अभिजात कला आणि साहित्याचा सुरेख संगम : चित्रकार द.ग.गोडसे



चित्रकार गोडसे यांचे नांव घेताच सर्वप्रथम नजरेसमोर येतात ती त्यांची प्रमाणबद्ध आणि शरीर सौष्ठव दाखवणारी रेखाटने, नाटकांसाठी त्यांनी केलेली त्यांची नेपथ्ये, अन त्याचसोबत त्यांनी केलेले सौंदर्य शास्त्राची मीमांसा करणारे त्यांचे विविधांगी लेखन. या विविध गोष्टींचे एकत्रीकरण गोडशांमध्ये असल्यामुळे चित्रकला क्षेत्रात तसेच नाट्य व साहित्याच्या वर्तुळात ते सुपरीचीत व आवडते होते. ' कोणत्याही कलाकृतीची निर्मीती होत असतांना ती एका विशीष्ट बिंदूपासून वेग घेत असते' हे त्यांचे आवडते सूत्र होते. झाडांची पाने एका ठरावीक आकाराचीच का होतात अथवा अंड्याचे आकार एकसारखे का ? याचा ते  मोठ्या चिकिस्तक पद्धतीने शोध घेत असत. व त्यावरील आपली अभ्यासू मते ठामपणे मांडत असत.

दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म खानदेशातील वदोडे येथे ३ जुलै १९१४ साली त्यांच्या आजोळी झाला.  गोडश्यांच्या जन्म वेळेची कथाही तितकीच वेधक म्हटली पाहीजे. आईचे दिवस भरलेले. बाळंतपणासाठी माहेरी जायचे ते पूर्णा नदी ओलांडून. तिला जातांना उलट्या बाजेवर बसवून भोई ती ओढत नदी पार करीत होते. भर आषाढाची वेळ. नदीचा प्रवाह फुगला, आणि त्या बेफाम झालेल्या प्रवाहाने बाजेला खेचून घेतले. भोयांच्या पकडीतून निसटलेली बाज धारेला लागली. आई भयभीत झाली. तिला उतरून घ्यायला दुसऱ्या तीरावर आलेल्या आप्तजनांत एकच कल्लोळ उडाला. पण दैवाने खैर केली आणि बाज एका ठिकाणी अडवली गेली. प्रसूती सत्वर झाली. पण गोडसेंना म्हणे पुढे कैक वेळा रौद्र प्रवाहात वहात जात असल्याची स्वप्ने पडत. डॉ. गं. बा.फडके हे त्यांचे मामा. या मामांनीच लहानग्या दत्तात्रयाला चित्रकलेचा पहीला धडा शिकविला. थोर साहीत्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यांचे पणजोबा. त्यांच्याकडून गोडसेंना नाट्यकला, गायन व लेखन याचा वारसा मिळाला.  अर्थात चित्रकला त्यांच्या जीवनांत बहरत होती. पण बालपणी त्यांनी अंगिकारलेले चित्रकलेचे व्रत मात्र खडतर होते. पहीले चित्रांचे पुस्तक त्यांच्या हाती आले ते होते 'इसापनीती.' त्यातील प्राण्यांची चित्रे तसेच घरातील भव्य गणेश मूर्ती आणि त्याचे हत्तीशी असलेले साधर्म्य त्यांना बरेच कांही शिकवून गेले. मग सुरु झाली ती त्यांची चित्रकलेची आराधना. दिसेल तो कागद, भिंत, अश्या विविध माध्यमावर त्याच्या प्रतिमा उमटू लागल्या. हे भिकेला लावणारे पेंटरकीचे धंदे मानणाऱ्या त्यांच्या वडीलांना मात्र हे चाळे अजीबात चालत नसत. कारण त्याकाळातील चित्रकार म्हणजे शेवटी पडदे रंगविणारा पेंटर अशीच त्याची सर्वार्थाने प्रतीमा असे. त्यामुळे गोडसे यांनी आपला 'स्टुडिओ' अडगळीच्या खोलीत हलविला. पण त्या गुप्त स्थानाचा शोध वडीलधाऱ्या मंडळींना शेवटी लागलाच! 'हा कार्टा शेवटी नाटकमंडळींचे पडदेच रंगविणार हे भाकीत सर्वत्र गर्जु लागले. पण नियती त्याच वेळी गोडसेंना त्यांच्या या तपश्चर्येचे योगदान देण्याची तयारी करीत होती.

गोडसेचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरच्या मॉरीस कॉलेज व पुढे मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले. कॉलेजातच रहाणे व शेजारीच कला तपस्वी सा. ल. हळदणकरासारख्या नामांकीत कला शिक्षकाचे घर. यामुळे गोडश्यांचा कला अभ्यास उच्च पातळीवर पोचला. १९३८ मध्ये बी.ए. चे शिक्षण पूर्ण करत असतानाच हळदणकरांकडे त्यांचे चित्रकलेचे शिक्षण सुरूच होते. गोडश्यांच्या चित्रकलेची लालसा पाहून व त्याच्या बोटातून उतरलेली कला पाहून हळदणकर म्हणाले, 'गोडश्यांसारखा शिष्य मला कधीच मिळाला नाही'. व वडीलांच्या आदेशानुसार चित्रकलेचा शिक्षणात व्यत्यय येऊ न देता त्यांनी आपली बी.ए. ची पदवी पदरात पाडून घेतली.  आणि याच सुमारास गोडश्यांची विविध वृत्त व अन्य नियतकालिकांमधून राजकीय व्यंगचित्रे प्रसीद्ध होऊ लागली. पुढ़े चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्यासाठी गोडसे इंग्लंड येथे स्लेड स्कुलचा अभ्यासक्रम करण्यासाठी गेले. दरम्यान दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहू कागल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून  त्यांना पुन्हां भारतात परतावे लागले. परत येताच कांही दिवस जाहीरात कंपन्यांमध्ये काम करून त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या कला विभागात काम करण्यास सुरुवात केली. तेथे कला दिग्दर्शक होते वाॅल्टर  लॅंगहॅमर. गोडसेंच्या कामाची बैठक,त्यांचा आविष्कार पाहून लॅंगहॅमर एकदम प्रभावीत झाले.  केवळ एक स्टाफ न मानता त्यांनी गोडसेंवर पुत्रवत माया केली. व स्वतः त्याना आपल्या घरी बोलावून त्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.

लॅंगहॅमर यांच्या कामाचा आवाका इतका प्रचंड होता की, त्यांच्या साधनेचे विराट स्वरूप पाहून गोडसे थक्क झाले. त्यांचे व्यक्तिमत्वच प्रभावी होते. साडेपांच फुटाची दांडगी देहयष्टी, थोडेसे स्थूल, आणि पोट सुटलेले, धारदार नाक, डोक्यावर भरगच्च पिंगट केस. पेहरावही अगदी साधा असे. पांढरा हाफ शर्ट, पांढरी किंवा खाकी हाफप्यांट, कमरेच्या पट्यात साखळीला अडकवलेले व खिशात ठेवलेले घड्याळ. अशी सारी एकंदरीत राहणी होती. त्यांचे बोलणे नरमाईचे, खासगी असे कधीच नसे. तर मोठ्याने बोलण्याचे वळणच त्यांच्या जिभेला होते. कोणतीही गोष्ट ते सांगत नसत, तर बजावत असत. त्यांच्या विनंतीलाही हुकमी अवसान असे. पण कामात एवढे जबरदस्त होते, की त्यांना कधी स्फूर्तीची गरज नसे. लहरी तर ते अजीबात नव्हते. व्यक्तिचित्रण करतांना  ते आपल्या घाऱ्या डोळ्याच्या तीक्ष्ण नजरेने आपले माॅडेल टिपायचे. व  ताबडतोब आपल्या सिद्ध हस्ताने अलगद फलकावरील कॅनव्हासवर उतरवायचे, तंत्र तर त्यांच्या अंगी ठासून भरले होते. त्यांनी स्वतःमध्ये जशी शिस्त ठेवली होती, त्याचप्रमाणे इतरांकडूनही त्यांना ती अपेक्षीत होती. कामाच्या दर्जाबद्दल त्यांनी कधीच तडजोड केली नाही. गलथानपणाची त्यांना चीड होती. कमअस्सल दर्जाचे काम ते फाडून टाकत. असाच एक प्रसंग गोडसे यांच्या वाट्यालाही आला. त्यांच्या घरच्या स्टुडीओत त्यांनी दिलेले एक काम करताना वेळ मारून नेण्याच्या दृष्टीने गोडसेंनी ते कसेतरी संपवीले होते. आणि ते काम पहाताच ताडकन त्यांनी आपली पाचही बोटे गोडसेंच्या गालावर उमटवली. नंतर ते म्हणाले, ' निदान  तुझ्याकडून तरी असला गलथानपणा होणार नाही अशी माझी खात्री होती.' चपराकीपेक्षाही या शब्दांचा मार त्यावेळी गोडसेंना अधीक जाणवला.

स्लेड स्कुल मध्ये अर्धवट राहीलेले गोडसेचे कला शिक्षण लॅंगहॅमरनी पुरे करून दिले. तब्बल सहा वर्षे गोडसेंनी त्यांच्या शागीर्दीत काढली. केवळ मेहनत, परीश्रम, अभ्यास या त्रिसूत्रीच्या नांवाचा बेलभंडारा त्यांनी उचलला होता. लॅंगहॅमर यांनी भारतीय वातावरण कसून अभ्यासले होते. अश्या या ताकदीच्या माणसाकडे गोडसेंना ऐन उमेदीच्या काळात शिकण्याचे भाग्य लाभले. लॅंगहॅमरकडे  शिकतानाचा अनुभव गोडसेंच्या तोंडून ऐकताना गुरु -शिष्य परंपरा काय असते याची एक तीव्र जाणीव आपल्याला होत असे. एक प्लॅस्टरचे  हेड समोर ठेवून त्याचे गोडसेंना ते प्रमाणबद्ध रेखाटन करायला लावीत. नंतर तेच हेड उलटे ठेवून त्याचे पुन्हा नवीन चित्र काढायला लावत. नंतर दोन्ही चित्रे घेऊन त्यांचा तुलनात्मक अभ्यास लॅंगहॅमर गोडसेंना करायला लावीत असत. अश्या पद्धतीने गोडसे यांनी आपली कला जोपासली. वाढवली. तिला एक कलात्मकतेचे कोंदण दिले! यामागे होती ती त्यांच्या गुरूची, लॅंगहॅमर यांची प्रेरणा! याच लॅंगहॅमरनी पुढे भारतीय चित्रकलेला एक वेगळीच दिशा देवून आपले अनेक शिष्य तयार केले. त्यांच्या घरच्या स्टुडिओत या शिष्यांचे शिक्षण सुरु होते. त्यामध्ये हुसेन, बाकरे, जहांगीर साबावाला, असे अनेक होते, ज्यांनी पुढे प्रोग्रेसीव्ह ग्रुप तयार केला. हे लॅंगहॅमर जे.जे.मधेही शिकविण्यास येत. येथेच त्यांनी प्रफुल्ला डहाणूकर विद्यार्थिनी असतांना तिचे व्यक्तिचित्रण करून प्रात्यक्षीक दिले होते. अद्यापही जे.जे.च्या भिंतीवर ते पोर्ट्रेट विराजमान आहे !

टाइम्सच्या कारकीर्दीत इलस्ट्रेटेड विकली मध्ये गोडसेंची चित्रे नित्य  नेमाने येऊ लागली. त्या काळात आतील संदर्भ चित्रेही विकलीच्या आकर्षणाचे एक प्रमुख अंग होते. गोडसेंच्या कामाचा वेगही अफाट होता. अनेक माध्यमातून ते काम करीत असत. पेन्सील,चारकोल, जलरंग, तैलरंग, पोस्टर रंग अशी विविध माध्यमं त्यांच्या आधीन होत असत. गोडसेंनी अॅनाटमीचा अभ्यास अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने केला असल्यामुळे त्यांच्या चित्रातील शरीर सौष्ठव प्रकर्षाने जाणवीत असे. चित्रातील व्यक्तीच्या हातापायांच्या बोटांची पेर न पेर त्यातील बारकाव्यांसहित ते रेखाटत असत. एखादा जलरंगातील देखावा असो, तैलरंगातील व्यक्तिचित्रण असो वा काळ्या शाईने केलेले बोधचित्र असो, गोडसेंचा कुंचला त्यावर आत्मीयतेने चालत असे. टाइम्स प्रकाशनांतील त्यांची चित्रे व त्यातील वास्तव पाहून त्या काळी सरकारने त्यांना खास आमंत्रीत करून युद्धावरील चित्रे काढण्यासाठी नियुक्त केले होते. ही चित्रे पाहील्यावर मुंबईमध्ये राहून त्यांनी हे युद्ध प्रसंग रेखाटले यावर कोणाचाच विश्वास बसू शकत नव्हता. जणू कांही गोडसे प्रत्यक्ष युद्धभूमीवर वावरून तेथील संदर्भ घेत असावेत अशीच जाणीव त्या चित्रांनी होत होती. एवढी ती चित्रे जिवंत झाली होती. आणि त्यांची राजकीय व्यंगचित्रेही या काळात गाजू लागली. ती ‘शमा’ या टोपणनावाने. यातून गोडसेनी जशी हिटलरवर टीका करणारी बोचक व्यंगचित्रे काढली तशीच साहीत्यिक मुल्ये व त्यातील व्यंग काढणारी साहीत्यविषयक व्यंगचित्रेही काढली.  टाइम्स सोडल्यानंतर गोडसेंनी कांही काळ प्रेस सिंडिकेट व एव्हरेस्ट या जाहीरात संस्थांमध्ये काम केले. या काळात त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे, आतील बोधचित्रे, तसेच दिवाळी अंकांची सजावट अशी कामे केली. मुखपृष्ठावर उन्मादक अश्या लक्ष वेधून घेणाऱ्या लावण्यवतींची चित्रे असण्याच्या त्या काळात गोडसेंनी मुखपृष्ठाला एक वेगळा दर्जा देणारी अशी चित्रे काढून एक नवीन पायंडा पाडला. स्वतःच्या अश्या खास ओळख देणाऱ्या त्यांच्या शैलीत अनेक पुस्तके, मासीके, वृत्तपत्रे नटू लागली. पण हळूहळू कामातील तोच तो पणा त्यांना नकोसा वाटू लागला. जोडीला नाटक, संगीत, साहीत्य हे गुण देखील त्यांना खुणावीत होते. व पुढे त्याच दिशेने त्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवली

गोडसे यांचा साहीत्याशी संबंध आला तो व्यंगचित्रकार म्हणून. 'संजीवनी' व ' ज्योत्स्ना' या मासिकांमधून प्रथम ते व्यंगचित्रकार म्हणून वावरले व नंतर त्यात लेखन करू लागले. १९४३ मध्ये बडोद्यावरून ' अभिरुची मासीक निघू लागले   आणि त्यातही गोडसे सामील झाले ते प्रथम व्यंगचित्रकार म्हणून आणि त्या मासिकाची सजावट करण्यामुळे साहित्याइतकीच त्यांची चित्रे गाजू लागली. आणि मग ते अभिरुची साठी लिहूही लागले. पण त्यांनी आपले लेखन, साहीत्य याविषयी कोणाशीही चर्चा केली नाही, अथवा बडेजाव मिरवला नाही. पण आपण लिहितो त्याचा लेखाजोखाही कधी ठेवला नाही. गोडश्यांचे पहीले पुस्तक प्रकाशीत झाले ते 'पोत' कला चिकित्सकांच्या छोट्याश्या जगात खळबळ माजवणारे. त्यापाठोपाठ कलेतील सौंदर्यतत्त्वांचा शोध घेणारी आणखी त्यांची पुस्तके आली. ती होती 'शक्ती सौष्ठव', ' गतिमानी', 'लोकधाटी', 'मातावळ' आणि 'ऊर्जायन'. याशिवाय इतिहास व लोककथा यावर याच्या संशोधनातून केलेल्या कथानकावर आधारित असे  'काळगंगेच्या काठी' हे नाटक त्यांनी लिहीले. इतिहास हा गोडसेंच्या संशोधनाचा आवडीचा विषय. त्यातून पुढे त्यांचा 'मस्तानी' या सौन्दार्यवतीच्या नांवावर तिला डागाळणाऱ्या लिखाणाचा परामर्ष घेऊन त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले व तिच्या व्यक्तित्वाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. बुंदेलखंडाच्या राजा छत्रसालाने पहील्या बाजीरावाला त्याने बुंदेलखंडाच्या रक्षणासाठी जी धांव घेतली त्याची कृतज्ञता म्हणून मस्तानी भेट म्हणून दिली. तिला मुसलमान मानून आणि तिच्या नृत्यकौशल्याचा विपर्यास करून पुण्यातील ब्राम्हणांनी तिचा उपमर्द केला. पण गोडश्यानी या इतिहासाचे उत्तखनन करून तिचे खानदानी, सुसंस्कृत व्यक्तिमत्व जगासमोर मांडले. एवढे ते मस्तानीशी एकरूप झाले होते. त्यावर त्यांनी मस्तानी हे पुस्तकही लिहीले. यातील प्रत्येक पुस्तकात दिसते ती गोडश्यांची प्रगल्भ बुद्धीमत्ता, त्यांच्या व्यासंगी अभ्यास आणि इतिहासाच्या संशोधनाचे साध्य झालेले इप्सित. गोडश्यानी कवी, कलावंत व काव्यावर मोठ्या रसिकतेने भरपूर लिहीले आहे. पण तेही केवळ त्यांची स्तुती न करता चिकित्सक रित्या त्यांची चिरफाड करून. यत् त्यांचे गुरू लॅंगहॅमरही सुटले नाहीत. आपल्या 'नांगी असलेले फुलपाखरू' या लेखसंग्रहात त्यांनी असे लेख समाविष्ट केले आहेत.

नेपथ्याबाबत चर्चा केल्याशिवाय गोडसे हे पर्व पूर्ण होऊच शकत नाही. नेपथ्यात गोडसे हे १९४३ सालापासून कार्यरत होते. शंभराहून अधिक नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले आहे. नाटकाच्या आवडीमुळे त्यांचे साहीत्य संघाशी जवळचे संबंध होते.  मुंबई मराठी साहीत्य संघाच्या नाटकापासून ते अलीकडील बॅरीस्टर, दिपस्तंभ नाटकातील त्यांच्या नेपथ्यातील यशाचा वाटा नेहमीच मानला गेला. होनाजी बाळा, भाऊबंदकी, शोभेचा पंखा या नाटकांची नेपथ्ये त्यांनी केली.  प्रत्येक नाटक हे त्यांनी आपल्या कल्पनेला आणि कारागिरीला आव्हान मानले. विजया मेहता यांच्या मुद्रा राक्षस, शाकुंतल या नाटकांचे नेपथ्य तसेच वेशभूषा त्यांनी केल्या.  संस्कृत नाटकांसाठी त्यांनी भारतमुनींनी आखून दिलेला रंगमंच उभा केला. जर्मनीत जेव्हां 'शाकुंतल' 'मुद्राराक्षस' यांचे प्रयोग झाले, तेव्हां गोडसेही या नाटकाच्या संचासोबत जर्मनीला गेले. तेथे गोडश्यांच्या नेपथ्याची खूप वाहवा झाली. धी गोवा हिंदू असोशीएशनच्या नाटकांचीही नेपथ्यं व वेशभूषेची बाजू ते सांभाळत असत. येथून पुढे मात्र गोडसेंनी व्यावसायिक कामांमधून आपले लक्ष कमी केले व स्वतःला त्यांनी शैक्षणीक कार्याला वाहून घेतले.

१९६४ मध्ये बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठामध्ये उपयोजीत कला विभागाचे प्रमुख म्हणून गोडसे काम पाहू लागले. पुढे ते तेथील प्राचार्य देखील झाले.मात्र तेथून निवृत्त होऊन आल्यावर गोडसेंनी केवळ लेखन व संशोधन हेच आपले क्षेत्र बनवले. महाराष्ट्र शासनाने उत्तम साहीत्य निर्मिती बद्दलचे पारितोषिक त्यांना दिले. न.चिं. केळकर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. १९८९ मध्ये संगीत नाटक अकादमीने गोडसेंना पुरस्कार देऊन त्यांच्या नेपथ्याचा खास गौरव केला होता. गोडसे थोडेसे अबोल आणि गंभीर वाटत. एकूण माणूसघाणा म्हणावेत असे. पण एकदा कां त्यांचे सूर एखाद्याशी जुळले की मग मात्र पहायला नको. त्यांचे खास मित्र होते ते केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाचे सोन्याबापू उर्फ बाळकृष्ण गणेश ढवळे. प्रथम चित्रकार म्हणून व्यवहारापुरती ओळख झालेले सोन्याबापू त्यातील व्यावहारिक परकेपणा जाऊन मित्र व्हायला बरेच दिवस जावे लागले. वास्तविक दोघांचे स्वभाव, आवडी निवडी, वाचन विचार सर्व काही भिन्न. पण दोघांत एक गोष्ट मात्र जिव्हाळ्याची होती, ती म्हणजे मराठी पुस्तकांचे उत्तम मुद्रण! मुद्रक या दृष्टीने सोन्याबापुना सारी पुस्तके सारखीच आव्हानात्मक वाटत. मग साधी अंकलीपी असो, मनाचे श्लोक असोत वा विवेकानंदांचे ग्रंथ असोत. तेथे मुद्रणाच्या आप पर भाव नसे. केवळ आदर्शवत छपाई हेच त्यांचे उदिष्ट होते. मात्र एकदा का पुस्तक छापून प्रकाशीत झाले, की मग मात्र सोन्याबापू त्याचा साधा उल्लेखही कोणाकडे करीत नसत. आणि कोणतेही पुस्तक मुद्रणाला घेण्यापूर्वी ते गोडसेंना सोबत घेऊन चर्चा करण्यासाठी बसत. ह्या बैठकी किती वेळ चालत याला नेम नसे. केशव भिकाजी ढवळे ही संस्था मूळ पुस्तक प्रकाशनाची. ते इतरांच्या मुद्रणालयातून छापून घेत. पण सोन्याबापुनी ढवळे प्रकाशनाचा कायापालट करून सर्व मुद्रण व्यवस्था एका छत्राखाली आणली.  डिझाईन स्टुडीओ, कंपोझिंग, ब्लॉक करण्याचा विभाग, फौंड्री, निरनिराळी मुद्रणयंत्रे असा सर्व आधुनीक साज चढवून केशव भिकाजी ढवळे ही संस्था संपूर्णपणे आधुनीक केली. आणि गोडसेही जणू या कुटुंबाचे एक सदस्य बनले.


याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रांतील मित्रवर्गात गोडसे रमून जात. त्यांच्या गप्पा रंगत असत. आणि सूर लागला की गोडश्यांची वाणी फुलून येत असे.  उठून उभे राहात व त्यांचे बोलणे सुरु होत असे. यामध्ये संगीतकर सुधीर फडके असत, तसे चित्रकार दलाल असत, हा,वि.मोटे असत, तसेच राजा बढे, रामदास भटकळ, पुरुषोत्तम चित्रे, पु.शी. रेगे, शामराव ओक इत्यादी नामवंतांसोबत त्यांच्या मैफीली रंगत. या त्यांच्या गप्पाना कोणत्याही विषयाचे वावडे नसे. पण ते विषय गमतीचे नसत तर इतीहास संशोधन, कला विचार, आणि बुद्धीमत्तेला स्पर्श करतील असे विवीध विषय. आणि सर्वात मजा म्हणजे चित्रपट सृष्टीमध्येही काही काळ गोडसेंनी काढला. पन्नास एक वर्षांपूर्वीच्या काळात गोडसे हे कथा-पटकथा लेखक, सहायक दिग्दर्शक, कला दिग्दर्शक अश्या भूमिकांमधून विश्राम बेडेकरांसोबत सहा एक महीने वावरले. बाजीराव-मस्तानी ह्या त्यांच्या आवडत्या विषयावर ते चित्रपट काढीत होते. बरेच काम करूनही हा चित्रपट निघाला नाही. पण मस्तानीचे संशोधन त्यांनी नेटाने पुढे चालविले.

गोडसे खूप मोठे कलावंत आहेत याची जाणीव आम्हांला झाली जेव्हां आम्हांला ते सर जे. जे. उपयोजीत कला संस्थेमध्ये ड्रॉईंग, इलस्ट्रेशन शिकविण्यात येत.  त्यांचे शिक्षकी योगदान कलाक्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र शिकवतानाही त्यांना शिस्त लागत असे. आम्हा विध्यार्थ्यांना ते शिकवायला येत असत, तेव्हां त्यांचे व्यक्तिमत्वच आम्हांला भारून टाकत असे. स्वच्छ अशी पांढरी प्यांट अन पंधरा हाफशर्ट असा त्यांचा पेहेराव असे. गौर वर्णाचे, डोक्यावर उलट फिरवलेले केस, चेहऱ्यावर खानदानी रुबाबदारपणा,  डोळ्यावर चष्मा व त्यातून दिसणारी त्यांची भेदक अशी नजर, वाटे की ते जणू समोरच्याचे अंतरंगच पहात आहेत. आणि आम्हांला त्यांच्याविषयी एक धाकयुक्त आदर वाटत असे. मात्र ते जेव्हां आमचे ड्रॉईंग सुधारायला बसत, तेंव्हां त्यांचे एकेक मुद्दे आम्हला आमच्या चुका दाखवीत असत. प्रात्यक्षिकाला ते जेव्हां बसत तेंव्हा त्यांची पेन्सिल अशी काहि फिरत असे की पहाता पहाता समोरील मॉडेल अलगद फलकावर येतं असे. शरीर सौष्ठव तर असे रेखाटत की अॅनाटमी शिकायला व्हिक्टर पेरार्डच्या अॅनाटमीच्या पुस्तकाचीही गरज वाटू नये. वर्गात त्यांचे सर्वच विद्यार्थ्यांच्या रेखाटनाकडे लक्ष असे. आणि ज्याचे स्केचिंग चांगले आहे, अश्या विद्यार्थ्यांना ते दर रवीवारी 'आर्टीस्ट'सेंटर' येथे ड्रॉईंगचा क्लास घेत असत तेथे त्याला अभ्यासासाठी बोलावत. आणि त्यासाठी कोणाकडूनही ते कधीच पैसे घेत नसत. मलाही त्यांच्या या खास क्लासला जाण्याचे भाग्य लाभले आहे. अश्या वेळी कित्येकदा ते आपल्या गुरुविषयी - लॅंगहॅमरविषयी,त्यांच्या कला तपस्येविषयी आणि त्यांच्या कामाच्या अावाक्याविषयी सांगत.


आपल्या आयुष्यात गोडसेनी  कधीही आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले नाही. अथवा मान सन्मान घेतला नाही. एकदा महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने त्यांचा राज्य कला प्रदर्शनात सत्कार करण्याचे ठरवीले. त्यासाठी त्यांना त्यांच्या घरी जाऊन निमंत्रीत करण्याचे काम कला संचालक बाबुराव सडवेलकर यांनी माझ्यावर सोपवीले. मी चेंबूर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना या गोष्टीला मान्यता देण्याची विनंती केली. पण नम्रपणे त्यांनी ती नाकारली. त्या काळात बाबुराव सडवेलकर व इतर कांही शिक्षक यांच्यामध्ये जोरदार लढाई सुरु होती. यामुळे गोडसेंना त्या आवारात येऊन आपण एक त्याचा भाग होणे पसंद नव्हते. मला त्यांनी विनंती केली की त्यांना केवळ सांगा की माझी तब्येत सध्या बरी नाही. त्यामुळे मी येऊ शकत नाही. पुढे त्यांनी आम्हां जे.जे.च्या शिक्षकांसाठी इलस्ट्रेशन विषयावर एक कार्यशाळा घेतली. अन त्यांच्या हाताखाली आम्हांला काम करायला मिळाले. त्यांना काम करतांना पाहायला मिळाले.  आमच्या एक सहकारी मीरा करंडे ( पूर्वाश्रमीच्या नाडकर्णी) गोडसेंच्या शिष्या होत्या. त्यांच्या हाताखाली चित्रकलेचे धडे त्यांनी गिरवले होते. गोडसेंना जवळून अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यांच्याकडून गोडसेंविषयी आम्हांला बऱ्याच गोष्टी कळत. त्या गोडसे कुटुंबियांपैकीच असल्याप्रमाणे त्यांचे नाते होते.

गोडसे हे विविधांगी व्यक्तीत्व होते. ते चित्रकार होतेच, शिवाय साहीत्यिक होते, समीक्षक होते, नाटककार होते, नेपथ्यकार होते, वादक होते. संगीताची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. तबला- मृदंगाचे जुजबी शिक्षण त्यांनी आधी घेतलेच होते. शास्त्रोक्त मृदंग शिकावा असे त्यांच्या मनाने घेतले. शेजारच्या ओवरीत एक उत्तम मृदंगीये रहातात हे कळल्यावर त्यांना भेटायचे त्यांनी ठरविले. ज्या शंकरराव अलकूटकर बुवांचा गंडा त्यांना बांधायचा होता, ते एक विक्षीप्त, तिरसट आणि  तऱ्हेवाईक  गृहस्थ होते. पण मृदंग वादनात फार थोर व्यक्ती होते. गेल्या गेल्याच त्यांनी विचारले, ' आतापर्यंत कुठं कांही वाजवलं आहे कां ? तबल्यावर कधी हात टाकला आहे का?' आणि गोडसेंसमोर मृदंग त्यांनी ठेवला.गोडसेंनी थाप देताच बुवा चमकले. आपल्या कानाला हात लावून ते  म्हणाले, अरे ही थाप तर माझ्या गुरूप्रमाणे आहे.  असा गादीदार तळवा माझ्या गुरूंचा होता.  आणि गोडसेचे शिक्षण सुरु झाले. व कोडकौतुकाने विद्या दिली.  पण पुढे गोडसेंना दिल्लीला जावे लागल्यामुळे त्यांचे हे संगीत शिक्षण अर्धवटच राहीले. पण आपली ही संगीत साधना गोडश्यानी कधीच उघड केली नाही.  अश्या या विविधांगी व्यक्तिमत्वाने व व्यासंगाने  नटलेल्या गोडसे यांनी आपल्या जीवनात स्वतःलाही शिस्त लावली होती. घरी कितीही उशीरा गेले तरी किमान पंधरा वीस स्केचीस केल्याशिवाय ते झोपत नसत. स्वभावाने ते प्रसीद्धी पराङ्मुख होते. त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले नाही किंवा कोणापुढे स्वतःला मिरवले नाही. कोणाशीही ते आपल्या चित्रांविषयी बोलत नसत. सर्वच मान सन्मानापासून, प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहीलेले गोडसे ५ जानेवारी १९९२  रोजी अचानक आपणा सर्वांना सोडून निघून गेले. पाठी आपली कलासंपदा ठेवून. असंख्य स्केचेस ठेवून!

मी जेव्हां जे.जे.उपयोजीत कला संस्थेचा अधीष्ठाता झालो, तेव्हां माझ्या सहकारी आणि गोडसेंच्या शिष्या  मीराताई करंडे यांचा मला फोन आला अन त्या म्हणाल्या, “ अरे, गोडसेंची बरीच पुस्तके आणि स्केचिस, कांही बोधचित्रे व लॅंडस्केप आहेत. त्यांच्या पत्नीने मला त्याबद्दल विचारले. गोडसेचे असलेले जे.जे.शी नाते पाहून मला ती सर्व चित्रे जे.जे.उपयोजीत संस्थेला द्यावीत असे वाटते. तर ती पहायला येशील का?”  मीराताईंचे बोलणे ऐकल्मीयावर मी आनंदाने उडालोच. मी माझ्या सहकाऱ्यांना घेऊन ताबडतोब त्यांच्या घरीं गेलो. तेव्हां त्यांच्या पत्नी सुशिलाबाई यांनी आमच्यासमोर दोन भल्यामोठ्या बॅग्ज आणून ठेवल्या. एकात होती गोडसेंची अमूल्य अशी ग्रंथ संपदा, व दुसरीत होती असंख्य स्केचीस, काही रंगीत निसर्ग दृश्ये, बोधचित्रे, कांही नेपथ्याचे आराखडे असा दुर्मीळ ठेवा. मी त्यांना पुस्तके मुंबई विद्यापीठाला द्यावीत अशी सूचना केली. चित्रांची रीतसर यादी करून त्याची एक प्रत सुशीलाबाईंकडे देऊन आम्ही सर्व चित्रांना माउंटींग केले. व १९९२ साली आमच्या जे.जे.उपयोजीत कला संस्थेच्या गॅलरीत गोडसे यांच्या चित्रांचे पहीले प्रदर्शन भरविले. विद्यार्थी, चित्रकार, कला प्रेमी या सर्वानाच हे प्रदर्शन प्रेरणादायी ठरले. बाळासाहेब ठाकरे देखील आवर्जून या प्रदर्शनाला आले, आणि आमच्या सोबत चित्रे पहात, त्यावर भाष्य करीत, त्यातील बारकावे आम्हांला समजावून देत त्यांनी सुमारे चार तास त्यादिवशी गोडसेंच्या प्रदर्शनात घालवले. म्हणाले, एवढ्या ताकदीचे कलाकार आमच्याकडे असताना आम्ही उगीच परदेशी चित्रकारांच्या मागे लागतो. त्यानंतर पुणे येथे थोर चित्रकार रवी परांजपे यांनी या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कला दालनांत भरवून पुणेकरांनाही त्याचा आनंद मिळवून दिला. मीराताई करंडे यांच्या सहकार्याने गोडसे कुटुंबियांकडून मिळालेली गोडसेंची चित्रसंपदा म्हणजे आम्हांला मिळालेले द.ग.गोडसे या चित्रयक्षाचे आशीर्वादच मी समजतो.

प्रा. मं.गो.राजाध्यक्ष






Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…