सर्वांसाठी झटणारा सदाशीव कदम.



मध्यन्तरी मी आमच्या कॉलेज कॅन्टीनच्या मालकावर-रमेशवर लिहीले होते. त्यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी त्यावर भरभरून लिहीले होते. त्यांच्या हलाखीच्या, अडचणीच्या विद्यार्थी दशेत या रमेशने त्यांना कशी मदत केली होती, कसे त्याच्यामुळे ते आपले पोट भरू शकत होते, अश्या अनेक आठवणी या माजी विद्यार्थ्यांकडून जागवील्या गेल्या. खरे तर जे.जे.च्या त्या मातीचा गुणच असा कांही आहे, की तिच्यातून सतत ममत्व, आपुलकी आणि प्रेमभाव स्रवत असतो. आणि त्यामुळे येथील माणसेही त्याच मुशीतून निर्माण झाल्यामुळे त्यांच्यातही तो भाव उत्पन्न झालेला असतो. विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी हा शिक्षकवर्ग झटत असतो तर विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेप्रती सदैव ऋणी रहातात. या प्रेमळ शृंखलेमध्ये सहाय्य करण्यास तत्पर असलेला चतुर्थ श्रेणी कामगार वर्ग यात कधीच मागे राहीला नाही. किंबहुना कित्येकदा अडी अडचणीला बऱ्याच वेळा ते विद्यार्थ्यांना मदत करीत. मी जेव्हां या संस्थेत विद्यार्थी म्हणून पाय टाकला, त्यावेळी कोणालाही कसलीही मदत कोठून मिळेल असे विचारताच तत्क्षणी तो म्हणे अरे, त्या एकनाथला विचार. कधी ड्रॉईंग बोर्ड लागला, किंवा त्यासारखी कशाचीही मदत लागो, एकनाथ पराडकर हे नांव ठरलेले असे. त्याच्या कारकिर्दीत अनेक विद्यार्थी पुढे नावाजले, मोठमोठ्या पदावर जाहीरात क्षेत्रांत काम करू लागले. त्यापैकी कोणी संस्थेत कधी आले की एकनाथची पहीली प्रतिक्रिया असे ती म्हणजे, 'ही इज माय स्टुडंट ' आणि लगेच तो त्याची भेट घ्यायला धावे. ते लोकही मोठ्या प्रेमाने त्याची चौकशी करीत. हा एकनाथ आमच्या काळी आमचा सर्वस्व होता. खिश्याला न परवडणारे स्कॉलरसारखे कागद देखील आम्हांला देत असे. ब्लॉक मेकींग मध्ये तर तो इतका माहीर झाला होता, की धारगळकरांनी त्याला आपल्या स्टुडीओत नोकरी देखील देऊ केली होती. एक्सिबिशनच्या वेळी आठ आठ, दहा दहा फूट मोठे प्रिंट प्लायवूडवर पेस्ट करणे हा या एकनाथच्या हातचा मळ होता. स्वभावाने नम्र, सतत हसत खेळत रहाणारा एकनाथ आपली संपूर्ण हयात या संस्थेत काढून निवृत्त झाला. त्यावेळी आमच्या विद्यार्थी दशेपासून अजूनही कांही लोक आमच्या मनावर कोरले गेले होते, ते म्हणजे वासू पराडकर, दत्ताराम,  भोगटे, रवींद्र पटवर्धन, सदाशीव कदम, गायकवाड असे कांही, जे मी पुढे त्याच संस्थेत अध्यापक व पुढे अधिष्ठाता होईपर्यंत कार्यरत होते. एवढेच नव्हे, तर माझी स्वतःच्या घरच्या माणसाप्रमाणे काळजी घेत होते.

अश्यातीलच एक होता आमचा सदाशीव कदम. उंचापुरा, वर्णाने जवळजवळ काळ्यातच जमा, चेहऱ्यावर सतत हास्यभाव आणि थोडासा गंभीरपणा. असा हा कदम सतत पटवर्धन सोबत असायचा.  संस्थेमधील आपले काम मनापासून करणे, कोणाच्या अध्यात ना मध्यात. त्यामुळे कधीही वादावादीत पडत नसे. पटवर्धन निदान मस्ती करणाऱ्या मुलांना दम देतांना तरी दिसे, पण कदम कधीच नाही. संस्थेतील काम संपले की केंकरे सरांनी कदम व पटवर्धन या दोघांना पाठीमागील रंगभवन मध्ये डोअर किपरची कामे दिली होती.   ऑरेंज शर्ट घालून तेथे हे लोक कामे करीत. आम्ही कधी तेथे नाटकाला अथवा एखाद्या कार्यक्रमाला गेलो की जातीने आम्हांला चांगल्या सीटवर बसवीत असे. एवढे करूनही कदमची कधीच कोणाकडून अपेक्षा नसे. चुकूनही कोणाकडून तो पैसे घेत नसे. मात्र त्याच्या या कामे करण्याच्या सवयीमुळे केवळ संस्थेमधीलच नव्हे, तर बाहेरील व्यतींनाही कामाला कदमच लागत असे. आणि तोही बिचारा त्याच्या नकार न देण्याच्या सवयीमुळे सर्व कामे अंगावर घेऊन करीत असे. या मध्ये डॉ. रेगेंची तिकिटे आरक्षीत करणे, केंकरेंचे कोणी जवळचे मित्र आले की त्यांना काय हवे ते पहाणे अशी सर्व कामे सदाशीव करीत असे.

आता मी त्याच्यातील एका माणुसकीच्या गुणांबद्दल सांगणार आहे तो म्हणजे, सर्वच सरकारी इस्पितळातील मोठमोठे डॉक्टर त्याच्या परीचयाचे होते. नुसतेच परिचयाचे नव्हे, तर कदमला ते मानीत देखील असत. त्यामुळे संस्थेतील कोणालाही कसलेही दुखणे असो, त्याचा एक्स- रे काढायचा असो, त्याला लाईट द्यायचे असोत, वॅक्स बाथ असो, कार्डीओग्राम काढायचा असो, ही सर्व कामे केवळ कदमच्या ओळखीने झटपट होत असत. पाठीमागील जी.टी.हॉस्पीटल तर त्याचेच होते. तेथे येणारे हॉनररी डॉक्टर देखील त्याला मानत. मीही कित्येकदा त्याचा प्रत्यय घेतला आहे. आधीच त्या इस्पितळात प्रचंड गर्दी, त्यातून कोणाचाही नंबर लागणे कठीण. पण कदम आधी जाऊन, डॉक्टरांना भेटून सर्व व्यवस्था करे व नंतरच आम्हांला नेत असे. आणि यात केवळ आमच्या संस्थेतील लोकच नव्हेत, तर सचिवालयातील अधिकारी देखील कदमच्या या सेवेचा लाभ घेत असत. ओळख असली की सरकारी इस्पीतळात जे उपचार मिळतात, ते अन्यत्र नाही कारण तेथील उपयूक्त मशीनरी जी खाजगी ईस्पीतळाला ठेवणेही शक्य नसते, याचा लाभ मिळे. माझ्या बाबतीत तर तो जरा हळवाच होता. मला कसलाही त्रास होऊ नये यासाठी जातीने तो लक्ष देत असे. आम्ही रात्र रात्र संस्थेमध्ये जेव्हां कामे करीत असू, तेंव्हा कदम देखील जातीने हजर असे. काम करून थकल्यावर टाईम्सजवळील भेळवाल्याकडून सुकी भेळ आणणे व येताना न विसरता शेजारच्याच हरीभावूंच्या दुकानातून प्रत्येकाच्या मागणीनुसार बनारसी १२०, कच्ची सुपारी, नवरतन किमाम अशी पाने घेवून येत असे. त्यात केंकरे सरांचे बिगर कत्ता आठवणीने आणावे लागे. केंकरे सरांचा लाडका असल्याने सरांना थोडा तो वचकून असे. केंकरे सरांनी मला जेव्हां गोरेगांवच्या फिल्म सिटीच्या उदघाटनाच्या वेळी तेथील सर्व डेकोरेशन करायचे काम दिले होते, तेव्हां या कदम व पटवर्धन आणि कांही विद्यार्थी घेऊन मी तेथे गेलो होतो. त्यावेळी फिल्म सिटीच्या रस्त्यावर काहीही नव्हते. टॅक्सीवालेही परतीचे भाडे घेऊनच येत. खाण्यापिण्याचे पण हाल होते. तेव्हां कदम कोठेतरी फिरून चहाची व्यवस्था करीत असे. मग रात्री केंकरे सर जेवण घेऊन येत असत. त्यानंतर श्रमपरीहार होत असे. मजा येत असे अश्या कामाची.

तेंव्हा कित्येक लोक होते जे कदम मुळे आपण बरा झाल्याचे सांगत. पण स्वतः सदाशीव मात्र प्रसीद्धी पराङ्मुख होता. कोणाकडून एका पैशाची अपेक्षा नाही, की आपण करत असलेल्या कामाचा गवगवा नाही. एक प्रकारचे महान सामाजीक कार्य या सत्पुरुषाकडून सुरु होते. तसे पाहीले तर जे.जे.पेक्षा कदमला रंगभवन व जी.टी. किंवा कामा इस्पीतळातीलच लोक जास्त ओळखत असत. एखाद्या गरजूला तो हक्काने कोणत्याही विभागातील डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकत असे. मग त्याच्यापुढे क्लास ३, क्लास १, किंवा क्लास २ चे ते अधीकारी नसत, तर त्याला घेऊन डॉक्टरकडे जाणारे घरातील वडीलधारे माणूस असे. मग आत डॉक्टरकडे गेल्यानंतर बाहेर जाऊन पेपर तयार करणे आदी कामे तो करून येत असे. तेथेही त्याला ओळखणारे लोक होतेच! मला नेहमीच आश्चर्य वाटे की काय या माणसावर देवाने इतकी मर्जी बहाल केली आहे? ना कुणाच्या नात्याचा ना गोत्याचा, पण नियतीनेच सर्वांची त्याच्याशी अशी कांही नाती जुळवली होती की जी रक्ताच्या नात्यापलीकडली होती. घट्ट विणिने बांधली गेलेली. कोण आपल्यामुळे कधी दुखावला जाऊ नये, याची पुरेपूर काळजी घेणारा, आणि एकदा शब्द दिला की तो पाळण्यासाठी वाटेल ते करणारा हा सदाशीव कदम मला माझ्या विद्यार्थी दशेपासून आर्ट स्कुल मधील एक आधार होता. कदम -पटवर्धन या जोडीवर कामे टाकून मी निश्चिन्त होत असे. आणि एक दिवस मी पहील्या मजल्यावरील गॅलरीत उभा असतांना आपल्या आवारातील घराकडे जाणारा कदम मला दिसला. प्रिंटिंगच्या इमारतीबाजूने जात असताना अचानक त्याचा तोल गेला व पडता पडता तो सावरला. मी लगेच पटवर्धनला बोलावून घेतले, व त्याला विचारताच तो म्हणाला, सर हल्ली खूप वेळा त्याचे असे होते. मध्ये एकदा तो वाटेत पडला. काहीवेळा तर त्याला आठवतही नाही. मला थोडे काळजीचेच वाटले हे प्रकरणं. मी कदमाला बोलावून घेऊन विचारताच तो म्हणाला, हल्ली डोके खूप दुखते. एकेकदा घट्ट कपडा बांधून घेऊन बसावे लागते. कधी कधी गरगरते. म्हटले तपासण्या करून पाहील्यास का? तर म्हणाला काळबादेवी रोडवर एक होमिओपॅथीचा दवाखाना आहे, तेथून गोळ्या घेतो. जरा बरे वाटते. मी म्हणालो, अरे तू जगाची दुखणी बरी करण्यासाठी सर्वाना घेऊन हॉस्पीटल मध्ये नेतोस, आणि स्वतः मात्र त्याचा फायदा का घेत नाहीस?

मला खात्री होती तो स्वतःसाठी जाणारा माणूस नव्हता. मी त्याला आमच्या फॅमीली डॉक्टरांकडे घेऊन गेलो. चालतानाही त्याला तोल जाऊन त्रास होत होता. डॉक्टरनी तपासणी केली व म्हणाले, याला ताबडतोब हॉस्पीटल मध्ये दाखल करण्याची गरज आहे. बहुदा पार्किन्सन जाणवतो. पण इतरही बरेच प्राॅब्लेम दिसतात. पुर्ण तपासण्या तेथे करतील तेव्हाच निदान स्पष्ट होईल. आम्ही विचार केला याला आता जी.टी. मध्ये जनरल वार्डात ठेवण्यापेक्षा एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवावे. माझे एक सहकारी संजय कुरवाडे यांच्या ओळखीने सेंट जॉर्ज इस्पितळाच्या संचालकांशी बोलून कदमाला आम्ही तेथे एक चांगल्या रूममध्ये ठेवून तेथे त्याच्यावर उपचार सुरु झाले. मी तेथे जाऊन त्याला भेटत असे, त्याच्याशी बोलत असे. सुधारणा जाणवत होती. पण आतून काय होते त्याचा अंदाज आम्हां कोणालाच नव्हता. काही दिवसांनी डॉक्टरांनी कदमाला डिस्चार्ज दिला. घरी आल्यानंतर त्याने विश्रांती घेतली. पण आता त्याच्यात ती पूर्वीची उमेद जाणवत नव्हती. बोलणेही थोडे असंबद्ध होऊ लागले. मधून मधून त्याच्याकडे जाऊन त्याला पाहणे, धीर देणे एवढेच काम उरले. त्याचे पूर्वीचे दिवस आठवून भडभडून येत असे. अगदी मध्यरात्री देखील मदतीला धावून येणारा हा सर्वांचा आधारवड असा शरपंजरी पडलेला पहावत नव्हता. पण अखेर परमेश्वराच्या इच्छेपुढे कोणाचेच चालत नाही हेच खरे!

आणि एके रात्री पटवर्धनाने येऊन बातमी दिली, ' कदम गेले' ! संपूर्ण जे.जे.कला संस्थांच्या आवारात दमदारपणे पाऊले टाकत जाणारा कदम आज थकून शांत झाला होता. कधीच कोणाकडे एक साधीशी तक्रारही न करणारा अथवा कसलेही मागणे न करणारा आमचा सदाशीव कदम त्या दिवशीही जातांना कसलीही तक्रार न करता गेला. अनेक जण हळहळले. दुसऱ्या दिवशी त्याच्या अंत्ययात्रेला संपूर्ण कला शाळा हजर होती. यावेळी त्याची उणीव जे.जे. उपयोजीत कला संस्थेसोबतच समस्त जी.टी., कामाच्या डॉक्टर वर्गाला, रंगभवनाला भासली असेल! 

-प्रा.मं.गो. राजाध्यक्ष


Comments

  1. Ok...

    This might sound pretty weird, maybe even kind of "supernatural"

    WHAT if you could just hit "Play" to LISTEN to a short, "magical tone"...

    And suddenly attract MORE MONEY into your life?

    What I'm talking about is hundreds... even thousands of dollars!!

    Think it's too EASY? Think something like this is not for real??

    Well then, I'll be the one to tell you the news..

    Many times the greatest miracles in life are the easiest to RECEIVE!!

    Honestly, I'm going to PROVE it to you by allowing you to listen to a REAL "miracle abundance tone" I developed...

    You just push "Play" and watch money coming right into your life.. it starts right away..

    TAP here now to play this marvelous "Miracle Money Tone" - as my gift to you!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :