सामाजीक बांधिलकीचा एक यशवंत कलाकार : यशवंत चौधरी
एखादी व्यक्ती कोणाच्या भेटीला जाते, त्यामागे कांहीतरी उद्देश असतो. त्या व्यक्तीशी त्याची कधीच भेट झालेली नसते. त्यामुळे भेट घेण्याच्या संदर्भात ती व्यक्ती आपले व्हिजीटींग कार्ड प्रथम पाठविते. त्या कार्डाचे स्वरूप, त्याचे संकल्पन, त्यावरील त्याचे अथवा त्याच्या आस्थापनेचे बोधचिन्ह, त्यातील आकर्षकपणा हेच सर्वप्रथम एखाद्याची ओळख त्या व्यक्तीकडे आपण पोचण्यापूर्वी त्याला करून देत असते. त्यामुळे ते बोधचिन्ह व त्याचा वापर केलेल्या लेटर हेड, व्हिजीटींग कार्ड, पाकीटे आदी संकल्पनांना अतीशय महत्व आहे. केवळ आपल्या देशातच नव्हे, तर साऱ्या जगात अश्या प्रकारे असलेल्या स्टेशनरीला अत्यंत महत्व आहे. आज आपल्या देशांत या बोधचिन्हांमधील कलात्मक आकार गुणांचे रचनात्मक संकल्पन करण्याचे व आपल्या देशाला या कला आणि विचार प्रसारणाची ओळख करून देण्यात आपल्या देशातील एक आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान भूषविलेले असे एक सर्जनशील कलावन्त प्रा. यशवंत चौधरी यांचा सिंहाचा वाटा आहे.
खानदेशातील वाघाडे या गांवी २६ एप्रील १९३० रोजी यशवन्त चौधरी यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण तेथेच घेऊन कलेचा ध्यास असलेल्या चौधरींनी सर्वाप्रमाणे मुंबईतील सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट या कलासंस्थेकडे धांव घेतली. मात्र ते रंग-रेखा कडे न वळता ते सरळ उपयोजीत कलेमध्ये दाखल झाले. उपयोजीत कलेमध्ये शिक्षण घेत असतांना बाहेरील देशातून आलेल्या कला मासीकातील ग्राफीक या चित्रांच्या सुलभीकरण असलेल्या प्रकाराने त्यांच्यावर मोहीनी घातली, आणि त्यांच्या चौकस बुद्धीने त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मूळ ड्रॉईंग तर पक्के हवेच, त्यानंतर सदर ड्रॉईंगचे सुलभीकरण केल्यास ती घटना अथवा चित्र आपल्या मनाशी पक्के ठसते याची त्यांना खात्री होती. यासाठी हवी ती सर्जनशील अशी विचारशक्ती. अनेक परदेशी पुस्तके वाचून त्यांनी स्वतःमधील कलारूचीला सुदृढ व संपन्न केले होते. शिवाय वर्गामध्ये दिलेल्या विषयावर केवळ अर्थ स्पष्ट होईल असे चित्र न काढता ते विचारपूर्वक त्यातील गाभा समजून घेत व त्यामुळे त्याचे चित्र हे खऱ्या अर्थाने विचार प्रसारणाचे अर्थपूर्ण चित्र होत असे. दरवर्षी चौधरी परीक्षेत पहीले येत असत. आणि त्याचप्रमाणे ते अंतीम वर्षातही सर्वप्रथम येऊन त्यांनी जे.जे.ची फेलोशीपही मिळवली. बाहेर व्यावसायीक क्षेत्रातही त्यांना आधुनीक असे कोणी काम केल्याचे जाणवत नसे. कारण भारताने तोपर्यंत ग्राफीक डिझाईन या क्षेत्रांत पाहीजे तशी आघाडी घेतली नव्हती. चौधरींच्या सृजनशील मनाला परदेशात जाऊन या गोष्टी आत्मसात करण्याची अनीवार ओढ लागलेली होती. त्यामुळे पुढे ते लंडन येथे 'सेंट्रल स्कूल ऑफ आर्ट' मध्ये दाखल झाले. त्याकाळात उच्च शिक्षणासाठी आतासारखे परदेशात जाणे सोपे नव्हते. तेथून त्यांनी नॅशनल डिप्लोमा घेतला. यानंतर चौधरींच्या विचारकक्षा व त्यांची दृष्टी रुंदावली. विचार प्रसारण कला व ग्राफीक डिझाईन याना पूरक असलेले असे विवीध अभ्यासक्रम चौधरींनी पूर्ण केले, ते होते ' एक्झीबिशन डिझाईन, फिल्म ॲज ॲन आर्ट, ॲडव्हर्टायझींग मॅनेजमेंट इन फिलॉसॉफी.
लंडनमध्ये त्यांनी कांही काळ हॅंस सचलेयर यांच्या सोबत काम केले, व त्यानंतर १९६० मध्ये त्यांनी स्वित्झर्लंड मध्ये बाझल येथील ' सिबा' या औषध उत्पादनाच्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्यास प्रारंभ केला. तो काळ त्यांच्या कला जीवनाला कलाटणी देणारा होता. तेथील कला विभागाचे उप-व्यवस्थापक म्हणून ते काम पहात होते. या दरम्यान चौधरींना पॅकेजींग हा प्रकार अगदी जवळून अनुभवायला मिळाला. या पॅकेजींग मध्ये दोन प्रकार असतात. एक पॅकेजींग म्हणजे एखाद्या उत्पादनासाठी कऱण्यात आलेले वेगवेगळ्या माध्यमातील प्याकिंग. हे उत्पादनाच्या गरजेप्रमाणे कांच, पुठ्ठा, धातू अश्या विविध साहीत्यामधून केले जाते. त्यातही त्यांतील सौंदर्यपूर्वक भाव सांभाळून. त्यामध्ये आतील मालाचे वजन, त्याला सहजरीत्या हाताळता येईल अशी रचना, वाहतुकीला अडचण होऊ नयें अथवा त्याने जास्त जागा व्यापली जाऊ नये अश्या पद्धतीचे बाॅक्सीस आदी गोष्टी पहाव्या लागतात. व हे इंडस्ट्रीयल डिझाईन मध्ये शिकावे लागते. त्यासाठी इंजिनीअरिंगचे शिक्षण हवे. व त्या पॅकींगला सुशोभीत करून ते आकर्षक करणे, ग्राहकाला पाहील्याबरोबर विकत घेण्याचा मोह होणे, विषयाशी संलग्न अशी रंगसंगती ठेवणे हे ग्राफीक डिझाइनरचे काम असते. पण चौधरींनी त्या दोन्ही गोष्टी आत्मसात केल्या. आणि त्यांनी पॅकेजींग या विषयांत नैपुण्य मिळवले. विशेषतः सिबा ही औषधाची कंपनी असली तरी त्यांची इतरही सौंदर्यवर्धक उत्पादने होती. त्यामुळे पॅकेजींग मधील दोन्हीचा समतोल त्यांना सांभाळावा लागत असे. त्यानंतर यशवंत चौधरींनी सिबाच्या भारतातील शाखेत कला दिग्दर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली.
भारतात तेव्हां बिनाका या ब्रॅंडखाली सिबाची उत्पादने खूपच लोकप्रिय होती. त्यांची बिनाका टूथपेस्ट, बिनाका टाल्कम पॉवडर ही तर खूपच गाजली होती. दर बुधवारी रात्री आठ वाजता रेडीओ सिलोनवरून होणाऱ्या 'बिनाका गीतमाला' मूळे तर त्यांना अधिकच प्रसीद्धी मिळत असे. जोडीला असे ते अमीन सयानींचे गोड आणि मधाळ अश्या आवाजातील निवेदन. यामुळे 'बिनाका ' हे नांव सर्वत्रच गाजत होते. आणि जोडीला बिनाकाच्या जाहीरात संकल्पनांमध्ये तसेच त्यांच्या उत्पादनांच्या वेष्टनांमध्ये चौधरींची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता अंतर्भूत होती. आणि याच दरम्यान यशवंत चौधरी सर जे.जे.उपयोजीत कला महाविद्यालयात आम्हांला अभ्यागत व्याख्याते म्हणून शिकवायला येऊ लागले. सदैव सुटात असणारे चौधरी संस्थेत आल्याबरोबर जाणवत असे ते त्यांचे बुद्धिमान प्रसन्न असे व्यक्तिमत्व. त्यांचा हसतमुख असा शांत स्वभाव, तरीही वाटणारा एक प्रकारचा दबदबा. हनुवटीवर असलेली छोटीशी बुल्गानीन दाढी. हातात ब्याग, असे चौधरी आले की प्रथम दादा आडारकर व नंतर इतर वरीष्ठ प्राध्यापकांशी बोलून झाले की वर्गात शिरत. वर्गात आल्याबरोबर स्वतःची ब्याग उघडून ते नवीन संकल्पने केलेली आपली उत्पादने काढत व त्यावर शास्त्रशुद्ध असे विवेचन करीत. चौधरीचा स्वभाव इतका मोकळा होता की कोणीही त्यांना दबकत नसे. ग्राफीक डिझाईन सोबत त्यांनी पॅकेजींग या आपल्या आवडत्या विषयाला एक विशीष्ट्य दर्जा या देशांत चौधरीने प्राप्त करून दिला. पुढे कांही वर्षे सिबा मध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःची 'कम्युनिका कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ ही डिझाईन संस्था सुरु केली व अखेरपर्यंत त्यातच ते कार्यरत होते.
डिझाइनसोबत त्या वस्तूचा होणारा वापर या बाबतीत ते कमालीचे जागृत असत. वापरतांना अडचण भासू नये म्हणून जाड क्रीम असलेल्या मोठ्या तोंडाच्या बाटल्या अथवा ट्यूब्स यांचा वरील भागच त्यांनी तळ म्हणून वापरला. त्यामुळे बाटली अथवा ट्यूब उलट करून ठेवली असता हळूहळू जाडसर द्रव तोंडाशी जमा होतो, व त्यामुळे संपूर्ण बोटे आत न घालता ती वरच्यावर अलगद बोटावर घेता येते. एखाद्या पारदर्शक तेलाच्या वा अन्य उत्पादनाच्या काचेच्या बाटलीवर त्यांनी केलेले सुंदर डिझाईनचे लेबल असले की त्यावर सरकारी नियमानूसार कांही माहीती देणे बंधनकारक असते. पण त्याचबरोबर ती लेबलचे सौंदर्य बिघडवू शकते. या हेतूने चौधरींनी ती लेबलच्या मागील बाजूस टाकली. आतील द्रव पारदर्शक असल्यामुळे तो मजकूर मागील बाजूनेही सहजगत्या वाचला जात असे. अश्या प्रकारची कल्पकता चौधरींच्या कैक संकल्पनातून दिसून येत असे. याच प्रकारे त्यांनी जेव्हां बिनाकाच्या 'टाल्क फॉर मेन ' या जेन्टस पॉवडरसाठी पॅकेजींग केले तेव्हां त्यांनी त्या डब्याचा एक कोपरा तिरका ठेवला. एक्झउक्युटीव्ह वा तत्सम प्रकारच्या लोकांसाठी, ज्यांना सतत मीटिंग्सना जावे लागते, अश्यासाठी ही पावडर होती. जी कोटाच्या खिशात सहजरीत्या ठेवता येत असे. व त्याच्या तिरक्या कटमुळे खिशातून ती सहजगत्या बाहेर काढता येत असे. त्यावर त्यांनी सुलभ असा पत्त्याच्या डावातील राजा दाखविला. शिवाय बाटल्यामधील द्रव असते तेव्हां त्या बाटल्या वाहतूकीला सुलभ व्हाव्यात, जास्ती जागा त्यांनी व्यापू नये यासाठी बाटलीचा तळ त्यांनी दुसऱ्या बाटलीचे तोंड विचारात घेऊन तसाच ठेवला व त्या दोन्ही एकमेकात जुळल्या गेल्या की अवास्तव जागा वाचेल, शिवाय त्या पॅकींगनंतर हालणारही नाहीत अश्या दृष्टीने त्यांनी 'मेल फिमेल' तत्वावर त्यांचे डिझाईन केले. अश्या अनेक गोष्टींचा ते चहुबाजूनी विचार करून संकल्पन करीत असत. अश्याच प्रकारे त्यांनी हायलाईफ ब्लेड्स, अमूल मिल्कचे सपाट जागेवर बसणारे त्रिकोणी पॅकींग अश्या अनेक उत्पादनावर आपला ठसा उमटवीला आहे.
'बोधचिन्ह' हा संकल्पन प्रकार तर यशवंत चौधरीचा आत्माच समजावा लागेल. पूर्वी एखादे बोधचिन्ह केल्यावर त्याचा वापर हा कसाही केला जात असे. मात्र चौधरींनी त्याला शिस्त लावली. बोधचिन्हाचा आकार, त्याची आखणी, त्याची विशिस्ट पद्धतीची ठेवण, एका ठरावीक जागी इतर घटकांना पूरक अशी ठेवून बोधचिन्हाला विशिष्ठ अशी जागा त्यांनी मिळवून दिली. बोधचिन्ह हे केवळ पत्रव्यवहारापुरते, स्टेशनरीशी मर्यादीत न ठेवता त्याला व्यापक असे रूप दिले.संपूर्ण व्यवहारात त्याचा वापर होऊ लागला. यामध्ये अंतर्गत सजावटीपासून कर्मचाऱ्यांचे गणवेष, वाहतुकीची वाहने, ऑफिस स्टेशनरी, मार्गदर्शक चिन्हे, लहानसहान भेटवस्तू अश्या गोष्टींचाही समावेश यात झाला. आणि विचार प्रसारण क्षेत्रात 'कॉर्पोरेट आयडेंटीटी' म्हणून बोधचिन्हाचा नवा आविष्कार अस्तीत्वात आला. एच.डी.एफ.सी. या गृह प्रकल्पासाठी आर्थीक सहाय्य देणाऱ्या स्वायत्त संस्थेसाठी चौधरींनी हे माध्यम प्रथम हाताळले. त्यामध्ये त्यांनी घर बांधणीसाठी विटांचा वापर दाखवला असून त्याच आधारावर कंपनीचा लोगो बनविला. यात त्यांनी विश्वास, संरक्षण आणि सुरक्षा दाखवली. तेच रंग त्यांच्या कार्यालयात मार्गदर्शिकेसाठी फिरवीले. त्यांचे फॉर्म्स देखील त्याच शिस्तीत संकल्पीत केले. या त्यांच्या संकल्पनेला त्यावर्षीचा पुरस्कारही त्यांना मिळाला. स्वतःच्या 'कम्युनिका कॉर्पोरेट कम्युनिकेशन' या संस्थेसाठीही त्यांनी दृक श्राव्य यांचे प्रतीक म्हणून डोळा व कान या आधारावर ग्राफीक चिन्ह तयार केले. ग्राफीक डिझाईनमधील एक अधीकारी व्यक्ती म्हणून चौधरी ओळखले जाऊ लागले. बोधचिन्हांच्या कलात्मक आकारगुणांचे रचनात्मक संकल्पन यात यशवंत चौधरी हे नांव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. कुवायामा या चित्रकार संपादकाने प्रकाशीत केलेल्या जागतीक चित्रकारांच्या चित्रकृतीत यशवंत चौधरींची ५४ चित्रे निवडून त्यांना चवथे स्थान देण्यांत आले होते. बोधचिन्हांच्या वापरात चौधरींनी भारतीय संस्कृतीची जडणघडण प्रामुख्याने साधली., ज्ञानेश्वर विद्यापीठ, इंडस्ट्रियल बॅंक, आय.डी.सी.च्या शैक्षणीक चर्चासत्राचे बोधचिन्ह करतांना त्यांनी शंकराचा तृतीय नेत्र वापरला, तर लोकनेते चंद्रशेखर यांच्या पदयात्रेच्या बोधचिन्हासाठी त्यांनी वामनाच्या पावलाचा वापर केला. यातून त्यांची भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीच्या मागोव्याची पुरेपूर कल्पना आपणास येते. त्याच प्रमाणे 'अमूल दूध', साठी केलेले बोधचिन्हही अर्थमय झाले आहे. गोहाटीच्या आय.आय.टी. चे बोधचिन्ह त्यांनी यौगिक तत्वावर केले.
विचार प्रसारण कला ही केवळ जाहिरातीपुरती मर्यादीत नसून तिचा उपयोग हा समाज शिक्षण, सामाजीक बांधीलकी, कुटुंब कल्याण अश्या जनहीत कार्यासाठी देखील समर्थपणे होतो हे ते मुद्दाम अधोरेखीत करीत असत. भारतासारख्या महाकाय देशात खेडोपाडी असलेल्या अशिक्षीत जनतेला या कलाप्रसारामुळे ज्ञान प्राप्त करून देण्यात यावे यासाठी त्यांचा प्रयत्न असे. आपल्या देशात विचार प्रसारण कला ही केवळ जाहीरातीपुर्ती मर्यादीत राहू नये, दूरदर्शन या माध्यमाचा वापर केवळ शाम्पू, तेल व साबण विकण्यापुरता होऊ नये, तर त्याचा वापर कॉर्पोरेट इंडस्ट्री, समाज शिक्षण, व बालशिक्षण यासाठी प्रामुख्याने व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते. पूज्य साने गुरुजींच्या विचाराने भारलेले चौधरी कांही काळ गुरुजींच्या 'साधना' साप्ताहीकाचेही काम पहात असत. साधनाचे शीर्षकही त्यांनी आपल्या खास टायपोग्राफीमध्ये केले होते. चौधरींच्या रचनात्मक मांडणीतील सृजनात्मक वैशीष्ट्य असे की, त्यामध्ये ते सामाजीक संदर्भ तर आणतच, शिवाय त्यात तत्वावर भर घालून स्वतःची अशी तालबद्धता आणि अर्थ सूचकता गुंफून एक आगळावेगळा पोत निर्माण करीत. एखाद्या विषयावर चौधरींचे काम सुरु झाले की त्यात ते संपूर्णपणे गुरफटून जात. मग ते त्यांचे पैशाचे व्यावसायीक काम असो, वा जनकल्याणासाठी एखाद्या सेवाभावी संस्थेसाठी केलेले विना मोबदला असो, कामात कधी हलगर्जीपणा त्यांनी केला नाही. सर्वच कामे तितक्याच आत्मीयतेने त्यांनी केली.
ना. मधुकरराव चौधरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोभस आणि अभ्यासू व्यक्तीमत्व होते. जे.जे. स्कुलच्या बाबतीत आरंभापासूनच त्यांना विशेष रस होता. त्यामुळे विशेष काम असले की त्यांचे आम्हांला बोलावणे येत असे. असेच एकदा त्यांनी मला बोलावले. त्याकाळात ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या बैठकीला मी चौधरीनाही बरोबर घेऊन गेलो. मधुकररावांनी सांगीतले की या मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावरून महात्मा गांधींनी ब्रिटिशाना सर्वप्रथम 'चले जाव' ची आरोळी दिली. आणि आज तेथे केवळ एक स्तंभ उभा आहे. पुढच्या पिढीला हा इतीहास कधीच कळणार नाही. त्यासाठी त्या मैदानावर एक कायमस्वरूपी तो देदीपयमान इतीहास सांगणारे क्रांति स्मारक हवे. श्याम बेनेगल, सदाशिवराव गोरक्षकर, कमलाकर सोनटक्के सहीत अनेक मान्यवर त्या बैठकीला हजर होते. त्या ऐतिहासीक मैदानावर तितकेच प्रभावी स्मारक हवे यासाठी यशवंत चौधरींनी रात्रंदिवस खपून त्याचा एक प्रकल्प तयार केला. त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची माहीती देणारे प्रदर्शन, संग्रहालय, ग्रंथालय, फिल्म प्रोजेक्शन, थिएटर, रेस्टारंट आदी गोष्टींचा समावेष होता. हे सर्व अंडर ग्राउंड असून ते सर्व पहात पहात जेव्हां लोक बाहेर येतील तेव्हां त्यांच्यावर प्रकाशाचा झोत पडून स्वतंत्र भारतात आपण परतल्याची जाणीव होणार होती. मा. मधुकररावांनी त्यामध्ये खूप रस घेतला होता. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे लगेच एक विरोधकांची फळी तयार झाली व 'मैदान बचाव'ची हाक देण्यात आली. मधुकरराव त्यांनाही पुरून उरले. पण पुढे सरकार बदलले. व सर्व प्रोजेक्टच ठप्प झाले. यशवंत चौधरींचा होऊ घातलेला एक अभ्यासू प्रकल्प मधेच थांबला.
यशवंत चौधरींनी जाहीरात क्षेत्रासोबतच कला शिक्षणाचीही तितकीच काळजी घेतली. विचार प्रसारण कला ही काळासोबत तंत्रज्ञानानेही व्यापली जाणार आहे हे ते जाणून होते. त्यासाठी संगणक ही आजची काळाची गरज आहे हे ते शिक्षण खात्याला बजावून सांगत होते. विद्यार्थ्यांच्या भावी पिढयांना याचा लाभ व्हावा यासाठी प्रथम शिक्षकांना त्यात प्रशीक्षित करण्याची गरज भासल्याने आय.आय.टी. च्या सहकार्याने चौधरींनी जे.जे.मध्ये शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी संगणकाची कार्यशाळा घेतली. आम्ही जेंव्हा अखील भारतीय तंत्र शिक्षण परीषदेकडे संस्थेचे संगणकीकरण करण्यासाठी अनुदानाची मागणी केली, त्यावेळी चौधरीनीच त्यासाठी शास्त्रशुद्ध असा प्रकल्प तयार केला. पुढे येणाऱ्या विचार प्रसारणेतील संगणकी महत्वाला ध्यानांत घेऊन फिल्म, फोटोग्राफी, ॲाडीओ व्हीज्यूअल आणि नवीन येऊ घातलेली प्रसार माध्यमं यासाठी पुढच्या विद्यार्थ्यांना संगणकाची कशी गरज आहे ते त्यांनी उदाहरणासहीत सादर केले, त्याचाच परीपाक म्हणजे संस्थेला अखील भारतीय तंत्र शिक्षण परीषदेनें अनूदान मंजूर केले. व संस्थेमध्ये प्रथमच संगणक आले. याशिवाय जे.जे.तर्फे देशांतील सर्व उपयोजीत कला महाविद्यालयासाठी कॉम्प्युटर ग्राफिक्सचे वर्कशॉप घेण्याची जबाबदारीही आम्हांवर सोपवीली. यासाठी देखील यशवंत चौधरींचे महत्वाचे योगदान आम्हांला मिळाले. विषय निवडून त्यासाठी त्यातील निष्णात असे वक्ते त्यांनी आम्हांला सांगीतले. व या आधारे आमच्याकडील प्रा. अरविंद नागवेकर व प्रा. विनय सायनेकर यांनी तीन विषयावर या कार्यशाळा सादर केल्या. ते विषय होते 'व्हिज्युअल ओरीएंटेड टेक्नाॅलाॅजी, 'कॉन्सेप्ट ओरीएंटेड टेक्नाॅलाॅजी' आणि 'काॅम्प्यूटर ओरिएंटेड टेक्नाॅलाॅजी'! देशातून सर्व उपयोजीत कलेचे शिक्षक यासाठी जे.जे.मध्ये आले आणि त्या सर्वानी या नवीन तंत्रज्ञानाचा, नवीन विचारांचा आणि नवीन माध्यमांचा लाभ घेतला.यातही चौधरी आघाडीवर होते.
शैक्षणीक कार्य करतांना त्यांनी अहमदाबादच्या राष्ट्रीय औद्योगिक संस्थेपासुन ते आय.आय.टी., आय.डी.सी., भारतीय पॅकेजींग संस्था, जे.जे.उपयोजीत कला महाविद्यालय या सर्वच संस्थांशी त्यांची बांधीलकी होती. ते जेव्हां वर्गात व्याख्यानाला येत तेव्हां कधीही ते रिकाम्या हाताने येऊन तोंडी बोलले नाहीत. विषयाचा सखोल अभ्यास करून, त्यासाठी स्लाईडस बनवून घेऊन, त्या प्रोजेक्ट करूनच ते आपला एकेक मुद्दा समजावून देत.पैसा हे त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच ध्येय मानले नाही. आमच्याकडे एखाद्या बैठकीला आले की ते आपली टॅक्सी खाली थांववून ठेवीत व बैठक संपल्यावरच ते निघून जात. आम्ही यासाठी त्यांना काहीही मेहनताना देऊ शकत नव्हतो. पण त्यांच्या टॅक्सीचे बील नक्कीच त्यापेक्षा जास्त होत असे. त्यांनी जशी आपल्या जीवनात शिस्त पाळली तशीच ती आपल्या कामातही पाळली. आणि ती त्यांच्या कामातून जाणवत असे. त्यांचे कामच मुळी आखीव रेखीव असे. त्यातून जाणवत असे ते त्यांचे संशोधन. मग त्याचे संकल्पन. त्यातील नीटनेटकेपणा. आणि त्याच्याशी जुडलेली सौंदर्य रचना. यामुळे त्यांची बोधचिन्हे देखील बोलकी होवून एखाद्याला पाहण्यास प्रेरीत करीत असत. त्यातील अर्थ जाणून घेण्याचा, विचार करण्यास लावण्याचा आणि तो विचार त्याचा चित्रासह कायमचा मनांत ठसवून ठेवण्याचा. आणि जोडीला असे ते त्या विचारातील सौंदर्यशास्त्र. ज्याला आपण सहजरीत्या दाद देऊन जात असू. हे केवळ त्यांच्या बाबतीतच नव्हे तर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अनेक कलाकारांवरही त्यांच्या कलेचा, त्यातील शिस्तीचा आणि विचारांचा पगडा पडलेला दिसतो. त्यांच्या कामातूनही चौधरी सतत डोकावत असत.
यशवंत चौधरींना दृककलेसोबतच काव्याचीही विलक्षण ओढ होती. अनेक साहीत्य - कवी संमेलनांना ते हजेरी लावीत. काव्यवाचन होत असे. कित्येकदा त्यांच्या पेडर रोडवर घरी अनेकजण जमत. यामध्ये षांताराम पवार, प्रभाकर कोलते, संभाजी कदमांसारखे चित्रकार- कवी असत, तर वसंत परब, शंकर पळशीकर, नारायण सोनवडेकर, गजानन भागवत यासारखे व्यावसायीक व सर्वमान्य असे कलाकार असत. चौधरींचे मराठी आणि इंग्रजी लिखाण मनाला मोह पाडणारे असे. त्यात एखादा संशोधनात्मक लेख असल्यास पाहायला नको. या संशोधनाचा वापर त्यांनी ग्राफीक डिझाईन व त्याचे संकल्पन यात पुरेपूर करून घेतला. 'एशिया ७२' या दिल्लीतील भव्य प्रदर्शनाच्या पोस्टरसाठी त्यांनी 'उद्याचा भारत' यासाठी अनेक प्रांतातील बालकांची छायाचित्रे वापरून त्याचे कोलाज केले व त्यातून त्यांनी साकारली पंडीत जवाहरलाल नेहरूंची एक विचारी अशी प्रतीमा. एक बोलके चित्र होते ते!
असा हा उमदा अन मनमिळावू माणूस अखेरच्या काळात मात्र थोडा खचलेला वाटत होता. पेडर रोडवरील राहती जागा खाली करण्याविषयी त्यांच्यावर सतत दडपण येत होते. शासनाच्या १० टक्के कोट्यातून जागा मिळेल या आशेवर त्यांनी युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे प्रयत्न करून पाहीले पण उपयोग झाला नाही. अनेक एजन्सीनी त्यांचे केलेल्या कामाचे पैसेही मिळत नसल्याचे त्यांच्या बोलण्यात येत असे. पुढे कानाच्या आजाराने ते त्रस्त झाले होते. जसलोक इस्पीतळात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मला हे कळताच कांही सहकाऱ्यांसोबत मी जसलोकमध्ये पोचलो. त्यांचे व्याही त्यांची तेथे देखभाल करीत होते. जसलोक समोरच फिल्म डिव्हिजन शेजारी त्यांचे निवासस्थान असल्याने कित्येकदा जसलोकमधून उतरून ते घरी जात व किरकोळ कामे करून परत आपल्या बेडवर हजर होत.पुढे त्यांना डिस्चार्ज मिळाला तरी त्यांचे दुखणे वाढतच गेले. ओळखीच्या लोकांकडून माहीती घेऊन बऱ्याच डॉक्टरांकडून त्यांनी उपचार करवून घेतले. पण गुण कांही आला नाही. मध्ये एकदा मी त्यांच्या घरी गेलो तेंव्हा घराला कुलूप होते. पुढे पुण्यात त्यांच्यावर शस्त्रक्रीया झाल्याचे ऐकीवात आले. मात्र त्यानंतर ते मुंबईत कधी आले ते आम्हांला कळलेच नाही. कळले ते एकदम १९ सप्टेंबर २००१ रोजी दुपारी माझ्या कार्यालयात कोणीतरी फोन करून निरोप ठेवला होता चौधरी गेल्याचा! मी, नरेंद्र विचारे व फिल्म डिव्हीजन मध्ये काम करणारे माझे वर्गमित्र जगदीश पुळेकर असे आम्ही त्यांच्या निवासस्थानी पोचलो. तेथेही कुलूपच दिसले. वाचमनला विचारताच तो म्हणाला, आजच ते निधन पावल्याची बातमी आम्हांला समजली. पण गेले चार महीने ते येथे रहातच नव्हते. बरीच चौकशी केल्यावर अंधेरीतील एका इस्पीतळात ते गेल्याचे कळले.
ज्या व्यक्तीने भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आपले चाहते जोडले, समाजसेवा करत असतांना असंख्य मित्रपरीवार मिळवीला. मोठा शिष्यगण तयार केला.पण केवळ त्यांच्या निधनाचे वृत्त न कळल्याने त्यांना अंतीम निरोप देण्यासाठी केवळ आठ दहा माणसेच त्या दिवशी उपस्थीत होती.
- प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
( आजवर मी अनेक व्यक्तींवर लिहीले. अश्या व्यक्ती, की त्या कर्तबगारीने खूप मोठ्या होत्या. पण आपण त्यांच्या आसपास वावरत असल्याने त्यांच्या कर्तबगारीची शिखरं कमी दिसली. त्यांच्या पायापाशीच आपण घुटमळत राहीलो. त्यामुळे त्यांची वैचारीक व कलात्मक ऊंची कित्येकजण मापू शकले नाहीत. पण आज या महान व्यक्तींच्या, या कलाकाराच्या तपश्र्चर्येचा पाया मी पाहीला तसेच त्यांची वैभवशाली कीर्तीची शिखरं देखील मी आजमावली. यातील बहुतेकांचा सहवास मला लाभला. प्रत्येकाकडून कांही गोष्टी मी शिकलो. आचरणात आणल्या. पण विचार करतांना जाणवते की अशी अनेक माणसं माझ्या आठवणींच्या कप्प्यात साठलेली आहेत. त्यापैकी कांहीजणच मी शब्दबद्ध केली. ही सर्व माणसे म्हणजे माझ्या जे.जे.ने माझ्या ओंजळीत टाकलेले एक दानच आहे. कारण त्यामुळेच अशा सोन्यासारख्या माणसांच्या सहवासांत मी आलो. त्यांनी मला जवळ केले. आपले मानले. आणि त्या बाबतीत मी भाग्यवानच ठरलो. आज आठवण येते ती या सर्व लोकांची. त्यांच्या सहवासात घालविलेल्या कांही क्षणांची. आणि त्यांच्या विचारधनातून घेतलेल्या कांही सुवर्णकणांची. आज माझी ही लेखमाला मी इथेच संपवतो. माझ्या फेसबुकवर /ब्लाॅगवर असलेल्या असंख्य मित्रांपैकी निदान कांही बोटावर मोजता येणाऱ्या मित्रांनी जरी ही मालीका वाचली असल्यास माझ्या परिश्रमाचे चीज झाले असे मी समजेन. भेटू पुन्हां कधीतरी ! )
.










Comments
Post a Comment