पेस्टल रंगाचा बादशहा : चतुरस्त्र चित्रकार व्ही. एस. गुर्जर




१९५० चे दशक म्हणजे एकापेक्षा एक चित्रकार रसिकांच्या मनाला आपल्या कलाविष्कारांनी भुरळ घालत होते. त्याचे स्वप्नरंजन करीत होते, आणी एकापेक्षा एक अश्या कलाकृती निर्माण करून रसिकांच्या मनाची तृप्ती करीत होते. त्यामध्ये होते ते चित्रकार दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगांवकर, एस. एम. पंडीत. या तिघांनी तर साऱ्या रसिकांना आपसात वाटून घेतले होते. शिवाय आणकीही कांही आघाडीचे चित्रकार यात कार्यरत होते. आणि तेही पेंटींग या विषयात प्रावीण्य मिळवून देखील उपयोजीत कला अर्थात त्या काळाप्रमाणे प्रचलीत असलेल्या कमर्शिअल आर्ट मध्ये काम करीत होते. आणि तेही आपल्या कामात इतके वाकबगार असत की बरेच होतकरू कलाकार त्यांच्या कलेचा मागोवा घेत आपली वाटचाल सुरु ठेवीत. अश्या नामवंत आणि निष्णात कलाकारांपैकी कांही म्हणजे प्र.ग.शिरूर, पंडीत सातवळेकर, माधवराव सातवळेकर, द.ग.गोडसे, व्ही. एस. माळी, मुरलीधर आचरेकर, मनोहर जोशी, रवी परांजपे, ग.ना.जाधव, बसवंत महामुनी, ठाकूर विटणकर आदी कलाकार मराठी रसिकांच्या मनात आपल्या कलाविष्काराने अधिराज्य गाजवीत होते. यातील बरेच जण आमच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये आम्हांला मार्गदर्शन करण्यासाठी येत असत. आणि हे महान कलावंत आम्हांला अनुभवायला मिळत असत. त्यादृष्टीने त्या काळातील आम्ही विद्यार्थी भाग्यवानच समजायला पाहीजे. आणि अश्या हरहुन्नरी कलावंतांमधील एक कलाकार, त्याचे प्रत्यक्ष काम करत असतानाच अनुभव, आणि विशेष म्हणजे आमच्या कामावर त्यांनी केलेली सुधारणा आम्हांला बरेच काही शिकवत असे, असे प्रख्यात कलाकार, कलाशिक्षक व्ही. एस. गुर्जर, ज्यांची कैक चित्रे मी स्त्री, किर्लोस्कर, सत्यकथा, मनोहर, रहस्यरंजन अश्या नियतकालिकांवर सतत पहात आलो होतो.

तसे पाहीले तर गुर्जरांचें व्यक्तिमत्व फारसे आकर्षक असे नव्हते. मात्र ते नेहमी सुटा बुटात असत. डोक्यावर त्या काळातील साहेब हॅट. डोळ्यावर चष्मा, नजर बारकाईने सर्वत्र फिरत असलेली. ते जेव्हां शिकवायला जे.जे.मध्ये येत असत, तेव्हां वर्गात आल्यावर आपली हॅट काढून काखेत पकडीत. तसेच मधून मधून दुमडलेल्या हाताला झटके देण्याची सवय त्यांना होती. मुख्य म्हणजे त्यांच्या सोबत त्यांच्या हातात एक मोठा असा पेन्सिलचा जुडगा असे. त्या सर्व पेन्सीली नीट टोक काढलेल्या असत. यामध्ये एच.बी. पासून सर्व ग्रेडच्या पेन्सील असत. जशी शेडची गरज पडे त्याप्रमाणे त्यातील एकेक पेन्सिलचा वापर होत असे. नंतर समोर मॉडेल बसले की आम्ही गोलाकार त्या सभोवताली बसत असू, अन मग एक डोळा बंद करून पेन्सिलने  बारीक डोळ्याने मॉडेलच्या एक एक अवयवाचे आमच्या बोर्डवरील कागदाप्रमाणे मोजमाप घेऊन आमचे रेखाटन सुरु होत असे. गुर्जर सर यावर बारीक लक्ष ठेवून असत. यात जर कोण चुकला तर त्याला जवळ जाऊन स्वतः करून त्याचे चित्र सुधारत. गुर्जर सरांचे प्रात्यक्षीक हे शिस्तबद्ध पद्धतीने चाले. प्रथम ते पेन्सिलच्या पाठचे टोक पकडून, पेन्सील लांब धरून  सैलश्या हाताने मॉडेलचा अंदाज घेऊन एकदम हलकीशी आउटलाईन काढीत असत. त्यानंतर हळूहळू त्यातील खोली वाढवीत जात. प्रात्यक्षिकाच्या वेळेस अथवा बहुतेक वेळा ते आपले ड्रॉईंग खोडण्यासाठी रबर वापरीत नसत. इतकी त्यांची रेषा हुकुमी असे. त्यामुळे कित्येकदा त्यांनी केलेल्या पेन्सिल ड्रॉईंग वर पुसट रेषा दिसत.


या थोर चित्रकाराचा, विष्णू सीताराम गुर्जर यांचा जन्म २० जानेवारी १९१० रोजी रत्नागीरी येथे झाला. बालवयापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या गुर्जरांची चित्र संपदा सतत चालू असे. पुढे जेव्हां मुंबईच्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, तेव्हां त्यांच्या मावशीचे यजमान अण्णा हे त्यांना घेऊन प्रवेशासाठी जे.जे.च्या प्रांगणात आले. आर्ट स्कुलची ती भव्य इमारत, तेथील गर्द झाडीने वेढलेले ते निसर्गरम्य वातावरण पाहून कुमारवयातील गुर्जर एकदम गांगरून गेले. अण्णा प्रवेश प्रक्रीयेची माहीती घेण्यासाठी जे.जे.च्या कार्यालयात गेले असता गुर्जर बाहेरूनच जे.जे.चे वैभव न्याहाळत असतांना तेथे एखाद्या सरकारी अधिकाऱ्याप्रमाणे पेहराव असलेली एक रुबाबदार व्यक्ती तेथे आली, आणि त्यांनी या बावचळून उभ्या असलेल्या मुलाची चौकशी केली. तुझे वय या अभ्यासासाठी अद्याप लहान असल्याचे सांगून काही चित्रे काढली आहेस कां ? असे विचारताच गुर्जरांनी सोबती आणलेली आपली चित्रे त्या व्यक्तीला दाखवीली. ती पहाताच त्या व्यक्तीने संस्थेचे हेडक्लार्क श्री नाडकर्णीना बोलावून घेतले. व त्यांना या विद्यार्थ्यांचे नांव प्रथम वर्ष्याच्या वर्गात नोंदवून घेण्यास सांगीतले. नंतर चौकशी करता जेव्हां गुर्जरांना कळाले की, ती व्यक्ती म्हणजे त्यावेळचे मुख्याध्यापक व ज्यांचे नांव गाजत असे ते सुप्रसीध्द चित्रकार  राव बहादूर धुरंधर होते तेव्हां गुर्जरांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्याशी संभाषण झाल्याने आपले आयुष्य धन्य झाल्याप्रमाणे त्यांना वाटले.

१९२६ साली ॲडव्हान्स परीक्षेत गुर्जर सर्वप्रथम आले. पुढे १९२८ साली त्यांचा डिप्लोमा पूर्ण झाला. या दरम्यान गुर्जरांना लाईफ पेंटींग आणि मेमरी या विषयात प्रथम पारितोषिक मिळाले. याशिवाय त्यांना १९२६ ते १९३२ पर्यंत सातत्याने स्कॉलरशिप मिळाली होती. १९२७ साली आर्ट स्कूलचे प्रिन्सिपॉल सॉलोमन यांच्या हस्ते त्यांना 'कॉम्पोझिशन' या स्पर्धेतील पारितोषिकाचा सन्मान मिळाला. स्कूल ऑफ आर्टचे सन्माननीय असे ' डॉली करसेटजी प्राइझ'नेही त्यांना सन्मानीत करण्यात आले. आणि स्कूल ऑफ आर्ट पासूनच त्यांची बक्षीसे व पदके मिळवण्याची परंपरा त्यांनी पुढेही आपल्या व्यावसायीक जीवनात सदैव राखली. आपलें उच्च कला शिक्षण नैपुण्याने प्राप्त केल्यानंतर गुर्जर घाटकोपर येथील 'रवी उदय प्रेस' मध्ये काम करू लागले. रवी उदय हा त्याकाळातील एक मोठा प्रेस होता, जेथे अनेक प्रकारची कॅलेंडर्स, लेबल्स छापली जात असत. गुर्जर तेथे प्रमुख चित्रकार म्हणून काम पाहू लागले. त्यावेळी गुर्जरांनी सुमारे ३०० कॅलेंडर डिझाइन्स बनवीली. कित्येक आकारातील लेबल डिझाइन्स साकारली. पण दुसरीकडे चाकरी करण्याचा त्यांचा पिंड नव्हता. दरम्यान त्यांनी फ्रेंच ब्रिज येथे स्वतःचा स्टुडीओ त्यांनी सुरु केला. समोरच प्रसीद्ध चित्रकार ए.ए. आलमेलकर यांचा स्टुडीओ होता. पण खरे पाहीले तर दोघेही एकमेकासमोर असूनही त्यांचे सूर कधीच जमले नाहीत. तसे गुर्जर थोडेसे एकलकोंडे होते.


गुर्जरांचा स्टुडीओ तसा आकाराने लहानच होता. साधारणपणे एक खोली होती ती. तिला एकच खिडकी होती. स्वभावाने धार्मीक असलेल्या गुर्जरांनी स्टुडिओत कुंडीमध्ये एक तुळस ठेवली होती. तसेच एक भिंगरीही तेथे त्यांनी कुंडीत ठेवली होती. त्यावर कांही मंत्र लिहिलेला होता. कामाला सुरुवात करतांना ते आरंभाला कागदावर नेहमी 'श्रीकृपा असे लिहीत असत. शिवाय आपण केलेले ड्रॉईंग किती वेळात केले याची नोंदही ते चित्रावर करून ठेवीत असत. आतमध्ये एक स्टोव्ह त्यांनी ठेवला होता. कधी मधी त्यावर ते चहा बनवीत असत. कामामध्ये तसेच त्यांच्या जीवनात गुर्जर एकदम वक्तशीर असत. सकाळी नेमके दहा वाजता ते आपल्या स्टुडिओत येत व आल्या आल्या दरवाजा बंद करीत असत. कोणालाही तेथे शिरकाव नसे. अपवाद केवळ दत्ता पाडेकरचा! पाडेकरना ते विद्यार्थी दशेपासून ओळखत होते शिवाय नंतरही पाडेकर त्यांच्या सानिध्यात बरेच वावरलेले असल्याने गुर्जरांच्या खूपच जवळ होते ते. स्टुडीओचे दरवाजे बंद झाले की मग मात्र गुर्जर कामामध्ये व्यग्र होऊन जात. क्रिकेटची आवड असल्याने त्याकाळातील प्रथेप्रमाणे ते रेडिओवर कॉमेंटरी ऐकत त्यांचे काम चालू असे. त्यांच्या स्टुडीओत त्यांनी पेंटींग करण्यासाठी इझल देखील ठेवला नव्हता. टेबलावरच कॅनव्हास  भिंतीला टेकवून ते ठेवीत असत, व तसेच त्यांचे काम चालत असे. कसलाच बडेजाव त्यांना मंजूर नव्हता.

गुर्जरांना बाहेरील कामे भरपूर मिळत असत. पण केवळ त्यामध्ये ते समाधान मानीत नसत. निरनिराळ्या कला प्रदर्शनासाठी त्यांची चित्रसंपदा सुरूच असे. त्यासाठी ते मॉडेलवरून काम करीत असत. मात्र त्यांचे सर्व काम मॉडेलप्रमाणेच असे. कित्येक चित्रकार कान अथवा बोटे वगैरे रेखाटताना सर्वसाधारणपणे मनानेच त्याचे आकारमान दाखवितात. पण गुर्जर मॉडेलचा प्रत्येक अवयव जसा असेल तसाच दाखवीत. सतत नवनवीन चित्रे काढून ते दिल्ली, कोलकाता, मद्रास (तामिळनाडू), अमृतसर मुंबई अश्या ठिकाणी ख्यातनाम संस्थाच्या प्रदर्शनात ते पाठवीत असत. अनेक प्रदर्शनातून त्यांच्या कलाकृतींना मान सन्मान मिळाले.  बिर्ला यांच्यासाठी त्यांनी बरीच कामे केली. आजही बिर्ला मातुश्री सभागार, इटली, वाशिंग्टन, रशिया अश्या ठिकाणी गुर्जरांच्या मौल्यवान कलाकृती स्थानापन्न झाल्या आहेत.

गुर्जरांनी अनेक विषय आपल्या कलाविष्कारासाठी निवडले. पण कोळी जीवन हा त्यांचा खास आवडीचा विषय. त्यांचे रंगभान जीवन गुर्जरांना नेहमीच आकर्षीत करीत असे. त्यांची बहुतेक चित्रे या कोळ्यांच्या जीवनाने नटलेली आहेत. मग ते कोळी नृत्य असो, समुद्रात जाळे फेकणारा कोळ्यांचा समुदाय असो किंवा बाजारात मासळी विकण्यास बसलेली धीवर कन्या असो, गुर्जरांचा कुंचला कोळ्यांच्या वेशभूषा, डोक्यातील गजरे, अंगावरील दागीने, विशिष्ट पद्धतीने बांधलेलं त्यांचे केस या सर्व गोष्टी रंगांची उधळण करीत आविष्कृत करीत असे. नुसत्या कोळी जीवनावर त्यांनी असंख्य चित्रे काढली आहेत. आणि यासाठी ते कोळ्यांच्या जीवनाशी समरस झाले होते. त्यांनीच एकदा लिहीले होते, " जे चित्र मी योजतो त्या चित्राचे रफ स्केच करून मी नेहमी हाताशी ठेवतो. व मगच प्रत्यक्ष चित्राला सुरुवात करतो. याप्रमाणे डोळसपूर्ण पूर्वतयारीनंतरच प्रदर्शनासाठी मी चित्र तयार करतो. आणि कदाचीत त्यामुळेच मला एकापाठोपाठ श्रेष्ठ अशी बक्षीसे मिळाली असावीत".  मला आठवते, आम्ही विद्यार्थी असताना १९६५ साली आमचे अधिष्ठाता आडारकर यांनी जे.जे.मध्ये मायकल अँजेलोची ४०० वी पुण्यतिथी साजरी केली होती. त्यासाठी नामवंत अश्या कलाकारांकडून भित्तिचित्रे रंगवून घेतली होती. पहील्या मजल्यावरील बाल्कनीचा एक मोठा कॉलम गुर्जरांनी आपल्या चित्रांसाठी निवडला होता. व त्याच्या एका बाजूला कोळी व दुसऱ्या बाजूला कोळीण अशी साधारणपणे पाच फूट उंचीची चित्रे काढली होती. त्यांना सभोवार लाकडी फ्रेम बसविण्यात आली होती. सुमारे दहा वर्षे दिमाखात संस्थेचे भूषण ठरलेली ही चित्रे पुढे संस्था चालक व कला संचालक यांच्या वादात ही दोन तसेच आणखी एक चित्र जे दुसऱ्या चित्रकाराने काढले होते ती तिन्ही चित्रे सार्वजनीक बांधकाम खात्याकडून खरवडून काढण्यात आली. उपयोजीत कला संस्थेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले त्या वेळी.


चित्रकार गुर्जर हे एक चतुरस्त्र कलाकार होते. कोणत्याही माध्यमाचे त्यांना वावडे नसे. पेन्सिल असो, जलरंग असो व तैलरंग तेवढ्याच सहजतेने ते वापरीत असत. मात्र जर का पेस्टल अथवा खडू हे माध्यम जर का त्यांच्या हाती आले, की त्यांची कळी खुललीच म्हणून समजा! पेस्टल मध्ये काम करणारा त्यांच्या तोडीचा दुसरा चित्रकार मिळणे अश्यक्य! एवढे प्रभुत्व होते त्यांचे पेस्टल या माध्यमावर. निरनिराळ्या प्रदर्शनांत त्यांना पेस्टल मधील कामाला सतत ओळीने सात वर्षे पारितोषिके मिळाली आहेत. आमच्या वर्गावर जेंव्हा त्यांनी पेस्टल माध्यमाचे प्रात्यक्षिक दिले होते, त्यावेळी ते स्वतःकडील एक खास कागद घेऊन आले होते. बहुदा तो विन्सर न्यूटनचा असावा. त्यांचे पेस्टलही परदेशी होते. आमच्या वर्गात एक तांबूस गौरवर्णाची मणी गझदर नावाची विद्यार्थिनी होती. तिला त्यांनी मॉडेल म्हणून बसविले . तिला निरखून पाहात असतांना त्यांना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. ते म्हणाले, यात कोठेतरी मला लाल रंग हवा आहे. म्हणून त्यांनी कांही मुलींकडे लाल रिबीन आहे का याची चौकशी केली. एका विद्यार्थिनीने दुसऱ्या वर्गातील मुलीकडून तशी रिबीन आणताच त्यांनी ती मॉडेलच्या कपाळावर आडवी बांधली आणि तत्क्षणी त्यांचा चेहरा खुलला.आणि मग त्यांचे जे प्रात्यक्षीक झाले त्याला तोड नव्हती. अशी बरीच पेस्टलमधील प्रात्यक्षीके जे.जे.मध्ये अजूनही पहायला मिळतात. विशेष करून मॉडेलला  बैराग्याचा  वेष घालून त्यांनी त्याची केलेली पेंटीग्स तर अद्भुत अशीच मानावी लागतील. 

कित्येकदा गुर्जर आपली मॉडेल रस्त्यावरून जाणाऱ्या माणसामध्ये शोधत. एकदा त्यांना दाढी वाढलेला, मळकट कपडे घातलेला, केस पिंजारलेला असा एक वैशिष्ट्यपूर्ण तरुण दिसला. गुर्जरांनी त्याला हटकले व सांगीतले की मला तुझे चित्र काढायचे आहे, तेव्हां माझ्या स्टूडीओवर ये. तुला त्याबद्दल मी पैसेही देईन. दुसऱ्या दिवशी ते त्या तरुणाची वाट पाहत थांबले. एवढ्यात एक गुनगुळीत दाढी केलेला, टापटीप कपडे घातलेला, केस चापून बसवलेला एक तरूण जिना चढून वर आला व म्हणाला , आपण काल सांगितल्याप्रमाणे मी आलो आहे. माझे चित्र काढाल ना ? गुर्जरांनी कपाळावर हात मारला. जो अस्ताव्यस्त कपड्यातला गांजलेला तरुण त्यांनी पाहीला होता, नेमका तोच आज या माणसातून हरवलेला होता. काहीही न बोलता गुर्जरांनी कांही पैसे त्याच्या हातावर ठेवले व त्याची रवानगी केली. त्यांना हवं होतं ते सौंदर्य त्याच्यातून हरवलं होतं! ते नेहमी म्हणत, 'सत्यम शिवम सुंदरम ' असे कलेचे स्वरूप असावे. मी सौंदर्याचा पूजक आहे. पण चित्र विषयासाठी स्त्री-सौंदर्य इतका मर्यादीत स्वरूपात मी तो शब्द वापरीत नाही. कार्यव्यग्र धीवरकन्ये इतकीच  सुरकुत्या पडलेली ९२ वर्षांची वृद्धा देखील मला चित्रांसाठी सुंदर वाटते.  अश्या या गुर्जरांना चित्रकार रघुवीर मुळगांवकर यांच्याविषयी अतीव आदर होता. त्यांच्या कामाचा दर्जा आणि तत्परता याबद्दल ते नेहमीच सांगत. अशीच एक मुळगावकरांची आठवण त्यांनी सांगीतली होती. एकदा परगावाहून दोन गृहस्थ आले. त्यांना एका देवाचे चित्र दोन दिवसात करून हवे होते. गुर्जरांकडे इतर कामे असल्याने, शिवाय इतक्या कमी अवधीत ते काम त्यांच्याकडून होऊ शकत नसल्याने त्यांनी त्या गृहस्तांना सांगीतले की केवळ मुळगावकरच हे काम करू शकतील. आणि त्यांना गुर्जरांनी मुळगावकरांकडे पाठवून दिले. मुळगांवकर त्यावेळी एका कॅलेंडरच्या चित्रावर काम करीत होते. गुर्जरांकडून हे लोक आल्याचे समजताच त्यांनी कश्या प्रकारचे चित्र हवे ते विचारून घेतले. पण परवा दिवशी संध्याकाळी आम्ही चाललो आहोत, तरी परवा सकाळपर्यंत सदर चित्र देण्याची त्यांनी विनंती केली. मुळगावकरांनी त्याप्रमाणे त्यांना यायला सांगीतले. जेव्हां त्यादिवशी हे लोक चित्र आणण्यासाठी त्यांच्याकडे गेले, तेव्हां पाहतात तो काय, मुळगांवकर त्या दिवशीचेच चित्र पूर्ण करीत बसले होते. या लोकांना वाटले की बहुदा आपल्या चित्राला मुळगावकरांनी हातच लावला नाही. पण या दोघांना पहाताच मुळगांवकर आत गेले व संपूर्ण पॅक केलेले चित्र घेऊन बाहेर आले. व त्यांना सांगीतले आता घरी जाऊनच हे उघडा. जेव्हां त्यांनी चित्र उघडले तेव्हां अत्यंत सुंदर रित्या केलेले ते चित्र hote केवळ मुळगावकरांनी एका दिवसात केलेले. कमी वेळात पण कामाचा दर्जा राखून काम करणारा दैवी कलावन्त म्हणून ते मुळगावकरांकडे पहात.


गुर्जरांना वास्तववादी कलेचा अभीमान होता, तितकाच त्यांना मॉडर्न आर्ट विषयी तिटकारा होता. प्रिन्सिपॉल सॉलोमन आर्ट स्कूल मधून गेल्यानंतर आलेल्या जेरार्ड साहेबाने मॉडर्न आर्टचे बीज रोवले. आणि पुढे विद्यार्थ्यांमध्ये त्याचा प्रसार झाला. वस्तुनीष्ठ व्यक्तीचित्रण हा विषय दुर्लक्षिला जाऊ लागला. मॉडर्न तंत्रातील रंग-शास्त्र यापुढे वास्तववादी चित्रे गौण समजू जाऊ लागली. आणि यामुळे वस्तुनिष्ठ चित्रकलेची शिखरे मानले गेलेले सर्वश्री माळी, हळदणकर, आचरेकर आदी कलाकार हरवत चालले. आणि हे सर्व पाहून गुर्जरांनी आता केवळ तोंडी बोलण्याचे काम नसून या प्रकाराला वाचा फोडली पाहीजे म्हणून त्यांनी कांही काळ ब्रश बाजूला सारून लेखणी उचलली. आणि या आधुनीक कलेवर त्यांनी आक्षेप घेणारे लेख लिहीण्यास त्यांनी आरंभ केला. यामध्ये चित्र-शिल्पकलेची उपेक्षा, चित्रकलेतील अराजक, कलशिक्षणाचा खेळ खंडोबा अश्या विविध विषयावर गुर्जरांनी लोकसत्ता, तरुण भारत, गावकरी, केसरी, स्त्री, मनोहर अश्या वृत्तपत्रे व नियतकालिकातून अभ्यासपूर्ण लेख लिहून या गोष्टींचा समाचार घेतला. व यातूनच त्यांनी कला शिक्षणात कांही सुधारणाही घडवून आणल्या. कित्येक वेळा अधिकारी वर्गाचा रोषही पत्करला.

एकदा पुण्याला लोकप्रिय साहित्यीक ना.सी.फडके यांच्या दौलत बंगल्यावर त्यांना कांही कामानिमित्त गुर्जर भेटण्यास गेले असता फडके बाहेर आले व म्हणाले, गुर्जर तुम्ही आज माझ्याकडे आलात. आनंद झाला. पण आता मला नीटसे ऐकू येत नाही. तुम्ही मोठ्या अक्षरांत लिहीलेले संभाषण चालू ठेवा. इतक्या उशीरा का होईना, आपली ओळख होते आहे हे भाग्याचे आहे. मात्र तुम्ही या वर्षीच्या 'अंजली' च्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी तुमच्या गाजलेल्या चित्राचा फोटो व तुमचा एक खास लेख मला हवाय. गुर्जरांना हे थोडे अकल्पीय वाटले. चित्रकलेच्या अंगाने जाणारे त्यांचे लिखाण फडके यासारख्या सिद्धहस्त लेखकाने वाचावे, व आठवण ठेवून आपला लेख मागावा हे त्यांना बहुमानाचे वाटले. व 'अंजली'च्या १९७३ च्या दिवाळी अंकात गुर्जरांनी 'माझे जीवनचरीत्र ' हा प्रदीर्घ लेख लिहीला. आणि या लेखामुळे गुर्जरांच्या जीवनातील अनेक आठवणी, प्रसंगांना उजाळा मिळाला. रसिकांना त्यांच्या कला जीवनाचा साक्षात्कार झाला. आणि पुढील पिढयांना तो प्रेरणादायक ठरला.

त्याकाळात स्त्री, किर्लोस्कर, मनोहर या किर्लोस्कर बंधूंच्या मासिकासाठी मुखपृष्ठे काढणारे चित्रकार म्हणून बहुदा लोक त्यांना ओळखीत असत. त्याविषयीही आपल्या त्या लेखांत गुर्जरांनी लिहीले आहे. १९५३ साली त्यांचे एक तैलचित्र प्रदर्शनात येण्याआधीच त्याची नक्कल 'किर्लोस्कर' च्या मुखपृष्ठावर त्यांना दिसली. त्यामुळे संतापून गुर्जरांनी संपादकांना एक कडक पत्र लिहीले. ताबडतोब किर्लोस्करांकडून त्याचे उत्तरही आले, पण खुद्द शं. वा. किर्लोस्कर व मुकुंदराव दोघेही त्यांच्या स्टुडीओमध्ये हजर झाले. शं.वा.
म्हणाले, तुम्ही अभिजात चित्रकार आमची चित्रे काढणे मनावर घेत नाही. म्हणून ही वेळ आमच्यावर आली. आता दर महीन्याला चित्र पाठवीत चला. आणि एक चित्र बरोबर घेतलें सुद्धा. आणि त्यानंतर गुर्जर किर्लोस्करांचे नाते आजन्म टिकले. किर्लोस्कर -स्त्री या मासिकांच्या मुखपृष्ठावर नंतर गुर्जरांची चित्रेच दिसू लागली. गुर्जरांच्या कामातील वक्तशीरपणा हेही त्यामागील एक प्रमूख कारण होते. किर्लोस्कर वरील चित्रांनी गुर्जरांचें नांव घरोघरी पोचले. जी प्रसिद्धी प्रदर्शनातून त्यांना मिळाली होती त्यापेक्षां कितीतरी पटीने त्यांना किर्लोस्कर मुळे मिळाली. किर्लोस्कर , स्त्री मासिकांच्या कव्हर चित्रामुळे बहुजन समाजापर्यंत चित्रकार म्हणून त्यांचा लौकीक पोचला.


चित्रकार दत्ता पाडेकर त्यांच्याशी नेहमी संपर्क ठेवून असत. त्यांच्या स्टुडीओत गेल्यावर त्यांनी आपल्या लिखाणाची असंख्य कात्रणे ठेवलेले ऑल्बम ते त्यांना दाखवीत. एकदा पाडेकरांच्या प्रदर्शनाला ते गेले ते स्वतः त्यांच्यावर केलेली एक कविता घेऊन. तेथे त्यांनी त्या कवितेचे वाचनही केले. त्यांच्या स्टुडीओत जाण्यासाठी एक लाकडी जीना होता. एकदा त्यावरून ते खाली पडले आणि त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला. त्यातही त्यांचे काम सुरु असे. पाडेकरांना ते म्हणाले, बरे झाले डावा हात मोडला ते. नाहीतर मी काम कसे करू शकलो असतो! असाच एकदा त्यांच्या हातांना कंप जाणवू लागला. पेन्सील फिरवताना कागदावर त्याची जाणीव दिसू लागली. पण गुर्जरांनी त्या कंप पावणाऱ्या हाताचा वापरही एका तंत्राप्रमाणे केला व त्या कंपायमान रेषेचा वापर त्यांनी चित्र शैली बनवण्यासाठी केला.
 

गुर्जर एक समाधानी अन समृद्ध जीवन जगले. आपल्या "माझे जीवन चरीत्र" मध्ये त्यांनी म्हटले आहे ' माझी चित्र निर्मीती ही सर्वसाधारण माणसासाठी आहे. चित्राचं नांव न वाचता चित्र पाहील्यावर त्याचा आशय व हेतू समजला पाहीजे. हेच खरं कौश्यल्य आहे, यातच खरी कला आहे. कलावंतांन नेहमी जागरूक रहायला हवं. लोकांना आवडतात म्हणून प्रणयाची, भावना चेतवणारी, उन्मादक चित्रे काढण्याचा मोह टाळावा. कारण लेखकाप्रमाणे चित्रकारही समाजाचा शिक्षक असतो. समाजाच्या अभिरुचीला योग्य वळण लावण्याची जबाबदारी चित्रकारावरही येते." आपल्या या प्रदीर्घ लेखाचा शेवट करतांना गुर्जर थोडे भावनाशील होऊन म्हणतात, ' असे काहीसे कष्टाचे, यशस्वी, कुणीतरी झाकाळू पाहीलेले, कधी कुठे खुडलेले पण पुन्हां फुलारलेले, उभारलेले, उत्साहाचे, कधी गर्द दुःखाचे, कधी मंद, उज्वल, तेजस्वी, प्रखर प्रकाशाचे अश्या विविध रंगानी समृद्ध, पण तरीही अपूर्णच राहीलेले असे आहे हे 'माझे जीवन चरीत्र! असे हे व्ही.एस.गुर्जर १२ जुलै १९८२ साली आपणा सर्वांना सोडून निघून गेले. आज त्यांची चित्रे कोणाकडे आहेत माहीत नाही. बिर्ला समूहाकडे त्यांच्या संग्रहामध्ये कांही चित्रे आहेत. दुसरी त्यांनी जे.जे.उपयोजीत कला संस्थेमध्ये केलेली कांही प्रात्यक्षीके आपणाला पहायला मिळतील. १९६८ साली संस्थेचे अधीष्ठाता दादासाहेब आडारकर जेव्हां निवृत्त झाले तेव्हां गुर्जरांनी त्यांचे ऑईलमध्ये केलेले पोर्ट्रेट पाहील्यावर जाणवते ती त्यांच्या कलाविष्काराची महती. आडारकरांचे करारी पण ममताळू असे व्यक्तीमत्व आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांनी आपल्या कुंचल्याद्वारे अतीशय सुंदर रेखाटले आहेत. त्यांच्या कोटाच्या कापडाचा पोत इतका सुरेख जमला आहे की त्या कापडाची जाडीही आपणाला जाणवते.त्यावरील खडबडीतपणा पहाताच कपड्याचा दर्जा समजतो. इतके सुंदर आणि भावपूर्ण असलेल्या त्या चित्राला पाहीले की पाहताक्षणीच आपण त्याला दाद देऊन जातो.


आजच्या पिढीतील कित्येकांना व्ही.एस.गुर्जर हे नांव माहीत आहे की नाही  हे ठाऊक नाही. अश्या ऊत्तुंग चित्रकारांच्या चित्रांचे जतन करणे, पुढील पिढयांना त्यांचा आदर्श दाखवून देणे, हे वास्तवीक राज्य सरकारचे आद्य कर्तव्य असते. पण जिथे चित्र संस्कृतीच अस्तीत्वात नाही, तेथे बोलून काय उपयोग?   आजवर या राज्यात अनेक थोर चित्रकार -शिल्पकार होऊन गेले. अजूनही आहेत. डोंगराइतके त्यांचे या क्षेत्रांत काम आणि योगदान आहे. पण चित्रपट- दूरदर्शन मालीकांच्या समारंभाला आवर्जून हजेरी लावणाऱ्या, त्यांना सदनीकेपासून गोष्टी पुरवणाऱ्या आमच्या नेत्यांनी दृक कलेला नेहमीच सावत्र वागणूक दिली आहे.  एकीकडे राज्य चित्रपट महोत्सव, नाट्य महोत्सव मोठ्या धामधुमीत साजरे होत असतात तेथे आपले महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन उरकून घेतले जाते. त्याला राज्यस्तरीय दर्जा मिळालेला दिसत नाही. जेव्हां पद्म पुरस्कार दिले जातात, त्यात अभावानेच दृक कलाकार असतो. एरवी तेथेही चलती असते ती परफॉरमींग आर्ट वाल्यांचीच. असे अनेक चित्रकार, शिल्पकार अनेक वर्षे कला संपदा करून काळाच्या पडद्याआड गेले, त्यांची कोणीच गणती ठेवली नाही. गुर्जर सरही त्यापैकीच एक!  आपण मात्र त्यांचे स्मरण ठेवून त्यांच्या कलेप्रती त्यांना मानवंदना देऊ शकतो.

-प्रा. मं.गो. राजाध्यक्ष


( संदर्भ : बिंदुमाधव रघुनाथ पारखी, लेखातील गुर्जरांची छ्यायाचित्रे : दत्तात्रय पाडेकर)





Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…