त्यांना घरे मिळावीत, त्यांना विश्रांती मिळावी यासाठी इनामदार शेवटपर्यंत झटले. नाशिकला ते पोलीस अकादमीचे प्राचार्य असतांना सर्व नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना लष्करी पद्धतीचे प्रशिक्षण दिले. तेथे फक्त शिस्त आणि शिस्तच पाळली जात असे. तेथील जेवणाचा दर्जा त्यांनी सुधारला. ग्रामीण भागातून आलेल्या पोलिसांमधील न्यूनगंड दूर करण्यासाठी ते त्यांना बोलायचे कसे, वावरायचे कसे, कपडे कसे घालायचे याचे धडे देत असत.यातून त्यांनी त्यांचा व्यक्तिमत्व विकास केला. ज्या दगडी चाळीत जायला पोलीसही घाबरत, तेथे जाऊन तेथील शस्त्रास्त्रे ताब्यात घेऊन अरुण गवळीवर टाडा अंतर्गत कारवाई करून त्याचा बंदोबस्त करणारे अरविंद इनामदारच होते. अश्या या चतुरस्त्र अधिकाऱ्याला मुंबईच्या पोलीस कमिशनरपदाने मात्र हुलकावणी दिली. त्याना नागपूर येथे पोलीस आयूक्त म्हणून नेमण्यात आले.नंतर ते महाराष्ट्र्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणूनही नियुक्त झाले. येथेही त्यांनी आपला करारी बाणा राखला. कोणापुढे झुकून त्यांनी कधीच काम केले नाही.     

जेव्हा ताजवर आतंकवाद्यांच्या हल्ला झाला, त्यावेळी भारतीय कमांडो हेलिकॉप्टर मधून हॉटेलमध्ये उतरताना टीव्हीवर दिसत होते, तेव्हा इनामदार म्हणाले होते माझ्याही पोलिसाला असे प्रशिक्षण हवे.त्यांनाही असे उतरताना मला पहायचे आहे. पण त्याच सोबत पोलीस खात्यातील भ्रष्टाचारावर देखील त्यांनी कठोर टीका केली, नेत्यांच्या दबावाला पोलीसाने कधीही झुकता कामा नये हे त्यांचे ठाम मत होते. एकदा तर त्यांनी सांगितले, मला स्वतःलाही पोलीस ठाण्यावर जायची भीती वाटते.तेथे गेल्यावर आपला अपमान होईल हे जाणवते. तुमचा बकरा कसा करावा याचीच ते वाट पाहतात. नागरिकांना, दिन दुबळ्यांना, महिलांना, वृद्धाना पोलीस हा आधार वाटला पाहिजे. तो वाटला नाहीतर ते हप्ता स्टेशन वाटेल.
अरविंद इनामदार जेव्हा सभेत बोलत  तेव्हा त्यांच्या भाषेतून शब्द मौक्तिके उधळत असत. मधून मधून अलंकारिक भाषेतून नर्म विनोद ते करत असत. मोठमोठ्या मराठी, इंग्रजी साहित्यिकांची, कवींची अवतरणे ते पेरत असत. एखाद्या काव्याचे मुक्त रसग्रहण ते करीत असत. पोलिसाला नेहमीच ' यस सर, राईट सर, व्हेरी गूड सर, डन सर ' अशा शब्दकोषातच वावरावे लागते. कारण ज्या क्षणी तो नो सर म्हणेल, तेव्हा तो आऊट झालेला असेल. अश्या या इनामदारसाहेबानी मंगेश पाडगावकरांनी आणीबाणीत केलेल्या ' सलाम ' या त्यांच्या प्रसिद्ध कवितेचे पोलीसी रूपांतर करून, त्यांची क्षमा मागून दस्तुरखुद्ध पाडगावकरांच्या उपस्थितीत तितक्याच उत्कट अभिनयानींशी ऐकविली होती.

                   “ सलाम भाई सलाम, सबको सलाम,


बदलीच्या भीतीने डाव्या हातातील काठी 
पाठीमागे लपवीत सलाम. 
आमच्यावर फेकलेल्या प्रत्येक दगडाला सलाम.

प्रत्येक शस्त्राला सलाम. 

आणि आमच्या माय भगिनींचा विनयभंग करणाऱ्या हातानाही सलाम!

कातडी वाचवू सरकारलाही सलाम. 

आणि गेल्या ६५ वर्षात न बदललेल्या कायद्यालाही सलाम. 

 हप्त्याला सलाम, आणि ज्यांनी हप्त्याची सवय लावली, 
       

त्यांनाही जबरदस्त सलाम.

                          पण त्याचपेक्षाही शेकडो निरपधार्याना मुंग्यासारखं मारणाऱ्या 
अट्टल आतंकवाद्यांना 'जी साहेब' म्हणून सलाम.
 आणि हे सगळं खपवून घेणाऱ्या पराक्रमी भारतियांनो,


तुम्हाला तर सलामी शस्त्र!”
                        


इनामदारांमध्ये सतत एक हळवा माणूस वावरत असे. पोलिसांच्या हाल अपेष्टा ते जाणून असत. वरून दवाब येतो म्हणून सामान्य नागरिकांना त्रास देणे मात्र त्यांना मंजूर नव्हते. अनेक गुन्ह्यांचा त्यांनी तपास लावला. जळगाव वासनाकांडच्या वेळी सुमारे दीड दोन महिने ते जळगावात मुक्काम ठेवून होते. कुटुंबापासून दूर होतो म्हणून का मी जनतेला त्रास द्यावा. तुम्ही प्रामाणिक राहिला तर तुमच्या चेहऱ्यावर एक रौनक येते असे ते सांगत. मात्र इनामदारांनी कधी वरिष्ठांच्या दबावाशी अथवा अनियमित कामाशी कधीच तडजोड केली नाही. १९९९ साली जेव्हां युती सरकार पायउतार झाले तेव्हा त्यानंतर आलेल्या काँग्रेस आघाडीच्या सरकारसोबत त्यांचे सूर कधीच जुळले नाहीत. कधीच कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार काम करणाऱ्या इनामदार साहेबांना अनेकवेळा बदल्याना सामोरे जावे लागले होते. आघाडी सरकारात गृहमंत्री असलेल्या छगन भुजबळांशी अश्याच कारणावरून त्यांचे पटले नाही.  त्यांची अडचण होते म्हणून राज्यकर्त्यांनी त्यांना जवळ जवळ काहीच अधिकार नसलेल्या पुण्यातील एका जागेवर त्यांची बदली केली. आणि जे प्रामाणिक आणि तडफदार माणूस करतो तेच त्यांनी केले. तब्बल दहा वर्षे नोकरी असून देखील आर्थिक नुकसान सोसूनही त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. आणि 
पोलीस खाते एका कर्तव्य कठोर अश्या अधिकाऱ्याला मुकले. एकदा माणूस निवृत्त झाला की त्याने केलेले अतुलनीय काम, सेवा याची नोंद कोणीच ठेवीत नाही, त्यासाठी इनामदारांनी ' अरविंद इनामदार फौंडेशन' सुरु केले आहे. या फौंडेशनतर्फे आय पी एस अधिकाऱ्यांपासून ते काॅन्स्टेबल पर्यंत तीन रोख पारीतोषीके अन मानपत्र देण्यात येते. पहीले १.२५ लाख, दुसरे १.११ लाख व तिसरे १.०१ लाख असे त्याचे स्वरूप आहे व पहीले श्री सूर्यकांत जोग, सॅम पटेल व दिलीप पाटील याना श्री रतन टाटा यांच्या हस्ते देण्यात आले.
पुण्यातील परांजपे यांच्या समारंभानंतर रात्री श्रेयस हाॅटेलवरील गच्चीवर आम्ही गप्पा मारत बसलो असता एकाने तलत महमूद यांचे निधन झाल्याचे व्रृत्त आणले. क्षणभर इनामदार स्तब्ध झाले. अन म्हणाले, एका फांदीवर रंगीबेरंगी पक्षी ओळीने बसले असताना अचानक त्यातील एक टपकन पडावा असे वाटले. कवी मनाच्या वेदना होत्या त्या ! 



अश्या या अरविंद इनामदार साहेबांचे व्यक्तीमत्व सर्वनाच भारून टाकणारे होते. ओळखीचे कोणी समोर दिसले की त्यांच्या खास आवडत्या शब्दांत म्हणत, बोला देवा!' मला पाहील्यावर त्यांनी लगेच म्हटले, 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश.’ कोणत्याही समारंभात ते आले की त्यांच्या प्रसन्न अश्या व्यक्तिमत्वाने क्षणार्धात वातावरण उजळून निघे. आणि मग केंद्रस्थानी असत ते केवळ 'अरविंद इनामदार' '. अश्या या महान मानवाचे गुरुवारी दिनांक ७ नोव्हेंबर २०१९ रोजी मध्यरात्री दुःखद निधन झाले. माणुसकीचा एक स्तंभ कोसळला. पोलीस दलात राहूनही केवळ जनतेच्या प्रश्नांची दखल घेत असणाऱ्या एक समाज सेवक गेला. अश्या या महापुरुषासमोर आपण लीन होतो व आपले हात आपोआप जोडले जातात, अन ओठावर शब्द येतात, ' तेथे कर माझे जुळती !

' या महापुरुषाला अश्रुपूर्ण श्रद्धांजली!


- प्रा. मं.गो.राजाध्यक्ष.

Comments

  1. Did you hear there is a 12 word phrase you can tell your crush... that will trigger intense feelings of love and impulsive appeal to you buried within his heart?

    That's because deep inside these 12 words is a "secret signal" that triggers a man's impulse to love, adore and look after you with his entire heart...

    ====> 12 Words That Trigger A Man's Love Impulse

    This impulse is so built-in to a man's brain that it will drive him to work better than before to take care of you.

    As a matter of fact, fueling this mighty impulse is so mandatory to achieving the best ever relationship with your man that the instance you send your man a "Secret Signal"...

    ...You'll soon find him expose his heart and mind to you in a way he never expressed before and he will perceive you as the only woman in the world who has ever truly fascinated him.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :