निसर्गाचा चित्रकार : प्रा. प्रल्हाद धोंड
सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट. आशीया खंडातील एक विख्यात असे कला महाविद्यालय. याचा वारसा चालविणारे अनेक कलाकार या वास्तूने निर्माण केले. हे सर्वच कलाकार आपल्या नांवाने जे.जे.स्कुलची ओळख बनले. ह्यांची नावेही तोलामोलाची होती. त्यापैकी एक नांव जे जलरंगाचा बादशहा म्हणून ओळखले जाई ते होते निसर्ग चित्रकार प्रल्हाद अनंत उर्फ भाई धोंड. ११ नोव्हेंबर १९०८ साली रत्नागीरीत जन्मलेल्या प्रा. प्रल्हाद अनंत धोंडांचे बालपण गेले ते मालवण व त्याच्या परीसरात, व नयनरम्य अश्या निसर्गाच्या सान्नीध्यात ते वाढले. त्यामुळे निसर्गाचा ओढा त्यांना सतत लागला. कोकणातील निसर्ग हा सागरी किनाऱ्यावर वावरणारा. त्या निसर्गाची सोबत त्यांनी आयुष्यभर केली. ते गाजले तेच मुळी निसर्गचित्रकार म्हणून! त्यांचे शालेय शिक्षण मालवणात झाले. मराठी शाळेत असताना ड्रॉईंग हा विषय त्यांना खास आवडीचा होता. त्यांचे मामाच ड्रॉईंग शिकवायला वर्गावर येत. झ्यांटे मास्तर हे त्यांचे नांव. आणि येथेच त्यांनी आपल्या एलिमेंटरी व इंटरमिजीएट ह्या ड्राॅईंगच्या परीक्षा दिल्या व त्यात ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले. चित्रकलेच्या पेशातला पायाच झ्यांटे मास्तरांनी रचल्याचे धोंडांचे प्रामाणिक मत होते.
या त्यांच्या कोकणच्या वाटचालीत त्यांना दोन दीपस्तंभ दिसले. ते होते फर्नांडीस मास्तर व पेडणेकर मास्तर. सेसील बर्न्स हे स्कुल ऑफ आर्टचे प्रिन्सीपॉल असताना त्यांचे जलरंग या माध्यमावर प्रचण्ड प्रभूत्व होते. त्यामुळे त्यांच्याकडे शिकून तयार झालेले बहुतेक विद्यार्थी हे जलरंगात निष्णात होते. पण त्यात सेसील बर्न्स यांची बरोबरी करणारे एकमेव होते ते पेडणेकर. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कुल मध्ये सरकारी नोकरीत असलेल्या या पेडणेकरांनी एकदा मनावर घेतले की आपण गावीच नोकरी करावी. तेथील सरकारी नोकरी सोडून ते गावंच्या शाळेत शिकविण्यास आले होते. त्याकाळी चित्रकार लोक रंगांची बरीच रेलचेल करीत, कोरीव काम करीत, बरेचसे फोटोत दिसण्याप्रमाणे काम करीत असत. पण पेडणेकर काळाच्या कितीतरी पुढे होते. मोठा ब्रश घेऊन ते आकाश, पाणी, जमीन सर्व एकाच दमात रंगवीत. संपूर्ण कागद पाण्याने ओथम्बून गेलेला असे. तो सुकण्याआधीच त्यावर मधून मधून झोपड्या, घरे, झाडे असे आवश्यक तपशील ते टाकत. जलरंगातील द्रवता आणि पारदर्शकपणा पेडणेकरांनी संपूर्णपणे आत्मसात केला होता,जो अद्यापही कित्येक चित्रकारांना साधला नाही. असे हे पेडणेकर यांच्या बोटामध्ये सरस्वतीचा वास असा कांही होता की प्रतीसृष्टी निर्माण करण्याची ताकद होती.
मुंबईला राम मोहन स्कुल मध्ये धोंड दाखल झाले. राममोहन शाळेच्या संमेलनातील नाटकात आणि खेळांत धोंड प्रामुख्याने असत. राममोहन शाळेची ती परंपराच होती. अनेक कलावंतांना त्या शाळेने पुढे आणले आहे. शाळेत असताना नकला करणे, गाणी म्हणणे, नाटकात काम करणे अशा गोष्टींमधून भाईंचे कला-क्रीडाप्रेमी व्यक्तीमत्व आकार घेवू लागले. याच शाळेत असतांना नगरकर व जी.पी.फर्नांडीस यांना मिळालेल्या दिल्ली डेकोरेशनच्या कामाचे अनौपचारिक प्रदर्शन नगरकरांच्या इमारतीत भरले होते. त्यासाठी जे.जे.स्कूलचे डायरेक्टर कॅ. सॉलोमन वगैरे मंडळी येणार होती. १९३० साली मॅट्रीकची विद्यापीठाची परीक्षा देऊन धोंडांनी जे.जे.मध्ये जाण्याचा हट्ट धरला.
सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये आपल्या काकांसोबत प्रथम पाऊल टाकले. . त्यावेळी विद्यार्थ्यांचे काम पाहून त्याला थेट वरच्या वर्गात प्रवेश देत. त्याप्रमाणे धोंडांना द्वितीय वर्षात प्रवेश मिळाला. त्याकाळातील तेथील शिक्षक रा. ब. धुरंधर, तासकर, चुडेकर, तळवडेकर, फर्नांडीस, नगरकर, भोंसुले हे सर्व तोलामोलाचे होते. प्रत्येकाची वेगळी हातोटी होती. आणि कमालीची शिस्त पाळली जात असे. प्रत्येकजण प्रात्यक्षीक दाखवून समजावून देत असे. भोंसुले मास्तरांनी धोंडांना तैलरंग कसे वापरायचे ते शिकविले. हाडाचे कलावन्त असलेले भोंसुले साधे सरळ अन दिसायला रुबाबदार होते. त्या काळात कला विचारावर व चित्राच्या तंत्र मंत्रात काळाच्या पुढे कैक वर्षे होते. सौष्ठवपूर्ण भारतीय ढंगाच्या मनुष्याकृती ते चित्रित करीत. त्यांनी काम जरी कमी केलें असले तरी, ते अतीशय दर्जेदार होते. स्कूल ऑफ आर्टचे संचालक ग्लॅडस्टन सॉलोमन यांचे त्यांच्या निवृत्तीच्या वेळी त्यांनी केलेले पोर्ट्रेट अजूनही जे.जे.च्या दालनाची शोभा वाढवीत आहे. हेच पोर्ट्रेट आज जर का परदेशातील एखाद्या म्युझीयम मध्ये असते, तर ते मोठ्या सन्मानाने तेथे विराजमान झाले असते.
एकदा सुटी पडल्यावर भाई बोटीने मालवणला निघाले होते. त्यावेळी बोटीत जागाही ऐसपैस मिळायची. दुपार झाल्यावर सर्वानी आपापले फराळाचे डबे उघडले. त्यांच्या जवळच एक किरिस्तांव दाढीवाला बसला होता. थोड्या वेळाने त्यांनी चिरूट शिलगावला व भाईंच्या पाठीवर हात ठेवून त्याचे नांव विचारले. भाईंनी धोंड असे म्हणताच त्यांनी हसून म्हटले, अरे तो फर्नांडीस मास्तर आर्ट स्कुल मध्ये आहे ना? भाईंनी विचारले, आपले नांव काय? त्यावर ते म्हणाले, अरे, मी आर्ट स्कुलचा त्रिंदाद मास्तर. आता रिटायर झालोय. आणि गोव्याला चाललोय. त्रिंदाद हे नांव ऐकताच एवढ्या महान कलावंताची भेट इतक्या सहज व्हावी यामुळे भाई खुष झाले. बाजूलाच पेंगुळलेल्या त्यांच्या मुलीला 'अँजेलो' म्हणून उठवून त्यांनी तिची ओळख करून दिली. ही ॲंजेलो देखील आर्ट स्कूलची विद्यार्थीनी होती. पुढे तीही ॲंजेलो त्रिंदाद म्हणून प्रसीद्ध पेंटर झाली.
त्रिंदादांचा आवडता छन्द म्हणजे माहीमच्या खाडीवर जाऊन तेथील होड्यांची चित्रे काढणे. यानंतर त्रिंदादाना मधुमेह झाला. त्यात त्यांचा एक पाय कापावा लागला. तरीही कुबडी घेऊन ते खाडीवर जात व होड्यांची चित्रे रंगवीत. त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचे चित्र रंगवीले ते काटेरी मुकुट घातलेल्या जिझस ख्राईस्टचे. त्याचा दुःखी चेहरा, ठिबकणारे रक्त जणू त्यांना स्वतःच्याच वेदना दाखवीत होते. त्यावेळी भाई आपल्या काही सहकाऱ्यांसोबत ते चित्र पहावे व त्यांना भेटावे या उद्देशाने त्यांच्याकडे जाऊन ते चित्र पाहीले होते.
१९३२ साल हे जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या जीवनात एक संकट आणणारे ठरले. या काळात जे.जे.वर एक मोठा आघात झाला. मुंबई सरकारने बचत योजनेसाठी नेमलेल्या थॉमस कमीटीचा अहवाल याच काळात प्रसीद्ध झाला. बचत योजनेसाठी ज्या कांही तरतुदी त्यात सुचविल्या होत्या त्यामध्ये जे.जे.स्कूल ऑफ आर्ट बंदच करून टाकावे ही एक सूचना होती. नाहीतरी येथून बाहेर पडलेल्या चित्रकारांना आर्थीक बाजू भक्कम करण्याचे काहीच साधन नाही हे त्यात नमूद केले होते. संस्थानीक राजे रजवाडे यांचे आश्रय बंद झाले होते. उदरनिर्वाहासाठी केवळ कलेवर अवलंबून रहाणे हे कठीणच होते. व त्यामुळे सदर मोक्याची जागा विकून त्याठिकाणी इमारती बांधून पैसा उभारावा अशी सूचना या थॉमसने केली होती. वास्तवीक सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टची स्थापना करून हिंदुस्थानला जमशेटजी जीजीभाईंनी एक समृद्ध असा वारसा दिला होता. त्याला जोड होती ती अश्या कला संस्कृतीच्या वारश्याला जपणाऱ्या कंपनी सरकारची! व त्यासाठी येथे शिकवायला येणारे प्रिन्सीपॉल हे इंग्लडमधून कला शिक्षण घेतलेले असावेत व त्यांचे मार्गदर्शन या संस्थेला व पर्यायाने भारतीय विद्यार्थ्यांना मिळावे ही अटच जमशेटजीनी घातली होती. आणि ग्रिफीथ, ग्रीनवूड,लाॅकवूड किपलींग, सेसील बर्न्स, कॅ. सॉलोमन यासारखे दिग्गज कलावंत यांनी ही संस्था वाढवली होती, विस्तारली होती. पण येथील लोकांच्या कानावर आले होते ते वेगळेच होते. सॉलोमन व थॉमस यांचे संबंध इंग्लंडपासूनच बिघडलेले होते. व या समीतीचे सूत्रधार म्हणून त्यांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले. व त्याचा सूड म्हणून ही अघोरी सूचना केली होती. पण कॅ. सॉलोमनही कांही कमी नव्हते. त्यांनी कलाकारांशी, विचारवंतांशी, मुंबईतील प्रतिष्ठीत नागरीकांशी जोडलेले संबंध त्यांच्या कामी आले. जोडीला वृत्तपत्रांचा आधार घेण्यात आला. त्यानी फिरोज सेठना, बॅ. मुकुंदराव जयकर, कन्हैयालाल वकील यांच्याकरवी आवाज उठवला. व याच्या जोडीला स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांची एक फळी उभारली व त्याचे नेतृत्व केले भाई धोंड यांनी. या कृती समितीच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या. यानंतर सर्व मुंबई जागी करण्यासाठी भाईंच्या नेतृत्वाखाली हे विध्यार्थी ' जे.जे.स्कूलचे रक्षण करा ' असे आवाहन करीत मिरवणुका काढीत होते. अनेक पालकांनी यासाठी आपल्या गाड्याही दिल्या. आणि जे.जे.च्या आवारातून सर्व विद्यार्थ्यांची एक प्रचंड मिरवणूक निघाली होती.
बघता बघता भाईंचे स्कूल ऑफ आर्ट मधील अंतीम वर्ष आले. या वर्षी त्यांना शैक्षणीक सहलीला जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या सहलीत सॉलोमन साहेबांना काम करतेवेळी पाहण्याची संधी त्यांना मिळणार होती. व तशी ती त्यांना मिळालीही! सर्वजण आग्र्याला पोहोचले. सर्वांसोबतच सॉलोमन साहेबांनीही ताजमहाल रंगवायला सुरुवात केली. सर्वांचे जलरंगातील चित्रे पूर्ण होईपर्यंत सॉलोमन साहेबानी कॅनव्हासवर तैलरंगामध्ये ताजमहाल पूर्णही केला होता. जोरकस अश्या शैलीमध्ये त्यांनी ताजमहालच्या सर्व रंगांचे वैभव आणले होते. आणि संपूर्ण सहलीत त्या मोगल साम्राज्याचे गतवैभव व पौर्णीमेच्या रात्रीच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला ताजमहाल डोळे भरून पाहून ही सहल परतली.
या दरम्यान सॉलोमनसाहेबानी जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे प्रदर्शन लंडनमध्ये भरविण्याचे ठरवीले. व त्याच्या मदतीसाठी रॉयल ऑपेरा हाऊस येथे तीन तासाचा एक सांस्कृतीक कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात मराठी नाटक 'बेबंदशाही'चा प्रयोग होता, त्याचे दिग्दर्शन केले होते धोंडांनी. प्रयोगाच्या दिवशी सर्वच कार्यक्रम रंगत गेले व टाळ्यावर टाळ्या घेत हा कार्यक्रम संपला. या अंतीम वर्षात भाईंनी जास्ती भर दिला तो कांपोझीशन या विषयावर. लाईफ स्टडीही महत्वाची होती. शरीर सौष्ठवाचा अभ्यासही तितकाच महत्वाचा होता.. या काळात भाईंना चुडेकर, अहिवासी, नगरकर अश्या दोन टोकाच्या शिक्षकाचे ज्ञान अनुभवायला मिळाले. विशेषतः नगरकर ज्या पद्धतीने जलरंगाचे अद्भूत काम करीत त्याचा परीणाम भाईंच्या कामावर खूप झाला. नगरकरांचे पारदर्शक रंग वापरण्याचे कसब त्यांना मोहवून टाकीत असे. या सर्वांच्या कामाच्या पद्धती कितीही भिन्न असल्या तरी हे सर्व शिक्षक आपापल्या शैलीमध्ये अत्यंत निपूण होते..धोंडांची जडण घडण होण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आणि भाई धोंड यशस्वी रित्या स्कूल ऑफ आर्टची पदवीका उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी आर्ट मास्टरच्या वर्गात नांव घातले, व तीही परीक्षा ते चांगल्या तऱ्हेने उत्तीर्ण झाले. आणि आता भेडसावू लागला तो द्रव्यार्जनाचा मार्ग शोधण्याचा अवघड प्रश्न. आणि त्यांच्या वाचनात पुण्याच्या 'श्रीशिवाजी प्रिपरेटरी मिलीटरी शाळेची’ चित्रकला शिक्षकाची जाहीरात आली. भाईंनी त्या पदासाठी अर्ज केला अन त्यांची नियुक्तीही झाली. ते शिवाजी मिलीटरी स्कूलच्या आवारात शिरण्यापूर्वी त्यांना मंगलमय दर्शन झाले ते, थोर भारतीय शिल्पकार नानासाहेब करमरकर यांनी केलेला श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे. त्याचे दर्शन घेऊनच त्यांनी संस्थेत आपले पाऊल टाकले.
या शाळेत असतांना धोंडांचा शिक्षकी पेशा खऱ्या अर्थाने सुरु झाला. मानाच्या समजल्या जाणाऱ्या बॉंबे आर्ट सोसायटीचे वार्षीक प्रदर्शन भरत असे व त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक विभाग होता. या शाळेतून अद्यापपर्यंत कोणी त्या विभागांत चित्रे पाठविली नव्हती. पण धोंडांनी प्रिन्सिपॉलच्या साहाय्याने कांही चित्रे निवडून त्या प्रदर्शनाला पाठविली. यामध्ये चित्रे केवळ लागलीच नाहीत तर त्यापैकी काहींना बक्षीसेही मिळाली. या वर्षी एका भारतीय चित्रकर्तीला सुवर्णपदक मिळाले होते. थोडे पौवार्त्य संकेत असलेल्या त्या आधुनिकतेकडे झुकलेल्या चित्रांत कांहीशी मोगल व राजपूत शैलीची झाक होती. एक नवीन दालन या चित्रकर्तीने उघडले होते. एखादी बिजली चमकावी तशी अल्पकाळात अनेक कलाकृती आविष्कृत करून आधुनीक भारतीय चित्रकलेची सुरुवात करून अल्पावधीतच भारतीय कलेच्या व जीवनाच्या क्षितिजावरून उठून गेलेली सरदार घराण्यातील ही कलाकार होती अमृता शेरगील!
शिवाजी मिलिटरी स्कुलमध्ये असताना भाईंची अधूरी राहीलेल्या प्रेमकहाणीने पुन्हां गती घेतली. कु. हिरा गवाणकर ह्या पुण्याच्या बी.जे.मेडीकल कॉलेजमधून एल.सी.पी.एस. झाल्या आणि त्याची परिणीती बेळगांवी एका गोरज मुहूर्तावर धोंड - गवाणकर यांच्या विवाहात होऊन डाॅ. हिरा गवाणकर या आशा धोंड म्हणून भाई धोंडांच्या आयुष्यात पदार्पण करत्या झाल्या. पुढे पुणे मुंबई असा पत्रप्रपंच चालूच होता. अखेर पत्नीला एकटे ठेवावे लागू नये म्हणून भाईंनी पुण्याला रामराम ठोकून बेळगांवी जाण्याचा निर्णय घेतला. व तेथील सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये त्यांनी कलाशिक्षकाची नोकरी पत्करली. तसे पाहीले तर बेळगांव हे कला संस्कृतीच्या बाबतीत पुण्यापेक्षाही मागासलेले. पण तेथे त्यांना आधार होता तो त्यांचे साडू व बेळगांवातील प्रतिष्ठीत असे नेते, तरुण भारतचे संपादक व सामाजीक कार्यकर्ते बाबुराव ठाकूर यांचा. फिरायला बाहेर पडले की दिसणारे देखावे मनांत टिपायचे व नंतर कागदावर उतरवायचे हा त्यांचा छंद झाला. याच दरम्यान त्यांच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. कुंदा हे त्यांचे पहिलेच अपत्य. दोघेही तिच्यात मग्न होऊन जात असत. आणि इकडे नियती कांही वेगळेच रचत होती. ज्या जे.जे.स्कूलशी त्यांची नाळ जुडली होती तेच जे.जे.त्यांना ललकारत होते. आणि एक दिवस टाइम्स ऑफ इंडीयामध्ये पब्लीक सर्व्हीस कमीशनची जाहीरात आली. ही जागा होती जे.जे.स्कुलच्या शिक्षक प्रशिक्षण विभागातील विभाग प्रमुखाची. एकतर ही जागा राजपत्रीत होती, व आयोगामार्फत प्रथमच भरण्यात येत होती. त्यात जमेची बाजू होती ती म्हणजे भाई आर्ट मास्टरची परीक्षा चांगल्यातऱ्हेने प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले होते. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे भाई मुलाखतीत निवडले गेले. व ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले, तेथेच अध्यापन करण्याची संधी नियतीने त्यांना मिळवून दिली.
भाई खरे तर हाडाचे शिक्षक होते. विद्यार्थी असताना ज्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले, त्या पुढील विद्यार्थ्यांना लागू नयेत यासाठी त्यांची धडपड होती. सर्वात कंटाळवाणी गोष्ट त्यांना जाणवत असे ती तेथील कडक शिस्त. आणि कलेच्या या सर्जनशील विद्यार्थ्यांना या शिस्तीच्या जोखडाखाली जुंपणं त्यांना प्रशस्त वाटत नव्हते. म्हणून त्यांनी सर्वप्रथम तेथील शिस्तीला मोडता घालून विध्यार्थ्यांना श्वास घेण्यास मोकळीक दिली. ह्या भावी शिक्षकांना उद्या विद्यार्थी घडवायचे आहेत तेव्हां त्यांना विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र माहीती पाहीजे या हेतूने त्यांनी मानसशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र हा विषय शिक्षक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात आणला. विद्यार्थ्यांना कलेची जाणीव व्हावी, चित्र पहाणे समजावे यासाठी कला इतीहास शिकवीण्यास त्यांनी सुरुवात केली. आतापर्यंत शिक्षकांचे आवाज ऐकू येत नसत ते ऐकू येऊ लागले. सॉलोमन साहेब निवृत्त होऊन परत गेले होते. त्याजागी आता जेरार्ड होते. उप संचालक म्हणून भाऊसाहेब आचरेकर होते. पण फार काळ ते राहीले नाहीत. जेरार्डने आधुनिक चित्रकला भारतात आणली असा समज होता. पण भाईंच्या मते अमृता शेरगील हिने प्रथम आधुनिक कलेची बीजे रोवली होती हे भाईंचे प्रांजळ मत होते. मात्र जेरार्ड हा आधुनिक कलेला उत्तेजन देत असे. तो एक उत्तम असा चित्रकार होताच शिवाय उत्कृष्ट असा शिक्षकही होता.
दादा आडारकर हे देखील वेंगुर्ल्याचे. भाईंचे मित्र. त्यांच्याआधी तीन चार वर्षे जेजे मधून शिकून बाहेर पडले. त्यांनी टाइम्स ऑफ इंडीयाच्या कला विभागात काम केले व त्यांचे संघटन चातुर्य पाहून त्यांना उपयोजीत विभागामध्ये घेण्यात आले होते. त्यांचे व्यक्तीमत्व पाहणाऱ्यावर छाप पाडीत असे. माणूस तर असा बोलघेवडा की समोरच्याच्या पोटातच शिरत असे. शासनाने त्यांना एक वर्षासाठी इंग्लडला तेथील शिक्षण पद्धती पाहण्यास पाठवले होते. आणि यावेळी कोकणातील तिसरी व्यक्ती संचालक पदावर आली, व ते होते अडूरकर. पहीले भारतीय संचालक. एक जन्मजात कलाकार असलेला हा माणूस कमी बोलत असे. इंग्रजी भाषा, कार्यालयीन छक्के पंजे त्याना माहीत नव्हते. त्यामुळे त्यांना बराच त्रास झाला. त्याचीच परिणीती शेवटी अडूरकर जे.जे.मधून बाहेर पडण्यात झाली. या अडूरकरांच्या कारकीर्दीत भाईंना रवींद्रनाथांचे 'शांतीनिकेतन' पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. शाळेपासूनच धोंडांना रवींद्रनाथांची 'गीतांजली' प्रभावीत करीत होती. मध्यवर्ती सरकारने शांतिनिकेतनमध्ये महात्माजींच्या 'बेसीक एज्युकेशन' मधील कला शिक्षकांचे प्रशिक्षण व्हावे म्हणून विनय भवन म्हणून संस्था स्थापन केली. त्यात भारतातील सर्व राज्यांच्या राज्य सरकारांना आपले प्रतिनीधी पाठविण्याची विनंती केली होती. मुंबई सरकारने जे.जे. स्कूलमधून भाई धोंड यांना पाठवून हा बहुमान मिळवून दिला. तेथे गेल्यावर त्यांनी शांतिनिकेतनी स्थापत्य इमारती पाहील्या आणि सभोवार होणाऱ्या पक्षांच्या किलबिलाटाने त्यांना जणू 'ॲलीस इन वंडरलॅंड' पाहील्यासारखे वाटले. तेथे त्यांना रवींद्रनाथांचे निवासस्थान 'उत्तरायण' दिसले. कलाभवनात चित्रकला शिकवणारे नंदलाल बोस यांच्याशी त्यांचा परीचय झाला. रवींद्रनाथांनी जगभरात ज्या ज्या गोष्टी पाहील्या त्या त्यांनी शांतीनिकेतन मध्ये रुजविल्या होत्या. शांतीनिकेतन मधील हा हृदयरम्य अनुभव भाईंना बरेच काही देऊन आणि शिकवून गेला.
पुढे दादासाहेब अडारकरांनी उपयोजीत कला स्कूल ऑफ आर्ट पासून स्वतंत्र करवून घेतली. वास्तुशात्र विभागही वेगळा झाला. त्यावेळी अधिष्ठाता होते जनार्दन गोंधळेकर. त्यांना न विचारताच सरकारने हा निर्णय घेतल्याने ते खूप निराश झाले होते. व त्यांनी राजीनामा दिला आणि नुकतेच निवृत्त होऊन आस्ट्रियाला परत गेलेल्या लॅंगहॅमर यांच्या टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रातील रिकामी झालेल्या कला दिग्दर्शक ह्या जागेवर गोंधळेकरांची नेमणूक झाली. व येथे शिक्षक प्रशिक्षण विभाग प्रमुख म्हणून काम पहात असलेले भाई धोंड यांची सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता म्हणून नियूक्ती झाली. सर्वप्रथम भाईंनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित करून कलाशाळेचे एकूण कामकाज दाखविले. आणि आजवर शाळा या नात्याने पाहीली जाणारी ही संस्था महाविद्यालयाच्या समकक्ष असल्याचे दाखवून शिक्षकाना तंत्रशिक्षणाच्या वेतन श्रेणी मंजूर करवून घेतल्या. अधिष्ठाता झाल्यावर भाई डीन साठी असलेल्या बंगल्यात रहायला आले. जागतीक कीर्तीचा नोबेल प्राईझ विजेता रुडयार्ड किपलींग याचा जन्म याच बंगल्यात झालेला असल्याने त्याला एक ऐतिहासीक महत्व होते. त्याचे वडील लॉकवूड किपलींग हे स्कुल ऑफ आर्टच्या स्क्लप्चर आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख होते. त्याच्या अर्ध्या भागात दादा आडारकर आधीच रहात होते. दोघेही मित्र असल्याने त्यांच्या कुटुंबाचा घरोबा होता. कधी धोंडांचे जेवण त्यांच्याकडे होत असे तर कधी दादा व ताई धोंडाकडे येत. तोपर्यंत भाईंची लहान मुलगी निशा हिचा विवाह झाला नव्हता. एव्हाना भाईंची पत्नी निवर्तली होती. नंतर किसन कामत यांच्याशी विवाह होऊन नीशादेखील दादरला गेली. तेव्हां धोंड त्या प्रचंड बंगल्यात एकाकी जीवन कंठू लागले. स्वयंपाकीण बाई जेवण बनवीत असे. दादा आडारकर आणि भाईंची जोडी, अगदी बालपणापासूनची. व्यवसायात प्रतीस्पर्धी - स्पर्धक तरीही दोघांच्या भावना आणि मैत्रीचं हितसंबंध घट्ट विणलेले. दोघेही एकमेकाच्या खोड्या काढत. चिमटे घेत. पण त्यातील प्रेम विशुद्ध होते. त्यांच्या मैत्रीची वीण घट्ट होती. अश्या या धोंड सरांच्या कारकिर्दीत अनेक विद्यार्थी येऊन गेले, जे पुढे नामवंत झाले. जगविख्यात झाले. त्यापैकी दोन म्हणजे प्रभा बडगेलवर अर्थात बी. प्रभा व प्रफुल्ला डहाणूकर. प्रभा ही अत्यंत शांत स्वभावाची, अबोल अशी होती तर प्रफुल्ला ही सतत काहींना काही करीत असे. अनेक सांस्कृतीक कार्यक्रमात ती भाग घेत असे. तिच्या उंचीमुळे धोंड सर तिला 'गुडी ' असे संबोधत. पण सर्वच विद्यार्थी धोंड सरांवर खुष असत.
कोकणातून निसर्गाच्या ओढीने झपाटलेला एक मुलगा मुंबईला कलाशिक्षणाच्या ओढीने येतो काय, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टला प्रवेश मिळवतो काय, शिक्षकी पेशा पत्करून पुणे, बेळगांव व परत आपल्या मातृसंस्थेत शिकवतो काय, एवढेच नव्हे तर तेथील अधिष्ठाता पद भूषवीतो काय, सर्वच चमत्कारीक होते. पण हा प्रवास साधा नव्हता. त्यामागे प्रचंड ऊर्जा, मेहनत, तपस्चर्या होती. आधी तैलरंग वापरून पोर्ट्रेट करणारे भाई जसजसे परीपक्व होत गेले तेव्हां त्यांचे माध्यम बदलले. यामध्ये त्यांच्या प्रवासात त्यांना भेटलेले मार्गदर्शक शिक्षक होते. जलरंगावर त्यांचे प्रभुत्व होते. ते पहात असता मनामध्ये रुजलेला कोकणातील निसर्ग होता. त्याचे सौंदर्य त्यांना खुणवीत होते. आणि त्यांनी आपली चित्रे आविष्कृत करण्यास जलरंगाचे माध्यम जवळ केले. आपले संपूर्ण आयुष्य भाईंनी हे माध्यम आत्मसात करण्यात तिच्या आराधनेत खर्ची केले, तेव्हां त्यांना या माध्यमात श्रेष्ठत्व व नैपुण्य मिळाले. दिसायला सोपे पण हाताळायला कठीण अशा या माध्यमातील स्फटिकाप्रमाणे असलेली शुद्धता, पारदर्शकता, जी त्यांच्या निसर्गचित्रातील विविध मूड्स दाखविण्याची ताकद ठरली. जलरंगाचे खास असे तंत्र त्यांनी विकसीत केले. त्यांच्या पहाण्यात जेव्हां रसल फ्लिंट या स्कॉटीश पेंटरची जलरंगातील समुद्र दृश्ये आली त्याचाही धोंडांच्या कलेवर मोठा परीणाम झाला. आणि तश्याच चित्रांचा जिव्हाळा भाईंना वाटत राहीला . मालवणमध्ये त्यांना तो निळाशार समुद्र, त्यांच्या लाटांवर एखाद्या समुद्र पक्षाप्रमाणे डुलणारे कोळ्यांचे मचवे, सर्वत्र पसरलेली माडाची,पोफळीची झाडे व सतत त्यांच्या डौलदारपणे हलणाऱ्या डुलणाऱ्या झावळ्या, हा सर्व निसर्गाचा देखावा आसमंतात पसरलेला असताना भाईंना मॉडेलची कधी गरजच वाटली नाही. निसर्ग हाच त्यांची प्रेरणा व तोच त्यांचे मॉडेल. आपल्या कामात सतत नावीन्य असावे म्हणून त्यांनी नेहमीच कामात स्वतःला मग्न ठेवले. आपल्या कलासक्त आयुष्याबद्दल बोलतांना भाई म्हणत, एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाने आयुष्याच्या धाग्याचा लहानसा तुकडा मी घेतला. व त्याची गुंफण अनेक रंगात केली. हे जग जेंव्हा एखाद्याला नाविन्यपूर्ण दिसते तेव्हां मला मात्र ते मनापासून लहान बालकाप्रमाणे जाणवते.
प्रा.धोंडांनी खूप काम केले. अनेक प्रदर्शनातून भाग घेतला. स्वतःची प्रदर्शने भरवीली. पण त्यांचा ओढा निसर्ग चित्राकडे जास्त होता. लॅंडस्केप व सीस्केप हे विषय त्यांनी जलरंगाने सहजतेने हाताळले. कोकणातील कोळी जमात व तेथील समुद्र किनारा त्यांच्या चित्रांचे विषय ठरले. सुमारे सत्तर वर्षे या माध्यमात त्यांनी काम केले. आपल्या जलरंगाच्या प्रात्यक्षिकाच्या वेळी त्यांनी ओल्या कागदावर एकदा का रंगाचा हात फिरवला, की क्षणार्धात पावसाळी ढगांनी भरलेले, अंधारून आलेले आभाळ निर्माण होत असे. वाटे की आताच त्यातून पावसाच्या धारा गळू लागतील. आणि मग त्यावर जराश्या मानवाकृती, होड्या, मचवे असे तपशील टाकले की त्यांचे चित्र पूर्ण होत असे. १९९७ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी आपले चित्रप्रदर्शन भरवले होते. ती सर्वच चित्रे नवीन केलेली होती. त्यांच्या या चित्रांतील ताजेपणा व टवटवीतपणा रसीकांना मोहवून टाकीत होता. त्यांचे शेवटचे प्रदर्शन तुळसीयांनी चेंबर्स मधील 'आर्ट रिसोर्ट ट्रस्ट' कला दालनांत झाले. त्यांची चित्रे सॅनफ्रॅन्सीस्को, म्युनिक, बर्लीन, साऊथ अफ्रीका, काबूल, चीन आणि रशिया येथे प्रदर्शीत झाली आहेत. भारतात त्याची चित्रे फाईन आर्ट सोसायटी, भाऊ दाजी लाड संग्रहालय, ललीत कला अकादमी, विधान भवन, नागपूर म्यूझीयम, बडोदा म्यूझीयम येथे संग्रहीत आहेत. भाईंनी अनेक प्रात्यक्षीके दिली. अनेक चर्चासत्रातून भाग घेतला. बॉंबे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनातून पारितोषिके मिळवीली. १९९० साली महाराष्ट्र सरकारने त्यांचा राज्यपातळीवर सत्कार करून त्यांचा गुणगौरव केला.
पण अश्या या निसर्ग अथवा समुद्रचित्रांसाठी भाईंनी फारसा प्रवास केला नाही. कधी नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवर वा कांही अन्य वाहिन्यांवर दिसलेला निसर्ग त्यांना भावला की तो त्यांच्या मेंदूत पक्का बसायचा. मग एकदोन दिवसांत त्या स्मरणातील कप्प्यातून ते अलगदपणे त्याला कागदावर उतरवीत. मात्र ती त्यांनी पाहीलेली नक्कल नसे, तर ते दृश्य आधुनिकतेचा साज चढवून आविष्कृत होत असे. त्यांचे सर्वच काम फ्लॅशी असायचे. भाईंची कामाची पद्धतही अनोखी होती. त्यांनी बोर्डावर कधीही कागद पिन टोचून लावला नाही. मांडीवर बोर्ड घेऊन ते बसायचे. शेजारील स्टूलवर रंगाची प्यालेट असायची. अन मग तल्लीन होऊन त्यांचे निसर्गचित्रण सुरु व्हायचे. तेही अश्या ममतेने जणू लहान बाळाला घास भरवत असल्याप्रमाणे. आणि यातून निर्माण व्हायचे निसर्गाच्या विविध लहरी पकडणारे सीस्केप. आणि यातूनच भाई धोंड बनले भारतातील जलरंगाचा बादशहा. त्यांचे चित्र अल्पावधीतच तयार होत असे. पण कोणी जर त्यांना विचारले की किती वेळ लागतो चित्र पूर्ण करण्यास? त्यावर त्यांचे उत्तर असे, ' पाच मिनीटे अन सत्तर वर्षे!' ही सत्तर वर्षे त्यांनी कला साध्य करण्यासाठी केलेल्या तपश्चर्येची असत.
असे हे धोंड मास्तर बोलण्यात व आठवणी सांगण्यात मोठे वस्ताद होते. स्कूल ऑफ आर्टचा ते चालता बोलता इतिहासच होते. जमशेटजी जीजीभाॅय ह्यांचा पैसा व नाना शंकरशेट ह्यांची जागा या संयोगातून उभारलेल्या या स्कूल ऑफ आर्टमध्ये घडलेलें नाना प्रसंग धोंड तपशीलवार सांगत असत. जे.जे.ची स्टाफरूम ही धोंड मास्तरांच्या गप्पानी व हास्य विनोदांनी फुलून निघत असे. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. एखाद्या गोष्टीचा संदर्भ त्यांना विचारायचा अवकाश, त्यांनी ती संपूर्ण हकीकत डोळ्यासमोर उभी केलीच म्हणून समजा! त्यांची सांगण्याची शैलीही इतकी सुंदर आणि नाट्यमय होती की ते ती व्यक्तीरेखा जिवंत करीत असत. त्यांच्या बोलण्यालाही कोकणी तिखटाचा स्वाद होता. एखाद्याला हसत हसत ते आपल्या खास मालवणीत चिमटा घेत. कित्येकांच्या ते नकलाही करीत. त्यांच्याशी गप्पा मारताना संपूर्ण रात्र कधी सरते हेही ध्यानांत येत नसे. अश्या या धोंड सरांच्या बहुढंगी व्यक्तीमत्वाची ओळख अनेक शिक्षकांना झाली नसल्यास नवलच! त्यांच्या वेळचे शिक्षक म्हणजे प्रा. विश्वनाथ सोलापूरकर, संभाजी कदम, सुकडवाला, संघवी, शंकर पळशीकर, बाबुराव सडवेलकर, वसंत परब, गजानन भागवत असे एकापेक्षा एक शैलीदार चित्रकार होते. यात कांही पोक्त होते, तसेच तरुणही होते. दुपारी जेवण झाल्यावर स्टाफरूम मध्ये सर्वांच्या गप्पा चालत. तेथे भाईंची हजेरी ही सर्वानाच उत्तेजक ठरे. त्यांच्या विनोदी गप्पांची ती एक मैफलच असे म्हणाना! त्या मैफीलीत ते कांही पोक्त प्राध्यापाकांना लक्ष करीत असत. त्यांच्या विनोदाचे विषय बनवीत. तावातावाने तेथे जर कोणी एखाद्या विषयावर गंभीर वाद घालत असेल तर भाई त्या चर्चेला अनपेक्षीतपणे विनोदी कलाटणी देत व त्या गंभीर विषयाला विसरून सर्वजण पोट धरून हसू लागत. एखाद्याचे प्रेम प्रकरण असेल तर त्याला खास असा मालवणी चिमटा काढून ते त्याला गोरामोरा करीत. अनेकांना आपल्यावर भाई कांही भाष्य करीत नाहीत या विचाराने अस्वस्थता वाटे. या त्यांच्या मैफीलीला त्यांनी स्वतःच 'धुरांडे’ असे नांव दिले होते. पण खरं पाहील तर भाईंच्या या गप्पा केवळ विनोदी नव्हत्या. त्या गंभीर होत्या. या धुरांड्यात त्या कांही कारुण्यापोटी वापरल्या होत्या. पण या गप्पाना एक साहीत्यिक मूल्य होते ते सर्वाना जाणवले. जे.जे.मधील प्रत्येक गोष्टीला ते साक्षीदार होते. तो जुना काळ त्यांच्या मनांत खोलवर रुजला होता. अशा या भाईना स्वत:ला डीन -अधीष्ठाता म्हणवून घेण्यात कधीच अप्रूप वाटले नाही. धोंडमास्तर या नांवानेच ते प्रसीद्ध झाले. त्यातच त्याना आपूलकी वाटत होती
१९६९ साली महाराष्ट्र राज्याचे कला संचालक म्हणून धोंड निवृत्त झाले. पण त्यांचे आर्ट स्कूलशी नाते अतूट होते.
गप्पांच्या मैफीली रंगतच होत्या. आणि या आठवणी सर्वांना उपयोगी पडतील या हेतूने त्या पुस्तक रूपाने याव्यात अशी सर्वांची भावना झाली. पण भाई याला तयार होत नव्हते. "नाय रे! माझ्या या धुरांड्यात काय तरी वाङ्मय आहे असं तुम्हांला वाटतं ते खोटं आहे! " पण संभाजी कदम आणि सोलापूरकरांनी त्यांचा पिच्छाच पुरवला तेव्हां ठरले की, भाईंनी सांगत जायचे आणि संभाजी कदमांनी लिहीत जायचे. आणि अश्या रीतीने त्यांच्या आठवणींचे पुस्तक लिहिण्यास सूरूवात झाली. आणि शेवट सुद्धा झाला. या पुस्तकाचे नांव ठेवले, "रापण". रापण म्हणजे कोकणातील गाबितांची रापणी. लांबलचक जाळे समुद्रांत दूरवर पसरवून त्यात मासे अडकले की, सुमारे पंचवीस तीस माणसे ते ओढून किनाऱ्याला आणतात. जाळे ओढणारे जेवढे असतात तितके त्या माश्यांचे वाटे करून प्रत्येकाला एकेक वाटा दिला जातो. त्याशिवाय आणखी एक वाटा देवाचा केला जातो. त्यातून कोणीही कितीही मासे फुकट घेऊ शकतो.
तसे पाहीले तर 'रापण' हे भाईंचे आत्मचरीत्र म्हणता येणार नाही. त्यात ते स्वतःविषयी खूपच कमी बोलले आहेत. पण तो एक त्यांच्या कारकिर्दीतील सांस्कृतीक, कलात्मक असा आढावा आहे. जे.जे.स्कूलच्या इमारतीतील जुनी माणसे, त्यांच्या चित्र नैपुण्यासहीत, सुखदुःखासहीत, रुसव्याफुगव्यासहीत त्यांनी उभी केली. आपले जीवन समरसून जातांना जे जे रसरशीत अनुभव आले तेच त्यांनी रसिकांना वाटले. वांद्र्याला कलाकारांची 'कलानगर' म्हणून जी वसाहत झाली तेथे त्यांना जागा मिळाली व त्यांनी तेथे बंगला बांधून आपल्या पत्नीचे 'आशा' हे नांव दिले. पुढे निवृत्तीनंतर तेथेच ते आपली मुलगी निशा व जावई किसन यांच्यासोबत रहात होते.धोंडांचे वय वाढत होते तरी मनाने ते चिरतरुण होते. वयाच्या ९२ व्या वर्षी कॅम्लीन फाउंडेशनच्या प्रदर्शनाचे ते उदघाटक होते. त्यावेळी कॅम्लिनच्या सुभाष दांडेकरांनी त्यांच्या तारुण्याचे कौतूक केले होते. दूरदर्शनवरील शेखर सुमन यांच्या 'मुव्हर्स अँड शेकर्स' या कार्यक्रमात त्या वयातही भाईंनी दिलखुलासपणे भाग घेतला होता व त्याच्यासोबत नृत्यही केले होते. वयाच्या ९२ व्या वर्षी केरळ येथे जाऊन त्यांनी तेथील 'बॅक वाॅटर' ची 'गॉड्स ओन कंट्री ' ही सीस्केपची मालीका जवळ जवळ पूर्ण केली. त्याचे त्यांना प्रदर्शन भरवायचे होते. वाटत होते की अजून भाईंची अशीच प्रदर्शने पहायला मिळणार, त्यांची जलरंगातील तंत्रकौशल्याने नटलेली चित्रे पहायला मिळणार. पण ते घडायचे नव्हते. २१ एप्रिल २००१ या दिवशी थोर चित्रकार, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता, प्रा. प्रल्हाद अंनत धोंड अथवा सर्वांचे लाडके भाई वयाच्या ९३ व्या वर्षी आपल्या कर्तृत्वाचे रंग भरत असतांना कृतार्थपणे या जगाचा निरोप घेऊन गेले. ज्या एका महान वटवृक्षाखाली आम्ही विसावलो होतो तो अचानकपणे कोसळल्याप्रमाणे आम्हांला वाटले
अश्या या भाईंची चित्रसंपदा आजच्या पिढीला अवलोकन करता यावी, त्यांच्या दैवी कुंचल्याचे पुनर्दर्शन घडावे, जलरंगातील धवल रेषा रसिकांना दाखवावी या हेतूने भाईंच्या १११व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून ११ जून ते
१७ जून २०१९ दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये भाईंच्या निसर्ग चित्रांचे एक भव्य प्रदर्शन भरवले आहे. भाई ज्या सहजतेने ती रेषा काढीत ती पाहताना कोणालाही वाटे की किती सोपे आहे हे? पण नाही ते सोपे तर नव्हतेच, त्यामागे होती कित्येक वर्षाची दीर्घ तपच्यर्या, दैवी देणगी आणि चित्रकलेच्या बाबतीतील अविरत आत्मीयता! हे प्रदर्शन आणि त्याचसोबत त्यांनी भाईंच्या तजेलदार अश्या निसर्गचित्रांची जणू मेजवानीच असेल अश्या दृष्टीने काढलेले ' धवल रेषा' हे संग्राह्य पुस्तक. अच्युत पालव यांनी अतिशय सुंदर रित्या संकल्पीत केलेले हे पुस्तक प्रत्येकाने जवळ बाळगावे असेच आहे. आणि ह्या प्रदर्शनाची कल्पना, त्याची जुळवाजुळव, आखणी, ग्यालरी मिळवणे, लेख मिळवणे या सर्वच गोष्टी जुळवून आणल्या आहेत त्या भाईंचा नातू केदार अन त्याची पत्नी रुपाली हीने. आणि ११ तारखेला सायंकाळी त्याचे भव्य उदघाटनही त्यांनीच करवून आणले. राज ठाकरे यांच्या हस्ते. शिवाय 'धवल रेषा' या पुस्तकासाठी राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाईंचे एक व्यक्तीचित्र देखील रेखाटले असून त्यामुळे पुस्तक उघडतानाच जणू प्रत्यक्ष भाईच आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होतो!
सर्वानीच आवर्जून पहावे असे हे अद्भूत निसर्गचित्रांचे प्रदर्शन आहे.
आजही जेव्हां ढगाळलेले आभाळ, उसळणारा समुद्र, त्यातील कोळ्यांचे मचवे पाहीले की चटकन ओठावर शब्द येतात,
अरे! हे तर भाईंनी केलेले सी स्केप !
प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
माजी अधिष्ठाता, सर ज.जी.उपयोजीत कला महाविद्यालय, मुंबई.




Comments
Post a Comment