आणि ‘मॅकडोनाल्ड’ने जग जिंकले.
रे क्रॉग, एक खटपट्या फिरस्ता सेल्समन . अनेक उद्योग करूनही त्यात फारसे यश न मिळवलेला. पत्नीचे उत्पन्न व सेव्हींग या आधारावर राहीलेला. या क्र्याॅगने पाच प्रकारचे मिल्कशेक बनवणारा एक मिक्सर बनवला व तो विकण्यासाठी तो अनेक ठिकाणी प्रयत्न करतो आहे. पण कोणाकडूनच त्याला प्रतीसाद मिळत नाही. त्या काळात अमेरीकेत कारहोप्स ही गाडीत बसून रेस्टारंट मध्ये ऑर्डर देण्याची पद्धत होती. ज्या ज्या रेस्टारंटना त्याने हे मिक्सर विकण्याचे प्रयत्न केले तेथे त्याला जाणवले की या ठिकाणी खाद्यपदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर ती गाडीत येण्यासाठी बराच वेळ खर्ची पडतो. आणि हे त्याला नेहमी खटकत असे. आणि अचानक क्रॉकला कॅलिफोर्नियातील स्यान बर्नार्डिनो येथून एका रेस्टारंट मधून मिल्कशेक मिक्सरची ऑर्डर येते तीही एकदम आठ मिक्सरची. क्रॉक ती पाठवतो, शिवाय एवढी मोठी ऑर्डर देणारे हे रेस्टारंट कोणाचे आहे ते तरी पहावे म्हणून तो सरळ ते पहाण्यास कॅलिफोर्नियाला निघतो. आणि तेथे त्याला दिसते ते ' म्यॅकडोनाल्ड' नावाचे एक प्रसिध्द असे रेस्टारंट जेथे वेगवेगळ्या रांगा लागल्या होत्या. फास्टसर्व्हिस, उत्तम दर्जाचे चवदार खाणे, डिस्पोजेबल पॅकिंग, आणि अगदी कौटूंबिक वातावरण.
आणि त्या रेस्टारंटच्या मालकाला क्रॉक भेटला. ते होते दोघे बंधू. माॅरीस मॅक आणि रिचर्ड डिक म्यॅकडोनाल्ड. त्यांच्या रेस्टारंटची पहाणी करताच क्रॉक विस्मयचकीत झाला. वेळ वाचवणे हे त्याचे नेहमीचेच स्वप्न होते, आणि येथे ते त्याला प्रत्यक्षांत पहायला मिळत होते. त्याची उत्सूकता पाहून मॅकने त्याला आपल्या रेस्टारंटच्या किचनची सैर घडवीली. तेथे त्याच्या नजरेस आले ते प्रत्येक नोकर आपले काम अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने करीत आहे. ओव्हन मधून पाव बाहेर पडताच त्यावर अगदी पद्धतशीरपणे त्यामधील इतर घटक घालण्यात येत होते. त्यासाठी कांही खास अशी उपकरणे त्या दोघा बंधूनी करवून घेतली होती, ज्या योगे पदार्थ बनविण्यास गती मिळेल. प्रत्येकजण आपले काम झाले की ते पुढील व्यक्तीकडे सरकवीत असे. व शेवटी त्यावर कागदाचे आच्छादन आले की तात्काळ ते ट्रेमधून कौंटरवर पोचत असे व तेथून गिऱ्हाईकाच्या हाती. व हे खाण्यास देखील आपला वेळ घेऊन गिऱ्हाईके आजूबाजूला बसून खात असत. त्यानंतर क्रॉकने त्या दोघा बंधूना रात्री डिनरसाठी बाहेर नेले, व तेथे त्यांची या मागची कथा ऐकण्याची इच्छा प्रगट केली.
मुळात या दोघा बंधूना आकर्षण होते ते फिल्म जगताचे. वडीलांनी एक रेस्टारंट सुरु केले होते. पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्या दोघांनी एक जुने थेटर विकत घेऊन त्यामधून चित्रपट दाखविण्याचा उद्योगही केला. पुढे तोही फसला. अखेर त्यांनी रेस्टारंटवर भर देण्याचा प्रयत्न केला. आणि १९३७ मध्ये त्यांनी पहीला हॉट डॉग स्टॅन्ड सुरु केला. पुढे त्यांनी त्यात भर टाकून एक नवीन रेस्टारंट सुरु केले. यात त्यांना यश मिळत गेले. व त्याची परिणीती पुढे एका मोठ्या रेस्टारंट मध्ये करण्याची कल्पना त्यांनी आकारली. डिक हा अतीशय कल्पक बुद्धीचा होता. त्याने पाहीले की येथे ह्यामबर्गर व मिल्क शेकला जास्ती मागणी आहे, तेव्हां त्याने इतर पदार्थ बंद करून या दोघांनाच प्राधान्य दिले. दुसरे महत्वाचे त्यांनी ठरविले होते ते म्हणजे दर्जाशी कोणतीच तडजोड करायची नाही. त्यांचे आज जे नांव त्यांच्या दर्जेदार खाण्यामुळे झाले आहे त्याला अजीबात कलंक लावायचा नाही. आणि याच कारणामुळे त्यांनी सुरु केलेली फ्रॅंच्याईज ते दर्जा न राखता केवळ पैसा मिळवणे हेच ध्येय ठरवीत असल्याने तीही त्यांनी बंद केली. खाणे देणे, तेही अत्यन्त जलद गतीने, लोकांना ताटकळत न ठेवता, आणि यामुळेच खाण्याच्या जगतात 'फास्ट फूड' ही संज्ञा अस्तीत्वात अली. आणि अमेरिकन लोकांना मॅकडोनाल्डने फास्ट फूड खायला शिकवले. आपल्या नोकरवर्गाला प्रशिक्षित करण्यासाठी डिकने रेस्टारंटमागील टेनिस कोर्टाचा वापर केला. त्या कोर्टावर खडूने आपल्या रेस्टारंटचे आराखडे काढून तेथे किचन मध्ये पदार्थ बनतो, त्यावर इतर लोक प्रक्रीया करतात, त्यामध्ये इतर घटक घालून तो पुढच्या कडे पाठविला जातो, व तेथून तो कौंटरवर येतो या सर्व गोष्टी हावभावासहित जलदगत्या जमीनीवरील आराखड्याप्रमाणे डीकने प्रात्यक्षीकाद्वारे करवून घेऊन ज्या गोष्टीला तीस मिनिटे लागतील ती तीस सेकंदात करवून घेण्याचे प्रयत्न केले. आणि येथेच क्रॉक त्या कल्पक अश्या मॅकडोनाल्ड बंधूंच्या प्रेमात पडला. व तेथेच त्याने त्या दोघांसमोर ही रेस्टारंटची चेन वाढविण्याचा प्रस्ताव मांडला. म्हणजे पुन्हा फ्रॅंच्याईज सुरू करणे. पण त्या दोघांनी एकदां घेतलेल्या सुमार दर्जाच्या अनुभवावरून यास ठाम नकार दिला. पण क्रॉकने त्यांना पटवून दिले की आपण तुमचा एक भागीदार बनून ही फ्रॅंच्याईज सुरु करतो, त्यासाठी लोक ठेवतो, त्यांना प्रशिक्षण देतो, योग्यतो दर्जा राखण्याची दक्षता घेतो. व या उद्योगाला वाढीला लावतो. त्यासाठी आपण कायदेशीर करारनामा करून त्यामध्ये सर्व बाबी नमूद करू व आपली मॅकडोवाल्ड ची सांखळी वाढवत जाऊ. आणि हे सर्व तुम्हां दोघा बंधूंच्या नियम व अटी यावर आधारीत करारनाम्याप्रमाणे करून.
शेवटी करारनामा झाला. आता क्रॉकला या नवीन सुरु करायच्या रेस्टारंटसाठी गरज होती ती भांडवलाची. त्यासाठी त्याच्या ओळखीच्या सर्वच बॅंक म्यानेजरसोबत त्याच्या बैठकी होऊ लागल्या. पण यापूर्वीही क्रॉकने बॅंकेच्या जीवावर अश्या प्रकारचे छोटे मोठे धंदे करण्याचे उद्योग केले होते व त्यात तो सपशेल आपटला असल्याने बॅंकांचा तो एक थट्टेचा विषय बनला होता. नजरेसमोर यश तरी दिसत होते. त्याच्यातील कल्पनाशक्ती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. करारनाम्याप्रमाणे पैसे क्रॉकच लावणार होता. आणि शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने आपल्या पत्नीच्या नकळत आपले घर बॅंकेकडे गहाण टाकून पैसे जमविले व आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे तो लागला. यावेळी त्याने मनाशी पक्के ठरवीले की येथे तीन महत्वाच्या गोष्टी ग्राहकांना पुरवायच्या, त्या म्हणजे फ्रेंच फ्राईज, ह्यामबर्गर, मिल्क शेक. सोबत कोकाकोलाशी त्याचे बोलणे होऊन जर कोकाकोला ठेवला तर तेही लोक पैसा द्यायला तयार होते. पण त्यासाठी मॅकची परवानगी हवी होती, ती त्याला मिळाली नाही. आणि आपले पहीले मॅकडोनाल्ड रेस्टारंट क्रॉकने सुरु केले व त्यासाठी त्याने आपल्या श्रीमंत अश्या क्लबच्या सभासदांकडून पैसे गुंतवून त्यांचा उपयोग केला. पण एके दिवशी क्रॉक पहाणी करायला तेथे जाताच त्याला सर्वत्र कचरा पडलेला दिसला. लोकांनी खाऊन टाकलेल्या पदार्थांचे कागद तेथेच पसरले होते. क्रॉपने ते स्वतः उचलले.स्वतः सर्व स्वच्छ केले. आतमध्ये त्याने पाहीले ते अत्यन्त सुमार दर्जाचे, आतून सलाड वगैरे बाहेर गळणारे बर्गर बनत होते. लोक ते अर्धवट खाऊन तेथेच फेकत होते. म्यक्डोनाल्डचे नियम डावलून इतरही अनेक पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. आणि हे सर्व पहाताच क्रॉकची तळपायाची आग मस्तकाला गेली. तात्काळ त्याने तेथील एक बर्गर उचलला व तो सरळ क्लबवर पोचला. व ज्याने हे फ्रँचाइज चालवले होते, त्याच्या तोंडात कोंबून तेथल्या तेथे त्याला काढून टाकले. दर्जाशी तडजोड करणे याला क्रॉकचा सख्त विरोध होता. नंतर त्याला एक ज्यू माणूस बायबल विकत असतांना दिसला. त्याला थोडे आस्शर्य वाटले. पण त्यातील प्रामाणीकपणा जाणवल्याने क्रॉकने त्याला आपल्या रेस्टारंट मध्ये व्यवस्थापक म्हणून नेमले. व क्रॉकच्या लक्षांत आले की मध्यमवर्गाला गुंतवणूकीत घेतले की त्याची गरज पूर्ण होईल व हे लोक मॅकडोनाल्डचे नियमही काटेकोरपणे पाळतील.आणि क्रॉकने स्वतःची दुसरी कंपनी उभी केली व तिचे नांव त्याने 'फ्रॅंच्याईज रिऍलिटी कॉर्पोरेशन' असे ठेवले. यावेळी त्याने मिल्कशेक साठी पावडर दूध वापरण्यास सुरुवात केली. आणि हे मिल्कशेक त्याच्या सर्व फ्रॅंच्याईजमध्ये तो पुरवू लागला. सोबत कोकाकोलाही ठेवण्यात येऊ लागला. आणि पहाता पहाता त्याच्या कंपनीचा आर्थीक आलेख वरवर जाऊ लागला.
यावेळी त्याने आपली पत्नी एथेस हिला घटस्फोट दिला. तिला घरापासून इतर बऱ्याच गोष्टी दिल्या पण आपल्या बिझिनेसमधील काहीही देण्यास नकार दिला. आता जोन त्याच्या आयुष्यात आलीच होती.
आणि नंतर अमेरीकेच्या अध्यक्षाला भेटताना करण्याच्या भाषणाची पूर्वतयारी करणारा रे क्रॉक दिसत असताना ' द फॉऊंडर ' हा एक सुंदर चित्रपट संपतो. हा जसा रे क्रॉक या उद्योगी माणसाचा चरित्रपट आहे तशीच 'मॅकडोनाल्ड' या 'नंबर १ फास्टफूड रेस्टारंट'ची यशोगाथा आहे. दोघा बंधूनी चालवलेला, कारहोप्स हा खाद्यप्रकार बंद करून त्याला जलद मिळणाऱ्या फास्टफूडचा मान मिळवून देणाऱ्या 'मॅकडोनाल्ड' ला जगाच्या पाठीवर सर्वत्र नेवून सर्वाना आपलेसे करणाऱ्या या रे क्रॉक वरील ह्या चित्रपटात त्याने केलेल्या मेहनतीचे, त्याच्या कल्पकतेचे आणि दर्जासाठी तडजोड न करता कठोरपणे निर्णय घेण्याची क्षमतेचे संपूर्ण चित्र यामध्ये रेखाटले आहे. रे क्रॉक याच्या चरित्रावरून जॉन ली हॅंकाॅक याने हा चित्रपट दिग्दर्शीत केला. अन यातील रे क्राॅकची भुमीका अत्यंत जिवंतपणे साकार केली आहे ती मायकल किटन या अभिनेत्याने.
-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष



Interesting story!
ReplyDelete