सार्वत्रीक निवडणुका, राजकीय पक्ष आणि त्यांची चिन्हे
आजचा भारतीय नागरीक हा आपल्या सार्वभौम प्रजासत्ताकाच्या सतराव्या लोकसभेच्या उमेदवारांना मतदान करणार आहे. यामध्ये कित्येक मतदार प्रथमच मतदानाचे पवीत्र कर्तव्य पार पडणारे असतील. या निवडणुका कश्या होतात, त्यांचे उमेदवार कोण, त्यांचे पक्ष कोणते, त्यांचे धोरण काय या कोणत्याच गोष्टी कदाचीत कोणाला माहीत नसतील. आजवर किती आणि कोणकोण पंतप्रधान या देशाला लाभले, हेही कदाचीत आठवीत नसेल. आज त्याविषयी हा थोडासा परामर्ष!
भारत देश स्वतंत्र झाल्यावर प्रथमच संवीधान निर्माण झाल्यावर पहील्या देशव्यापी सार्वत्रीक निवडणूका या देशात झाल्या. वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या भारतीय नागरीकाला मतदान करण्याचा हक्क मिळाला. आणि स्वतंत्र भारताची पहीली सार्वत्रीक निवडणूक ठरली ती २५ ऑकटोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२. अर्थात तो काळच असा होता की काँग्रेस पक्ष हा देश्याच्या स्वातंत्र्य लढ्यात आघाडीवर होता. आणि जनमानसात त्याचा खूप मोठा प्रभाव होता. या निवडणूकीत एकूण ५३ पक्षांनी भाग घेतला होता. त्याप दोन होते ज्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे सहकारी म्हणून त्याच्या सोबत काम केले होते ते म्हणजे एक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जे जनसंघातर्फे उभे होते व दुसरे होते, पहीले कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपला 'शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' हा पक्ष स्थापन केला होता. ( जो पुढे रिपब्लीकन पक्ष म्हणून प्रचलीत झाला) त्यांचा उत्तरमुंबई मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराकडून पराभव झाला. पुन्हां ते पोटनिवडणुकीतून उभे राहीले व त्यातही ते पराभूत झाले. पुढे राज्यसभेवर ते निवडून गेले. या पहील्या निवडणुकीत भारतात असलेल्या ८० टक्के जनता अशिक्षीत व निरक्षर असल्यामुळे, प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र अश्या वेग वेगळ्या रंगाच्या मतपेट्या ठेवल्या होत्या. त्यावर उमेदवाराचे नांव, पक्षाचे चिन्ह व नांव असलेले लेबल लावण्यात आले होते.
आचार्य कृपलानी यांचा किसान मजदूर पक्ष, डॉ. लोहीया, जयप्रकाश नारायण यांचा समाजवादी पक्ष, द कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडीया, असे बरेच पक्ष त्यावेळी निवडणूक लढवीत होते. पण पं. नेहरू व काँग्रेस सारख्या ताकदवान पक्षापुढे ते सर्व निष्प्रभ ठरले. ४०९ पैकी ३६४ जागा जिंकून काँग्रेस सत्तेवर आली, व पं. जवाहरलाल नेहरू यांना लोकशाही पद्धतीने निवडलेल्या देशांतील पहील्या सरकारचे पंतप्रधान म्हणून निवडून येण्याचा मान मिळाला. या पहील्या लोकसभेचे अध्यक्ष होते गणेश वासुदेव उर्फ दादासाहेब मावळणकर. आणि १७ एप्रील १९५२ या दिवशी सार्वभौम भारताची पहीली लोकसभा अस्तीत्वात आली. त्यानंतर दर पांच वर्षांनी या देशात सार्वत्रीक निवडणुका सुरु झाल्या.
विधानसभा व लोकसभा या दोन्ही निवडणुका एकाच दिवशी, एकाच वेळी होत असे. त्यामुळे आतासारखा प्रचंड खर्च होत नव्हता. पं. नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ ह्या त्यांच्या निधनापर्यंत असे एकूण १७ वर्षे पंतप्रधानपद भोगल्यानंतर लाल बहादूर शास्त्री देशाची दुसरे पंतप्रधान झाले. शास्त्रीजींचा काळ हा भारत -पाक युद्धाचा काळ म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानला अद्दल घडवल्यामुळे देशभर शास्त्रीजींच्या नांवाचा जल्लोष चालला होता. त्यातच त्यांची दुसरी गाजलेली घोषणा म्हणजे ' जय जवान, जय किसान' ! पुढे युद्ध जिंकल्यावर ताश्कंद येथे त्यांना रशियाने पाकीस्तान सोबत वाटाघाटी साठी बोलावले. व युध्दात जिंकलेले तहात घालविण्यात आले. व त्याच रात्री लाल बहादुर शास्त्री यांचा तश्कन्ड येथे गूढ मृत्यू झाला. व त्यानंतर इंदीरा गांधी यांना के. कामराज रेड्डी यांनी पंतप्रधान बनवीले. याला मोरारजीभाईंचा विरोध होता.
या निवडणूकीत सर्व पक्षांना आपली चिन्हे रजीस्टर करावी लागली. या चिन्हांचा निवडणुकीमध्ये मोठेच योगदान आहे. लोक फक्त चिन्ह ओळखतात. ते पाहून मतदान करतात. कित्येकदा त्यांना आपला उमेदवार कोण, आपण कोणाला मत देतो, त्याची समाजातील पत काय, समाजकार्य काय, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे का याची काहीही माहीती मतदाराला नसते. बहुतेक मतदार ही चिन्हे मनात बाळगूनच मत देतात. आणि एका अर्थानं पाहीलं तर ते देशाला घातक देखील आहे. एखाद्या पक्षाला कायमचे चिन्ह प्रदान करण्याचीही एक पद्धत असते. जर राज्यस्तरावरील पक्ष असेल तर एकूण मतांच्या सहा टक्के पेक्षा अधीक मते जर पडली असली, आणि कमीतकमी दोन आमदार निवडून आले तरच त्याला निवडणूक आयोगाकडून राज्य स्तरीय पक्ष म्हणून मान्यता देते. मग त्यांना असलेल्या चिन्हातून हवे ते व राज्यात कोणी न घेतलेले चिन्ह रजीस्टर करता येते. जर पक्ष राष्ट्रीय असेल तर कोणत्याही चार अथवा जास्ती राज्यातून निवडणूक लढवून सहा टक्क्यापेक्षा जास्ती मते हवीत तसेच चार उमेदवार निवडून यायला हवेत. तेव्हां ते चिन्ह पक्षाचे म्हणून अधीकृत म्हणून रजीस्टर होते.
काँग्रेसने मानेवर जू असलेली बैलजोडी हे चिन्ह घेतले. देशभरातील शेतीप्रीय जनतेला ते आपले चिन्ह वाटल्यामुळे जनतेत त्याचा प्रभाव खूपच वाढला हे मात्र खरे! भारतीय जनसंघाने पणती, समाजवादी पक्षाने वटवृक्ष, नंतर राजगोपालाचारी यांनी स्वतंत्र नांवाचा पक्ष काढला, व त्याचे चिन्ह होते तारा अर्थात चांदणी. पुढे प्रजा समाजवादी हा पक्ष उगवला. त्याने चिन्ह स्वीकारले झोपडी. त्यानंतर काँग्रेसमधील शंकरराव मोरे यांनी ' शेतकरी कामकरी पक्ष' सुरु केला. पुढे त्याचे रूपांतर शेतकरी कामगार पक्ष असे झाले. त्यांचे चिन्ह होते खटारा. पण कोल्हापूर भागात फोफावलेल्या या पक्षाची धुरा पुढे मोरेंनी आपला मानसपुत्र मानलेल्या एन.डी. पाटील यांच्या खांद्यावर सोपवीली. पण या पक्षांत पुढे जातीयवादाचा वास येऊ लागल्यामुळे याची वाढ होऊ शकली नाही. आता तो केवळ रायगड जिल्ह्यापुरता मर्यादीत राहीला आहे. कम्युनीस्ट पक्षाने त्यांचा विळा हातोडा हे चिन्ह घेतले होते, पुढे त्यांच्यातही दोन गट पडले. व भारतीय कम्युनीस्ट पक्षानें विळ्यावर कणीस दाखविले.
अनेक वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता उपभोगीली. पण पुढे पंतप्रधान इंदीरा गांधी व काँग्रेसचे जुने पुढारी यांचा संघर्ष होऊन काँग्रेस प्रथमच दुभंगली. जुने नेते वेगळे झाले व तरुण इंदीरा गांधींच्या सोबत राहीले. पण प्रश्न आला बैलजोडीचे चिन्ह कोणाला घ्यायचे याचा. दोन्ही पक्ष चिन्हासाठी अडून बसले. जुना गट सिंडिकेट म्हणून ओळखला गेला. व दुसरा गांधींचा इंडिकेट. प्रकरण कोर्टात गेले. व कोर्टाने मूळ बैलजोडीचे चिन्ह गोठवीले. सिंडिकेटच्या वाट्याला आली सूत कातणारी महीला व इंदीरा गांधींच्या वाटेला गाय वासरू आले. आणि प्रथमच पाच वर्षाचा निवडणुकीचा कार्यक्रम बिघडला. ५२, ५७,६२,६७ नंतर केवळ तीनच वर्षांनी इंदीरा गांधींनी जनमत आजमावण्यासाठी ७० साली पांचव्या लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली. व त्यांना जनमत मिळून त्या पुन्हा निवडून आल्या व त्यांनी आपले सरकार स्थापन केले. यानंतर १९७१ चे बांगला देश युद्ध झाले व जनमत इंदीरा गांधींच्या बाजूला झुकले. अश्यातच पुढे राजनारायण यांनी त्यांच्या निवडणुकीला कोर्टात आव्हान दिले व कोर्टाने आपला ऐतिहासीक निर्णय दिला व त्यांची निवड रद्द केली. आणि येथून त्यांच्या विरोधी संघर्ष सुरु झाला.
जयप्रकाश नारायण यांनी त्याचे नेतृत्व केले. परीणीती १९७५ सालची आणीबाणी आली. पुन्हां काँग्रेस दुभंगली. पुन्हां चिन्हांचा वाद सुरु झाला. व पुन्हां काँग्रेसच्या दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे मिळाली. इंदीरा गांधींच्या काँग्रेसला हाताचे चिन्ह मिळाले. आणि या आणीबाणीच्या काळात निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या व १९७७ साली निवडणूका जाहीर झाल्या. या दरम्यान इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन सर्वांचा 'जनता पक्ष' स्थापन केला. त्यामध्ये सर्व पक्षांनी आपापल्या पक्षांचे विसर्जन करून त्यात सामील झाले. चिन्ह निवडण्यास वेळ नव्हता. त्यामुळे चौधरी चरणसिंग यांच्या भारतीय लोक दल या पक्षाचे वर्तुळातील 'हलधर' हे चिन्ह स्वीकारले. आणि मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे प्रथमच बिगर काँग्रेस सरकार केंद्रात अस्तित्वात आले अन मोरारजीभाई पंतप्रधान झाले.
या सरकारचे दुर्दैव म्हणजे सगळे शहाणे एकत्र आले होते. समाजवाद्यांच्या अभद्र कारवायांमुळे सरकारवर गंडांतर आले. चौधरी चरणसिंग यांच्या महत्वकांक्षेने उचल खाल्ली. व एकेकाने राजीनामे दिले व मोरारजीभाईंचे सरकार केवळ अडीच वर्षात संपुष्टात आले. इकडे संजय गांधींच्या नेतृत्वाखाली कांग्रेसने चरणसिंगाना पाठींबा दिला व चरणसिंग यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत प्रवेश करण्यापूर्वीच काँग्रेसने आपला पाठींबा काढून घेतला, व चरणसिंगांचे सरकार गडगडले. एकही दिवस अधीकृतपणे ते पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसू शकले नाहीत. व काळजीवाहू सरकारचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहीले. पुन्हां निवडणुका जाहीर झाल्या. यावेळी लोकांनी पुन्हां इंदीरा गांधींना निवडून दिले. ३१ ऑकटोबर १९८४ पर्यंत त्यांची दुर्दुवी हत्या होईपर्यंत त्या पंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या. बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बांगला देशाची निर्मिती अश्या महत्वाच्या घटना त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी राबविल्या. इकडे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ‘ भारतीय जनता पक्षाची’ स्थापना झाली. व त्याचीही घोडदौड सुरू झाली. त्यांची निशाणी होती ‘कमळ’
आठव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत राजीव गांधी याना भरघोस यश मिळाले. पुढे बोफोर्स तोफांचा प्रकार घडला. त्यावेळी अर्थमंत्री असलेले व्ही.पी. सिंग हे बाहेर पडले. १९८९ मध्ये झालेल्या नवव्या लोकसभेत ते पंतप्रधान बनले. त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाची घटना म्हणजे त्यांनी लागू केलेला मंडल आयोग. या द्वारे इतर मागासवर्गीयांसाठी त्यांनी २७ टक्के आरक्षण लागू केले. इकडे दिवसेंदिवस बी.जे.पी.ची ताकद वाढत होती. पुढे सिंग पायउतार झाले व चन्द्रशेखर पंतप्रधान झाले. दहाव्या लोकसभेसाठी निवडणुका जाहीर होणार होत्या त्याच सुमारास राजीव गांधी यांची हत्या झाली. त्या निवडणुकीत एकट्या व भा.ज.प.ने १२० जागा जिंकल्या. पण त्रिशंकू लोकसभेसाठी पी.व्ही.नरसिंहराव यांनी पंतप्रधान म्हणून हे अल्पमतातील सरकार यशस्वीरीत्या चालविले. पहीले दाक्षीणात्य पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झाली.
१९९६ साली झालेल्या अकराव्या लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी काँग्रेस सरकारच्या भानगडी व घोटाळे बाहेर पडू लागले. या काळात प्रादेशीक पक्ष जोर धरू लागले. त्यांच्या मदतीने सरकार बनवणे भाग पडू लागले. व यातून युनाइटेड फ्रंट जन्माला आली व एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान बनले. पण यातूनच त्यांना फार विरोध होता. त्यांचा कार्यकाळ केवळ १८ महिन्यांचा राहीला. देवेगौडा नंतर पंधरावे पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल ह्यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. व त्यानंतर आली १९९८ ची १२ वी लोकसभा. आता आघाड्यांची सरकारे बनू लागली. नॅशनल डेमोक्रॅटीक अलायन्स ( NDA) म्हणून आघाडीचे अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान बनले. पण विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ऑल इंडिया अण्णा द्र मू क ने पाठींबा काढून घेतल्यामुळे अवघे एक मत कमी पडून १३ महीन्यांचे हे सरकार अल्पमुदतीचे ठरले. १३ व्या लोकसभेच्या निवडणुकांना कारगील युद्धाची पार्श्वभूमी होती. व भारतीय जनता पक्षाने त्यात तब्बल १८२ जागा जिंकल्या. पुन्हा अटलजींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली व हे सरकार संपूर्ण पांच वर्षे टिकले.
त्यानंतर आली २००४ ची १४ वी लोकसभा निवडणूक. भारतीय जनता पक्षाच्या एन.डी.ए. ने ' इंडीया शायनिंग' चा जोरदार प्रचार केला. पण मध्यमवर्गीयांना भावणारी ही जाहीरात मोहीम गरीब व शेतकरी वर्गाला मोहवू शकली नाही. त्यामुळे काँग्रेस व इतर आघाडी केलेल्या पक्षांना बहुमत मिळाले व त्यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवीले. या सरकारला कम्युनिस्ट पक्षाने बाहेरून पाठींबा दिला होता. पुढे २००९ ते २०१४ दरम्यानच्या १५ व्या लोकसभेसाठी पुन्हां काँग्रेसला लोकांनी बहूमत दिले. व मनमोहनसिंग यांची दुसरी टर्म सुरु झाली. पण या काळात काँग्रेसवर लाच लुचपतीचे, भानगडीचे अनेक आरोप झाले. राहूल गांधींचा अनधिकृत प्रभाव सरकारवर जाणवू लागला. मनमोहनसिंग हे मौनी पंतप्रधान म्हणून ओळखले जाऊ लागले. व नेमका याचा लाभ बी. जे.पी. ने उचलला.आणि सोळाव्या लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणुन जाहीर करून काँग्रेसने केलेल्या घोटाळ्यावर आधारीत अशी जाहीरात मोहीम एका प्रख्यात जाहीरात संस्थेकडून करून घेतली. व त्यांचा 'अबकी बार, मोदी सरकार' ही घोषणा एकदम लोकप्रिय केली. मोदी स्वतः देशभर फिरले. विरोधकांकडे त्यांच्या तोडीचा एकही वक्ता नव्हता. व भा.ज.प.ने पक्षाला पुढे न करता मोदी हे नांव पुढे करून मोदी 'सरकार' असा प्रचार केला. व कित्येक वर्षांनंतर जनतेने बी.जे.पी.ला संपूर्ण बहुमत दिले. परीणामी काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासातील अत्यंत दरिद्री असा निकाल या निवडणूकीत लागला. केवळ देशभरातून काँग्रेसचे ४४ उमेदवार निवडून आले.
आता पाच वर्षे सरली आहेत या गोष्टीला. आपापला लेखाजोखा घेऊन सर्व पक्ष पुन्हा मतदारांना सामोरे जात आहेत. पुन्हा जाहीरनामे वाचले जात आहेत. गेल्या पांच वर्षात अनेक न दिसलेले चेहरे आता आपल्या दाराशी हात जोडून उभे रहात आहेत. आणि मतदान झाल्यावर पुन्हा गुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तुम्ही कधीही फोन वरून संपर्क साधण्याचा वा भेटण्याचा प्रयत्न केला असता दरवेळी साहेब अंघोळीला गेले आहेत, साहेब नाश्ता करताहेत, साहेब मीटिंगमध्ये आहेत अशी उत्तरे मिळणाऱ्या आपणाला आता तुम्हीच आमचे राजे म्हणून गौरवणाऱ्या या नव्या संस्थानिकांना भरपूर वेळ मिळणार आहे.
पण आपले काम म्हणजे त्या दिवशी जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावयाचा. लोकशाही राष्ट्राची लोकशाही बळकट करायची.
तेव्हां आता वेळ आली आहे की योग्य उमेदवाराला निवडून देण्याचा, काम न करणाऱ्या नेत्यांना जाब विचारण्याचा.संसदेने तो हक्क आपणा सर्वांना दिला आहे. कारण संसद सार्वभौम आहे. सर्वाना समान हक्क देणारी, अन तुमचे स्वांतत्र्य अबाधीत राखणारी!
- प्रा. मं.गो. राजाध्यक्ष










Comments
Post a Comment