र. कृ. जोशी : एका अक्षर यज्ञाची सांगता...
जे.जे. मध्ये मी असताना माझ्यावर सर्वानीच प्रेम केले म्हणा किंवा लाड केले म्हणा. पण सर्वच जण कश्यासाठीही यायचे ते माझ्याकडेच ! मग ते मनु देसाई असोत, यशवंत चौधरी असोत, र.कृ. जोशी, डॉ. रेगे, मनोहर जोशी, रमेश कुलकर्णी, अविनाश गुप्ते, किंवा इतर कोणीही येवोत, माझ्याकडेच आपली मागणी घेवून येत. आणि अश्या लोकांचा संग्रह ही मोठी संपत्ती मी जमा केली होती. तिचा अभिमान होता. आणि हे डीन नसतानादेखील ! अश्याच एकावेळी, १९८६ साली र.कृ.जोशी सर माझ्याकडे आले व मला म्हणाले, दिल्लीला ' जागतिक कॅलीग्राफीक परिषद भरवत आहे व इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट तर्फे डॉ. कपिला वात्सायन यांनी हे काम मला सांगितले आहे. प्रोजेक्ट मोठे होते. त्यासाठी काम करायला त्यांना हवे होते काही पक्की बैठक असलेले विध्यार्थी. माझ्या डोळ्यासमोर त्यावेळी आला तो संतोष क्षीरसागर. कॅलीग्राफी - टायपोग्राफिची आवड असलेला. त्याचे प्रोजेक्ट देखील एशियाटिक लायब्ररीवर त्याने केले होते. केवळ लिखाणच नव्हे, तर त्यामागे असलेली त्याची साधना, कल्पनाशक्ती,उर्जा आणि अभ्यासपूर्ण संशोधनी वृत्ती, या सर्वच बाबी त्याला उपयुक्त होत्या. कलानगर जवळील साहित्य सहवास मधील शांताबाई शेळके यांच्या रिकाम्या फ्लॅट मध्ये काम सुरु झाले.संतोष अगदी मनापासून काम करत होता. मला वाटते जोशींच्या सहवासात तो त्यावेळी प्रथमच आला. कधी आला तर अगदी जोशींच्या हुबेहूब आवाजात काय काय केले ते सांगायचा. तो नकला अप्रतीम करतो. एक दिवस मीही तेथे काय कामे चालली आहेत ते पाहायला गेलो. प्रचंड प्रमाणावर कामे होत होती. मीही देवनागरी मध्ये कॅलीग्राफी करून दिली होती
आणि एक दिवस अचानक मी माझ्या फायनल इयरच्या वर्गात बसलो असता, एक कुरियर आले. त्यामध्ये दिल्लीच्या इंदिरागांधी सेंटर ऑफ आर्टतर्फे 'आकार' या सुलेखन प्रदर्शनासाठी व ' अक्षरविन्यास' या जागतिक सुलेखन परिषदेसाठी सभासद म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते. मी दिल्लीला निघालो, अन मला आणखी दोन व्यक्ती मिळाल्या, मनु देसाई अन अशोक शहाणे. आम्ही दिल्लीत पोचलो, त्याच संध्याकाळी प्रदर्शनाच्या जागी पोचलो. तेथे र.कृ. सुलेखन ही प्रचंड आकाराची अक्षरे करताना दिसले. सायनेकर, वाडीशेरीया हे देखील तेथे दिसले. या सर्वांचीच कामे तेथे लागली होती. त्या प्रचंड मैदानावरील हिरवळीवर दोन प्रचंड अश्या अक्षराकृती उभ्या होत्या. एक होती ' अक्षरस्तंभ ' ज्यावर वेगवेगळ्या लीप्यातील अक्षरे होती. व दुसरी ' अक्षरशिल्प' तेथे ' आकार' ही अक्षरे विटांनी उभारली होती. हेच व्यासपीठ म्हणूनही वापरता येणार होते. याच हिरवळीवर व अक्षराकृतीच्या व्यासपीठावर देशोदेशींच्या नामवंत सुलेखनकरांनी आपली प्रात्यक्षिके दाखविली. या प्रदर्शनातील सुलेखनाला संगीताची जोड दिली होती, डॉ. अशोक रानडे यांनी. प्रत्येक दालनात वेगवेगळे संगीत महत्वपूर्ण भूमिका बजावीत होते. वातावरण निर्मीती करत होते.
आकार कशातून निर्माण झाला, त्यात चेतना कशी फुलली, याचे विवरण करताना, आधी शांतता होती, त्यातही संगीत होते. नंतर संगीताचा आवाज, ध्वनी उद्भवला. निराकारातून आकाराकडे, अन वाणीतून लिखाणाची कला उदयाला आली. प्रथम चित्रे काढली जावू लागली, पुढे त्यातून अक्षरे अवतरली. लिप्या विकसित झाल्या, यातूनच संवादाचे विश्व साकारले. हा सर्व इतिहास ' आकार' मध्ये मांडला होता. पहीली तीन दालने ' चेतस' ' आकाश' 'नाद' यावर आधारित होती. व्यक्त अव्यक्ताचे सर्वसाक्षी अनंत आकाश आहे, या कल्पनेतून साकार झालेल्या दुसऱ्या दालनात पूर्ण अंधार होता. फक्त मध्ये ठेवलेल्या एका पितळी कुंभावर प्रखर प्रकाशझोत टाकून शून्यातून साकारलेल्या ध्वनीचे प्रतिक व त्यावर संत कबीराच्या समर्पक ओळी,
" इस घट अंतर काग बगीचे, इसीमे सीरजन हारा !
इस घट अंतर सात समुंदर, इसी मी नौलख तारा !"
असे हे अक्षरविश्व दाखविणारे भव्य प्रदर्शन म्हणजे जोशी सरांच्या कल्पनेतून साकारलेला एक आकार होता. अशी ही अक्षरांची दुनिया जोशींसारख्या मराठी कलावंताने आपल्या हिमतीने राजधानीत उभारली. याच्या जोडीला होते ' अक्षरविन्यास' हे चर्चासत्र ! येथेही देशोदेशीच्या विद्वान सुलेखनकरांनी आपले शोध निबंध सादर केले. त्यातही अग्रणी होते जोशी सरच ! राजधानी दिल्लीत सतत दोन महिने सुरु असलेल्या या प्रदर्शनाने एक प्रकारे क्रांतीच घडविली होती. आणि या प्रदर्शनाची कल्पना, त्याची आखणी, संधर्भ शोधन, त्यासाठी कलाकृती जमविणे हे प्रचंड काम जोशी सरांनी केले. आणि तेही आपले आई. डी. सी. मधील अध्यापन सांभाळून.हे विशेष होते. त्या सोनेरी क्षणांचा एक साक्षीदार होण्याचे भाग्य त्यावेळी मला लाभले होते
असे हे आर. के. उर्फ र.कृ. जोशी कसे घडले हे पहाणे मोठे औत्सुक्याचे ठरेल. पटवर्धनांचे संस्थान आलेल्या सांगली मध्ये
२२ फेब्रुवारी १९३६ साली त्यांचा जन्म झाला. चित्रकलेची आवड असलेला लहानग्या रघूला अक्षरांचाही मोह त्या लहान वयात पडला. घरावरच्या, दुकानाच्या पाट्या पाहील्या की त्यांचे वळण रघु नजरेनेच गिरवीत असे. भितीवरील त्याकाळातील 'चले जावं' ही अक्षरे मान वर करून वाचायला जरा वेळच लागत असे. बोलताना थोडे चाचरावे लागत असल्याने अक्षरे वाचायलाही वेळ लागे. पुढे त्यांनी मुंबईच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या कमर्शिअल विभागात प्रवेश घेतला. तेथें अन्य कला विषयासोबत लेटरींग हा विषय देखील होता. पण तो ट्रॅजन काॅलमवर आधारित अश्या अक्षरांच्या उंची व रुंदीचे प्रमाण दाखवणाऱ्या व आपले सर्व गुण त्यातून स्पष्ट होत. मग मराठीतही अनेक अक्षरे आपण पहात असतो, पण छपाईमध्ये केवळ देवनागरीचं का? असे अनेक प्रश्न ते स्वतःलाच विचारू लागले. स्वतःच त्यांची उत्तरे शोधू लागले. आणि यातच त्यांची टायपांशी कधी मैत्री झाली ते कळलेच नाही.
दरम्यान र. कृ. जोशींचे कला शिक्षण पूर्ण होऊन ते डी.जे. केमर ( आताची ओगिल्वही) या जाहीरात संस्थेत कला दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तेथे काम करताना जोशींचे टाईप व कॅलीग्राफी यांच्यावरील संशोधन सुरूच होते. मराठी टाईपामध्ये मुद्रण करण्यासाठी किती कष्ट पडतात, याची त्यांना जाणीव होती. आकार, इकार, काना, मात्रा, वेलांटी, रफार, ऊकार, जोडाक्षरे, असे सुमारे सहाशेच्या आसपास खिळे असत. त्यांचा अभ्यास करण्यासाठी जोशींनी थेट 'मौज' गाठले. विष्णुपंत भागवतांनी त्यांना संपूर्ण मुभा दिली. व मराठी कंपोजिंगचे सर्व ठोकताळे जोशींनी शास्त्रशुद्ध रीत्या शिकून घेतले. १९६१ मध्ये ओगिल्व्ही सोडून तेथील र.कृ. जोशी, बाळ मुंडकुर, नौशीर चापगार या लोकांनी 'उल्का' ही नवीन जाहीरात एजन्सी सुरु केली. जाहीरात क्षेत्रात उल्काचे काम लक्षणीय ठरले. त्याच सोबत र.कृ. यांचा टायपोग्राफीचा अभ्यास करतांना डिझाईनचा विचार सुरु केला. पण प्रत्येक पाश्च्यात टाईपाचा अभ्यास करतांना त्यांना आठवत असे ती आपल्या मातीतील भारतीय लिपीच ! आणि उल्कांमध्ये काम करीत असतांना रोज संध्याकाळी एशियाटिक लायब्ररीमध्ये जाऊन जोशींनी तेथील पोथ्या, हस्तलिखीते, शिलालेख यांचा अभ्यास करण्यास आरंभ केला. रोजच्या त्या दोन तीन तासामध्ये जोशींनी त्या हस्तलिखितांच्या शैली, वळणे, सौंदर्यस्थळे यांचा अभ्यास सुरु केला. हा अभ्यास सतत दोन वर्षे चालू होता. व येथून पुढे जोशींचा पाश्च्यात टाईपांसोबतच भारतीय सुलेखनाचा अर्थात कॅलीग्राफीचा प्रवास सुरु झाला. फौंटनपेनचे निब लेखणी प्रमाणे कापून ते सुलेखन करू लागले. या काळात जोशींनी सत्यकथा या दर्जेदार मासिकांची मुखपृष्ठे केली. येथे त्यांच्यातील कवी, साहित्यिक, कॉपी रायटर, व्हिज्युलायझर, डिझाइनर अश्या सर्वच पैलूंना कोंदण मिळाले. आणि जाहीरात क्षेत्रासोबतच
‘र. कृ.’ हे नांव साहीत्य क्षेत्रातही गाजू लागले.
हे नांव तसे पाहीले तर त्या काळात सर्वच कला क्षेत्रांत गाजत होते. आज जी देशभर कॅलिग्राफी बहरली आहे तिचे उगमच मुळी जोशी सरांच्या हातातील बोरूच्या लेखणीने झाले आहे. या दरम्यान जोशी सरांच्या आयुष्यात घडलेली एक महत्वाची घटना म्हणजे फोर्टमधील खादी भांडार शेजारील ' चिमणलाल पेपर्स प्रा. लिमिटेड' या हात बनावटीच्या कागद विक्रेत्यांशी त्यांचा आलेला संबंध. कलाविश्वात या रंगीबेरंगी हात बनावटीच्या कागदांना अनन्यसाधारण महत्व होते. या कागदाचा रंग, पोत, खडबडीतपणा याचा खरा वापर जोशींनी केला. आपल्या लेखणीने तो नटवला. 'चिमणलाल' हा लोगो देखील त्यांनी आपल्या कॅलिग्राफीक पद्धतीत बनविला. चिमणलालचे पॅकींग पेपर्स, नोट पेपर्स, फोल्डर्स, कॅलेंडर्स, रॅपिंग पेपर्स, वाॅल पेपर्स, चोपड्या, लिफाफे, पिशव्या, आवरणं, तोरणं, दैनंदिन्या, असे जे जे माध्यम समोर येईल त्याला जोशींच्या लेखणीने स्पर्श केला. व चिमणलाल हे नांव कलाक्षेत्रात व मुद्रण क्षेत्रात उंचीवर नेवून ठेवले. चिमणलालचा तो कागद जोशींनी आपल्या स्पर्शाने मोहरून टाकला. अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी दासबॊधामध्ये लेखनाविषयी जे नियम सांगून ठेवले आहेत त्याचा वापर जोशी सरानी पुरेपूर केला. सुलेखन करताना शाई कशी तयार करावी, येथपासून ते अक्षर कसे काढावे, समास कसा सोडावा, वयोमानानुसार अक्षरांचे लहान मोठेपण कसे जपावे याचे सुंदर विवेचन रामदास स्वामींनी केले आहे. येणाऱ्या कैक पिढ्यांना त्या महापुरुषाने मार्गदर्शन केले आहे.
ब्राह्मणे बाळबोध अक्षर | घडसून करावे सुंदर |
जे देखतांचि चतूर | समाधान पावती ||
वाटोळे सरळ मोकळे | वोतले मसीचे काळे |
कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळे |
मुक्त माळा जैशा ||
या सुलेखनाच्या वचनांना र.कृ. नी सुलेखनाच्या कोंदणात बसवून चिमणलालचा दर्शनी भाग नटवला. र. कृं. च्या मते एक संवेदनशील कॅलीग्राफर हा लेखनाच्या सौंदर्यस्थळांचा शोध घेत, लिखाणाचे तत्वज्ञान, त्यातील पावित्र्य जाणवणारी अक्षररचना करतो. यात त्याचे अध्यात्मक अनुभव व मानसशास्त्रीय तत्वज्ञान सामावलेले असते. व या संस्कारक्षम अनुभवातून निर्माण झालेल्या ऊर्जेद्वारा या सुलेखनाची निर्मिती होती. जेव्हां एखादे अक्षर, त्याचे लिखाणाचे उपकरण व पृष्ठभाग याचा विचार केला जातो, तेव्हां त्यातील संवेदना, अंतस्थ हेतू याचाही विचार असतो. जोशी सरानी जेव्हां शिलालेखाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली, तेव्हां ते त्याच्या पार मुळाशी पोचले. शिलालेखाचा केवळ अर्थ नव्हे तर लिखाणालाही महत्व असते, हे त्यांना जाणवले. व जोशींनी असे खोदकाम करणारे त्यांचे चक्क चाळीस पूर्वज शोधून काढले. त्यांचा मूळ पुरुष त्यांनी शोधून काढला. ज्याने ख्रिस्त पूर्व २०० वर्षे अशोकाच्या शिलालेखावर आपले नांव शेवटी लिहिले होते, 'चापदं लिखितम इदम ' ( हे चापडने लिहीले आहे) आणि त्यावरूनच जोशींनी आपली प्राचीन लिपींशी साधर्म्य असणारी स्वतःची शैली निर्माण केली. साऱ्या भारतीय भाषांना लागू पडेल अशी 'देशनागरी ही स्वतंत्र लिपी निर्माण केली. लेखनाच्या विविध पद्धती अभ्यासल्या. मग त्या चित्रलिपी असोत, मुळाक्षरे असोत, वा नादमय असोत, त्यांना डिझाईन अथवा संकल्पना मध्ये बसवणे हेच त्यांचे उद्दीष्ट्य होते.
जोशी सरांकडे काव्य प्रतीभा होतीच. अगदी साध्या साध्या गोष्टीतून ती जाणवत असे. कधी त्यांच्या जाहीरातींमधील मजकूर काव्यपंक्ती वाटत, तर त्यांचे काव्य हे चित्ररूपाने अवतरे. कवीता करणे हा देखील र.कृं च्या जीवनातील विवीध पैलूंपैकी एक होता. त्यांनी काव्य शब्दबद्ध केले. शब्दाविनाही केले. कधी त्याला चित्रलिपीत गुंफले, तर कधी नादमय केले. या कवीता आहेत की नाहीत यावर समीक्षकात वादही झाले. पण जोशी सरानी आपले वेगळेपण त्यातूनही जपले. शब्द रचना करण्यात ते दंग असत. शब्दांचे, अक्षरांचे सामर्थ्य जाणण्याची शक्ती त्यांच्यापाशी होती. म्हणूनच आपल्या एका कवीतेत ते म्हणतात,
बारा स्वर आणि छत्तीस व्यंजने फक्त,
पण ती माग पुढं आलटून पालटून लिहीली गेली
की बरंचसं कांही सांगून जातात, मराठीत,
ज्ञानेश्वराच्या हाती ती ओवी बनतात
तुकोबांचे अभंग हीच अक्षरे गातात
एकनाथी भारूड त्यांतच वहावत जातं
टिळकांची सिंहगर्जना, चिपळूणकरांची निबंधमाला,
केतकरांचे ज्ञानकोशी भांडार नि केशवसुतांची तुतारी
यातूनच अवतरते...
एवढा हा शब्दभांडाराचा खजीना काव्यावाटे र.कृ. आपल्या समोर ठेवतात. आणि जाणवून देतात की आपल्या सृजनशील कृतीचे धनी आपण नसतो. ती असते केवळ कर्मपूर्ती. अश्या या कोमल कवी मनाच्या अक्षरवेड्या जोशी सरांना निसर्ग नेहमीच मोहवीत असे. एकदा गोव्याला ते सपत्नीक कांही कार्यक्रमासाठी गेले होते. गोवा कॉलेज ऑफ आर्टचे प्रिन्सीपॉल प्रा. महेश वेंगुर्लेकर यांच्यासोबत ते ते अंजुना बीचवर पोचले. संध्याकाळची वेळ होती. सूर्य नुकताच कलंडलेला होता. आसपास माडांची हिरवीगार झाडे क्षितिजावर डुलत होती. आणि ते दृश्य जोशी सर आकंठ प्राशन करीत होते. सर्वानाच त्यांनी ते दृश्य दाखवून म्हटले, ' पहा, त्या निळ्याशार आकाशावर ही हिरवीगार झाडे कशी लिहीताहेत ! त्यांचा शोध घेणं चालू आहे. निसर्ग सततच काहीतरी लिहीत असतो. आणि झाड हा त्याचा कुंचला आहे.' आणि ते ऐकताच सर्वानाच तो रोमांचकारक अनुभव आला.
एवढ्यात पावसाची भुरभुर सुरु झाली. समुद्राची एकेक लाट किनाऱ्यावरील वाळूला अलगद स्पर्श करून परतत होती. जणू दोघांचा पाठशिवणीचा खेळ चालला होता..आणि एकाएकी जोशी सरांनी आपले दोन्ही हात फैलावले. व धावतच ते वाळूत गेले. ओणवे होऊन त्यांनी हाताच्या पंजांचीच लेखणी केली व त्या ओलसर वाळूवर त्यांची कवीता उमटू लागली,
एक
अक्षर लिहावं
एक तप थांबावं
मग दुसरं अक्षर
आणि
तिथेच
मृत्यू ...
लयबद्ध अश्या सुलेखनात साकारलेली कवीता, झरझर चालणारा त्यांचा हात हे पहात असतांनाच र. कृ. नी सागराला हात जोडले अन ते म्हणाले, 'हे सागरा, आज ही कवीता मी तुला समर्पीत करीत आहे !' अन पुन्हां एक लाट आली, अंगावरून जस मोरपीस फिरावं तशी अलगद त्या अक्षरांवर पसरली आणि क्षणांत ती अक्षरे सोबत घेऊन परत गेली. कवीतेची जागा आता मोकळी दिसत होती. अगदी निसर्गाने देखील ह्या शब्दवेड्या कवीला, त्याच्या अक्षर सौंदर्याला त्यादिवशी मनापासून दाद दिली, एका समर्पणाला साक्ष ठेवून!
र.कृं ची हॅपनींग अथवा अक्षर घटना
१९५०च्या आसपास ॲलाॅन कॅप्रोव्ह या चित्रकाराने आपल्या सृजनशील मनामधून नैसर्गिकरित्या कोलाजमध्ये अकस्मातपणे केलेले सादरीकरण खूपच खळबळ माजवून गेले. हेच ‘हॅपनींग’ हा पाश्च्यात प्रकार जोशींनी प्रथमच येथे सादर केला. गंमत म्हणजे कॅलिग्राफी अथवा सुलेखन हे देखील या देशात जोशी सरानी प्रथम आणले, तसेच हॅपनींग हे देखील त्यांनीच आणले. व या दोन्ही गोष्टींची सुरुवात त्यांनी सर जे.जे. उपयोजीत कला संस्थेत केली. आरंभालाच त्यांनी एका लांबलचक अश्या कागदावर विद्यार्थ्यांकडून अनेक भाषांमधील अक्षरे काढून घेतली. नंतर तो कागद सर्व विद्यार्थ्यांनी डोक्यावरून मिरवणुकीने नेला व नंतर 'हॅपनींग' असे एकमुखाने ओरडून तो कागद फाडून टाकला. या हॅपनींगचेज आम्ही सर्व साक्षीदार होतो! निरनिराळ्या भाषेतील अक्षरांच्या साहाय्याने केलेली जनजागृती, अक्षराबद्दलचे त्यांचे प्रेम वाढीला लावले. आणि त्यानंतर सुरु झाली ती हॅपनींग अथवा अक्षर घटनांची एक विस्मयकारक मालीका! यात त्यांनी समाजाच्या सर्व घटकांना सामील केले होते. एका मध्यरात्री शिवाजी पार्कच्या मैदानावर असंख्य लोक ज्यावर निरनिराळ्या भाषेतील अक्षरे काढलेले अनेक आकारांचे रंगीबेरंगी झेंडे घेऊन आले व मैदानावर जागोजागी रोवून शांतपणे निघून गेले. पहाटे जोशी सर तेथे फिरायला येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रीया जाणून घेण्यास हजर होते. असंख्य लोकांनी हे दृश्य पाहीले. त्याच वर्षी गिरगांवातील एका चाळीमध्ये वेगवेगख्या भारतीय लिप्यांचे आकार काढलेले आकाश कंदील त्यांनी टांगले. त्याचसोबत लिपियुक्त दिव्यांच्या पणत्या पेटविल्या होत्या. त्या सर्वसामान्यांच्या नजरेत भरल्या. एक आगळावेगळा प्रकार जन्माला आला होता.
असाच एक प्रयोग जोशींनी एशियाटीक लायब्ररीत केला. खूप मोठ्या आकाराचे ' अ ' हे अक्षर अनेक लिप्यामध्ये काढून ती प्रचंड अक्षरे लायब्ररीत येणाऱ्या प्रत्येकाकडे त्यांनी दिली. अगदी 'शांतता कोर्ट चालू आहे' या नाटकांमध्येही त्यांनी त्याचा वापर करून घेतला. प्रत्येक अभिनेता त्याचे एक वाक्य वेगळ्या भाषेत म्हणत असे. सुरुवातील लोकांना हे विक्षिप्तपणाचे वाटले. पण नंतर त्यांना त्यातील महत्व कळू लागले. यामध्ये जोशींनी सतत पाहीला तो भारताच्या एकात्मतेचा दृष्टीकोण. केवळ ही अक्षरेच या देश्याच्या अखंडत्वाला प्रेमरज्जूनी घट्ट बांधून ठेवतील याची र.कृ. ना मनोमन खात्री होती. या त्यांच्या हॅपनींग शृंखलेमधील 'ग्रंथाली'च्या जन्मकाळातील एक अक्षर घटना सांगीतल्याशिवाय रहावत नाही. 'ग्रंथाली' या संस्थेच्या स्थापनेच्या वेळी जोशींनी एक ग्रंथ दिंडीची कल्पना रुजविली. साहीत्य सहवास या साहित्यिकांच्या वस्तीतून एक दिंडी काढायची असे ठरले. यावेळी त्याकाळचे समविचारी साहीत्य प्रेमी तेथे जमले. यामध्ये गांगल. र.कृ. जोशी, त्यावेळी तरुण असलेले निखील वागळे हे वरून पाहणाऱ्यांना आवाज देत होते, 'बघता काय! सामील व्हा! ' पुढे ही दिंडी सरकारी वसाहतीजवळील हनुमान मंदिरा पर्यंत जाऊन परतली.
आतापर्यंत त्यांची हॅपनींग नवनवे प्रयोग आकारत होते. यामध्ये लोकांचा सहभागही मिळत होता. आणि एक दिवस सुप्रसीद्ध कवी रमेश तेंडुलकर यांनी ते शिकवीत असलेल्या 'कीर्ती कॉलेज'मध्ये असे हॅपनींग करायचे त्यांनी ठरवले. आणि या हॅपनींगचे नांव होते ' लयबंध' ! महाविद्यालयाच्या प्रांगणात मंडळी जमली. काहीजणांना कोठे उभे रहायचे, काय करायचे ते सांगीतले होते. एकाने आधी एका वैशिष्ट्य लयीत टाळी वाजवायची. एक...दोन ...तीन...अश्या आघातात त्या वाजवायच्या. त्याला प्रतीसाद म्हणून दुसऱ्या कोणीतरी त्याच्याशी संवादी अश्या वेगळ्या टाळ्यांनी प्रत्यूत्तर द्यायचे. पुढे त्याला जोडून काव्य, शब्द, हावभाव, गिरकी, शांतता अश्या विभिन्न प्रतिसादातून त्या मूळ टाळीशी बंध जोडायचे. यातून विणला जायचा तो विविध भारतीय एकात्मतेचा दृढ संदेश. शब्दाचा वा अक्षरांचा वापर करण्यासाठी जोशी सरांना माध्यमं आपोआप मिळत. काव्य हा त्यातीलच एक प्रकार. याची मुहूर्तमेढ सत्यकथेत रुजली. यामध्ये सुलेखनातील कवीता, शब्दांविना कवीता, नाद कवीता या गाजल्याही. ज्यांचे अधिष्ठानच ध्वनी होय. अश्या ध्वनिकविता जागतीक पातळीवर जाऊन पोचल्या. ते म्हणत, एक काळ असा होता की कवीता कानावाटेच मनांत शिरायची. कवी त्या वाचून दाखवीत. मुद्रण कला आली, आणि कवीतेचा छापील ठसा डोळ्यासमोर येऊ लागला. तीच कवीता आता मूकपणे डोळ्यावाटे मनांत शिरू लागली.
जोशी सर केवळ संकल्पनाकार नव्हते, केवळ उपयोजीत कलाकार नव्हते, केवळ टायपोग्राफर-कॅलिग्राफर नव्हते, जाहीरात कला तज्ञ नव्हते तर ते होते आजच्या काळातील गुरुकूल. आपले ज्ञान दुसऱ्याला द्यावे, शिष्य घडवावे, आयुष्यभर व्रतस्थपणे काम करत ज्ञानाची गंगा सदैव वाहती ठेवावी. असे त्यांचे ऋषीं प्रमाणे व्यक्तीत्व होते. लेखनकलेचा त्यांचा अभ्यास हा मूलतःच सुरु होता. प्राचीन काळी बायबलच्या प्रती प्रसारासाठी तयार करवून घेतल्या जात. त्याचे काम अनेक कॅलिग्राफरकडे देण्यात येत असे. पुढे त्यावर राजकीय राजवटींचा, वातावरणाचा तसेच तत्कालीन वास्तुशैलीचा प्रभाव पडत गेल्यामुळे निरनिराळ्या सुलेखनाच्या शैली अस्तीत्वात आल्या. आणि जोशी सरांनी सर जेजे उपयोजीत कला संस्थेला कॅलिग्राफीच्या आधीन केले. सर्व विद्यार्थ्यांकडे कापलेल्या निबचे फौंटन पेन दिसू लागले. जे.जे.चे वातावरण सुलेखनमय झाले. आणि हीच कॅलिग्राफी पुढे त्यांनी देशभर नेली. एवढेच नव्हे तर तिला जागतीक पातळीवर स्थान मिळवून दिले. आज अनेकजण कॅलिग्राफी गिरवतात पण या मागे केवळ प्रेरणा आहे ती र.कृ. जोशी नामक तपस्वी माणसाच्या कठोर तपश्चर्येची ! त्यानी हा विषय कला अभ्यासात अंतर्भूत करायला लावून त्याला एक प्रतीष्ठा मिळवून दिली. यानंतर जोशीसरांचे काम सुरु झाले ते संगणकावर मराठी टाईप फॉन्ट बसवण्याचे. अक्षर-लिपी यांचा जेव्हा जेव्हा ते विचार करीत त्या त्या वेळी आजच्या या प्रगत जगात इतर पाच्छ्यात लिप्यांसोबत आपली देवनागरी येणे आवश्यक आहे, या एकाच विचाराने ते मग्न होत असत. म्हणूनच संगणकाशी त्यांनी नाते जोडून त्याला आत्मसात केले. 'विन्यास' हा सुलेखनावर आधारीत व वापरण्यास सोपा जावा या हेतूने सॉफ्टवेअरची रचना केलेला हा टाईप. ही पद्धत वापरून जोशींनी पुढे ३-४ वर्षे खपून बरेच टाईप संकल्पीत केले. झपाटून गेल्याप्रमाणे त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिले होते. आणि याच भारतीय सुलेखनाचे स्वातंत्र्य आणि हक्क अबाधीत रहावेत, संस्कृत भाषा ही परकीयांच्या मालकीची होऊ नये, या हेतूने त्यांनी प्रकृती साथ देत नसताना देखील आपला प्रकल्प सादर करण्यासाठी अमेरीकेच्या सॅनफ्रॅन्सीस्को या विमानतळावरच त्यांना हृदय विकाराचा झटका आला. आयुष्यभर जोशी सरांनी आपल्या श्वासावाटे सुलेखनाची चिंता व उश्वासवाटे सुलेखनाचे उत्कर्ष पाहीला होता.
जोशी सरांनी काय नाही केले? शालेय वयापासूनच त्यांनी भारतीय सुलेखनाच्या खजीन्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. ज्यामध्ये आहे नाद हे समान सूत्र. ही संपन्न अशी लिपी सौंदर्यदृष्ट्या ऐतीहासीक कॅलीग्राफिक, टायपोग्राफिक अशी सर्वच दृष्टीने समृद्ध आहे. भारतात भारतीय लिपीची ओळख करून द्यायचे काम जोशींनी एकट्याने केले. सुलेखन पुनरुज्जीवित केले. संगणकाशी जोडले. व जागतीक पातळीवर नेवून ठेवले. कसलीही अपेक्षा न ठेवता हे काम केले आहे. कदाचीत याची दखल घेतली गेली नसेल. पण अनेक अक्षरवेडे त्यांच्या या यात्रेत सामील झाले. त्यांचा हा वारसा अनेकांनी पुढे चालवीला. आणि या विश्वाच्या नियंत्याकडे त्यांची वेगळी मागणी काय असेल? आय. डी. सी. मधील एका प्रकल्पाच्या फिल्म मधील सांगतेचं दृश्य आलं तेव्हां र.कृ. यांचं एक वाक्य समोर आलं. वाक्य कुठलं, आपल्या संपूर्ण जीवनाचे सारंच त्यात त्यांनी मांडलं होतं.
- प्रा. मं.गो. राजाध्यक्ष









Comments
Post a Comment