बेळगांव ते गिरगांव : एक प्रवास, पांडूरंग नागेश कुमठा यांचा:
कांही दशकांपूर्वीची गोष्ट. कोणाताही मराठी पुस्तकप्रेमी माणूस गिरगावातील पोर्तूगीज चर्च समोरील 'बॉंबे बूक डेपो' ह्या भरस्त्यावरील पुस्तकांच्या दुकानाच्या पायऱ्या चढल्याशिवाय राहीला नसेल. आम्हीही कित्येकवेळा त्या पुस्तकांच्या दुकानांतून अनेक पुस्तके विकत घेतली आहेत. दुकानांत गेल्यावर दिसत ते एक मितभाषी पण सुहास्य चेहऱ्याचे त्या बुक डेपोचे मालक पांडूरंग कुमठा. नांवावरूनच जाणवत असे ते कर्नाटकाच्या बाजूचे आहेत. मंगलोरी कोंकणी ही त्यांची भाषा होती. पण पुस्तकांची ओढ, त्यांची आवड, वाचनाचे लिहीण्याचे वेड यामुळे हा माणूस या पुस्तक विक्रीच्या व्यवसायात पडला. तो नेटाने चालवीला अन आपले या पुस्तकी विश्वात एक स्वतंत्र असे स्थान निर्माण केले. आपल्याला हवे ते पुस्तक या 'बॉंबे बुक डेपो'त मिळणारच याची खात्री सर्वसाधारण वाचकाला असेच!
पांडूरंग कुमठा यांचा जन्म बेळगावातील बैलहोंगल या तालुक्यांत २५ मे १९२१ रोजी झाला. आई लवकरच वारल्यामुळे शेंडेफळ म्हणून त्यांचे नेहमीच घरी कौतुक होत असे. पुढे तेथेच त्यांना शाळेत दाखल करण्यात आले. त्या शाळेत कानडीही शिकविण्यात येत असे. त्यांचा वडील भाऊ तेथेच शाळेत होता. पण ती शाळा इंग्रजी चौथीपर्यंतच असल्याने पुढे हे कुटुंब बेळगांवला आले. तेथील बेनन-स्मिथ हायस्कुल मध्ये त्यांचे पुढील शिक्षण झाले. अभ्यासात पांडुरंग हुशार होतेच. त्या काळातील इंटरची परीक्षा झाल्यावर पुढील नैपुण्य विषय निवडावे लागत असत. बी.ए.ला त्यांनी इंग्रजी हा विषय घेऊन ऑनर्स घ्यायचे ठरवले. यासाठी हवी होती आर्थीक मदत. तीही थोडीफार सारस्वत समाजाच्या शिष्यवृत्तीने भागली होती. पण पुढे पुस्तकांची गरज होती. त्यासाठी त्यांना सरदार हायस्कुलचे प्रिन्सिपॉल यांनी निवृत्त सब जज्ज श्री उग्राणकर याना पत्र दिले. इंटरचे त्यांना मिळालेले मार्क्स पाहून त्यांना आनंद झाला. व त्यांनी त्याकाळात २०० रुपये त्यांना पुस्तकांसाठी दिले. शिवाय आणिक कांही पुस्तके लागली तर घे व मला त्यांची पावती दे. त्याचे पैसे मी तुला देईन असेही आश्वासन त्या सद् गृहस्थाने त्यांना दिले. पुढे चांगल्या गुणांनी ते बी.ए. ऑनर्स झाले. पुढे एम. ए. देखील इंग्रजी विषय घेऊन झाले. त्यानंतर मुंबईच्या पॉप्युलर बुक डेपो मध्ये कांही काळ उमेदवारी केल्यानंतर पुढे १ एप्रील १९४८ रोजी त्यांनी 'बॉंबे बूक डेपो' मध्ये काम करण्यास आरंभ केला. सुप्रसिध्द लेखक कवी जी.ए. कुलकर्णी हे त्यांचे शालेय वर्गमित्र होते. दोघांनी एकत्रच म्यॅट्रिकची परीक्षा दिली होती.
पुस्तकांची आवड असलेल्या व पुस्तकांत रमणाऱ्या कुमठाना हे पुस्तकी विश्व चांगलेच भावले. त्या काळात लेखक हे चतुरस्त्र होते व वाचकही बहुश्रूत होते. नवीन कोणाचे पुस्तक येत आहे, याची वाट पहात असत. आणि अश्या या वाचकांची नाडी कुमठानी नेमकी ओळखली होती. व त्यांनी पुस्तक विक्री सोबतच वाचकांसाठी पुस्तक प्रकाशनही सुरु केले. यामध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबविले. पुस्तक पंढरी, बालसाहीत्य जत्रा, साहीत्य दिंडी, स्वाक्षरी सप्ताह हे त्यांचे उपक्रम खूपच गाजले. स्वाक्षरी सप्ताहाच्या वेळी कुमठा एका नामांकीत लेखकाची पुस्तके प्रदर्शीत करून खुद्द त्या लेखकाला आमंत्रीत करीत. कोणीही त्या लेखकाचे पुस्तक विकत घेतले, की लेखक स्वतः त्यावर आपली स्वाक्षरी करून देत असे. आणि अशी ही पुस्तके जवळ ठेवण्यासाठी अनेक रसीक वाचक ती खरेदी करीत असत. त्या वेळी 'ललीत' मासिकामध्ये 'ठणठणपाळ' या टोपण नांवाने एकजण लिखाण करीत असे. त्यांचे लिखाण खूपच गाजले होते. पण ठणठणपाळ कोण आहे ह्याचा मात्र कोणालाच उलगडा होत नव्हता. अनेक तर्क वितर्क चालू असत या 'ठणठणपाळ' विषयी. आणि तो दिवस आला 'ठणठणपाळ' या लेखकाच्या पुस्तक विक्रीचा. आज ठणठणपाळ कोण आहे याचा उलगडा होणार, प्रत्यक्षात तो दिसणार या भावनेने बॉंबे बुक डेपोमध्ये वाचकांची झुंबड उडाली होती. पण पाहतात तो काय? प्रत्यक्षात ठणठणपाळ याचे वसंत सरवटे यांनी केलेल्या एका अवखळ मुलाचे एका हातात असलेल्या लाकडी हातोड्याला टेकून उभा असलेल्या मुलाचे चित्र कट आऊट करून ठेवले होते. त्यामागून कोणीतरी एक हात बाहेर काढून पुस्तकावर सही करीत असे. व्यक्ती दिसत नव्हती. तेव्हां मात्र वाचकांचा संयम संपला. 'ठणठणपाळ पुढे या !' अश्या घोषणा ते देऊ लागले. शेवटी या वाचक प्रेमावर हार मानून मागून लेखक बाहेर आले, आणि इतके दिवस आपली ओळख लपवलेले ते नामवंत लेखक होते ' जयवंत दळवी’! अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
आम्ही बॉंबे बुक डेपो कडे सतत वळायचे आणखीही एक कारण होते आणि ते म्हणजे, त्यांच्या बाहेरील भव्य अश्या शोकेस मध्ये नवीन प्रकाशीत झालेल्या पुस्तकांसोबतच त्याच्या मुखपृष्ठावरील मूळ चित्र ठेवलेले असे. त्याकाळात महान चित्रकार दीनानाथ दलाल व रघूवीर मुळगांवकर हे दोघे बहुदा बऱ्याच नामांकीत लेखकांच्या पुस्तकाची मुखपृष्ठे रेखाटत असत. मात्र ती मूळ चित्रे केवळ कुमठा यांच्या त्या उपक्रमामुळे आम्हांला पहायला मिळत. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे, वी.स. खांडेकर, रणजीत देसाई, शिवाजी सावंत अश्या तोलामोलाच्या लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे असत. लहानशा आकारात असलेल्या पुस्तकावरील ते मूळ चित्र मोठ्या आकारात पहायला मिळे तेंव्हा त्यांच्या मूळ रंगसंगतीत आणि मुद्रीत चित्रात किती फरक असे ते जाणवत असे. शिवाय अशा महान चित्रकाराचे मूळ चित्र पाहील्याचे एक समाधानही असे.
असा हा पुस्तक वेडा माणूस पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारा कुमठाशेठ म्हणून ओळखला जाई. त्यांचे ' बोंबे बुक डेपो' हे मराठी पुस्तकांचे माहेरघर बनले होते. सर्वच प्रकाशक -लेखक त्यांच्या बुक डेपोमध्ये गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असत. पुढे वयाची सत्तर वर्षे पूर्ण झाल्यावर पांडूरंग कुमठा यांनी 'बॉंबे बुक डेपो'मधून निवृत्ती घेतली. कांही दिवस निवांतपणे विश्रांती घेतल्यावर त्यांनी मनांत साठवलेल्या व आठवलेल्या आठवणींना शब्दरूप द्यावे असे ठरवीले. त्यांनी आपल्या डायऱ्या काढल्या. पूर्वी त्यांनी इंग्रजी व मराठीत कांही लिखाणही केले होते. त्यातूनही निवडक घेतले. यामध्ये कांही स्नेह्यांची त्यांना मदतही झाली. १९९२ साली त्यांच्या मुलीने त्यावर कांही संस्कार करून सुधारणा केली. पण कांही कारणाने ते प्रसीद्ध होण्या पासून वंचीत राहीले. व ते तसेच पडून राहीले. त्यांनी कांही वर्षांपूर्वी इंग्रजी कथा व कवीता लिहील्या होत्या, त्या कुमठा यांच्या सुनबाईंनी स्वतः एकत्र करून संपादीत केल्या. स्वतः संगणकावर त्या छापल्या. आणि त्याचे स्वतःच एक पुस्तक छापून २५ मे २००६ रोजी पांडूरंग कुमठा यांच्या ८५ व्या वाढदिवशी त्याचे प्रकाशन केले. या कवितांच्या पुस्तकाचे नांव 'Songs from the Heart’ असे ठेवण्यांत आले.
आणि पुन्हां कुमठा यांनी आपल्या आठवणींचे बाड बाहेर काढले. त्यामध्ये आणखी कांही लेखांची भर घालून त्याला पुस्तक रूपात आणण्यास त्यांच्या घरच्या तसेच बाहेरील स्नेह्यांचीही मदत झाली. आणि पांडूरंग कुमठा यांच्या वयाची नव्वदी झाली त्या मंगल दिवशी त्यांच्या 'पुस्तक पंढरीचा वारकरी' या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे मुखपृष्ठ व मांडणी चित्रकार वसंत सरवटे यांनी केली होती. या पुस्तकांत त्यांनी आपल्या पुस्तक विक्री प्रवासांत आलेल्या व्यावसायीक अडचणी, वाङ्मयीन घडामोडी याचा परामर्ष घेतला आहे. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे " आजवर अनेक लेखकांनी, कांही प्रकाशकांनी देखील आत्मवृत्ते लिहीली आहेत. पण एखाद्या ग्रंथविक्रेत्याचे आत्मकथन आजवर पाहील्याचे आठवत नाही. तेव्हां या पुस्तकाद्वारे ग्रंथविश्वाचा एक वेगळा पैलू वाचकांसमोर नक्कीच आणला आहे” आणि ते खरेच होते.
अश्या या पुस्तकप्रेमी कुमठा शेट यांचे गुरुवार दिनांक २८ मार्च २०१९ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी वृद्धपकाळामुळे निधन झाले. एक चोखन्दळ पुस्तकप्रेमी गेला. प्रकाशनविश्वातील एका प्रभावी व्यक्तित्वाची अखेर झाली. त्यांच्या दुःखद निधनाने पुस्तक व्यवसायातील आणि प्रकाशनातील एक मार्गदर्शक आणि सल्लागार हरपल्याची भावना आज या क्षेत्राला झाली आहे. त्यांच्या स्मृतीला नम्र अभिवादन!
- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष


Comments
Post a Comment