माझ्या मुंबईतील माझ्या आठवणी.


५ जून १९६२ . हा दिवस मी मुंबईत माझ्या लहानपणापासून स्वप्न पाहीलेल्या नगरीत पाय टाकलेला दिवस मी कधीच विसरणार नाही. माझ्या आयुष्याच्या करिअरचा पहीलाच दिवस होता तो. मुंबईत आल्यावर काय पाहू, काय नको हेच कळत नव्हते. सर्वच भव्य दीव्य असे भासत होते. पुढे आपले संपूर्ण आयुष्य या महानगरीत काढायचे आहे, हे ध्यानांत येऊन छातीवर एक प्रचंड दडपण येत होते. रस्त्यावर दिसणाऱ्या प्रचंड अश्या बी.इ.एस.टी. च्या बस व त्यावरील A, A4, O2, L, अश्या अक्षरांच्या रूट दिसत. ( तेव्हां आकडे आलेले नव्हते ) डबल डेकर ह्या बस मी प्रथमच पहात होतो. सिंगल डेकर बसमध्ये दोन दोन कंडक्टर असत. बसच्या दोन्ही बाजूनी ते तिकीटे देत फिरत असत.  तसेच बाहेरून आलेल्याना किंवा येथील नागरीकांनाही सोयीचे ठरेल असे १.२५ रुपयांचे 'Travel as you like” हे दिवसभर चालणारे तिकीटही मिळत असे. ते काढल्यास कोणत्याही बसमध्ये आपणास चढता येत असे. बसच्या सर्वच रूट ना ते तिकीट चालत असे.   शिवाय याच बी.इ.एस.टी. ची ट्राम दादर टी.टी. ते म्यूझियम पर्यंत रस्त्यावरील ट्रॅक वरून धावत असे

१९६२ साली जेव्हां ही ट्राम बंद झाली, तेव्हां तिचे रूळ काढण्याचे महापालीकेने ठरविले, तेव्हां तें खूप खर्चीक असल्याचे जाणवले. तेव्हां हे रूळ जमिनीमध्ये दाबण्यात आले. रस्त्यावर बॉंबे गँस कंपनीचे गँसचे दिवे असत. सकाळी एक कामगार सायकलवर एक लांब बांबू घेऊन जात असे व त्या बांबूच्या आधारे त्याचे बटन बंद करीत असे. फोर्ट भागात मोठ्या टॅक्सी दिसत. त्यांचे ड्राईव्हर बहुदा सरदार असत. येथे  उत्तर भारतीय असत, पण आताइतक्या संख्येने नव्हे. इस्त्रीवाला, दूधवाला हे उत्तरभारतीयच असत. रोज सकाळी दुधाचे कॅन व एक लिटरचे माप घेऊन भल्या पहाटे ते दूध घालण्यास येत. अगदी नावाने हाक मारून उठवीत असत. पण ज्या भाग्यवानांकडे आरे दुधाची मेटलची कार्डे असत, ते सकाळी काचेच्या बाटल्या घेऊन सेंटरवर दूध आणण्यास जात. अनेक मराठी चित्रपटात अश्या सेंटरवर प्रेम बसून लग्न जमविल्याचेही दाखवीत असत. या बाटल्यांच्या फॉईलच्या झाकणावर एक वर्तुळ एम्बॉस केलेले असे. दर दिवशी त्यामध्ये एक खाच दाखविण्यांत येत असे. त्यावरून दूध बाटलीत कोणत्या दिवशी भरलेले आहे हे समजत असे

मुंबईची जीवन वाहीनी असलेल्या लोकल ट्रेन तर आपल्या लेकरांना कुशीत घेऊन सतत धावित असत. आताही त्या धावतात. पण त्याकाळात त्या धावण्यामागे एक प्रकारची शिस्त होती. भरवसा होता. वांद्रे ते बोरीबंदर येथे जाण्यास जी हार्बर लाईनची रेल्वे होती, ती सहा डब्यांची असून दोहोबाजूला फुटबोर्ड होते. वेस्टर्न रेल्वेच्या लोकलनाही असे फुटबोर्ड असत. त्यावर उभे राहून सात आठ तरी प्रवासी नक्कीच प्रवास करीत असत. फर्स्ट क्लासचा प्रवास तसा सर्वाना सहजी परवडणारा नव्हता, पण आम्हां विद्यार्थ्यांना अर्ध्या सवलतीत पास मिळत असल्याने आम्ही फर्स्ट क्लासने जात असू. या लोकल गाड्यांचा पास काढण्यासाठी २ रूपयांचे डिपाॅझीट घेतले जात असे. त्यामुळे आपला पास संपला तरी पुढे तीन दिवस तो चालत असे.  मात्र सकाळी ऑफीसच्या वेळी दक्षीण मुंबईच्या बाजूला जाणाऱ्या गाड्या भरुन जात, तश्याच उलट दिशेने येणाऱ्या गाड्या मात्र झोपून जावे इतक्या रिकाम्या असत. कारण सर्व कारखाने, उद्योग हे दक्षीण मुंबईच्या बाजूलाच असत. लोकल गाडी माहीम सोडून वांद्र्याकडे येऊ लागली की त्यावेळेस प्रचंड दुर्गंधी येत असे. ही दुर्गंधी असे ती तेथील कत्तलखान्यातील  टाकून दिलेल्या प्राण्यांच्या निरुपयोगी अवशेषांची. तसेच सांताक्रूझ कडे गाडी आली की बाजूला दिसे तो मुंबईचा सुप्रसीध्द असा सांताक्रूझचा लखलखीत असा अनेक रंगी लाईट चमकावत असलेला विमानतळ. व जरा पुढे पार्ल्याकडे आलो की पोटभर साठवून घ्यावा असा पार्ले बिस्कीट कंपनीतील ग्लुको बिस्किटांचा घमघमीत सुवास. जणू आपण बिस्किटेच खात आहोत असे भासवणारा. आणि विमानतळ म्हणजे हक्काचे फिरण्याचे ठिकाण. थेट विमानाच्या धावपट्टीच्या रेलींग पर्यंत आपल्याला जाता येत होते. कुठेही मज्जाव नाही. आज कित्येकजण हा विमानतळ पार्ल्यातील असे म्हणतात. पण आता सांताक्रूझ मिलिटरी कॅम्प जवळील गेटातून व्ही.आई.पी. लोकांची ने आण करतात तेथेच हा पूर्वीचा सांताक्रूझ विमानतळ होता. त्यासमोरून बसही जात येत असत. आता ते सर्व बदलले आहे.

मुंबईतील इराणी रेस्टारंट ही एक या मुंबईची खास अशी ओळख होती. अनेक ठिकाणी मोक्याच्या जागी ही इराणी हॉटेल्स असत. मुख्य म्हणजे दोन रस्त्यांच्या कोपऱ्यावर ही हॉटेल्स असत. त्यामुळे दोन्ही बाजूनी त्यात शिरता येत असे.  त्यांचे गोल टेबल, नक्षीदार खुर्च्या, टेबलवर सफेद मार्बल असा ठरलेला साज. सर्वत्र हीच रचना या हॉटेल्स मधून दिसून येत असे. ही हॉटेल्स भल्या पहाटे उघडली जात व त्यामध्ये ब्रून मस्का, बन मस्का, खारी बिस्कीट, केक, खिमा प्याटीस असे खाद्य पदार्थ सकाळपासून मिळत असत. ऑम्लेट देखील एक आकर्षण असे. फोर्ट मधील कयानी, बास्तानी, ही प्रसीद्ध इराणी हॉटेल्स. विशेषतः कयानीचे मटण प्याटीस, बिस्किटे, व बास्तानीची खारी बिस्किटे, मावा केक्स, हे देखील प्रसीद्ध होते. तेव्हां उडुपी हे मोठ्या प्रमाणावर नव्हते. पण मराठी उपहारगृहे मात्र मोठ्या प्रमाणात दिसत. यात गिरगावातील भज्यांसाठी प्रसीद्ध असलेले  कुलकर्णी, कोना, खरवससाठी प्रसिध्द असलेले मॉडर्न, चाफेकर दुग्ध मंदीर, दुधी हलवा प्रसीद्ध पुरोहीत दुग्धालय,  केळकर उपहार गृह, डोक्यावर फेटे असलेले वाढपी बाळगणारे तांबे यांची रेस्टारंटस, सरदार गृह, मामा काणे यांचा बटाटेवडा अशी एकापेक्षा एक चवीष्ट उपहारगृहे ह्या मुंबईची शान वाढवीत होती. तसेच खोताच्या वाडीतील 'आनंदाश्रम' ही सामीष भोजनाची खानावळ प्रसिध्द होती. अद्याप पर्यंत ती कार्यरत होती. तसेच दादर येथील  कानविंदे यांचे 'दुर्गाश्रम' हेही प्रसीद्ध होते. लॅमींग्टन रोडवरील बटर चिकन साठी प्रसीद्ध असलेले शेरे पंजाब, विल्सन काॅलेजकडील हाॅटेल विल्सन ही नांवेही आठवणीतील आहेत.  कांही लहान सहान हॉटेल्स असायची ती खास करून कामगार वर्गासाठी मानली जात. तेथे बरेच गिरणी व इतर कामगार चपात्या सोबत घेऊन येत व हॉटेल मध्ये उसळ अथवा एखादी भाजी मागवून त्यासोबत खात असत. त्याकाळी ते चालत असे. बऱ्याच खानावळीत महिन्यावर कुपन काढून जेवणारे अनेक लोक त्याकाळी असत. चाळीस पैशांना राईस प्लेट, व पन्नास पैशाना  स्पेशल राईसप्लेट मिळत असे. शिवाय दर महीन्याच्या शेवटच्या रविवारी मेंबर्सना फीस्ट असे. त्यादिवशी एखादा खास गोड पदार्थ बनविण्यात येत असे. मात्र बाहेरून आलेल्याला त्यादिवशी जास्त दर असे. व त्या संध्याकाळी खानावळ बंद ठेवण्यात येई.

 चहा हे पेय मुंबईकरांना अत्यंत प्रिय. अनेक ठिकाणी चहा पिण्याची सोय असलेली हॉटेल दिसत. 'शंकर विलास हिंदू हॉटेल' या हॉटेलांची मुंबईभर एक चेन होती. त्यामध्ये  मसाला, अमृततुल्य, गुलाबी, सुंदरी अश्या विविध नावांचे चहा मिळत व तो पिण्यासाठी बरेच लोक येत असत. असे एक हॉटेल महात्मा फुले मंडई कडे होते. त्याच्या शेजारीच एक फरसाण दुकान होते. दोघेही प्रसीद्ध. अनेक लोक फरसाण वाल्याकडून फरसाण, पापडा-मिरची बांधून घेऊन शेजारील हॉटेलमध्ये चहा मागवून त्यासोबत तो खात असत. अगदी प्रिंसेस स्ट्रीट पासून लोक येऊन त्याचा रोज आस्वाद घेत. आम्हीही मुद्दाम संध्याकाळी तेथे जात असू. इराण्याच्या चहाची चव जशी वेगळी असे, त्याचप्रमाणे या 'शंकरविलास' ची चवही तशीच चटकदार असे. हळूहळू चार आणे दर असलेल्या चहाची किंमत वाढत चालली होती. पण रेल्वेच्या स्टेशनवरील कॅन्टीनमध्ये मात्र कैक वर्षे चहा पाच पैशाला मिळत असे. त्यामुळे अनेक लोक तो स्टेशनवर पीत असत.

साठचे दशक म्हणजे सुती कपड्याचा जमाना असलेले. कपडे धुवून त्यांना इस्त्री केल्याशिवाय घालता येत नसत. त्यासाठी मुंबईमध्ये दोन प्रमुख लॉंड्र्या  होत्या. त्यापैकी सर्वात मोठी असलेली लॉंड्री म्हणजे  वरळीची 'गारमेंट क्लीनर्स' व उपनगरातील ' सनलाईट लॉंड्री'. त्याकाळात वाॅश- एन- वेअर चे कपडे आले नव्हते. पॅंटसाठी डक नांवाचे चमकदार कापड मिळत असे.    सफेद कपड्याना टिनोपॉल घालून एक चकाकी आणली जायची व त्यात स्टार्च घालून ते कडक केले जायचे. याला 'टिनोपॉल स्टार्च धुलाई' म्हटली जात असे. गारमेंटचे हे खास वैशिष्ट्य होते. रोज सकाळी गारमेंट व सनलाइट यांच्या गाड्या त्यांच्या लॉंड्री मधून कपडे गोळा करीत फिरत असत. आणि तिसरी एक लॉंड्री होती ती म्हणजे वरळीची 'बॅंड बॉक्स' मात्र ही खास करून वुलन कपड्यांच्या ड्राय क्लिनिंगसाठी प्रसीद्ध होती. अजूनही वरळीला गारमेंट हाऊस व बॅंड बॉक्सच्या इमारती आपणाला दिसतात. पुढे वाश-एन-वेअर कपडे आल्यावर हळूहळू यांचे धंदे मंदावले.

डबेवाले हे एक आमच्या मुंबईचे खास असे वैशिष्ट्य होते. सकाळी घरून डबा घेऊन जाणारा हा डबेवाला स्टेशनवर गेल्यावर दक्षीण मुंबईकडून आलेले डबे आपल्याकडे घेत असे व आपले त्यांच्या स्वाधीन करीत असे. या डब्यांवर इनॅमल पेंटने काही चिन्हे काढलेली असत. त्या अनुषंगाने प्रत्येक डब्याचे वितरण नेमके त्या व्यक्तीकडे होत असे. पुण्याजवळील जुन्नर परीसरातील ही मंडळी वारकरी संप्रदायातील असून अतीशय धार्मीक होती. रात्री भजन करणे ही त्यांची श्रद्धा होती. आज फास्ट फूड संस्कृतीमुळे डबे प्रकरण अत्यंत अल्प झाले आहे. पण या डबेवाल्यांच्या विचार प्रणालीने जागतीक मान्यता मिळवली. खुद्द प्रिन्स चार्ल्सने यांची  दखल घेऊन या डबेवाल्यांच्या वितरण प्रणालीचे कौतुक केले होते.

हळू हळू मी या मुंबईसोबत रुळू लागलो. बसच्या अक्षरांच्या रुटवरून आकड्यांपर्यंत मजल गेली. बरशेन व एस्सो यांचे घरगुती वापराचे गॅस सिलिंडर उपलब्ध झाले. २० रुपयांचा सिलिंडर व १०० रुपयांचे डिपॉझीट भरल्यावर गॅस कनेक्शन मिळू लागले. १९६५ च्या भारत-पाक युद्धानंतर जेवणावळींवर बंधने आली. हॉटेलमधून सोमवारी भात मिळणे बंद झाले. जे लोक कायम हॉटेलमध्ये जेवत असत, त्यांना त्यांची रेशन कार्ड्स आणण्यास सांगण्यात आली. कारण तांदूळ मिळणे कठीण झाले होते. रेडीओवर देशभक्तीपर गाण्यांचे कार्यक्रम सुरु झाले. एका रात्री आकाशात गडद केशरी लालबुंद रंगांची आतषबाजी सुरु झाली. तेव्हां अनेक नागरीक ती पाहण्यास उत्सुकतेने बाहेर आले. तेंव्हां काही जणांच्या अंगावर  गरम धातूचे तुकडे पडून ते लोक भाजले गेले. नंतर कळाले की शत्रूच्या विमानांचा शोध घेण्यासाठी आकाशात सोडलेले ते ट्रेसर होते. त्याच्या प्रकाशामुळे विमान दृष्टीक्षेपात येऊन त्याला हे ट्रेसर चिकटत असत व नंतर फुटून पडत. त्या विमानाचा पाठलाग करून त्याला समुद्रावर नेवून त्याला कोसळविण्यात येत असे.


मुंबईची ओळख दाखविणारी चित्रपट गृहे देखील सर्वांचे आकर्षण असे. मेट्रो हे आलीशान म्हणून ओळखले जाई. १ रुपयाच्या तिकिटासाठी तेथे बाहेरच्या बाजूला प्रचंड रांग जरी असली तरी ती आतमध्ये कधी लुप्त होत असे ते कळायचे सुद्धा नाही. तेथे फक्त इंग्रजी चित्रपट लागत. फोर्टमधील कॅपीटल, न्यू एम्पायर, स्ट्रॅन्ड, एक्सलशिअर. एरॉस, लिबर्टी, एडवर्ड,  टाटांचा बंगला पाडून तेथे उभारलेले स्टर्लिंग ही चित्रपटगृहे, ऑपेरा हाऊस चे रॉक्सि, ऑपेरा हाऊस, ग्रॅण्ट रोडवरील नाझ, स्वस्तीक, सुपर, नॉव्हेल्टी, इंपिरिअल आणि त्यावेळचे आलीशान म्हणून गणले जाणारे ' मराठा मंदीर' ही सर्व चित्रपट गृहे मुंबईच्या वैभवात भर घालीत होती. त्यात एक आधुनीक चित्रपटगृहाने भर घातली ती म्हणजे  राज कपूरच्या 'संगम' या दोन इंटरव्हल असलेल्या चित्रपटाने आरंभ केलेले 'अप्सरा' हे चित्रपटगृह. पुढे 'मिनर्व्हा' ह्या चित्रपटगृहाचे नूतनीकरण झाले व ' शोले' ह्या चित्रपट श्रुष्टीत इतीहास घडविणाऱ्या चित्रपटाने त्याचे उदघाट्न झाले. ह्या चित्रपटाने उच्चांक केला होता. पुढे 'अलंकार' चित्रपट गृह होते. त्याच्या पुढील भागात इतकी चित्रपट गृहे होती की त्यांची नावेही कधी वृत्तपत्रात दिसत नसत. गिरगावातील श्रीकृष्ण चे नामांतर नंतर ' ड्रिमल्यांड झाले, वरळी नाक्यावरील कुमकूमचे गीता झाले.  त्यापुढील लोटस, अश्या अनेक चित्रपट गृहांनी या मुंबईकरांची करमणूक केली आहे.
नेहमीच्या शोचे तिकीट ३.३० असले तरी सकाळच्या मॅटीनी शोचे तिकीट १ रूपया असे. यावेळी जुने क्लासीक चित्रपट दाखविण्यात येत असत. पहीली ट्वीन थेटर म्हणून ताडदेवचे गंगा -जमुना व वांद्र्याचे गेइटी ग्यालक्सि ह्यांना श्रेय जाते. शिवाय सोबत मिनी थेटर देखील त्यांची होती. आणि चित्रपटगृहात एक इतिहास घडवणारे चित्रपटगृह म्हणजे वांद्र्याचे 'ड्राइव्ह-इन' हे खुले चित्रपट गृह. तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जायची व तेथील स्पीकर आत घ्यायचे व निवांतपणे कुटुंबासोबत चित्रपटाचा आस्वाद घ्यायचा. वांद्र्याकडून लोकलने जात असतानाही त्यावर दाखविणारा चित्रपट दिसत असे. यात मराठी माणसाचे मानदंड असलेली सिनेमा गृहे म्हणजे लालबागची भारतमाता, हिंदमाता व दादरचे प्लाझा ही होत.


मुंबईच्या कापड गिरण्या हादेखील तेव्हां बऱ्याच माणसांचे संसार चालविण्याचे साधन होते. डॉन, खटावू, गोल्ड मोहर, फिनिक्स, अंबीका, श्रीराम मील, कमला मील, मफतलाल मील, बॉंबे डाईंग, इंडीया युनाइटेड मील, अश्या सुमारे दीडशेच्या आसपास कापड गिरण्या या मुंबईत होत्या. तो भाग गिरणगांव म्हणून ओळखला जाई. प्रचंड धुरांडी असलेल्या त्या इमारतीच्या पोटात अनेक कामगार त्या सामावून घेत असत. कापसाचे स्पिनिंगपासून त्याचा धागा बनणे, त्याचे कापडात रूपांतर होणे, हे सर्व ती  धडधडणारी यंत्रे काम करीत असताना पाहण्यास एक विलक्षण रोमांचक असे.
गिरणीचा भोंगा, प्रचंड गेट, त्याबाजूचा लहान दरवाजा ह्या खुणा गिरणीची ओळख देण्यास पुरेश्या होत्या. बाहेर पहारेकरी म्हणून दारवान असे. पूर्वी हे बहुदा पठाण असत. आणि हे कामगार बरेचसे कोकण भागातील असत. एखाद्याकडे 'खानावळी' म्हणून जेवणाचे पैसे देऊन हे रहात असत. व बरेचजण रात्री बाहेर रस्त्यावर झोपत असत. जर कधी रात्री उशीरा त्या भागात गेले की उघडे दाटीवाटीने झोपलेल्या या लोकांना पाहून समुद्रातील बाहेर आलेल्या माश्यांची आठवण येत असे. या गिरण्यानी अनेक संप पाहीले. कॉ. डांगे हे त्याचे नेतृत्व करीत असत. पण कधीही एका कामगाराला कामावरून काढायला त्यांनी दिले नाही. संप करताना तो मागे घेण्यासाठी एक दरवाजा आम्ही नेहमीच उघडा ठेवतो, असे डांगे सांगत असत.   पण पुढे दत्ता सामंत यांच्या हातात नेतृत्व गेल्यावर मात्र त्यांचा हटवादीपणा नडला. १८ जानेवारी १९८२ रोजी त्यांनी  गिरणी कामगारांचा संप पुकारला. त्यात सुमारे २.५ लाख कामगार संपावर गेले. आणि गिरणी मालकांनी याकडे अजीबात लक्ष दिले नाही. अखेर अनेक कामगाराना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले. आणि अनेक गिरणी मालकांनी आपल्या गिरण्या बंद केल्या. अधीकृत रित्या अद्यापही हा संप मागे घेतला नाही. पण मुंबईच्या त्या वैभवाला नक्कीच या संपामुळे  एक डाग लागला. कित्यायेकांचे संसार धुळीला मिळाले. याच कष्टकरी कामगारांनी मुंबईचे वैभव वाढवले, एवढेच नव्हे तर महाराष्ट्रासाठी मुंबई मिळविण्यासाठी बलिदानही केले. पण दत्ता सामंतांच्या संपाने त्यांना देशोधडीला लावले.


त्या साठच्या दशकात मुंबईतील मुख्य मराठी वृत्तपत्रे म्हणजे लोकसत्ता, लोकमान्य,  एस.एम.जोशींनी चालविलेले लोकमित्र, नवशक्ती, आचार्य अत्रे यांचा मराठा, आणि नवाकाळ ही होत. नंतर त्यात टाइम्सचे 'महाराष्ट्र टाइम्स' सामील झाले. टाईम्स ग्रूपचे ते पहीलेच मराठी वृत्तपत्र होते. अत्रे मराठा मधून राज्यकर्त्यांच्या चुकांवर आसूड ओढत, तर नवाकाळ हा बातम्या अगदी सवीस्तर देत असे. विशेषतः कोर्ट खटल्याच्या बातम्यांचे त्यांचे रिपोर्टींग इतके बारकाईने असे की कायद्याचे विद्यार्थी देखील अभ्यासासाठी त्याचा वापर करीत. शिवाय शब्दकोडे हे देखील या नवाकाळचे आकर्षण होते.  आणि याच दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी आपले व्यंगचित्राला वाहीलेले महाराष्ट्रातील पहीलेच व्यंगचित्र साप्तीहीक ‘मार्मीक’ हे  सुरू केले.  आणि त्याने इतीहास घडवीला.  अर्थात त्याकाळात दूरदर्शन नव्हते. रेडिओच हे करमणुकीचे, बातम्या समजण्याचे, समाज शिक्षणाचे मुख्य साधन होते. म्हणून वाचन संस्कृती जोपासली जात असे. अनेक वाचनालये होती. तेथे नवीन पुस्तके, मासीके यासाठी लोकांची गर्दी होत असे. या सर्क्युलेटिंग लायब्ररी मध्ये दिवाळी अंकासाठी वेगळी वर्गणी भरावी लागत असे. मग संपूर्ण महिनाभर दिवाळी अंक तुमच्या दिमतीला! अगदी शाळकरी मुलेदेखील पुस्तकांचे वाचन करीत असत.


मुंबईची चौपाटी ही तर श्रमजीवी लोकांचे विश्राम घेण्याचे एकमेव ठिकाण. आठवडाभर काम करून थकल्या भागल्या जीवाला आराम देण्यासाठी मुंबईकर सहकुटूंब येथे शनिवार रविवार येत असत. अनेक कार्यालयातील मित्र-मैत्रिणी देखील अमुक ठिकाणी भेटू असे ठरवून येथील ओल्या वाळूत आपले पाय घालून चालत असत. नंतर तेथील भेळपुरी, पाणीपुरी, कुल्फी, आईस क्रीम, गंडेरी  याचा चवीचवीने आस्वाद घेत मावळत्या सूर्याकडे पहात त्याचे सौंदर्य न्याहाळीत असत. मधूनच मॉलीशवाले, चंपीवाले गिऱ्हाईकाच्या शोधात फिरत असत. गिरगांव आणि दादर चौपाटी या प्रामुख्याने प्रसीद्ध होत्या. सार्वजनीक गणपती विसर्जन येथे होत असे ते अद्यापही चालू आहे. मोठमोठ्या नेत्यांची भाषणे या गिरगांव चौपाटीवर आम्ही ऐकली आहेत. त्यामध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, इंदीरा गांधी अश्या दिग्गज नेत्यांची भाषणे होत. शिल्पकार फडके यांनी शिल्पबद्ध केलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या साक्षीने ह्या सभा होत असत.

शिवाजी पार्क अथवा शिवतीर्थ याचे नांव घेतल्याशिवाय मुंबईची महती पूर्ण होऊच शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी या मैदानाने मोठमोठ्या नेत्यांचे वक्तृत्व येथे आजमावले आहे. कॉ. डांगे, जॉर्ज फर्नांडीस, आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, शाहीर अमरशेख अश्या दिग्गजांचे आवाज येथे गर्जले आहेत. आचार्य अत्रे आणि शिवाजी पार्क हे तर समीकरणच बनले होते. त्यांना ' Lord of Shivaji Park’ म्हणूनच ओळखण्यात येत असे. रात्री दहा - अकरा वाजेपर्यंत मी त्या  शिवतीर्थावर या महान नेत्यांची भाषणे ऐकत बसलो आहे. आणि मुख्य म्हणजे कोणत्याही नेत्याला तुम्ही सहजी भेटू शकत होता. आतासारखे ते पंचतारांकीत नेते नव्हते. राजा एडवर्डचा अश्वारूढ भव्य पुतळा असलेला फोर्ट मधील भाग त्याच्या काळ्या घोड्यामुळे ‘काळा घोडा’  या नांवानेच प्रचलीत होता. त्यापुढील इमारतीत विधान भवन होते. त्यामुळे अधीवेशनाच्या वेळी आलेले विरोधकांचे सर्व मोर्चे या काळ्या घोड्यापाशी अडविण्यांत येत असत. आता त्या इमारतीत पोलीस मुख्यालय आहे.   तसेच चर्चगेटचे क्रॉस मैदानही आठवणीत राहीले आहे. त्याकाळात मुंबईत सर्कस ही बहूदा नेहमीच येत असे. आणि तिचा मुक्काम ओव्हलवर आणि माहीमला असे. ती पाहण्यास आम्ही नेहमीच जात असू. त्यातील जनावरांचा शिकारखाना, ट्राफिजवरील कसरतीची कामे, मृत्यूच्या गोलातील दोघांनी चालवलेली मोटारसायकल हे सर्व बघताना काळजाचे ठोके चुकत असत. आणि मुख्य म्हणजे त्यातील जोकर! वरून भोळा वाटणारा हा जोकर खरेतर सर्वच बाबीत सर्वांपेक्षा हुशार असतो. आता प्राण्यांकडून काम करवून घेण्यास बंदी केल्याने सर्कस या प्रकाराला आताच्या पिढ्या मुकला आहेत हे मात्र खरे!




अशी होती माझी मुंबई. सर्वाना मायेने पोटाशी घेणारी. कोणी उपाशी झोपू नये याची काळजी घेणारी, आणि मुख्य म्हणजे आपल्या लेकरांना सुरक्षीतता जाणवून देणारी. पण आज आपण तिची काय काळजी घेतो? राज्यकर्ते असोत, गुन्हेगारी जगतातील लोक असोत, रस्ते फुटपाथ अडवणारे परप्रांतीय असोत, महापालिका, शासन यांच्या आशीर्वादाने या मुंबईला चहुबाजूनी ओरबाडून खात आहेत. अवैध झोपडपट्ट्यांची वीण माफीयावादी दादांकडून वाढतच चालली आहे. आणि नेहमीप्रमाणे मतांच्या लाचारीसाठी शासन त्यांना वैध ठरवीत आहे. करदात्यांना सोयी देण्याऐवजी त्यांचा पैसा या अनधीकृत लोकांमध्ये वाटण्यांत येत आहे.   येथे बाहेरून येणाऱ्या अनेक राज्यातील लोंढ्यांचा त्राण तिला सहन करावा लागतो. तिच्या जखमांच्या वणावर फुंकर घालण्या ऐवजी तिच्याकडून लुबाडता येईल तितके घेऊन स्वतः गब्बर होत आहेत. आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी ' मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरु आहे' अशी एक हाकाटी देऊन जनतेचे लक्ष दुसऱ्या ज्वलंत प्रश्नावरून दुसरीकडे वळवीत आहेत..आणि आपण केवळ ' आपली मुंबई बकाल होत चालली ' म्हणून अश्रू ढाळीत बसलो आहोत.

- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

( जुनी चित्रपट तिकिटे: सौजन्य प्रा. अरुण काळे )




Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

माझे वडील कलाकार होते :

अक्षरांची प्राचीन सौंदर्यदृष्टी जपलेला कला प्राध्यापक : प्रा. रमेश खापरे.