अग्रलेखांचा बादशहा : निळकंठराव खाडीलकर
या महाराष्ट्रात अनेक साहीत्यिक झाले. ज्यांच्या साहीत्याने भारलेल्या अनेक पिढ्या येथे समृद्ध झाल्या.अनेक विचारवंतांना त्यांनी प्रगल्भ बनवीले. तसेच या मातीत अनेक पत्रकारही निर्माण झाले. पत्रकारांची थोर परंपरा या महाराष्ट्राला लाभली. अगदी लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर. कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडीलकर, ज्ञानप्रकाशचे काकासाहेब लिमये, काळ कर्ते शिवरामपंत परांजपे असे एकापेक्षा एक दिग्गज असे विद्वान आणि विचारवंत अभ्यासू पत्रकार त्या स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेले. टिळकांचा केसरी, कोल्हटकरांचा संदेश, अशी समाचार पत्रे त्याकाळी निघत होती ही पत्रे केवळ बातम्या देण्याची कामे करीत नसत, तर ती स्वातंत्र्याने प्रेरीत झाली होती. त्यांची स्वतःची वैयक्तीक विचारशैली होती. ही वृत्तपत्रे स्वातंत्र्यासाठी लढत होती. पिढ्या घडवीत होती. केसरी हे पत्र विचारवंतांचे होते. त्यातून टीकाही तारतम्य राखून केली जायची. पुढे लो.टिळकांना त्यांच्या सरकारविरोधी लेखनामुळे शिक्षा झाली अन केसरी चालविण्याची जबाबदारी नरसिंह चिंतामण केळकर यांच्यावर पडली. जोडीला होते संपादकीय व्यवस्था पाहणारे काकासाहेब खाडीलकर. काकासाहेब तितकेच प्रसीद्ध नाटककार होते. त्याची नाटकेही ब्रिटिशांच्या जुलुमाविरुद्ध आवाज उठवीत असत. मानापमान, स्वयंवर, भाऊबंदकी, किचक वध अशी नाटके लिहून नाटकांची एक समृद्ध परंपरा काकासाहेबांनी निर्माण केली. अश्या या काकासाहेबांवर जेव्हां केसरीची जबाबदारी आली, तेव्हां त्यांची लेखणी इंग्रज सरकारवर आग ओकू लागली. त्यामुळे केळकरांना चिंता वाटू लागली, व त्यानी काकासाहेबाना सांगीतले की , टिळक येईपर्यंत तरी आपणाकडून केसरी वाचवला गेला पाहीजे या भावनेने त्यांनी काकासाहेबाना संपादकीय जबाबदारीतून मुक्त होण्यास सांगीतले. त्यावर संतापलेल्या काकासाहेब खाडिलकरांनी केसरीतून आपले अंग काढले व स्वतःचे वृत्तपत्र 'नवाकाळ' हे ७ मार्च १९२३ रोजी सुरु केले.
मग मात्र काकासाहेबांच्या लेखणीला मर्यादा राहील्या नाहीत. इंग्रज सरकारचा रोष पत्करूनही त्यांनी सरकारवर आसूड ओढण्याला सुरुवात केली. परीणामी ब्रिटिश सरकारने त्यांच्या जहाल लेखनाबद्दल १९२९ साली त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना दंड व कैदेची शिक्षा सुनावली. तुरुंगात जातानाच त्यांनी आपले नवाकाळचे संपादकपद सोडले, व त्यांचे चिरंजीव यशवंत उर्फ अप्पासाहेब खाडीलकर यांच्यावर संपादकाची जबाबदारी टाकली व परत आल्यावरही ते संपादक राहीले नाहीत. एक नवा पायंडा त्यांनी पाडला. पुढे अप्पासाहेबांनी देखील १९६९ मध्ये ते पद सोडले व त्यांचे पुत्र निळकंठराव यांना संपादक केले. दरम्यान या पूर्वीच्या पत्रकारांची परंपरा राखणारे पत्रकार या महाराष्ट्रात निर्माण झाले. यामध्ये आचार्य अत्रे यांचे नांव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अत्र्यांनी आदर्श ठेवला होता तो काकासाहेब लिमये यांचा व अच्युत बळवंत कोल्हटकरांचा. त्यांची गुणग्राहकता, वैचारिक बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती, स्वतंत्र अशी अलंकारीक व उपरोधीक भाषाशैली, हे सर्व गुण आचार्य अत्रे यांच्यामध्ये पुरेपूर होते. त्यामुळे अत्रे यांचा नवयुग या त्यांच्या साप्ताहिकाने व पुढे मराठा या त्यांच्या दैनिकाने महाराष्ट्र गाजवीला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे.
याचबरोबर एक नांव गाजत होते ते नवाकाळ कर्ते निळकंठराव खाडीलकर यांचे. या काळातील बहुतेक वृत्तपत्रे ही भांडवलदारांची होती. त्यांचेच धोरण संपादकाला राबवायचे असे. कामगार चळवळींना यामध्ये कोणतेच स्थान नसायचे. लोकमान्यचे संपादक पां.वा. गाडगीळ यांनाही मराठी जनतेच्या बाजूने लिहायला मनाई होती. कारण भांडवलदार शांतीलाल शहा कंपनीची ती वृत्तपत्रे होती. आणि हे ओळखूनच आचार्य अत्रे यांनी 'दैनिक मराठा' सुरु केला. अत्र्यांचा मराठा कामगार वर्गासोबत त्यांच्या अन्यायाला वाचा फोडू लागला. सरकारचे वाभाडे काढू लागला. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढू लागला. आणि त्यामुळे मराठावर सरकारची वक्रदृष्टी होणे स्वाभावीक होते. आणि त्याच्या सरकारी जाहीराती बंद करणे हे एकमेव शस्त्र सरकारने वापरले तरीही केवळ आपल्या खपावर खपाचा उच्चांक गाठणारे दैनीक म्हणून 'मराठा' ओळखू जाऊ लागला. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीमध्ये मराठाने मोलाची कामगीरी बजावली. यावेळी खाडीलकरांचा 'नवाकाळ'ही तसाच तळपत होता. आचार्य अत्रे हे अग्रलेख लिहीताना कधीच परीच्छेद पाडीत नसत. तर दोन कॉलमी दणदणीत असा सलग अग्रलेख लिहीत जो वाचकांच्या मनाचा ठाव घेत असे. तसाच प्रकार निळकंठरावानी सुरु केला तो म्हणजे मुखपृष्ठावरच अग्रलेख द्यायचा. व ते नवाकाळचे एक आकर्षण ठरले.
पण पुढे संयुक्त महाराष्ट्राचे कार्य संपले आणि मराठांची कामगीरीही संपुष्टात आली. त्यानंतर निळकंठरावानी आपल्या नवाकाळचे वाचक वाढवीण्यास सुरुवात केली. मराठा व नवाकाळ ही दोन्ही वृत्तपत्रे मराठी माणसाची, मध्यम वर्गीयांची अन कामगार वर्गाची मानली जात असत. अत्र्यांनंतर नवाकाळ वाढू लागला. त्याकाळात मराठी वृत्तपत्र मालकांना आर्थीक अडचणींना तोंड द्यावे लागत असे. भांडवदार वृत्तपत्रांकडे अद्यावत यंत्र सामुग्री, आधुनीक तंत्रज्ञान असे. त्या तुलनेने नवाकाळकडे तुटपुंजी यंत्र सामुग्री, खपही फारसा नाही अशी परिस्थीती होती. त्यामुळे त्याची छपाईही उत्कृष्ट नसे. पण बुद्धिमत्तेचा वारसा लाभलेल्या निळकंठरावानी आपल्या प्रतीभेने, आपल्या तीव्र स्मरणशक्तीने त्याची भरपाई केली व झपाट्याने नवाकाळचा खप वाढू लागला. एखाद्या गोष्टीतील ज्वलंत व जिवंत असा प्रसंग उभा करण्याच्या त्यांच्या लेखन हातोटीमुळे नवाकाळ वाढीला लागला. त्यांनी घेतलेल्या खास मुलाखती, त्याही त्याची टिपणे न घेता लिहिलेल्या, अतीशय लोकप्रिय झाल्या. व यामुळे मराठी पत्रकारीतेचा दर्जा उंचावला. त्यांनी अनेक कोर्ट केसीस आपल्या वृत्तपत्रातून संपूर्ण रित्या प्रश्नोत्तरावर आधारित छ्यापल्या. त्याचा लाभ अनेक कायद्याचे विद्यार्थी अभ्यासासाठी करीत असत. आणि महत्वाचे म्हणजे त्याकाळात सर्वाना वेड लावणारे शब्द कोडे! त्यामुळे विशेषतः प्रत्येक कामगाराच्या हाती नवाकाळ दिसत असे.
नवाकाळने जसे वृत्त आणि मुलाखतीमध्ये आपला चेहरा ठेवला, तसेच निळकंठरावांचे अग्रलेख हेदेखील नवाकाळचे मुख्य आकर्षण ठरले. ओघवती, सहज सुलभ भाषाशैली, नीट मांडलेले मुद्दे, विषयाचे नेमके मर्म यामुळे नवाकाळचे अग्रलेख
वाचनीय, संग्रही ठरू लागले. आचार्य अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनावर दिसू लागला. मुलाखतीत तर त्यांचा हात कोणीच धरू शकत नव्हते. कित्येकदा तर टाचणं न घेताही केवळ मनात आठवणी ठेवून ते मुलाखती लिहीत असत. १९९२ साली त्यांनी शरद पवारांची प्रदीर्घ मुलाखत तर त्यांनी एकही शब्द लिहून न घेता केवळ त्यांच्याशी गप्पा मारून क्रमश: पांच दिवस नवाकाळ मधून प्रसीद्ध केली होती. त्यांच्या गोळवलकर गुरुजी व सत्य साईबाबा यांच्या मुलाखती खूपच गाजल्या होत्या. मुलाखती घेण्याची पद्धत, आणि झंझावाती अग्रलेख आणि त्यासोबत कोर्टातील खटल्यांची प्रश्नोत्तररूपी बातम्या, या सर्वांमुळे निळकंठरावानी 'नवाकाळ'ला अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोकात आणले. आणि निळकंठरावांना जनतेने 'अग्रलेखांचा बादशहा' हा अनभिषिक्त किताब बहाल केला, व पुढे खाडीलकर व अग्रलेखाचा बादशहा हे एक मराठी वृत्तपत्रसृष्टीत समीकरणच बनले. सामान्य वाचकालाही अवगत होईल अश्या साध्या व सुलभ भाषेतील त्यांच्या अग्रलेखानी सामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवीले. तसेच राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन करून त्यांनी सतत तळागाळाच्या माणसाच्या व्यथांना वाचा फोडली. याच्या जोडीला त्याचे सायंकालीन लहान भावंड म्हणून 'संध्याकाळ' हे सायंदैनिक सुरु केले. तेही खूप प्रसिद्धीला आले.
वृत्तपत्राच्या जोडीलाच निळकंठरावानी पुस्तकेही लिहीली. टॉवर्स, हिंदुत्व, द्रौपदी, मराठाची बोलू कौतुके, अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशीत झाली. त्यातील 'हिंदुत्व' हे पुस्तक वाचकांनी उचलून धरले. त्यांच्या पत्रकारीतेचा गौरव करून महाराष्ट्र शासनाने त्यांना पहीला 'लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार' दिला. दोन वेळा ते मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. भारत सरकारने त्यांच्या व्यासंगी पत्रकारीतेची दखल घेऊन त्यांना 'पदमश्री' किताबाने गौरवीले. मराठी पत्रकार संघातर्फे त्यांना 'आचार्य अत्रे पुरस्कार' देण्यात आला. १९९३ साली अत्र्यांच्या ९५व्या जयंतीला हा पुरस्कार त्यांना दिल्यानंतर खाडिलकरांनी त्यानिमिताने आचार्य अत्रे यांच्याविषयी जबरदस्त अग्रलेख मालीका लिहून एक नवा विक्रम केला. व त्याचे पुस्तकात रूपांतर केले. त्यांच्या खास शैलीतील अग्रलेखांची पुस्तके देखील त्यांनी प्रसीद्ध केली. याच आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्युपत्राचा वाद उफाळून आला होता. त्यांची सर्व संपत्ती महाराष्ट्र मातेच्या चरणी अर्पण केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सदर मृत्युपत्र खोटे असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला, व कोर्टात त्याला आव्हान देण्यात आले. या वेळी मूळ मृत्युपत्र कोणी आणले ते कळत नव्हते. नवाकाळने याचा पाठपुरावा करून विनायक भावे यांनी ते आणल्याचे उघडकीस आणले. पुढे कोर्टात सदर मृत्युपत्र बनावट असल्याचे सिद्ध होऊन अत्र्यांची मालमत्ता त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला आली. अत्रे यांच्या आजूबाजूला असलेल्या साम्यवादी मंडळींनी हे कारस्थान रचले होते. अत्रे यांच्यावर अनेक खटले चालू असत. त्यासाठी कित्येकदा ते कोऱ्या कागदावर सह्या करून ठेवीत असत. अश्याच कोऱ्या कागदांचा वापर करून सदर मृत्युपत्र बनवण्यात आले होते. हा खटलाही नवाकाळने साग्रसंगीत वाचकापर्यंत पोचविला.
यानंतर स्वतःहून संपादकपद सोडण्याची परंपरा राखत ६ एप्रील १९३४ साली जन्मलेल्या निळकंठरावानी वयाच्या ६३ व्या वर्षी, १९९७ साली 'नवाकाळ'चे संपादकपद सोडले. व त्यांची कन्या जयश्री पांडे हिला संपादक व लहान कन्या रोहीणी हिला 'संध्याकाळ'ची संपादक म्हणून नियूक्त केले. सर्वात मोठी कन्या वासंती ही व्यवस्थापक म्हणून कार्य पाहू लागली. खाडीलकर घराण्याच्या बुद्धिमतेचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या या तिघीही मुलींनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक आधीपासूनच दाखविण्यास सुरुवात केली होती. या तिघीही बहीणी बुद्धिबळ चॅम्पिअन होत्या. जयश्री ही पहीली भारतीय महीला ठरली जिने आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. 'नवाकाळ'ची सूत्रे हातात आल्यानंतर तिनेही त्याच तडफेने तो चालवीला. तीच लोकप्रियता वाढीला लाविली. जोडीला सरकारचा रोषही पत्करला. १९९२-९३ साली मुंबईत झालेल्या जातीय दंगलीवर जो श्रीकृष्ण आयोग नेमला त्यावर निळकंठरावानी आक्षेप घेत आपल्या बेधडक भाषेत अग्रलेख लिहीला.
या संपादकीयामुळे कोर्टाची बेअदबी झाली या दृष्टीने त्यांच्यावर खटला भरून त्यांना २००४ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली. पण त्यांचे वय ध्यानात घेता, संपादक या नात्याने जयश्रीताईंना सहा दिवस गजाआड काढावे लागले. वास्तवीक ही शिक्षा एक दिवसाची होती, पण जयश्री यांनी माफी मागण्यास सपशेल नकार देऊन त्याऐवजी सजा पत्करली. यावेळी मुंबईतील जनतेने, विशेष करून कामगार -मजूर वर्गाने नवाकाळला चहुबाजूनी सहाय्य केले. आर्थीक मदतही त्यांनी स्वतःकडचे ५ रुपये देऊनही केली. सातव्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेत विरोधकांकडून स्फोटक परिस्थीती निर्माण झाल्याने जयश्रीताईंना सरकारला सोडावे लागले. अश्या तऱ्हेने केवळ एका स्त्री पत्रकारालाच नव्हे, तर एका महीला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ ग्रँड मास्टरला भारतीय कोर्टाकडून शिक्षा सुनावली गेलेले हे पहिलेच प्रकरण असेल!
निळकंठरावानी आपल्या संपादकीय कारकीर्दीत अनेक सार्वजनीक उपक्रम केले. अनेक गोष्टी चव्हाठ्यावर आणल्या. अनेक प्रकरणांना वाचा फोडली. भांडवलशाही पत्रकारांसमोर धडाडीने उभे राहून केवळ आपल्या लेखणीने नवाकाळचा खप वाढवीला. 'रिडल्स' प्रकरण या महाराष्ट्रात जेंव्हा पेटले, तेव्हां नवाकाळने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका एकाकीपणे लढविली. गिरणी कामगारांना न्याय मिळून त्यांना मिळालेली ९ कोटी रुपयांची थकबाकी ह्या मागे नवाकाळची प्रेरणा होती. पण सर्वात महत्वाची देणगी निळकंठरावानी जर या देशाला दिली असेल, तर ती त्यांच्या 'प्रॅक्टीकल सोशालिझम'ची!
१९८३ साली जेव्हां ते सोविएत रशियाचा दौरा करून आले, तेव्हां हा नवीन विचार त्यांनी मांडला. ज्या वेळी त्यांना 'आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार' मिळाला त्यादिवशी त्यांनी पत्रकार संघात केलेल्या व्याख्यानाला तुफान गर्दी होती. आणि त्यानंतर निळकंठरावानी सतत नऊ दिवस आचार्य अत्रे यांच्यावर खास अग्रलेख लिहीले. व शेवटी त्यांनी अत्र्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी खुद्द अत्रे यांच्या शैलीत प्रत्यक्ष आचार्य अत्रेच लिहीताहेत असा एक खास लेख लिहून विठ्ठलराव गाडगीळांचा समाचार घेतला होता. आणि तोही होता हर्षद मेहता याच्या भ्रष्टाचारावर ! आपल्या अत्र्यांवरील लेखमालीकेची अखेर करताना निळकंठरावानी आपला निष्कर्ष मांडला होता-
या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर एकच झाले,
रेडे अनेक झाले
लोकमान्य टिळक एकच झाले,
पगड्या अनेक झाल्या
भारतरत्न डॉ. आंबेडकर एकच झाले,
दुकानदार अनेक झाले
झंझावाती आचार्य अत्रे एकच झाले,
भुंकणारे अनेक झाले!
आज निळकंठराव समाधानी जीवन जगत आहेत. भांडवलदारांच्या हातात लगाम असलेल्या या वृत्तपत्रीय जगात स्वतःचे ठाम मत मांडण्याची ताकद ठेवणारे वृत्तपत्र म्हणून 'नवाकाळ' ची भूमिका निळकंठरावानी राखली, आणि दैनिक मराठा नंतर मराठी माणसासाठी लढणारे लढाऊ वृत्तपत्र म्हणून नवाकाळ ओळखू जाऊ लागला. आणि एका समर्थ अश्या पत्रकार कुटुंबीयांचा वारसा लाभलेले निळकंठराव खाडीलकर आणि त्यांचे 'नवाकाळ' असेच उत्कर्षाप्रती राहो, हीच एक प्रार्थना!
- प्रा. मं.गो.राजाध्यक्ष





Comments
Post a Comment