आणि डॉ. काशीनाथ घाणेकर :


आजच सुबोध भावे यांचा नितांत सुंदर असा 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ हा चित्रपट पाहीला, व कित्येक दिवसांनी एक सुंदर असा चरीत्रपट पाहिल्याचा आनंद मिळाला. चित्रपट सुंदर, त्यातील व्यक्तीरेखा सुंदर, संवाद सुंदर (कांही सोडून) मनाची पकड घेणारी गती सुंदर आणि विशेष करून डॉ. काशीनाथ घाणेकर यांची भूमिका चक्क जिवंत केलेला सुबोध भावे यांचा अप्रतीम अभिनय. आमच्या पिढीतील माहीती असलेले अनेक व्यक्तीमत्वे यातून दिसून आली. यापैकी काहींशी परिचयही झाला होता. आता यातील बरीचशी पात्रे मूळ पात्रांशी साधर्म्य दाखवीत नाहीत. पण खुद्द दिग्दर्शकानी एका मुलाखतीत सांगीतले होते की, आम्हांला यात मूळ नायक दाखवायचे अथवा त्यांची नक्कल करायची नाही तर ती पात्रे दाखवून तो काळ उभा करायचा आहे. तेव्हां तोही प्रश्न उरत नाही. मात्र काशीनाथ यांची भूमिका करणारे सुबोध भावे जर का थोडे बारीक झाले असते तर आणखी गंमत आली असती. कारण काशीनाथ यांची शरीरयष्टी किरकोळ होती. मात्र यातील सुलोचनाबाई कोणत्याही अंगाने वा बाजूने त्या वाटत नाहीत. केवळ एक हालणारे चालणारे पात्र वाटते. अर्थात हे माझे मत आहे. पण त्यांना तसा चित्रपटात फारसा वाव नाही.


मला खटकणारा दुसरा मुद्दा म्हणजे चित्रपट सुंदर असला तरी तो एका ख्यातनाम कलाकाराच्या आयुष्यावर आधारीत आहे. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यातील नकारार्थी भाग किती दाखवावा यालाही मर्यादा आहेत. प्रत्येक मोठ्या व्यक्तीच्या आयुष्यात अश्या गोष्टी असतातच! मग ती व्यक्ती अभिनय क्षेत्रांतील असो, चित्रकलेच्या, साहित्याच्या कोणत्याही क्षेत्रांतील असो. पण जर कां त्या व्यक्तीने स्वतः आत्मचरीत्र लिहून त्यात आपले आयूष्य जर का उघडे केले असेल तर मग प्रश्न नाही. अर्थात नामावलीत त्यांनी कांचन घाणेकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेतल्याचे नमूद केले आहे. मात्र ते पुस्तक मी वाचले नसल्यामुळे त्यातील घटनांवर मी बोलू शकत नाही. अर्थात यात संवाद लेखकाचीही कमाल असते. काशीनाथ यांचे कित्येक संवाद काल्पनीकही असू शकतात. दरवेळी कोणतेही नाटक चालू असते तेव्हां 'लाल्या'चा चाहता वर्ग हजर  असतो आणि काशीनाथ शिरल्या शिरल्या शिट्ट्यांची बरसात करतो, हाही योगायोग वाटतो

शेवटी एक गोष्ट मात्र खटकली ती म्हणजे काशीनाथ जेव्हां आपण सिनेमात काम का करू लागलो हे सांगतात त्यावेळी उल्लेख करतात तो त्यावेळच्या गाजलेल्या वसंतराव जोगळेकरांच्या ' हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटाचा. व त्यातील गाजलेल्या ' गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय? ' या गीताचा. आणि त्यातील नृत्याचा. यासाठी त्याने या चित्रपटाचा टुकार दर्जा दाखविणारा एक असंस्कृत शब्द उच्चारला आहे. शिवाय एक मानसोपचार तज्ञ असा फुलाफुलांचा शर्ट घालून वाकडा तिकडा नाचेल काय ? हेही वाक्य त्याच्या तोंडी घातले आहे. एकतर ह्या चित्रपटातील गाणे व नृत्य वापरल्याबद्दल दिग्दर्शकांनी श्रेय नामावलीत वसंतराव जोगळेकरांचे आभारही मानले नाहीत. उलट काशिनाथच्या उद्गारानंतर त्या गाण्याचे जे शुटींग चालले होते तसे दाखवून त्यावेळच्या क्लॅपवर  दिग्दर्शक वसंत जोगळेकर हे नांव प्रामुख्याने दिसेल असे दाखविले आहे. मला वाटते हा जाणून बुजून केलेला उपमर्द आहे. कारण एकतर काशीनाथ असे जोगळेकरांच्या बाबतीत बोलणे शक्य नाही कारण ते त्यांना खूप मानत असत. शिवाय काशीनाथ आजारी असताना जोगळेकर सतत त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करीत असत. तसेच काशिनाथही वसंत जोगळेकरांकडे नेहमी येत. वसंतराव व सुमतीबाईंचा पाहुणचार घेत असत. इतकी त्यांची जवळीक होती. त्या वसंतरावांच्या चित्रपटाविषयी काशीनाथ कधीच बोलणे शक्य नाही. तेव्हां हे काल्पनीक संवाद असल्याची शक्यता आहे, पण त्यामुळे जोगळेकरांवर अन्यायही करणारे आहे. त्यातील गूढ कथानक, मधुर संगीत यामुळे हा चित्रपट चांगलाच चालला होता.  दुसरे म्हणजे ते कोळीगीत आहे. अशी गाणी ही अश्या चित्रपटांना आषयासाठी लागत असतात. नाहीतर ह्याच काशीनाथनी भालजींना एखादा मावळा सरदार घोड्यावरून गाणे म्हणत जातो का हे विचारले असते. किंवा ज्या पिंजऱ्यातील दृश्य दाखवले आहे त्यातही बरेच प्रश्न विचारण्याजोगे आहेत. हे विचारायचे धाडस दिग्दर्शक करेल का? तेव्हां वसंतरावांसारख्या बुजून व कल्पक दिग्दर्शकाबद्दल असे उद्गार लिहीताना या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दहा वेळा विचार करायला हवा होता. आणि 'हा खेळ सावल्यांचा''या चित्रपटाने काशीनाथ यांनाही चांगलेच कम बॅक मिळाले. आजही त्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून काम केलेले जयप्रकाश कर्नाटकी आहेत. व ते काशीनाथ बाबत सांगू शकतील.

एकूण मराठीमध्ये खूप दिवसांनी एक सुंदर चित्रपट आला आहे. तो प्रत्येकाने,  माणूस मराठी असो वा नसो, सर्वानी आवर्जून पाहावा असा आहे आणि तो अगत्याने पहावा. आणि चित्रपट सुंदर असल्याने तो चालवण्यासाठी  कोणत्याही राजकारणी लोकांची गरज भासू नये. चांगल्या चित्रपटाला प्रेक्षक आपणहून येतात. आणि मराठी चित्रपटश्रुष्टीला समृद्ध करतात!

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :