जयप्रकाश नारायण यांचे सरकारी पातळीवरील खोटे निधन :


२३ मार्च १९७९ चा दिवस एक भयानक रूप घेऊन या देशात आला.  दुपारी १.१० च्या सुमारास आकाशवाणीने आपले रोजचे दैनंदिन कार्यक्रम अचानकपणे बंद करून देशाला एक सुन्न करणारे वृत्त दिले. आणि ते होते लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे दुःखद निधन! वास्तवीक जयप्रकाश नारायण हे त्याकाळी जसलोक इस्पीतळात मृत्यूशी झुंजत होते. कोणत्याही क्षणी अशी बातमी येईल ह्याची जनतेला अपेक्षा होती. आणि या बातमीवर विश्वास न ठेवण्यासारखे कांहीच नव्हते. थोड्याच वेळात जसलोक इस्पीतळाला वृत्तपत्र वार्ताहर, दूरदर्शन चॅनल, छ्यायाचित्रकार यांनी गराडा घातला. आणि इकडे निष्णात डॉक्टरांची फौज जयप्रकाश याना आराम पडावा म्हणून शर्थीचे प्रयत्न करीत होते. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून झटत होते. आणि त्यावेळी त्यांनी हे वृत्त पाहीले तेव्हां जसलोकचे संचालक डॉ. टी. एच. रिंदानी ओरडलेच, येथे आम्ही शर्थीचे प्रयत्न करीत आहोत, आणि तेथे पहा ते काय वृत्त देत आहेत ? एका जिवंत व्यक्तीला मृत समजून ही बातमी दिली होती, तीही अश्या व्यक्तीला की त्याकाळात आपल्या एका शब्दावर संपूर्ण देशाला हालवीत असे. आणि राज्यसभेत पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी जयप्रकाश नारायण यांना श्रद्धांजली वाहीली. सर्व शाळा, दुकाने बंद झाली. पण ही चूक पत्रकारांची अथवा वृत्तपत्रांची नव्हती. मग कोणाची होती?

आता याच्या पार्श्वभूमीकडे जरा पाहू. जयप्रकाश नारायण हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी नेते. गांधीजींच्या हाकेला ओ देऊन ते त्यांच्या आश्रमातही राहीले होते.त्यांच्या सोबत सुरज नारायण सिंग, राम मनोहर लोहीया, अरुणा असफअली आदी लोक चळवळीत होते. स्वातंत्र्यानंतर राजकारणापासून थोडे दूर राहीलेल्या जयप्रकाशजींनी १९६० साली पुन्हां सक्रीय राजकारणात भाग घेतला. गुजरात मधील 'नव निर्माण आंदोलन' त्यांनी सुरु केले. बिहारमध्ये त्याकाळात सरकारने लोक आंदोलनांना पाशवी पद्धतीने चिरडण्यास सुरुवात केली होती. स्वातंत्र्य मिळून २७ वर्षे झाली तरी भूक, बेकारी, भ्रष्टाचार वाढत होता. त्याविरोधात जयप्रकाश यांनी शांती मोर्चा काढला. पाटणाच्या गांधी मैदानावर लक्षावधी लोकांची प्रचंड सभा घेतली. १९७४ साली बिहारमधील विध्यार्थ्यांना एकत्र करून त्यांनी विद्यार्थी चळवळ उभारली, जी पुढे लोकांनी उचलून धरली व तिचे रूपांतर बिहार चळवळ मध्ये झाले. याच काळात इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्या विरुद्ध लढलेले राजनारायण यांनी इंदिराजींनी  निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केल्याचा, भ्रष्टाचार केल्याचा  खटला भरला. तो सिद्ध होऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने  १२ जून १९७५ रोजी इंदिराजींची निवडणूक रद्द ठरवली. त्यावेळी जयप्रकाश यांनी इंदिराजींना खुर्ची खाली करण्यास सांगितले. कोलकात्याहून  दिल्लीला मोठा मोर्चा काढण्यात आला. सैन्य व पोलीसांना चुकीचे आदेश न पाळण्याचे आवाहन जयप्रकाश यांनी केले. आजचे नेते नितीश कुमार, लालमुनी चौबे, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान हे त्यावेळी त्यांच्या ' छात्र युवा संघर्ष वाहिनी’चे  कार्यकर्ते होते.  रामलीला मैदानावर लाखांनी लोक जमले. त्यांच्या तोंडी रामधारी सिंग दिनकर यांच्या काव्य पंक्ती होत्या , त्या ' सिंहासन खाली करो के जनता आयी है ' आणि २५ जून १९७५ च्या मध्यरात्री इंदिराजींनी राष्ट्रीय आणीबाणी घोषीत केली. त्याच रात्री जयप्रकाश यांच्यासोबतच अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. वृत्तपत्रावर सेन्सॉरशीप लादण्यात आली. सामान्य जनतेला देशात काय घडत आहे हे समजतही नव्हते.तुरुंगात जयप्रकाशजींची प्रकृती बिघडली. त्यांना चंदीगड येथे कैदेत ठेवण्यात आले होते. बिहारमधील पूरग्रस्त लोकांसाठी फंड जमा करण्याकरीता आपल्याला एक महीना पॅरोलवर  सोडावे अशी त्यांनी विनंती केली पण ती मान्य केली नाही. 


२४ ऑक्टोबर  रोजी जयप्रकाशजींचं तब्येत बिघडली. त्यामुळे १२ नोव्हेम्बरला त्यांना मुक्त करून मुंबईच्या जसलोक इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचे एक भक्त व पत्रकार श्री रामनाथ गोएंका यांनी त्यांची सर्व जबाबदारी घेतली होती. एक्सप्रेस टॉवर्स वरील पेंट हाऊस येथे त्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. पण त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याची जाणवल्यामुळे पुढील सर्व आयुष्य त्यांना डायलिसिस वर काढावे लागले. ही मूत्रपिंडे आपल्या तुरुंगवासाच्या कारकिर्दीत कदाचीत निकामी करण्यात आली असावी असा संशयही त्याकाळात त्यांनी व्यक्त केला होता.
१८ जानेवारी १९७७ रोजी इंदीरा गांधींनी आणीबाणी उठवली व निवडणुका जाहीर केल्या. आणि सर्व विरोधक जयप्रकाश यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आले, तेव्हां सर्वजण आपसातील मतभेद विसरून जर का एकत्र आले तर आपण मदत करू असे सांगून त्यांनी सर्व पक्षांना आपापले पक्ष विसर्जीत करून जनतेचा एकच पक्ष बनविण्यास सांगीतले व त्यातून 'जनता पक्ष' उदयाला आला व त्याने दिल्ली काबीज करून देशातील पहिलेच बिगर काँग्रेस सरकार बनवीले. 'जनता सरकार’  अशी बिरुदावली मिरवणारे जनतेचे सरकार ही लोकप्रिय नेते श्री जयप्रकाश नारायण यांनी देशाला एक प्रकारची देणगी दिली होती. खुद्द राजनारायण यांनी इंदीरा गांधींचा रायबरेली मतदार संघातून प्रचंड मतांनी पराभव केला. व खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचे गुरु डॉ. राममोहन लोहीया यांचे काँग्रेसला उखडून टाकायचे स्वप्न पूर्ण केले.  आरंभाला  सुरळीत चालू असलेल्या या सरकारमधील कांही हेकेखोर आणि महत्वाकांक्षी लोकांनी त्याला पोखरण्यास सुरुवात केली . आणि जनतेच्या सिंहासनाला सुरूंग लागला. तब्येत ढासळलेले जयप्रकाशजी हे हताशपणे पहात होते. पण ते आता काहीही करू शकत नव्हते.त्यांच्यात आता ताकद उरली नव्हती. 


अशातच ते शरपंजरी पडलेल्या भीष्मप्रमाणे लढत असतांना इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकांना  दुपारी एक वाजता त्यांचे उपसंचालक श्री डी. एस. सोमण यांच्याकडून संदेश आला की, १२.४० वाजता जयप्रकाश नारायण यांची मृत्यूशी झुंज संपली व ते आता राहीले नाहीत. हा संदेश पोलीस कंट्रोल रूम मधून आल्याचे त्यांनी सांगीतले. महाराष्ट्राच्या एका उपसचिवाकडू हे वृत्त त्यांना मिळाले होते. यामुळे इंटेलिजन्स ब्युरोला यात शंका घेण्याचे कांही कारणच नव्हते. त्यांनी तात्काळ हे वृत्त पंतप्रधान मोरारजी देसाई यांना कळविले. पंतप्रधानांनी सभापती हेगडे यांना लोकसभेत बोलावून हे वृत्त दिले. आणि पंतप्रधानांनी लोकसभेत जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या दुःखद निधनाबद्दल (?) श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.  संपूर्ण देश या वृत्ताने स्तब्ध झाला होता. आणि इकडे जसलोक मधील डॉक्टर आपण नेटाने त्यांचे प्राण वाचवायचे प्रयत्न करीत असता, त्यांच्याबद्दल खोटे वृत्त दिले जात आहे हे पाहून संतापले होते. आणि पाठोपाठ बातमी आली की जयप्रकाशजींच्या निधनाचे वृत्त खोटे आहे. त्यांच्यावर रीतसर उपचार सुरु असून ते त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.  त्यांची तब्येत चांगली आहे. तेव्हां काँग्रेस इतर विरोधी पक्षांनी लोकसभेत व राज्यसभेत सरकारच्या राजनाम्याची मागणी केली. तब्बल चार तासांनी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी झाल्या प्रकाराबद्दल देशाची  मनापासून व बिनशर्त माफी मागीतली.  दिल्लीहून जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर हे इस्पितळात येऊन तळ ठोकून होते. जयप्रकाशजींच्या शत्रू मानल्या गेलेल्या इंदिरा गांधी या स्वतः तात्काळ हजर राहील्या व आजारी जेपींची तब्येत पाहून गेल्या. मात्र जनता पक्षाचे अध्वर्यू मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग व बाबू जगजीवनराम हे दिल्लीत बसून होते. वास्तवीक यावेळी ते येथे पाहीजे होते अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली होती. अखेर २३ तारखेला मोरारजींनी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावेळी त्यांचे तरुण तुर्क असलेले मधू लिमये आदी सहकारी तेथून निघून गेले.

सदर प्रकरणावर जो लोकक्षोभ झाला होता, त्यासाठी इंडीयन एक्सप्रेसचे संपादक तसेच जयप्रकाश नारायण यांचे चाहते श्री अरुण शौरी यांच्यावर तो शांत करण्याची जबाबदारी टाकली होती. शौरींनी यावर एक लेख लिहून झालेल्या चुकीबद्दल जनतेचा क्षोभ शांत करण्याचा प्रयत्न केला. आपल्या लेखात त्यांनी म्हटले होते, ' मरणा आधीच मृत्यूची बातमी देणाऱ्या या सरकारने आधी त्यांची वचने मारली, व आता त्यांनाच जिवंतपणी मारले.'

विचार करून पहाता यात कोणाची चूक होती? जेव्हां अशी बातमी येते तेव्हां पंतप्रधान कार्यालयाने जसलोक इस्पितळातील संचालक यांच्याशी संपर्क साधून खरे वृत्त घेता आले असते. आकाशवाणीनेही वृत्त देण्यापूर्वी या बातमीची शहानिशा करायला हवी होती. ज्या उपसंचालकाने ही बातमी पुढे पाठवली, त्यालाही जसलोकंशी संपर्क साधता आला असता. स्वतः रामनाथ गोएंका एक प्रभावी पत्रकार होते, त्यांच्याशीही संपर्क झाला असता. नंतर एक्सप्रेसने एक वृत्त दिले त्याप्रमाणे या बातमीची सुरुवात कश्या प्रकारे झाली त्याचे गूढ उकलत गेले. जेव्हां एखादी मोठी व्यक्ती मृत्यूशी झुंज देत असते, तेव्हां त्याच्या अंतीम यात्रेची तयारी ही आधीपासूनच केली जाते. कित्येक वृत्तपत्रेही आपले मृत्युलेख देखील तयार करून ठेवत असतात. नंतर त्यात तारीख व वेळ टाकली की काम झाले. त्याच प्रमाणे दिल्लीहून महाराष्ट्र सरकारला सूचना आली की जयप्रकाश नारायण यांची तब्येत अतीशय खालावल्यामुळे कोणत्याही क्षणी काय होईल याची कल्पना नव्हती. त्यासाठी राष्ट्रीय सन्मानाने त्यांची अंत्ययात्रा काढायची असल्याने त्यासाठी एक चिलखती गाडी तयार ठेवावी. सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या त्या उपसचिवाने पुढील सर्व धागे आपल्या कल्पना विलासाने जोडले. व त्यातून देशाला तसेच केंद्रसरकारला हादरवून सोडणारी एक बातमी जन्माला आली.


पुढे जयप्रकाश नारायण यांचे निधन वयाच्या ७६ व्या वर्षी  पटना येथील त्यांच्या रहात्या घरी हृदयविकाराने झाले. मधमेहानेही ते त्रस्त होते. त्यांच्या स्मरणार्थ ज्या जसलोक इस्पितळाने त्यांची सतत काळजी घेतली होती, त्यांचे सतत डायलिसीस केले होते, त्या जसलोकला मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असलेल्या रुग्णांसाठी डायलिसीसचे यंत्र देणगीदाखल देण्यात आले.
त्याकाळात लोकांच्या तोंडी एकच घोषणा होती,
                    
                       " अंधेरे मे एक प्रकाश, जय प्रकाश- जय प्रकाश! "

-प्रा. मं.गो. राजाध्यक्ष

( लेखाच्या संदर्भासाठी वापरलेली व त्याकाळात 'मार्मिक' व्यंगचित्र साप्ताहिकात प्रसिद्ध झालेली सर्व व्यंगचित्रे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आहेत )

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

माझे वडील कलाकार होते :

अक्षरांची प्राचीन सौंदर्यदृष्टी जपलेला कला प्राध्यापक : प्रा. रमेश खापरे.