एक दृष्टा औद्योगीक विकास महापुरुष : भाऊसाहेब नेवाळकर
या महाराष्ट्रात अशी अनेक व्यक्तीमत्वे घडली, की ज्यांची फक्त आपण शिखरेच पाहू शकलो. पण त्यांच्या अफाट कार्याचा भाग जो आपणास दृष्टीक्षेपात आला नाही, त्यावरून आपण त्यांचे मोठेपण जोखू शकलो नाही. एखाद्या प्रभावशाली ज्योतीचा दूरवर पडलेला प्रकाश केवळ आपण जाणू शकलो. त्या ज्योतीची संवेदनशक्ती पाहू शकलो नाही. आणि आपल्या कर्तव्याने, कृतीने, युक्तीने , व्यासंगाने अफाट असलेली ही दृष्टी माणसे आपण आपणाप्रमाणे सर्वसामान्य समजू लागलो. त्यांना आपल्यातीलच समजू लागलो. कारण त्या व्यक्तीही आपले मोठेपण विसरून सर्व सामन्यांमध्ये समरस होत. त्यांच्यातच मिसळून जात. अश्याच एका महापुरुषाचे नांव आहे, गणेश बा. उर्फ भाऊसाहेब नेवाळकर.
२८ ऑगस्ट १९१५ रोजी जन्मलेल्या भाऊसाहेबांचा स्वातंत्र्य चळवळीशी जवळून संबंध आला. अनेक पुढारी त्यांच्या सान्नीध्यात आले. ते स्वतः भूमीगत होते. अनेक मोठमोठ्या नेत्यांची संगत त्यावेळी त्यांना होती. सर्वानीच आपली नांवे बदलली होती..भाऊसाहेबांनी 'नवरे' हे नांव घेतले होते. पण स्वातंत्र्यानंतर मात्र भाऊसाहेबांनी राजकारण अंगीकारले नाही. लहान सहन नोकऱ्या करणे, पत्रकारीता करणे यातच ते आपल्या जीवनाला नवीन कलाटणी देऊ पहात होते. आचार्य अत्रे यांच्या ‘जयहिंद’ व 'नवयुग'ची कांही काळ संपादकीय धुराही त्यांनी सांभाळली. पण अत्र्यांच्या कांही न पटलेल्या गोष्टींवरून त्यांनी राजीनामा दिला व पुन्हा तेथील पायरी चढणार नाही ही प्रतीज्ञा करून शेवटी ती त्यांनी पाळली. आणि याला कारण होते ते दत्तू बांदेकर यांची वर्तणूक. पण अत्रे यांच्याशी त्यांचे संबंध राहीले. आणि स्वातंत्र्याची पहाट उगवताच त्यांना प्रथम दिसला तो स्वतंत्र भारताच्या नवनिर्माणाचा प्रकाश किरण. एकीकडे स्वातंत्र्य चळवळीतील काम केलेल्या शिलेदारांची पलटण दिमतीला होती. त्या काळात त्यांची दुखी कष्टी सामान्य माणसाशी घट्ट नाळ जुळली गेली होती. जनतेचे दुःख, दारीद्र्य, दैन्य हे काय असतं हे त्यांना नवीन नव्हते. त्यामुळे स्वतःचे मोठेपण त्यांनी कधीच दुसऱ्यावर लादले नाही. तर त्यांच्या सुख-दुःखाशी समरस होऊन त्यांनी नेहमीच इतरांची दुःखे कमी करणे, त्यांना मदत करणे हेच व्रत अंगीकारले. त्यांच्या मोकळ्या वागण्याचा एक आदरयुक्त धाक लोकांना जाणवायचा. पण याचबरोबर त्यांनी आपणात व लोकांत कधीच अंतर पडू दिले नाही. भाऊसाहेबांना कदाचीत जाणवत असेल तो त्यांच्या महाराष्ट्रातील लोकांनी उद्योजक म्हणून पुढे यावे. उद्योग आणि भाऊसाहेब यांचे एक नाते मुळातच भाऊसाहेबांच्या हृदयांत ठाण मांडून बसलेले असावे. आणि जोडीला होता तो त्यांचा पूरक असा दृष्टेपणा. काळापुढील गोष्टी पाहण्याची ताकद. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर यशवंतरावांना एक आदर्श अश्या संस्कृतीने नटलेले राज्य उभारण्याची इच्छा होती. त्यासाठी यशवंतरावजींनी महाबळेश्वर येथे एक शिबीर आयोजीत केले. त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, भाऊसाहेब नेवाळकर, गोविंद तळवलकर अश्या दिग्गजांची बैठक घेऊन राज्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान चीनचे आक्रमण झाले. व एक दिवस अचानक यशवंतरावांचा निरोप आला की मला तात्काळ विमानतळावर येऊन भेटा.
आणि त्याच या त्यांच्या दृष्टेपणातून त्यांनी १९६१ मध्ये एका उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली होती. उद्योजकतेची आवड, राज्यासाठी काहीतरी करून दाखविण्याचा उद्देश आणि डोळ्यासमोर असलेला मागास असा महाराष्ट्राचा ग्रामीण भाग, यातून या दृष्ट्या औद्योगीक विकास पुरुषाने पाहीलेले स्वप्न आकारास आणण्यास प्रारंभ केला. त्याकाळात अनुरूप अश्या खासगी-सहकारी सहकार्यातून उभारलेल्या उद्योगाची कल्पना त्यांना आली. सामान्य अश्या परिस्थीतीतून आल्यामुळे उद्योगासाठी भांडवलाची वानवाच होती. पण विज्ञानाची आवड होती. व त्यातूनच ' महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरेशन’ ही संस्था उभारण्यात आली. प्रथम श्रीवर्धन व नंतर सिंधुदुर्गात शासनाकडून जमीन लीजवर घेऊन खाण महामंडळाची स्थापना करण्यांत आली. व त्याचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेबांचे नांव घोषीत करण्यात आले. वास्तवीक भाऊसाहेबांनी याच्यावर पूर्ण विचारही केला नव्हता. यामध्ये खनीज पदार्थांवर प्रक्रीया करून त्याचे विपणन, तसेच महाराष्ट्रातील अती मागासलेल्या भागांतील व छत्तीसगड मधून कायनाईट, सिलीका सॅंड, बॉक्साइट अश्याचा व्यवसाय आरंभला.
यशवंतरावजी कांही काळातच दिल्लीला गेले व वसंतराव नाईक मुख्यमंत्री म्हणून आले. वसंतरावांनी भाऊंना संपूर्ण पाठींबा देऊन लघुउद्योगांच्या विकासाच्या त्यांच्या कल्पना पूर्णपणे राबवीण्यास मुभा दिली. भाऊंनीही केवळ महाराष्ट्र राज्यातील विकास, लघु उद्योजक यांचा विकास यावरच लक्ष केंद्रीत केले. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर त्यासाठी त्यांनी देशातील सर्व राज्यांचा दौरा अनेकवार केला. तेथील कारागीर, त्यांची कामे पाहीली. पण त्यांच्या ध्यानांत आले की सर्व भागातील कारागीरांना सामान आर्थीक बळ देऊनही सर्व भागाचा समान विकास घडू शकला नाही. त्यामुळे नवीन कल्पना राबविणाऱ्या उद्योजकाला भागीदारीच्या रूपात मदत करण्याचीही योजना आखली गेली. या सर्वच कांही योजना यशस्वी झाल्या अश्यातला भाग नाही. पण बऱ्याचश्या योजना खूपच यशस्वी झाल्या. जेव्हां 'महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाला' दहा वर्षे पूर्ण झाली त्यावेळी झालेल्या समारंभात मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी त्यांचा गौरव करून म्हटले होते की, जो कामे करीत असतो, त्याच्याच हाताने चुका होत असतात. तर यशवंतरावजी म्हणाले, ' जेव्हां नव्या दिशा शोधायच्या असतात, तेव्हां नव्या कल्पना व नव्या योजना अंमलात आणाव्या लागतात. आणि याला लागते ते धाडस. भाऊ कबूल करतात की त्यांच्या कांही योजना असफल झाल्या. परंतु त्यांनी पैठणी उद्योगाचे केलेले पुनरुज्जीवन, कोल्हापुरी चप्पल उद्योगाला केलेली मदत तसेच महाराष्ट्रातही लघु उद्योगाला मदत व्हावी म्हणून दिल्लीत उघडलेले 'त्रिमूर्ती' हे राज्य स्तरावरील एम्पोरियम ह्या भाऊंनी केलेल्या कांही महत्वाच्या गोष्टी आहेत.
चीनच्या आक्रमणानंतर पं. नेहरू खचून गेले होते. आपल्या पंचशील तत्वांची अशी दैना व्हावी ह्याचे त्यांना दुःख झाले. त्यावेळी जनतेला आपल्या सैन्याचा पराभव झाला, याचेच शल्य टोचत होते. आतासारखी माध्यमेही नव्हती जी खरी हकीकत समोर आणतील. आणि ही हकीकत सामान्य शहरी जनतेसमोर आणण्यासाठी भाऊंनी एक योजना आखली. मुंबईत क्रॉस मैदानावर 'Our Himalaya’ हे सदर युद्धाविषयी माहीती देणारे, आपल्या हिमालयाची महत्त्ती दर्शवणारे एक भव्य प्रदर्शन आयोजीत केले. हिमालय काय म्हणतो ते सांगीतले. यामध्ये भाऊसाहेब आचरेकरांकडून हिमालयाची त्रिमिती प्रतीकृती बनवीली. संपूर्ण जे.जे.स्कुल ऑफ आर्ट व जाहीरात संस्था या कामाला लागल्या होत्या. सायंकाळी मॉक वार दाखविण्यांत येत असे. जनतेला आपले सैन्य कसे लढले याचे प्रात्यक्षिकच त्या ठिकाणी दाखविण्यांत येत होते. पं. नेहरू याच्या उदघाटनाला आले, आणि हे सर्व पाहून त्यांनी भाऊसाहेबांचे आभार मानले. म्हणाले, नेवाळकर, मला दुःख झाले. आपल्या सैन्याने खूप केले. आपण हरलो नव्हतो, तर त्या परिस्थितीची ती कसोटी होती. हेच या प्रदर्शनातून दाखविण्यांत आले होते. एवढेच नव्हे, तर सायंकाळी पुन्हां ते प्रोटोकाॅल सोडून माॅक वाॅर पहाण्यास हजर राहीले.
महाराष्ट्र लघु उद्योगावर नियुक्ती झाल्यावर भाऊसाहेबांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. प्रत्येक खेडे, गांव, तालुका स्तरावर विकसीत झाले पाहीजे या एकाच ध्यासाने त्यांना घेरले. कामानिमित्त त्यांना वारंवार दिल्लीला जावे लागे. तेथे त्यांच्या अनेक मोठ्या लोकांशी भेटी होत. त्यांच्याशी चर्चा चालत. भाऊंच्या ज्ञानाची लोकांना कदर होती. पण भाऊंना त्यात कांही विशेष वाटत नसे. ते म्हणत मी कांही प्रोफेसर लोकांसारखी पुस्तके वाचत नाही. पण उपजतच तल्लख बुद्धी असलेल्या भाऊंना जेव्हां बॅंक ऑफ बरोडाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर घेतले, तेव्हां त्यांनी चार दिवसांची सुटी घेतली. व बॅंकींगवरील सर्व पुस्तके वाचून काढली. त्यानंतर त्यांनी बॅंकींगविषयी व त्यावरील पुस्तकांविषयी एवढी माहीती सांगीतली की कुणाही बॅंकरच्या ज्ञानात भर पडावी. अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रांत पाय ठेवायचा नाही हे तत्व त्यांनी आचरणात आणले होते. नंतर ते सेंट्रल बॅंकेवरही नेमले गेले. पुढे त्यांना जाणवले की लघुउद्योगाचे अनेक प्रश्न असतात. सर्वानी एकत्र आल्यासच हे प्रश्न सुटतील. त्यासाठी त्यांनी लघुउद्योग विकास महामंडळाची शिखर संस्था स्थापन करून त्याचे केंद्रीय कार्यालय मुंबईला ठेवले.
भाऊसाहेबांनी अनेक संस्थांना आपले योगदान दिले आहे. अनेकांची अध्यक्षपदे भुषविली आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग होता. माथाडी कामगार, पाणी पंचायत, यात त्यांचे योगदान आहे. प्रीमियर ऑटो मोबाईल मध्ये अनेक वर्षे ते कार्यरत होते. अगदी दत्ता सामंतांच्या संपकाळात त्यांचा डोंबिवलीचा प्रिमियरचा कारखाना चालू राहीला. महामंडळाच्या कामानिमित्त भाऊसाहेबांना सतत फिरावे लागत असे. तेव्हां त्यांच्या लक्षात आले की उद्योजकता हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यासाठी नवीन, होतकरू अश्या उद्योजकांना प्रशिक्षण दिले पाहीजे. आणि यासाठी एक स्वतंत्र संस्था भाऊंनी उभारली. National Institute of Motivational and Institutional Development ( निमीड ) ही ती संस्था होय. या संस्थेतर्फे भाऊंनी विदर्भ, मराठवाडा, इत्यादी मागास भागात उद्योजकता शिबिरे भरवीली. ज्या काळात आंत्रप्र्यूनीयर हा शब्दही कोणाच्या कानावरून गेला नसेल, त्या काळात भाऊ या नव उद्योजकांना घडविण्याच्या मागे लागले होते. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांना 'पॉसिटीव्ह थिंकिंग' करायला लावीत असत. अश्याच एका वेळी नवोदितांना प्रशिक्षित करण्यासाठी भाऊंनी उदयपूरच्या महालांत एक प्रशिक्षण शिबीर घेतले. भारतातील बॅंकींगमधील अगदी उच्च श्रेणीचे अधिकारी प्रशिक्षण देण्यासाठी आणले. लोकांना उद्योगासाठी पैसे देण्याचे ठरले. आणि दोन दिवस होताच सर्व अधिकाऱ्यांना सांगण्यात आले कीं, आता आपण एक गेम खेळायचा. यात तीन अधिकारी व्यक्ती निवडण्यात आल्या. तिघांच्याही डोळ्यावर काळ्या कापडी पट्ट्या गच्च बांधण्यात आल्या. आणि त्यांना सांगितले की आपण आता बंद डोळ्यांनी रोज जात होता त्या मेस कडे जा! हॉलमधील काहींनी त्यांना गरगर फिरवले. काहींनी वाटेत स्टूल आडवे टाकले. तर काहींनी दुसऱ्या बाजूनी आवाज काढून त्यांचे लक्ष वेधले. दहा मिनिटांचा हा गेम सुमारे ३५ मिनिटं वाढला. नंतर त्यांच्या डोळ्याच्या पट्ट्या सोडल्यावर त्यांना कळले की आपण या हॉलमधून बाहेरही पडू शकलो नाही. आणि यावरून त्यांना निष्कर्ष सांगण्यात आला की तुम्ही नवीन उद्योजक येतो तेव्हां त्याच्या गरजा तुम्ही पहात नाही. तुम्ही विनाकारण त्यांना गरगर फिरवता, त्यांच्या पायात अडथळे आणता, तुमचे जुनेच विचार त्यांच्यावर लादता. पण तुमच्या समोर येणारा तरुण हा नवीन विचार घेतांसाठी येतो. जर तुम्ही तुमची प्रवृत्ती बदलली नाही तर तुम्ही त्याला कसा घडवणार? या गेममधून आपली प्रवृत्ती कशी बदलायची व नवीन उद्योजकाला कसा आंत्रप्र्युनीयर बनवायचा याचा हा गेम म्हणजे एक धडा होता
१९७७ साली भारतात जनता पक्षाचे राज्य केंद्रात आले. त्यावेळचे सर्वच लोक भाऊसाहेबांचे विचार व कार्य जाणत होते. त्यांची कामाचं धडाडी त्यांना माहीत होती. त्यामुळे भाऊंना हॅंडलूम व हॅंडीक्राफ्ट कमिशनचे अध्यक्ष नेमण्यात आले. यावेळी त्यांनी काश्मीरच्या गालीचा उद्योगास उत्तेजन दिले. तेथे बनलेला पहीलाच मोठा गालीचा भाऊनी स्वतः खरेदी केला. जेव्हां त्यांनी त्या कारागीरांना रोख रक्कम देऊ केली तेव्हां ते कारागीरही चकीत झाले. पण भाऊंचा हा शिरस्ता होता. त्यांच्या तत्वाप्रमाणे त्यांनी पहील्या पैठणी स्वतः खरेदी केल्या, आणि विक्रीच्या दृष्टीने त्या कारागीरांना कांही मौलीक सूचनाही केल्या. त्यांना बाजारपेठ मिळवून दिली. या काळात त्यांच्या तोंडात हॅंडलूम, हॅंडीक्राफ्ट, लघुउद्योग, हेच प्रश्न असत. हा गुंता सुटल्याशिवाय त्यांची भरभराट होणार नाही हे त्यांना जाणवत होते. दोन वर्षांनी जनता सरकार पडले, तेंव्हां भाऊ स्वतः नव्या मंत्र्याकडे गेले व आपला राजीनामा देऊन आले.
भाऊसाहेबांनी कधीही कसलाच हव्यास ठेवला नाही. इतक्या ठिकाणी कामे केली पण त्याचा पगारही घेतला नाही. नांवाला एक रुपया वेतन ते घेत असत. अनेक लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले. अनेकांना ते आपल्या आस्थापनात हवे असत. गोव्याचे विश्वासराव चौगुले त्यांना आपले बंधू समजत. प्रिमिअर ऑटो मोबाईलचे वालचंद शेटजी यांचेही भाऊंवर अकृत्रीम प्रेम होते. ममत्व होते. पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरो तर त्यांना पंजाबला येण्यास सतत आमंत्रण देत असत. यशवंतराव चव्हाण पुढे दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून गेल्यावर त्यांच्याशी येथील सहवास कदाचीत कमी झाला असेल, पण जेव्हां जेव्हां दिल्लीला जाण्याची वेळ येई, तेव्हां हे दोघे मित्र एकमेकांची सुख दुःखे तेथे वाटत असत. भाऊसाहेबांचे घर तर सर्वांसाठी सतत खुले असे. त्यांच्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळात येत असत ते जयप्रकाश नारायण, एस.एम.जोशी, राम मनोहर लोहीया, क्रांतीवीर नाना पाटील, आणि हे सर्व त्याकाळात भूमीगत असत. आणि अनेक जण केवळ गांधीजींच्या हाकेला ओ देऊन घरदार, नोकरी सोडून देशासाठी बाहेर पडलेले तरुण. राम मनोहर लोहीया घरी आले की त्यांना सतत चहा लागत असे. दिवसाला चाळीस कप चहा ते पीत असत. भाऊंच्या पत्नी एक मोठे पातेले भरून चहा बनवीत व लोहीया सरळ कप बुडवून त्यातून चहा घेऊन पीत असत. स्वातंत्र्यानंतर जेव्हां हे लढलेले लोक भाऊंकडे येत तेव्हां म्हणत, आम्ही कोणासाठी लढलो? आता कोण त्याचा लाभ घेत आहे? आणि भाऊंनाही हे जाणवत असे. आज लोहीयांसोबत ही माणसे कोण आहेत, कधी चळवळीत त्यांच्यासोबत होती? पण स्वातंत्र्य आले तरी सिस्टीम तीच राहीली. कारण माणसे तीच होती. जेव्हां स्वातंत्र्य सैनीकांना मानधन देण्याचा प्रश्न आला, त्यावेळी ही सर्व मंडळी भूमीगत होऊन लढत होती. त्यांची सरकारी दफ्तरात नांवेही वेगळी होती. तेंव्हां या बऱ्याच लोकांची ओळख भाऊसाहेबांनी पटवून देऊन त्यांना मानधन मंजूर करायला लावले. स्वतः मात्र आयुष्यात त्यांनी कसलाही लाभ घेतला नाही.
अश्या या भाऊसाहेबांचे मनमोहनसिग यांच्याशी मात्र पटले नाही. ज्यावेळी लघु उद्योग बहरला होता, तेव्हां नुकतेच नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे शिरकाव करीत होते. सुटे भाग आयात करून टेलिव्हिजन सेट सारखी उत्पादने लघु उद्योगांत तयार होत होती. गरजा वाढत होत्या. व पुरवठा पण केला जात होता. आणि अचानक आपल्या रीझर्व बॅंकेने आपली धेरणे बदलून बाहेरील उत्पादनांना शिरकाव देण्यांत आला. त्याकाळात उदयाला आलेले टेलिरॅड, बुश, डायनोरा सारखे ब्रॅंड लयाला गेले. देशी शीतपेयांनी माना टाकल्या. आणि यामुळे भाऊसाहेब दुःखी झाले. त्यांनी सांगीतले, आज तुम्हांला अमेरीका मोठी वाटते. पण तीही लघु उद्योगावरच अवलंबून आहे. हे उद्योग जर तुम्ही मारले, तर विकसीत होत असलेली उद्योजक तरुणांची पिढीचं तुम्ही नष्ट कराल. सतत आपल्या देशांतील तरुणांनी, कारागिरांनी स्वतः उद्योजक व्हावे म्हणून झटणाऱ्या भाऊसाहेबांनी ते जेव्हां बॅंक ऑफ अमेरिकेसाठी जगभर फिरले, तेव्हां त्यांनी तेथे राहीलेल्या भारतीय तरूणांना सांगीतले की आता तुम्ही आपल्या देशांत परत या. येथे तुम्हांला पुढे वाव असणार नाही. या देशात तुम्ही नेहमीच दुय्यम नागरीक मानले जाणार आहात. शिवाय आपल्या देशाने तुमच्यावर खर्च केला आहे. ते ऋणही तुम्हांला देशसेवा करून फेडायचे आहे.
लौकीक अर्थाने जरी भाऊसाहेब निवृत्त झाले असले तरी त्यांनी निवृत्ती कधीच घेतली नाही. रोज ते त्यांच्या ऑफिसमध्ये जात. नव्वदी उलटली तरी कधीकधी पाच मजले चढून जात असत. त्यानी लघु उद्योग मंडळ सोडल्यानंतर त्या उद्योगाची अवस्था वेगळीच झाली. अनेक लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असत. घरी असतानाही वृत्तपत्रात उद्योगासंदर्भात एखादी बातमी आली की तिचे कात्रण कापून ठेवीत असत. नंतर त्यावर स्वतःची अभ्यासपूर्ण अशी टिपणी लिहून ते ठेवीत असत. हा फार मोठा दस्तावेज त्यांनी करून ठेवला आहे. एकदा गोविंदराव तळवलकरांचा निरोप आला की आपण अमेरिकेहून आलो आहे व आपणास भेटण्यास येत आहे. सोबत भाऊंचा एक चाहता लेखक होता. त्या लेखकाला वाटले की नव्वदी पार केलेला माणूस हा बिछान्यावर झोपून असेल. डोळ्याला कदाचित स्पष्ट दिसत नसेल. तर अश्या माणसाकडे जावे की नाही या विवंचनेत तो होता. एवढ्यात भाऊंचे घर आले व स्वतः भाऊसाहेब गोविंदरावांचे स्वागत करायला बाहेर आले व म्हणाले, अरे गोंद्या! एवढ्यातच तुझ्या हातात काठी आली. गोविंदरावांनी भाऊसाहेबांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. एकतर गोविंदरावांना गोंद्या म्हणणारे भाऊसाहेब, तसेच त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करणारे गोविंदराव, या दोन्ही गोष्टी पाहून तो लेखक विस्मयचकीत झाला. त्याला मिळालेले ते दोन धक्केच होते
यशवंतरावांचे अखेरचे दिवस मात्र भाऊंना बेचैन करून सोडीत असत. ज्या माणसाने महाराष्ट्राची संस्कृती दिल्लीला नेली, आचार्य अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे हिमालयाच्या हाकेला सह्याद्री धावला त्याच यशवंतरावांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे ते दिल्लीत एकाकी पडले होते. आधीच त्यांची सहचारिणी मधूनच सोडून गेल्यामुळे यशवंतराव खचले होते. पुढें आणीबाणीच्या काळात ते इंदिरा गांधींची साथ सोडू शकले नाहीत. जेव्हां सोडली तेव्हां खूप वेळ झाला होता. पून्हा त्यांना इंदिराजींकडे यावे लागले. या काळात त्यांना खूप अवहेलना सहन करावी लागली. एकटेपणा जाणवत होता. अश्यावेळी कित्येकदा भाऊसाहेब सकाळी दिल्लीला जाऊन त्यांच्यासोबत दिवस काढून रात्री परत येत असत. आल्यावर ते स्तब्ध बसत. व म्हणत, यशवंतरावांच्या बाबतीत असे व्हायला नको होते!
भाऊसाहेबांनी आपल्या आयुष्यात कोणाकाढून काहीही कधी घेतले नाही. कोणाच्याही उपकाराच्या ओझ्याखाली ते नव्हते. सरकार दिल्लीत जागा देऊ करीत होते तीही त्यानी घेतली नाही. मात्र त्यांचे कार्यालय होते ती इमारत 'अकबरअल्लीज' ची होती. शेवटच्या दिवशी तेथून निघतांना अकबरअल्लीज’चा मालक वर आला. व त्यांनी भाऊंच्या हातात एक पेटी ठेवली.म्हणाला, भाऊ, आता तुम्ही येणार नाही. ही माझ्याकडून तुम्हांला एक भेट. भाऊंनी खूप विरोध केला पण तो ऐकेचना! शेवटी भाऊनी ती त्याने प्रेमाने दिलेली भेट घेऊन ते घरी आले. उघडून पाहतात तो आतमध्ये एक सुबकशी संगमरवरी गणेश मूर्ती. पत्नीने ती पहाताच म्हटले, अहो पण ही उजव्या सोंडेची आहे! अशी आपल्याकडे घरी ठेवीत नाहीत. पण भाऊ म्हणाले, ठेवून दे. मोठ्या प्रेमाने दिली आहे त्याने. त्याला काय उजवी सोंड अन डावी सोंड? आजही ती मूर्ती त्यांच्या घरी आहे.
आणि आपल्या सर्व कर्तव्यांची पूर्तता करून भाऊसाहेबांनी वयाच्या ९३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. २८ ऑगस्ट १९१५ या दिवशी सुरु झालेल्या एका यज्ञाची ८ ऑक्टोबर २००८ रोजी सांगता झाली. एक समृद्ध जीवन ते जगले. अनेक आदर्श त्यांनी मराठी तरुण उद्योजकांसमोर ठेवले. अनेकांना उभे केले. भारत जेव्हां विकासाच्या उंबरठ्यावर उभा होता तेव्हां भाऊ त्या भारताचे नवनिर्माण करण्याच्या प्रेरणेने झपाटलेले होते. म्हणूनच त्यांच्याकडून उद्यमशील असा महाराष्ट्र घडला. अश्या या दृष्ट्या विकास पुरुषाचे चरीत्र लिहवून शासनाने सर्व उद्योजकांना वाचण्यास द्यावे. अनेक उद्योग निर्मितीस त्याचा नक्कीच उपयोग होईल. हीच गणेश बा. ऊर्फ भाऊसाहेब नेवाळकराना वाहीलेली आदरांजली ठरेल. व त्यांचे आपल्यावरील
ऋण थोडे तरी फिटेल !
-प्रा. मं. गो. राजाध्यक्ष






Comments
Post a Comment