'या मंडळी सादर करू या' नाट्यसंस्थेची वैभवशाली ४३ वर्षे.
सर ज.जी. उपयोजीत कला महाविद्यालयांतील माझ्या सुमारे बत्तीस वर्षांच्या शिक्षकी कारकिर्दीतीत अनेक विद्यार्थी येऊन गेले. अनेकजण त्यांच्या बऱ्या वाईट कृतीमुळे ध्यानात राहीले. आरंभी मी खूपच ज्युनीयर असल्याने आमचे जे प्राध्यापक असत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्हांला काम करावे लागे. पण हळूहळू स्वतंत्रपणे मी विध्यार्थ्यांच्या कामावर सुधारणा करू लागलो. त्यामुळे अनेक विद्यार्थी संपर्कात येऊ लागले. दरवर्षी नवीन विद्यार्थी येत, आणि मागील विद्यार्थ्यांशी गुंफलेले बंध तसेच रहात. कारण जे.जे. हे एक कुटुंब आहे. सर्वच पिढ्यातील विद्यार्थ्यांना भावनीक नात्याने बांधून ठेवणारे. पण का कोण जाणे, ते विद्यार्थी मात्र कायमचे स्मरणात राहीले. काय नाते होते त्या विद्यार्थ्यांशी? तसे पाहीले तर माझा वैयक्तीक त्यांच्याशी कॉलेज जीवनात फारसा संबंध आला नाही. पण हे विद्यार्थी जेव्हां तृतीय वर्षात आमच्याकडे आले, तेंव्हा जाणवला तो त्यांच्यातील बेडरपणा, त्यांचा बंडखोरपणा, आणि थोडासा असलेला वेडेपणा. आणि अशीच वेडी माणसे प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस करतात, व त्यांच्याकडून असे काही घडते की ते आपले नांव कोरून जातात. आणि हे घडते कश्यामुळे?
तर त्यांना घट्टपणे बांधून ठेवणारे एक पवीत्र बंधन. षांताराम पवार नांवाचे! आणि ही सर्व मंडळी जेव्हां वर्गात आली, त्याचे वर्गप्रमुख होते हेच षांताराम पवार. संस्थेमधील एक वादग्रस्त तसेच सर्जनशील व्यक्तीमत्व. कलेसोबतच साहीत्य, नाट्य, टीका, काव्य, यामध्ये रस घेणारे तितकेच प्रभावी असे. आणि त्यांची शिस्त तर इतकी जबरदस्त की, मनाजोगते काम विद्यार्थ्यांकडून झाले नाही तर त्याच्या समोरच ते टरकावुन टाकीत असत. पण त्याच सोबत हातात ब्रश उचलून ते स्वतः करून दाखवीत. ही त्यांची ताकद होती. आणि या वर्गावर त्यांच्या सोबत आम्ही शिक्षक वर्ग होतो ते मी स्वत:, सुधाकर खांबेकर व दत्ता नावेलकर. त्यावर्षी जे.जे.ची नवीन इमारत मागील बाजूस उभी रहात होती. एकेक वर्ग जसा तयार होत असे तसा नवीन वर्ग त्या ईमारतीत स्थलांतरीत होत असे. त्यामुळे आमचा तृतीय वर्षाचा वर्ग तेथे स्थानापन्न झाला.
नवीन विद्यार्थी आले की पवार सर प्रत्येकाची ओळख करून घेत. तो काय करतो, कुठे रहातो, हे प्रश्न ते त्याला विचारीत. त्यावरून त्याची स्थिती त्यांना समजे. त्याच्या आवडी, छंद, यावरून त्याची सांस्कृतीक पातळी ते आजमावत. यातून पवारांचा एक प्रश्न हटकून त्यामध्ये असायचा, 'तुम्ही वाचता का?' यामधून त्यांना बरीच उत्तरे मिळत. तो कविता वाचतो का, नाटक -सिनेमा पाहतो का, हे ते जाणून घेत. यावरून समोरचा माणूस किती तयार आहे, त्याला शिलगावयाला काय करायला हवे याचा वेध पवार सर घेत. आणि ह्या मुलांची बॅच जेंव्हा त्यांच्या समोर आली, तेंव्हा पवारांना आढळून आली त्यांची विलक्षण अशी बौद्धीक पातळी. या मुलांकडे लिहीणे होते, वाचन होते, नाटके पाहण्याची आवड होती. पण ते खिशाला परवडणारे नव्हते. काव्याची सुद्धा अनुभूती हे विद्यार्थी घेत होते, त्याच सोबत वाद्येही वाजवत होती. आणि येथे पवारांचे डोळे चमकले. यांच्यातील ठिणगी शिलगावयाचीच, हा विचार त्यांच्या मनांत पक्का रुजला. आणि पवारांनी या टोळक्याला आपल्या केबिनमध्ये बोलावले. आणि त्यांचे आपल्या आणि त्या विद्यार्थ्यांचाही भाषेत बौद्धीक घेतले. अजूनही मला ती सर्व मुले डोळ्यासमोर येतात. ते होते पुरुषोत्तम बेर्डे, रघुवीर कुलकर्णी, नलेश पाटील, अशोक वंजारी, राकेश शर्मा, हेमंत शिंदे, विजय रायकर, अशोक साळगांवकर, अजीत पालकीवाला, विजू ताडफळे ! एकापेक्षा एक वरताण असलेल्या या विद्यार्थ्यांशी जमवून घेणं आधी कठीण. त्यात त्यांना वेगळ्या उपक्रमात गुंतवणं हे तर त्याहून कठीण. पण पवार सरांची किमया काही और होती. आणि तृतीय वर्ष संपवून हे सर्व विद्यार्थी पुढच्या अंतीम वर्षात प्रवेश करते झाले. आमच्या वाट्याला आला तोच वर्ग, त्याच त्यांच्या ठरलेल्या जागा, तेच आम्हां सर्व शिक्षक-विद्यार्थ्यांचे चेहरे. नवीन वर्षाचे नावीन्य कोणालाच वाटले नाही. केवळ शैक्षणीक वर्ष हे १२ महिन्यांचे असते, त्या ऐवजी २४ महीन्यांचे झाले असे वाटे. अजूनही या विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या जागा माझ्या मनांत पक्क्या आहेत. निळ्या रंगाचा दोन्ही बाजूना खिसे असलेला शर्ट घालून समोरील दुसऱ्या बाकावर डावीकडे बसलेला रघु कुलकर्णी, तेथेंच त्याचे कलेसोबत काव्य अन साहीत्य बहरत असे. पाठीमागे अत्यंत सुंदर अशी ढोलकी वाजवणारा पुरुषोत्तम बेर्डे, कधी कधी त्यावेळी नुकताच लागलेल्या अमिताभच्या दिवार मधील भूमिकेप्रमाणे शर्टची दोन्ही टोके बांधणारा अशोक वंजारी, काव्यमय भाषेत बोलणारा आणि चित्रात संवाद साधणारा नलेश पाटील, खाली मान घालून शांतपणे काम करीत असलेला विजय रायकर, वर्गात सर्वात उंचीमुळे उठून दिसणारा हेमंत शिंदे, सैगलच्या गाण्याचा भक्त असलेला व आपल्या दर्दभऱ्या आवाजात गाणारा राकेश शर्मा, विजू ताडफळे, असे हे सर्व विद्यार्थी विखुरलेले बसतं असत.
त्यावेळेपर्यंत जे.जे.मध्ये हाऊस जर्नल नव्हतं. पवारांच्या नजरेसमोर बाहेरच्या भिंतीवर लावलेला नोटीस बोर्ड आला. छापून नसेना का, पण निदान हस्त-लिखीत प्रमाणे एक जर्नल त्या बोर्डावर का चितारू नये? नाही तरी तीन तीन महीने अंगात असंख्य टांचण्या खुपसून घेऊन जुन्या शासकीय नोटीसा तेथे एकमेकांवर रेलल्या होत्या. त्या नोटीस बोर्डाचा सरकारी चेहरा पुसून काहीतरी वेगळं करावं या भावनेने पवारांनी सर्वाना कामावर लावलं. व त्याचे नामकरण ' समाचारी बेरड' असे करून तो पुरुषोत्तम बेर्डेच्या ताब्यात दिला. आणि तेथे सर्वच लिहू लागले. त्यांच्याच भाषेत लिहीणे हे महत्वाचे होते. कोणाचे लेख दिसू लागले, कोण कविता लिहू लागले, कोण व्यंगचित्र काढू लागले, पुरूषोत्तम , बोरीबंदरचा बेरड’ या टोपणनांवाने समीक्षण करू लागला. असे प्रत्येकजण आपापले कला-साहीत्य गुण त्या जर्नलवर दाखवू लागला. सर्वाना या 'समाचारी बेरड'ने एक अमोल अशी संधी प्राप्त करून दिली. आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक वेगळी अशी कलाटणी मिळाली. व तेथूनच त्यांची एक अनोखी वाटचाल सुरु झाली. एकदा रघुवीर कुलकर्णीने आपल्या लेआऊटची काॅपी त्याना सुधारण्यासाठी दाखवली. ती वाचताच पवार उद्गारले, काय रे, कविता करतोस कां? रघु कविता करीत असे, पण हे त्यांना कोणी सांगीतले हे विचारताच सर म्हणाले, येथेच दिसते नां ! येथेच रधुवीरच्या नांवावर कवीचा शिक्का बसला. पवार सरही असे किमयागार की, हातात माती आली की तिला शिल्पाचा आकार दिल्याशिवाय त्यांना स्वस्थता लाभतच नसे. पुढे हे विद्यार्थी लिखाणात वाकबगार झाले. जोडीला काव्यातही रस घेऊ लागले. अभिनयाची जाण त्यांना उपजतच होती. या समाचारी बेरडांमध्ये लिहायला लावतांना पवारांनी आपला गुरुमंत्र त्यांना दिला, तुम्ही लिहू शकता. विचार करू शकता, जे काय तुम्ही पहाता ऐकता, त्यावर दहा ओळी लिहा. आणि पवारांनी या मुलांना एक नाटक लिहीण्यास प्रवृत्त केले. आणि ही बनली जे.जे.ची एक क्रिएटिव्ह टीम.
त्यावर्षी जे.जे.मध्ये स्नेह संमेलनाच्या वेळी प्रत्येक वर्गाने आपापल्या एकांकीका सादर करायच्या ठरवील्या. पण बेर्डेने आपल्या वर्गाच्या दोन एकांकीका सादर करण्याचे ठरवीले. नुकतीच संस्थेची म्हैसूर-हळेबिट येथे वार्षीक शैक्षणीक सहल जाऊन आली होती. हे सर्वच विध्यार्थी सहलीला जाऊन आले होते. तेथील आलेल्या शिक्षकांच्या तऱ्हेवाईक पणाचा, विद्यार्थ्यांच्या खोडसाळपणाचा, स्वतःला झोकून देऊन केलेल्या कामाचा, घडलेल्या विनोदांचा, मजेशीर तसेच हृदय द्रवणाऱ्या अनुभवावर आधारीत अशी 'टुर टुर' ही एकांकीका बेर्डेने लिहीली. तर रघुवीर कुलकर्णीने ' अभद्र' ही एकांकीका लिहीली. आणि त्यावेळी टुरटुर ने विक्रम घडवीला. ज्याच्या त्याच्या तोंडी 'टुरटुर' होते. सहलीत घडणाऱ्या शाब्दीक कोट्या, नेहमीच्या सरावातील शिव्या,घडणारे विनोद व हळवेपणा यावर आधारीत ही एकांकीका इतीहास घडवून गेली. पवारांनी पाहीले या पोरांकडे जिद्द आहे. भरपूर ताकद आहे. कल्पना शक्ती व सर्जनशीलता ओसंडून वहाते आहे, याचा उपयोग झालाच पाहीजे. गरज आहे ती त्यांना दिशा दाखविण्याची. आणि पुरुषोत्तमच्या म्हणण्यानुसार 'सरांनी नुसती प्राध्यापकी न करता आमच्यातील असलेले कांही छुपे गुण होते ते बाहेर काढले व जोपासले. त्यामुळे आमच्या पुढील कारकीर्दीमध्ये आम्ही केवळ चित्रकाराच म्हणून नव्हे, तर वेगवेगळ्या माध्यमांतून आम्ही व्यक्त होत गेलो.' आणि खरेच, उपयोजीत कले मध्ये सर्वच कला समावीष्ट असतात. फक्त त्यांचे माध्मम वेगवेगळे असते
वार्षीक परीक्षा आटोपल्या. जे.जे.मधील चार वर्षे आटोपून हे विद्यार्थी बाहेर पडले तेच आयुष्यात काहीतरी नवीन घडविण्याच्या दृष्टीने! सर्वजण आपापल्या व्यवसायाला लागले. मात्र त्यांची जे.जे.शी असलेली नाळ मात्र तुटली नव्हती. कामे आटोपून झाली की रोज संध्याकाळी हे सर्वजण जे.जे.मध्ये पवार सरांच्या केबीन मध्ये अथवा रमेशच्या कॅन्टीनमध्ये दिसू लागले. आता तर या सर्वांना नाटकाने पूर्ण झपाटून टाकले होते. शिवाय ठिणगी शिलगावयाला पवार सर तयार होतेच! पवार सरांचा दिवस संस्थेत सकाळी आठ वाजता सुरु होवून संध्याकाळी पांच वाजेपर्यंत संपत असे. तो आता रात्रीपर्यंत वाढू लागला. तेथे झडत असत नाट्य गप्पा. प्रत्येकजण झपाटलेला. त्यामुळे गप्पाना अंत नसे. सर्वाना रमेशच्या कॅंटीनचा चहा येत असे व पवारांच्या वहीवर त्याची नोंद होत असे. तेही झपाटून गेले होते. कारण त्यांच्या मते स्वप्नापासून जगण्यापर्यंत नाटकामध्ये सर्व शक्य असते. याकाळात पवारांनी आपल्या वैयक्तीक कामकडेही दुर्लक्ष केले. घरी त्यांना विचारायची कोणाची हिम्मत नव्हती. पण तरीही त्यांच्या मोठ्या मुलीने, गौरीने त्यांना ' अधूनमधून घराकडेही लक्ष द्या' असा थोडासा प्रेमळ व थोडा धाकाचा सल्ला दिला. कारण कामे थांबल्यामुळे अमदानी पण थांबली होती.
पवार सर आपल्या बैठकीत नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना अश्या सर्वच बाबींवर परीपूर्ण अशी बोधक माहीती देत असत. या मुलांमध्ये सर्वच गुणी होते. पुरुषोत्तम लेखन-दिग्दर्शन करीत असे. नलेश पाटील सुंदर गाणी लिहीत असे. राकेश शर्मा हा गात असे, शिवाय त्याला उर्दूचे चांगले भान होते.एकंदरीत नाटक पुढे चालविणे हे या मंडळींचे ध्येय होते. त्याबद्दल आत्मीयता होती. आणि पवार नामक भक्कम असा आधारस्तंभ संस्कार घडवत उभा होता. या विद्यार्थ्याकडे 'टूर टूर ' व 'अभद्र' या दोन एकांकीका तर तयार होत्याच! यातच अजून दोन एकांकीकांची भर घालायची, व या चार एकांकीकांचा गुच्छ छबीदास मध्ये सादर करायचा व रसीकांपुढे प्रकट व्हायचे असे त्यांनी ठरवले. तो पर्यंत या ग्रुप मध्ये राणी सबनीस, दिलीप वारंग, महेश कुबल, प्रदीप मुळ्ये, राज शिंगे हे देखील सामील झाले. पवारांच्या केबिनमध्ये बैठका अन त्यावर पवारांचा चहा हे समीकरण ठरलेच होते. यावेळी पवारांनी स्वतः लिहीलेले व कमलाकर सारंग यांच्याकडून परत आणलेले 'चिकण्या मारुती' हे नाटक वाचून दाखविण्यास सुरुवात केली. एव्हाना पवारांनी नाटकाच्या सर्व अंगानी अभ्यास केला होता. दामू केंकरे यांच्याशी संबंध आले होते. तेही बऱ्याच तालमींना हजर रहात. डॉ. लागू, अमोल पालेकर, सतीश दुभाषी, कमलाकर सोनटक्के अश्यांच्या रंगीत तालीमीना हे सर्व हजर राहायचे. त्यात दिग्दर्शन हाच केंद्रबिंदू असायचा. आणि नेपथ्यकाराच्या जोडीने दिग्दर्शक हे सौंदर्यकमळ पूर्ण करायचा. जेवढा अभ्यास दिग्दर्शकाचा तेवढाच नेपथ्यकाराचा हवा याची जाणीव ते करून देत. नाटकाची संहीता ही मानसीक पातळीवर आधारलेली हवी. केवळ वास्तूचं नव्हे, तर वस्तूमधूनही गोष्ट निर्माण झाली पाहीजे. नाटकाची उंची दिग्दर्शकाने वाढवली पाहीजे हे तत्त्वही पवार नाट्यअभ्यास करताना येथे शिकले. आणि या सर्व बाबी त्यांनी या सर्जनशील कलाकारांवर रुजवील्या.
या पुढील पायरी होती ती, बाहेरील एकांकीका स्पर्धामधून भाग घेण्याची. यासाठी संस्था स्थापन करणे व तिला एक समर्पक असे आशयपूर्ण नाव देण्याची आवश्यकता होती. कोणतीही कल्पना सुचली की सर्वप्रथम पवार सरांना दाखवून त्यांची पसंती घेणे हे या सर्व मंडळींचे आवडते काम होते. आताही संस्थेच्या बारश्याची वेळ आली, तेव्हां सर्वच आपल्या सर्जनशील मेंदूला खाजवू लागले. शेवटी सर्वानी एक दिवस 'न्यू एम्पायर' च्या कॅफे मध्ये भेटण्याचे ठरवीले. सदर कॅफे जे. जे.च्या जवळच असल्याने पवार सर तेथे आधीच पोचले. त्यांच्या सोबत दत्ता नावेलकर, रंजन जोशी हे त्यांचे सहाध्यायी देखील होते. तसेच याच ग्रुप मधील हेमंत शिंदे हाही होता. हळू हळू एकेक करून सर्वजण तेथे अवतरले. सर्वांच्या या विषयावरच गप्पा सुरु होत्या. आणि अचानक हेमंत शिंदे म्हणाला, "या मंडळी सादर करीत आहोत " नेमके पवारांनी त्याचे हेच वाक्य हेरले. ते म्हणाले, अरे, याने तर संपूर्ण नाटकाची संहीताच सांगीतली. मी तुम्हांला म्हणालो नव्हतो का? की नाटक हे दोघांचे असते. 'नाटक आणि प्रेक्षक' आणि येथे पवारांनी थोडा बदल केला. 'सादर करीत आहोत' ऐवजी " या मंडळी सादर करू या!" असे म्हणून प्रेक्षकांनाही त्यांनी त्यात गुंतवले. एक नवीन नाट्यसंस्था नाट्यक्षेत्रात जन्माला आली, आणि तिचे बारसेही करण्यात आले.
" या मंडळी सादर करू या! " नाट्यवेड्या शिक्षकाच्या आणि तितक्याच नाट्यवेड्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमधून उदयाला आलेली एक नवी नाट्यसंस्था. असे आगळे वेगळे नांव कोणत्याच संस्थेच्या मनांत कधी आले नसेल. एक सृजनशील मंथनाचा परीपाक होता तो! रघुवीर कुलकर्णीने संस्थेला साजेसे ब्रीदवाक्य लिहीले, 'नाट्यानंद केवळ रंगमंचावर नसतो. केवळ प्रेक्षकांत नसतो. असतो तो दोहोंच्या परस्पर संबंधात.' लगेच संस्थेचे बोधचिन्ह नलेश पाटीलने तयार केले. कुंकवाचा उभा टिळा व त्यावर थोड्या अक्षता. नांवाला साजेसं व रसीक मंडळीचं मंगलमय स्वागत करणारं! २८ सप्टेंबर १९७६ या दिवशी गुरुवर्य षांताराम पवार यांच्या मार्गदर्शनाने, प्रेरणेने, आशीर्वादाने जे.जे.च्या अधीष्ठातांच्या बंगल्यावर या अनोख्या नाट्यसंस्थेचा नारळ वाढवला.
संस्थेचे 'अलवारा डाकू' हे नाटक सादर झाले. जाहीरातीसाठी पैसा नव्हताच. यावेळी मदतीला धावून आले ते 'कॅनन' चे दांडेकर. पुण्यात सायकल दिंडी काढली. अलवारा डाकू मध्ये अशोक वंजारी मुख्य भूमिकेत होता. तोंडात रॉकेल भरून पेटत्या मशालीवर त्याचा फवारा उडवून अशोक आगीचा जाळ करीत असे, ते पाहून पाहणाऱ्याच्या जीवाचा थरकांप होत असे. टुरटुर हे आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे नाटक देखील रंगभूमीवर सादर झाले. या नाटकामुळे सुधीर जोशी, लक्षुमीकांत बेर्डे, विजय कदम, या सर्वांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. अश्या रीतीने ह्या सर्वच कलाकारांची मने घट्ट रीतीने एकत्र बांधली गेली होती. आणि बघता बघता हे सर्व प्रायोगिक कलाकार व्यावसायिक बनले. स्वतःच्या पायावर उभे राहीले. पण पवार सरानी त्या सर्वांवर एक शिस्त बिंबवली होती. सर्वप्रथम तालमीची जागा त्यांना स्वच्छ लागे. प्रसंगी ते स्वतः हातात झाडू घेऊन जागा स्वच्छ करीत. मग ही मुलेही कटाक्षाने ती शिस्त पाळू लागली. म्हणून पवार सर म्हणायचे, 'मी डोळा फिरवतो, तेथे हे बोळा फिरवतात!' अर्थात स्वच्छतेचा. नंतर या संस्थेने पुढची दहा वर्षे चांगलीच गाजवली. अनेकजण या वारीत वारकरी झाले. त्यांनी या नाट्यपंढरीच्या पालखीला हातभार लावला. 'या मंडळीने' भरपूर नाटके, एकांकीका केल्या. अलवारा डाकूला ४० वर्षे पूर्ण झाली. पुरुषोत्तम बेर्डे आणि रघुवीर कुलकर्णी या दोघांनी बरीच नाटके रंगमंचावर आणली. त्यापैकी देवस्की, काय डेंजर वारा सुटला, कोळीष्टक, इजा बिजा तिजा ही नाटके रघूने लिहीली आणि पुरूने दिग्दर्शीत केली. पुरूने आकडेमोड, टूरटूर, वारकरी ही नाटके सादर केली. जिथे गाण्याची गरज होती तिथे नलेश ती आपल्या हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या शब्दांनी पूर्ण करीत असे. पुढे पुरुच्या 'हमाल दे धमाल' या चित्रपटासाठी देखील पुरूने नलेशला गाणी लिहायला लावली. कोळिष्टक चे नेपथ्य आजचे सुप्रसीध्द नेपथ्यकार व त्यावेळचे 'या मंडळी'चे सोबती प्रदीप मुळ्ये यांनी केले होते. त्यांचे ते पहिलेच नेपथ्य.
' या मंडळी.. .' मुळे या सर्व कलाकारांना एक स्वतंत्र अशी ओळख मिळाली. पण शेवटी अनेक सर्जनशील मने एकत्र आल्यावर जे घडतं तेच येथेही झाले. प्रत्येकाला स्वतःचं मोठेपण दिसायला लागलं. एका नाट्यवेड्या ध्येयातून जन्माला आलेल्या, तितक्याच सृजनशील ,समर्थ अश्या षांताराम पवार या सूत्रधाराशी घट्ट जोडलेल्या अश्या 'या मंडळी सादर करू या!' ही संस्था १९८५ साली बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. याचं सर्वाधीक दुःख होऊन कोणाचं मन आक्रन्दलं असेल तर ते षांताराम पवार सरांचं ! आणि ही संस्था बंद होण्याचं एक महत्वाचे कारण म्हणजे सर्वच जाहीरात कलेशी निगडीत होते. जाहीरात क्षेत्रांतील आकर्षण होतेच. त्यातील अशोक वंजारी पुढे अमेरीकेला गेला. नलेश जाहीरात क्षेत्रांत गगनाला पोचला होता. पुरुषोत्तम बेर्डे स्वतंत्रपणे आणि समर्थपणे नाट्य-चित्रपट क्षेत्रांत चमकू लागला. स्वतःचे एक बळकट स्थान त्याने या क्षेत्रांत निर्माण केले. तो आजही तसाच चमकतो आहे. रघुवीर कुलकर्णीचेही तेच झाले. स्वतंत्रपणे त्याचीही वाटचाल चालू आहे. नंतर काहींचे विवाह होऊन ते कुटुंबात रमले. कांही स्थलांतरीत झाले. असे एकेकजण विखुरले. पण जरी नाटक बंद झाले, तरी नाट्यसंस्था चालूच राहीली. 'या मंडळी सादर करू या' हे नांव अबाधीत राहीले. सर्वच एकमेकांच्या संपर्कात राहीले. सर्वानी आपले अस्तीत्व टिकवून ठेवले. दरवर्षी सर्वांची सहल निघू लागली. मध्यंतरी नलेशचे दुर्दैवी अकाली निधन झाले. त्यानंतर पवार सरही सर्वांना सोडून गेले. त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम करण्यात आले. नलेशच्या कवितांचा कार्यक्रम असो वा त्याच्या काव्यसंग्रहाला मूर्त रूप देण्याचा, कारणीभूत ठरली ती 'या मंडळी सादर करू या ' हीच संस्था. हे नावंच आज या कुटुंबाचे तीर्थक्षेत्र बनलेआहे. नंतर १९९५ साली या संस्थेत बाहेरील कलाकार सामील झाले. त्यात विजय केंकरे आधीच होते. त्यांच्यामुळे बरेचसे व्यावसायीक यात आले. पण यातील कोणाला पवारांची शिस्त झेपली नाही. किंबहुना पवार सर या विद्यार्थ्यांना गुरुस्थानी होते, त्यामुळे त्यांचे परखड बोलणे, वेळप्रसंगी त्यांची बोलणी खाणे ही मुले फुलाप्रमाणे झेलत. ते बाहेरील लोकांना मान्य होणे कदापीही शक्य नव्हते. आणि पवार सर यातून बाहेर पडले. पण संस्थेशी या सर्वांची नाळ मात्र जुळलेलीच राहीली! अभेद्य अशी. घट्ट विणीने गुंफली गेलेली. आजही ती तशीच आहे.
आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे आज 'या मंडळी सादर करू या!' ही संस्था आपला ४३ वा वर्धापन दिन आज दिमाखात साजरा करीत आहे. मराठी रंगभूमीवरील अनेक तारे तारका आज येथे एक स्नेह संमेलन भरवणार आहेत. रंगभूमीच्या सप्तरंगी रंगमंचावर ही फुलपाखरे अल्लडपणे वावरणार आहेत. आणि भर्रकन माझे मन ७४ -७५ सालच्या जे.जे.च्या नवीन इमारतीमधील त्या वर्गात गेले. भरा भरा एकेक चेहरे डोळ्यासमोर येऊ लागले. खोडसाळपणा करणारी व तितकीच साहीत्यात बहरणारी, काव्यात दरवळणारी आणि कुंचल्यात रमणारी ही थोडीशी बंडखोर मुले आज नाट्यक्षेत्रात स्वकर्तृत्वावर ठामपणे पाय रोवून उभी राहीलेली पाहतो तेव्हां मन आनंदाने उचंबळून येते. बेर्डे यांच्या लेखन स्पर्शाने बऱ्याच गुणी कलाकारांना पुढे आणले. आणि आजच्या या मंगल प्रसंगाची आठवण म्हणून दादर येथील 'पार्कवे क्लब' येथे सर्वजण जमून त्या निमित्ताने एक भरगच्च कार्यक्रम आयोजीत करून त्यांची प्रारंभीची व यावर्षी चाळीशी पार केलेली 'अलवारा डाकू' ही एकांकीका देखील सादर करण्यात येणार आहे.
सर ज.जी.उपयोजीत कला महाविद्यालयाच्या शैक्षणिक जीवनांत एक आगळा वेगळा इतिहास घडवणाऱ्या 'या मंडळी सादर करू या' च्या सर्व सभासदांना जे.जे.च्या संपूर्ण शिक्षक-विद्यार्थ्यांच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छांचा वर्षाव मी आज करीत आहे. आणि त्यांच्या पुढील वाटचालीत त्यांच्या प्रत्येक पावलागणी त्यांना यश लाभो दे! हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
चला मंडळी, सादर करीत राहा!
प्रा.मं.गो.राजाध्यक्ष
२० सप्टेंबर, २०१९.
( प्रा.षांताराम पवारांचे छ्यायाचित्र : सौजन्य- गंगाधरन मेनन.पवार सरांचे स्केच : पुरुषोत्तम बेर्डे)


Comments
Post a Comment