सूर सम्राट रफी साहेब : अनकहे अनसूने
मला लहानपणी जेव्हां गाणी आवडू लागली, समजू लागली, चित्रपट संगीताची गोडी वाटू लागली, तेव्हापासूनच महंमद रफी या नांवाने माझ्या मनावर गारुड घातलं. त्याकाळातील आमचे आवडीचे अन लोकप्रिय नायक होते, ते अशोक कुमार, दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर, शम्मी कपूर असे आणि रफीसाहेब त्यांना आपला आवाज जेव्हां देत असत तेव्हां चक्क त्यांचे आवाज घेऊनच त्यांच्या अंतरंगात शिरून गात. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा ताबा घेऊनच गीत सादर करीत. त्यामुळे त्यांचे गाणं कधीही रेडीओवर लागले, की ते गाणे चित्रपटांत कोणाच्या तोंडी आहे ते चटकन कळत असते. आणि गायकी सोबतच पार्श्व्गायन याचे रफी साहेब मानदंड ठरले.
डिसेम्बरमधील एका थन्डीच्या सर्द रात्री, १९२४ सालच्या २४ तारखेला पंजाबमधील कोटला सुलतान सिंघ गावांत एका मुलाने जन्म घेऊन मोठ्याने रडून आपण आल्याची जाणीव जगाला करून दिली. हे त्या घरातील सातवे अपत्य असून मुलामध्ये चौथे अपत्य होते. आणि या बालकाचे नामकरण झाले 'महंमद रफी!' जे नांव पुढे संपूर्ण जगावर अधीराज्य गाजवणारे ठरले. दोन वर्षांनी हे कुटुंब त्यावेळच्या अखंड भारतातील लाहोर येथे स्थलांतरीत झाले. त्यावेळी 'फिको''म्हणून ओळखला जाणारा हा मुलगा आपल्या मित्रांशी खेळून वेळ काढीत असे. वयाच्या ९ व्या वर्षी त्या गावांत कोठून तरी एक फकीर नवीन नवीन पंजाबी गाणी गात येत असे व तसाच गात जात असे. व त्यामागोमाग छोटा फिको हा पण जात असे व फकीर निघून गेल्यानंतर परत येऊन वडीलांच्या दुकानासमोर बसून ती गाणी स्वतः म्हणे. गावांतील लोकांनी तेव्हांच त्यांचे गायकीतील गुण ओळखले. व सर्वानांच खात्री पटली की हा मुलगा पुढे एक महान गायक होणार. व हें त्यांचे म्हणणे अक्षरश: खरे होते. पुढे जाऊन या बालकाने एकेक पाऊल पुढे टाकत गायन क्षेत्रांतील एकेक पद पादाक्रांत केले. व केवळ भारतातच नव्हे,तर साऱ्या जगांवर त्यांनी आपल्या पहाडी,मधाळ आणि धीरगंभीर आवाजाने राज्य केले.
रफींच्या मोठ्या बंधूचे मित्र हमीद यांनी रफींना गायनाचे शास्त्रोक्त शिक्षण मिळावे म्हणून त्या काळात बडे गुलाम अली खां, छोटे गुलाम अली खां, बरकत अली खां, अब्दूल वाहीद खां, पं. जीवनलाल मटू यांच्याकडून शागीर्दी करवून घेतली. व येथे रफींना रेडीओ वर गाण्याची संधी मिळाली. त्याच वेळी शामसुंदर यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून नुकतीच आपली कारकीर्द सुरु केली होती. व एक नवीन आवाजाच्या शोधात ते होते. पंजाबी फिल्म 'गुल बकावली' हा तो चित्रपट होता. रफींचा आवाज त्यांनी ऐकला व त्यांनी त्यांच्याकडून त्यांच्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीतील पहीलं गाणं त्यांनी गाऊन घेतलं. मग हमीदभाई त्यांना घेऊन निरनिराळ्या मैफिलींना घेऊन जाऊ लागले. व तेथे रफींना गाण्याची संधी मिळवून देऊ लागली. आणि एकदा सैगल साहेबांच्या उशीरा येण्यामुळे त्यांना त्यांच्या श्रोत्यांपुढे गाण्याची संधी मिळाली, ती त्यांचे भवीष्य बदलणारी ठरली. आणि त्यानंतर रफी साहेबांची या क्षेत्रांतील घोडदौड पुढे कधीच थांबू शकली नाही. हे सर्वोच्च पद प्राप्त करण्यासाठी रफीनी आयुष्यभर तपस्चर्या केली. आणि जोडीला होतें त्यांच्यावर असलेले ईश्वरी वरदान.
तो काळ होता चित्रपट नुकताच बोलु लागण्याचा. त्यामुळे चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेते घेतले जात असत तेहि गाणारे. नूरजहाँ, सुरैया, अमीरबाई कर्नाटकी ह्या आधीच प्रसिद्धीला आल्या होत्या. त्यांच्या सोबत देखील रफीनी गाणी गायली आहेत. आरंभीच्या काळात एकदा ते शमशाद बेगम यांच्या वडीलांसोबत तिच्या घरी गेले. वडीलानी मुलीला सांगीतले की मुलगा फिल्मी क्षेत्रांत गायनात नांव कमावण्याची इच्छा घेऊन आला आहे. त्याची कोणाकडे तरी शिफारस कर. शमशाद त्यावेळी मोठे नांव होते. तिने सांगितले, मी केवळ ओळखीने शिफारस करीत नाही. तर काही गाऊन दाखव, तेव्हां पाहू. आणि रफी साहेबानी सूर लावताच त्या एकदम स्तब्ध झाल्या. एवढ्या दैवी आवाज त्यानी ऐकला नव्हता. शिफारस तर करेनच. पण लवकरच तू माझ्यासोबत ड्युएट गाशील याची खात्री आहे. आणि तिचे हे बोल लवकरच खरे ठरले. एव्हांना नवीन पिढीतील हेमंत कुमार, तलत महमूद, मन्ना डे, मुकेश हे गायक देखील पुढे येत होते. येथेच रफी साहेबांची नौशाद यांच्याशी भेट झाली. व पुढे झाला एक शुद्ध अश्या भारतीय संगीताचा गीत प्रवास. पण सुमारे दोन वर्षे नौशाद यांनी त्यांना गाणे दिलेच नाही. त्यांच्या केवळ भेटीगाठीच होत असत. पुढे १९४४ साली त्यांनी रफींना पहीले गाणे 'पहीले आप' या चित्रपटांत दिले.आणि पुढे 'अनमोल घडी' या चित्रपटांपासून त्यांची मैफल रंगू लागली.
रफी साहेब हे जगातील खरे पाहीले तर पहीले पार्श्वगायक ठरले. कारण इतर गायक आपापल्या आवाजात गात असत. कोणाला तो आपसूकच जुळला जाई, तर कांही वेळा त्यातून गायकच जाणवे. सैगल,सुरैया,नूरजहाँ या गात असत. नंतर प्लेब्याकचा ट्रेंड आला. इतर गायक आपापल्या आवाजात गात असत. रफींनी नेमके हेच ओळखले. रेकॉर्डसाठी गाणे किंवा एखाद्या मुशायऱ्यासाठी गाणे असते, ते वेगळे असते. कारण तेथे गायक व ऐकणारा दोघेच असतात. पण प्लेब्याकमध्ये जरी गायक गात असला तरी तेथे तो पडद्यावरील नायक गात असल्याचे दाखवावे लागते. प्रत्येक नटाचा आवाज वेगळा असतो, त्याचा अंदाज वेगळा असतो, व्यक्तीमत्व वेगळे असते. आणि त्या सर्वांना जुळेल अश्या तऱ्हेच्या आवाजात गाणे सादर करणे हे अत्यंत कठीण आहे . पण ते लीलया साध्य करून रफीनी नवे मानदंड रोवले. त्यांची व्हॉइस कॉलीटी नटाप्रमाणे बदलू शकत होती. ज्यावर ते गाणे चित्रित केले आहे ते चित्रपट न पाहताही समजत असते. शिवाय जे गाण्याचे अंतरंग असते त्याचीही पूर्ण जाणीव ठेवून रफीसाहेब आपल्या गीतांना न्याय देत. म्हणूनच 'आजकी रात मेरे' हे गाणे जेव्हां दिलीपकुमार सुटाबुटात पियानो समोर बसून गातात, तेच दिलीपकुमार ग्रामीण ढंगात जेव्हां 'नैन लड गई है' म्हणतात त्यावेळी जाणवते की त्याचे संपूर्ण व्यक्तीमत्व त्या गाण्यातून उलगडते आहे. नौशाद साहेबांनी जेव्हां राग हामीर मध्ये 'मधुबनमे राधीका नाचे रे’ हे गीत बांधले ते दिलीपकुमार सतार छेडताना गात असतांना दाखवायचे होते. पण त्या गाण्यातून रफीनी जे भाव आणले त्याला पूर्ण न्याय देण्यासाठी दिलीपकुमार स्वतः सतार शिकले आणि त्यानंतरच या गाण्याचे चित्रीकरण झाले.
रफीसाहेब जेव्हां गात त्यावेळी तेव्हां ते त्या व्यक्तिमत्वाला व त्याच्या त्या वेळच्या भूमिकेला अनुसुरूनच गात. म्हणूनच त्यांनी देव आनंदला 'जिया हो जियहो जिया कुछ बोल दो' अशी साद घालताना ऐकविले तसेच ' दिन ढल जाये ' हे गीतही आर्त स्वरांत गायले. एकीकडे शंकर-जयकिशन सारख्या उडती गाणी देणाऱ्या संगीतकारासोबतच त्यांनी एस.डी. बर्मन सारख्या काळजातून स्वर काढणाऱ्या संगीतकारालाही न्याय दिला. लक्ष्मीकांत -प्यारेलाल आणि मदन मोहन या दोन टोकांच्या संगीतकारांसोबत त्यांनी तितक्याच जोषात गाणी गायली. ओ.पी. नैय्यर यांनी तर रफीमुळे आपण घडल्याची स्पष्ट कबूली दिली. त्यांच्या आवाजातून जसा रोमान्स उधळत होता तसेच त्यातील दर्दही जाणवत होता. नौशाद म्हणत, रफी सात सुरांच्या नाही तर साडेसात सुरांच्या सप्तकांत गातात. त्यांच्या आवाजाची रेंज इतकी होती की कितीही उंचीवर तो पोचत असे. त्यांच्या 'ओ दुनियाके रखवाले' या गाण्याच्या शेवटी ते जेव्हां 'रखवाले ...रखवाले ...रखवाले' म्हणतं ज्या उंचावर स्वर नेतात ते इतर कोणताही गायक करू शकत नाही' याचा प्रत्यय त्यांनी इतर नामवंत गायिकांसोबत गायलेल्या ड्युएट मध्ये येतो. याच ताकदीने त्यांनी ' नाचे मन मोरा' 'मन तरपत हरी दर्शन को आज' ‘ दुनिया ना भाये' ही गाणी गायली. आणि हे त्यांचे भाव नटाच्या अभिनयाचं अर्धे काम करीत असत.
रफी साहेबांची माइकवरची हुकूमत एकदम पक्की होती. माईकचा अंदाज चोख होता. गाण्यातील शब्द, त्यांचे उच्चार, त्यांची फेक, पूर्ण श्वासाने उच्चारलेले शब्द याची पूर्ण जाणीव त्यांना होती..आणि यामुळेच त्यांचा आत्मविश्वास पक्का होता. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, एकदा ताडदेवच्या फेमस मध्ये 'गुमनाम' चित्रपटातील गाण्याचे रेकॉर्डींग सुरु होते. त्यावेळी एका लहानशा खोलीत रेकॉर्डींग होत असे. मोठ्या काचेच्या खोलीत गायक आपापल्या माईकसमोर हेडफोन लावून उभे असत. बाहेर मोठ्या हॉल मध्ये सर्व वादक असत व संगीत दिग्दर्शक हाताच्या खुणांनी मार्गदर्शन करीत असे. यावेळी रफीसाहेबांसोबत शारदा ही गायीका होती. रफीसाहेबांचे कडवे झाल्यावर शारदाने गाणे सुरु केले. रफीनी तिला नजरेनेच सुंदर गातेस असे भाव दाखवले. बाजूच्या कोपऱ्यात पाण्याचे एक भांडे व पेला ठेवलेला होता. रफीनी पेल्यात पाणी घेऊन त्यातील एक घोट घेतला. बोट ओठावरून फिरवले व परत वळत असतांना त्यांना बाहेर रेकॉर्डींग पहाण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये त्यांचा एक परिचित होता. त्याने हात दाखवून सुंदर गात आहात अशी प्रतीक्रिया त्याने देताच रफी साहेबानी दोन्ही हात वर आकाशाच्या दिशेने उंचावले व 'ही सर्व त्याची कृपा आहे' असे. अश्या अर्थाने प्रतिक्रीया व्यक्त केली. परत माईक कडे गेले व आपले कडवं त्यांनी गायला सुरू केले. इतकी जबर क्षमता आणि आत्मविश्वास त्यांच्यापाशी होता.
रफीसाहेबांच्या गळ्यात सर्वच स्वर एका पंक्तीत विनम्रपणे उभे होते. कोणत्याही गायन प्रकारचे त्यांना वावडे नव्हते. ते शास्त्रीय संगीत जितक्या सुलभतेने गात, तितक्याच सहजतेने रॉक एन रोल, पॉप, गझल, कव्वाली अश्या सर्व प्रकारची गाणी ते गात.त्यात व्यक्तीविशेष हे देखील महत्वाचे असे. मग तो अभीनय सम्राट दिलीपकुमार असो, खांदे पाडून सरळ हात करून चालणारा राज कपूर असो, आपल्या दुडक्या चालीत धावणारा देव आनंद असो, अंगाला झटके देत उडती गाणी गाणारा शम्मी कपूर असो, नटखट पणे अल्लडपणा करणारा जॉनी वाकर असो किंवा विशिष्ट असे दाक्षिणात्य हेल काढणारा महमूद असो, सर्वच अभिनेत्यांच्या शैलीतून त्यांचा आवाज आपण ऐकत असू. अनेकांचे ते आवाज बनले. ते म्हणजे दिलीप कुमार, गुरुदत्त, शम्मी कपूर, देव आनंद, धर्मेंद्र, जॉनी वाकर, ओम प्रकाश, ऋषी कपूर इत्यादी.
रोजचा रियाझ त्यांनी कधीच चुकविला नाही. पहाटे लवकर उठून त्यांचा रियाझ सुरु असे. देशात परदेशात त्यांचे कार्यक्रम होत असत. त्याआधी ते संपूर्ण कार्यक्रमाची आंखणी करून आपल्या गाण्यांचा रियाझ करत. एकदा कलकत्त्याला त्यांचा कार्यक्रम होता. अभिनेता सचिन पिळगांवकर यांचे देखील कांही सादरीकरण त्यात होते. एका हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सचीनने आयोजकांना विचारले रफीसाहेब आले का? त्यावर आयोजक म्हणाले ते कालच आले. आपल्या कार्यक्रमाची व्यवस्था, तेथील सर्व साऊंड वगैरे तपासून पाहण्यासाठी ते एक दिवस आधीच येतात, अन याच हॉटेलमध्ये ते उतरले आहेत. सचीन लॉबीमधून जात असतांना हॉटेलच्या एका स्वीटचा दरवाजा त्याला काहीसा उघडा दिसला व आतून पेटीचे स्वर येताच त्याने आत डोकावले. पाहतो ते काय? आतमध्ये खाली कार्पेटवर पेटीसमोर रफीसाहेब काहीतरी हळू आवाजात गात बसलेले आहेत. त्यांनी सचीनला बसायला सांगितले. सचिनने जेव्हां त्यांना विचारले की आपण जेवला का? त्यावर ते हलक्या आवाजात म्हणाले थोडेफार खाल्ले आहे. मग संध्याकाळच्या शो पूर्वी विश्रांती घेण्यासाठी कांही झोप का काढत नाही, असे सचीनने विचारताच रफीसाहेब म्हणाले, 'शोच्या आधी कधीच झोपायचे नसते. आवाज भारी होतो, जड होतो.' हा एक नवीन धडा त्यादिवशी रफी साहेबानी शिकवला होता.
रफीसाहेब अत्यंत हळू आवाजात बोलत. इतके की, कित्येकदा त्यांच्या तोंडापाशी कान न्यावा लागे. जणू त्यांना त्यांच्या अनमोल अश्या गळ्यातील शब्दांचे महत्व माहीत होते. पण अत्यन्त मृदू, शांत स्वभावाचे रफीसाहेब जेव्हां माईकसमोर गायला येत असत, त्यावेळी मात्र त्यांचा हळू आवाज कोठल्याकोठे जाऊन ते एका नवीन विश्वात अवतरत होते. जणू त्यांच्या सर्वांगातून एक चैतन्य ओसंडत असायचे. आणि मग सुरु होत असे एकामागून एक अशी सुमधूर गीतांची मालिका. ते नुसते गायक नव्हते, तर एक उत्कृष्ठ अभिनेते देखील होते. याचा वापर ते आपले गाणे सादर करताना करीत असत. आपल्या गाण्यातील शृंगार, प्रेम, मिश्कीलता, खट्याळपणा, दर्द या सर्व भावना त्या आपल्या गाण्यासोबतच आपल्या अभिनयातून आविष्कृत करीत. नेहमी अश्या कार्यक्रमाला जातांना ते कांही रंगीत रेशमी रुमाल सोबत ठेवत. आणि अश्या ढंगाचे गाणे सादर करतांना ते रुमाल हाताला बांधून जेंव्हा त्यांचे ' सरपर टोपी लाल, हातमे रेशम का रुमाल' हे ढंगदार गाणे सुरु झाले की आपल्या रुमालाची साथ ते त्याला देत व गाण्याची रंगत वाढवीत. 'तेरी प्यारी प्यारी सुरत को' हे गाणे कार्यक्रमांत सादर करताना ते त्या अवखळपणात जात व त्यातील 'चश्मेबद्दूर' हा शब्द येताच ते त्यातील अवखळपणा दाखवण्यासाठी जोडीदाराचा हात पकडून त्यातील गोडी आणखीनच वाढवीत. एका दिवस त्यांच्या एका मित्राने त्यांना विचारले, आपण इतके कमी कां बोलता? त्यावर रफीसाहेब म्हणाले, बोलत राहीलो तर गाणार कोण?
रफीसाहेब एक कलाकार म्हणून अढळपदावर तर होतेच, पण माणूस म्हणा की देवदूत म्हणा, हे तर त्याहून मोठे होते. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहताच सर्वप्रथम दिसत ते त्यांचे हसणारे डोळे. अतिशय नम्र स्वभाव, कीर्तीच्या शिखरावर असूनही जमीनीवर नजर ठेवून असणारे, इतरांचा आदर करणारे, असे एकमेवाद्वितीय व्यक्तीमत्व होते. आयुष्यात त्यांनी इतक्यांना मदत केली आहे की एका हाताने दिलेले दान दुसऱ्याला माहीत नसावे. याचा प्रत्यय त्यांच्या घरच्यांनाही आला आहे. एक तब्बलजी होता, त्याने रफी,मन्नाडे, तलत महमूद, मुकेश अश्या गायकांच्या रेकॉर्डींगच्या वेळी कैकवेळा तबला वाजवला होता. पुढे त्याची हलाखीची वेळ आली. खायलाही मिळणे कठीण झाले होते. अनेकांकडे त्याने निरोप पाठविले. पण कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. ही गोष्ट रफीसाहेबांच्य कानावर गेली. ते त्याच्याकडे गेले. खोलीच्या कोपऱ्यातील टेबलावर अनेक गायकांना साथ केलेले तबले होते. रफीनी दोनशे रुपये काढून त्याच्या हातात ठेवले. व त्यानंतर दरमहा दोनशे रुपये त्याला मिळतील याची व्यवस्था त्यांनी केली. त्याकाळात दोनशे रुपये खूप मोठी रक्कम होती. कित्येकदा रात्री ते बाहेर जाऊन उशीरा परतत. कोणालाही कोठे जातो ते सांगत नसत. नंतर घरच्यांना बाहेरून समजले की कांही नवोदीत संगीतकारांना रफींचे दर परवडत नव्हते. पण दिवसभर इतर कामात व्यस्त असल्याने रफी त्यांना वेळ देऊ शकत नसत. पण त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने ते रात्री त्यांच्यासाठी गात व त्याचे ते पैसे अजीबात घेत नसत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने जेव्हां स्वतंत्र काम करायला सुरुवात केली तेव्हां त्यांनी पहिलेच गाणे रफीनी गायले. जेव्हां त्यांनी रफीसाहेबाना त्याचे पॆसे देवू केले, तेव्हां रफीनी त्याबद्दल एक पैसाही घेतला नाही. या दोन मुलांना त्यांनी वाद्यें वाजवतांना त्यांच्या रेकॉर्डींगच्या वेली कित्येकदा पाहीले हिते. त्यांना आशीर्वाद म्हणून त्यांनी त्यांच्याकडून काहीच मोबदला स्वीकारला नाही. रफीसाहेबानी बहुतेक सर्वच भाषांतून गाणी गायली आहेत. मराठी मधूनही श्रीकांत ठाकरे यानी त्यांच्याकडून गझल गाऊन घेतली.
रफीसाहेबांच्या दातृत्वाला तर तोडच नव्हती.त्यांच्याकडे कोणीही गेला तर रिकाम्या हाताने परतत नसे. तसेच त्यांचेही अनेकांवर लक्ष असे. अनेकांना मदतीचा हात ते देत असत. एकदा त्यांच्या व्हायोलियानीस्ट अमर हळदीपूर यांच्या श्रीकांत या मित्राला त्याचे पहीले गाणे रफीसाहेबानी गावे असे वाटत होते. त्यावेळी रफी १०,००० रुपये आकारत होते, जे त्या मित्राला शक्य नव्हते. रफीनी त्याला बोलावून आपल्या हळुवार आवाजात ते किती पैसे देऊ शकतो हे विचारताच तो हळूच पुटपुटला मला २००० रुपये शक्य आहे. 'रफीनी हॉर्मोनियम मागवला व ते रियाझाला बसले. हळदीपूर यांनी रफींना विचारले , आपण हे एक पैसाही न घेता गाऊ शकला असता. मग हे कसे? तेव्हां रफी म्हणाले, मला श्रीकांतला माझ्या उपकाराखाली ठेवायचे नव्हते. हा चित्रपट होता १९८१ सालचा 'संत ज्ञानेश्वर.' १९६८ साली 'जॉय मुकर्जीने 'हमसाया' नावाचा चित्रपट काढला होता, त्यामध्ये ओ.पी.नैय्यर यांनी रफीसाहेबांकडून 'दिल की आवाज भी सून' हे गीत गाऊन घेतले, जे अतीशय प्रसीद्ध झाले. पुढे हा चित्रपट साफ आपटला व जॉय मुखर्जीला फार मोठा आर्थीक फटका बसला. तेव्हां रफीसाहेब जॉयला भेटले व त्यांनी आपल्याला गाण्याचे मानधन म्हणून मिळालेल्या १०,००० रुपयांचे पाकीट त्याच्या हातात ठेवले. जॉय प्रथम ते घेत नव्हता. पण रफीनी त्याला पाठीवर थोपटून त्याच्याच गाण्याची ओळ ऐकविली, 'दिल की आवाज भी सून' आणि समाधानाने ते परतले.
हैद्राबादच्या भूतपूर्व अर्थमंत्र्यांची एक स्त्री नातेवाईक थायरॉइडच्या कर्करोगाने त्रस्त होती व मुंबईच्या जे.जे.इस्पीतळात शस्त्रक्रीया करण्यासाठी आली होती. तिला पैश्यांची अतीशय गरज होती. त्यावेळी तीने फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक नामवंतांचे दरवाजे खटखटावले पण सर्वच निष्फळ ठरले.योगायोगाने तिला एका हॉटेलमध्ये ओळखीचा एक वादक भेटला व त्याने रफीसाहेबांची भेट घेण्यास सांगीतले. रफीनी तात्काळ तिला त्याकाळात तिच्या शस्त्रक्रियेसाठी दहा हजार रुपयांची मदत केली. हरीदास प्रभू हे आरंभापासून इस्कॉन मंदीराशी जुळले गेले होते. त्यावेळी इस्कॉनसाठी एक सभागृह बांधण्याची योजना त्यांनी ठरविलीं. आणि यासाठी शंकर-जयकिशन नाईट ठरविण्यांत आली. निधी जमविण्याचा या समारंभात रफींसोबतच मन्ना डे, तलत महमूद यांनीही गीते सादर केली होती. याला श्रोत्यांचा प्रचंड प्रतीसाद मिळाला. व दुसरे दिवशी हरीदास रफी व्हिला येथे त्यांचे आभार मानायला गेले असता रफीसाहेबानी विचारले, तुमची पूर्ण रक्कम जमा झाली का? त्यावर हरीदास म्हणाले, आमचे लक्ष्य होते एक लाख रुपयांचे. पण ७५००० रुपये जमा झाले आहेत. त्यावर रफीसाहेब उठून आत गेले व २५००० रुपयांचा चेक लिहून त्यांनी हरिदासांना आणून दिला. एवढे प्रेम, ममत्व, आपुलकी आणि माणूसकीचा झरा नव्हे तर प्रचंड ओघ असणारा दुसरा माणूस कधीच कोणाच्या पाहण्यात आला नसेल.
अमीताभ बच्चन याना आलेला त्यांचा अनुभव तर माणूसकीचे मिसाल देणारा आहे. कांही वर्षांपूर्वी दार्जिलिंगजवळ सिलीकुडी येथे आर्मीच्या जवानांच्या मदतीसाठी एक गाण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात पहीला दिवस होता रफी साहेबांचा तर दुसरा होता तितक्याच प्रसिद्धीला पावलेल्या दुसऱ्या गायकाचा. अर्थात यामध्ये अभिनेत्यांचे काम होते ते मधूनमधून बोलण्याचे, गायकांची खुमासदार पद्धतीने ओळख करून देण्याचे. पहीला दिवस रफीसाहेबानी आपल्या दैवी आवाजाने सर्वाना मंत्रमूग्ध करून गाजवला. जगभरात त्यांच्या शोला लोक चक्क डोक्यावर घेत असत. सकाळी उठल्यावर रफीसाहेब आपले सामान आवरून विमानतळावर मुंबईला येण्यास निघाले. इकडे त्या दुसऱ्या गायकाने सकाळी आपण येत नसल्याचे कळविले आणि येथील आयोजकांच्या काळजाचे ठोकेच चुकले. आता एकच उपाय होता, तो म्हणजे रफीसाहेबाना गाठून त्यांना विनंती करणे. विमानतळ सुमारे १६ मैलावर होता. लगबगीने अमीताभ वगैरे धांवत निघाले. तोपर्यंत बोर्डींग झाले होते. विमानाचे दरवाजेही बंद झाले. अन अमीताभ यांनी तेथील अथॉरिटीला हात जोडून विनंती करून फक्त दोन मिनिटे रफीसाहेबांशी बोलण्याची विनंती केली. व त्या लोकांनी गांभीर्य ओळखून अमिताभना आत जाण्याची परवानगी दिली. रफीसाहेब स्थानापन्न झाले होते. आत येताच अमिताभनी त्यांना परिस्थीती सांगून परत येण्याची विनंती केली. अन्यथा लोकक्षोभ होण्याचा संभव असल्याचे सांगीतले. रफीसाहेब एकही शब्द न विचारता खुर्चीतून उठले, व खाली आले. व दुसरा दिवसही त्यांनी गाजवीला. एक निर्मळ मनाचा, शांत स्वभावी, अतीशय सज्जन, आणि ज्याच्यामध्ये मानवतेचे सर्व गुण ठासून भरलेले व्यक्तीमत्व असे म्हणून अमीताभनी त्यांचे मोठेपण सांगीतले. रफीसाहेबानी नेहमीच स्वतः दुसऱ्याला सलाम आधी केला. त्यांचाच हात नेहमी वर असे. पण त्यांनी आपल्याला किंवा दुसऱ्याला कधीच आपला हात प्रथम उंचावण्याची संधी दिली नाही, हे शल्य सचिन पिळगांवकर यांनी व्यक्त केले होते.
रफीसाहेब अत्यंत धार्मीक होते. खुदावर त्यांची नितांत श्रद्धा होती. नेमाने ते हाज यात्रेला जात. यात कधीच खंड पडला नाही. ते जेव्हां १९७२ साली हाज यात्रेला गेले, तेथे त्यांना एक मौलवी संत भेटला. त्याने रफीसाहेबाना सांगीतले की ते ज्या व्यवसायात काम करतात, ते धर्माच्या, कुराणाच्या विरोधी आहे. या जादुई नगरीत काम करणे हे एक पाप आहे. तेव्हां रफीसाहेबांना वाटले की खरोखरीच आपण खुदाशी प्रतारणा करीत आहोत का? त्याच्या आज्ञेचा भंग करतो आहे का? त्यांच्या मनाला हे खूपच लागले. ते मुंबईला परतले अन काही दिवसांनी लंडनला आपल्या मुलाकडे गेले. महीना उलटून गेला तरी त्यांचे परतायचे चिन्ह दिसेना. सर्वजण काळजीत पडले. इकडे अनेक संगीतकारांचे रेकॉर्डींग खोळंबले होते. त्यांचे रफींना फोन जाऊ लागले. कधीही या इंडस्ट्रीपासून दूर न राहीलेल्या रफींना हे कठीण जात होतेच! सर्वजण त्यांच्यापाशी जमले आणि तेव्हां रफीसाहेब म्हणाले, 'आजवर मी देवाच्या दरबारी गुन्हा करीत होतो. आता मी गाणार नाही.' तेव्हां दुसऱ्या एका धार्मीक माणसाने त्यांना सांगीतले की, अल्लाने तुझ्यावर संगीताची बरसात केली आहे. स्वर्गीय आवाजाची देणगी दिली आहे, आणि त्यायोगे मानवाची सेवा करण्याची आज्ञा केली आहे. ती तू धुडकावणार आहेस का? तू गाऊन लोकांचे मनोरंजन करावे हीच अल्लाची इच्छा आहे हे ध्यानात ठेव. तेव्हां कोठे रफीसाहेबांची समजूत पटली. व ते परत आपल्या कामात व्यस्त झाले.
एका युगाचा अंत
स्वर्गलोकीच्या देवांना रिझवण्याची योग्यता असलेल्या या गंधर्वाने चुकून मर्त्य मानवाच्या पृथ्वीतलावर येऊन सर्व जगाला स्वरानंद देण्यास सुरुवात केली त्यामुळे असूयेने स्वर्गातील भगवान -अल्ला-येशू हे देव लोक त्याला पुन्हां परत आणण्याच्या कामात मग्न होते. व ती संधी त्यांना एकदा मिळाली. तो दिवस होता जुलै ३१, १९८०. रफीसाहेबांच्या आयुष्यातील एक नेहमीचा दिवस. ते बाल्कनीत बसून विना साखरेच्या चहाचे घुटके घेत होते. दुसऱ्या हातात त्या दिवशी रेकॉर्डींग होणारे उर्दूमध्ये लिहीलेले गीत होते. तेवढ्यात कोलकात्यावरून दोन संगीत दिग्दर्शक बंगाली गाण्यासाठी रफीसाहेबांकडे आले. रीहल्सल सुरु झाली. तेवढ्यात त्यांच्या छातीत एक बारीकशी कळ आली. पण त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. पण हळूहळू वेदना वाढू लागल्या. घरी त्यांची लाडकी पत्नी बिल्कीस ही तापाने आजारी असल्याने विश्रांती घेत होती. रफीनी ॲसीडिटी झाली असे समजून त्याचे औषध घेतले. आणि ते पायऱ्या उतरून खाली आले. पण बिकिस यांना त्यांच्यातील फरक जाणवला. त्यांनी लगेच त्यांचे डॉक्टर चंदीरामाणी यांना बोलावले. रफी घामाने थबथबले होते. डॉक्टरांना त्यांना हार्ट अट्याक आल्याचे जाणवले. तात्काळ त्यांना नॅशनल हॉस्पीटल ( आताचे हिंदुजा) मध्ये हलवण्यात आले. हॉस्पिटलमध्ये कॉर्डिओलॉजिस्टची टीम हजर झाली. पेसमेकर बसविण्यात येणार होता. पण त्यावेळी त्या इस्पितळात ती सुविधा नव्हती. त्यामुळे ताबडतोब त्यांना बॉंबे हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. वाटेत जात असतानाच रफींना आणखी एक ॲटॅक आला. तो रमजानचा महीना होता. कुराणाचे पठण सुरु होते. त्यांच्यावर शस्त्रक्रीया झाली. रात्री ९.४५ च्या सुमारास त्यांना शुद्ध आली. बिल्किस यांना आत बोलावले.
.....आणि रात्री १०.२५ वाजतां कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. मोदी यांनी बिल्किसना ती भयानक बातमी सांगीतली, 'रफी राहीले नाहीत' चित्रपट सृष्टीतील इतिहासात प्रथमतःच दोन दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला. लाखो लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सामील होते. त्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अश्या सर्व धर्मीयांचा सहभाग होता. पावसानेही त्या दिवशी आपले अश्रू वाहात त्यात सहभाग घेतला. त्यांचे दफन झालें तेथील मूठ मूठ माती कित्येकांनी उचलून आपणासोबत घेतली. रफी हे संपूर्ण मानवजातीचे होते. संपूर्ण जगाचे होते. त्यांच्या पार्थीवासमोर नौशादसाहेबानी शायरी केली,
यूं तो सभी आते है दुनिया में मरने के लिये,
मौत उसकी है जिसका दुनीया करे अफसोस..
रफीसाहेब गेले त्यानंतर कांही दिवसानी कांही लोक त्यांचा पत्ता काढत रफी व्हिलावर पोचले. हे लोक कांही त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनाला आलेले नव्हते,तर इतके दिवस मदतीच्या पैश्यांची मनीऑर्डर येत होती, ती अचानक कशी बंद झाली ह्याची विचारणा करण्यासाठी आलेले होते. त्या बिचाऱ्यांना रफीसाहेबांचा अंतकाल झाल्याचेही माहीत नव्हते. अशी बरीच मदत कोणालाही न कळवता ते करीत असत. अगदी घरच्यांनाही नाही. पण त्यांना काय माहीत संगीताचा हा सूर्य ३१ जुलैच्या रात्री जो मावळला तो पुन्हा कधीच न उगविण्यासाठी ? त्यादिवशी एका संगीत युगाचा अंत झाला. एक ईश्वरी वरदहस्त असलेला गायक नाहीसा झाला. सरस्वतीच्या गळ्यातील रत्नहारातील एल मौलीक रत्न खळकन गळून पडले. एक असा माणूस नाहीसा झाला की ज्याचे नांव घेऊन माणूसकीची मिसाल दिली जात होती. एक निर्मळ मनाचा सज्जन हरपला. केवळ शतका शतकातून जन्माला येणाऱ्या महागायकाला त्यादिवशी भगवान-अल्ला-जीझस यांनी एकत्रीत रित्या येऊन त्याला आपणापासून हिरावून नेले. असा रफी पुन्हां होणे नाही. पण त्यांचा ईश्वरी आवाज आजही जगात सतत कुठेना कुठे गात असतो, आपले मन रिझवत असतो, आपल्याला आनंद देत असतो. रफी अमर आहेत. ते आपल्या हृदयांत सतत वास करून आहेत. आणि तेही आपल्याला साद घालताहेत, आणि त्यांचे स्वर वाऱ्याच्या लहरी सर्वत्र पोहचवतात आहेत,
तुम मुझे यूं भुला न पाओगे
जब कभी भी सुनोगे गीत मेरे
संग संग तूम भी गुनगुनाओंगे...
( रफी साहेबांच्या ९४ व्या जन्म दिनानिमीत्त त्यांना सतत हृदयात पुजणाऱ्या त्यांच्या एका चाहत्याकडून शब्द सुमनांजली )
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष











Comments
Post a Comment