फॅमीली डॉक्टर ते कॉर्पोरेट डॉक्टर
डॉक्टर हा साधारण पन्नास-साठ वर्षांपूर्वी प्रत्येक कुटुंबाचा एक जिव्हाळ्याचा स्नेही समजला जात असे. तसे प्रत्येक कुटुंबाचा एक खास असा डॉक्टर ठरलेला असे. त्याला फॅमीली डॉक्टर म्हणून संबोधले जायचे. तसे हे लोक व्यावसायीक जरी असले, तरी आपल्या नोबल व्यवसायाशी प्रामाणीक असत. रुग्ण सेवेचे घेतलेले व्रत पूर्ण प्रामाणिकतेने पूर्ण करीत. आणि या डॉक्टरना संपूर्ण कुटुंबाची माहीती असे. ते घरात शिरत तेच घरातील वडीलधाऱ्या मंडळींची चौकशी करीत. त्यामुळे मूलतःच त्यांच्याशी एक अनामीक असे नाते निर्माण होई. मग रुग्णाची तपासणी, त्याचे पथ्यपाणी, वगैरे सांगून दवाखान्यातून औषध घेऊन जाण्यास सांगत. आम्हांला आमच्या लहानपणी त्यांच्या स्टेथोस्कोपचे नेहमीच एक औस्त्युक व कुतूहल वाटत असे. यातून त्यांना आजाराचे निदान कसे करता येते याबद्दल कुतूहल असे. एकदा हळूच मी ते कानांत घालून पोटाला लावताच मोठा आवाज आला अन तत्क्षणी मी ते कानातून काढले. पुढे याबाबत मी एका ओळखीच्या डॉक्टरांना विचारताच त्यांनी त्याचे साधे स्पष्टीकरण दिले ते असे, तुम्ही धान्याचा एखादा डबा घेऊन त्यावर टिचक्या मारून पहा. तो जर पूर्ण भरलेला असेल तर आवाज वेगळा येईल. अर्धा वा त्याहून रिकामा असेल तर त्याचा आवाज बदलत जाईल. हेच तत्व आहे यामागे. निरोगी माणसाचे ठोके आणि आजारी माणसाचे यात फरक असतो.
तर असे हे फॅमीली डॉक्टर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग म्हणून पहावे लागेल. असे अनेक डॉक्टर आमच्या सहवासात आले. त्यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास अन भरवसा असे. दवाखान्यांतून औषध आणायला जातांना त्याकाळात औषधासाठी बाटली न्यावी लागत असे. या बाटल्या बहुदा डोंगरे बालामृतच्या हिरव्या रंगाच्या, वरती भेंडाचे बूच असलेल्या असत. साधारणपणे तीन बाय चार आकाराच्या या बाटल्यांचे कोने तिरके असून त्या षट्कोनाकृती असत. त्यामध्ये कम्पाउंडरने औषध ओतले, की ते घेण्याचे माप म्हणून एक पांढऱ्या कागदाची पट्टी जितके डोस तितक्या घड्या घालून त्यांचे कोपरे कात्रीने कापायचे व ती सरळ केल्यावर प्रत्येक डोस मध्ये एक खाचा मिळतो, त्या प्रमाणे औषधाचे डोस घ्यायचे. जोडीला पुड्या किंवा गोळ्या असायच्याच! औषध आणताना घरी नेण्यासाठी त्यांच्याकडील मलम आणणे हे देखील एक काम असे. हे पिवळसर आणि जाडसे मलम ग्रीस प्रमाणे दिसत असे. घरी आणल्यावर ते एका डबीत भरून ठेवावे लागे. कधी भाजले, कापले की त्यावर हा इलाज असे. या दवाखान्यातून नेहमी दरवळायचा तो डेटॉलचा वास. भीती वाटत असे ती मात्र डॉक्टरांच्या इंजेक्शनची. पण ते फार क्वचीतच वाट्याला येत असे. असे कांही मी अनुभवलेले डॉक्टर यांच्याविषयी मी आज बोलणार आहे.
आमचे बेळगांव हे तसे एक शहरच होते. मला माहीत असलेले आमचे पहीले फॅमीली डॉक्टर होते डॉ. एन.आर. कुलकर्णी. बहुतेक वेळा त्यांच्या रामलिंग खिंडीतील दवाखान्यातच जायची वेळ येत असे. पण जर का कधी व्हिजिटला घरी आले तर त्यांच्या गाडीतून आम्हांला यायला मिळे. त्याकाळात गाडी बाळगणारे डॉक्टर फारच कमी होते. बहुदा सायकल स्वारच असत. तर काहीजणांकडे एन्फिल्ड,नॉर्टन किंवा बी.एस.ए. या मोटारसायकल असत. पुढे आमचे घर बदलून आम्ही रहायला आलो शहराच्या दुसऱ्या टोकाला. तेथे जवळपासच डॉ. प्रभू यांचा दवाखाना होता. मुख्य म्हणजे आमच्या डॉ. कुलकर्णी यांनीच एकदा कांही दिवसांच्या सुटीवर जाताना आम्हांला डॉ. प्रभूंचा संदर्भ दिला होता. तेही बेळगावात अतीशय प्रसीद्ध असे डॉक्टर होते. सगळीकडे उपचार करून थकले की मग लोक या प्रभूंकडे येत असे म्हटले जात असे. अर्थात यामध्ये खेडेगावातील रुग्णांचा भरणा जास्ती असे. अतीशय चांगला हातगुण असलेले हे डॉ. प्रभू तोंडाने मात्र अतीशय फटकळ होते. बाहेर त्यांचे मित्रमंडळ खूप थोर अश्या मंडळींचे होते. बोगारवेशीत त्यांचा दवाखाना होता. सायकलवरून ते निघत ते दवाखान्यांत जाण्यापूर्वी त्यांचा मुक्काम असे तो 'तरूण भारत' शेजारीच असलेल्या हरिभाऊ हेरवाडकर यांच्या वाड्यावर. मग बाहेरील खोलीत जमत ते तरुण भारतचे संपादक बाबुराव ठाकूर, तेथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते बा.रं.सुंठणकर, वकील राम नाईक. या सर्वांच्या चहासोबत गप्पा चालत त्या बहुदा राजकारणावर. सर्वच मराठीचे अभिमानी. महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढणारे. नंतर मात्र डॉ. प्रभू एकदा का आपल्या दवाखान्यात पोचले की तेथे मात्र या मैत्रीला छेद मिळत असे. तेथे यातील कोणालाच स्वतंत्र अशी वागणूक नसे. सर्वांप्रमाणे नंबराप्रमाणेच यांनाही वागणूक मिळे. मात्र कोणालाही या बाबतीत तक्रार नसे. कित्येकदा खेड्यातून सर्व डॉक्टर आटोपून झाले की मग प्रभूंच्या दवाखान्याची पायरी चढणाऱ्या लोकाना ते म्हणत, काय रे ? त्या डॉक्तरांकडे म्हातारी मरायला नको म्हणून माझ्याकडे आणलीस काय? सर्वानाच या त्यांच्या प्रेमळ दटावणीच्या शब्दांची सवय झाली होती. पण त्यांच्याकडे आलेला रुग्ण मात्र ठणठणीत बरा होऊनच जात असे. या प्रभू डॉक्टरनी कधीच कंपाऊंडर ठेवला नाही. पेशण्टची गर्दी असूनही ते दहा दहा पेशन्ट तपासत. त्या सर्वांच्या बाटल्या घेऊन आत जात. तेथे त्यांचे अनेक गोळ्यांचे कूट करून मिश्रण तयार केले जात असे मग त्यात पाणी व इतर पातळ सिरप घालून त्यांचे औषध तयार झाले की मगच ते बाहेर येत व पुढचे पेशन्ट तपासायला घेत. सर्वजण कधी आले आहेत हे त्यांच्या पूर्ण लक्षांत येई. जर का कोणी मधेच पुढे येऊन बसला तर त्याला सांगत, पुढे बसलास म्हणून आधी तपासणार नाही. तुझा नंबर आल्यानंतर तपासणार. अश्या या प्रभू डॉक्टरनी अनेकांना बरे केले. तोंडाने फटकळ असूनही अनेकांचे आशीर्वाद घेतले. कोणीही त्यांचे बोलणे मनावर कधी घेतले नाही.
आणि एक बेळगावातील आदरणीय नांव घ्यावेसे डॉक्टर म्हणजे डॉ. डिसिल्व्हा आणि त्यांची बहीण. हे भाऊ बहीण डॉ. हेरेकर यांच्या हॉस्पिटल मध्ये स्वतःचे हॉस्पिटल चालवीत. हे हेरेकर म्हणजे डॉक्टर कुटूंब होते. व त्यांनी अट घातली होती की जर पुढे त्यांच्या कुटुंबात कोणी डॉक्टर झाले, तर् पुन्हा ही जागा त्यांना देण्यांत यावी. येथे डॉ. डिसिल्व्हा यांनी आपले हॉस्पिटल व त्यांच्या बहीणीने सूतिकागृह सुरु केले. एक आदर्श डॉक्टर बंधू भगिनी म्हणून ते प्रसीद्ध होते. दोघांच्याही बोलण्यात मिठास अशी कांही होती, की त्यांच्या प्रेमळ वागण्यानेच रुग्णाचे अर्धे दुखणे पळून जात असे. आमचे जे.जे.चे अधिष्ठाता धोंड मास्तर बेळगांवच्या सेंट पॉल्स हाय स्कुल मध्ये ड्रॉईंग मास्तर होते. हे डॉक्टर त्यांचे विध्यार्थी. त्यामुळे जे.जे.च्या सुटीत मी कधी बेळगांवी गेलो की त्यांना भेटत असे. तेव्हां हमखास ते धोंड मास्तरांविषयी विचारीत असत. नंतर बऱ्याच वर्षांनी हेरेकर घराण्यात एकजण डॉक्टर झाल्याने त्यांनी ती जागा त्यांच्या हवाली केली, व स्वतःचे हॉस्पीटल बंद करून केवळ दवाखाना सुरु ठेवला. त्यानंतरही बरीच वर्षे ते कार्यरत होते.
यानंतर १९६२ साली मी मुंबईला आलो. तेव्हां बेळगांवशी संबंध बहुतेक दुरावले. अंधेरीत माझे वास्तव्य होते. यापूर्वी दवाखाने पाहीले होते, ते दहा-बारा पेशन्ट असलेले. कधी बसावे लागले तरी लवकरच नंबर लागत असे. पण मुंबईला आल्यावर प्रथमच डॉक्टर पी.के.मंकोडी यांच्याकडे जाण्याचा योग आला. आतमध्ये बरीच गर्दी होती. एवढ्यात तेथील एकाने माझ्या हातात एक छोटासा पुठ्ठयाचा तुकडा दिला. त्यावर नंबर होता. तेव्हां कळले की येथे आल्यावर नंबर घ्यावे लागतात. तुमचं नंबर आला की तुम्ही आत जायचे. मला हा प्रकार नवीनच होता. पुढे मी सांताक्रूझला रहायला आलो तो येथे आमचे फॅमीली डॉक्टर होते डॉ. मेहता. येथेही नंबरच दिले जात व ते घेऊन पेशन्ट आपला नंबर येण्याची वाट पहात असत. एकामागोमाग पेशन्ट जसे आत जात तसे तपासून घेऊन बाहेर कंपाउंडर कडून औषध घेऊन जात. या डॉक्टरांना मी कधी खुर्चीत बसलेले पाहीलेच नाही. उभ्याउभ्या पेशन्टला बेडवर झोपवून ते तपासत. बोलणे अत्यन्त कमी. कामापुरतेच असे. स्वभावाने शांत अन प्रसन्न अश्या व्यक्तिमत्वाच्या या मेहता डॉक्टरांचा हातगुण एकदम चांगला होता. मात्र नंतर नंतर त्यांचे बहुतेक पेशन्ट याच भागातील असल्यामुळे ते नंबर घेऊन परत घरी जात व आरामात येत. मात्र एखादा बराच वेळ बसून त्याची आत जायची वेळ आली की अचानक दोघे तिघे आपले आधीचे नंबर आहेत म्हणून आत शिरत. नंतर मग प्रामाणिकपणे बसलेले पेशन्ट यांच्या तक्रारी वाढू लागल्या तेव्हां डॉक्टरांनी नंबर देण्याची प्रथा बंद करून त्यांना नंबराप्रमाणे बाहेर बसावयास सांगितले, तेव्हां मात्र सर्वजण रांगेने बसू लागले.
दरम्यानच्या काळात माझी आणखी एका डॉक्टरांशी माझे संबंध आले, ते होते प्रार्थना समाज मधील डॉ. सुखटणकर. माणूस मोठा हुशार, जणू संजीवनी प्राप्त झालेला. पेशण्टची तपासणी करण्यापूर्वी ते त्याला समोर बसवून पूर्ण न्याहाळत असत. त्याच्या प्रकृतीचा अंदाज घेत. माझ्या पत्नीच्या माहेरचे ते फॅमीली डॉक्टर. त्यांचे बोलणे एकदम खणखणीत. माझ्या खोकल्यातील ॲलर्जी ते संपूर्ण काढून टाकणार होते. पण स्वभाव मात्र हेकेखोर होते. त्यांनी सांगितलेल्या केमिस्ट कडून औषधे घेणे, त्यांनी सांगितलेल्या पॅथाॅलाॅजीस्ट कडूनच तपासणी करून घेणे हा त्यांचा आग्रह असे. ते त्यांच्या विश्वासातील असायचे. अन पुन्हां सांगितल्यावेळी जर का पेशन्ट त्यावेळी आला नाही तर ते त्याच्याकडे ढुंकूनही पहात नसत. त्यांचा नेहमीच पेहेरावही ठरलेला असे. शुभ्र सिल्कचा शर्ट, सास्कीनची सफेद प्यांट अन दिसणे रुबाबदार अन थोडेसे दबाव टाकणारे असे व्यक्तीमत्व. पण पुढे मी बदली होवून नागपूरला गेलो, व तेथेच त्यांचे निधन झाल्याची बातमी मला कळाली.
त्यानंतर आणि एक डॉक्टर आमचे कौटुंबीक डॉक्टर बनले. ते होते डॉ. श्रीकांत लवंदे. हेही त्यांच्या चांगल्या हातगुणामुळे अतीशय प्रसिध्द होते. दवाखान्यात शिरताच सर्वांकडे हास्यमुद्रेने पहात ते आत जात. त्यांच्याकडे गेल्यावर आम्हांला कधी डॉक्टरांकडे आलो आहे असे वाटतच नसे. एवढे घरगुती संबंध झाले होते त्यांच्याशी. एखाद्या घरातील व्यक्तीची काळजी घ्यावी अश्या प्रेमळपणे त्यांचे वागणे असे. मेडीकल क्षेत्रांत नवीन काय घडते आहे, डॉक्टरांच्या सेमीनार मध्ये नवीन काय संशोधन झाले यावरही ते आम्हांला ज्ञान देत असत. कधीतरी पेशन्ट म्हणून नव्हे, तर गप्पा मारण्यासाठी या म्हणून ते नेहमी सांगत. सांताक्रूझहुन मी व्ही.टी.ला जे.जे.च्या बंगल्यात रहायला जाईपर्यंत आमचे संबंध होते. व आता परत आल्यावर ते तसेच पूर्वीप्रमाणे बंध जुळले गेले.
१ मे, १९८० साली मी दिल्ली येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ' महाराष्ट्रातील पारंपारीक कला' या विषयावर ललीत कला दालनामध्ये प्रदर्शन लावण्यासाठी गेलो होतो. तेथून एक दिवस आम्ही आग्र्याला ताज महाल पाहण्यासाठी पाहण्यासाठी बसने गेलो. त्या प्रवासात धुळीने मला मोठ्या प्रमाणावर सर्दी खोकला झाला व माझा आवाज पूर्ण बसला की त्यामुळे मला बोलताच येईना. परत आल्यावर इ एन टी स्पेशॅलिस्ट, इतर डॉक्टर यांच्या कडून तपासणी करून घेतली. पण काहीच गुण येईना. तेव्हां माझ्या पत्नीने तिचे एक नातेवाईक दादरचे डॉ. सुधीर आडारकर यांच्या कडे नेले. त्यांनी पूर्ण तपासणी करून मला एक कोर्स दिला. आणि त्यानी माझी सर्दी पूर्ण बरी केली. आणि त्यानंतर डाॅ. आडारकर हेच आमचे फॅमीली डाॅक्टर बनले ते आता कायमचेच! आता त्यांना आम्हा सर्वांचीच प्रकृती माहीती झाली आहे. कित्येकदा लहानसहान दुखण्या खुपण्यासाठी आम्ही फोनवरच त्यांना सांगून त्यांच्या कडून औषधे विचारून घेतो. कित्येकदा त्यांच्या घरीही जातो. एक हक्काचे फॅमीली डाॅक्टर हेच नाते त्यांच्याशी जडले आहे. आज खऱ्या अर्थाने पूर्वीच्या प्रथेप्रमाणे ते आमचे फॅमीली डॉक्टर झाले आहेत. नुसते फॅमीलीच नव्हे, तर घरातील एक व्यक्तीच झाले आहेत. त्यांच्या दवाखान्यात देखील पेशण्टची अफाट गर्दी असते. ते येण्यापूर्वीच त्यांचा दवाखाना पेशन्टनी तुडूंब भरलेला असतो. दुपारी अडीच-तीन पर्यंत सर्व पेशन्ट तपासून गेले की मगच त्यांची सुटका होते. परत संध्याकाळी हाच प्रकार असतो. मात्र आम्हांला ते कधीच ताटकळत ठेवीत नाहीत. या
डॉ. सुधीर आडारकर यांची एक खासीयत आहे ती म्हणजे आपल्याला काय झाले आहे, त्यावर केवळ औषध देऊन थांबत नाहीत, तर त्याचे आराखडे काढून काय प्रकार झाला आहे, कशामुळे झाला आहे याचे संपूर्ण विवेचन करतात. व आपण औषधासोबतच मेडीकल ज्ञान देखील घेऊन बाहेर पडतो. शिवाय आजच्या या महागड्या जीवनात ज्या कंपनीची औषधे कमी किमतीची आहेत, तीच देण्यावर त्यांचा भर असतो.
हे झाले आमचे सर्व फॅमीली डॉक्टर! ज्यांना आम्ही हक्काने सांगू शकत होतो. तेही आम्हाकडे एक कौटुंबीक नात्यानेच पहात. दोघांमध्ये निर्माण झालेला एक जिव्हाळा हाच आपले रोग बरे करणारे बंध असत. कधीही न तुटणारे, न गुंतणारे! आता आला जमाना स्पेशालिस्टचा! पूर्वी आपल्या डोक्यापासून पायापर्यंत काहीही झाले तरी आपले डॉक्टर पहात असत. पण आता आपल्या प्रत्येक अवयवाला त्या त्या भागाचा स्पेशालीस्ट तपासतो. आधी या स्पेशालीस्ट कडे पोचण्यासाठी आपल्याला त्यांची वेळ ( अपॉइंटमेंट ) घ्यावी लागते. आणि तीही त्या स्पेशालिस्टच्या मोठेपणावर अवलंबून असते ती किती दिवसांची मिळेल. एकदा मी ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. चौबळ यांची वेळ घेतली होती, ती होती सायंकाळी सहा वाजताची. मी साडेपाच वाजतां पत्नीला घेऊन त्यांच्या कन्सल्टींग रूमवर हजर झालो. त्यांच्या ॲनेस्थेशीस्टच्या ओळखीने वेळ घेतल्यामुळे एक आठवड्यानंतरची मिळाली, अन्यथा दोन महीन्यानंतरची होती. मी त्यांच्या कन्सल्टिंग रूम मध्ये पोचलो तो काय? तेथे संपूर्ण हॉल भरला होता. एकेकजण आत जात होता. त्याला साधारण अर्धा तास तरी बाहेर येण्यासाठी लागत होता. त्यातच मध्ये मध्ये कांही डॉक्टर सुद्धा आपले पेशण्ट घेऊन येत होते. कांही जण चक्क झोप काढत होते. शेवटी रात्री साडेदहाला माझा नंबर आला. एव्हढी प्रचंड गर्दी होती तेथे. याला कारण म्हणजे डॉ. चौबळांची कर्तबगारी, त्यावरील लोकांचा विश्वास आणि त्यांनी अगदी लोळागोळा झालेल्या रुग्णांना दिलेले नवजीवन. त्यांनी कधीही पैशासाठी काम केले नाही. त्यांची फी देखील माफक असे. पण त्यांचे एक म्हणणे असे की तुम्हांला जर का कोणत्याही डॉक्टरकडे जाऊन तुम्ही बरे होत असाल, तर अशा सामान्य दुखण्यासाठी माझ्याकडे येऊ नका. तो वेळ मी खरी गरज असलेल्या रुग्णांना देऊ शकतो.
दुसरे एक आदरणीय व्यक्तीमत्व मी पाहीले ते सुप्रसीध्द बालरोग तज्ञ डॉ. रमेश संझगिरी. यांचीही वेळ मिळवणे हे देखील एक दिव्यच होते. पण मुलांना निरोगी आणि गुटगुटीत ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता. मुलं चालू लागली की त्यांना पायात कोणते बूट घालावेत हें देखील ते सांगत. मुलांच्या आजाराचे त्यांना चांगलेच निदान होते. नाट्य क्षेत्रात त्यांची चांगलीच उठबस होती. अनेक कलावंतांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. तसेच आमचे वेंगसरकर बंधू. एक न्यूरो सर्जन तर त्यांचे बंधू ऑर्थोपेडिक सर्जन. दोघेही आपापल्या क्षेत्रांत निष्णात असे. अर्थात यांच्याही अपॉइंटमेंट लगेच मिळू शकत नव्हत्या. पण एकदा का त्यांच्याकडे गेले की त्यांच्या बोलण्यानेच आपले दुखणे कमी होई. एकदा माझ्या मित्राचा हात फ्रॅक्चर झाला होता. आणि तेथील एका डॉक्टरने जो जुळवला होता तो बरोबर झाला नव्हता. दुखणे वाढतच होते. तेव्हां त्याला कोणीतरी सांगीतले की डॉ.वेंसरकारांना दाखव म्हणून. तो माझ्याकडे आला व त्याची अपॉइंटमेंट मिळवण्याची विनंती केली. मी त्याप्रमाणे ती घेतली व त्याला घेऊन हिंदू कॉलनीत त्यांच्या कन्सल्टिंग रूम मध्ये गेलो. लगेच त्यांनी आत बोलावीले. मित्राचे पाहून झाल्यावर मग माझ्याशी ते बोलू लागले. रुडयार्ड किपलींग जन्मलेल्या बंगल्यात जेथे मी रहात होतो त्याविषयी आमच्या गप्पा झाल्या. नंतर स्कूल ऑफ आर्टच्या जुन्या चित्रकाराविषयी बोलणे झाले. मलाच थोडे अवघडल्यासारखे होऊन मी त्यांना म्हणालो, बाहेर पेशन्ट वाट पहाताहेत तेंव्हा मी निघतो. तेव्हां डॉक्टर म्हणाले, बसाहो ! पेशण्टशी आम्ही रोजच बोलतो. तुमच्यासारखे क्वचित येतात. आम्हांला कला विषयावर बोलता-ऐकता येते. असे डॉक्टर विरळाच!
सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी हे केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर नांव असलेले डॉक्टरी व्यक्तिमत्व. त्यांचीही वेळ लवकर मिळणे ही सुद्धा भाग्याची गोष्ट. पार गुजरातपासून त्यांच्याकडे रुग्णाची रांक लागलेली असते. शस्त्रक्रियेतील त्यांचा हातखंडा तर बघायलाच नको. केवळ नाडी पाहूनच ते प्रथम परीक्षा करतात. दुबईच्या एका शेखच्या मुलाचा नवीन गाडी चालवीत असता अपघात झाला होता, तेव्हां तातडीने त्या शेखनी विमान पाठवून त्यांना नेले होते. शरीरातील बहुतेक प्रत्येक हाड तुटले होते. त्यांनी लंडनहून त्यांचा ऍनेस्थेशिस्ट बोलावून त्याची सर्जरी केली. व संपूर्णपणे त्याला चालता फिरता केला. त्या शेखने डॉ. रामाणींना खास असा रत्नजडीत खंजीर भेट म्हणून दिला, जो केवळ त्यांच्या खास कुटुंबीयांनाच दिला जातो. असे हे डॉ. रामाणी यांचे नांव मला मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.स्नेहलता देशमुख यांनी सुचविले. व त्याप्रमाणे मी त्यांना भेटलो. मी व माझी पत्नी आम्हां दोघांनाही पाठीच्या व पायाच्या दुखण्याची समस्या होती. त्यावेळी त्यांनी मला कांही व्यायाम, व औषधे देऊन बरे केले व माझ्या पत्नीला मात्र ऑपरेशनची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. व त्याप्रमाणे लीलावती मध्ये त्यांनी सर्व व्यवस्था करून तिच्यावर शस्त्रक्रीया केली. त्यांनी आम्हांला स्वतः या विषयावर लिहीलेली पुस्तके पण दिली. त्यांचे ‘ताठ कणा’ हे पुस्तक आपले शरीर तंदुरूस्त ठेवण्यास खूप मदत करते. आणि आमच्या कौटुंबीक डॉक्टरांच्या यादीत आणखी एक आदरणीय डॉक्टरांचे नांव पडले. कित्येक बरे झालेले रुग्ण डॉ.रामाणी यांनी आपले ऑपरेशन केले आहे हे अभिमानाने सांगतात. आजही डॉ. रामाणी शरीराने एकदम फिट आहेत. रोज ते कांही किलोमीटर जाॅगींग करतात. मॅरॅथोन स्पर्धा मधून भाग घेतात. देश परदेशात वैधकीय चर्चासत्रे आयोजीत करतात.
कांही देश तर त्यांनी दत्तक घेतले आहेत. वर्षातून एकदा ते आपली टीम घेवून तेथे जातात व विनामूल्य तेथील रूगणांवर शस्त्रक्रीया करतात.
असाच एक सुखद अनुभव घेतला तो डॉक्टर मिहीर बापट यांचा. सुप्रसीध्द हृदयरोग तद्न्य डॉ. रवी बापट ह्यांचे हे चिरंजीव. एकदम प्रसन्न व्यक्तीमत्व लाभलेले. त्यावेळी ते कोकिळाबेन अंबानी इस्पीतळात काम करीत होते. ऑर्थोपेडीक विभागाचे संचालक होते, व त्यांचा अनूभव घेतलेले अनेक रुग्ण मला भेटले. माझे स्पाईनचे ऑपरेशन त्यांनी केले. त्यापूर्वी रूग्णाला
प्रत्येक गोष्ट समजावून देण्यांत त्यांचा हातखंडा आहे. ते कितीही कामात व्यस्त असले तरी कांही विचारण्यासाठी त्यांना मेसेज केला तर मोकळे झाल्यावर त्याला उत्तर देणे, हा त्यांचा प्रामाणीकपणा असायचा. रात्री जरी फोन केल्यास ते तात्काळ घेत. आता ते नानावटी मध्ये त्या विभागाचे प्रमुख आहेत. रोज त्यांची ऑपरेशन चालूच असतात. त्यावेळी त्यांच्याकडे त्यांचा फोन नसतो. पण त्यांना केलेल्या मेसेजीसना रोज रात्री ते स्वतः उत्तरे देत असतात. त्यांचे वैद्यकीय ज्ञान आणि त्यांच्यातील माणुसकीचे वृन्दावन या दोन्ही गोष्टीमुळे त्यांचे पेशंट बरे होऊन गेल्यावर त्यांच्यावर जो शुभेच्छा कार्ड्सचा वर्षाव होतो, त्यावरून ध्यानात येईल की आपल्या कामामुळे किती हृदयं या माणसाने जोडली आहेत व जपली आहेत.
हे झाले आमचे ऋणानुबंध जुळलेले, नात्यांनी बांधलेले आमचे फॅमीली वा हक्काचे डॉक्टर. याशिवायही असे काही डॉक्टर देखील भेटलेत की त्यांची एकदा भेट घेतल्यानंतर मी पुन्हां त्यांच्याकडे वळलो नाही. बापटांकडे जाण्यापूर्वी मी एका अश्याच निष्णात स्पेशालीस्टकडे पोचलो होतो. तेथे आलेला अनुभव मला फारसा रुचला नव्हता. एकतर त्यांचे बोलणे कोरडे असल्याचे जाणवले. दुसऱ्या वेळी मला जेव्हां आत बोलावले, त्यावेळी ते फोनवर कांही मेसेजीस करीत होते. आम्ही समोर उभे होतो. नंतर मीच स्वतः बसलो. थोड्या वेळाने त्यांचे बोलणे झाले. तेही मोजकेच. जसे तिऱ्हाईताशी बोलतो तसे. तेव्हांच मी ठरवले, आता पुढे येथे येणे नाही. दुसरा एक अनुभव असाच होता. आमच्या फॅमीली डॉक्टरनी एका न्यूरो सर्जनकडे पाठवीले होते. जेव्हां त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्या बोलण्यावरून मला सतत जाणवत होते, की एखादी व्यक्ती कोणाकडून आपले एखादे काम करून घेण्यासाठी त्याच्याकडे गेल्यावर जसे त्या व्यक्तीचे वर्तन असेल तसे वाटले. बोलण्यात ना धीर देणारा गोडवा होता, ना डॉक्टरांकडे असलेला प्रेमाचा ओलावा! मला तपासून त्यांनी बॉंबे हॉस्पीटल मधून एक टेस्ट करून घेण्यासाठी एक छोटीशी नोट दिली अन जाताना सांगितले, बाहेर असलेल्या माझ्या माणसाकडे माझ्या फीचे पैसे देऊन जा! त्या डॉक्टरांशीही ती माझी होती पहीली व शेवटची भेट ठरली.
तर असे हे डॉक्टर! आपल्या आयुष्यात निरनिराळ्या वळणावर भेटत गेलेले. एकदा आयुष्यात आले की आपल्याच कुटुंबाचा एक अविभाज्य भाग ठरलेले. ज्यांच्या हातात आमच्या दोन ते तीन पिढ्या वाढल्या. निरोगी राहील्या. आणि आमच्या विश्वासाला पात्र ठरल्या.
-प्रा. मं.गो. राजाध्यक्ष







Comments
Post a Comment