साहित्याचे गुण; संगीताचा डौल : चित्रकार दीनानाथ दलाल
भारतात गेल्या शतकांत वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवणारी अनेक उत्तुंग अशी व्यक्तिमत्वे जन्माला आली. आपल्या अलौकीक कार्याने त्यांनी भारतीयांच्या मनावर आपली नावे कोरली. महाराष्ट्रातील अश्या व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे दीनानाथ दामोदर दलाल. चित्रकलेच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे एक महाराष्ट्राचे लाडके दैवत ! ३० मे १९१६ रोजी गोव्यातील मडगांव येथे दीनानाथ दलालांचा जन्म झाला. ज्या गोमंतकाने चित्रकार, गायक, वादक, नाटककार, नट अश्या कलाकारांच्या कैक पिढ्या निर्माण केल्या, तेथे दलालांसारख्या प्रतीभाशाली कलावंताचा जन्म व्हावा, हे कांही नवल नव्हते. त्यांचे बालपण या निसर्गरम्य परीसरात गेले. सभोवताली हिरव्यागार वनश्रीने नटलेली कुळागारे, निळेशार समूद्र, मासेमारीसाठी पारंपारीक वेषात जाणारे कोळी, मंगेश-शांतादुर्गा-महालक्षुमी अशी ऐतिहासीक महत्व लाभलेली अन वास्तूशास्त्राचा अद्भूत नमूना असलेली मंदीरे आणि त्यासोबत तेथील भव्य अशी प्राचीन चर्चीस या सर्वाचाच परीणाम दीनानाथ दलाल यांच्या सौंदर्य दृष्टीवर घडत गेला असणार. सतत रेखाटणने करणाऱ्या शाळकरी दीनानाथने एकदा आपल्या मुख्याध्यापकाचे केलेले रेखाटन खुद्द त्यांच्याच पहाण्यात आले. कलेची जाण असलेल्या त्या मुख्याध्यापकांनी दीनानाथ यांच्या वडीलांना बोलावून सांगीतले की, या मुलाला पुढे कला शिक्षणासाठी मुंबईला पाठवा ! तेथेच याच्या कलेचा उत्कर्ष होईल.
आपली फायनल परीक्षा झाल्यावर दलाल मुंबईला आले. गोव्याच्या तुलनेने मुंबई या महानगरीने त्यांना एकदम दिपवून टाकले. चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याच्या दृष्टीने त्यांनी गिरगावातील केतकरांच्या आर्ट स्कुल मध्ये प्रवेश घेतला. त्या काळात खाजगीरित्या अभ्यास करून सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या सरकारी परीक्षांना बसता येत असे. दलालांची कांही चित्रे पाहून थक्क झालेल्या केतकरांनी दलालांना सांगून टाकले की, तुला येथे माझ्याकडे येऊन शिकण्याची कांहीच गरज नाही. मात्र माझ्याकडे शिकवायला जरूर ये ! प्रत्यक्ष केतकर मास्तरांनी दिलेली ती पावती होती. जी.डी. आर्ट ही सरकारी पदवीका मिळवल्यानंतर दलालांनी त्या काळांतील सुप्रसीध्द अश्या ' बी. पी.सामंत ' या जाहीरात एजन्सीत काम करण्यास सुरुवात केली. तेथे दलालांना निरनिराळ्या उत्पादनासाठी जाहीराती करण्याची संधी मिळाली. व त्यांनी आपल्या चित्रांकनावर आपली स्वतंत्र अशी छाप निर्माण केली. आणि येथूनच दलाल या तरुण चित्रकाराची लक्षवेधक वाटचाल सुरु झाली.
दलालांनी लवकरच आपल्या कला सामर्थ्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर मोहीनी घातली. त्यांची स्वतंत्र अशी शैली त्यांनी निर्माण केली. दलालांनी त्याकाळांत अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे तसेच आतील रेखाटने केली. कांही व्यक्तीरेखा तर त्यांनी अजरामर केल्या. त्यापैकी ना. धों. ताम्हणकरांचा 'गोट्या' व 'चिंगी ' 'दाजी', वि.वि. बोकीलांचा 'वसंत', हे आवर्जून उल्लेखावे लागतील. गोट्या या पुस्तकाचे तीन भाग होते. प्रत्येक भागात खोडकर गोट्याचे वाढते वय, वय वाढेल तशी त्याच्यामध्ये आलेली परीपक्वता याचे सुरेख चित्रण दलालांच्या कुंचल्याने केले आहे. दरम्यान दीनानाथ दलालांचा सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थीनी सुमती पंडीत यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांनी केनेडी ब्रिज येथे स्थलांतर केले. व लवकरच त्यानी नोकरी सोडून तेथे आपला ' दलाल आर्ट स्टूडीओ ' थाटला. केनेडी ब्रिजवरून जातायेतांना त्यांच्या स्वतःच्या सहीची असलेली ' दलाल आर्ट स्टूडीओ 'ची पितळी पाटी दिमाखात दिसत असे. दलालांच्या त्या काळात अनेक भारदस्त अशी मासीके होती, तसेच अनेक चित्रकार त्यासाठी कामे करीत असत. बहुतेकांचे काम हे फोटोग्राफी पद्धतीचे असे. काहीजण यासाठी इंग्रजी मासीकातील चित्रांचे आधार घेत. पण दलाल अश्या गोष्टीत कधीच अडकून पडले नाहीत. त्यांची चित्रशैली ही संपूर्णपणे त्यांनी जोपासलेली होती. त्यांची प्रवाही रेषा त्यांच्या रेखाटनाचे सौंदर्य तर वाढवीत असेच, शिवाय त्या चित्रातील व्यक्तिरेखा आणखीनच खुलवीत असे. त्यांच्या चित्रात बोजडपणा, किचकटपणा कधीच नसे. पण सुलभीकरण केल्यामुळे त्यांतील लावण्य खुलून दिसत असे. म्हणून ते कधीच शास्त्रीय रेखाटनात अडकून पडले नाहीत.
दलाल यांनी उपयोजीत कलेसाठी कलासंपदा केली तरी त्यांच्या चित्रकलेला शास्त्रीय बैठक होती. कसलेल्या पेंटरच्या तोडीसतोड असे व्यक्तीचित्रण ते करीत असत. त्यांनी केलेल्या लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, साहित्यसम्राट न.चिं. केळकर, एस. एम. जोशी, महात्मा गांधी, गाडगे महाराज यांच्या केलेल्या व्यक्तीचित्रणावरून कल्पना येते. दलालांपूर्वी सामान्य माणसावर आपली छाप पाडणारा चित्रकार म्हणजे राजा रविवर्मा हे होते. रविवर्मांच्या चित्रांच्या प्रिंट्सना मिळालेले यश पाहून अनेक चित्रकार मुद्रणासाठी चित्रे काढायला पुढे आले. छपाईची तंत्रे बदलली. चित्रांची छपाईची संख्याही वाढली. आणि त्याकाळात चित्रकार मुळगावकर आणि दलाल या दोघा चित्रकारांचीच चित्रे सर्वत्र दिसत असाही एक काळ होता. पुस्तकांची मुखपृष्ठे दलालांकडूनच करून घ्यावीत असा एकंदर सर्वच प्रकाशकांचा, लेखकांचा मानस असे. साने गुरुजी, स्वा. सावरकर, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, पु.ल.देशपांडे, जयवंत दळवी ते रणजीत देसाई अश्या अनेक प्रतिभाशाली साहित्यिकांच्या पुस्तकांना दलांच्या कुंचल्याने नटवले आहे. दलालांचे मुखपृष्ठ हे पुस्तकाचा दर्जा ठरवणारे एक परिमाणच ठरले होते
दलालांनी शास्त्रशुद्ध कलाशिक्षण घेतले असले तरी त्यांची कला समाजातील सर्वच स्तरांच्या लोकांना आनंद देणारी ठरली. त्यांची चित्रे ही विचार प्रसारण कलेशी जुळलेली होती. साहीत्यीक, कवी यांच्याशी दलालांचा जवळून संबंध होता. कदाचित या साहीत्य ओढीमुळे असेल, त्यांनी आपली वाटचाल थोडी वळवून स्वतःचे ' दीपावली ' हे वार्षीक सुरु केले. नंतर त्याचे मासीकात रूपांतर केले. ' दीपावली'चा दिवाळी अंक म्हणजे रसीक मराठी वाचकांना एक आनंदाची पर्वणी ठरली. यात दलालांची खास अशी तिरंगी चित्रे असत. ती अनेकदा अंक वाचून झाल्यावर वाचक कापून काढून संग्रह करून ठेवीत असत. कैकजणांनी अजूनही ती सांभाळून ठेवलेली आढळतात. दिवाळीअंक म्हणजे दलाल हे समीकरणच त्या काळात रूढ झाले होते. यामध्ये त्यांनी शृंगार नायीका चित्रीत केल्या. शृंगाररसाची आतषबाजीच होती ती. रंग रेषांवर प्रभूत्व असलेल्या दलालांनी या वेळी काहीसा आधुनिकतेचा बाजही आपल्या चित्रांवर चढवीला. अनेक तंत्रे वापरून त्यांनी आपल्या या नायीका सादर केल्या. त्यांच्या स्त्री चित्रणामध्ये स्त्रीची मोहकता, तिचा कमनीय बांधा, आरक्त गाल, थोडीशी अनावृत अशी वस्त्र प्रावरणे, नजरेतील भाव, तिचे मोहमयी लावण्य आणि विषयानुरूप आकृतीबंध व हुकूमी रंगसंगती यामुळे ती खुलून येत असे. ग्रामीण विषय असो, वा पौराणिक अथवा ऐतिहासीक ते लालीत्याने फुलवायचे. विशेषतः ग्रामीण विषयातील बैलगाडीतून जाणारा घरधनी, त्याची गृहलक्ष्मी धनीण, घुंगुर वाजवीत डौलाने जाणारी बैलगाडी आजूबाजूचा सुपीक असे मळे - शिवारे, हे पाहीले की आपणही त्या वातावरणात नकळत पोचत असू.
दलालांच्या चित्रांत प्रणय असे, शृंगार असे, मोहकता असे, पण अश्लीलतेचा वासही त्यांनी आपल्या चित्रांना येऊ दिला नाही. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाच्या घरोघरी त्यांच्या चित्रांनी आपले एक चित्ररूपी नाते जोडले आहे. दिवाळी अंकातील त्यांच्या चित्रमालिका आजही आपल्या मनाला सुखावून जातात. हे सर्व पहातांना एक गोष्ट प्रामूख्याने आणि प्रकर्षाने जाणवते ती त्यांची यामागील तपश्यर्या. ते सतत कार्यमग्न असत. कोठेही गेले तरी तेथील इमारतींची, प्राण्यांची, माणसांची असंख्य रेखाटने ते करीत असत. सरावासाठी केलेली ही रेखाटने आजही पाहावयास मिळतात. सर्वच प्रकारच्या रंग माध्यमावर त्यांची हुकूमत होती. जलरंग असो, तैलरंग असो, पेस्टल वा इंक असो अगदी सहजतेने ते त्याचा वापर करून ते पुन्हा विविध प्रयोगही करीत राहीले. चित्रकलेच्या क्षेत्रात तळपणाऱ्या दलालांनी राजकीय व्यंगचित्रेही तितकीच प्रभावीपणे आविष्कृत केली. मो.ग.रांगणेकर व अनंत काणेकर यांच्या 'चित्रा ' या साप्ताहिकात दलालांची व्यंगचित्रे येऊ लागली. व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनीही आपण दलालांच्या व्यंगचित्रापासून स्फूर्ती घेतल्याचे सांगितले आहे. या दोघांचाही व्यंगचित्रातील आदर्श होते, डेव्हीड लो. पण दोघांनीही आपल्या रेषेवर त्यांचा प्रभाव पडू दिला नाही. पुढे काणेकरांसोबत दलालांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली, आणि त्यामधून ' आमची माती, आमचे आकाश ' या पुस्तकाची निर्मिती झाली. काणेकरांच्या लिखाणावर दलालांनी केलेल्या रेखाटनामुळे देशभरातील सांस्कृतीक जीवनाचे दर्शन या पुस्तकातून होते.
दलालांनी अनेक प्रकाशक, लेखक यासाठी काम केले. त्या बाबतीत त्यांना युगप्रवर्तक म्हणावे लागेल. पुस्तकांचा संपूर्ण तोंडवळाच त्यांनी बदलून टाकला. यामध्ये त्यांनी वास्तववादी शैली वापरली, नवचित्र शैलीतही काम केले. अलंकारीक अश्या आधूनीकतेकडे झुकणाऱ्या सुलभ शैलीनेही त्यांनी मुखपृष्ठे नटवीली. साहीत्यातील जाणकार असल्याने अनेक साहीत्यिक, टीकाकारांशी त्याचे जवळचे संबंध होते. त्यांच्या स्टुडीओत ते एका टेबलावर काम करीत बसले असताना त्यांना सतत भेटायला आलेल्या व्यक्तींशी त्यांच्या गप्पाही चालू असत. त्यांच्या कामात याचा खंड कधीच येत नसे. त्यांच्या मित्रमंडळीत पुरुषोत्तम चित्रे, गोपालकृष्ण भोबे, द.ग.गोडसे, अरविंद गोखले, काँटिनेंटलचे अनंतराव कुलकर्णी, प्रकाशक देशमुख, रॉय किणीकर अश्या लोकांचा प्रामुख्याने राबता असे. त्यांच्याशी हितगूज करीतच एकीकडे दलालांचा कुंचला चालूच असे. तो कुंचला दलालांशी संभाषण करीत असे. कुजबूजत असे. सत्यकथा, नवल, हंस, मौज, धनुर्धारी अश्या नियतकालिकांनाही त्यांची मुखपृष्ठे असत, काही मासिकांना आतील कृष्ण धवल बोधचित्रे ते काढीत असत. तीही तितकीच जोरकस व अर्थपूर्ण अशी शैलीदार असत. मग ते बैठक मांडून सिगरेटचा झुरका मारीत लिहीत बसलेले पु.भा. भावे असोत, वि.स.खांडेकर असोत, औंधचे महाराज, पं.नेहरू असोत किंवा कथेच्या विषयानुरूप प्रसंग असोत, दलालांचा कुंचला ते समर्थपणे रेखाटत असे
दलालांच्या कलेने प्रोत्साहित झालेले अनेक जण त्यांच्या दीपावलीला जाहीराती देत असत. या जाहिरातींना दलाल ऑक्सिजन म्हणत. या ऑक्सिजनच्या पुरवठ्याने आपले वार्षिक जिवंत आहे याची त्यांना जाणीव होती. यामध्ये जाहीरात क्षेत्राशी संबंधित असलेले लेखक अच्युत बर्वे होते, तसेच पुण्याचे त्यांचे मित्र व ' टॉम ॲन्ड बे’ जाहीरात संस्थेचे गणपतराव तांबे होते. उपयोजीत कलेमध्ये काम करूनही दलालांनी आपला कलात्मक दर्जा कायम राखला. पुस्तके, कॅलेंडर, कथाचित्रे, आणि व्यक्तिचित्रणे यातून कलात्मकतेचा उच्चांक त्यांनी गाठलेला होता. अभिजात कलेच्या आविष्काराचा त्यांना ध्यास होता. त्यामुळेच अनेक कला संस्थांच्या वार्षीक प्रदर्शनासाठी ते चित्रनिर्मिती करीत. या प्रदर्शनांतून त्यांनी बक्षीसेही मिळविली. दलालांना साहित्याबरोबरच संगीताचीही जाण असल्याने ते लेखक, कवी, नाटककार, गायक, वादक यांच्या सहवासांत रमत असत. यामुळेच साहित्याचे गुण व अर्थवाहित्व आणि संगीताचा डौल यांचा मिलाफ त्यांच्या चित्रातून नेहमीच उमटला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराचे जे चार फूट उंच व बारा फूट लांबीचे तैलचित्र बनविले, त्यावेळी आपले चित्रण सत्य तपशिलांवर आधारित असावे म्हणून त्यांनी अनेक इतिहासकारांशी चर्चा केली. त्यांची मते आजमावली. आणि त्यानंतरच आपल्या चित्राची बैठक पक्की केली. या तैलचित्रात शिवाजी महाराज व बाल संभाजी राजे यांच्या व्यतिरीक्त सुमारे ४६ दरबारी दाखविले आहेत. महाराजांचे वैभव, त्यांचा करारीपणा, त्यांच्या मानकऱ्यांचा त्यांच्याप्रती आदरभाव याचे यतार्थ दर्शन या भव्य चित्रातून होते.
दलालांच्या चित्रांत सूर-ताल, लाघवीपणा, लावण्य असे सर्व कांही होते. प्रणय आणि शृंगार हा त्यांच्या चित्रांचा मूलभूत आविष्कार होता, पण त्यात अश्लीलता कोठेच जाणवली नाही. आपल्या आधुनिक चित्रात त्यांनी थोडे स्वातंत्र्य घेतलेले दिसते, त्यामुळे ते नेहमीच प्रयोगशील राहीले ! आज कांही अभिजात कलाकार दलालांच्या कलेचे मूल्य मापन करताना म्हणतात की, दलालांना अभिजात कलासाधना व निर्मिती करता आली नाही याची खंत होती. माझ्या मते हे श्यक्यच नाही. त्यांच्या चित्रांनी मराठी मनांत प्रेमाचे व श्रद्धेचे स्थान मिळवले. त्यांनी केलेल्या अभिजात कलेच्या कामाने त्यानी ते सिद्धही करून दाखविले. त्यांच्या व्यावसायिक कामांनाही त्यांनी नेहमीच अभिजात कलेचा स्पर्ष दिला.दलाल हे मराठी माणसाला पडलेले एक गुलाबी स्वप्न होते. त्यांचा ' दलाल आर्ट स्टूडीओ ' हा वैभवाच्या शिखरावर होता. पण सृष्टीच्या विधात्याला आपल्या रंगरेषा कुंचल्याच्या साहाय्याने प्रती विश्व् निर्माण करणाऱ्या या कलावंताबद्दल असूया निर्माण झाली असावी. चित्र निर्मितीच्या मैफलीत मग्न असतांना, वयाच्या केवळ ५५ व्या वर्षी, १५ जानेवारी १९७१ रोजी, प्रत्येक मराठी मनाचा मानबींदू असलेल्या या मनस्वी कलावंताला, दीनानाथ दामोदर दलाल याना हिरावून नेले. चित्रकलेचा मानबींदू असलेल्या या कलावंताला विनम्र अभिवादन
- मं.गो. राजाध्यक्ष










Comments
Post a Comment