पंचाहत्तरी पूर्ण


या मुंबई शहरात कोणीही येतांना त्याला समोर दोन रस्ते दिसतात. एक क्षणीक सुख दाखवणारा मोहाचा आणि दुसरा कठोर परीश्रम करायला लावून आपली परीक्षा घेणारा, तसेच त्याचे फळ भरभरून आपल्या पदरात टाकणारा कर्तव्याचा! प्रत्येकाने आपले ध्येय ठरवावे, आपणास भविष्यात काय हवे त्याचा. बरेच जण स्वीकारतात मोहाचा रस्ता जो पुढे त्यांना आपल्या आयुष्याची तुटकी फाटकी लक्तरं घेऊन हरलेल्या स्थितीत जगापुढं मान तुकवायला लावत असतो. आणि 'कठोर' परिश्रमाला पर्याय नाही' या उक्तीला  धरून चालणारा मात्र यशोदेवीची वरमाला गळ्यात घालून मिरवतो. सुदैवाने मला दुसरा मार्ग चोखाळायला मिळाला हे मला माझ्या मुंबईने दिलेले एक सुवर्ण लेणं आहे.

गेल्या वर्षी मी माझ्या २९ ऑगस्टला होणाऱ्या आणि ७५ वे वर्ष लागलेल्या जन्म दिवसाला उद्देशून 'अवघे पाऊणशे वयमान'   नांवाचा लेख लिहून माझ्या गत आयुष्याचा एक धावता आढावा घेतला होता. माझे गुरुवर्य, सोबती, हितचिंतक या सर्वांच्या आठवणींना उजाळा दिला होता. आणि पहाता पहाता ते संपूर्ण वर्षच असे कांही डोळ्यापुढून सरून गेले कीं ते आले कधी आणि गेले कधी हे देखील समजले नाहीं आणि पाहतो तो काय? पंच्याहत्तरी संपली देखील! या वर्षात काय घडले, काय मिळवले आणि काय हरवले याचा लेखाजोखाही ठेवता आला नाही. अर्थात आता या वयात काय मिळवायचे अन काय गमवायचे ? आला दिवस तो आपला. उद्याचे माहीत नाही काय ते. आणि आचार्य अत्रे म्हणत, ' आता कसले या वयात वाढदिवस, आता फक्त काढदिवस!'  आणि वाढदिवसाचे कर्तृत्व तरी काय? निसर्ग नियमानुसार वय वाढत असते, जे सर्व पशु पक्षी वनस्पती यांच्याही बाबतीत घडत असते. केवळ आपणा मानव जातीला, आपल्याला विचार करण्याची ताकद निसर्गाने बहाल केली असल्याने आपण हे स्वतःचेच कोडकौतूक करीत असतो. पण जन्माला आल्यानंतर आपल्या वाढत्या वयानुसार आपण या समाजासाठी, या देशासाठी काय केले आहे, हेच तुमचे जीवन सार्थकी लावू शकते. आणि त्यासाठी तुम्हांला सीमेवर जाऊन शत्रूशी लढायला नको. मागे एका समारंभात सैन्याचे मुख्याधिकारी बोलत होते. ते म्हणाले, आज सर्वत्र असे समजले जाते की कोणी सैन्यात गेले की तो देशाची सेवा करायला गेला आहे. पण हे खरे नाही. ते एक तुमचे व्यक्तिमत्व असते. साहसाची आवड असते. आणि कोणी कुठेतरी नोकरी करायची म्हणून सैन्यात जाणारेही असतात.. पण त्यामुळे बाकीचे लोक देशभक्त नाहीत अथवा त्यांना देशाप्रती आदर नाही असे होत नाही. या देशातील प्रत्येक माणूस देशभक्त असतो. देशासाठी काहींना कांही करत असतो. ज्या क्षेत्रांत तुम्ही काम करीत आहात तेथे प्रामाणीक पणे काम करा, उत्पादन वाढवा, ही प्रत्येक गोष्ट तुमच्या देशाला प्रगतीवर नेत असते. तीच तुमची देशभक्ती असते. त्यासाठी उठून प्रत्येकाने सैन्यातच जायला हवे असे नाही. आणि हे खरेच आहे. प्रत्येकाने आपण करत असलेले काम जर कां चोख केले, तर देशाला दुसऱ्यावर अवलंबून रहायलाच नको

मी मुंबईत आलो तो काळच वेगळा होता. ट्रेन, बस मध्ये प्रत्येकाच्या हातात वृत्तपत्र दिसत असे. काहीजण प्रवासात पुस्तक वाचण्यात गुंग असत. जागोजागी वाचनालये दिसत. तीही वाचकांनी भरलेली असत.  आता ते जग हरपले आहे. ज्ञान मिळवण्यासाठी लोक आज अभ्यास न करता ‘गुगल’वर अवलंबून रहात आहेत.  ट्रेन-बस मधेच नव्हे, तर रस्त्यात चालत असतानाही कानाला फोन लावून वेड्यासारखे बडबडत जाणारे लोक आता आम्ही पहातो. डोकं आणि खांदा याच्या पकडीत वाकडी मान करून फोन पकडून जाणारे दुचाकीस्वार तर सतत दिसताहेत. पूर्वीच्या काळातील शिस्त आता दुर्मीळ झाली आहे. पूर्वी चालत्या लोकल ट्रेन मधून कोणी जर का पडला, की त्याच्या कुटुंबीयांना दंड भरल्याशिवाय  त्याचा मृत देह दिला जात नसे. कारण  चालत्या गाडीच्या दरवाजात उभे राहणे हा देखील गुन्हा आहे. आता त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. कोठेही सरकारी, रेल्वेच्या जागेवर बिनधास्त झोपड्या उभारून हक्क दाखवणाऱ्याना लोकांनाही अपघाताने इजा झाल्या, किंवा कोणी मृत झाले तर तेही नुकसानभरपाईसाठी सरकारच्या मागे असतात. आणि सरकार तरी काय? जी जमात संख्येने जास्त, तेवढीच सरकारला त्यांची भीती. कायदा किंवा कायद्यापुढे सर्व समान हा प्रकार दिसत नाही आता. झुंडशाही करून सार्वजनीक मालमत्तेची जरी कोणी राखरांगोळी केली तरी ते माफीचे हकदार होतात. जेव्हां शेतकऱ्यांचे प्रश्न येतात तेव्हां त्यांचे नेते रस्त्यावर दुधाचे ट्यान्कर, भाजीपाला फेकून स्वतः उतल्या मातल्याचा दाखला देतात, तेव्हां त्याच शेतकऱ्यांच्या व पर्यायाने अनेक ग्राहकांच्या हक्कावर आणि पोटावर गदा आणतात हे सरकार डोळ्यावर कातडी ओढून पहात असते. आणि तेच शेतकरी त्यांचा जयजयकार करताना आपणांला दिसतात.  निवडणुकीत ज्या उमेदवाराला आपण आपल्या आवडत्या  पक्षाची धोरणे, त्याविषयीचा आदर म्हणून मत टाकून निवडून देतो, तोच आपला उमेदवार स्वार्थासाठी आपल्याच पक्षावर, निवडून दिलेल्या मतदारावर टांग वर करून दुसऱ्या पक्षाचा मलीदा खायला जातो तेव्हां आपल्याच लोकांशी आपण विश्वासघात करत आहे हेही विसरून जातो. आणि आपणही एकदा मत टाकून मोकळे झालो की ते विसरून जातो

शिक्षण खाते तर विद्यार्थी जास्तीत जास्त पास कसे होतील यासाठीच झटत असते.एकदा विद्यार्थ्यांचा शैक्षणीक दर्जा सुधारावा म्हणून त्यांचे शाळेने दिलेले मार्क बंद करते, तर दुसऱ्या वेळी निकाल अत्यंत कठीण लागला म्हणून तेच मार्क देण्यासाठी शाळांच्या हातात निकालाचे भवीष्य सोपवीते. एकदा त्यांना आठवीपर्यंत मुले नापास होऊ नयेत म्हणून परीक्षाच बंद कराव्या लागतात, तर त्यांना जेव्हां ध्यानांत येते की सहावीच्या मुलांना तिसरीतलीही गणीते येत नाहीत, तेव्हां त्यावर इलाज करावासा वाटतो. कधी बालभारतीच्या संचालीकेच्या मनात येते की आतापर्यंत गणितात शिकविण्यात येणारी पूर्वीची पाढ्याची पद्धत चुकीची असून त्यासाठी १०  ७ x ३ = ५१ हे पाढे शिकविण्यास त्यांनी सुरुवात केली. मग जनक्षोभ झाला. विधानसभेपर्यंत ही गोष्ट पोचली. असे एकापेक्षा एक प्रयोग मुलांवर सुरु झाले. येथे ना विद्यार्थ्याच्या बुद्धीमत्तेचा विचार होतो ना त्यांचा शैक्षणीक दर्जा वाढण्याचा! हे सर्व पहाता आपण कोठे चाललो आहे हेच समजणे कठीण आहे. आणि शिक्षणाचा दर्जा पहावा तर आता पी.एच.डी. करून डॉक्टरेट मिळवणे काही विद्यापीठाकडून अतीशय सोपे झाले आहे. विशेष करून आपल्या फाईन आर्ट सारख्या इतरांना अनाकलनीय असलेल्या विषयात तर पहायलाच नको

आज तंत्रज्ञानाने मोठी झेप घेऊन सर्वांचे जीवन सुखकर केले आहे. पण त्याचसोबत त्याचे दुष्परीणाम देखील जाणवत आहेत. यंत्र मानवाने माणसाची कामे हलकी केली. अनेक माणसांची कामे केवळ एक संगणक करू लागला, अन अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. माणसाचा गुलाम भासणाऱ्या या यंत्रमानवाने पुढे माणसालाच आपला गुलाम करून सोडले. हस्तकलेला जिथं वाव होता, त्यांना संगणकाची जोड मिळाल्यामुळे मानवी कौश्यल्याच्या पुढे जाऊन त्याने अश्या कलाकारांना, छायाचित्रकारांना दृष्टीआड करून टाकले. मोबाईलच्या रूपाने भीषण असा सैतान आपल्या हातात आला, त्याने तर माणसातले माणूसपणच हरवून टाकले. जो तो  आपल्या कानाशी अथवा त्यात डोळे घालून फोनवर तासन तास न थकता वेळ घालवू लागला. एकाच घरातील सर्वजण आपापल्या फोनशी निगडीत राहू लागले. आणि येथेच माणुसकीचा झरा आटला. एकमेकांशी संवाद साधणे, हास्यविनोदात वेळ घालवणे, पत्त्यांचा डाव अथवा गप्पांची मैफल भरवणे अश्या सर्वच गोष्टींना तिलांजली मिळाली. कोणाकडे जाऊन थोडा वेळ काढावा म्हटलं, तर त्यांच्याकडे टी व्ही वरील मालीका पहाण्यात त्यांना आपला व्यत्यय वाटू लागला. पूर्वी एखादा माणूस रस्त्यावरून एकटाच काही बडबड करीत जात असताना दिसला तर लोक त्याला वेड लागले आहे असे म्हणत. आता सर्रास प्रत्येकजण कानाला फोन लावून जोरजोराने एकटाच बडबडत जातांना दिसत असतो. चालतानाही हे लोक कोणाशी इतके महत्वाचे काय बोलत असतील देव जाणे! याना ना आकाशातील रंगभान इंद्रधनुष्याचा सोस, ना कधी झिमझिम पडणाऱ्या पावसाच्या जलधारेत मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्याचे सुख, ना आपल्या आजूबाजूला दिसणारे विहंगम दृष्य. फक्त आयुष्यात एक कोरडेपणा. एवढा या तंत्रज्ञानाने आपल्या मेंदूचा ताबा घेतला आहे. शिवाय आजकाल आपण भलतेच भावनाशील झालो आहोत. पण त्याचबरोबर हाच फोन आज सर्व जगच आमच्या हातात देवून बसला आहे. आज या फोनच्या रूपाने ‘दुनीया मेरी मुठ्ठीमे है’ म्हटल्यास ते खोटे नाही!

या मुंबई शहरांत जेव्हा आपण  रस्त्यावरून चालतो तेव्हा त्यावरील खड्डे, वाहनांची बेसुमार गर्दी, त्यात शिस्त न पाळणारी वाहने, वाहतूक पोलीस फक्त सिग्नल जवळच कायद्याचा बडगा घेऊन उभे असतात. आणि हे प्रशासन ज्यांच्या हातात आहे त्या राजकीय पक्षावर आपण लाखोली वहात असतो. निवडून दिलेल्या लोकांची सेवा न करता स्वतःच्या ऐषारामाकडेच त्यांचे लक्ष असते म्हणून आम्हीच त्यांना दूषणं देत असतो. पण निवडणुका आल्या की आपण आपली सारी दुःखे, साऱ्या गैरसोयी, आपण या शहरात आपण भरत असलेल्या कराच्या बदल्यात आपण काय सुखसोयी भोगतो याचा विसर आपणांस पडतो. आणि आपापल्या पक्षाचे झेंडे खांद्यावर उचलून आपण भावनाशील होत त्यांच्या नांवाच्या घोषणा देत त्यांनाच निवडून देतो. पुन्हा पुढील पाच वर्षे घरात बसून अथवा रस्त्यावरून जाताना खड्ड्यांचे धक्के खात, डोळ्यासमोर कायद्यांचे धिंडवडे काढणाऱ्या समाजद्रोह्यांचे, प्रत्येक आंदोलनात सरकारी मालमत्तेचे, शेतकऱ्यांच्या दूध दुभत्याचा, भाजीपाल्याचा, विध्वंस करणारे आणि परत आपल्या ताकदीच्या जोरावर सर्व गुंडगीरीचे सर्व गुन्हे माफ करा म्हणून सरकारचे नरडे धरणारे नेते पाहून आपणच याना निवडून देतो याची स्वतःशीच निर्भत्सना आपण करत बसतो. आणि तेंव्हा जाणवते या मुंबईने, महाराष्ट्राने आपल्याला काय दिले. आमच्या पिढीला हे बघण्याचे भाग्य दिले. आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे, बॅ. नाथ पै यासारखे आभाळाएवढे नेते आम्ही पाहीले. प्रचंड चिमण्या असलेल्या भोंगे वाजणाऱ्या आणि  या नगरीची शान वाढवणाऱ्या  कापड गिरण्या आणि त्यांचे उत्पादन वाढवणारे मराठी कामगार पाहीले . दुसऱ्यावर अश्लाध्य चिखलफेक न करणारे ह. रा. महाजनी, द्वा. भ.कर्णीक, निळकंठराव खाडीलकर, एसेम जोशी, पां. वा. गाडगीळ, माधव गडकरी  यासारखे खन्दे पत्रकार पाहीले. लेखणीच्या  जोरावर सरकारलाही घाम फोडणारे आचार्य अत्रे पाहीले. ना.सी.फडके,वि.स.खांडेकर, हरी नारायण आपटे, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, द.मा.मिरासदार, शंकर पाटील धों.वी. देशपांडे, अ.वा.वर्टी यांच्यासारखे शैलीदार लेखक आजमावले.  मुळगांवकर, दलाल, एस.एम. पंडीत, रवी परांजपे, तय्यब मेहता, मकबूल हुसेन, बी.प्रभा, प्रफुल्ला डहाणूकर, ना.श्री.बेंद्रे यासारखे देशाचे नांव वाढवणारे सर्जनशील चित्रकार पाहीले. आचार्य अत्रे, मास्टर विनायक, बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके, पु.ल.देशपांडे, राम गबाले, राजा परांजपे, राजा गोसावी, हंसा वाडकर, सुमती गुप्ते-जोगळेकर, वसंत जोगळेकर,सुलोचना, जयश्री गडकर, दादा कोंडके यासारख्या धुरंधरांनी समृद्ध केलेली मराठी चित्रपट सृष्टी पाहीली. दाजी भाटवडेकर. विजया मेहता, दामू केंकरे, चित्तरंजन कोल्हटकर, डाॅ. लागू, डाॅ. काशीनाथ घाणेकर, सुधा  करमरकर, गोपालकृष्ण भोबे, रमेश देव, अशोक सराफ, शरद तळवलकर अश्या लोकांनी रंगदेवतेला साष्टांग नमस्कार घालून संजीवनी दिलेली मराठी नाट्यसृष्टी पाहीली. आणि हे सर्व साहित्यिक-कलाकार, दिग्दर्शक स्वतःशी, जनतेप्रती प्रामाणीक राहीलेले आम्ही पाहीले. केवळ पैशासाठी विकले न गेलेले. पावित्र्य पाळणारे. आमच्या पिढीच्या ललाटावर हे भाग्य कोरलेले होते. आणि त्यांचे संस्कार आम्हांवर घडत होते. आणि अशा कांही लोकोत्तर महापुरूषांचा सहवास लाभण्याचे भाग्यही मला लाभले

आज या तंत्रज्ञानाने मला मात्र भरपूर दिले. घरबसल्या आठवणींच्या चित्रांमधून पुसट झालेले अनेक मित्र, माझे माजी विद्यार्थी मला फेसबुकवर भेटले. जुनी नाती पुन्हां विणली गेली. एकमेकांशी संवाद साधू लागलो. एकमेकांशी विचारांचे आदान प्रदान करू लागलो. आणि या सर्वातून मीही बऱ्याच कांही गोष्टी शिकलो. माझे लिखाण वाढले. आठवणींच्या हिंदोळ्यावर गतदिवसांच्या खुणा झोके घेऊ लागल्या. आणि बघता बघता माझा सर्वच जीवन प्रवास मी माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींसोबत उलगडत गेलो. यातूनच निर्माण झाल्या  माझी 'यादोंकी बारात', 'गाठीभेटीतील हृदयस्थ', निरनिराळ्या जाहीरात संस्थां व त्यातील कलाकारांच्या  जन्मकथा सांगणारी 'आर्ट त्रिविया' ह्या मालीका, ज्या माझ्या वाचकांना खूपच आवडल्या. मात्र मी जे लिहीले ते कला या विषयाला धरूनच! ' यादोंकी बारात' ही माझ्या व  जे.जे.च्या जीवनावरील मालीका तर कित्येकांनी पुस्तक रूपात काढा म्हणून सांगीतली. याची एक गमतीशीर आठवण म्हणजे, ही मालीका खूप छान आहे, म्हणून सांगणारे संजय पेठे या माजी विद्यर्थ्याने मला सांगीतले की याचे पुस्तक मी बनवणार आहे. त्यावर्षी वाढदिवसाला मला संजय पेठेंचा शुभेच्छा देण्यास फोन आला व त्याने सांगीतले की 'सर, पुढच्या तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला भेट म्हणून तुमचे 'यादोंकी बारात' पुस्तक देणार आहे. ते करणे माझी जबाबदारी. मी त्याला धन्यवाद दिले. आणि तीच माझी आणि संजय पेठे यांची फोनवरील पहीली आणि शेवटची भेट. त्यानंतर वर्षाभराने  मी शिल्पकार तालीम यांच्यावर फेसबुकवर लेख लिहीला. व त्यासाठी नेहरू सेंटरमध्ये त्यांच्या शिल्पांचे प्रदर्शन झाले होते त्याच्या कॅटलॉगवरील छायाचित्र मी वापरले होते.  त्यावर संजय यांनी कॉमेंट टाकला की ' या कॅटलॉगवरील साईबाबांचा फोटो मी काढला आहे.' त्यानंतर मी त्याच पोस्टवर पेठे  यांचा उल्लेख करून  त्यांचे आभार मानले होते. यानंतर मी संजय पेठेंना बऱ्याच वर्षांनी  पाहीले ते गेल्या वर्षी विले पार्ले येथे जे.जे.च्या माजी विद्यार्थ्यांनी माझा व विचारे सर यांचा सत्कार केला त्यावेळी त्या हॉल मध्ये. मी माझे ‘भारतीय जाहीरात कला’ या विषयावर माझे प्रेझेंटेशन केले व नंतर अवांतर बोलतांना मी माझ्या कारकिर्दीत जे.जे.उपयोजीत संस्थेमध्ये मी विद्यार्थ्यांच्यासाठी केलेल्या कांही गोष्टींचा उल्लेख केला. माझे बोलणे संपल्यावर संजय पेठे उठून पुढे आले व त्यांनी सांगीतले की ' नुकतेच राजाध्यक्ष सरांनी 'मी हे केले, मी ते केले' असे बरेच कांही सांगीतले. पण मलाही आता कांही सांगायचे आहे. आताचे डीन संतोष क्षिरसागर यांनीही कांही महत्वाची गोष्ट  संस्थेमध्ये केली आहे. ती आहे माजी विद्यार्थ्यांसाठी संस्थेमध्ये एक रूम ठेवली आहे. कोणीही तेथे जाऊन तिचा वापर करू शकतो!'  वास्तवीक माझ्या बोलण्यात इतर कोणाबद्दल मत मी मांडलेच नव्हते. मग मी हे केले, मी ते केले असे म्हणण्याचे त्यांचे प्रयोजन काय मला अजूनपर्यंत तरी कळले नाही. शिवाय मी या माझ्या संस्थेसाठी काय काय केले ते माझे विद्यार्थीच नव्हे तर कला क्षेत्रांतील अनेकजण सांगतील.  आणि याकरताच मी स्वतः होऊन कधीच जास्ती कोणाच्या जवळ जात नाही. कारण अश्यातूनच गैरसमज वाढीला लागतात. मात्र माझ्या या 'यादोंकी बारात'ला माझ्या सर्वच मित्रांनी भरभरून साद दिली. अपवाद फक्त आपल्या संस्थेमधील शिरभावीकर सर. एकदा त्यांनी संतापून मी केवळ माझ्याचबद्दल लिहून बाकीच्या शिक्षकांचा अपमान करतो अश्या अर्थाचे विधान करून 'तुम्ही केले ती सुरुवात होती. आता विध्यार्थी शिकत असताना बाहेरची कामे करतात. थांबवा ते तुमचे लिहीणे ' अश्या अर्थाचे विधान केले होते. त्यांना हेही कळले नाही की मी त्यात माझ्याबद्दलच लिहीत असे. मी शिक्षणात केलेले प्रयोग सांगत असे. तेही त्या काळातील. पण असेही लोक हवेतच!

म्हणून माझी पंचाहत्तरी अश्या सर्व गोष्टीपासून काही दिवस दूर राहून काढायची मी ठरवली आहे. फेस बुक, व्हाट्सअप, ब्लॉग  अश्या मोहमयी दुनीयेपासून कांही काळ दूर राहून पूर्वीचे दिवस जगायचे आहेत.   निसर्गाच्या सहवासात तृप्त पणे डुंबायचे आहे.  राजकारणावर प्रतीक्रिया नाही, उपहासात्मक लिखाण करायचे नाही, सोशल मिडीयावर काही टाकायचे नाही असे ठरवून शांततामय जीवन जगायचे. आणि लिहायचे तरी कशाला? कारण आता लोक वाचत नाहीत तर पहात असतात. मी एखादी पोस्ट टाकली की एका सेकंदात त्यावर लाईक पडतो. जी पोस्ट वाचायला कमीतकमी पंधरा एक मिनीटे लागतील ती एका फटक्यात कशी वाचून होते हेही एक गूढ  आहे. अर्थात वाचणारे पण असतात. पण त्यांचे प्रमाण असते केवळ दोन टक्के!  आणि यापासून दूर राहीले की मग कसे शांत शांत वाटेल त्याची कल्पना करायची. मनाला शांतता देणाऱ्या आकाशातील असंख्य चांदण्या पहात, उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या सूर्याचा तप्त आणि शीतलपणा मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवायचा आहे. आजकाल दुर्मिळ झालेल्या चिमण्यांचा किलबिलाट अनुभवायचा आहे. घरात वाचन वेडापायी साठवून ठेवलेल्या अनेक दुर्मीळ पुस्तकांचे वाचन करायचे आहे. सोबत त्याला मधूर अशा माझ्या आवडत्या संगीताची साथ द्यायची आहे, ज्यात मला स्वत:लाच विसरून जायचे आहे. माझी प्रिय पत्नी भारती, जिने प्रत्येक बाबतीत माझी साथ देऊन मला माझ्या जीवन प्रवासात सदैव मोलाची साथ दिली. माझ्या बऱ्या वाईट दिवसात धीर दिला. माझ्या दोन्ही मुलांना वाढवण्याची जबाबदारी पेलली.  माझी दोन्ही मुले केतन आणि हर्षद यांनी माझी सतत काळजी घेतली. मधेच माझी गोड नात सिमरन कधी घरी आली की वातावरण प्रसन्न करून सोडते आणि जोडीला असते तिची आई पूजा. हर्षद मुळे मला केवळ जाहीरात युगातीलच नव्हे, तर जगातील सर्वच बाबतीत त्याची सतत नजर फिरत असते,  तसेच प्रत्येक विषयातील त्याचे ज्ञान मला रोज आमच्या चर्चेतून नवीन कांही शिकवून जाते. व आजच्या पिढीला देखील काय हवे त्याचे भान मला राहते ! माझी नाविन्यपूर्ण, जुन्या गोष्टी जमविण्याचा नाद पाहून हर्षद  परदेशात अथवा भारतात कोठेही गेला की माझ्यासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण गोष्टी आणतच असतो. अश्या गोष्टी आता माझ्याकडे इतक्या संख्येने जमा झाल्या आहेत, की आता त्या ठेवाव्या कोठे हीच एक समस्या आहे. अर्थात सुखकारक समस्या !  आणखीही एक ऋण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. आणि ते आहे माझे शेजारी तसेच नंतर आमचेच झालेले श्री. रवींद्र व सौ. सुनंदा लोवलेकर दाम्पत्य. आमच्या मुलांच्या लहानपणी त्यांचे आजारपण असो, अथवा आमच्या कठीण प्रसंगात असो, सदैव आमच्या सोबत असत. मुलांचे तर ते हक्काचे घर झाले होते. आणि आम्हीही कधी शेजाऱ्यांपासून घरचेच झालो तेही आम्हांला कळले नाही. मी मधल्या काळात कांही वर्षे नागपूरला होतो, तेव्हां मला या लोवलेकरांमुळे येथील काळजी वाटत नसे. अगदी हक्काची माणसे आहोत आम्ही एकमेकाना. आणि आज जवळजवळ पन्नासवर्षे होत आली, अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबे  तसेच जवळ आहोत. तशीच पूर्वीप्रमाणे एकमेकांची सुखदुःखे वाटत.

१९६८ पासून सुरु झालेला माझा व्यावसायीक प्रवास रमत गमत, कधी सुखाचे घट आकंठ प्राशन करीत, कधी काटेरी वाटेवरून चालत, तर कधी लोकांच्या घोळक्यात मिसळून एका विशिष्ट टप्प्यावर आला आहे. पण या प्रवासाच्या प्रत्येक वळणावर मला परमेश्वर भेटत गेला. कधी भाऊ बनून, कधी मित्र बनून, कधी विद्यार्थ्यांच्या रूपात, कधी माझे गुरु बनून तर कधी माझे प्रेमळ कुटुंब बनून, तसेच माझ्या कुटूंबाचे घटक असलेले माझे दोन डाॅबरमन मार्शल व स्वीटी ही प्रेमळ कुत्र्यांची जोडी. आम्ही त्यांची नांवेही मार्शल व स्वीटी राजाध्यक्ष म्हणूनच सांगत असू. आज त्यांची कमतरता नक्कीच जाणवते ! म्हणूनच मी प्रत्येक वेळी सावरत गेलो. जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे जे.जे. मधील माझी डीनपदावरील नेमणूक! शासकीय नियमानूसार मी १९८८ साली उपयोजीत कलेतील डीन या पदाला अधीकृतरीत्या पात्र असल्याने माझे शासकीय आदेश निघाले. पण त्याच वेळी संस्थेतील एक गट मी डीन होवू नये म्हणून कार्यरत होता. व माझे निघालेले आदेश निघूनही तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी ते रद्द करायला लावले. शिक्षण सचीवानी त्यांना नियम दाखवूनही मंत्रीमहोदयानी त्यावर कानाडोळा केला, व सुमारे दोन वर्षे मला माझ्या हक्काच्या पदापासून दूर ठेवले. यावेळी मला मदत केली ती माझे पत्रकार मित्र माधवराव गडकरी, किरण ठाकूर, कुमार कदम, व तत्कालीन विरोधी पक्ष नेते मनोहर जोशी यांनी. व अखेर शासनाला सुमारे दोन वर्षांनी माझे हक्काचे पद मला द्यावे लागले. यातही परमेश्वरच त्यांच्या रूपाने मला न्याय देण्यास आला नाही कां! तो दिसण्याची कांहीच गरज नाही. त्याची जाणीव आपणाला होत असते, विवीध रूपाने आणि विवीध नात्यांनी!  आणि मीही प्रत्येक वेळी सावरत गेलो. परीश्रमपूर्वक त्या पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. हा काळ देखील खडतर असाच होता. पण कठोर परीश्रमाची वाट सुरुवातीलाच स्वीकारली होती ना!

तर मग मित्रानो,  आज माझी पंचाहत्तरी पूर्ण होत आहे. त्यानिमीत्ताने मी ठरवले आहे की, कांही दिवस तरी स्वतःला या आभासी मोहनगरीत  गुंतवून घ्यायचे  नाही. पुढे केंव्हा तरी भेटूच !

आपला मित्र

मं.गो. राजाध्यक्ष
२९ ऑगस्ट २०१९



Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…