अर्नाळकरांची रहस्यमय नगरी



बाबुराव अर्नाळकर या नावाचे  आमच्याच काय, पण १९५० ते पुढील पंचवीस एक वर्षे सर्वांच्याच मनावर एक प्रकारचे गारुड होते. याला कारण होते त्यांच्या दरमहा प्रसिद्ध होणाऱ्या उत्कंठापूर्ण रहस्यकथा. अगदी दहा वर्षाच्या बालकापासून ते ऐन्शी वर्ष्यांच्या आजोबांपर्यंत सर्वानाच या रहस्यकथांनी वेड लावले होते. त्याची कित्येक पारायणे आम्ही करीत असू. एवढा प्रचंड प्रभाव या अर्नाळकरांच्या रहस्यमालाचा सर्व मराठी माणसांवर होता. लायब्ररीत गेले की त्याचे नवीन आलेले पुस्तक आपणाला मिळावे यासाठी सर्वच जण तत्पर असत.शाळेतील विध्यार्थ्यांच्या दप्तरातही ही पुस्तके दिसत. काहीजण तर अभ्यासक्रमाच्या पुस्तकात लपवून वर्गात त्याचे वाचन करीत, एकमेकांशी देवाण घेवाण करीत असत. आणि वर्गात त्यातील कथानकावर चर्चाही करीत.

बाबुराव अर्नाळकरांचे मूळ नाव चंद्रकांत सखाराम चव्हाण. वसईतील अर्नाळा या गावी ९ जून १९०९ रोजी त्यांचा जन्म झाला. पुढे ते वसईला त्यांच्या मावशीकडे आले. परत अर्नाळ्याला शाळेत जाऊ लागले. तेथे केवळ तिसरीपर्यंतच  शिक्षणाची सोय असल्याने पुढे त्यांची मावशी त्यांना घेऊन मुंबईला आली. तेथे आर्यन शाळेत त्यांनी नाव घातले, आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळू लागला. तसेच त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या काही घटना घडल्या, त्यापैकी लोकमान्य टिळकांचे देहावसान. त्यादिवशी त्यांची अंत्ययात्रा पाहण्यासाठी ते ऑपेरा हाऊस जवळील पुलावर बसले होते. एवढा प्रचंड जनसमुदाय त्यांनी प्रथमच पहिला.पुढे स्वा. सावरकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी देखील त्यांचा संबंध आला. हळूहळू लिखाणाकडे ते वळले. ' सतीची कहाणी ' ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. येथे त्यांचे चंद्रकांत अथवा चंदू हे नाव मागे पडून सर्वच जण त्यांना  ते दिवस बाबू असे संबोधू लागले व पुढे त्यांचे बाबुराव झाले. ते दिवस स्वातंत्र्याच्या चळवळीचे होते. बाबुरावांनीही स्वतःला त्यात झोकून दिले. प्रक्षोभक लेखनामुळे त्यांना अठरा महिन्याची शिक्षा झाली. विसापूर जेल मधील ही सश्रम करावासातील शिक्षा त्यांना बरेच कांही शिकवून गेली. या कारावासाने  त्यांच्या जीवनाला एक विलक्षण कलाटणी मिळाली


तुरुंगात कैद्यांना वाचायला पुस्तके देण्यात येत असत. बाबुरावांचे वाचन भरपूर झाले होते. तुरुंगात त्यांना एडगर वॉलेस यांचे ' थ्री जस्ट मेन ' हे रहस्यमय पुस्तक वाचायला  मिळाले. रहस्यकथांची आवड असलेल्या बाबुरावांनी ते पुस्तक देहभान विसरून वाचून काढले. त्यांचे इंग्रजी उत्तम होतेच, शिवाय कसे लिहावे याची दिशा त्यादिवशी त्यांना मिळाली. लिहिण्याची उर्मी तर त्यांच्या ठायी ठासून भरली होती. या पुस्तकाने त्यांच्या बीजाला अंकुर फुटला. या कादंबरीचे त्यांनी भाषांतर केले ' तीन न्यायाधीश ' दुसऱ्यांना लुबाडून आयुष्यात दुष्कृत्ये करून समाजात उजळ माथ्याने वावरणाऱ्या व कायद्याच्या पाशात न अडकलेल्या बदमाशांना हे तीन न्यायाधीश शिक्षा सुनावून ती तात्काळ अमलात आणीत असत. पुढे प्रामुख्याने त्यांनी एडगर वॉलेस यांच्या कादंबऱ्या भाषांतरित केल्या. त्यांचे प्रमुख डिटेक्टिव्ह होते. धनंजय. त्यांचा मदतनीस छोटू, कुत्रा वाघ्या आणि त्यांना घरच्याप्रमाणे सांभाळणाऱ्या मनोरमाबाई.

त्यांच्या  'पहिली झुंज ' या कादंबरीत आल्या वडिलांना लुबाडून त्यांची इस्टेट बळकावणाऱ्या काकाला  'मी येत आहे ' अश्या एक ओळीच्या चिठ्या पाठवून येणार नरेंद्र पुढे आपला हक्क मिळवतो. येथेच त्याला त्याची प्रिय पत्नी विजया भेटते अन प्रामाणिक सेवक नेताजी, आणि नरेंद्राचा बनतो झुंझार, आणि हा रंगेल उठावंगीर पुढे अनेक बदमाशांना न्यायासमोर आणून त्यांना ठेचून काढतो. मात्र याच्या कायदा गुंडाळून ठेवून केलेल्या कारवाईने त्रस्त होऊन सी.आई.डी. इन्स्पेक्टर आनंदराव संतापून जात. व एकदातरी झुंझारला बेड्या ठोकण्याचे स्वप्न पाहत. पण झुंझारने सोडवलेल्या प्रकरणाचे श्रेय शेवटी आनंदरावांना मिळून त्यांना बढती मिळे, त्यामुळे झुंझारने बदमाशांच्या तिजोरीतील धन आपल्या झुंजारमहाल मधील तिजोरीत भरले तरी आनंदराव कानाडोळा करीत. आणि त्यामुळे झुंजारचे कोणतेही प्रकरण आले की, कमीशनरसाहेब ते आनंदरावांच्या माथी मारीत असत.  अर्नाळकरांनी अनेक नायक रंगविले. धनंजय-छोटू, झुंझार-विजया- नेताजी, काळापहाड, चारुहास, दर्यासारंग- सावळ्या, मेजर सुदर्शन, गोलंदाज. यासर्वांची एकमेकांशी कधी त्यांनी भेट करून दिली नाही, पण एकमेकांना ते चांगलेच ओळखत ते अनेक कादंबर्यातून त्यानी दर्शवीले होते!


गिरगांवात चष्म्याचे दुकान चालवीणाऱ्या या चंद्रकांतने, म्हणजेच बाबुराव अर्नाळकरांनी हे केवळ चरित्र नायक म्हणून ठेवले नाहीत तर त्यांना खरोखरीची प्रतिमा दिली. त्यांना अजरामर केले. पन्नास वर्ष्यांच्या वर महाराष्ट्रातील अनेक पिढयांना या नाईकांनी मोहीत केले.  धनंजयांचे गावदेवीतील घर, झुंझारचा मारिन ड्राइव्ह वरील बंगला, त्यातील आधुनिक सुखसोयी, दिवसा उचभ्रु वर्तुळात लेखक म्हणून वावरणारा चंद्रवदन रात्री काळा बुरखा घालून, कमरेला चामड्याचा घरफोडीच्या हत्यारे बाळगणारा व गैरमार्गाने संपत्ती मिळवलेल्या श्रीमंतांच्या घरावर दरोडे घालून किमती हिरे चोरणारा काळापहाड, आपले मोडके तोडके जहाज घेऊन दर्यावर्दी सफरीला निघालेला व या सफरीच्या दरम्यान एक  विलक्षण प्रकरण सोडवणारा दर्यासारंग व सतत त्याची टवाळकी करणारा त्याचा सेवक सावळ्या, वडिलांच्या डिटेक्टिव्ह एजन्सीत काम करणारा चारुहास असे अनेक नायक आपल्या करामती दरमहा दाखवीत असत. धनंजय हे तर्कशास्त्राच्या आधारे केस सोडवीत तर झुंझारचा आपल्या' झुंझार' ठोश्यावर जबरदस्त विश्वास असे. कित्येक वाचक पत्रे पाठवून या चरित्र नायकांचे पत्ते विचारीत असत.

अर्नाळकरांच्या हे चरित्र नायक अगदी खरेखुरे वाटावे यामध्ये चित्रकार रघुवीर मुळगावकर यांचाही मोलाचा वाटा होता. त्यांनी केलेल्या अर्नाळकरांच्या सर्वच पुस्तकांवरील रेखाटने ही अखेरपर्यंत सातत्य ठेवत काढली. तेजस्वी मुद्रेचे धनंजय, मिस्कील आणि बेडर वाटणारा झुंझार, सात्विक सौंदर्याची त्याची पत्नी विजू , सर्वचजण त्यांच्या रहस्यकथा वाचताना हे चेहरे डोळ्यासमोर येत. शिवाय दिवाळीला खास अंक काढीत त्यामध्ये धनंजय, झुंझार, चारुहास अश्यांची मुळगावकरांनी काढलेली पोर्ट्रेट्स भेट म्हणून देण्यात येत. इतके मुळगावकर अर्नाळकरांच्या महानायकांशी समरस झाले होते. कित्येक पुस्तकांच्या शेवटी अर्नाळकर धनंजयच्या मुलाखत छापत, तसेच  ' हे आमचे मुळगावकर बरं कां ! ' म्हणून मुळगांवकरांचीही छापत. मात्र पुढे मुळगावकरांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर अर्नाळकरांच्या रहस्यमालेची मुखपृष्ठे केरकर करू लागले, पण मुळगावकरांच्या तुलनेने ती दुय्यम दर्जाची वाटू लागली अन कथा नायकांचे मर्म त्यातून हरपल्याचे जाणवू लागले.


अर्नाळकरांनी बराच प्रवास केला होता. भारतातही प्रत्येक ठिकाण त्यांना पाठ होते. मुंबईची संपूर्ण माहिती होती, त्यामुळे भाषांतर करूनही आपल्या कलाकृतीला संपूर्ण भारतीय साज चढवीत. मुंबईतील ठिकाणही वेसाव्यातील ताडीचा गुत्ता, दहिसर, वसई, भुलेश्वर, परळ असे शब्द असत की तेथील वातावरण डोळ्यासमोर उभे राहत असे. त्यांच्याच काळात रामचंद्र नाडकर्णी नावाचे लेखक देखील रहस्यमय कादंबऱ्या लिहीत.माझे वडील अश्या सर्वच लेखकांची पुस्तके विकत घेऊन संग्रह करीत. एकदा नाडकर्णींचे ' नीना ' नावाचे व अर्नाळकरांचे ' किनाऱ्याचे रहस्य ' नावाची अशी दोन पुस्तके एकाच महिन्यात प्रसिद्ध झाली. दोघांचे कथानक एकच होती. कारण एकच पुस्तकाचा अनुवाद दोघांनीही केला होता. त्यावर माझ्या वडिलांनी अर्नाळकरांना पत्र लिहून हे कळवताच त्यांचे उत्तरही आले. त्यांनी लिहिले होते, मी प्रवासात असताना सदर पुस्तक लिहिले. त्यामुळे नाडकर्णींचे पुस्तक माझ्या वाचनात आले नाही. मात्र यापुढे मी काळजी घेईन! 

मात्र एकदा काही वाचक त्यांच्यावर नाराज झाले होते. त्याला कारण होते. ' धनंजयना कैद ' हे पुस्तक ! यामध्ये धनंजय नेहमीप्रमाणे आपल्या रायफल क्लबच्या तळघरात नेमबाजीचा सरावाला गेले असता तेथील मानवाकृतीच्या चित्राच्या कपाळाच्या मध्यभागी गोळी मारतात. त्यावेळी धनंजयना गुन्ह्यात अडकविण्यासाठी काही बदमाशानी पाठीमागे खरीखरीचा माणूस बेशुद्ध करून ठेवलेला असतो.अर्थात गोळी त्याच्या कपाळात छिद्र करून जाते, व तो इसम मारतो. धनंजयने कैद होते. पण त्यातून ते आपले निर्दोषत्व सिद्ध करतात व निर्दोष सुटतात. पण चुकीने का होईना, आपल्या लाडक्या धनंजयच्या हाताने हत्या घडवली हे धनंजयच्या, अर्थात अर्नाळकरांच्या चाहत्यांना रुचले नाही. निषेधाची अनेक पत्रे त्यावेळी बाबुरावाना वाचकांनी पाठविली. हे त्यांच्या चरित्र नायकावरील प्रेमच सिद्ध होते


अश्या या रहस्य कथा सम्राटाचे निधन ५ जुलै १९९६ रोजी वयाच्या सत्त्याऐंशी वर्षी झाले. अर्नाळकरांनी अनेक रहस्यकथा लिहिल्या. 'चौकटीची राणी' या कथेपासून रहस्यकथा लिहीण्यास आरंभ केलेल्या बाबुरावांनी बाराशेच्या वर रहस्यकथा लिहील्या. महीन्याला सहा माला ते प्रकाशीत करीत असत. आरंभी प्रकाशक व्ही. आर. प्रभू हे त्यांची पुस्तके प्रकाशीत करीत असत. पुढे त्यांनी स्वतःचीच ' अर्नाळकर प्रकाशन ही संस्था सुरु केली. त्यांना साहाय्य होत असे ते त्यांचे बंधू मधुकर अर्नाळकर यांचे. त्यांनीही कांही धनंजय कथा लिहील्या आहेत. गिनीज बुक मध्ये बाबुरावांचे नांव नोंदले गेले. पण उच्चभ्रू म्हणून वावरणाऱ्या साहित्यिकांनी त्यांच्या वाङ्मयाला अभिजात साहित्याचा दर्जा दिला नाही. साहित्यसम्राट म्हणून मानले गेलेल्या आचार्य अत्र्यांनी मात्र खास अग्रलेख लिहून बाबुराव अर्नाळकरांचे जाहीर कौतुक केले होते. आज अर्नाळकरांच्या पुस्तके पुन्हा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न काही प्रकाशक करीत आहेत. पण त्यांना त्यावेळचे मुळगावकरांनी नटवले सौंदर्य नसणार, त्यातील धनंजय- झुंजार, आपल्या मनाला भिडणारे नसणार. आणि आजच्या या इंटरनेट जगात त्यांना लाभणारे वाचकही नसणार. मात्र एकेकाळी रहस्यकथांचा बादशाह म्हणून मिरवलेल्या या अजोड लेखकाच्या कलाकृती मिळवून त्यांचा संग्रह करणे आवश्यक आहे !
आज ५ जुलै ! बाबुरावांनी तेविसावी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला विनम्र अभीवादन !

 -  प्रा. मं.गो.राजाध्यक्ष.
               


    
Sent from http://bit.ly/LvJfIK

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…