सतत तेवणारा आनंदमयी प्रकाश : प्रकाशभाई मोहाडीकर




( जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पूज्य साने गुरुजींचे सच्चे अनुयायी, सामाजीक कार्यकर्ते प्रकाशभाई मोहाडीकरांना आज त्यांच्या जन्म  शताब्दीबद्दल विनम्र आदरांजली )
 

नुकतेच ७१ सालचे भारत पाकीस्तान युद्ध संपले होते. शिवाजी पार्कवर नित्याप्रमाणे भव्य प्रमाणात २६ जानेवारीला ' बालक मेळावा साजरा होणार होता. संगीतकार वसंत देसाई यांचा वाद्यवृंद नित्याप्रमाणे  राष्ट्रगीत वाजवणार होता. त्यासाठी  शासनाच्या सांस्कृतीक खात्यातर्फे एक स्मरणीका प्रसीद्ध करण्यात येणार होती.  त्याचे काम माझ्यावर सोपवले होते. त्यासाठी मला त्या बालक मेळाव्याचे फोटो हवे होते. आणि काही काळ त्या चळवळीशी जुडले गेलेल्या यशवंत चौधरींनी माझा प्रश्न तात्काळ सोडवला. त्यांनी थेट मला दादरच्या साने गुरुजी विद्यालयात नेले व तेथे मला विद्यालयाचे सर्वेसर्वा श्री प्रकाशभाई मोहाडीकरांना भेटवीले. हीच माझी त्यादिवशी झालेली प्रकाश मोहाडीकर नांवाच्या एका दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असलेल्या, मानवता धर्म पाळणाऱ्या एका समाजसेवेकरी, साने गुरुजींचा सच्चा अनुयायी, दीन दुबळ्यांचा कैवारी असलेल्या एका समाजसेवकाची भेट झाली. आणि त्यांचे साधे परंतु तेजस्वी रूप पाहून आदराने माझी मान त्याच्या चरणावर झुकली. अन मग त्यांनी बालक मेळाव्याचे अनेक आल्बम माझ्या हवाली केले.

वास्तवीक ९ जानेवारी १९१९ रोजी जन्मलेले मोहाडीकरांचे खरे नांव होते लक्ष्मण गणेश मोहाडीकर. पण पुढे स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सहभागामूळे त्यांच्यामागे पोलीसी ससेमिरा लागला. त्यावेळी त्यांनी अनेक नांवे बदलून ते वावरत होते. त्यापैकी एक प्रकाशचंद्र होते. आणि पुढे ते प्रकाश मोहाडीकर याच नांवानें सुपरीचीत झाले. अंमळनेर येथील विद्यालयात साने गुरुजी यांचे विदयार्थी असलेले प्रकाशभाई त्यांचे सच्चे अनुयायी बनले. त्यांना देशभक्तीचे, आणि देशसेवेचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले होते. पुढील शिक्षणासाठी ते दादरच्या छबीलदास मध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. पण त्याकाळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे झालेले अपघाती निधन, त्यामुळे प्रकाशभाईंनी शाळेत घडवून आणलेला हरताळ यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. पण पुन्हां त्याच शाळेने त्यांना नोकरी देऊ केली आणि विशेष म्हणजे ज्या छबीलदास शाळेने त्यांना काढून टाकले होते, त्याच शाळेचे ते पुढे अध्यक्ष बनले. रुईया महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. अन तेथून त्यांनी पदवी मिळवली. पुढे त्यांच्यातील साने गुरुजींचे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. १९४७ साली त्यांनी दादरच्या गोखले रोडवर ' अमरहिंद मंडळ' ही संस्था स्थापन केली, आणि त्यातून त्यांनी सुरु केलेल्या ' वसंत व्याख्यानमाला' अनेक कार्यकर्त्यांनी व विचारवंतांनी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवल्या. आजही 'अमर हिंद मंडळ’ची वास्तू गोखले रोडवर दिमाखाने उभी आहे. या कथामाला आठ ते नऊ राज्यामध्ये त्यानी  सुरु केल्या


१९५० च्या जून महीन्यातील ११ तारीख ही मोहाडीकरांच्या जीवनातील एक काळीकुट्ट तारीख ठरली. त्यांचे सर्वस्व असलेले लाडके व्यक्तीमत्व साने गुरुजींनी आपले जीवन अचानकपणे संपवीले. पण झालेले दुःख व आघात यानी न खचता साने गुरुजींच्या पुढच्याच वर्षीच्या जयंतीला 'साने गुरुजी कथामाले'ची स्थापना केली, आणि थोर गांधीवादी तत्वज्ञ, विचारवंत आचार्य भागवत यांनी दादरच्या कित्तेभंडारी हॉल मध्ये महाभारतातील कथा सांगून कथामालेचे उदघाट्न केले. आणि पुढे महाराष्ट्रात 'साने गुरुजी कथामाले'ची गाडी संपूर्ण महाराष्ट्रभर धावू लागली. त्यांचा १९५४ साली विवाह झाला त्या काळात ते स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले होते. फिरती तर सततची लागलेली असायचीच! विवाहानंतर दसरा आला. दसऱ्या दिवशी नवीन जावयाला मान देवून बोलाविण्याची सासूरवाडीची प्रथा असते.त्यामुळे सासुरवाडीचे आग्रहाचे निमंत्रण होते. त्याच वेळी अखील भारतीय बालक मेळावा मुंबईत शिवाजी पार्क येथे त्यांनी आयोजीत केला होता. दीड लाख मुले जमलेल्या या मेळाव्याचे अध्यक्ष होते तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू. दृष्ट लागण्यासारखा झाला तो मेळावा. या दीडेक लाख मुलांनी गायलेले व वसंतराव देसाई यांनी बसवलेले राष्ट्रगीत ऐकताच पं. नेहरू एवढे खुश झाले की सुमारे अर्ध्या तासाच्या वर ते मुलामध्ये सामील होऊन रमले. एक संस्मरणीय आनंदाचा प्रसंग होता तो. त्याची पूर्वतयारी महीनाभर चालली होती. दोन रात्री ते अजीबात झोपले नव्हते. सासुरवाडीच्या लोकांनी जावई दिसत नाही म्हणून शोध सुरु केला. कोणत्याही ठिकाणी न आढळल्याने शेवटी ते लोक शिवाजी पार्क वर आले अन पाहतात ते काय? प्रकाशभाई  स्टेजच्या खाली गाढ झोपेत पडलेले दिसले.

शाळेत असताना त्यांच्या एका शिक्षकांनी निबंधाला विषय दिला, देशासाठी तुम्हांला काय करावेसे वाटते? प्रकाशजींनी लिहिले, मला देशासाठी जीव अर्पण करावासा वाटतो. शिक्षक म्हणाले, अरे हे तू भावनेच्या भरात लिहीले आहेस. ते म्हणाले, नाही ! आर्थीक बाब सांभाळायला इतर भाऊ आहेत. मला देशासाठी सोडून द्या. आणि ते आठ वर्षाचे असताना वर्षी इंग्रज सरकारने हुकूम काढला की कोणीही पाचच्या वर जमायचे नाही. त्यावर सातआठ मित्रांना जमवून इंग्रजांविरुद्ध घोषणा देत त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, बुटाखाली ठेचून घेतले. पुढे नंतर नोकरी करत असताना साने गुरुजींचे त्पयांना पत्र आले की नोकरी सोडून ये. हा आता माझा शेवटचा धडा आहे. त्यांनी तात्काळ नोकरी सोडून ते पुण्याला आले व त्यानंतर नाशिकमध्ये बॉम्ब बनविणे, रूळ उखडणे, तारा तोडणे सरकारी कचेऱ्या जाळणे, हरताळ पाळणे अशी कामे गुप्तपणे ते करीत राहीले. त्यात त्यांना अटक होऊन शिक्षाही झाली.

१९७२ साली महाराष्ट्रात जेव्हां मोठा दुष्काळ पडला, त्यावेळी अगदी लहानसहान गोष्टीतून त्यांनी मदत करण्याचे ठरवीले. त्यांनी सर्व शाळांच्या हेडमास्तरांची बैठक बोलाविलीं. व त्या सर्वाना सांगीतले की तुमच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला सांगा की या भीषण दुष्काळाला मदत म्हणून प्रत्येकाने एक मूठ धान्य, एक जुने वृत्तपत्र आणि कांही रोख रक्कम आणावी. हे कोणाला कठीण जाणार नाही. त्यावर अनेक हेडमास्तरांनी यावर शंका उपस्थीत केल्या की अश्या प्रकारे कितीशी मदत जमणार आहे? त्यावर प्रकाशभाईंनी सांगीतले की तुम्ही फक्त त्यांना दुष्काळाची कल्पना देऊन सांगा. आणि खरोखरीच चमत्कार घडला. प्रत्येकाने आणलेल्या मूठमूठ धान्यातून साडे पांचशे पोती धान्य जमले. रोख रक्कम आणली होती ती सहा लाख एकसष्ट हजार रुपये झाली. प्रत्येकाने आणलेल्या एकेक जुन्या वृत्तपत्राची रद्दी विकून चक्क साडे बेचाळीस हजार रुपये जमा झाले त्यातून त्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके, पेन्सिल आदी साहीत्य घेऊन दिले. आलेली रोख रक्कम मुख्यमंत्री निधीला दिले. अशी बरीच मदत त्यांनी त्या गावांना केली. ही कल्पना त्यांना कशी सुचली हे विचारताच ते म्हणाले, परमेश्वरानेच बुद्धी दिली. आपण एखाद्या विषयाशी समरस झालो, त्यावर रात्रंदिन विचार करू लागलो, की जात्यावर बसल्यावर जशी ओवी सुचते, त्याप्रमाणे विषयाचा अभ्यास करू लागलो की त्यावर अश्या कल्पना आकार घेऊ लागतात. आणि मी सतत या मुलांमध्ये वावरत असल्यामुळे मला मुलांची ताकद माहीत आहे. आणि त्यांचा तुमच्यावर विश्वास पाहीजे!

बाबा आमटे यांनी गोकुळ नावाचा प्रकल्प काढला अन टाकून दिलेल्या मुलांना सांभाळलं. पु.ल. देशपांडे यांनी त्याचे इतके सुंदर वर्णन केले की प्रकाशभाई भारावून गेले.ते बाबांना म्हणाले, आज साने गुरुजी असते तर त्यांनी स्वतःलाच तुम्हांला वाहून घेतलं असतं, तुमच्या या प्रकल्पाला मी मुलांकरवी तीन लाख रुपये गोळा करून देतो. कसलाही विचार न करता त्यांनी हे आश्वासन दिले होते". आता हे पैसे कसे गोळा करायचे? तेव्हां महाराष्ट्रातील मुलांना त्यांनी सांगीतले की २ ऑकटोबरला गांधी जयंती आहे. त्यादिवशी तुम्ही एक वेळ जेवायचे. आणि आई वडीलांना सांगायचे आज मी जेवलो असतो तर माझ्यावर जो काही रुपया बारा आण्याचा खर्च झाला असता, तरी ते पैसे मला द्या, म्हणून मागून घ्यायचे,. व ते पैसे शाळेत जमा करायचे आठ हजार शाळांना पत्रे गेली. पोस्टमनने मनी ऑर्डर आणल्या. तीन लाखांचा संकल्प होता. जमले चक्क साडेचार लाख. तेही आठ हजार शाळांमधून केवळ सातशे शाळांनी दिलेल्या प्रतिसादातून. सर्वच शाळांनी दिला असता तर ....
अन अश्या बऱ्याच प्रकल्पाना त्यांनी पैसे जमवून व वैयक्तीक रित्या अर्थसहाय्य केले आहे. आणि या सर्वावर कळस म्हणजे १९५५ साली दादरमध्ये त्यांनी स्थापन केलेले ' साने गुरुजी विद्यालय' आणि हे सर्व साधले ते केवळ त्यांच्या अविरत परिश्रमातून,  सर्व सामान्य जनतेतील अतूट विश्वासातून. दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांनी त्यांना राहती जागा शासनामार्फत देऊ केली. पण त्यांच्यातील तत्वनिष्ठ प्रवृत्तीने ती नाकारली व स्वतःच्या छोट्याश्या जागेतच राहणे त्यांनी पसंद केले




असा हा लोकोत्तर पुरुष एकदा माझ्याकडे आला. मी त्याकाळी सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचा अधिष्ठाता होतो. सोबत होते आमचे यशवंत चौधरी. अन प्रकाशभाईंनी आपली योजना माझ्यासमोर मांडली. पूज्य साने गुरुजी जेव्हां नाशिकच्या जेल मध्ये होते, ती कोठडी आता गुरुजींचे एक स्मारक या नात्याने जतन केली आहे. आणि त्या कोठडीची योग्य प्रकारे जतन करण्याचे श्रेय जाते ते तेव्हाचे जेलर श्री दवणे यांना. श्री दवणे हे देखील साने गुरुजींचे भक्त. त्यांनी स्वतःच्या मनाने त्या कोठडीचे जतन केले होते. ११ जून १९९६ रोजी पूज्य साने गुरुजींची ४२ वी पुण्यतीथी होती. त्या निमित्ताने नाशिकमधल्या त्या कारागृहाच्या ज्या साने गुरुजींना बंदीवान म्हणून ठेवले होते, तेथे त्यांचे स्मारक म्हणून कैद्यांच्या मदतीने काय करता येईल याबद्दल त्यांना सल्ला हवा होता. गुरुजींचे अनुयायी असलेले प्रकाशभाई  हे सतत  तेथील कैद्यांना सानेगुरुजी कथामालेच्या आधारे सदाचरणाची शिकवण देत असत. सानेगुरुजींना जिथे ठेवण्यात आले होते, त्या कोठडीचे तुरूंगाधिकारी श्री ढवणे यांनी जुन्या खुणा सांभाळीत तिचे जतन केले होते. ते स्वत: साने गुरूजींचे भक्त असल्याने त्यानाही ओढ होती.  ढवणे स्वतःही तेथील कैद्यांना कैदी म्हणून न वागवता माणुसकीच्या नात्याने वागवीत असत.

आम्ही प्रकाशभाईंसोबत दुसऱ्याच दिवशी नाशीक कारागृहात निघालो. गुरुजींच्या कोठडीची पहाणी केली. याच कोठडीत गुरुजींनी मातृप्रेमाचे मंगल स्तोत्र सांगणारे ' श्यामची आई' हे पुस्तक लिहीले. त्या पुस्तकातील प्रत्येक रात्र त्या कारागृहाच्या दगडी भिंतींनी अनुभवलेली आहे. त्यामुळेच नाशिकच्या त्या कारागृहाला एक आगळेवेगळे वैशीष्ट्य प्राप्त झाले आहे. गुरुजींची कोठडी साधारणपणे आठ बाय दहा फुटांची होती. तिचे साधेपण जपून त्यांच्या आठवणीदाखल काय करता येईल, याचा विचार करत मी बाहेर पडलो. तोच कोठडीच्या मागील बाजूला  दहा फूट उंचीची व अंदाजे शंभर फूट लांब अशी दगडाची खडबडीत भिंत मला दिसली. अन तेथेच गुरुजींची आठवण जतन करण्याची एक कल्पना मला सुचली. याच ‘श्यामची आई’ मधील मोजके प्रसंग त्या दगडी भिंतीवर तेथील कैद्यांच्या व जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहाय्याने करायचे ठरवीले. गुरुजींच्या खडतर व कष्टमय जीवनाची जाणीव ठेवून भिंतीचा खडबडीतपणा राखूनच ही चित्रे रंगवून त्यातून एक म्युरल करण्याचे निच्छीत झाले. ही कल्पना प्रकाशभाईंना खूपच आवडली. यानंतर प्रकाशभाई व यशवंत चौधरी यांनी ‘श्यामची आई’ मधील वेचक प्रसंग निवडले.


यात काम करायला जे.जे.चे प्राध्यापक नरेंद्र विचारे, शेखर साळवी, अनील नाईक यांनी व जे.जे.चे कांही विद्यार्थी असे आम्ही नाशीक कारागृहात पोचलो. त्यासाठी प्रचंड प्रमाणात लागणाऱ्या रंग साहित्याचा प्रश्न भेडसावत होता. पण कॅम्लीन च्या सुभाष दांडेकरांनी तो चुटकीसरसा सोडवला. आम्हांला लागेल तितका ऑइल पेंट, निरनिराळ्या आकाराचे ब्रशेस असे सर्व साहीत्य त्यांनी मोफत पुरवले. तेथील कैद्यांमध्येही चित्रकार होते. पेंटर होते. त्यांचीही मदत आम्हांला झाली. व एक मनोहर असा 'श्यामची आई'चा चित्रमय प्रवास सुरु झाला. त्यामध्ये खोडकर श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपणारा श्याम, स्वतःच्या पैश्यातून भावाला कोट आणणारा श्याम, पाण्यातून आपल्या आजारी आईला भेटायला जाणारा श्याम अशी विवीध श्यामची रूपे आम्ही तेथे रंगवीली. जन्मठेपेची शिक्षा झालेले अनेक कैदीही त्यात रेखाटन करीत होते.

११ जून १९९६ रोजी या भित्तिचित्रांचे उदघाट्न तत्कालीन सांस्कृतीक मंत्री मा. प्रमोद नवलकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रा.ग.प्र.प्रधान, यदूनाथ थत्ते व प्रकाशभाई मोहाडीकर यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला. व  या कार्यक्रमात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल सर्व कैद्यांचे अभीनंदन केले. यावेळी कैद्यांनी स्वतः बनवलेली शुभेच्छा पत्रे व विणलेले हातरुमाल आम्हांला भेट म्हणून दिले. स्वतः जेवण बनवून आम्हांला वाढले. सकाळी प्रार्थना झाली. एकूण कोठल्या तरी कारागृहात नसून एखाद्या स्वच्छ अश्या पवीत्र आश्रमात आल्याप्रमाणे त्यावेळी आम्हांला त्यांची एकत्र प्रार्थना ऐकून वाटले. कित्येकदा भावनेच्या भरात आपल्या हातून एखादा गुन्हा घडतो, अगदी खून सुद्धा. आणि गुन्हेगाराचे लेबल माथ्यावर लावून समाज त्याच्याकडे गुन्हेगार म्हणूनच पहातो. पण या कैद्यांनाही भावना असतात. त्यांच्या अंगीही कलागुण असतात. ते हेरून त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून दिला की समाजात त्यांना पुन्हा मानाचे स्थान मिळते, याकडे प्रकाशभाईंनी लक्ष पुरवले. आणि त्यांच्याप्रती त्या कारागृहातील कैद्यांना किती आदर आहे हे त्यादिवशी आम्हांला प्रत्यक्ष जाणवले.

प्रकाशभाई एक समृद्ध जीवन जगले. पूज्य साने गुरुजींच्या निष्ठा, सात्विकपणा, शुद्ध आचरण आणि जगाप्रती प्रेम अर्पण करणारा बंधूभाव त्यांनी स्वतःमध्ये जोपासला. १९६७ साली शिक्षक आमदार म्हणून त्यांना विधान परीषदेवर पाठविण्यात आले. त्यांची पत्नीने त्यांना त्यांच्या या सेवावृत्तीच्या यज्ञांत मनोमन साथ दिली. विवाहानंतर शिक्षण घेऊन त्यांच्या विद्यालयात अध्यापन केले. पण मधेच ती साथ सुटल्यानंतर ते म्हणाले, ' आमची सेवा तिने सतत केली, पण तिची सेवा करण्याची संधी मात्र तिने कधीच दिली नाही.'

असे हे विलोभनीय हसतमुख व्यक्तीमत्व, प्रेमळतेचा, वात्सल्याचा आणि सेवावृत्तीचा प्रचंड ओघ असलेला महापुरूष शनिवार दिनांक १९ मे २०१२ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षीं तृप्त मनाने आपणातून निघून गेले. देशसेवा आणि ज्ञान साधना यांचा सुरेख संगम असलेल्या एका समाजकारक आणि ऋषीतूल्य अश्या व्यक्तीमत्वाला आपण मुकलो होतो. त्यांनी लावलेली हजारो रोपटी वृक्ष बनून आपल्या या गुरुचे ऋण मान्य करून इतरांना प्रकाशमय करतात. अश्या या दिव्य पुरुषाचा कांही दिवस का होईना? चरणस्पर्श करण्याचा लाभ मला मिळाला त्याबद्दल मी ईश्वराचे आभार  मानतो.

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे!
 


आज ९ जानेवारी २०१९ ! प्रकाशभाई मोहाडीकरांची जन्म शताब्दी ! या निमित्ताने त्यांना हृदयात पुजलेल्या एका भक्ताची ही शब्दांजली !

प्रा.मं.गो.राजाध्यक्ष






Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :