जॉर्ज फर्नांडीस आमचे दैवत होते !
आणि सावरकर वगळता आम्हांला भाग्य लाभले, ते या सर्व लोकांच्या चरणाला स्पर्श करण्याचे. त्यांचे आशीर्वाद घेण्याचे.शिवतीर्थावर रात्रौ उशीरापर्यंत राहून त्यांची भाषणे ऐकण्याचे. आणि त्यांचे ते मनांत खोलवर रुतून बसलेले शब्द परत परत आठवून त्यात लीन होऊन जाण्याचे. असेच होते आमचे जॉर्ज फर्नांडीस. अंगावर नेहमी खादीचा अर्ध्या हाताचा बुशशर्ट, तशीच ढगळ प्यांट, डोळ्यावर जाड फ्रेमचा चष्मा व करडे झालेले व एक बट नेहमी कपाळावर आलेले केस असा त्यांचा नेहमीचा पेहराव असे. जॉर्ज यांचा जन्म मंगळूरला ३ जून १९३० साली झाला. पंचम जॉर्जच्या जन्मतारखेला झाला म्हणून याचेही नांव जॉर्ज ठेवण्यात आले. बालपण गरिबीतच गेले. जॉर्जला पुढे प्रिस्ट करावा या हेतूने त्याला मिशनरी शाळेत घालण्यात आले. पण तेथे जॉर्जचे मन रमेना. आणि एक दिवस जॉर्ज निघाला तो थेट मुंबईला आला. पुढे काय करायचे याचे एक मोठे प्रश्नचिन्ह घेऊन. सध्यातरी कोठेतरी नोकरी करून पोट भरण्याची आवश्यकता होती. कांही दिवस हॉटेलात कामगार म्हणून नोकरी केली. रात्री बंद दुकानाच्या फळीवर अथवा फुटपाथवर झोपून दिवस काढले.
या काळात पी.डिमेलो या समाजवादी कामगार पुढाऱ्याशी त्यांचा संपर्क आला. या काळात डॉ. राम मनोहर लोहीया देखील ट्रेड युनियनच्या कार्याशी जुळले गेले होते. त्यांचा फार मोठा प्रभाव जॉर्ज याच्यावर पडला. व त्यानंतर जॉर्ज फर्नांडीस हे नांव समाजवादी पक्ष व कामगार चळवळीशी जुळले गेले. १९५० साली जॉर्ज यांनी औद्योगीक कामगार, हॉटेल कामगार यांच्यासाठी प्रखर लढा दिला कारण दिवसभर राब राब राबून, अंगमेहनत घेऊन या कामगारांच्या पदरी काहीच पडत नसे. आणि या सोबतच त्यांनी टॅक्सी ड्रॉयव्हर युनीयन देखील बांधली. व डिमेलोंच्या संघटनांना मोठ्या प्रमाणावर नेले.
आणि मुंबईमध्ये कापड गिरणी कामगार म्हणजे डांगे, व टॅक्सी, बेस्ट, औद्योगिक कामगार, रेल्वे कामगार म्हटले की जॉर्ज ही नांवे पक्की झाली. आणि त्यांनी एकदा का संपाची हाक दिली की संपूर्ण मुंबई बंद झालीच म्हणून समजा. मात्र या बंदमध्ये कोठेही दहशत नसे, सामान्य माणसाला बाहेर फिरण्यास अटकाव नसे, कांही वेळा महापालिकेचे कामगार नळ उघडे ठेवून मग बंदमध्ये सामील होत, त्यामुळे घरात पाणी बंद होत नसे. फर्नांडिस यांचे एक स्वप्न होते ते म्हणजे रेल्वेचा 'चक्का' जाम करण्याचे. पण त्यांच्या आंदोलनात विध्वंस, जाळपोळ नसल्याने ते कधीच साध्य होऊ शकले नाही. पण त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाची घटना होती, ती म्हणजे १९७४ साली त्यांनी घडवून आणलेला रेल्वेचा ऐतिहासीक असा देशव्यापी संप. अवघ्या देशाला स्तब्ध करणारा हा रेल्वे संप तब्बल २० दिवस चालला होता
जॉर्ज फर्नांडिसनी संप विनाकारण ताणून कामगारांना कधीही उपाशी ठेवले नाही. ते म्हणत मी जेव्हां संप करतो तेव्हां आधीच तो संपवण्याचा एक दरवाजा मी नेहमी उघडा ठेवतो. अश्या वेळी नेत्यांनी आपला अहंकार मुळीच दाखवायचा नाही. आणि या जॉर्जला समस्त मुंबईकरांनी ' बंद सम्राट' ही मानाची बिरुदावली दिली. फर्नांडिस कधीही केवळ आदेश देऊन मागे रहात नसत, तर ते स्वतः त्यामध्ये सामील होत असत. मुंबईतील एका रेल्वेच्या संपाच्या वेळी रेल्वे बंद करण्यासाठी त्यांनी स्वतःला गाडीसमोर रुळावर झोकून दिले होते. अनेक पोलिसांना त्यांना बाजूला करता येईना. तेव्हां चिडून पोलिसांनी त्यांना लाठ्यानी झोडपले होते. तरीही ते शांत होते. नगरसेवक ते आमदार बनलेल्या जॉर्ज फर्नाडिसना १९६७ च्या सार्वत्रीक निवडणुकीमध्ये पक्षाने तिकीट देऊन मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून उभे केले. हा मतदारसंघ म्हणजे संपूर्ण धनीक वर्गाचा! आणि त्याचे कायम नेतृत्व करीत होते, ते मुंबईचे अनभिषिक्त राजे श्री स.का.पाटील. मराठी माणसाला 'यावचंद्रो दिवाकरो' मुंबई मिळणार नाही अशी वल्गना करणारे पाटील निवडणुकीत कधीच पडू शकत नाहीत अशी एक वदंता होती. आणि जॉर्ज त्यांच्या विरोधात, तेही कुलाब्यासारख्या धनदांडग्या आणि बहुसंख्य गुजराथी असलेल्या कुलाब्यातून. आणि यावर कढी म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या शिवसेनेने या 'मुंबईतील पाचही समितीच्या उमेदवारांना पाडा' असा जोरदार प्रचार सुरु केला होता. 'पाच भस्मासुराना भीमटोला' अशी शिवसेनेची पोस्टर्स सर्वत्र लागली होती. पण मुंबईतील गरीब लोक, कामगार वर्ग, टॅक्सी ड्रायव्हर हे सर्व जॉर्जच्या मागे होते, सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद त्यांच्या मागे होते. पण जॉर्ज हा यंडूगुंडू आहे. अमराठी आहे. असा प्रचार शिवसेनेकडून सातत्याने होत होता. आणि ती शिवतीर्थावरील शेवटची अत्रे, डांगे, जॉर्ज, गोखले आणि कृष्णमेनन यांची अखेरची सभा होती. त्या दिवशी जॉर्जच्या मुखातून अंगार बाहेर पडत होता. हिंदीमधून भाषण करताना जेव्हां त्यांनी शिवसेनेच्या जॉर्ज मराठी नसलेल्या मुद्याला स्पर्श केला तेव्हां त्यांनी आपली भाषा बदलली. आणि त्यांनी शुद्ध मराठीतून बोलण्यास आरंभ केला. शिवसेना म्हणते जॉर्ज बाहेरून आलेला आहे. तो मराठी नाही. मी त्यांना सांगतो, ह्य जॉर्जने येथील लोकांसाठी लाठ्या खाल्ल्या आहेत. त्याचे वळ अजूनही माझ्या अंगावर आहेत तो मी मराठी नाही? ज्याला तुम्ही निवडून येण्यास मदत करत आहात, तो माणूस मराठी माणसांच्या, मुंबईच्या मुळावर आला होता तो तुमचा मराठी काय? संयुक्त महाराष्ट्रासाठी आम्ही लढलो, तेव्हां हा माणूस मुंबई द्विभाषिक ठेवून महाराष्ट्राला देणार नाही म्हणून सांगत होता, तो मराठी माणूस? आणि फ़र्नांडीसनी आपला प्रचार एकाच मुद्यावर केला तो म्हणजे ' पाटील पडू शकतात. तुम्ही पाटलांना पाडू शकता.' असे भावनीक आवाहन करून. जोडीला होती आचार्य अत्र्यांची मुलुख मैदानी तोफ 'दैनीक मराठा'. आणि खरोखरीच जनतेने जॉर्जना निवडून देण्याचा बेल भंडारा उचलला. आणि पाटील पराभूत झाले. तो दिवस मुंबईकरांच्या जीवनातील एक आनंदी सोहळ्याचा दिवस होता. आणि ह्या निवडणुकीचे पडसाद जगभरात उमटले. आणि जॉर्ज फर्नांडीस एका रात्रीत 'जायंट किलर' म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९७६ मध्ये श्रीमती इंदीरा गांधींनी देशांत आणीबाणी लादली. आणि सर्वच महत्वाच्या नेत्यांची धरपकड सुरु झाली. त्यावेळी जॉर्ज भूमीगत झाले. त्यांचा पत्ता लागावा म्हणून त्यांच्या कुटुंबीयांचे अतोनात छळ करण्यात आले. अखेर त्यांना पकडून पोलीसांनी त्यांना हातकड्या व साखळदंड बांधून पोलीसांच्या गराड्यातून आणले, त्याचे फोटो सर्वत्र प्रसीद्ध झाले. रेल्वे रूळ उखडणे, ब्रिज पाडण्याचे कट करणे असे त्यांच्यावर आरोप ठेवण्यांत आले. हा पुढे बडोदा डायनामाईट कट म्हणून ओळखला गेला. आणीबाणीचा हा संपूर्ण कालखंड त्यांनी कारावासात काढला. निवडणुकीच्या काळातही त्यांना सोडण्यात आले नाही. इकडे सर्व पक्षांचे विसर्जन करून विरोधकांनी 'जनतापक्ष' नांवाने नवीन पक्ष काढला. व जॉर्जना उमेदवारी दिली. ही निवडणूक जॉर्जनी तुरुंगातूनच लढवली. त्यासाठी त्यांचे हातापायात साखळदंड घातलेल्या छायाचित्राचा वापर करण्यात आला. आणि त्यावर शीर्षक होते, ' यह श्रुंखला मुझे नही, भारत के लोकतंत्र को है ' आणि हे पोस्टरदेखील बरेचसे काम करून गेले. तुरुंगातून लढवलेल्या या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडीस हे मुजफ्फरपूर मधून लक्षावधी मतांनी विजयी झाले. आणि इंदीरा गांधींची सद्दी संपून जनसेवेचे कंकण बांधून जनतेचे सरकार- जनता सरकार अवतरले. मोरारजीभाईंनी त्यांना आपल्या सरकारात उद्योग मंत्रालय दिले. आपल्या पहील्याच भाषणात रायबरेलीतून पराभूत झालेल्या व संसदेत हजर नसलेल्या इंदिराजींना उद्देशून ते म्हणाले, मादाम ' आज तुम्ही येथे हजर नाहीं हे आमचे दुर्दैव. आज आणीबाणीत आपण केलेल्या पापांचा पाढा आम्ही येथे तुम्हांला ऐकविला असता.' पुढे इंदिराजींसाठी काँग्रेसने हमखास निवडून यायची जागा म्हणून कर्नाटकातील चिकमंगळूर येथील मतदारसंघ तेथील खासदाराला राजीनामा द्यायला लावून मोकळा केला व तेथून इंदिराजींना पोट निवडणूक लढवायला लावली. त्यांच्या विरोधात होते जनता पक्षाचे वीरेंद्र पाटील. या वेळी प्रचाराची सर्व सूत्रे जॉर्ज यांच्या हाती देण्यात आली होती. अगदी तळागाळाच्या लोकांशी जॉर्ज धुळीत बसून त्यांच्याशी संवाद साधे.आणीबाणीमुळे जनतेच्या विचारस्वातंत्र्यावर कसा घाला घातला गेला हे त्यांना समजून सांगे. पण त्या निवडणुकीत पुढे इंदिराजी विजयी झाल्या.
उद्योग खात्याची सूत्रे हाती घेताच फ़र्नांडीस यांनी पहीले काम कोणते केले असेल तर 'कोकाकोला' व ' आई बी एम' यांची त्यांनी भारतीयांना आपले समभाग देण्यास नकार दिल्याने हाकालपट्टी. पुढे जनता पक्षावर काही समाजवादी पुढाऱ्यांनी केलेल्या आरोपामुळे सरकार धोक्यात आले. तेव्हां संसदेत जॉर्जने केलेल्या घणाघाती भाषणाने त्यात पुन्हा धुगधुगी आणली होती. पण दुसऱ्या दिवशी खुद्द जॉर्जच विरोधकांसोबत जाऊन बसले. आणि पुढचा इतीहास सर्वाना माहीत आहेच! पुढे व्ही.पी.सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते रेल्वे मंत्री झाले. तेथील त्यांचे महत्वाचे काम म्हणजे त्यांनी आरंभ केलेले ऐतिहासिक कोकण रेल्वेचे काम. महत्वाचे म्हणजे या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतही जॉर्ज साहेबानी कोणताही लवाजमा सोबत पाळला नाही. स्वतःच गाडी चालवीत ते संसदेत जात. मंत्र्यांसाठी असलेला बंगलाही त्यांनी घेतला नाही. आपल्या एका खोलीत असलेला संसार ते चालवीत. स्वतःचे कपडे स्वतःच धूत. आपला खादीचा झब्बा आणि खादीचा पायजमा या पोषाखातही त्यांनी बदल केला नाही. १९९४ मध्ये जॉर्जनी आपला 'समता पार्टी' हा नवीन पक्ष काढला. नंतर झालेल्या बी जे पी सोबतच्या आघाडीत ते सामील झाले व अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्याकडे संरक्षण खाते दिले. १९९८ ची पोखरणची न्यूक्लियर टेस्ट व कारगील युद्ध त्यांनी पाहीले. पण पुढे 'काफिन' प्रकरणामुळे व जॉर्ज यांनी आपल्या पदावरून पायउतारी केली. परत २००९ च्या राज्यसभेत ते बिनविरोध निवडून आले. २००९-२०१० मधील राज्यसभेतील जॉर्ज फर्नांडीस नांवाच्या तोफेची ही शेवटची हजेरी ठरली. त्यानंतर ते अल्झायमर व पार्किन्सन सारख्या व्याधींनी त्रस्त होऊन हळू हळू त्यांना विस्मरण होऊ लागले. आणि अखेर मंगळवार दिनांक २९ जानेवारी २०१९ रोजी पहाटे ७.१५ वाजतां त्यांचे निधन झाले. एक सूर्य अस्ताला गेला. एका झंजावाताची अखेर झाली. मुंबईवर आपला ठसा उमटवणारा 'बंद सम्राट' व ' जायंट किलर' आपल्या मुंबईकरांच्या हृदयात कायमची उणीव निर्माण करून निघून गेला. त्यांच्या निधनाची वृत्त च्यानलवाल्यानी तशी खास दखल घेतली नाही. केवळ जुजबी माहीती देऊन त्यांच्या वृत्ताची बोळवण करण्यात अली. एरवी एखादी व्यक्ती दारू पिऊन पाण्यात बुडून मेली तर गळे काढणाऱ्या या चॅनलवाल्याना जॉर्जच्या झंझावाती जीवनाची माहीतीच दिसली नाही. पण त्यामुळे जॉर्ज साहेबांचे मोठेपण कमी होत नाही.
जॉर्जसाहेब तुम्हांला कोटी कोटी प्रणाम!
-मं.गो. राजाध्यक्ष






Comments
Post a Comment