'पब्लीक क्राय फंड' अर्थात लोकांकडून पैसे मिळवणे :



हल्ली बऱ्याच वेळा टीव्ही चॅनल असो, वा वृत्तपत्रे असोत त्यावर एखाद्या गोष्टीसाठी पैसे जमवायचे असतात, त्यासाठी जनतेला एक भावनीक आवाहन केले जाते. मग ती व्यक्ती गरीब कुटुंबातील परीक्षेत जास्ती मार्क मिळवणारा अथवा मिळवणारी आणि पुढील शिक्षणासाठी पैशांची गरज असलेली असते, मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी अथवा एकाकी जीवन जगणाऱ्यांसाठी  अश्या प्रकारे आपापल्या चॅनलवरून अथवा वृत्तपत्रातून त्यांच्यासाठी खास बॅंक खाते उघडून त्यात रक्कम जमा करण्यास सांगीतले जाते. आणि यामुळे कित्येक व्यक्तींना त्यांच्या जीवनांत स्थैर्य मिळाले आहे. एका प्रकारे हा उपक्रम स्तुत्य मानला जावा. पण त्यातील दुसरीही बाजू आहे, ती म्हणजे अश्या आवाहनानंतर लोक विचार न करता भराभर चेक पाठविण्यास सुरुवात करतात. आपल्या पैशांचे पुढे काय होते, एकूण किती पैसे जमा होतात याचा विचार क्वचीतच कोणी करीत असेल. येथे कोणाचा उपमर्द करणे अथवा त्यावर शंका उपस्थीत करण्याचा प्रश्न नाही. पण आपण जे पैसे देतो त्याचा विनीयोग योग्य होतो की नाही याची माहीती मिळवणे हा प्रत्येक दात्याचा हक्क आहे. जेव्हां डी.एस.कुलकर्णी आपल्या व्यवसायांत डुबले तेव्हां त्यांनी 'पब्लीक क्राउड फंड' नांवाच्या फंडाची माहीती दिली होती. जेव्हां अमेरीकेत एखादा प्रामाणीक व्यावसायीक डुबतो किंवा अडचणीत येतो, तेव्हां सामान्याकडून आर्थीक मदतीची मागणी केली जाते. एखाद्या प्रामाणीक माणसाला त्याने केलेल्या सेवेला मदत करून त्याचे बुडणारे जहाज वाचविण्यासाठी काही उद्योगपतीं एकत्र येतात व सामान्यजन एकत्र येवून  त्या बुडत्या जहाजाला भरभक्कम आर्थीक मदतीचा टेकू देऊन त्याला वाचवीतात. शिवाय हे पैसे परत करण्याची गरज नसते. ते त्या व्यक्तीला भेट म्हणूनच दिले जातात. व त्यातून तो आपले कर्ज, लोकांची देणी वगैरे भागवू शकतो.  एखादा बिल्डर अडचणीत आला तर त्याच्यामागे समाज उभा राहतो आणि त्याच्या बॅंकेच्या अकाऊंट मध्ये जसे जमतील तसे पैसे भरू लागतो. व ते भांडवल म्हणून पुरवतात. व ते पैसे परत मागत नाहीत. ती देणगी समजून दिली जाते. अश्या प्रकारे क्राऊड फंडींग करण्याचे डी. एस.कुलकर्णी यांचे प्रयत्न चालू होते. पण पुढे कोर्टाने त्यांना शेवटी आत टाकलेच!

आता हे झाले एखाद्या चित्रपटाचे ट्रेलर. आता पुढील कथानकाकडे वळू. अमेरीकेसारख्या देशांत हे ‘पब्लीक क्राऊड फंडींग’   प्रकरण बरेच प्रसीद्ध आहे. एखादी संस्था, अश्या गरजू लोकांना, समाजसेवी संस्थांना, दिव्यांगांना मदत करण्यासाठी याचा वापर करून त्यांना सावरतात. त्यामुळे कोणाचे कधी नशीब उघडेल हे सांगता येत नाही. आणि या सर्वाना महत्वाची जोड असते ती माध्यमांची. टीव्ही. वृत्तपत्रे, सोशल मिडीया ही माध्यमे  साऱ्या जगात ह्या गोष्टी पोचवून जनतेला मदत करण्यास उद्युक्त करीत असतात. आणि संपूर्ण राष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी अशीच एक घटना अमेरिकेतील एका शहरांमध्ये घडली. शनीवार दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ च्या टाईम्स ऑफ इंडियाच्या अंकात  एक बातमी आली आहे. अमेरीकेतील न्यू जर्सी भागातील  केटी मॅक्ल्यूअर नावांची एक महीला एक दिवस आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी एका पेट्रोलपंपावर गेली होती. तेथे सर्वच डिजिटल असल्याने पंपावर कोणीच नव्हते. एवढ्यात तिच्या ध्यानांत आले की ती सोबत आपली पर्स घेण्यास विसरली आहे. त्यामुळे रोख रक्कम, अथवा कार्ड यापैकी काहीच तिच्याकडे नव्हते. जवळपास कोणी व्यक्तीही दिसत नव्हती. काय करावे ते सुचत नव्हते. एवढ्यात तिचे लक्ष रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका अजागळ कपडे घातलेल्या, चेहऱ्यावर दाढी वाढलेल्या एका गृहस्थाकडे गेली. हातात एक मदतीची साइन घेऊन तोही केटी म्यॅक्ल्यूअरची धडपड पहात होता. केटीने त्याच्या जवळ जाताच त्याने तिची अडचण जाणली. तिला गाडीत बसून लॉक करण्यास सांगून तो गेला,व थोड्याच वेळांत तो परतला तो त्याच्या हातात लाल रंगाचा ग्यासचा कॅन होता. मोठ्या कृतज्ञतेने केटी म्यॅकल्यूअरने त्याचे आभार मानले. व सोबत पैसे नसल्याने थंडीने कुडकुडणाऱ्या त्या जॉनी बॉबीट वर स्वतःचे गरम जॅकेट घातले, ग्लोव्ह्स दिले व  त्याचे पैसे परत करण्यासाठी त्याचा पत्ता मागून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी केटी आपला बाॅयफ्रेंड  मार्क द ॲमीको यांच्या सोबत जॉनी बॉबीट याला १०० डॉलर्स द्यावे या हेतूने त्याच्या घरी पोचले.

तेथे ते पोचतात ते काय? ते घर असे नव्हतेच! एका खुराड्यात कसेबसे जॉनी बॉबीट रहात होता. तेव्हां या जोडप्याचे कुतूहल जागृत झाले. व त्यांनी त्याची हकीकत विचारण्यास सुरुवात केली. तेव्हां केटी ॲमीको व मार्क हे दोघेही अचंब्यात पडले. मुळात जॉन बॉबीट हा अमेरिकेच्या नौदलात काम करीत होता. आपल्या कारकीर्दीत त्याने बरीच उल्लेखनीय कामे केली होती. युद्धात  देखील त्याने प्रशंसनीय कामगिरी केली होती. बरीच पदके, प्रमाणपत्रे त्याच्यापाशी या घटनांची साक्ष देत होती. पण आरमारातून निवृत्त झाल्यावर त्याच्या नशिबात केवळ दुखी जिणे आले. डोक्यावर छप्पर देखील नसलेला बेघर झाला हा देशाची सेवा केलेला सैनिक. सरकारने त्याच्याकडे बिलकुल लक्ष दिले नव्हते. तेव्हां त्याच्यासाठी कांहीतरी करावे ही एकच भावना केटी - मार्क ॲमीको यांच्या मनात दाटून आली. आणि त्यांनी जॉन साठी भरगच्च योजना आखण्याचे ठरवीले. त्यांच्यातील माणूसकी जागी होऊन एका बेघरला घर देण्याची योजना आकार घेऊ लागली. आणि येथवर या चित्रपटाचे मध्यंतर आले असे समजायला हरकत नाही. कारण पुढे क्लायमॅक्सकडे जायचेच आहे.


सर्वप्रथम केटी - ॲमीको यांनी जॉनच्या नांवे 'गो फंड मी ' नावाचे सोशल मीडिया वर एक पेज तयार केले. त्यावर ह्या जॉनची सर्व हकीकत टाकून त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आर्थीक मदतीची कशी आवश्यकता आहे हे जाणवून देऊन त्याला भरघोस मदत करण्याचे भावनीक आवाहन केले. शिवाय निरनिराळे टीव्ही चॅनल, वृत्तपत्रे, सेवाभावी संस्था यांच्याशी देखील या जोडीने संपर्क साधला. जोडीला जॉनची हजेरी असेच! आणि देशासाठी सेवा केलेल्या या शूर आणि सच्च्या सैनिकाला मदत करण्यास पैशांचा महापूर लोटू लागला. आधी केवळ १००० डॉलर्स जमवीण्याचा हेतू बाळगून असलेल्या या त्रिकूटाला येणारे पैसे पाहून त्यांचे डोळे विस्फारले गेले. आणि हां हां म्हणता त्याच्या बॅंक खात्यात तब्बल हजारो रुपयांचा भरणा झाला. अमेरीकेतील पोलीस खाते अतीशय जागृत असते. त्यांना या ' गो फंड मी' या पेजचा संशय आल्याने त्यांनी एकूण प्रकारची चौकशी सुरु केली. अमेरीकेच्या नौदलात चौकशी केली तेव्हां त्यांना ह्या नावाची व्यक्तीच तेथे कधी नसल्याचे आढळून आले. आणि मग फासे पडू लागले. एकेक पुरावा जमा होऊ लागला आणि सरतेशेवटी केटी-ॲमीको - जॉन ह्या त्रिकुटाला फिलाडेल्फिया पोलिसांनी पकडले. आणि त्यांच्यावर कोर्टात खटला दाखल करण्यात आला. तेथे केटीने व तिच्या सहकार्यांनी आपल्या सर्व लबाडीची कहाणी ऐकवीली. आणि शिवाय सर्वांचे पैसे परत करण्याचे मान्यही केले. पण हा पूर्णपणे नियोजीत गुन्हा असल्याने सरकारनेही गुन्हेगारांना कडक शासन व्हावे यासाठी कंबर कसली आहे.

जेव्हां क्राउड फंडींग मुळे कोणीही विना चौकशी पैसे दान करतात हे माहीत झाल्याने केटी -अमिगो या दुकलीने अश्याप्रकारे धाडस करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना हवा होता एक तिसरा साथीदार जो सदैव पैशांच्या अडचणीत असेल. आणि लवकरच त्यांना तो ' शुगर हाऊस कॅसीनो मध्ये मिळाला. आणि एक योजना जन्माला आली. आक्टोंबर २०१७ मध्ये हे प्रकरण सुरु झाले. येथेच त्यांचा जॉनशी संबंध आला. आणि याच कॅसिनोमध्ये १० नोव्हेंबर २०१७ मध्ये 'गो फंड मी' पेज तयार झाले. जॉन यातील बेघर नौदलातील सैनीक बनला. गाडीतील पेट्रोल संपले वगैरे संपूर्ण खोटी गोष्ट होती. नौदल सैनीककेवळ या व्यक्तीला सहानुभूती मिळावी म्हणून बनविलेले हे एक तद्दन खोटे पात्र होते. म्हणतात ना, 'क्राईम नेव्हर पेज' त्याप्रमाणे हे प्रकरणही उघडकीस आले. अश्या प्रकरणामुळे उद्या खरोखरीच ज्यांना गरज आहे, त्यांना पण कोणी मदत करायला पुढे येणार नाही ही भीती सध्या अश्या सेवाभावी संस्थांना भेडसावीत आहे. आणि पब्लीक प्रॉसिक्यूटर स्कॉट कॉफीना हे या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी झटत आहेत.

आहे की नाही एखाद्या चित्रपटासारखी उत्कंठा वर्धक कथा. यावर हॉलिवूडमध्ये चित्रपट नक्कीच निघेल. आणि असे गुन्हेगार नवनवीन क्लुप्त्या शोधण्याचे प्रयत्नही शोधत असतील. म्हणूनच म्हणतो, भावनेच्या आधारी जाऊन दान करू नका. त्यातील सत्यता पडताळा. कारण दान नेहमी सत्पात्री असावे!

- प्रा. मं.गो.राजाध्यक्ष

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :