विवाह एक समारंभ : कालचा आणि आजचा




विवाह समारंभ हा अगदी बालपणापासून एक औत्सुक्याचा, आनंदाचा, कुतूहलाचा विषय असे. त्या बालवयात आनंद असे तो नवीन कपड्यांचा. अर्थात आतासारखे ते मॉल मधून आणलेले तयार ब्रॅंडेड नसत. किंवा मोठी माणसे आताप्रमाणे डिझाइनर कुडते सलवारी घातलेले नसत. मात्र मुलाबाळाना, स्त्रीपुरुषांना नवीन कपड्यांचे पेहराव मात्र करावे लागत. प्रत्येकाच्या डोक्यावर कोणत्याही लग्नाला जाताना टोपी मात्र अवश्य लागे. तो एक शुभ संकेत होता. मुलांना क्वचितच कधी फुल प्यांट मिळत असे एरवी अर्ध्या चड्डीवरच साधारण ११ वी पर्यंत घालावी लागत असे. अर्थात हा जो काळ मी सांगतो आहे तो ५० व्या शतकातील आहे. गावाकडे शेतकरी लोकांकडे लग्ने व्हायची ती डोक्यावर भले मोठे भेंडाचे बनवलेले बाशींग असायचे. हातात एक कट्यार घेऊन असलेल्या नवऱ्याच्या सोबत करा आणिदिवा धरलेली करवली असे. नंतर सुरु होत असे ती अखेरची प्रथा. प्रत्येक माणसाने दिलेला आहेर जोराने ओरडून सर्वांना सांगण्यात येत असे. नंतर वरातीच्या वेळी अहेरात मिळालेली पिंपे, भांडी हे देखील डोक्यावरून  वरातीत नेण्यात येई. या वरातीमधील एक आवश्यक गोष्टी असते ती म्हणजे वरातीला आणलेला बॅंड! बॅंड लावून वरात काढणे  हा लग्नातील एक मोठेपणा असायचा. अश्या काही बॅंड कंपन्या असायच्या. त्यांच्या वाद्यावर हिंदी सिनेमातील गाणी वाजवली जात. यांचा रंगी बेरंगी गणवेश असे सैन्यातील ब्यांडप्रमाणे असे. यातील प्रत्येकजण आपापले वाद्य वाजवीण्यात निपुण असे. त्यांचा मूख्य असे तो मोठा कर्णा असलेले चकचकीत  पितळी वाद्य वाजवीत पुढें असायचा, त्याच्या कर्ण्याच्या तोंडावर एका गोलाकृती पत्र्यावर ' भारत ब्रास बॅंड' अश्या प्रकारची त्यांच्या कंपनीची नांवे असत. लग्नाच्या मोसमात यांना खूप मागणी असे. एरवी हे आपापल्या अड्ड्यावर नवीन नवीन गाण्यांचा सराव करण्यात वेळ घालवीत असत. ह्या वराती रात्री असत तेंव्हा त्यांच्या पुढे डोक्यावर ग्यासबत्त्या घेतलेले पुरुष-स्त्रिया चालत असत. या खास ग्यासबत्त्या स्टॅन्ड वर उलट्या बसवलेल्या असत. व यादेखील भाड्याने मिळण्याची सोय असे.

गावांत किंवा शहरात लग्ने होत असत त्या वेळी घरासमोर मांडव घालून त्यात ही लग्ने होत असत. बाहेर गावच्या पाहुण्यांना  आमंत्रणच असे असायचे की आमंत्रणासोबतच खास पत्र जायचे त्यात पाहुण्यांना लिहिलेले असायचे की सवड काढून चांगले चार आठ दिवस येथे रहायला या. व त्यांची सोयही केली जात असे. आलेली मंडळी त्या काळात लग्नघरीच उतरीत असत. हॉटेलमध्ये रहाणे हा प्रकारचं अस्तीत्वात नव्हता. लग्नघरातील मांडवाच्या दोन्ही कोपऱ्यावर लाऊड स्पीकर लावून त्यावर सिनेमाची गाणी वाजवली असत. त्याचसोबत सनई चौघड्याचे मंगल स्वर कानावर पडून वातावरण निर्मिती होत असे. बसायला खुर्च्यांच्या अभावच असे, कारण जवळजवळ संपूर्ण गावालाच आमंत्रण असल्याने अक्षता टाकण्यास जातीने सर्वजण हजर असत. विवाह ठिकाणी येतानाच हातात छोटासा फुलांचा तुरा देण्यासाठी दरवाजावर मुले उभी असत. महीलांना गजरे देणाऱ्या सुवासीनी हातात गजऱ्यांचे तबक घेऊन आपलें काम चोख बजावीत असत. एकजण अत्तरदाणीतून कांडी काढून अत्तर हातावर लावे, तर दुसरा हातात चांदीची गुलाबदाणी घेऊन येणाऱ्यावर सुगंध पाणी शिंपीत असे. बहूतेक ठिकाणी बसायला भली मोठी जाजमे असत. लग्न लागल्यानंतर नेहमीप्रमाणे अहेराचा कार्यक्रम. तेव्हां आतासारखी भपकेबाज बसायची व्यवस्था नसायची. पण नीटनेटकी आरास केलेल्या खुर्च्यांवर वधुवर गळ्यात हार घालून उभे असत. त्यांच्या दोहोबाजूला म्हणजे वराच्या बाजूला वराचा आणि वधूच्या बाजूला वधूचा असे दोन प्रतिनिधी खुर्च्यांवर बसून बाजूला एकेक ब्याग व हातात वही पेन घेऊन आलेल्या आहेराची नोंद करण्यास बसलेले असत. व येणारी पाकीटे तसेच इतर भेट वस्तू जवळच्या ब्यागेत भरत असत. या भेटवस्तू मध्ये बहुदा टेबल लॅंप, स्त्रियांची वेणीफणी करणारी पेटूल, फोटो अल्बम, स्टीलची भांडी, पाण्याचे कावळे, फ्लावर पॉट्स अशीच बहुदा असत. कित्येकदा एकच  वस्तू देणारे दोघे तीघे निघत. मग या गोष्टी सांभाळून ठेवून त्यांची रवानगी इतर कोणाच्या तरी लग्नाच्या वेळी त्याच्या घरची सजावट होण्यास उपयोगी होत असे. मात्र स्टीलच्या भांडयांवर नांव घालून दिले असल्याने ती मात्र आपल्या दिल्या सासरी सुखाने नांदत. या विवाह सोहळ्याची किर्लोस्कर मासिकाचे संपादक-चित्रकार शं.वा.किर्लोस्कर यांनी त्यावेळी 'किर्लोस्कर' मध्ये 'लग्नमंडपातील विनोद यावर अनेक व्यंगचित्रे काढली होती. त्यापैकी मी कांही देत आहे

या नंतर असे तो भोजन समारंभ ! त्यावेळी आतासारखे बुफे प्रकार नव्हते. जेवणावळी खाली जमीनीवरच असायच्या. जेवणांत वांग्याचा अथवा मसालेभात हा हमखास असायचाच! आणि गोड पदार्थ म्हणजे जिलेबी, साखरभात हे ठरलेले. मिरचीचे गोड पंचामृत आणि महत्वाचे म्हणजे यजमानानी जातीने हजर राहून केलेला प्रेमळ आणि मनस्वी आग्रह. त्यामुळे पाहुण्यांचे द्रोण -पत्रावळीवरील जेवण कसे भरपेट होत असे. तृप्त पणे ढेकर देत नंतर जमत असे ती विड्याच्या पानांची बैठक. समवयस्क लोक एकत्र जमून आपल्या चंच्या उघडून सुपारी अडकित्त्याखाली कातरु लागत. आणि त्यांच्या तंबाखूची गोळी गालफडात शिरे. अश्या पाहुण्यांना बसण्यासाठी गाद्या गिरद्याच्या बैठका लोड लावून तयार केलेल्या असत. या समारंभातून मुलांना बरेच सवंगडी मिळत. त्यामुळे त्यांचा धुडघूस सर्वत्रच सुरु असे. त्यांना दटावणारे कोणीच नसे. मात्र वडील माणसांच्या धाकात वाढलेली ती मुले प्रसंग पाहूनच वागत. वयात आलेले तरुण रंगीबिरंगी फुलपाखरांच्या शोधात असत, तर वयस्कांना आपली मित्र मंडळी मिळण्यात फारशी अडचण पडत नसे. शिवाय कांही वधुपिते आपणाल्या गळाला कोणी भावी जावई लागतो का याकडे लक्ष पुरवीत असत. 

यानंतर आल्या टेबलावरील जेवणावळी. लांबलचक टेबले लावून त्यावर पांढरा कपडा अंथरून त्यावर ताटें मांडली जात. सर्वजण लग्न आटोपून जागा मिळवण्याच्या आशेने तिकडे धाव घेत असत. समोरासमोर मांडलेल्या त्या चारपांच रांगांमधून डाळीचे पातेले, चटण्या कोशिंबिरीचा चौफुला असे वेगवेगळ्या पदार्थांचे वाहक त्यामधून वाट काढत असत. ही सर्व कंत्राटदाराची माणसे असत. त्यामुळे कोणाला कधी एक तर कोणाच्या पानांत अर्धेच भजे पडत असे. त्यातही त्यांना एखादा खट भेटतच असे, जो परत बोलावून आपले पान भरुन घेई.आणि आपल्या प्रत्येकाच्या मागे एकेकजण आपण उठण्याचा वाट पहात उभे असे. त्यामुळे आणखीनच विचित्र वाटत असे. मग जो जसा उठेल त्याच्या खरकट्या ताटासमोर दुसरा आपली वर्णी लावे. सर्व जण एकदाचे उठले, की मग त्यावरील टेबल क्लॉथ बदलला जाई व दुसरी जेवणावळ सुरु होई.

नंतर दिवस आले ते संध्याकाळच्या रिसेप्शनचे. याचा कालावधी असे तो सायंकाळी ७ ते १० पर्यंत. पत्रीकाही दोन छापल्या जात. ज्यांना लग्नाला व रिसेप्शनला बोलावयाचे असेल, त्यांना दोन्ही पत्रीका जात. लग्नाला मात्र आप्त,अगदी जवळचे अश्यानाच  आमंत्रण असे. त्यावेळी जेवणावळ असायची. सायंकाळी रिसेप्शनला केवळ आईसक्रिम किंवा कुल्फी आणि थंडपेय असायचे. आहेराची रक्कम साधारणपणे पाच रुपये ही ठरलेली. हे साठ -सत्तरच्या दशकातील मी सांगतो आहे. त्याकाळात 'पांच रुपया भी बडी काम की चीज होती थी बाबू'. जरा जवळचे असतील तर वीस ते पंचवीस रुपये. आणि खासच कोणी असेल तर रक्कम शंभरापर्यंत पोचे. पण आहेर मात्र प्रत्येक लग्नात असेच! त्यामुळे लग्नाचा थोडा भार हलका होत असे.

त्यानंतर मात्र आम्ही पाहीले ते एखाद्या इव्हेन्ट प्रमाणे झालेले विवाह समारंभ. रिसेप्शन मध्ये बुफे अवतरला. दिमाखदार स्टेज बनविली जाऊ लागली. त्याची सजावट करणारी खास माणसे तयार झाली. सजावटीचे अल्बम पाहून त्यातून निवड होऊ लागली. वधूवरांच्या छ्यायाचित्रांचे खास असे प्रोफेशनल अल्बम बनू लागले. त्यामध्ये 'प्री वेंडींग फोटोग्राफी' करण्यात येते. लग्नाच्या आमंत्रण पत्रिकाही अतीशय महागड्या आणि खास अश्या डिझाईनच्या बनू लागल्या. अगदी सांभाळून ठेवाव्या अश्या. त्यावरूनच समारंभाची कल्पना येत असते. ज्यावेळी आपण रिसेप्शनच्या हॉल वर पोहोचतो तेथील झगमगाटाने आपलें डोळेच दिपतात. सर्वत्र शरारा, भरजरी साड्या, वेस्टर्न गाऊन अश्या पेहरावातील स्त्रिया, व शेरवानी व चुडीदार सलवार, स्टोल, जॅकेट, बंडी सूट अश्या पेहराव्यात पुरुष वावरत असतात . वेळेवर आपण जाऊन स्थानापन्न होतो पण स्टेज रिकामीच असते. कारण वधू गेलेली असते 'ब्रायडल मेकअप ' करायला . हल्ली तर अगदी साडी नेसविण्यापर्यंत सर्वच तेथूनच करून मिळते. अर्ध्या पाऊण तासांनी वधुवर स्टेजवर अवतीर्ण झाल्या झाल्या फोटोग्राफरचा तांडा त्यांचा ताबा घेऊन त्यांचे फोटोसेशन सुरु करतात. मग अगदी मेंदी लावलेल्या हातापासून ते वधूवरांच्या मिठीपर्यंत सर्व फोटोग्राफी होते. कारण नंतर अल्बम साठी हातातील मेंदीत वराचे डोळे, वरच्या बुब्बुळांत दिसणारी वधू असे क्रिएटिव्ह फोटो तयार करावे लागतात. यामध्ये एखादा तास जातो व आपण वधू वराना भेटण्यास स्टेजवर जायला लागतो तो तेथे आधीच भली मोठी रांग लागलेली असते. प्रत्येक कुटुंब वर गेले की त्यांचे फोटो, व्हिडीओ यामध्ये वेळ जाता जाता आपण एकदाचे वधू वराना आशीर्वाद देण्यास पोचतो एकदाचे! मग आपण त्यांना म्हणायचे, ‘एकदा आमच्याकडे दोघेही या!’व त्यांनीही ‘जेवल्याशिवाय जायचे नाही’ हे सांगणे आटोपले की आमची स्वारी निघते बुफेच्या ठिकाणी. बुफेच्या ठिकाणी इतके पदार्थ असतात की अगदी भेळपुरी चाट पासून उंदियो, तवा भाजी, व्हेज बिर्याणी, पर्यंत. त्यातील दोनतीन पदार्थ घेतले तरी हातातील प्लेट भरून जाते. पण येथे बसण्याचीही सोय असते त्यामुळे कोणी फिरत फिरत तर वयस्क माणसे बसून जेवण घेतात. आणि आतातर हे विवाह दोन दोन,तीन तीन दिवस वेगवेगळे विधी करून चाललेले असतात.

हल्ली अहेर मात्र बहुतेक कोण स्वीकारत नाहीत. पण काही ठिकाणी वधूकडून घेतला जातो तर वराकडील घेत नाहीत. माझ्या अगदी जवळच्या मित्राच्या मुलीचे लग्न होते. त्यावेळी त्यांच्याकडून आहेर घेण्यात येणार होता म्हणून मित्रालाही घ्यावा लागला . पण त्याने आपल्या पत्रिका वाटल्या त्यावर १० ग्र्यामचे एकेक चांदीचे नाणे चिटकवून दिले होते. पण आहेर घेणारेही बरेच मित्र आढळून आले आहेत. पण आताचे हे फाईव्ह स्टार समारंभ होतात मोठ्या भरजरी थाटात. आपण हजेरी लावतो तीही बऱ्याच वेळा औपचारीक पद्धतीने. मग मनात विचार येतो खरोखरीच आवश्यकता आहे का एवढा प्रचंड प्रमाणात खर्च करून हे दिमाखदार पद्धतीत साजरे होणारे समारंभ करणे? नाहीतर तेच पैसे नवीन जोडप्याला त्यांच्या नवीन संसाराला मदत म्हणून दिले तर !


-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष

( छायाचित्रे सौजन्य : सोल टच व शं.वा. किर्लोस्कर)



Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :