मिठ्ठास वाणीचा कलावन्त : रमेश कुलकर्णी
रमेश कुलकर्णी. खरे पाहीले तर हे एक सामान्य नांव. अनेकजण धारण करणारे. पण जाहीरात क्षेत्राचा विचार करताना मात्र त्या क्षेत्रांत कर्तबगारी गाजविलेले ते एक असामान्य नांव होते. अनेकांच्या आदराचे स्थान झालेले, विश्वासाला पात्र ठरलेले असे नांव ! कोकणातून मुंबईला स्वप्ने बाळगून येणाऱ्या अनेकांपैकी रमेश कुलकर्णीही एक होते. कोकणातील मसुरे येथे जन्मलेले कुलकर्णी आपले शालेय शिक्षण आटोपून मुंबईला येऊन सर जे.जे. उपयोजीत कला संस्थेत दाखल झाले आणि त्यानी यशस्वीरीत्या आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर आपल्या व्यावसायीक जीवनाची सुरुवात त्यांनी त्या काळच्या
' बोमास ' या आंतरराष्ट्रीय जाहीरात संस्थेत केली. बोमास ही भारतातील पाच प्रमूख जाहीरात कंपन्यांपैकी एक आंतरराष्ट्रीय जाहीरात कंपनी होती. नंतर तिचे नामकरण बेन्सन असे झाले व त्याही पुढे 'ओ. बी.एम. ( ओगील्वी, बेन्सन ॲंड मॅथर ) असे होऊन त्यामधून बेन्सन बाहेर पडल्यावर ती ‘ओ अँड एम’ राहीली व आता ती केवळ ‘ओगिल्व्ही’ या नावाने सुपरीचित आहे.
कुलकर्णी ज्या काळात जाहीरात क्षेत्रात आले, त्या काळात सहजासहजी कोणीच वरच्या पदावर पोहोचू शकत नव्हते. तेथे मोठमोठे कल्पक कलाकार काम करीत होते. त्यामध्ये होते पी.एन.सर्मा, भाई पत्की, अरुण कोलटकर, र.कृ. जोशी, पीटर कार्डोझ असे एकापेक्षा एक सर्जनशील कलाकार.आपल्या कल्पकतेला परीश्रमांची जोड देऊन तपशर्या केल्यानंतरच वरच्या पदावर पोहोचता येणे शक्य होत असे.आजच्या सारखे गलेलठ्ठ पगार, अन अल्पावधीतच आर्ट डायरेक्टर, क्रिएटीव्ह डायरेक्टर अश्या पदावर पोचणे तेव्हां अश्यक्य होते. पण कुलकर्णीची मेहनत, आत्मविश्वास अन मुख्य म्हणजे त्यांना लाभलेली जनसंपर्काची जन्मजात देणगी या गोष्टींमुळे कुलकर्णी अल्पावधीतच जाहीरात क्षेत्रांत अग्रगण्य ठरले. त्या क्षेत्रांतील ते एक आघाडीचे कलाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९६० च्या आसपासचा काळ हा नवनवीन उत्पादने बाजारात येण्याचा काळ होता. स्पर्धात्मक वातावरण तयार झाले होते. आपले उत्पादन लोकांच्या नजरेत भरावे यासाठी त्याचे आकर्षक असे पॅकेजींग करण्याची गरज होती. अनेक उत्पादनातून आपलेच पॅकींग उठावदार असावे व ग्राहकाने त्याकडे आकृष्ठ व्हावे अशी भावना प्रत्येक उत्पादक करीत होता व ती पुरवण्याची जबाबदारी जाहीरात संस्थांवर होती. आणि त्यासाठी त्यांच्या जाहीरात संस्थेत पॅकेजींग साठी एक स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आला. येथे कुलकर्णींना एक नवे विश्व मिळाले. त्यांच्या कामांतील गती आणि झपाटा पाहून बोमासने त्यांना लंडनमधील त्यांच्या मूळ कंपनीत पॅकेजींगच्या खास प्रशिक्षणासाठी पाठवीले. मुळांत इलस्ट्रेटर असलेले कुलकर्णी व्हिज्युलायझर झाले. व पॅकेजींग एक्सपर्ट म्हणून परत आले. पण त्यांच्या चौकस बुद्धीमुळे आणि मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांचा संचार सर्वत्र होत असे. या काळात कुलकर्णीनी टाटा-फिनले चहा, मोती साबण, नायसील पावडर, आदी उत्पादनासाठी विविध प्रकारची आकर्षक अशी वेष्टने तयार केली. ती खूपच गाजली. पॅकेजींगला एक 'शेल्फ अपील' असते. केवळ शेल्फमधूनच त्याने ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याची किमया पॅकेजींग करीत असते. कुलकर्णी अश्या वेळी त्या उत्पादनाचा चहुबाजुंनी विचार करून त्याला योग्य न्याय देत व त्यांच्या खास अश्या पॅकेजींगमुळे ती उत्पादने बोलकी करीत. रमेश कुलकर्णी आणि पॅकेजींग असे समीकरणच त्या काळात बनले होते
अश्या या रमेश कुलकर्णींशी माझी पहीली भेट झाली ती आमच्या प्रथम वर्ष्याच्या परीक्षेच्या ओरलच्या वेळी. त्याकाळी ओरलला आमचे परीक्षकच असत. आतमध्ये कोण आहेत हे मी बाहेर उभा असलेल्या एकनाथ शिपायाला विचारताच तो म्हणाला, बेन्सनचे रमेश कुलकर्णी आणि बांद्रा स्कुलचे किसन कामत आहेत. आणि ओरलला गेल्यानंतर अत्यंत आपुलकीने बोलणाऱ्या त्या व्यक्तीने आमचे मन जिंकले. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे रमेश कुलकर्णी आम्हांला दुसऱ्या वर्षाला अभ्यागत व्याख्याते म्हणून आले. १९६४ ते ७५ च्या दरम्यान ते अभ्यागत व्याख्याते म्हणून येत असत.ते आले की विद्यार्थ्यांचा त्यांच्या भोवती गराडा पडत असे. प्रथम आम्हांलाच ते शिकवायला आले. तेव्हां दर शनीवारी जाहीरात संस्थांना सुटी असे. पण आमचे कॉलेज सुरु असल्याने तो दिवस या व्यावसायीक लोकांचा असे. आणि कुलकर्णी आम्हांकडून चक्क व्यावसायिक कामे करून घेत. केवळ डिझाईनचा नव्हे, तर व्यावसायीक दृष्ट्या काम कसे केले जाते याची महत्वपूर्ण माहीती व शिक्षण त्यावेळी ते आम्हांला देत असत. फक्त सुंदर डिझाईन करून चालत नाही, तर उपयोजीत कलेच्या कामाचा वापर हा मुद्रणानंतरच होतो, तो विचारात घेऊन काम कसे करायचे, त्याची तांत्रीक बाजू कशी सांभाळायची, हे सर्व ते स्वतः प्रात्यक्षीके देऊन शिकवीत असत. वृत्तपत्राच्या कागदाचा दर्जा वाईट असल्यामुळे त्यावर फोटो प्रत्यक्ष छापला जात नसे. मग तो क्वार्टर टोन मध्ये कसा करायचा, ब्लिचआऊट कसे करायचे हे देखील ते शिकवीत, जे ज्ञान सर्वसाधारणपणे विद्यार्थी अभ्यासक्रम संपवून एजन्सीत गेला की त्याला अनुभवातून येत असे. त्याकाळात एकदम सफाईदार कामासाठी वापरात येणाऱ्या स्क्रेपर बोर्ड ह्या माध्यमावर कसे काम करायचे तेही आम्ही कुलकर्णी यांच्याकडून शिकलो. यासाठी लागणारे सर्व साहीत्य ते स्वतः घेऊन येत असत. शिवाय जी प्रोजेक्ट - स्टेशनरी वरच्या वर्गाला शिकवली जात असे, तीही कुलकर्णी आमच्याकडून अगदी व्यावसायीक रित्या करवून घेत. त्यासाठी जर का त्यावर त्यांच्याकडून सुधारणा हवी असल्यास त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या एजन्सीत देखील येण्याची मुभा दिली होती. जे.जे. आर्ट स्कूल हे कुलकर्णी यांचे हक्काचे घरचं होते. येथील सर्व शिक्षक त्यांचेही शिक्षक होते. त्यामुळे जे.जे.च्या विद्यार्थ्यांना कशाचीही गरज लागली, तर येथील अध्यापक त्यांनाच ते हक्काने सांगत असत. त्याकाळी कान्स येथील जाहीरात फेस्टिव्हलच्या बक्षीसपत्र कलाकृतींच्या फिल्म येथे येत असत. पण आम्हां विद्यार्थ्यांना त्या पहाणे मात्र दुर्मीळ असे. पण कुलकर्णीनी अश्या फिल्म्सचा आम्हां विद्यार्थ्यांसाठी खास शो ब्लेझ या मिनी थेटरमध्ये करून त्या दाखविण्यास प्रारंभ केला. येथील विद्यार्थ्यांसोबतच प्रत्येक शिक्षकांच्या वैयक्तीक कामाबद्दल त्यांना माहीती असे. त्यामुळे तश्या प्रकारची काही कामे असल्यास ती शिक्षकांनाही ते करण्यास देत. आर्ट स्कूल मधील विद्यार्थ्यांना मदत करण्यास कुलकर्णी तत्पर असत. आर्टस्कूल मधील चांगले काम करणारे विद्यार्थी हेरणे आणि त्यांना निरनिराळ्या एजन्सीत स्वतःच्या ओळखीने नोकरीला लावणे हा त्यांचा आवडता उद्योग होता. त्यामुळे आर्टस्कूलमधून बाहेर पडलेला विद्यार्थी त्यांना गुरुस्थानी मानत असे. गुणी मुलांना कामे देणे, त्यांना योग्य मोबदला मिळेल हे पहाणे हे त्यांचे महत्वाचे काम असे. एकदा बेन्सनला असताना ते मला घेऊन ऑफिसला गेले, व त्यांनी मला ग्लॅक्सोचे बरेच काम फ्रीलान्स म्हणून करायला दिले. पुढे कुलकर्णी तेथे असेपर्यंत मी ते काम करीत होतो.
ओ.बी.एम. मध्ये असताना कुलकर्णीनी अनेक नामवंत अश्या उत्पादनावर कामे केली. मॉडेला सुटींग्स, कोरोमंडल फर्टीलायझर, फायझर, नायसील प्रिकली हीट पॉवडर, ग्लॅक्सो ही त्यापैकी कांही नांवे. ग्लॅक्सोच्या कित्येक उत्पादनाची पॅकेजींग डिझाईन त्यांनी केली आहेत. ग्लॅक्सोचे तरुण गुप्ता यांनी त्यांच्यातील कलागुण, विचारशक्ती, आणि सादरीकरण क्षमता पूर्ण पणे ओळखली होती. तरुण गुप्तांना अमेरीकेतील ग्लॅक्सोचे कामही पहावे लागत असे. पण जेव्हां त्यांनी पाहीले की अमेरीकेत होणाऱ्या कामाच्या तोडीचे काम येथे कुलकर्णींकडून होत आहे, शिवाय तेथील अवाढव्य खर्चही येथे नाही, कारण त्यांच्या तुलनेने भारतातील डिझायनिंगचे, छपाईचे दर खूपच कमी असतात. यामुळे तरुण गुप्तांनी कुलकर्णींना अमेरीकेला जाऊन तेथील ग्लॅक्सोच्या ऑफीसची मेडीकल व्हिज्युअल एडस करण्यास सांगीतले. आणि त्यांचा विश्वास रमेश कुलकर्णीनी सार्थ ठरवला. एवढी त्यांची व ग्लॅक्सोची जोडी जमली होती. कुलकर्णीनी कॉर्पोरेट डिझाईनिंग डेव्हलपमेंट हा विषयही मोठ्या कौश्यल्याने हाताळला. मुंबईत 'ओबेराय' हॉटेल झाल्यावर त्याला 'ताज'च्य' तोडीने उभे रहायचे होते. त्यासाठी डिझाइनींग मध्ये कुलकर्णीनी एकसूत्रता आणली. त्यांची सर्व स्टेशनरी, कटलरी, ड्रेसेस, वाहने यावर त्यांनी प्रतीकात्मक चिन्हांचा वापर करून त्यांना एका विशिष्ट दर्जावर नेवून ठेवले. त्यापाठोपाठ त्यांना विविध हॉटेल्सची कामे मिळू लागली व त्या सर्वाना त्यांनी एक वैशीष्ट्यपूर्ण रूप दिले.
ओ.बी.एम.चे क्रिएटिव्ह डायरेक्टर झाल्यावर कुलकर्णीनी आपल्या ऑर्गनायझींग कौशल्याचा पुरेपूर वापर केला. मूलतः कुलकर्णी मिठ्ठास वाणीचे! कोणाशी त्यांची ओळख झाली तर तिचे रूपांतर गट्टीतच व्हायचे. बोलणे तर इतके आपुलकीचे की एखाद्याच्या पोटातच शिरत. त्यातही जर का एखादा कोकणातला भेटला, की खास अश्या मालवणी भाषेत त्यांचा संवाद सुरु करून त्याला आपलासा करीत. त्यांचा जनसंपर्क तर त्यांनी मोठ्या कौश्यल्याने संभाळला होता. कोणाला मदत हवी असल्यास मदत कर,कोणी अडचणीत असला तर त्याला मार्ग दाखव, कोणाला स्वतंत्र उद्योग सुरु करायचा असेल तर त्याला क्लायंट मिळवून देण्यापासून उभारी दे, कोणाला लिफ्ट दे, एखाद्या एजन्सीला तातडीने काम करण्यासाठी स्टूडीओ हवा असल्यास स्वतःचा स्टूडीओ दे, कुणाला नुसताच फोन करून त्याला हॅलो कर या त्यांच्या लोकांशी वागण्याच्या बारीकसारीक गोष्टीही त्यांच्या यशाच्या गमक ठरत, त्यांची कला विकसीत करत असत. ' कॅग ' अथवा कम्यूनीकेशन आर्टीस्ट गिल्ड' नावाची जाहीरात कलाकारांची एक संस्था या मुंबईत कार्यरत आहे. दरवर्षी प्रकाशीत झालेल्या जाहीराती व तत्सम माध्यमातून उतकृष्ट जाहीराती निवडून त्यांना ' कॅग अवार्ड हा मानाचा पुरस्कार देणे याचे काम आहे. विशेष म्हणजे जाहिरातीतील कला हा भाग विचारात घेऊन ही पारितोषिके देण्यासाठी आलेल्या जाहीरात कलाकृतीतून नेमलेल्या ज्यूरीकडून निवड होत असते.म्हणून कला वर्तुळात या संस्थेला फार महत्व होते.मध्यन्तरी या कॅगची आर्थीक परिस्थीती खुपच नाजूक बनली होती. सभासदांची संख्या पण रोडावली होती. तेव्हां सर्वाना डोळ्यासमोर आले,ते हक्काचे नांव होते रमेश कुलकर्णी. आणि कुलकर्णीनी ही जबाबदारी स्वतःवर घेतली. येथे त्यांनी आपल्या जनसंपर्काचा उपयोग करून घेतला. स्वतः सभासदत्वाचे फॉर्म बरोबर घेऊन ते प्रत्येक एजन्सीत, आर्ट स्कूलमध्ये तसेच खाजगी रित्या काम करणारे जे असंख्य कलाकार होते, त्यांच्याकडे गेले व त्या सर्वाना कॅगचे सभासद बनवून त्यांना कामाला लावले. त्यानंतर त्यांनी कॅगमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी दर महीन्यांत जहांगीर आर्ट गॅलरीत कलाकारांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे ठेवली. विदेशी जाहीरातींच्या फिल्म्सचे शो ठेवले. निरनिराळ्या शैक्षणीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. व कॅगला उर्जीतावस्था आणून दिली. शिवाय प्रत्येक सभासदाला त्याच्या वाढदिवसाला एक सुंदर असे शुभेच्छा पत्र कॅगतर्फे कुलकर्णींच्या सहीने येऊ लागले. सभासदांना हा एक सुखद असा गोड धक्का होता.यामागे होती ती कुलकर्णीची प्रेरणा आणि सृजनशील अशी विचारशक्ती.
१९७६ मध्ये रमेश कुलकर्णीनी स्वतःचा 'आरट्यॅलेंट' हा डिझाईन स्टूडीओ सुरु केला. ( आर ट्यालेंट म्हणजे रमेश ट्यालेंट ) त्यांचे मुख्य ग्राहक होते नामांकीत अश्या औषधांच्या कंपन्या. ग्लॅक्सो हे क्लायंटही त्यांच्याकडे स्वतः होऊन चालत आले. शिवाय सँडोझ, ल्युपिन, खंडेलवाल, फायझर, अलेम्बिक, रॅफ्टाकोस ॲंड ब्रेट, ॲलनबरीज अश्या प्रमुख कंपन्यांचा अंतर्भाव होता.जेव्हां डॉक्टरांशी संवाद साधायचा असतो तेव्हां त्यांना आपल्या औषधाने बरे होणारे रोगी केवळ दाखवून चालत नाही. कारण डॉक्टरांचे म्हणणे असते की, दिवसभर आम्ही जे पाहतो तेच पुन्हा का दाखवता? शिवाय अश्या औषधांची माहीती डॉक्टरांना पुरेपूर असते. तेव्हां अशी औषधे विकण्यासाठी जाहीरात कलाकारांना आपली सर्जनशीलता पूर्णपणे पणाला लावावी लागते. कुलकर्णींकडे ते पुरेपूर होते. एखाद्या डॉक्टरला असावी तशी औषधी उत्पादनांची माहीती त्यांना झाली होती. जाहीरातींना मॉडेल्स मिळवण्यासाठी मॉडेल को ओर्डीनेटरची गरज लागते. पण कुलकर्णींना त्यांची गरज कधीच भासली नाही. आपल्या असंख्य मित्र परीवारातून ते कोणालाही मॉडेल म्हणून आपल्या स्टुडीओत आणून त्याचा वापर करीत असत. मलाही एक दिवस ते स्टुडीओत घेऊन गेले आणि मॉडेल म्हणून माझा वापर केला. कामाचे पैसेही ते तितक्याच तत्परतेने देत असत. प्रिंटिंगसाठी त्यांची रंगांची जाण खूपच उत्कृष्ट होती. एकदा का क्लायंटसोबत बैठक आटोपून ते आले की मग प्रत्येक आर्टवर्कवर कलरस्कीम मार्क करीत असत. ही सगळी कामे थॉम्सन प्रेस मध्ये छापली जात असत. त्यासाठी सर्व आर्टवर्क छपाईसाठी योग्य आहेत कां ते पहाण्यासाठी प्रेसचे मॅनेजर सप्रे स्वतः येऊन त्यांची पहाणी करीत असत. इतक्या पद्धतशीरपणे कुलकर्णीचे काम चालत असे.
कुलकर्णींचा सहवास मला पुरेपूर लाभला. त्याला कारणही तसेच होते. थोर चित्रकार रवी परांजपे हे त्यांच्या सोबतच बेन्सन मध्ये काम करीत असत. दोघांची मैत्री केवळ तोंडदेखली मैत्री राहीली नाही तर पुढे ती घरगुती झाली. आणि परांजपे माझे शालेय जीवनापासूनचे गुरुवर्य. त्यामुळेही मी कुलकर्णींच्या जवळ गेलो. मात्र मी कॉलेजमध्ये साठे सरांसोबत कामे करीत असे. कित्येकदा कुलकर्णी तेथे येत. एकदिवस त्यांनी मला बेन्सनची कांही कामे फ्रिलान्स म्हणून दिली. आणि ती पाहील्यावर मला त्यांच्याकडून सतत कामे मिळत गेली. त्यांनी मला इतर कंपन्यांचीही कामे मिळवून दिली. एखाद्यावर त्यांचा विश्वास बसला की मग आमच्या वतीनेच ते दुसऱ्याला खात्री देत असत. आणि त्यांच्या शब्दाला नेहमीच मान असे. त्यांनी जेव्हां स्वतःचा स्टूडीओ सुरु केला तेंव्हांही ते मला तेथे घेऊन गेले, आणि मला तेथे येऊन काम करण्यास सांगितले. आणि पैशासाठी त्यांचा हात नेहमीच मोकळा राहीला होता. मला जेव्हां जागा घ्यायची होती तेव्हां कांही पैसे कमी पडत होते. मी त्यांच्याकडे शब्द टाकताच त्यांनी मला तेथेच चेक लिहून दिला. आणि वर ते म्हणाले राजा, परत करायची गडबड करू नकोस. तू माझ्याकडे काम करत आहेसच. तेव्हां त्यातून मी तुला पैसे दिले आहेत असे समज. त्यावेळी माझा गळा इतका भरून आला होता की, माझ्या तोंडातून आभाराचे औपचारीक शब्दही उमटले नाहीत. आणि कदाचित त्यांनाही ते आवडले नसते. सढळ हाताने मदत करणे हा त्यांचा धर्म होता.
फिरोझ कुडियनवाला हे आर्किटेक्ट जगतातील एक मोठे नांव. त्या काळात संगणक नव्हते. बिल्डिंगचा प्लॅन तयार झाला की ग्राहकाला दाखविण्यासाठी त्याची वर्कींग ड्रॉइंग्स करावी लागत. पण कुडिअनवाल्याना अपेक्षीत असे काम करणारा त्यांना कोणी दिसत नव्हता.तेव्हां सर्वाप्रमाणे त्याने कुलकर्णींना गाठले. कुलकर्णींना माहीत होते , अश्या ड्रॉइंग्जना पर्स्पेक्टिव्हची गरज असते आणि ती व्यक्ती म्हणजे रवी परांजपे ! आणि त्यांनी त्यांची परांजपेंशी गाठ घालून दिली. केवळ प्लॅनवरून संपूर्ण इमारतीची रचना दाखवणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण दैवी लेणं लाभलेल्या परांजप्याना काहींचं कठीण नव्हते. त्यांची परस्पेटीव्ह ड्रॉईंग ही मूळ इमारतींपेक्षा सुंदर दिसत. आणि या क्षेत्रांत एक परस्पेक्टीव्ह लॅंडस्केप हा एक नवीन कला प्रकार उदयाला आला. कुलकर्णींचा याला थोडाफार हातभार लागला होता. कुलकर्णीनी माणसेही जोडली ती सोन्यासारखी. त्यांनी जेव्हां प्रभादेवीला ऑर्नेट हाऊस मध्ये राहती जागा घेतली, तेव्हां आर्किटेक्ट प्रकाश मानकर यांनी केवळ साहित्याचा खर्च घेऊन त्यांचे संपूर्ण इंटेरियर केले. त्यांना जेव्हां स्वतःचा स्टूडीओ काढण्याचे ठरवले तेव्हां युनीक प्रोसेसच्या नेरकरांनी आपली जुनी जागा त्यांच्या हवाली केली. इतका त्यांचा मित्रपरीवार त्यांना मानत असे.
मी जेव्हां १९९१ साली जे.जे.चा अधीष्ठाता झालो तेव्हां माझे दोन गुरुवर्य, माझी दैवते असलेले रवी परांजपे आणि रमेश कुलकर्णी याना मी ती आनंदाची बातमी दिली. परांजपे त्यावेळी पुण्याला स्थायीक झाले होते. त्यांनी सांगीतले की मीं तुला भेटायला मुंबईला येत आहे. तर रमेश कुलकर्णींना मी भेटण्यास येतो असे सांगताच ते ताबडतोब म्हणाले,' अरे, ज्या खुर्चीत आम्ही आडारकरांना पाहीले आहे, त्याच खुर्चीत तुला पाहण्यासाठी मीच तेथे येणार आहे. आणि दुपारी ते माझ्याकडे आले. जाताना नेहमीप्रमाणे ' कसली गरज लागली तर सांग रे बाबा.आता तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे'. आणि पुढे आम्ही जेव्हां सिलॅबस बदलला, तेव्हाही त्यांचा आम्हांला खूप उपयोग झाला. कुलकर्णींच्या मुलीचे लग्न झाले तेव्हां वनिता समाज मध्ये जणू जाहीरात कलाकारांचे संमेलनच भरले आहे असे वाटत होते. जाहीरात क्षेत्रांतील त्यांचे सर्व मित्रमंडळ तेथे वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. कुलकर्णीनी पुण्याला प्रभात रोडवर सेकंड होम म्हणून जागा घेतली होती. बऱ्याचवेळा आठवड्याच्या अखेरीस ते तेथे जात असत. मीही त्यांच्या घरी जावून पाहुणचार घेवून आलो आहे. दोघेही पती पत्नी एक आदर्शवत जोडपे होते. एकमेकाना साथ देणारे, सर्वाना प्रसन्न करून सोडणारे! कुलकर्णी यांच्या मुलाच्या लग्नाला मी गेलो होतो, तेव्हां मला ते थोडे नरम वाटले. असे शांत बसलेले आम्ही त्यांना कधीच पाहीले नव्हते. तेव्हां मन थोडे चरकले. पुढे मी माझ्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यास त्यांच्या घरी गेलो असता त्यांची तब्येत जास्तच खालावलेली दिसली. मला म्हणाले, 'माझे आशीर्वाद मी आता येथूनच देतो रे!' तसे ते सदैव आमच्या सोबत असायचेच!
असा हा उमदा कलावंत आपल्या आजारपणामुळे, ज्यांच्याशी त्यांचा सतत संपर्क असे अश्या अनेक लोकांच्या
सहवासापासून दूर झाला. आपण आता आपल्या पूर्वीच्या जोमाने या धावपळीच्या क्षेत्रांत वावरू शकत नाही याची त्यांना खन्त वाटू लागली. मात्र त्यांच्या सतत संपर्कात होते ते गोखले व रवी परांजपे. बाकी कोणाला ते भेटत नसत. ज्यांच्या मदतीचा हात नवोदीतापासून ते व्यावसायीक कलाकारापर्यंत नेहमी असे, असे अजातशत्रू रमेश कुलकर्णी यांनी १० मे २००२ रोजी या जगाचा निरोप घेतला. एक माणुसकी जपणारा सच्चा माणूस गेला. खूप मोठी पोकळी निर्माण करून. आणि माझा तर पावलोपावली मार्गदर्शन करणारा दीपस्तंभच विझला. जुन्या आठवणींनी भडभडून येते. वाटते की आपले आयुष्य रिवाईंड व्हावे आणि पून्हा या गुणी माणसांसोबत दिवस काढावेत. पण ते घडणे केवळ अशक्य आहे याचीही जाणीव आहे.
जाहीरात क्षेत्रांत रमेश कुलकर्णीनी केलेली कामगीरी, त्यांची कर्तबगारी, त्यांनी मिळवलेली जाहीरात व विचार प्रसारण कलेतील असंख्य पारितोषिके व त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक कला विद्यार्थ्यांना दिलेला मदतीचा हात ही त्यांची आठवण कधीच मिटायला देणार नाहीत.
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष






Comments
Post a Comment