एका सुवर्ण काळाची समृद्ध वाटचाल अर्थात 'भिंतीवरी कालनिर्णय असावे'
१८ ऑक्टोबरची एक सायंकाळ. एका रम्य अश्या सांस्कृतीक सोहळ्याने नटलेली, अनेक पाकक्रियेनी सजलेली आणि आणि ‘सुमंगल’ अश्या सांस्कृतीक वातावरणाने भारलेली अशी मी त्या दिवशी अनूभवली. निमित्त होते सुमंगल प्रकाशनातर्फे घेतलेल्या व नावाजलेल्या शेफनी निवडलेल्या खाद्य पदार्थांच्या स्पर्धांचे पुरस्कार वितरण, तसेच त्याच प्रकाशनांचा नावाजलेला, अनेक विद्वान लेखक, कवी, चित्रकार यांनी सजविलेल्या 'कालनिर्णय' या सांस्कृतीक दिवाळी अंकाचे उदघाटन, असा सुरेख संगम घडवून आणला होता, श्री. जयराजजी साळगांवकर यांनी. त्यामुळे अंक स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळा किती हृदयंगम झाला असेल याची कल्पनाच करावी. आणि या मंगल प्रसंगी उपस्थीत राहण्यासाठी जयराजजी यांचा प्रेमळ आग्रह. त्यामुळे मन कसे हरपून गेले होते! तसे पाहीले तर या सुमंगल प्रकाशन आणि कालनिर्णय यांच्या उभारणीत भक्कम असा आधार आणि हातभार होता तो जोतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांचा! अध्यात्म, परमार्थ, साहीत्य, शास्त्र, ज्योतीष, पंचांग काव्य असे सर्वच अंगानी जाणारे त्यांचे व्यक्तिमत्वच सर्व काही सांगून जात असे. धोतर नेसलेली, सदरा घातलेली, कपाळावर शेंदरी टिळा असलेली त्यांची मुद्रा पहाताच एखादा भारावून जाऊन त्यांच्यापुढे नतमस्तक होत असे. आणि धर्मशास्राचा अभ्यास तरी किती ? एकामागोमाग एक अशी उदाहरणे धडाधड देत त्यांचे बोलणे सुरु असे. त्यावरून त्यांची विद्वत्ता आणि आपल्या संस्कृतीविषयी असलेले ज्ञान आणि आस दिसून येत असे.गणेशाचे तर ते निस्सीम भक्त. त्यामुळे गणेश स्तुती त्यांच्या अंतःकरणातून नेहमी जाणवत असे. आणि त्यामुळेच त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकालाच जयंतराव आपल्या घरातील पितृतुल्य असे वडीलधारे व्यक्तीमत्व वाटे. प्रेमाचा धाक आणि मनाचा जिव्हाळा असलेले वडीलधारे माणूस!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (त्यावेळच्या रत्नागिरी) मालवण येथे १ फेब्रुवारी १९२९ साली जयंतरावांचा जन्म झाला. संस्कृतची गोडी त्यांना आरंभापासूनचीच. त्यामुळे शब्दांवर आणि साहीत्यावर प्रेम जडले. मालवण सारख्या ठिकाणी त्यांच्या शब्दभांडाराला तसे काय मोल होते? त्यामुळे निसर्गदत्त शब्दवैभवाने तसेंच परिश्रमाने मिळवलेले भाषा सौंदर्य यांच्या शिदोरीवर जयंतराव थेट मुंबईला पोचले. व लोकसत्ता वृत्तपत्रात नोकरीला लागले. वृत्ती अभ्यासू होतीच. त्यात चौकसपणाची भर पडल्याने सर्वच जणांशी त्याचे जमू लागले. त्याकाळात रविवारच्या लोकसत्तेत 'शब्दकोडी' असत, ते योग्यशब्द भरून त्यासोबत चार आण्याची रोखीची पावती जोडून ते लोकसत्तेकडे पाठवले की दुसऱ्या आठवड्यात त्याचे उत्तर तसेच ज्यांची उत्तरे त्याप्रमाणे असतील त्यांना बक्षिसे असत. आणि हा शब्दकोड्याचं विभाग जयंतरावांनी उच्च स्तरावर नेवून त्याला प्रसीद्धी मिळवून दिली. याच काळात त्यांचा ज्योतीष शास्त्र, तसेच अध्यात्म, संतवाङ्मय, आणि धर्म ग्रंथांचा सखोल अभ्यास सुरु झाला. त्यातही ते पारंगत झाले. दैनिक वृत्तपत्रांतून राशी भवीष्य तसेच शब्दकोडी वाचकांना उपलब्ध करून देण्याची प्रथा ही साळगावकरांनीच सुरु केली. एक नवीन पायंडा त्यांनी पाडला व वाचकांनीही त्याला भरभरून प्रतीसाद दिला. नंतर मात्र त्यांचे मन त्या शब्दकोड्यातील विभागात रमेना. ती नोकरीसोडून जयंतरावांनी स्वतःचे शब्दरंजन साप्ताहीक सुरु केले.
जयंतराव जसे दृष्टे होते तसेच त्यांच्या ज्योतीष शास्त्रांवर त्यांचा पुरेपूर भरवसा होता. यात मालवणचेच नांवाजलेले जोतीषी वसंत लाडोबा म्हापणकर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले होते. शब्दांचे ते पुजारी होतेच, शिवाय त्यांच्या लिखाणांत अचूकपणा दिसे. नेमकेपण जाणवे. कधी अवास्तव लिहीणे नाही वा फाफट पसारा नाही. पण लिहीतील ते अतीशय भावपूर्ण आणि माहीतीपुर्ण. त्यातही एखादा अभंग असेल, स्तोत्र असेल तर त्याचे सांगोपांग विश्लेषण ते करीत असत. एकतर साहित्याचा सखोल अभ्यास, संतपरंपरा व संत वाङ्मय यांचे अफाट वाचन आणि तितकीच तीव्र अशी स्मरण शक्ती यामुळे जयंतरावांचे लिखाण असो वा व्याख्यान तितकेच उदबोधक आणि श्रवणीय होत असे. त्यामुळे त्यांनी स्वतःचे
'शब्दरंजन' काढले, तेंव्हा त्याचा पसारा बराच वाढला. त्याकाळात बहुतेक सर्वच लेखक, संपादक, प्रकाशक मोठमोठे असत. दर्जेदार असत. आणि त्यांना बांधून ठेवणारे आणखी एक व्यक्तीमत्व असे ते म्हणजे चित्रकार. कारण संपादक-लेखकांचे विचार वाचण्यास प्रवृत्त करणारा चित्रकार हा महत्वाचा घटक मानला जात असे. निरनिराळ्या माध्यमातून तो ते प्रगट करीत असे. आणि साळगावकरांचे चित्रकार होते 'चित्रसार्वभौम रंगसम्राट रघुवीर मुळगांवकर ! एक दैवी लेणं घेऊन जन्माला आलेला स्वयंभू कलाकार. पुढे साळगावकरांचे व मुळगावकरांचे केवळ व्यावहारीक संबंध राहीले नाहीत. ते घरगुती झाले. एकमेकांची सुखदुःखे वाटण्यापर्यंत झाले. मुळगांवकर तसे मितभाषी होते. त्यांचे मित्रमंडळ अत्यंत मोजके. त्यात साळगावकरांचे स्थान एकदम वरचे होते. साळगावकरांचे धार्मीक तत्वज्ञान आणि त्या देवादिकांना मुळगावकरांचे मनोहर असे चेहरे, हा संयोग घडून आला त्याकाळात.
गणेशाच्या विविध रूपांची मुळगावकरांनी रेखाटने केली आहेत. एकदा भगवान व्यासांनी सांगीतलेले महाभारताचे लेखन करणारे गणेश साळगावकरांना हवे होते. त्यावर मुळगावकरांनी अत्यंत मोहक असे गणेश रूप चित्रित केले. पण साळगावकरांना ते थोडे खटकले. कारण व्यासांचे विद्वत्तापूर्वक असे शब्द, त्या शब्दांचा अर्थ समजून घेवून तो लिहीणारा गणेश याच्या चेहऱ्यावर जे भाव त्यांना अभिप्रेत होते, ते त्यांना दिसत नव्हते. मुळगावकरांनी ते चित्र मागवून घेतले, व पुन्हां जयंतरावांच्या वर्णनाप्रमाणे त्यांना बनवून दिले. अशी निखळ मैत्री होती त्या दोन जिवलग मित्रांची. शब्दरंजनच्या वेळी मुळगावकरांनी केलेली अनेक चित्रे माझ्या स्मरणात अद्यापही आहेत.
जयंतरावांच्या ज्योतीष्याची प्रचीती अनेकांनी घेतली आहे. पण एक शास्त्र म्हणून त्याच्याकडे पाहणाऱ्या साळगावकरांनी त्याचा धंदा मात्र अजीबात केला नाही. अन्यथा केवळ त्या एकाच भांडवलावर ते कोट्याधीश झाले असते. पण अगदी रावापासून रंकापर्यंत अचूक भवीष्य सांगणाऱ्या साळगावकरांकडे अनेक थोरामोठ्यांचा राबता असे. मग ते राजकारणी असोत, समाजकारक असोत वा आपल्या गटांगळ्या खाणाऱ्या आयुष्याला कधी स्थीरता मिळेल या शोधात आलेले सामान्य जन असोत, सगळेच त्यांच्या पायाशी लीन होत. सर्वानाच ते विनामूल्य भविष्य सांगत. आणि अश्या रीतीने शब्दरंजनच्या अफाट यशात मिरवतांनाच अचानक दुर्दैव मागे लागले. त्यात सापडून आर्थीक घडी विसकटली. त्या हलाखीत सापडून पुढे लागलेल्या कोर्ट कचेऱ्यामुळे दुर्दैवाचे दशावतार त्यांना पहायला मिळाले. तरीही त्यांच्यातील अध्यात्मीक ताकद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कुठून तरी दैवी शक्तीचे प्रकाश किरण त्यांना जाणवत होते. आणि मनःशांतीसाठी ते सज्जनगडावर श्रीधर स्वामींच्या दर्शनाला गेले. तेथून येताच त्यांच्या मनात आनंदाच्या उर्मी उसळू लागल्या. आपल्या हातून काहीतरी नवीन घडणार आहे याची संवेदना त्यांना जाणवू लागली. आणि त्यावेळी त्यांच्या नजरेसमोर आले ते 'पंचांग'. पंचांग हे पूर्वी घरोघरी दिसत असे. लेखन करीत असलेल्या गणेशाचे चित्र असलेलं दाते पंचांग हे कित्येक पिढ्यानी या महाराष्ट्रात पाहीले आहे. नवीन पंचांग आणले, की त्याला टोच्याने भोक पाडून त्यात सुतळी घालून घरातील खुंटीला अथवा खिळ्याला ते अडकवीले जात असे. पण पंचांग पहाणे हे तितकेसे सर्वाना सोपे पडत नसे. हे सर्व ध्यानात घेऊन जयंतरावांनी एक कल्पना मांडली, कां नाही हे पंचांग सुलभ करून एका कॅलेंडरच्या ( दिनदर्शिका) रूपात मांडावे? जुन्या पंचांगाच्या ऐवजी हे कॅलेंडर सर्वच बाजूनी उपयुक्त ठरेल. यावेळी त्यांच्या अनेक स्नेह्यांनी त्यांना वेड्यात काढले. त्याकाळात प्रत्येक कंपनी आपापल्या उत्पादनाची जाहीरात करण्यासाठी सुंदर अश्या तरुणीचे चेहरे असलेली कॅलेंडर मोफत देत असत. त्या ऐवजी हे पैसे देऊन कोण घेणार? पण त्यातील खुबी ओळखली होती ती केवळ जयंतरावांनी. त्यांनाच त्यांच्या यशाचे गमक समजले होते.
ही दिनदर्शिका बनवताना त्यांना कल्पक अश्या सुलेखनकाराचे सहाय्य मिळाले ते होते अक्षरांचे बादशहा श्री कमल शेडगे. जेथे सुन्दर अक्षर दिसते तेथे कमल शेंडगे असतात असे म्हटले जात असे. त्या काळात मराठीत चांगले टाईप उपलब्ध नव्हते. डिस्प्ले टाइपांची तर वानवाच होती. लेटरप्रेसवर मोजक्या पॉईंटच्या टाईपची उपलब्धता असे. यावेळी अक्षरांकनकाराच्या हातचे वळण कामी येत असे. कमलचा डिझाईन सेन्स कालनिर्णयच्या पानापानावरून जाणवतो. कालनिर्णयचे पुढील पान तसेच मागील पान यातील समतोलही कमलने लयबद्ध सांभाळला. तारखांच्या आकड्यांचे वजन, त्यातील देखणेपण हे सर्व कमल शेडगे यांच्या हाताचे वळण आहे. कागदाची एवढीशीही बाजू फुकट न सोडता तेथे अन्य जाहीराती मोठ्या कल्पकतेने त्यांनी बसवल्या. व या कालनिर्णयमध्ये सुबक सौंदर्य आणले. नवीन वर्ष सुरु झाले, कालनिर्णयचे वितरण झाले की पुढील वर्षाच्या कालनिर्णय साठी कमल कामाला लागत असे. कालनिर्णय केवळ एक दिनदर्शीका न रहाता प्रत्येकाच्या गरजेनुसार ती पाहू जाऊ लागली. त्याकाळात गुगल नव्हते, पण तेव्हां कालनिर्णय हेच समस्त मराठी माणसांचे गुगल मानले जावे. आणि
भविष्य मेनू आरोग्य ज्ञान | उपयुक्त साहीत्य प्रत्येक पान |
पंचांग सोपे सुमंगल स्वभावे | भिंतीवरी कालनिर्णय असावे |
हे आपले घोषवाक्य घेवून कालनिर्णय १९७३ साली अवतरले व त्याची ही धून सर्वांच्या ओठावर घुमू लागली.
साळगावकरांनी विपुल असे लेखन केले. विषय धार्मिक असला की , त्यांच्या लेखणी- वाणीतून सरस्वती बहरत असे. श्री गणेशाचा हस्त त्यांच्या मस्तकावर असे. आणि कागदावर उमटत असत त्या दैवी सामर्थ्याचे शब्द. यामधील कांही पुस्तके आहेत ती,
'सुंदरमठ' -समर्थं रामदास स्वामींच्या जीवनावरील कादंबरी.
'देवा तूची गणेशु'- श्री गणेश दैवताचा इतीहास आणि स्वरूप, तसेच समाजावरील त्याचा प्रभाव याचा
अभ्यासपूर्ण आढावा.
'धर्म-शास्त्रीय निर्णय ' या ग्रंथाचे लेखन व संपादन.
'देवाचिये द्वारी'- संत वाङ्मयावर आधारीत धार्मीक -पारमार्थीक लेख संग्रह.
'रस्त्यावरचे दिवे- आयुष्यात आलेल्या अनुभव व घटनांवर आधारीत लेख संग्रह.
याशिवाय अनेक लहान धार्मीक पुस्तके, अभ्यासपूर्ण लेख, टीकात्मक लेखन ते सतत करीत असत.
साळगावकरांनी आपल्या जीवनात अनेक चढउतार पाहीले. पण त्यातही ते मोठे झाले ते स्व-कर्तृत्वावर. हिंदू धर्म आधुनिक व्हावा, त्यातून अंधश्रद्धा नाहीश्या व्हाव्यात अशी त्यांना कळकळ लागली होती. अनेक साहीत्यिक, कवि त्यांच्या जीवनात आले. त्यांना लाभला होता ग.दि.माडगूळकर, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, विद्याधर गोखले, पु.भा.भावे, मांधव गडकरी अश्या महान सारस्वतांचा निकट सहवास त्यामुळे त्यांची सांस्कृतिक बाजू संपन्न व समृद्ध बनली होती.
मध्यंतरी त्यांचे 'कालनिर्णय वर्तमान' हे प्रकाशन त्यांनी सुरु केले. एक उत्तम उपक्रम सुरु केला. पण शेवटी नशीब आडवे आले व ‘कालनिर्णय वर्तमान’ पुढे चालले नाही. ही खंत जयंतरावांनी मनाला खूप लावून घेतली. त्याचा एक धक्का त्यांना बसला होता. पण त्यांना त्यातून विनोदाच्या अंगाने सावरण्याचे काम केले पु.ल.देशपांड्यानी. पु.ल.म्हणाले, काय रे, पेपर बंद झाला काय? काय साळगांवकर, आपल्या पेपरचे नांव निदान 'आजनिर्णय वर्तमान' तरी ठेवायचे. 'कालनिर्णय वर्तमान' कोण घेईल ? हा विनोद ऐकून मात्र साळगावकरांची कळी खुलली व त्यांची तब्येत नॉर्मलला आली. लोकसत्तेशी मात्र त्यांचे एक वेगळेच नाते जुळले होते. जेव्हां ते मुंबईला आल्यावर लोकसत्तेचे संपादक हा.रा.महाजनी यांनी त्यांना नोकरी दिली, शब्दकोड्याची जबाबदारी दिली. मुंबईत प्रथम थारा दिला हे ऋण मात्र साळगांवकर कधीच विसरले नाहीत. ते लोकसत्तेत लागले तो दिवस होता २६ जुलै. संपूर्ण आयुष्यभर ते २६ जुलै रोजी संपादक विभागात सर्वांसाठी पेढ्याचा एक मोठा बॉक्स घेऊन येत असत. जो कोणी संपादकाच्या खुर्चीत असे त्याला घेऊन मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला नेत असत. महाजनीनंतर आलेल्या प्रत्येक संपादकांशी त्यांचे मैत्रत्वाचे संबंध होते.
अनेक मान सन्मान त्यांच्या वाट्याला आले. पूज्य शंकराचार्यानी त्यांना ‘ज्योतीर्भास्कर’ ही पदवी दिली आणि पुढे त्याच मानाच्या नांवाने ते सदैव ओळखले जावू लागले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचा 'जीवन गौरव पुरस्कार' ,
महाराष्ट्र कला निकेतन तर्फे त्यांच्या सांस्कृतिक कार्यासाठी देण्यात आलेला ' महाराष्ट्र रत्न पुरस्कार',
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे दिलेला धर्म संस्कृती क्षेत्रांतील 'प.पू. श्री गुरुजी पुरस्कार' तसेच २०११ साली त्यांना मुंबई मुद्रक संघाने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. असे हे त्यापैकी कांही सन्मान!
जयंतरावांच्या विद्वत्ता प्रचुर भाषण ऐकणे म्हणजे श्रोत्यांना एक पर्वणीच असे. एखाद्या विषयावर अथवा व्यक्तीवर ते बोलू लागले की सारे कसे तपशीलवार असे. स्मरणशक्तीच्या जोरावर ते तो संपूर्ण कालखंड आपल्या डोळ्यापुढे उभा करीत. मुळगांवकर सत्यनारायणाच्या पूजेला जाताना नारळ देखील त्यांच्या सौंदर्यदृष्टी प्रमाणे तासून पॉलिश पेपर मारून गुळगुळीत करून नेत असत. हे ऐकल्यावर प्रत्यक्ष मुळगांवकरच आपल्या नजरेसमोर येतात. तसेच ते किती प्रचंड काम करीत हे सांगताना त्यांच्या ब्रशवरील रंग कधीच सुकत नसे हे देखील ते आठवणीने सांगत. बोलण्यात कधीही खंड पडत नसे. बोलताना त्यांच्या तोंडून वाक्येच्या वाक्ये बाहेर पडत. जणू ते बोलायला उभे राहीले की प्रत्यक्ष वेद व्यास त्यांच्या कानांत वाक्ये सांगत असावेत, व हे महर्षी आपल्या मुखावाटे ती बाहेर काढत असावेत!
पण त्यांचे न ऐकलेले भाषणही मी एकदा पाहीले आहे. ऐकले नाही. प्रसंग होता सारस्वत बॅंकेच्या प्रभादेवी येथील सारस्वत भवनाचे भूमीपूजन. मोठा मंगल सोहळा आयोजीत केला होता रवींद्र नाट्य मंदीरात. अध्यक्षस्थानी होते अर्थातच ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर. गुरुवार होता तरी खास असे सारस्वती पद्धतीचे शाकाहारी-मांसाहारी भोजन ठेवले होते. व्यासपीठावर अनेक थोर मंडळी स्थानापन्न झाली होती. अनेक मान्यवरांचे सत्कार त्या निमित्ताने करण्यात आले. जयंतरावांचे शब्द ऐकण्यासाठी प्रत्येकाचे कान आसुसले होते. पण व्यासपीठावरील असलेले सर्वच जेष्ठ सन्माननीय बोलण्यासाठी आतुरले होते. त्यामुळे माइकला उसंत म्हणून ती मिळेना. काहीजण तर बोलणे संपवून परत फिरताना एखादा मुद्दा आठवल्यामुळे परत बोलू लागले. साळगांवकर शांतपणे पहात बसले होते. बराच उशीर झालेला होता. जेवणही व्हायचे होते. नंतर आली अध्यक्षांची वेळ. साळगांवकरानी फक्त एवढेच सांगीतले, 'मला बोलायचे होते ते मी लिहूनही आणले होते. पण मला वाटते आता लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सर्वाना भुका लागल्या आहेत व आतमध्ये जेवण तयार आहे. जेवून घ्या. हे भाषण मी पुढे जेंव्हा या भवनाचे उदघाट्न होईल, त्यावेळी करेन' आणि त्यांनी आपले भाषण संपवीले. एका मोठ्या विचारवंताला ऐकण्यास त्या दिवशी मी मुकलो.
एखाद्या व्यक्तीचे प्रचंड कार्य असले की आपण म्हणतो, ती व्यक्ती नव्हे तर संस्था आहे. पण साळगांवकर संस्था तर होतेच पण या महाराष्ट्राचा एक प्रचंड असा सांस्कृतीक कालखंड होते. संस्कृती त्यांनी जोपासली, वाढीला लावली आणि घरोघरी पोचवली. आज कॅलेंडरचा काळही गेला पण साळगावकरांचे 'कालनिर्णय' आजही घरोघरी भिंतीवर दिसते. कारण त्यात आपण पहात असतो ते आपले प्रतिबिंब, आपल्या गरजांवर उपाय, आपल्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या पाककृती, आपल्या आरोग्याची देखभाल घेणारे, भविष्यातील वेध घेणारे आपल्याला विरंगुळा देणारे नामवंतांचे लेख. आणि त्याशिवाय दैनंदिन जीवनातील घडामोडीसाठी असलेले पंचांग. आणि काय पाहीजे? अनेकांनी कालनिर्णयची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी अस्सल हिरा तो अस्सल राहीला, नकली भंग पावले. अश्या या महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राने महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला सुमंगल प्रकाशन आणि 'कालनिर्णय दिनदर्शिका' तसेच 'कालनिर्णय वार्षिक' या रूपाने खूप मोठी सांस्कृतीक देणगी दिली व २० ऑगस्ट २०१३ साली तृप्तपणे या जगाचा निरोप घेतला. आज त्यांचे चिरंजीव व थोर अर्थतज्ञ जयराजजी साळगांवकर व त्यांचे कुटुंबीय तितक्याच आपुलकीने, कर्तबगारीने, व सौंदर्य निष्ठेने हा वारसा पुढे चालवीत आहेत. तशीच संस्कृती जपत आहेत. कालनिर्णयचे कुटूंब वाढवीत आहेत, व त्याच्या लोकप्रियतेत भर घालत आहेत.
आपण त्यांचे जेव्हां स्मरण करतो, तेव्हां आपले हात नकळत त्यांच्यापुढे जुळले जातात. आणि आपण नतमस्तक होतो!
- मं.गो. राजाध्यक्ष






According to Stanford Medical, It's in fact the SINGLE reason this country's women get to live 10 years more and weigh on average 19 kilos less than we do.
ReplyDelete(And actually, it is not about genetics or some secret-exercise and really, EVERYTHING about "HOW" they are eating.)
BTW, What I said is "HOW", and not "WHAT"...
CLICK on this link to see if this brief quiz can help you unlock your real weight loss potential
As reported by Stanford Medical, It's indeed the SINGLE reason women in this country get to live 10 years more and weigh on average 19 kilos less than us.
ReplyDelete(Just so you know, it has NOTHING to do with genetics or some hard exercise and really, EVERYTHING about "HOW" they eat.)
BTW, I said "HOW", not "what"...
Tap this link to reveal if this brief questionnaire can help you release your real weight loss potential