पुण्यांतील अभीनव कलाकारांचे पाशवी हत्याकांड :
आम्ही जेजेची स्टडी टूर घेऊन केरळ येथे गेलो होतो. सोबत अध्यापक होते, डीन प्रा. हणमंते, रमाकांत देशपांडे, अरुण काळे,खांबेकर व मी. त्या काळात आतासारख्या टूर आंखणे, रेल्वेचे आरक्षण करणे अश्या सोयी नव्हत्या. त्यामुळे केरळहून परतण्याची तिकीटे आम्हांला मिळाली नाहीत. तेव्हां चक्क आम्ही तेथून बसने प्रवास सुरु केला. सुरुवातीला मजेशीर वाटणाऱ्या या प्रवासाने नंतर कंटाळवाणे रूप धारण केले. तरी आम्ही काही ठरावीक अंतर झाल्यानंतर बस ड्रायव्हर व विध्यार्थ्यांना विश्रांती देण्यासाठी एखादे हॉटेल पाहून तेथे कांही तास उतरत असू. शेवटी दोन रात्री व तीन दिवस पूर्ण झाल्यावर रात्री आम्ही पुण्याला येऊन ठेपलो. त्यावेळी हणमंते सरांनी निर्णय घेतला की आजची रात्र पुण्यात काढायची. पुण्यात आमचे हक्काचे ठिकाण होते ते तेथील टिळकरोडवरील अभिनव कला महाविद्यालय. तेथील प्राचार्य दिवाकर डेंगळे यांना बोलावल्यावर त्यांनी येऊन आम्हां सर्वांची राहण्याची सोय केली. अभिनवला प्रगतीवर आणणारे ते एक व्यासंगी व्यक्तीमत्व होते. सकाळी आम्ही मागच्या बाजूला असलेल्या 'हॉटेल विश्व' येथे चहा नाश्त्यासाठी गेलो. तुम्हांला वाटेल यात महत्वाचे ते काय? पण येथेच खरी या प्रकरणाला सुरुवात होते.
'हॉटेल विश्व' हे सुंदर हेगडे या मंगलोरी गृहस्थांचे लहानसे हॉटेल. त्यांचा मुलगा प्रकाश हा पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचा उपयोजीत कलेचा विद्यार्थी. त्याचा ओढा होता तो ॲनीमेशन या क्षेत्रांत काहीतरी करून दाखवायचे. हाॅटेलच्या गल्ल्यावर बसून पैसे घेण्यात त्याला अजीबात स्वारस्य नव्हते. पण वडीलांची इच्छा होती ती त्याने आपला व्यवसाय पुढे चालविण्याचा.आणि याला साथ देत होते ते त्याचे कॉलेजमधील मित्र जे नेहमी त्याच्या हॉटेल मध्ये पडलेले असत..त्यांचे टेबलही ठरलेले होते..कित्येक वेळा पैसे नसल्याने त्यांची तेथे उधारीच चालू असे. पण मुलाचे मित्र म्हणून सुंदर हेगडे त्याकडे दुर्लक्ष करीत. हे चार मित्र होते ते १. राजेंद्र जक्कल, २. दिलीप ध्यानोबा सुतार, ३. शांताराम कान्होजी जगताप,४. मुन्वर हारुण शाह. जक्कलला फोटोग्राफीची आवड होती. येथेच त्यांच्या गप्पा चालत, लोकांची संभाषणे ऐकता येत. आणि एक दिवस तो भयानक क्षण आला. या चौकडीने आपल्या जिवलग मित्राचे, प्रकाश हेगडेंचे अपहरण करून त्यासाठी खंडणी वसूल करायचे ठरवीले. आपल्या कॉलेजमधील आणखी एक मित्र सुहास चांडक याच्या सोबतीने प्रकाशला खोटीच कारणे सांगून जक्कलच्या कर्वे रोडवरील टपरीवर आणले. त्याच्याकडून जबरदस्तीने आपण घर सोडून जात आहे असे लिहवून घेतले. हा दिवस होता १५ जानेवारी १९७६. प्रकाशला त्यांनी पेशवे पार्ककडे आणले. व नायलाॅनच्या दोरीला एक विशिष्ट प्रकारची गाठ मारून त्या दोरीचा फास लावून प्रकाशची हत्या केली. त्याचे शव एका पत्र्याच्या पिंपात घालून त्याच्या आजूबाजूला दगड भरले. व ते पिंप तलावात टाकले.यावर कहर म्हणजे त्याच्या खुनानंतर रात्री त्याच्या वडीलांना फोन करून तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. तो जर परत हवा असेल तर पाच लाख रुपये सांगीतलेल्या ठिकाणी ठेवण्यास सांगीतले. हे संभाषण ते इंग्रजीत करीत होते. सुंदर हेगडे यांनी पोलिसांकडे जायचे ठरवीले पण त्यांच्या पत्नीने मुलाच्या जिवाच्या भीतीने तसे करू दिले नाही. त्यांनी सांगीतलेल्या ठिकाणी पैसे ठेवल्यावर एका हॅल्मेटधारी इसमाने दुचाकीवरून येऊन पैसे नेले. दुसऱ्या दिवशी प्रकाश घरी पोचला नाही, पण त्याचा मृत देह तलावाच्या काठी मिळाला. त्यांचे हे मित्र हेगडे कुटुंबाचे सांत्वन करायला आले. आपला एक जवळचा मित्र गमावल्याचे दुःख ते दाखवीत होते.
यानंतर त्यांनी आपले लक्ष कोल्हापूर कडे वळविले. पण तेथे डाळ न शिजल्याने ते पाठी परत फिरले. ऑकटोबर १९७६ मध्ये अच्युत जोशी व त्यांची पत्नी उषा असे दोघेच घरी असतांना हे लोक त्यांच्या घरी पोचले. दोघांचेही हातपाय बांधून पूर्वीच्याच पद्धतीने त्यांनी ती विशिष्ठ गाठ मारून नायलॉनच्या दोरीने त्या दोघांचे गळे आवळले. एवढ्यात त्यांचा दहा वर्षांचा मुलगा आनंद आत आला. त्यालाही पकडून त्याचे कपडे उतरवून त्यांनी त्यांच्याकरवी घरातील रोकड, दागीने, घड्याळ, मंगळसूत्र असे सर्व बरोबर घेतले व त्या लहानग्याचाही तसाच नायलॉन दोरीने गळा आवळला. बघता बघता संपूर्ण पुणे या खुनांच्या मालीकेने हादरले. पोलिसांवरील दबाब वाढत चालला. संध्याकाळ झाली की पुण्यामध्ये स्मशान शांतता पसरू लागली. अत्यंत गजबजलेले ठिकाण म्हणून ओळखली जाणारी 'तुळशी बाग' देखील सायंकाळी सात वाजताच बंद होऊ लागली. हे खून काही ठरावीक काळातच पौर्णीमेला होतात अशीही वदंता पसरू लागली. खून झालेल्या घरात अत्तर पसरून कुत्र्यांना वास येऊ नये याचीही काळजी ही चांडाळ चौकडी घेत असे.
२२ नोव्हेंबर १९७६ रोजी बाफना यांच्या बंगल्यावर या नराधमांनी धाड टाकली. पण त्यांच्या प्रखर अश्या विरोधामुळे तो असफल झाला. पैशांची चणचण होत होती. नवीन कांड करण्याच्या प्रयत्नांत ही चौकडी होती. यासाठी ते अश्या लोकांवर नजर ठेवीत की त्यांच्या घरात लोक कमी असतील अथवा वृद्ध असतील जे प्रतीकार करू शकणार नाहीत. पुण्याच्या बाहेर निवांतपणे बंगले बांधून राहणारे लोक यांचे लक्ष असे. आणि १ डिसेंबर १९७६ रोजी त्यांनी साधारणपणे सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हे टोळके पोचले भांडारकर रस्त्यावरील ‘स्मृती’ या बंगल्याकडे. तेथे कोण रहात असते यांच्याशी त्यांचा काडीचाही संबंध नव्हता. तेथे रहात होते एक आदरणीय असे व्यक्तीमत्व, संस्कृतचे प्रकांड पंडीत, वेदांचे अभ्यासक विद्वान असे ८८ वर्षे वयाचे काशीनाथ शास्त्री अभ्यंकर, त्यांच्या ७६ वर्षांच्या पत्नी इंदीराबाई, त्यांच्या घरची मदतीला असलेली ६० वर्षे वयाची सखुबाई वाघ, २१ वर्षाचा नातू व १९ वर्षांची नात असे एक आनंदी कुटुंब रहात होते. किंचीतही प्रतीकार करू न शकणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याचा, इतर कुटुंबीयांसहित नायलॉन दोरीने सर्वांची हत्या करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हातात बराच ऐवज लाभला. या हत्येने मात्र पुण्यातील लोकांच्या भावनांचा बांध तुटला..पोलीस स्टेशनवर लोकांचा जमाव येऊ लागला. सरकारलाही या गोष्टीची खास दखल घ्यावी लागली. तपासाची सूत्रे पोलीस उपायुक्त श्री मधुसूदन हुल्याळकर यांच्याकडे सोपवली. त्यांनी पोलीस निरीक्षक श्री माणिकराव दामाणे यांची टीम बनवीली. एकाच पद्धतीची दोरीची गाठ, त्याच प्रकारे केलेली हत्या, आवळण्यासाठी लागलेली ताकद या सर्व गोष्टीवरून हे काम एका व्यक्तीचे नसून जास्त लोकांचे आहे हे पोलीसांच्या ध्यानात आले. त्यांनी सर्व सोनारांच्या दुकानावर नजर ठेवली. इंग्लिश बोलण्याच्या पद्धतीवरून ही मुले नक्कीच महाविद्यालयीन असावीत हा त्यांनी कयास करून सर्व काॅलेजमधील मुलांवर कोण जास्ती खर्च करतो आहे, कोणाकडे महागड्या वस्तू आहेत, ब्रॅंडेड कपडे आहेत याचा तपास करण्यास सुरुवात केली.
याच चौकडीच्या अभिनव कला महाविद्यालयातील एक वर्गबंधू जयवंत गोखले याचा लहान भाऊ अनील गोखले हा आपल्या भावाला भेटण्यासाठी २३ मार्च १९७७ रोजी अलका टॉकीजजवळ जाणार होता.जक्कलने त्याला आपल्या मोटार सायकलवर लिफ्ट दिली आणि त्यालाही त्याने आपल्या टपरीवर आणले. तेथे या लोकांनी त्याचाही नायलॉनची गाठ मारलेली दोरी आवळून त्याचा खून केला. त्याचे शव एका लोखण्डी शिडीला बांधून त्याला दगड बांधून बंड गार्डनजवळ मुळा मुठा नदीमध्ये बुडविला. पण आतमध्ये पाण्यात दोरी तुटून दगड निघाले व येरवड्याकडे ते २४ तारखेला ते शव पाण्यावर आले.
इकडे पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होतेच! त्यात गोखले याचे मारेकरी सापडले कां, याची चौकशी करायला सतत हे चौकडी पोलिसांकडे येत असत. त्यावर त्या पोलिसी चाणाक्षपणाने ही बाब नेमकी हेरली. हे चारी तरुण बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये सतत येऊन आपल्या गायब झालेल्या अनील गोखले या मित्राची वारंवार चौकशी करीत. यानेही पोलीसांचा संशय बळावला. एकदा हॉटेल विश्ववर चौकशीला गेले असता, त्यांनी यातील एकाच्या हातात महागडे घड्याळ पाहीले. चौकशीअंती त्याची गडबड होऊ लागली. जक्कलने अभ्यंकरांच्या घरून जे दागीने चोरले होते, त्यातील एक अंगठी व चेन त्याने आपल्या प्रेयसीला दिली होती, तीही पोलिसांनी मिळवली. एका हवालदाराने यामध्ये काळजीपूर्वक लक्ष घालून अनेक बारकावे हेरले. यामधील चांडक याला पश्चाताप होऊन तो यातून बाहेर पडू पहात होता, त्यामुळे त्याचाही खून करण्याचा प्रयत्न झाला व शेवटी पोलिसांनी आपले पाश ह्या नराधमांच्या नरड्याभोवती आवळले. पोलिसी खाक्या दाखवील्यानंतर त्यातील सतीश गोरे हा शेवटी तुटला, व भडाभडा बोलू लागला. चौकशी दरम्यान सुहास चांडकही फुटला. व माफीचा साक्षीदार होण्याच्या अटीवर त्याने सर्व खून कसे केले याचा पाढा वाचायला सुरुवात केली. कोर्टात केस उभी राहीली. निष्णात कायदेतज्ञ शामराव सावंत यांना सरकारतर्फे नियुक्त करण्यात आले होते. संतापलेल्या नागरीकांची केस ऐकण्यास गर्दी होत असे. सुहास चांडक जो प्रकाश हेगडेच्या खुनाच्या वेळचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता, तो माफीचा साक्षीदार बनला. सेशन कोर्टाने या चौघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. पुढे आरोपी अपीलात गेले. पण हायकोर्ट व सुप्रीम कोर्टानेही ह्या शिक्षा कायम ठेवल्या. शेवटचा प्रयत्न म्हणून राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्यात आला. तेथेही तो फेटाळला गेला. यावेळी हजारो पुणेकरांनी सह्या करून सुप्रीम कोर्टाला विनंती केली की शक्यतो लवकर या नीच नराधमांना फाशी द्या! अखेर शिक्षा लांबविण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून आरोपीनी आपलें अवयव दान करण्याची इच्छा आहे, त्यासाठी अवधी मागीतला. पण तोही फेटाळला.
शेवटी फाशीची शिक्षा ही अत्यंत वेदनादायक असल्याने आपणास इलेक्ट्रीक खुर्चीवर शॉक देऊन मारण्यात यावे अशी दयेची याचना या नराधमांकडून न्यायालयाकडे करण्यात आली. आतापर्यंत या नीच लोकांनी कोण लहान मुलं आहे, कोण असहाय वृद्ध आहे, कोण अबला आहे त्यांची क्रूरपणे हत्या करताना जराही विचार केला नव्हता, त्यांचे गळे आवळताना त्यांना काय वेदना होत असतील याचा काडीमात्र विचारही न करता हत्या करून हाहा:कार माजवला होता, ते नरभक्षक आता स्वतःसाठी वेदनाहीन मरण मागत होते. पण यावेळीही पुणेकरांनी देशभरातील दहा नामवंत डॉक्टरांचे हे मरण वेदनादायक नसल्याची प्रमाणपत्रे सादर केली. केस सुरु झाल्यापासून सुमारे साडेसहा वर्षानंतर या नराधमांना येरवडा सेंट्रल जेल मध्ये २७ नोव्हेंबर १९८३ रोजी पहाटे फासावर लटकविण्यांत आले. कित्येक लोकांची मागणी होती की या आरोपीना उघड्यावर फासावर लटकवा. जानेवारी १९७६ ते मार्च १९७७ पर्यंत एकूण दहा खून करणाऱ्या या सैतानाचा अखेर शेवट फासाच्या दोरीने केला.
आम्ही त्या 'हॉटेल विश्व' मध्ये दुसऱ्या दिवशी बसलो असता जक्कल कंपनी बसत असे ते टेबल पाहीले. प्रा. डेंगळे यांनी आम्हांला या हत्याकांडातील मुख्य मास्टरमाईंड राजेंद्र जक्कल याची माहीती दिली. त्याचे भाव, बारकावे, वर्गातील त्याचे वागणे, विक्षीप्तपणा ह्या सर्व गोष्टीवर ते बोलत होते. विशेष म्हणजे जेव्हां अभ्यंकरशास्त्री कुटुंबियांच्या हत्या केलेल्या दिवशी तो महाविद्यालयात आला तो कपाळाला गंध लावून. त्याकाळात परीक्षा चालू होत्या. त्याचा साळसूद चेहरा पाहील्यावर कोणालाही या चेहऱ्यामागे एक पाताळयंत्री सैतान लपला आहे याची चुकूनही जाणीव होत नसे. या हत्याकांडावर 'माफीचा साक्षीदार' नांवाचा मराठी चित्रपट निघाला. नाना पाटेकर याने त्यात जक्कलची भूमिका केली होती. अभिनयासाठी नानाला एकदा येरवडा जेलमध्ये जाऊन जक्कलचे निरीक्षण करणे आवश्यक वाटले. त्यासाठी प्रॉडक्शनने हव्या त्या सरकारी परवानग्या मिळवल्या. पण जक्कल हा कोणालाच भेटू इच्छित नाही असे कळले. तेव्हां नानाने चक्क एक इलेक्ट्रिशियन बनून जक्कलच्या कोठडीतील वायरींगचे काम करण्याचा आवीर्भाव केला व ते करता करता हळूच त्याच्या लकबींचे, बोलण्याचे, चालण्याचे निरीक्षण केले. अनुराग कश्यप यांनीही या घटनेवर 'पांच' हा हिंदी चित्रपट काढला. क्राईम पेट्रोलने त्यावर एक खास एपीसोड बनवून चॅनेलवरून तो प्रक्षेपीत केला. आजच्या पिढीला कदाचित हे लोक अथवा यांनी बळी घेतलेल्या लोकांची नांवेही माहीती नसतील. पण त्रेचाळीस वर्षांपूर्वी संपूर्ण पुणे या घटनांच्या दहशतीखाली होते. आज त्यांना फासावर लटकावून देखील छत्तीस वर्षे झाली आहेत. म्हणतात की कलावंत हे भावनाशील असतात. त्यांच्या संवेदना नाजूक असतात. पण पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातील ह्या उपयोजीत कलेच्या विद्यार्थ्यांचा या संवेदनांशी काहीही संबंध नव्हता. होती ती फक्त सैतानी हाव. अगदी थंड डोक्याने त्यांनी केलेल्या हत्या पाहून सैतानाचीही मान लाजेने खाली गेली असेल!
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष


Comments
Post a Comment