कल्पक नेपथ्यकार : रघुवीर तळाशीलकर
अठराव्या शतकापासूनच बंगाल व महाराष्ट्रात मनोरंजनाचे साधन म्हणून थेटरमध्ये लोक जाऊ लागले. नाटक हे अर्थातच मनोरंजनाचे साधन असायचे. नाटकाच्या एकूण आशयाचे प्रतीक म्हणून एकच भव्य चित्रांकृत पडदा पार्श्वभूमीवर दाखवीला जाऊ लागला. यानंतर त्यात सुधारणा होऊन नाटकातील दृश्याप्रमाणे तीन ते सहा पडदे राजवाडे, जंगल, मंदीर, महाल अशी ठिकाणे नाटकाच्या आषयाप्रमाणे दाखवू लागले. हे पडदे एरव्ही वरती गुंडाळून ठेवण्यात येत व गरजेचा पडदा खाली सोडण्यात येत असे. हे पडदे रंगविणारे कलाकारही निष्णात असे असत. कांही कलाकार तर पहील्या पडद्यालाच टाळी घेण्याचा विक्रम करीत असत. गंधर्व संगीत मंडळी, ललीत कलादर्श, किर्लोस्कर नाटक मंडळी अश्या मोठमोठ्या संगीत नाटकें सादर करणाऱ्या नाट्य संस्था अश्या मातब्बर कलाकारांकडून हे भव्य पडदे बनवून घेत. पुढे साधरणतः त्या शतकाच्या अखेरीस निरनिराळ्या आकाराची चित्रे कापून ती एकमेकांपुढे ठेवून त्यातील खोली ( depth ) दाखविण्यांत येऊ लागली.
यानंतरचा काळ होता तो वास्तववादी दृष्य निर्मीतीचा! यापूर्वी नाटके असत ती बहुदा पौराणीक,ऐतिहासीक आणि संगीतप्रधान नाटके असल्याने त्यातील नट हा गायक असायचा. पण या वास्तववादी नाटकांनी त्यात महत्वाचा बदल घडविला. सामाजीक समस्यांवर विविध नाटके लिहीली जाऊ लागली. स्टेजवर विविध पातळ्या दर्शवून त्यात खरेपणा जाणवू लागला. यामध्ये फर्निचरचा सुद्धा समावेश होता. १९५३ पासून मराठी थेटर मध्ये जुन्या जीर्ण अश्या विचारांचे पुनरुज्जीवन होऊन अनेक कलाकारांच्या विचारातून, कल्पकतेतून आणि प्रयोगशीलतेतून नवनवीन कल्पना साकारू लागल्या. यात स्टेज संकल्पन कसे मागे राहील? ते तर नाट्यसृष्टीचा आत्माच मानला गेला आहे. त्यालाही या नवचैतन्याची संजीवनी मिळाली. अनेक अमूर्त आकारांचा वापर करून प्रतीकात्मक नेपथ्य केले जाऊ लागले. अनेक जेष्ठ आणि श्रेष्ठ असे कलाकार यामध्ये आघाडीवर होते, ते म्हणजे द.ग.गोडसे, दामू केंकरे, मोहन वाघ, श्याम आडारकर आणि रघुवीर तळाशीलकर ज्यांनी थेटरच्या नेपथ्याला एक नवा आविष्कार दिला. यापैकी रघुवीर तळाशीलकर ह्यांनी अनेक नाटकांना आपले कल्पक नेपथ्य देऊन मराठी रंगभूमीवर आपला एक ठसा उमटवीला.
रघुवीर विश्वनाथ तळाशीलकर यांचा जन्म १९३५ मधला. कोकणच्या मातीतील कला उपजतच घेऊन ते जन्माला आले. सर्वसाधारणपणे कलेचा ध्यास घेतलेला विद्यार्थी जसा मुंबईच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट कडे येतो तसेच रघुवीरचेही झाले.
सर ज.जी.उपयोजीत कला संस्थेमधून त्यांनी उपयोजीत कला शिक्षण घेतल्यानंतर तळाशीलकरानी पुस्तकांच्या बोधचित्रांचे आधुनीक तंत्राचे प्रशिक्षण घेतले. त्याचसोबत इंडियन नॅशनल थिएटरतर्फे आयोजीत केलेल्या कार्यशाळेतही त्यांनी सहभाग घेतला. येथेच त्यांची नाट्य व्यवसायाशी नाळ जुळली. आम्ही जेव्हां जे.जे.मध्ये विध्यार्थी होतो, त्या ६० च्या दशकांत त्यांचे नांव दुमदुमत होते ते नेपथ्यकार म्हणून. तसेच आमचे प्राध्यापक दामू केंकरे हेही नाट्यक्षेत्राशी तितकेच निगडीत असल्याने तळाशीलकर यांचे इतर नाट्यकर्मींप्रमाणे जे.जे.मध्ये त्यांच्याकडे सतत येणे होत असे. त्या वेळी ताम्हाणे यांची प्रदर्शने,डिस्प्ले करण्याची 'डिझाईन ऑर्गनायझेशन' ही नामांकीत संस्था होती. नंतर नामवंत म्हणून नावारूपाला आलेल्या कलाकारांनी याच संस्थेतून आरंभीची उमेदवारी केली होती. त्याप्रमाणे तळाशिलकरांनी देखील ती केली होती. पुढे कांही काळ त्यानी 'फिल्म डिव्हीजन' तसेच 'टाइम्स ऑफ इंडिया' मध्ये काढला. येथे ते बोधचित्रे व व्यंगचित्रे काढीत असत. नंतर त्यांच्या प्रदर्शन व डिस्प्ले कामाचे वैशिष्ट्य पाहून 'ट्रेडफेअर अथॉरिटी ऑफ इंडीया' मध्ये प्रदर्शन संकल्पनाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण नोकरीत त्यांचे मन फार रमत नव्हते. म्हणून त्यांनी नोकरीला सरळ रामराम ठोकला अन स्वतःची 'आईडियास' ही डिझाईन संस्था १९६९ मध्ये शिवाजी मंदीर येथे स्थापन केली. येथून पुढे रघुवीर तळाशीलकर यांचा प्रदर्शने, इंटेरीअर डिझाईनर, डिस्प्ले डिझाइनर, असा प्रवास सुरु झाला. तरीही रघुवीर तळाशीलकर हे नांव महाराष्ट्रातील घरांघरात परीचीत झाले ते नेपथ्य व स्टेज डिझाइनर म्हणून! साधारणतः १९५९ पासून तळाशीलकर हे मराठी नाट्यसृष्टीशी संबंधीत राहीले. आपल्या नाट्यसेवेच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांनी जवळजवळ प्रत्येक नांवाजलेल्या नाट्य संस्थेचे सेट डिझाईन केले. अनेक लेखक दिग्दर्शक यांच्या सोबत त्यांनी काम केले. आणि तेही त्यावर आपला स्वतंत्र असा ठसा उमटवून, जो कधीच पुसला जाणार नाही.
तळाशीलकर यांनी आपल्या कारकीर्दीतील पहीले स्टेज डिझाईन बाल रंगभूमीसाठी केले. त्या काळापर्यंत अगदी पारंपारीक पद्धतीचे रंगविलेले पडदे वापरण्यांत येत. त्यामुळे कित्येकदा ते नाटकाच्या मूळ कल्पनेलाही मारक ठरत. पण तळाशीलकरानी सेटच्या आकारमानाप्रमाणे पडदे बनवून घेतले, जे मूळ नाटकात पूरक असे ठरतील व नाटक अधीक बोलके व स्पष्ट होईल. या दरम्यान त्यांनी सुधा करमरकर यांच्या सोबत अनेक बालनाट्यावर काम केले. त्यापैकी 'अल्लादीन आणि जादूचा दिवा',
'निम्मा शिम्मा राक्षस', कळलाव्या कांद्याची कहाणी' ही होत.
नेपथ्य करतांना तळाशीलकर त्यात नेहमीच नवनवीन प्रयोग करीत असत. वास्तववादी, प्रतीकात्मक अश्या नेपथ्याच्या ज्या मूळ कल्पना आहेत ते त्या एकत्रीतरीत्या बेमालूमपणे साधत. तेही त्यातील कलात्मकता व सौंदर्याची अभीरुचीं ठेवून! यातून त्यांनी 'अश्रूंची झाली फुले' या नाटकांत जो विमानतळ दाखवीला, त्याच्या रनवेचे दिवे हे खरोखरच्या धावपट्टीची जाणीव करून देऊन प्रेक्षकांची दाद घेऊन गेले. हे नाटक जेवढे काशीनाथ घाणेकरांच्या 'लाल्या'वर गाजले, तेवढेच तळाशीलकरांच्या नेपथ्याने त्याचे नांव वाढवीले. 'सभ्य गृहस्थ हो' या प्रा. दामू केंकरे दिग्दर्शीत नाटकाची चाळीची ग्यालरी त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याच्या पातळीशी ठेवली. त्यामुळे खालून जात येत असलेल्या वर्दळीची जाणीव होत असे. आचार्य अत्रे, विजया मेहता, विश्राम बेडेकर, मो.ग.रांगणेकर, डॉ. श्रीराम लागू, पुरुषोत्तम दारव्हेकर अश्या सर्वच नाट्य सृष्टीतील उत्तुंग शिखरांसोबत रघुवीर तळाशीलकरांनी काम केले आहे. अश्रूंची झाली फुले, नटसम्राट, टिळक आणि आगरकर, वाडा चिरेबंदी अश्या यशस्वी नाटकांचे सेट त्यांनी बनवीले. सेट डिझाईन करतांना नाटकाचे स्वरूप ते त्यातून जाणवून देत. 'लेंकुरे उदंड झाली' या श्रीकांत मोघे यांनी भूमिका केलेल्या नाटकांत त्यांनी मध्यमवर्गीय लोकांची चाळ दाखवीली होती. पडदा वर जातांच दिसून येत असे ते त्या घरातील स्वच्छ व चकचकीत वातावरण. क्षणभर प्रेक्षकांना चाळीतील घर इतके स्वच्छ कसे? हे खटकत असे. पण जेव्हां त्यातील पात्र म्हणते, 'आमचा हा नीटनेटकेपणा बिघडवणारा आमच्याकडे येईल का? त्यावरून त्यामागील कल्पना चटकन जाणवते. कारण त्या जोडप्याला मूल नसतं. त्यामुळे घर अस्ताव्यस्त करणाऱ्या लाडक्याचा अभाव होता.
असाच एक प्रसंग 'मीरा मधुरा' या नाटकांत आहे. नाटकांच्या पहील्या अंकात मीरेच्या कृष्ण भक्तीने सर्वच त्रासलेले असतात. त्यामुळे राजा तेथेच कृष्णाचे मंदीर बांधायचे ठरवतो. त्यासाठी कृष्णाचा एक पुतळा बनविण्यात आला. रिहल्सलच्यावेळी दुसऱ्या अंकात तो पुतळा स्टेजच्या मध्यभागी ठेवण्यांत आला. पण दिग्दर्शकांना तो पुतळा इतर अभिनेत्यांच्या हालचालींना मारक ठरेल असे वाटून त्यांनी तळाशीलकराना तसे सांगीतले. पण तळाशीलकर म्हणाले, हेच तर पाहीजे! कारण मीरेची कृष्णभक्ती ही सर्वांना त्रासदायकच आहे. त्यासाठीच कृष्ण येथे उभा केला आहे. तो खटकणाराच वाटला पाहिजे.
नाट्यक्षेत्राइतके तळाशीलकर प्रदर्शने व चित्ररथ यांच्या उभारणीत रमले. जे.जे.स्कुलने संकल्पीत केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या 'बैल पोळा' या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथाची उभारणी त्यांनीच केली होती. त्यावेळी त्यात आलेल्या तांत्रीक अडचणीवर मात करून हा चित्ररथ दिमाखात दिल्लीत संचलनात फिरला. महाराष्ट्र पर्यटन विभागासाठीही तळाशिलकर यांनी अगणीत काम केले आहे. एलिफंटा व अजंठा फेस्टिव्हलच्या वेळी जे दिमाखदार कार्यक्रम झाले त्यासाठी रघुवीरनी तितकेच अप्रतीम सेट उभारले. शासकीय प्रदर्शनाची कामेही केवळ त्यांच्यातील सर्जनशीलता जाणूनच त्यांच्याकडे येत असत. शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरे यांनी भरविलेले 'शिवसृष्टी' या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील भव्य प्रदर्शनातही तळाशीलकर यांचे योगदान होते. अश्या या हरहुन्नरी,अष्टपैलू, स्पष्टवक्ता तसेच सर्वांशी प्रेमळ वागून मातीशी नाते सांगणाऱ्या कलाकारांशी आमचा संबंध आला हे आमचे भाग्यच होते. ते जेव्हां कांही बैठकींना निवड समितीचे सदस्य म्हणून कला संचालनालयाच्या बैठकींना येत तेव्हां बैठकीत आपले म्हणणे परखडपणे मांडत असत. त्यानंतर त्यांच्याकडून कांही किस्से ऐकण्यात मजा येत असे. २००६ चा तो काळ होता. तळाशिलकरांवर मला लिहायचे होते. त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या रंगभूमीवरील कारकीर्दीतील कांही किस्से ऐकायचे होते. त्यासाठी एकदा त्यांच्या घरी जमायचे होते. त्यांनी आपण केलेल्या कांही कामाची छ्यायाचित्रेही मला पाठविली होती. त्त्यां काळात त्यांची तब्येतही जरा नाजूक झाली होती. २८ नोव्हेंबर रोजी मी सर ज.जी.उपयोजीत कला संस्थेमध्ये चित्रकार जे.पी.सिंघल यांचे चित्र प्रदर्शन पहात असतांनाच एका मित्राचा फोन आला. त्याने धक्कादायक अशी दुःखद वार्ता कानावर घातली. 'रघुवीर तळाशीलकर आज पहाटे गेले' हीच ती दुःखद वार्ता!
रघुवीर तळाशीलकर हे नाट्य व्यवसायातील एक नावाजलेले नांव. नेपथ्य आणि तळाशीलकर हे दोन्ही शब्द एकमेकांशी जुळले गेले होते. त्यांच्याकडे आमची बैठक जमली नाही ही हुरहूर मात्र कायमची राहीली. रघुवीर तळाशीलकर हे प्रतिभावंत होते. त्यांचे केवळ नांवच नव्हे,तर त्यांची कला सुद्धा वजनदार होती. नेपथ्यकार म्हणून त्यांचा लौकीक सर्वदूर पसरला होता. होतकरू व अन्य कलाकारांना चार मोलाच्या गोष्टी शिकवणाऱ्या तळाशीलकराना आम्ही कायमचे मुकलो. पण अजूनही नाट्य, प्रदर्शन, फॅब्रीकेशन,नेपथ्य या क्षेत्रांत त्यांचे नांव कायमचे जोडले गेले आहे ते कधीच पुसले जाणार नाही!
-प्रा.मं. गो.राजाध्यक्ष

Very informative. There is very less literature available on designers. I would like to talk to you about an exhibition that happened in Mumbai in 1974 of which Talashilkar was the designer. Kindly let me know when and how can I get in touch.
ReplyDeleteWish there was an English translation of this. He was my uncle's colleague in Film's Division, and a frequent visitor to our home in Bombay, in the 1960s. I recall him singing, Dolyamadhale aasoo pusathi, in our living room. Found it online yesterday, and listened to it, after decades!!
ReplyDelete